HomeHindiWeb Series

आरोप प्रत्यारोपांचा रंगला खेळ..! पण खरा खूनी कोण..? “क्रिमिनल जस्टिस : अ फॅमिली मॅटर्स” वेब सीरीज समीक्षा

A colorful game of accusations and counter-accusations..! But who is the real murderer..? “Criminal Justice: A Family Matters” Web Series Review

Written by : आकांक्षा कोलते

Updated : जुलै 08, 2025 | 11:41 PM

जिओ हॉटस्टार वरील “क्रिमिनल जस्टिस” ही वेबसिरीज प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली. या सिरीज चा पहीला भाग प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता, तुलनेत दुसरा आणि तिसरा तेवढा आवडला नाही. आणि आता २०२२च्या तिसऱ्या सिझन नंतर “क्रिमिनल जस्टिस : अ फॅमिली मॅटर्स” हा चौथा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. यावेळी सगळ्याच जास्त प्रेक्षकांनी नाराजी यासाठी व्यक्त केली की यावेळी दर गुरुवारी एक भाग असं करत एकूण आठ भाग प्रदर्शित झाले. त्यामुळे एक एक भाग बघत शेवटपर्यंत ती उत्कंठा राहत नाही. तरीही सस्पेन्स थ्रिलर चित्रपट किंवा वेबसिरीज ज्यांना आवडतात त्यांना ही सिरीज या विकेंडला आता एकाच वेळी बघता येईल. आता या सिरीज चा हा सिझन कसा आहे.? आम्हाला तो‌ कसा वाटला ते बघूया.

A colorful game of accusations and counter-accusations..! But who is the real murderer..? “Criminal Justice: A Family Matters” Web Series Review

क्रिमिनल जस्टिस : अ फॅमिली मॅटर्स (Criminal Justice: A Family Matter)
२०२५. रहस्य, थ्रिलर, गुन्हेगारी, कोर्ट ड्रामा. [U/A १६+]
लेखक हरमान वडाला, राहुल वेद प्रकाश, वर्षा रामचंद्रन, रिया पुजारी, संदीप जैन, समीर मिश्रा, अनुराग पांडे
दिग्दर्शकरोहन सिप्पी
कलाकारपंकज त्रिपाठी, सुरवीन चावला, मोहम्मद जीशान अयूब, श्वेता बासु प्रसाद, आशा नेगी, खुशबू अत्रे, आत्मप्रकाश मिश्र
निर्माताअप्लॉज एंटरटेनमेंट
सीजन
रिलीज तारीख२९ मे – ३ जुलै २०२५
भाषाहिंदी
डबिंगमराठी, तमिळ, तेलुगु, मल्याळम, कन्नड, बेंगाली
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.६⭐/ ५

क्रिमिनल जस्टिस : अ फॅमिली मॅटर्स” वेब सीरीज समीक्षा :-

     क्रिमिनल जस्टिस या वेबसिरीजची ही खासियत म्हणुया किंवा योगायोग परंतु प्रत्येक सिझन मध्ये मर्डर केस ही एक हाय प्रोफाईल मर्डर केस असते. आताही या भागात मुंबईतील एक प्रथितयश सर्जन डॉक्टर राज नागपाल (मोहम्मद जीशान अय्यूब) यांच्यावर त्यांचीच प्रेमिका रोशनी हीच्या खुनाचा आरोप आहे. तर डॉ. राज नागपाल आणि त्यांची पत्नी अंजू (सुरवीन चावला) यांच्यात रितसर घटस्फोट झालेला नसला तरीही ते दोघं वेगळे झालेले आहेत. अंजू ही आपल्या मुलीच्या देखभालीसाठी राजच्या घरासमोरील फ्लॅट मध्येच राहत असते. कारण त्यांची मुलगी इरा हिला ॲस्पर्गर्स सिंड्रोम नावाचा आजार असतो. आणि आपल्या मुलीसाठीच अंजू ने तिची वकीलीची प्रॅक्टिस बंद केलेली असते, जेणेकरून ती मुलीला पूर्ण वेळ देऊ शकेल. तर एकीकडे राज याचं सुद्धा आपल्या मुलीवर प्रचंड प्रेम असतं. तो सुद्धा तिची खूप काळजी घेत असतो आणि म्हणूनच त्याने तिच्यासाठी केअरटेकर म्हणून एक नर्स अपॉइंट केलेली असते. ही नर्स म्हणजेच रोशनी. रोशनी इराची काळजी छान घेत असतेच पण या दरम्यान राज आणि रोशनी यांच्यात एक नातं निर्माण होतं. आणि अर्थातच हे नातं कालांतराने सगळ्यांसमोर येतं. अगदी अंजूला सुद्धा हे नातं स्विकारावं लागतं. 

