ऑक्टोबर २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी
ऑक्टोबर २०२३ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेले हे हिंदी चित्रपट तुम्ही पाहीलेत का?
Written by : आकांक्षा कोलते
Updated : डिसेंबर 7, 2023 | 11:09 PM
खरं तर आता वेबसिरीज चा जमाना असल्यामुळे प्रेक्षकांच्या चित्रपटांच्या बाबतीत अपेक्षा वाढल्या आहेत. त्यातही नवीन आलेल्या चित्रपटांमध्ये ओरिजनल कंटेट कमीच असतो. बरेच चित्रपट हे रिमेक असतात. त्यामुळे चित्रपटगृहात प्रेक्षकांना खेचून आणणं हे आता निर्माते आणि दिग्दर्शक यांच्यापुढे नवीन आव्हान आहे. आता प्रेक्षकांच्या चित्रपटांच्या बाबतीत असलेल्या अपेक्षा पूर्ण होतायत की नाही हे आमच्या परीने सांगण्याचा प्रयत्न या लेखात आम्ही करणार आहोत. आज ऑक्टोबर २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले चित्रपट या लेखात आपण बघणार आहोत. त्यातील तुम्हाला कोणते आवडले हे आम्हाला कळवा.
१. दोनो |
लेखक | अवनीश एस बड़जात्या , मनु शर्मा |
दिग्दर्शक | अवनीश एस बड़जात्या |
कलाकार | राजवीर देओल, पलोमा ढिल्लों, आदित्य नंदा, कनिका कपूर, रोहन खुराना, गरिमा अग्रवाल |
निर्माता | कमल कुमार बड़जात्या, राजकुमार बड़जात्या, अजीत कुमार बड़जात्या |
प्रदर्शित तारीख | ५ ऑक्टोबर २०२३ |
भाषा | हिंदी |
“दोनो” चित्रपट समीक्षा :-
अवनीश बडजात्या यांनी लिहीलेला आणि दिग्दर्शित केलेला दोनो हा चित्रपट ५ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला. आताच्या पिढीला आपली वाटेल अशी चित्रपटाची कथा आहे.
हल्ली डेस्टिनेशन वेडिंग हा एक नवीन ट्रेंड आलाय. अशाच थायलंडमध्ये होणाऱ्या एका डेस्टिनेशन वेडिंग ला आपल्या चित्रपटाचा नायक देव सराफ म्हणजे राजवीर देओल हा जातो. पण हे लग्न त्याचं ज्या मुलीवर प्रेम असतं तिचंच असतं. आलिनावर देव लहानपणापासून प्रेम करत असतो परंतु तिला ते कधी सांगत नाही आणि आता तिच्याच लग्नासाठी तो थायलंड ला जातो. तिथे त्याची ओळख मेघना जोशी हिच्यासोबत होते. ति आलिनाच्या नवऱ्याची मैत्रीण असते. तिचं सुद्धा ब्रेक अप झालेलं असतं. आणि ट्विस्ट असा असतो की तिचा एक्स बॉयफ्रेंड या लग्नाला आलेला असतो.
या लग्नात देव आणि मेघना यांची ओळख जास्त घट्ट होते. आता पुढे काय होतं ते बघण्यासाठी तुम्हाला चित्रपट बघावा लागेल. देव आपलं प्रेम अलीना समोर व्यक्त करेल का.? मेघना आणि तिचा बॉयफ्रेंड गौरव हे पुन्हा एकत्र येतात का.? की एखादं नवीन नातं जुळेल? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे या चित्रपटात मिळतील.
चित्रपटाचं संगीत सोडलं तर बाकी सगळ्या गोष्टी छान आहेत. सगळ्या कलाकारांनी अभिनय उत्तम केला आहे. सिनेमॅटोग्राफी, लोकेशन, दिग्दर्शन सगळंच छान आहे.
माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.
२. खुफीया |
लेखक | रोहन नरूला, विशाल भारद्वाज |
दिग्दर्शक | विशाल भारद्वाज |
कलाकार | तब्बू , वामिका गब्बी, अली फजल, आशीष विद्यार्थी, अतुल कुलकर्णी, अजमेरी हक, ललित परिमू, शताफ फिगार, नवनींद्र बहल |
निर्माता | विशाल भारद्वाज, रेखा भारद्वाज |
प्रदर्शित तारीख | ५ ऑक्टोबर २०२३ |
भाषा | हिंदी |
“खुफीया” चित्रपट समीक्षा :-
२०१२ मध्ये प्रकाशित झालेली कादंबरी ‘एस्केप टू नोव्हेयर’ वर आधारित असलेला खुफीया हा चित्रपट विशाल भारद्वाज यांनी दिग्दर्शित केला आहे. विशाल भारद्वाज यांच्या चित्रपटांचं एक वेगळं स्थान बॉलिवूड मध्ये आणि प्रेक्षकांच्या मनात आहे.
भारताच्या गुप्तचर यंत्रणेमधील एका एजंटचा खून झाल्यावर यंत्रणेमध्ये कोणीतरी गद्दार आहे हे लक्षात येतं आणि त्यालाच शोधण्यासाठी कृष्णा मेहरा या रॉ ऑफिसरवर ही जबाबदारी दिली जाते. ही भूमिका तब्बू हीने अत्यंत ताकदीने साकारली आहे. अली फजल याने रवी ही भूमिका साकारली आहे. व तो यंत्रणेच्या एका महत्त्वाच्या पोस्टवर असून देशाशी गद्दारी कलत असतो.
रवी आणि त्याची पत्नी म्हणजे वामिका गब्बी हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात आपल्या मुलासोबत खुश असतात. परंतु जेव्हा तिला कळतं की तिचा नवरा गद्दार आहे तेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते की तिला तिच्या मुलापासून वेगळं केलं जातं. तेव्हा वामिका ने जे काही आपल्या अभिनयातून सादर केलं आहे ते केवळ अप्रतिम आहे.
चित्रपटाची कथा शेवटपर्यंत खिळवून ठेवते. आपल्या जिवावर उदार होऊन हे रॉ एजंट आपल्या देशासाठी काय करत असतात हे बघणं सुद्धा थ्रिलिंग असतं. राझी वैगरे चित्रपट तुम्ही पाहीला असेल तर थोडाफार सारखा अनुभव तुम्हाला हा चित्रपट बघताना येईल.
एक स्त्री गरज पडल्यास काहीही करू शकते हे सांगणारा हा चित्रपट आहे. तब्बू हीने एक कणखर अधिकारी आणि सोबतच एक हळवं मन असलेली स्त्री अशी भूमिका अत्यंत सुंदर प्रकारे साकारली आहे. दिग्दर्शन उत्तम आहे. अली फजल याने रवी ही भूमिका खूप चांगल्या प्रकारे केली आहे.
चित्रपटाचं संगीत चांगलं आहे. या सगळ्या गोष्टींमुळे हा चित्रपट एकदा बघायला हरकत नाही. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.
३. मिशन राणीगंज |
लेखक | विपुल के रावल, दीपक किंगरानी, पूनम गिल |
दिग्दर्शक | टीनू देसाई |
कलाकार | अक्षय कुमार, कुमुद मिश्रा, पवन मल्होत्रा, वरुण बडोला, दिब्येंदु भट्टाचार्य, राजेश शर्मा, वीरेंद्र सक्सेना, अनंद महादेवन, जमील खान, सुधीर पांडे, रवि किशन, परिणीति चोपड़ा |
निर्माता | वाशू भगनानी, दीपशिखा देशमुख, जैकी भगनानी, अजय कपूर |
प्रदर्शित तारीख | ६ ऑक्टोबर २०२३ |
भाषा | हिंदी |
“मिशन राणीगंज” चित्रपट समीक्षा :-
या चित्रपटाची कथा ही सत्यघटनेवर आधारित आहे. पश्चिम बंगाल मधील एक धाडसी माइनिंग इंजीनियर जसवंत गिल यांची ही गोष्ट आहे. १९८९ मध्ये कोळशाच्या खाणीत अडकलेल्या मजुरांना वाचवताना स्वतःच्या जिवाची बाजी लावणाऱ्या “कॅप्सुल मॅन” गिल यांची कथा म्हणजे हा चित्रपट. अर्थात ही भूमिका अक्षय कुमार याने साकारली आहे.
१९८९ साली पश्चिम बंगाल मधील राणीगंज मधील महावीर या कोळशाच्या खाणीत स्फोट होऊन पाणी शिरले व त्यात दोनशेहून अधिक कामगार अडकले होते. या कामगारांना गिल यांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता वाचवण्यासाठी अतोनात प्रयत्न केले होते व वाचवले होते. याच घटनेवर आधारित हा चित्रपट आहे.
स्वतःची पत्नी गरोदर असताना आणि तिला डॉक्टरकडे घेऊन जायचयं हे माहीत असूनही गिल यांनी आपल्या कर्तव्याला प्राधान्य दिले व ६५ मजुरांचे प्राण वाचवले होते. त्यामुळे अशा रिअल हिरो साठी तरी हा चित्रपट नक्कीच बघावा. टीनू देसाई यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट अक्षय कुमार साठी खास आहे कारण सतत एकापाठोपाठ एक असे फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर त्याचा हा चित्रपट चांगला आहे.
खरं तर हा चित्रपट अजून चांगला होऊ शकला असता. चित्रपटाची कथा थोडी लांबली असल्यामुळे तो रेंगाळत पुढे सरकतो. अशा प्रकारच्या चित्रपटांना चांगल्या बॅकग्राऊंड म्युझिक ची साथ असेल तर तो जास्त परिणामकारक ठरतो ज्याची इथे कमी आहे. पण एकंदरीत एकदा तरी बघायलाच हवा असा हा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.
४. थँक यु फॉर कमिंग |
लेखक | राधिका आनंद, प्रशस्ति सिंह |
दिग्दर्शक | करण बुलाणी |
कलाकार | भूमि पेडनेकर, शहनाज गिल, डॉली सिंह, कुशा कपिला, शिबानी बेदी, अनिल कपूर |
निर्माता | शोभा कपूर, एकता कपूर, अनिल कपूर, रिया कपूर |
प्रदर्शित तारीख | ६ ऑक्टोबर २०२३ |
भाषा | हिंदी |
“थँक यु फॉर कमिंग” चित्रपट समीक्षा :-
भुमी पेडणेकर हिचा “थँक यु फॉर कमिंग” हा चित्रपट ६ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला. परंतु हा चित्रपट तुम्ही सिनेमागृहात जाऊन तर सोडाच पण ओटीटी प्लॅटफॉर्मवर आल्यावर सुद्धा बघू नका असं आम्ही सुरूवातीलाच सांगू.
अतिशय भंगार प्लॉट घेऊन महिला स्त्रीवाद वगैरेच्या नावाखाली अत्यंत टुकार चित्रपट बनवण्यात आला आहे. त्यामुळे तुम्ही तो का बघावा हे सांगण्याचा प्रश्नच येत नाही. कांडू कनिका म्हणजे भूमी पेडणेकर ही एक अशी मुलगी आहे जीच्यासोबत लहानपणी लैंगिक शोषणाचे प्रकार घडलेत. आणि तेव्हापासून ती नक्की सेक्स चा आनंद काय हे शोधण्याचा प्रयत्न करतेय.
ऑर्गेझमसाठी ती कोणासोबत सुद्धा सेक्स करायला तयार आहे. आणि तरीही ती अजून खुश नाही. जो कोणी तिच्यासोबत झोपायला तयार असतो त्याला ती थॅंक्यू फॉर कमिंग असं म्हणत असते. इंटीमेट सीन्स आणि बोल्ड सीन्स चा इतका भरणा आहे की अर्धाअधिक पॉर्न फिल्म झाली आहे.
असो अतिशय टुकार , अर्थहीन असा चित्रपट नाही पाहीला तरी काही फरक पडणार नाही. माझ्याकडून या चित्रपटाला अर्धा स्टार.
५. धक धक |
लेखक | पारिजात जोशी, तरुण डुडेजा |
दिग्दर्शक | तरूण डुडेजा |
कलाकार | दीया मिर्जा, फातिमा सना शेख, रत्ना पाठक शाह, संजना सांघी |
निर्माता | तापसी पन्नू , आयुष माहेश्वरी, प्रांजल खंढडिया |
प्रदर्शित तारीख | १३ ऑक्टोबर २०२३ |
भाषा | हिंदी |
“धक धक” चित्रपट समीक्षा :-
धक धक असं नाव वाचून जर तुम्हाला वाटत असेल की एखादी लव्हस्टोरी असलेला हा चित्रपट आहे तर तुमचा अंदाज अगदीच चुकीचा आहे. पारिजात जोशी आणि तरूण डुडेजा यांनी लिहिलेल्या कथेवर आधारीत हा चित्रपट म्हणजे चार महिलांनी जिद्दीने बाईक वरून केलेला प्रवास आहे. विविध ठिकाणांहून आलेल्या या चौघी प्रत्येकीचा भुतकाळ सोबत घेऊन दिल्ली ते लेह खारदुंगला असा बाईकचा प्रवास करत आहेत.
महीला सक्षमीकरण , स्त्रीवाद वगैरे मुद्द्यांवर बरेच चित्रपट येत असतात. कुठे ना कुठे या चित्रपटांच्या कथेचा पाया हा सारखा असतो. तोच या कथेमध्ये सुद्धा जाणवतो. परंतु चित्रपटाची कथा, पटकथा, अभिनय, दिग्दर्शन सगळंच फसलंय असं म्हणावं लागेल. उगीच ओढून ताणून या चौघीजणी ट्रीपला गेल्या आहेत असं वाटतं राहतं. मुळात कथाच दमदार नाही आणि अभिनय सुद्धा बरा असल्यामुळे चित्रपट तेवढा परिणाम साधत नाही. माझ्याकडून या चित्रपटाला दीड स्टार.
६. गुठली लड्डू |
लेखक | गणेश पंडित, श्रीनिवास अब्रोल, इशरत आर खान |
दिग्दर्शक | इशरत आर खान |
कलाकार | संजय मिश्रा, सुब्रत दत्ता, कंचन पगारे, संजय सोनू, धनय सेठ, हीत शर्मा, कल्याणी मुले, अर्चना पटेल. |
निर्माता | प्रदीप रंगवानी |
प्रदर्शित तारीख | १३ ऑक्टोबर २०२३ |
भाषा | हिंदी |
“गुठली लड्डू” चित्रपट समीक्षा :-
समाजातील जातीव्यवस्थेवर भाष्य करणारे चित्रपट नेहमीच येत असतात. या जातीव्यवस्थे मध्ये ठराविक कामं ही ठराविक गटाने, ठराविक जातीच्या लोकांनी करावी असा अलिखित नियम समाजानेच घालून दिलेला आहे.
अशाच एका जातीव्यवस्थेच्या महत्वाच्या मुद्द्यांवर उजेड टाकणारा हा चित्रपट आहे. संजय मिश्रा आणि सुब्रत दत्ता यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट इशरत आर खान यांनी दिग्दर्शित केलेला आहे.
ही गोष्ट गुठली नावाच्या एका अनुसूचित जातीमध्ये जन्माला आलेल्या मुलाची आहे. ज्याचा कुटुंबातील माणसं ही समाजातील घाण साफ करण्याचं काम करतात त्यामुळे या कुटुंबियांना मिळणारी वागणूक ही अतिशय हीन दर्जाची असते. ना त्यांना समाजात मान ना इज्जत.
या गुठलीला मात्र इतर मुलांसारखं शिक्षण घ्यायचं आहे परंतु शाळेत प्रवेश न मिळाल्याने तो कसा शिकतो ही एक प्रेरणादायी गोष्ट आहे. अपमान सहन करत गुठली कसा शिकतो.? काय करतो हे बघण्यासाठी हा चित्रपट नक्कीच बघावा. संजय मिश्रा यांनी अपेक्षेप्रमाणे अभिनयाची बॅटिंग उत्तम केली आहे. इतरही सगळ्याच कलाकारांनी अभिनय उत्तम केला आहे.
काही गोष्टी अजून पुरक असत्या तक्ष चित्रपट अजून जास्त चांगला झाला असता. परंतु एकदा तरी बघायलाच हवा असा हा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.
७. भगवान भरोसे |
लेखक | सुधाकर नीलमणि एकलव्य, मोहित चौहान |
दिग्दर्शक | शिलादित्य बोरा |
कलाकार | सतेंद्र सोनी, स्पर्श सुमन, मौसमी मखीजा, विनय पाठक, श्रीकांत वर्मा, महेश शर्मा, सावन टांक, मनु ऋषि चड्ढा आदि |
निर्माता | प्रसन्ना विठानगे, शिलादित्य बोरा, मिलाप सिंह जडेजा, के के राधामोहन, शिल्पी अग्रवाल, संयुक्ता गुप्ता, अंकुर इंद्रविजय सिंह |
प्रदर्शित तारीख | १३ ऑक्टोबर २०२३ |
भाषा | हिंदी |
“भगवान भरोसे” चित्रपट समीक्षा :-
निर्माते, दिग्दर्शक यांनी चांगल्या विषयावर आधारित चित्रपट काढला खरा परंतु प्रमोशन नाही, जाहिरात नाही त्यामुळे तो चालला तर ठीक नाहीतर सब भगवान भरोसे असं एकंदरीत या चित्रपटाच्या बाबतीत आहे.
एका खेडेगावातील ही गोष्ट आहे. दोन मुलांच्या भावविश्वाच्या अवतीभोवती फिरणारी कथा सुधाकर नीलमणी यांनी लिहीली आहे. दिग्दर्शन शिलादित्य बोरा यांनी केलं आहे. साधारण १९८९ चा हा काळ दाखवला गेला आहे जेव्हा दुरदर्शन वर महाभारत ही मालिका प्रत्येक घरात आवर्जून बघितली जात होती. ही मालिका आणि एकंदर घरातील संस्कार, शिकवण याचा भोला आणि शंभू या दोन मुलांवर कशा प्रकारे परिणाम होतो हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
शेजारच्या गावातील मुस्लिम वस्तीतील माणसं म्हणजे राक्षस आणि त्यांना मारायला हे दोघं धनुष्यबाण बनवून ते घेऊन निघाले आहेत. त्यांच्या मनावर हिंदू धर्म आणि शिकवण, दंतकथा यांचा इतका प्रभाव पडला आहे की त्यांचा पुरता गोंधळ उडाला आहे. यात भर म्हणजे त्या गावातील पंडित. आता ते दोघं नक्की काय करतात हे बघण्यासाठी हा चित्रपट बघणं गरजेचं आहे.
कथा , विषय चांगला असून चित्रपट म्हणावा तसा प्रभावी वाटत नाही तरीही एका वेगळ्या धाटणीच्या विषयावर आधारित म्हणून एकदा हा चित्रपट बघायला हवा. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.
८. डरन छू |
लेखक | भरत जाधव |
दिग्दर्शक | भरत रतन |
कलाकार | करण पटेल, आशुतोष राणा, मनोज जोशी |
निर्माता | अंकीता भार्गव |
प्रदर्शित तारीख | १३ऑक्टोबर २०२३ |
भाषा | हिंदी |
“डरन छू” चित्रपट समीक्षा :-
१३ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झालेला डरन छू हा चित्रपट टिव्ही ॲक्टर करण पटेल याचा पहीलाच चित्रपट असून भरत रतन यांनी तो दिग्दर्शित केला आहे. यात आशुतोष राणा, मनोज जोशी असे इतर कलाकार आहेत. विनोदी वाटणारा हा चित्रपट खरं तर खूप गंभीर आणि महत्वाच्या मुद्द्यांना हात घालतो.
चित्रपटाचा नायक मानव अवस्थी म्हणजेच करण पटेल हा आयुष्याला कंटाळलेला आहे. त्याला हवं तसं काही होत नाहीय. मनासारखी नोकरी नाही. वैयक्तिक आयुष्यात सुद्धा सतत समस्या म्हणूनच तो कंटाळू आत्महत्या करत असतो परंतु तेवढ्यात त्याला जुगाडू म्हणजे आशुतोष राणा हे वाचवतात. व त्याला मरण्यापूर्वी निदान जवळच्या लोकांसाठी काहीतरी करून ठेव , इन्शुरन्स वैगरे. आणि मग हवं ते कर असं सांगतात. एक डेडलाइन ठरवून सगळी कामं करून मग आत्महत्या करावी असं मानव ठरवतो.
परंतु त्याच्या आयुष्यात एक ट्विस्ट येतो तो काय हे बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल. चित्रपटाची कथा, विषय, अभिनय सगळं चांगलं आहे. परंतु स्क्रीन प्ले अजून चांगला असायला हवा होता. चित्रपट उगीच लांबवला आहे तो थोडक्यात मांडता आला असता तर अजून प्रभावी झाला असता. तरी एकदा नक्की बघू शकतो असा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.
९. गणपथ |
लेखक | विकास बहल |
दिग्दर्शक | विकास बहल |
कलाकार | टाइगर श्रॉफ, कृति सैनन, रहमान, जमील खान, गिरीश कुलकर्णी, जियाद बाकरी, रॉब होरॉक्स, अमिताभ बच्चन |
निर्माता | वाशु भगनानी, जैकी भगनानी, दीपशिखा देशमुख, विकास बहल |
प्रदर्शित तारीख | २० ऑक्टोबर २०२३ |
भाषा | हिंदी |
“गणपथ” चित्रपट समीक्षा :-
कथा, पटकथा, दिग्दर्शन, सिनेमॅटोग्राफी या सगळ्याचा कशाचा कशाशी संबंध नसलेला हा टायगर श्रॉफ चा सुमार चित्रपट आहे. २० ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट विकास बहल यांनी दिग्दर्शित केला असून याची कथा सुद्धा विकास यांनीच लिहीली आहे. परंतु कथा आणि दिग्दर्शन या दोन्ही गोष्टी त्यांना अजिबातच जमलेल्या नाही असं वाटतं.
या चित्रपटात श्रीमंत आणि गरीब यातली दरी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. गुड्डू उर्फ गणपत म्हणजे टायगर श्रॉफ हा गरिबांना मदत करणारा हिरो आहे पण तो नेमका कुठून आला आहे त्याची पार्श्वभूमी काय याचा काही थांगपत्ता नाही. उगीच कृत्रिम वाटणारे व्हिज्युअल इफेक्ट्स आणि ॲक्शन सीन चा नको तेवढा भडीमार या चित्रपटात पहायला मिळतो. दलपती म्हणजे अमिताभ बच्चन हे कथा सांगत आहेत. क्रीती सेनन ही नावापुरती नायिका आहे.
एकंदर सुमार दर्जाच्या या चित्रपटाला किती स्टार द्यावे हा प्रश्न आहे. माझ्याकडून या चित्रपटाला एक स्टार.
१०. यारीया २ |
लेखक | राधिका राव, विनय सप्रू |
दिग्दर्शक | राधिका राव, विनय सप्रू |
कलाकार | दिव्या खोसला कुमार, मीजान जाफरी, अनस्वरा राजन, यश दासगुप्ता, भाग्यश्री बोरसे, पर्ल वी पुरी, वरीना हुसैन, प्रिया प्रकाश वैरियर, लिलेट दुबे, मुरली शर्मा |
निर्माता | भूषण कुमार, दिव्या खोसला कुमार |
प्रदर्शित तारीख | ५ ऑक्टोबर २०२३ |
भाषा | हिंदी |
“यारीया २” चित्रपट समीक्षा :-
भुषण कुमार आणि दिव्या खोसला कुमार निर्मित यारिया २ हा चित्रपट बेंगलोर डायरीज या मल्याळम चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. फार अपेक्षा नसताना सुद्धा खरं तर या चित्रपटाने एक चांगली कलाकृती सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
शिमला मधील तीन भावंडांची ही गोष्ट आहे. जी कोणत्या ना कोणत्या कारणाने आता मुंबई शहरात आलेली आहेत. लाडली छिब्बर म्हणजेच दिव्या खोसला ही प्रमुख भूमिकेत असून तिला मॉडेलिंग करण्याची इच्छा असते परंतु तिची आई तिचं मनाविरुद्ध लग्न लावून देते. त्यामुळे ति आता मुंबई मध्ये आलेली असते. तिचा एक भाऊ शिखर म्हणजे मीजान जाफरी ज्याला रेसिंग बाईक चालवायला आवडतं तो सुद्धा मुंबईत आलेला असतो. तिसरा भाऊ बजरंग हा कॉर्पोरेट जॉबसाठी मुंबईत आला आहे.
परंतु या तिघांच्या आयुष्यात काही ना काही मनाविरुद्ध चालू आहे. आता या सगळ्यात हे तिघं भावंडं म्हणून एकत्र राहून कशी एकमेकांना समजून घेऊन साथ देतात, त्यांच्या समस्या कशा सोडवतात हे बघण्यासाठी हा चित्रपट बघायला हवा. कथा, विषय छान आहे परंतु चित्रपटाची बांधणी अजून चांगल्या प्रकारे करता आली असती. दिग्दर्शन उत्तम आहे. हा मनोरंजन करणारा आहे इतकं नक्की. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार .
११. १२ वी फेल |
लेखक | विधु विनोद चोपड़ा |
दिग्दर्शक | विधु विनोद चोपड़ा |
कलाकार | विक्रांत मैसी , मेधा शंकर , अंशुमान पुष्कर , अनंत जोशी , हरीश खन्ना , संजय बिश्नोई , विकास दिव्यकीर्ति , प्रियांशु चटर्जी |
निर्माता | विधु विनोद चोपड़ा आणि जी स्टूडियोज |
प्रदर्शित तारीख | २७ ऑक्टोबर २०२३ |
भाषा | हिंदी |
“१२ वी फेल” चित्रपट समीक्षा :-
दिग्दर्शक विधु विनोद चोपडा यांनी दिग्दर्शित केलेला १२वी फेल हा एक अतिशय उत्कृष्ट असा प्रेरणादायी चित्रपट असून त्यांनीच या चित्रपटाचं लेखन आणि निर्मिती सुद्धा केली आहे.
सुप्रसिद्ध लेखक अनुराग पाठक यांच्या १२वी नापास या पुस्तकावर आधारित हा चित्रपट आहे. आयपीएस अधिकारी मनोजकुमार शर्मा यांचा जीवनपट रुपेरी पडद्यावर उलगडणारा हा चित्रपट आहे. मध्यप्रदेश मधील मनोजकुमार शर्मा म्हणजेच विक्रांत मेस्सी हा बारावीच्या परीक्षेत कॉपी करून पास होण्याचा प्रयत्न करत असतो परंतु असं काहीतरी घडतं की त्याचं अख्खं आयुष्य बदलून जातं.
ही एक प्रेरणादायी गोष्ट आहे. मेहनत आणि जिद्द असेल तर माणूस काहीही करू शकतो हे या चित्रपटात पहायला मिळतं. विक्रांत मेस्सी याने उत्कृष्ट अभिनय केला आहे. काही गोष्टी सोडल्या तर ही एक उत्तम कलाकृती आहे. ना बिग बजेट, ना बडे कलाकार तरीही कथा आणि दिग्दर्शन उत्तम असेल तर चित्रपट चांगला बनू शकतो हे दाखवून देणारा हा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला साडेतीन स्टार.
१२. तेजस |
लेखक | सर्वेश मेवारा |
दिग्दर्शक | सर्वेश मेवारा |
कलाकार | कंगना राणावत, अंशुल चौहान, वरुण मित्रा, विशाक नायर, आशीष विद्यार्थी |
निर्माता | रॉनी स्क्रूवाला |
प्रदर्शित तारीख | २७ ऑक्टोबर २०२३ |
भाषा | हिंदी |
“तेजस” चित्रपट समीक्षा :-
कंगणा राणावत हिची मुख्य भूमिका असलेला आणि पुर्णपणे फसलेला तेजस चित्रपट आहे. तेजस गिल या एका पायलटच्या मोहीमेची कथा सांगणारा हा चित्रपट आहे.
सर्वेश मेवारा यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटा्त बघण्यासारखं असं काही नाही. तीच तीच देशप्रेमावर आधारित कथा असल्यामुळे नाविन्यपूर्ण असं काहीच नाही. तेजस ही विमानाची पायलट असून ती एका खास मोहीमेवर पाकिस्तानात जाते. आता पुढे काय होतं हे बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल.
कथा, पटकथा, दिग्दर्शन सगळंच अगदीच ओके म्हणावं असं आहे. कंगणा राणावत सुद्धा या चित्रपटाला वाचवू शकलेली नाही. ओटीटी प्लॅटफॉर्मवर आल्यावर सुद्धा हा चित्रपट नाही बघितला तरी चालेल इतका सुमार आहे. माझ्याकडून या चित्रपटाला एक स्टार.
