एप्रिल २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी
Written by : आकांक्षा कोलते
Updated : जून 29, 2023 | 11:42 PM
आशयघन आणि दर्जेदार कथानक हा मराठी चित्रपटांचा गाभा आहे. मराठी चित्रपट हे नेहमीच वास्तववादी आणि चांगला कंटेंट घेऊन भेटीला येतात हे आता प्रेक्षकांच्या लक्षात येत आहे. त्यामुळे मराठी चित्रपटांना प्रेक्षक आता भरभरून प्रतिसाद देतात.
२०२२ चा शेवट वेड या चित्रपटाने लोकांना अक्षरशः वेड लावून केला. तर २०२३ ची सुरुवात दणक्यात झालीय का ते आपण बघूया. आज आम्ही तुम्हाला २०२३ मध्ये जानेवारी महिन्यात प्रदर्शित झालेले चित्रपट सांगणार आहोत.

१. घर , बंदुक, बिर्याणी |
लेखक | नागराज मंजुळे |
दिग्दर्शक | हेमंत अवताडे |
कलाकार | सयाजी शिंदे, नागराज मंजुळे, आकाश ठोसर, सायली पाटील, दीप्ती देवी, श्वेतांबरी घुटे |
निर्माता | भुषण मंजुळे, नागराज मंजुळे |
प्रदर्शित तारीख | ७ एप्रिल २०२३ |
भाषा | मराठी |
“घर , बंदुक, बिर्याणी” चित्रपट समीक्षा :-
जोरदार प्रमोशन आणि चर्चा झालेला “घर , बंदुक बिर्याणी” हा चित्रपट एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. सुरूवातीला प्रेक्षकांनी प्रतिसादही जोरदार दिला. नागराज मंजुळे लिखित आणि हेमंत अवताडे दिग्दर्शित हा चित्रपट प्रेक्षकांना आवडला खरा पण जेवढ्या अपेक्षा होत्या तेवढा करिष्मा चित्रपटाला दाखवता आला नाही. पण ॲक्शन सीन, सगळ्यांचा अभिनय, संगीत या सगळ्या गोष्टी नक्कीच जमून आल्या आहेत.
नक्षलवाद्यांचं वर्चस्व असणाऱ्या महाराष्ट्रातील ‘कोलागड’ मधील ही एक कथा. याच नक्षलवाद्यांचा म्होरक्या पल्लम म्हणजेच सयाजी शिंदे, त्याच गावात एका ढाब्यावर काम करणारा आचारी राजू म्हणजेच आकाश ठोसर आणि पुण्याहून बदली होऊन या गावात आलेला एक पोलिस अधिकारी राया पाटील म्हणजेच नागराज मंजुळे यांच्याभोवती ही कथा फिरते.
या सगळ्यांच्या आयुष्यात ज्या काही गोष्टी घडत आहेत त्याला आजूबाजूचे बरेच घटक कारणीभूत आहेत जे एकमेकांशी संलग्न आहेत. आणि याच सगळ्यातून तयार झालेली ही बिर्याणी.
चित्रपटाच्या नावाप्रमाणेच चित्रपटाची कथा आहे. नक्षलवादी पल्लम याचं घरदार उध्वस्त झालेलं आहे, राजू हा अनाथ असतो पण त्याचं सायली वर प्रेम असतं पण लग्नासाठी घर असावं अशी अट असल्याने तो घर मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय. तर तो पोलीस अधिकारी राया पाटील यांचं कुटुंब उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.
चित्रपटाचे ॲक्शन सीन बघताना एखादा साऊथ इंडियन मुव्ही पाहील्याचा फिल येतो. नागराज मंजुळे यांना अशाप्रकारच्या वेगळ्या भुमिकेत बघताना थोडं वेगळं वाटू शकतं पण त्यांनी या भुमिकेला नक्कीच न्याय दिला आहे. आकाश ठोसरच्या वाटणीला आलेल्या थोड्या भुमिकेचंही त्याने सोनं केलं आहे. सयाजी शिंदे यांना अशा रोलमध्ये बऱ्याचदा पाहीलय असं वाटतं. पण अभिनय उत्तम आहे. चित्रपटाची लांबी जास्तच वाढल्याने मधे मधे थोडी पकड सैल होते पण एकंदरीत एकदा हा चित्रपट तुम्ही नक्कीच एंजॉय करू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.