      सगळं काही सुरळीत चालू असतानाच इराचा वाढदिवस येतो. आणि तिच्या वाढदिवसाच्या पार्टीत राज आणि रोशनी यांच्यात थोडासा वाद होतो. आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी राज जेव्हा जॉगिंग करून परततो तेव्हा त्याच्याच घरात त्याची प्रेयसी रोशनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली असते. राज तिला वाचवण्यासाठी प्रयत्न करतो परंतु रोशनीला तो‌ वाचवू शकत नाही. थोड्याच वेळात तिथे त्यांची कामवाली येते आणि मग पत्नी अंजू. परंतु ज्या अवस्थेत राज रोशनी सोबत असतो त्यावरून प्राइम सस्पेक्ट म्हणून राजला अटक होते. आणि मग सुरू होतो न्यायालयातील खटला. अंजू राजला सोडविण्यासाठी आपले द माधव मिश्रा म्हणजेच पंकज त्रिपाठी यांना अपॉंईट करते. आणि मग नेहमीप्रमाणे माधव मिश्रा सत्य काय ते शोधून काढण्यासाठी एकदम खोलवर जाऊन शोध घेऊन आपली बाजू मांडत असतात. परंतु ट्विस्ट असा येतो की अंजूवर सुद्धा संशय निर्माण होतो आणि मग आधी माधव मिश्रा विरूद्ध पब्लिक प्रोसिक्यूटर लेखा अगस्त्या(श्वेताप्रसाद बासू) या खटल्यात अजून विरोधी वकील येतात त्या म्हणजे ॲडव्होकेट मंदिरा माथुर (मीता वशिष्ठ). आता मंदिरा माथुर अंजूला वाचविण्यासाठी प्रयत्न करत असतात तर माधव मिश्रा राजला. परंतु लेखा अगस्त्या या पब्लिक प्रोसिक्यूटर असल्यामुळे त्या ज्या प्रकारे त्यांची बाजू मांडतात त्यानुसार रोशनीचा खुन राज आणि अंजू या दोघांनी मिळून केलेली असतो असं त्या सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. आता खरंच रोशनीची हत्या दोघं मिळून करतात की राज करतो, की अंजू.? या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी ही वेबसिरीज बघावी लागेल. 

       प्रत्येक एपिसोड असा आहे की आपल्याला जे वाटतं ते एपिसोड संपताना खोटं ठरतं आणि वेगळंच सत्य आपल्यासमोर येतं. प्रत्येक वकील आपल्या क्लायंट ला वाचवण्यासाठी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतो. त्या प्रत्येकाची बाजू ऐकून आपणही गोंधळात पडत असतो. खरं तर यावेळी माधव मिश्रा यांना जास्त स्क्रीन टाईम मिळाला नाही याचं वाईट वाटतं. परंतु जो काही वेळ ते स्क्रीन वर वावरतात ते इंटरेस्टिंग आहे. काही ठिकाणी काही गोष्टी खटकतात. काहीतरी ट्विस्ट दाखवायचा म्हणून ओढून ताणून केलेला तो प्रयत्न वाटतो. पहीला आणि तिसरा सिझन ज्या प्रकारे लिहीला गेला ती गुंतागुंतीची आणि खिळवून ठेवणारी गंमत या सिझन मध्ये जाणवत नाही. परंतु ज्यांना सस्पेन्स थ्रिलर क्राईम अशा प्रकारचा कंटेट बघायला आवडतो त्यांनी ही सिरीज बघायला हरकत नाही. 

  रोहन सिप्पी यांचं दिग्दर्शन नक्कीच चांगलं आहे परंतु यावेळी कथा पटकथा फार सशक्त नसल्याने त्यांनाही वाव कमी मिळाला. माधव मिश्रा यांचं महत्त्व किंवा त्यांची शोध घेण्याची पद्धत दाखविण्याच्या नादात पोलिसांकडून इतक्या बालिश चुका कशा होतात असा प्रश्न पडतो. त्यांचा तपास इतका अर्धवट दाखवणं हे पटत नाही. माधव मिश्रा कोर्टात असताना केसच्या पुराव्यांचा बॉक्स त्यांच्या पत्नीला किचनमध्ये सापडतो हे हास्यास्पद आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या खटकतात. परंतु कलाकारांचा अभिनय ही एक बाजू नक्कीच चांगली आहे. खरं तर मोहम्मद जीशान अय्यूब हा एक उत्तम अभिनेता आहे परंतु यावेळी तो जरा डॉक्टर म्हणून गोंधळलेला वाटतो. इतर कलाकारांच्या भूमिका चांगल्या झाल्या आहेत. परंतु एक सस्पेन्स थ्रिलर कंटेट मध्ये जे अपेक्षित असतं की शेवटपर्यंत आरोपी कोण हे कळत नाही तो क्लायमॅक्स टिकवण्यात टिम यशस्वी झाली आहे. एकंदरीत एकदा बघायला हरकत नाही अशी ही वेबसिरीज आहे. माझ्याकडून या वेबसिरीजला अडीच स्टार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *