एप्रिल २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी
Written by : आकांक्षा कोलते
Updated : जून 27, 2023 | 12:18 AM
हल्ली साऊथ इंडियन चित्रपटांनी प्रेक्षकांना जणू भुरळ घातली आहे. भरीस भर नवीन आलेला बॉयकॉट ट्रेंडमुळे हिंदी चित्रपटसृष्टीला वाईट फटका बसला आहे. म्हणूनच आता २०२३ मध्ये हिंदी चित्रपटसृष्टीला दमदार कमबॅक करणं गरजेचं आहे. आणि तशी सुरूवात सुद्धा झालेली आहे. पण खरं तर आता वेबसिरीज चा जमाना असल्यामुळे प्रेक्षकांच्या चित्रपटांच्या बाबतीत अपेक्षा वाढल्या आहेत. आता या अपेक्षा पूर्ण होतायत की नाही हे आमच्या परीने सांगण्याचा प्रयत्न या लेखात आम्ही करणार आहोत. चला तर मग एप्रिल २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले चित्रपट आज या लेखात आपण बघणार आहोत. त्यातील तुम्हाला कोणते आवडले हे आम्हाला नक्की कळवा.

१. गुमराह |
लेखक | असिम अरोरा, मगीझ थिरूमेनी |
दिग्दर्शक | वर्धन केतकर |
कलाकार | आदित्य रॉय कपूर, मृणाल ठाकूर, रोनीत रॉय |
निर्माता | भुषण कुमार, क्रिष्णण कुमार, मुराद खेतानी, अंजुम |
प्रदर्शित तारीख | ७ एप्रिल २०२३ |
भाषा | हिंदी |
“गुमराह” चित्रपट समीक्षा :-
आजकाल बॉलिवूड साऊथचे चित्रपट रिमेक करून त्यात बॉलिवूडचा थोडाफार मसाला घालून तेच चित्रपट प्रेक्षकांच्या गळी उतरवत आहे. पण प्रेक्षक सुद्धा हिंदी पेक्षा ओरिजनल चित्रपटांना उजवा कौल देत आहे. गुमराह हा चित्रपट सुद्धा असाच ओरिजनलच्या तुलनेत थोडा फसलेला. साऊथच्या ‘थडम’ चित्रपटाचा गुमराह’ हा चित्रपट हिंदी रिमेक आहे.
हा एक क्राईम, थ्रिलर, सस्पेन्स चित्रपट आहे. एक खून आणि संशयित असलेले रोनी आणि अर्जुन हे दोघं भाऊ. यात ट्विस्ट हा की हे दोघे आयडेंटीकल ट्विनस आहेत. इतकच नव्हे तर त्यांचे डीएनए सुद्धा शंभर टक्के मॅच होतायत. आता पेच हाच आहे की हा खून नक्की कोणत्या भावाने केला आहे.
आदित्य रॉय कपूर याने जुळ्या भावांची भुमिका साकारली असून अभिनय सुद्धा उत्तम केला आहे. पोलिस अधिकाऱ्यांच्या भुमिकेत असलेले मृणाल ठाकूर आणि रोनित रॉय यांनी सुद्धा त्यांच्या भुमिका व्यवस्थित पार पाडल्या आहेत.
चित्रपटाची कथा पटकथा अजून चांगल्याप्रकारे खुलवता आली असती. पुर्वाध थोडासा रेंगाळलेला वाटतो पण ज्यांना सस्पेन्स, ट्विस्ट वैगरे आवडतात त्यांना शेवटपर्यंत चित्रपट बघावा लागेल. त्यामुळे एकदा हा चित्रपट नक्कीच बघू शकता. दोन्ही भावांना वाचवण्यासाठी दोन वेगवेगळ्या पोलिस अधिकाऱ्यांकडे असलेला स्वतंत्र अजेंडा, दोन्ही भावांमध्ये असलेली लहानपणापासूनची दुश्मनी, आणि जुळे असल्यामुळे असलेला गोंधळ या सगळ्यातून खरा खूनी शोधला जाईल का.? शंभर अपराधी सुटले तरी चालतील पण एका निरपराधी ला शिक्षा होता कामा नये या तत्त्वावर काम करणारे पोलिस खऱ्या खुन्यापर्यंंत पोहोचतात की नाही हे बघण्यासाठी लगेच जाऊन हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर बघू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.
२. मिसेस अंडरकव्हर |
लेखक | अबीर सेनगुप्ता, अनुश्री मेहता |
दिग्दर्शक | अनुश्री मेहता |
कलाकार | सुमीत व्यास, राजेश शर्मा आणि साहेब चटर्जी |
निर्माता | इशान सक्सेना, सुनील शाह, वरून बजाज,अबीर सेनगुप्ता, अनुश्री मेहता |
प्रदर्शित तारीख | १४ एप्रिल २०२३ |
भाषा | हिंदी |
“मिसेस अंडरकव्हर” चित्रपट समीक्षा :-
अनुश्री मेहता दिग्दर्शित मिसेस अंडरकव्हर हा चित्रपट झी फाईव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला असून राधिका आपटे ही प्रमुख भुमिकेत आहे.
कोलकाता शहरातील ही गोष्ट असून सिरियल किलिंगवर आधारित आहे. आपापल्या क्षेत्रात स्वतःचं नाव कमवू पाहणाऱ्या किंवा उच्च शिक्षण घेऊन स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या मुलींना टार्गेट करून त्यांची निघृणपणे हत्या करणारा हा किलर समाजामध्ये सामान्य माणूस म्हणून वावरत आहे.
त्याला शोधून काढण्याची कामगिरी ही एका दुर्गा नावाच्या अंडरकव्हर एजंटकडे म्हणजेच राधिका आपटे हिच्याकडे सोपवली जाते. कारण त्यासाठी त्याच्या लक्षात येणार नाही अशी साधी गृहिणी हवी असते आणि अंडरकव्हर एजंट म्हणून गेली दहा वर्ष ती एक गृहिणी बनून राहत असते पण तीला मिळालेलं ट्रेनिंग ती पूर्णपणे विसरून गेलेली असते.
आता तिच्यावर टाकलेली जबाबदारी ती पार पाडते का.? खुन्याचा शोध लागतो का..? दुर्गा बनून माणसाचा मुखवटा लावून फिरणाऱ्या राक्षसाचा संहार करते का हे बघण्यासाठी हा चित्रपट बघणं गरजेचं आहे. राधिका आपटे हिच्यासोबत सगळ्याच कलाकारांनी अभिनय चांगला केला आहे. सस्पेन्स थ्रिलर चित्रपट असला तरी त्याला कॉमेडी चा तडका आहे. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.
३. सर, मॅडम, सरपंच |
लेखक | प्रवीण मोर्चेचले |
दिग्दर्शक | प्रवीण मोर्चेचले |
कलाकार | सीमा बिस्वास , एरियाना सजनानी, भवन तिवारी |
प्रदर्शित तारीख | १४ एप्रिल २०२३ |
भाषा | हिंदी |
“सर, मॅडम, सरपंच” चित्रपट समीक्षा :-
काही चित्रपट अशा विषयांवर किंवा सत्यकथेवर आधारित असतात की ती माहिती लोकांपर्यंत पोहोचायला हवी असते. लोकांनी प्रेरणा घेऊन त्यातून शिकणं अपेक्षित असतं पण चित्रपटाचं प्रमोशनच झालं नाही तर तो चित्रपट कधी येऊन जातो हे प्रेक्षकांना देखील कळत नाही. नेमकं हेच “सर, मॅडम सरपंच” या चित्रपटाच्या बाबतीत देखील झालं.
ओडीसा मधील धुनकपाडा येथील सर्वात कमी वयाच्या झालेल्या सरपंच आरती देवी यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. महिलांना सक्षम करणं, शिक्षण किती महत्त्वाचं आहे हे सांगण्यासाठी त्यांनी बरेच उपक्रम सुरू केले. त्याच धर्तीवर हा चित्रपट बेतलेला आहे.
अमेरिकेत शिकलेली, वाढलेली एना जेव्हा तिच्या गावी येऊन एक वाचनालय सुरू करण्याचं ठरवते पण प्रत्यक्षात जेव्हा तीला बऱ्याच अडचणींना तोंड द्यावं लागतं तेव्हा तिला बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतात. गावात चालणारं राजकारण, सरकारी यंत्रणाचा गोंधळ, गावातील सो कॉल्ड प्रतिष्ठित लोक , गुंड या सगळ्यांचा तिला सामना करावा लागतो. इतकंच नव्हे तर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत तिला उतरावं लागतं.
स्वतःचं करियर सोडून ती आपल्या गावासाठी कशी लढते हा प्रेरणादायी प्रवास बघण्यासाठी तरी हा चित्रपट तुम्ही नक्कीच बघायला हवा. चित्रपटाच्या दर्जा बद्दल बोलायच झालं तर माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार. पण एक प्रेरणादायी चित्रपट आणि कोणाला माहीत नसलेल्या आरती देवी यांच्या कामगिरीबद्दल माहिती लोकांपर्यंत पोहोचायला हवी म्हणून हा चित्रपट बघा म्हणून आम्ही नक्की रीकमेंड करू.
४. पिंकी ब्युटी पार्लर |
लेखक | अक्षय सिंग |
दिग्दर्शक | अक्षय सिंग |
कलाकार | सुलगना पाणिग्रही, जोगी मलंग , विश्वनाथ चटर्जी |
निर्माता | बाहनीशिखा दास, अक्षय सिंग |
प्रदर्शित तारीख | १४ एप्रिल २०२३ |
भाषा | हिंदी |
“पिंकी ब्युटी पार्लर” चित्रपट समीक्षा :-
चित्रपटाच्या नावावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की चित्रपट कोणत्या प्रकारच्या कथानकावर आधारित असेल. अक्षय सिंग दिग्दर्शित पिंकी ब्युटी पार्लर हा चित्रपट १४ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला असून अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावर भाष्य करणारा आहे.
माणसाला मिळालेलं रूप, सौंदर्य, रंग हे त्याच्या हातात नसतं. म्हणजे जन्माला येताना काळा किंवा गोरा रंग घेऊन यायचं हे कोणाच्याच हातात नसतं. पण आपल्याकडे काळ्या, सावळ्या लोकांना मात्र जणू काही त्यांच्यात काहीतरी कमी आहे अशीच वागणूक मिळते. गोऱ्या रंगाला उगीच जास्त महत्त्व दिल्यामुळे सावळ्या, काळ्या रंगाच्या मुला मुलींमध्ये एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण होतो आणि त्यातूनच असुया, द्वेष यासारख्या भावना निर्माण होतात. हा चित्रपट याच विषयावर उजेड टाकणारा आहे.
बनारस मध्ये पिंकी आणि बुलबुल या दोघी सख्ख्या बहिणी एक पार्लर चालवत असतात. पिंकी ही दिसायला सुंदर व गोरी. याउलट बुलबुल. दिसायला सावळी आणि जेमतेम. या संपूर्ण चित्रपटात या दोघी बहिणी असून इतकी तफावत कशी हे सतत बुलबुल ला ऐकून घ्यावं लागतं. अगदी याचा त्रास पिंकी ला सुद्धा होत असतो. आणि असंच अचानक एक दिवस त्यांच्या पार्लर मध्ये एक पंख्याला लटकलेला मृतदेह आढळतो. आता हा मृतदेह कोणाचा, ती हत्या की आत्महत्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं चित्रपटात मिळतील.
अक्षय सिंग यांनी ही कथा चांगल्या प्रकारे पडद्यावर मांडली एका महत्त्वाच्या विषयावर भाष्य केलं आहे. सगळ्याच कलाकारांनी अभिनय चांगला केला आहे. माझ्याकडून या चित्रपटाला साडेतीन स्टार.
५. किसी का भाई किसी की जान |
लेखक | फरहाद सामजी |
दिग्दर्शक | फरहाद सामजी |
कलाकार | सलमान खान, पूजा हेगडे, दग्गुबाती वेंकटेश, पलक तिवारी, जस्सी गिल, शहनाज गिल, राघव जुयाल |
निर्माता | सलमान खान |
प्रदर्शित तारीख | २१ एप्रिल २०२३ |
भाषा | हिंदी |
“किसी का भाई किसी की जान” चित्रपट समीक्षा :-
खरं तर ” सलमान खान” या फक्त नावानेच चित्रपट चालतात. चित्रपटाची कथा,पटकथा,संवाद , संगीत सगळंच दुय्यम जेव्हा की सलमान भाई ईदच्या मुहूर्तावर चित्रपट घेऊन येतात. तसंच झालंय या चित्रपटाच्या बाबतीत. सलमानचा स्वतःचा एक मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळेच रिलीज होण्याआधीच या चित्रपटासाठी प्रिबुकींग झाले होते. पण नंतर मात्र काही या चित्रपटाला गल्ला जमवता आला नाही.
चित्रपटाच्या कथेविषयी सांगायचं झालं तर ही घासूनपुसून गुळगुळीत झालेली आणि प्रत्येक भाषेत याच पटकथेवर आधारित चित्रपट येऊन गेले आहेत अशी ही कथा. दिल्लीतील चार भावांची ही गोष्ट आहे. ही गोष्ट बघताना तुम्हाला प्रत्येक वेळी हे जाणवेल की ही गोष्ट तर खूप वेळा ऐकलीय.
भाईजान म्हणजेच सलमान खान हा लव, मोह आणि इश्क या तीन भावांसोबत राहत असतो. आईवडील नसल्याने लहान भावांची जबाबदारी भाईजान वर असते आणि म्हणूनच तो भावांसाठी लग्न करत नाही. आता कारण तर तुम्हाला कळलच असेल. पण हे भाऊ मात्र पुढे जाऊन त्यांच्यासाठी प्रेमिका शोधतात. कालांतराने भाईजान ला सुद्धा भाग्यलक्ष्मी भेटते. पण आता ट्विस्ट हा की या भाग्यलक्ष्मी आणि भाईजान च्या घरचे म्हणजे नाण्याच्या दोन बाजू. ज्या एकत्र येऊ शकत नाहीत. आता पुढे काय होतं ते बघायला चित्रपट बघावा लागणार. आता हि रिस्क घ्यायची की नाही तो तुमचा निर्णय. झी फाईव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट उपलब्ध आहे. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार.