२. सर्किट |
लेखक | संजय जमखंडी |
दिग्दर्शक | आकाश पेंढारकर |
कलाकार | हृता दुर्गुळे , वैभव तत्ववादी, रमेश परदेशी,मिलिंद शिंदे |
निर्माता | मधुर भांडारकर |
प्रदर्शित तारीख | ३ एप्रिल २०२३ |
भाषा |
“सर्किट” चित्रपट समीक्षा :-
आजकाल रिमेकचा ट्रेंड आलाय म्हणायला हरकत नाही. खरं तर मराठी चित्रपट हे बहुतांश ओरिजनल कंटेट वरच आधारित असतात. पण हल्ली मराठी चित्रपटसृष्टी सुद्धा यात मागे नाही. २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘काली’ या मल्याळी सिनेमाचा “सर्किट” हा मराठी रिमेक आहे. पण ओरिजनलच्या तुलनेत एक फसलेला डाव म्हणू शकतो.
सिद्धार्थ म्हणजे वैभव तत्त्ववादी हा कथेचा नायक. कॉलेजमध्ये शिकणारा सिद्धार्थ हा स्वभाव रागीट स्वभावाचा असतो. कॉलेजमधील निवडणूका, मारामारी, राडे हे त्याचं आयुष्य. पण त्याच कॉलेजमध्ये शिकणाऱ्या आरोहीच्या म्हणजेच ऋता दुर्गुळेच्या तो प्रेमात पडतो. त्यांचं लग्न देखील होतं. पण पुढे सिद्धार्थ च्या रागामुळेच ती त्याला सोडून जाते. पुढे काय होतं ते बघायला चित्रपट बघावा लागेल बरं का.
चित्रपटात रमेश परदेशी आणि मिलिंद शिंदे हे नकारात्मक भुमिकेत आहेत.मिलिंद शिंदे हे कसलेले अभिनेते असून त्यांचा अभिनय बघण्यासारखा आहे. ऋताने देखील अभिनय उत्तम केला आहे. वैभवचा अभिनय थोडासा नाटकी आणि ओढून ताणून केलेला वाटतो. एकदा मनोरंजन करण्याइतका हा चित्रपट चांगला आहे. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.
३. सर्जा |
दिग्दर्शक | धनंजय मनोहर खंडाळे |
कलाकार | ऐश्वर्या भालेराव, रोहित चव्हाण, तुषार नागरगोजे, अनिल नगरकर, ज्योती शेतसांडी |
निर्माता | रमेश रंगराव लाड, अमित जयपाल पाटील |
प्रदर्शित तारीख | १७ मार्च २०२३ |
भाषा |
“सर्जा” चित्रपट समीक्षा :-
१४ एप्रिल रोजी प्रदर्शित झालेला सर्जा हा चित्रपट बऱ्याच लोकांना माहीत नाही. कारण कोणत्याच प्रकारचं प्रमोशन या चित्रपटाचं झालं नव्हतं. धनंजय खंडाळे यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून ऐश्वर्या भालेराव, रोहीत चव्हाण, तुषार नागरगोजे हे नवीन कलाकार या चित्रपटात आहेत.
चित्रपटाची गोष्ट काही वेगळी नाहीय. जवळपास आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात घडणारी गोष्ट आहे. ग्रामीण भागातील ही कथा असून तीन मित्रांच्या अवतीभवती ही कथा फिरत राहते.
सर्जा, गौरी आणि धनराज हे तिघे लहानपणापासूनचे मित्र असतात. सगळं शिक्षण एकत्र झालेलं असतं. त्यांच्या आयुष्यात वळण येतं जेव्हा कॉलेजमध्ये वैशाली नावाची मुलगी सर्जाच्या आयुष्यात येते आणि त्याला सोडून जाते. त्यानंतर धनराज सुद्धा त्याचं प्रेम गौरी जवळ व्यक्त करतो पण ती स्पष्ट नकार देते. आता धनराज हा सरपंचांचा मुलगा असतो. तो हा नकार पचवतो का.? सर्जा चं पुढे काय होतं.? हे सगळं चित्रपट पाहिल्यानंतरच कळेल.
खरं तर अशा प्रकारच्या अनेक कथा, सेम कंटेटवर आधारित बरेच चित्रपट याआधी येऊन गेले आहेत. त्यामुळे वेगळं असं काही बघायला मिळत नाही. अभिनयचं बोलायचं झालं तर अजून चांगला होऊ शकला असता. सध्या तरी हा चित्रपट कोणत्याच ओटीटी प्लॅटफॉर्मवर आला नाहीय, त्यामुळे बघायचा झाल्यास थोडी वाट बघू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार.
४. स्कूल कॉलेज आणि लाईफ |
लेखक | विहान सुर्यवंशी |
दिग्दर्शक | विहान सुर्यवंशी |
कलाकार | तेजस्वी प्रकाश , करण परब, जितेंद्र जोशी |
निर्माता | |
प्रदर्शित तारीख | १४ एप्रिल २०२३ |
भाषा |
“स्कूल कॉलेज आणि लाईफ” चित्रपट समीक्षा :-
रूपनगर के चिते या चित्रपटानंतर आता विहान सुर्यवंशी यांनी दिग्दर्शित केलेला स्कूल कॉलेज आणि लाईफ हा चित्रपट १४ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. हा चित्रपट बघताना तुम्हाला तुमच्या शाळा कॉलेजचे दिवस आठवणार हे नक्की.
नावाप्रमाणेच चित्रपटाची कथा ही शाळा कॉलेज आणि त्यानंतरच्या आयुष्यावर आधारित आहे. कथेचा नायक आहे निरव. निरवचे वडील नाहीत आणि आई शिलाई काम करून निरव आणि त्याच्या बहिणीला सांभाळत आहे. परिस्थितीमुळे निरवला बऱ्याच गोष्टींमध्ये तडजोड करावी लागते. शाळेत असताना त्याचे दोन जिवलग मित्र असतात अर्थात कॉलेज मध्ये सुध्दा त्यांची मैत्री तशीच असते. त्यात कॉलेज मध्ये निरवच्या आयुष्यात इंदू येते. दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम असतं पण असं काही तरी होतं की इंदू अचानक निरवला सोडून मुंबईला जाते असं निरवला कळतं. आता खरं काय होतं ते बघायला चित्रपट बघावा लागेल.
चित्रपटातील अजून एक महत्त्वाची भूमिका म्हणजे
शेख चाचा म्हणजेच जितेंद्र जोशी. त्यांनी तर या भुमिकेला चार चांद लावले आहेत. निरवच्या आयुष्यात ते एखाद्या मार्गदर्शकासारखे आहेत. निरव आणि त्यांचही स्वप्न असतं की निरवने सिंगापूर ला जावं आणि आयुष्यात खूप काही करावं. निरव सिंगापूर ला जातो का.? इंदू त्याला परत भेटते का.? हे सगळं बघण्यासाठी चित्रपट नक्की बघा.
तेजस्वी प्रकाश हीचा हा दुसरा मराठी चित्रपट असला तरीही तीचा अभिनय उत्तम आहे. बाकी सगळ्या कलाकारांनी सुद्धा उत्तम अभिनय केला आहे.
५. उर्मी |
लेखक | राजेश जाधव |
दिग्दर्शक | राजेश जाधव |
कलाकार | चिन्मय उद्गीरकर, सायली संजीव, रसिका सुनील,नितीश चव्हाण |
निर्माता | प्रवीण चौधरी |
प्रदर्शित तारीख | १४ एप्रिल २०२३ |
भाषा | मराठी |
“उर्मी” चित्रपट समीक्षा :-
१४ एप्रिल रोजी प्रदर्शित झालेला उर्मी या चित्रपटात चिन्मय उद्गीरकर, सायली संजीव, रसिका सुनील,नितीश चव्हाण यांच्या प्रमुख भूमिका आहेत. राजेश जाधव यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाची पटकथा आणि संवाद सुद्धा त्यांनीच लिहिले आहेत.
चित्रपटाच्या कथेबद्दल बोलायचं तर फार काही नाविन्य असं नाही. चित्रपटाचा नायक चिन्मय उद्गीरकर याच्या वैवाहिक आयुष्यात असं काही वादळ येतं की त्याचं अख्खं आयुष्य बदलून जातं. लग्नाआधी खरं तर तो काही धुतल्या तांदळासारखा नसतो. बऱ्याच मुली त्याच्या आयुष्यात येऊन गेलेल्या असतात पण लग्नानंतर अचानक एक दिवस एक मुलगी येऊन सांगते की तिच्याकडे असलेलं बाळ त्याचं आहे.
आता खरंच ते बाळ त्याचं आहे की तीचा काही हा प्लॅन असतो. तीची फसवणूक वैगरे झालीय का आणि म्हणून ती बदला घेतेय का वैगरे अशा सगळ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला चित्रपट बघितल्यावरच मिळतील.
नवरा बायकोचं नातं, नात्यातील विश्वास, एकमेकांना नात्यात दिलेली स्पेस, प्रामाणिकपणा हे सगळं किती महत्त्वाचं आहे हे सांगणारा हा चित्रपट आहे.
एकंदर चित्रपटाची कथा, संवाद, लांबलेले सीन्स किंवा अजून बऱ्याच गोष्टी आहेत की चित्रपट बांधलेला वाटत नाही म्हणूनच बघताना तेवढी मजा येत नाही.तरीही तुम्हाला बघायचा असेल तर बघू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार.
६. जैतर |
दिग्दर्शक | घनश्याम पवार |
कलाकार | रजत गवळी आणि सायली पाटील, गणेश सरकटे, गायत्री सोहम, अविनाश पोळ, रामेश्वर डापसे, अरुण गीते |
निर्माता | मोहन घोंगडे |
प्रदर्शित तारीख | १४ एप्रिल २०२३ |
भाषा | मराठी |
“जैतर” चित्रपट समीक्षा :-
ग्रामीण भागात आजही जातीव्यवस्था, आर्थिक स्थिती या सगळ्याचा पगडा आहे. जातीबाहेर प्रेम किंवा लग्न करणं म्हणजे पाप असं चित्र दिसतं. आणि यातूनच मग अशा प्रेमविवाहात अडचणी येतात, मुख्यतः मुलींवर खूप बंधनं असतात. याच सगळ्यांवर आधारित जैतर हा चित्रपट आहे.
नाशिक मधील मालेगाव येथे घडलेल्या सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट असून लेखक दिग्दर्शक मोहन घोंगडे यांनीच या चित्रपटाची निर्मिती केली आहे. समाजातील आर्थिक आणि जातीव्यवस्थेचे चित्र कुठेतरी बदलायला हवे म्हणून त्यांनी हा प्रयत्न केला आहे.
रजत गवळी आणि सायली पाटील हे दोन नवीन कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. मन्या आणि राधा अशा यांच्या भूमिका आहेत. राधा ही सुखवस्तू वर्गातील तर मन्या हा मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. त्यामुळेच त्यांच्या प्रेमात खूप अडचणी येतात.
आता ही कथा खरं तर अक्षरशः घासूनपुसून गुळगुळीत झालेल्या नाण्यापेक्षाही गुळगुळीत झालेली आहे. त्यामुळे चित्रपटात बघण्यासारखं नवीन काही नाही. सायली चा अभिनय चांगला झाला आहे. हा चित्रपट बघायचा असल्यास ओटीटी प्लॅटफॉर्मवर आल्यावर बघू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार.
७. महाराष्ट्र शाहीर |
लेखक | वसुंधरा साबळे, केदार शिंदे |
दिग्दर्शक | केदार शिंदे |
कलाकार | अंकुश चौधरी, सना शिंदे, अश्विनी महांगडे, शुभांगी सदावर्ते, निर्मिती सावंत |
निर्माता | बेला शिंदे, संजय छाब्रिया |
प्रदर्शित तारीख | २८ एप्रिल २०२३ |
भाषा | मराठी |
“ महाराष्ट्र शाहीर” चित्रपट समीक्षा :-
महाराष्ट्रातील शाहीर कृष्णराव गणपतराव साबळे यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. शाहीर साबळेंचा पोवाडा तर त्यांची ओळख जणू. भारूड आणि इतर अनेक गीतं ही साबळेंनी महाराष्ट्राला दिली.
चित्रपटातील गाऊ नको किसना , गाऊ नको किसना ,गाऊ नको गाऊ नको रे..’ या गाण्याने अक्षरशः लहान मोठ्यांना वेड लावले आहे. चित्रपटात साबळेंची भुमिका अंकुश चौधरी याने केली आहे. आणि त्याने त्याच्या परीने या भुमिकेला नक्कीच न्याय दिला आहे.