६. बॅड बॉय |
लेखक | संजीव, रंजीत कपूर |
दिग्दर्शक | राजकुमार संतोषी |
कलाकार | नमाशी चक्रवर्ती, आमरीन कुरेशी, जॉनी लिवर, राजपाल यादव, दर्शन जरीवाला |
निर्माता | अंजुम कुरेशी, साजीद कुरेशी |
प्रदर्शित तारीख | २८ एप्रिल २०२३ |
भाषा | हिंदी |
“बॅड बॉय” चित्रपट समीक्षा :-
मिथुन चक्रवर्ती यांचा लहान मुलगा नमाशी चक्रवर्ती याने बॅड बॉय या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. राजकुमार संतोषी दिग्दर्शित हा चित्रपट २८ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांना तो फारसा आवडलेला नाही.
या चित्रपटाच्या कथेबद्दल बोलायचं झालं तर अगदीच टिपिकल नव्वदच्या दशकातील ही कथा वाटते. आता प्रेक्षकांची आवड बदलली आहे त्यामुळे नव्वदच्या दशकातील गोष्ट कितीही इनोव्हेटिव्ह पद्धतीने मांडली तरी ती जुनीच वाटते. रघू आणि रितू यांची लव्हस्टोरी आणि त्यात हिरोईन चे वडील दोघांना विरोध करतात. रघू हा उनाडक्या करत फिरणारा गरीब घरातील मुलगा तर रितू ही अतिशय हुशार आणि अतिशय शिस्तबद्ध वातावरणात वाढलेली सुखवस्तू घरातील मुलगी.
रितूचे वडील रघूसमोर एक आव्हान ठेवतात ते जर त्याने पूर्ण केले तरच ते त्यांच्या प्रेमाला स्वीकारतील अशी अट आहे. आता रघू हे आव्हान पूर्ण करेल का.? खरं तर याचं उत्तर तुम्हाला माहीत असेलच. कारण अशा प्रकारचे चित्रपट गेली कित्येक वर्ष आपण बघत आलोय.
चित्रपटाची कथाच जुनाट असल्याने चित्रपटात बघण्यासारखं फार काही उरत नाही. पण जॉनी लिव्हर यांना स्क्रीनवर बघताना शंभर टक्के मनोरंजन होतं. तेवढीच जमेची बाजू. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.
७. यु टर्न |
लेखक | परवेज शेख, राधिका आनंद |
दिग्दर्शक | आरिफ खान |
कलाकार | अलाया एफ, प्रियांशू पेन्युली, आशिम गुलाटी, मनू ऋषी |
निर्माता | शोभा कपूर, एकता कपूर |
प्रदर्शित तारीख | २८ एप्रिल २०२३ |
भाषा | हिंदी |
“यु टर्न” चित्रपट समीक्षा :-
यु टर्न हा चित्रपट खरं तर २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या कन्नड चित्रपटाचा रिमेक आहे. हा चित्रपट आतापर्यंत जवळपास सात भाषांमध्ये रिमेक झाला आहे.
अलाया एफ ही या चित्रपटाची नायिका असून तीने एका पत्रकाराची भूमिका साकारली आहे. पत्रकार म्हणून ती सध्या एका हायवेवर असणाऱ्या ब्रिजवर स्टोरी बनवत असते. ज्या ब्रिजवर प्रवास करताना जे लोक काही कारणाने यु टर्न घेतात , ज्यामुळे ट्रॅफीकच्या नियमांचं उल्लंघन होतं त्यांचा पुढच्या चोवीस तासात मृत्यू होतो. आणि याच प्रकाराचा तपास सुरू असताना राधिका ला सुद्धा चौकशी साठी बोलवण्यात येतं.
आता या सगळ्या प्रकारात राधिकाचा काय संबंध आहे हे बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल. हा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट असल्यामुळे जास्त काही सांगणं उचित नाही. तुम्ही ओरिजनल चित्रपट पाहिला असेल तर हा चित्रपट तुम्हाला तेवढा आवडणार नाही. पण जर पाहीला नसेल तर एकदा बघायला हरकत नाही.
माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार. हा चित्रपट तुम्ही झी फाईव्हवर बघू शकता.
तर मंडळी यापैकी कोणते चित्रपट तुम्ही पाहीलेत आणि कोणते आवडलेत हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.