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत शाहीर , लोककलावंत यांचं मोलाचं योगदान होतं. हा तोच काळ आहे. त्यामुळे चित्रपटात त्या काळातील बरेच कलावंत दिसतात. इतकंच नव्हे तर साने गुरुजी, संत गाडगे महाराज, यशवंतराव चव्हाण जे तेव्हा मुख्यमंत्री होते यांच्यासारखी बरीच मोठी मंडळी चित्रपटात दिसते. बाळासाहेब ठाकरे आणि शाहीर यांचे सुद्धा काही सीन्स चित्रपटात आहेत.
चित्रपट बघावा की नाही तर हो.! जरूर बघावा. काही गोष्टी सोडल्या तर चित्रपट नक्कीच छान आहे. आणि शाहीर साबळेंसाठी चित्रपट बघायलाच हवा. सना शिंदे हीने शाहिरांच्या पत्नीची भूमिका कलत चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे. त्याचप्रमाणे निर्मिती सावंत, अक्षय टाक , अश्विनी महांगडे या सगळ्या कलाकारांनी अभिनय उत्तम केला आहे. चित्रपटाचा पूर्वार्ध जरा लांबलेला आहे. पण बाकी चित्रपट उत्तम आहे. अजय अतुलचं संगीत म्हणजे तर चित्रपटाचा आत्मा आहे. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार. हा चित्रपट तुम्ही ॲमेझॉन प्राईम वर बघू शकता.
८. टिडीएम |
लेखक | भिकू देवकाटे |
दिग्दर्शक | भाऊराव कऱ्हाडे |
कलाकार | पृथ्वीराज थोरात, कलिंदी, भाऊराव कऱ्हाडे |
निर्माता | भाऊराव कऱ्हाडे, इंद्रभान कऱ्हे, बि. देवकाटे |
प्रदर्शित तारीख | २८ एप्रिल २०२३ |
भाषा | मराठी |
“८. टिडीएम” चित्रपट समीक्षा :-
भाऊराव कऱ्हाडे आणि अस्सल गावरान म्हणजेच ग्रामीण बाज असलेला चित्रपट हे समीकरण झालं आहे. टिडीएम या चित्रपटाबद्दल बरीच उलटसुलट चर्चा झाली. स्क्रीन न मिळाल्यामुळे तो प्रदर्शित झाल्यानंतर प्रदर्शन थांबवण्यात आलं होतं. खरं तर ही खूप खेदाची बाब आहे.
प्रेक्षकांना चित्रपटाचा ट्रेलर प्रचंड आवडला होता. परंतु सिनेमागृह न मिळाल्याने चित्रपट बघता आला नाही त्यामुळे बऱ्याच प्रेक्षकांचा हिरमोड झाला.
चित्रपटाची कथा ही गावातील सर्वसामान्य तरूणाची आहे. जो त्याच्या कुटुंबाचा आधार आहे. १९९५ च्या आसपासचा हा काळ आहे. चित्रपटाचा नायक हा नट नट्या , सिनेमातील गाणी या सगळ्या गोष्टींचा दर्दी आहे. आपला एक ट्रॅक्टर, रेडिओ हवा, ते घेण्याइतपत आपण पैसे कमवावे अशी छोटी स्वप्न असलेला आहे. त्याची प्रेयसी आणि कुटुंब हे इतकच त्यांचं जग. सगळ्यांचा अभिनय अतिशय उत्तम आहे. सिनेमॅटोग्राफी, लोकेशन, गावरान बाज, चित्रपटातील गाणी सगळच जुळून आलं आहे. भाऊराव कऱ्हाडे यांनी सुद्धा यात काम केले आहे.
चित्रपटात बघण्यासारखं काय हे समजण्यासाठी तुम्हाला चित्रपट बघणं गरजेचं आहे. आता ९ जून पासून पलत हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला आहे त्यामुळे तुम्ही तो नक्कीच बघू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला साडेतीन तीन स्टार.
तर मित्रांनो, यापैकी कोणते चित्रपट तुम्ही पाहीलेत आणि या विकेंड ला कोणते बघायला जाणार आहात हे कमेंट करून नक्की सांगा.