१३. सजनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ |
लेखक | मिखिल मुसळे, परिंदा जोशी, अनु सिंह चौधरी, क्षितिज पटवर्धन |
दिग्दर्शक | मिखिल मुसळे |
कलाकार | राधिका मदान, निमरत कौर, भाग्यश्री, सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर, शशांक शिंदे, सुमित व्यास |
निर्माता | दिनेश विजन |
प्रदर्शित तारीख | २७ ऑक्टोबर २०२३ |
भाषा | हिंदी |
“सजनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ” चित्रपट समीक्षा :-
आजकाल आपण सोशल मीडिया इतका वारतो की आपल्या आयुष्यातील प्रत्येक छोटी मोठी गोष्ट सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत असतो. या सोशल मीडियाचे जेवढे फायदे आहेत तेवढेच किंबहुना जास्तच तोटे आहेत. हेच सांगणारा हा चित्रपट आहे.
एका माध्यमिक शाळेतील सजनी ही शिक्षिका सोशल मीडिया वर खूप ॲक्टिव्ह असते. सजनी ही मराठी कुटुंबातील मुलगी असते. अशीच एकदा शाळेतील इतर शिक्षिंका सोबत सहलीला गेलेली असते व तिकडे स्वतःच्या वाढदिवसाची पार्टी करायला म्हणून ती एका क्लब मध्ये जाते आणि तिचा तिकडचा डान्स व्हिडिओ व्हायरल होतो. पण हे प्रकरण इतकं मोठं होतं की ती सुसाइड नोट सोडून गायब होते.
आता ती खरंच आत्महत्या करते की तिला अजून कोण गायब करतं हे चित्रपट बघितल्यावर कळेल.
राधिका मदन ही मुख्य भूमिकेत असून तिने चांगला अभिनय केला आहे. निमरत कौर हीने सुद्धा पोलिस अधिकारी चांगली उभी केली आहे. एकंदर एकदा तरी बघायला हवा असा हा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.
१४. मुजिब : द मेकिंग ऑफ नेशन |
लेखक | अतुल तिवारी, शमा जैदी |
दिग्दर्शक | श्याम बेनेगल |
कलाकार | अरिफिन शुवू, नुसरत इमरोज तिशा, फजलुर्रहमान बाबू, चंचल चौधरी, नुसरत फारिया, रियाज, दीपक अंतानीरजित कपूर |
निर्माता | प्रदीप रंगवानी |
प्रदर्शित तारीख | २७ ऑक्टोबर २०२३ |
भाषा | हिंदी |
“मुजिब : द मेकिंग ऑफ नेशन” चित्रपट समीक्षा :-
‘मुजिब’ हा एक चरित्रपट असून बांगलादेशचे जनक आणि बांगलादेशचे पहीले राष्ट्रपती असलेल्या नेते शेख मुजिबुर रेहमान यांच्या आयुष्यावर आधारित आहे. पाकिस्तान विरुद्ध युद्धात शेख मुजीबुर रेहमान यांनी केलेला संघर्ष आणि बांगलादेशला स्वतंत्र देश म्हणून मिळवून दिलेली ओळख हा प्रवास या चित्रपटात पहायला मिळतो.
अफिरीन शूवू यांनी शेख रेहमान यांची भूमिका साकारली असून यात त्यांचं बालपण ते पाकिस्तान विरुद्ध युद्धात पुढाकार घेऊन बांगलादेशला पाकिस्तानातून वेगळं करण्यापर्यंतचा प्रवास या चित्रपटात पहायला मिळतो. यात त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची हत्या करण्यात आली होती हे सुद्धा दाखवलं आहे. या संपूर्ण संघर्षामधे रेहमान यांची पत्नी रेणू यांची सुद्धा महत्वपूर्ण भूमिका होती हे या चित्रपटात पहायला मिळतं. हा चित्रपट नक्कीच बघावा असा आहे. श्याम बेनेगल यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट इतर चित्रपटांपेक्षा वेगळा आहे कारण तो एक चरित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.
१५. मंडळी |
लेखक | प्रशांत कुमार गुप्ता |
दिग्दर्शक | राकेश चतुर्वेदी ओम |
कलाकार | विनीत कुमार, अभिषेक दुहन, आंचल मुंजाल |
निर्माता | राकेश चतुर्वेदी ओम |
प्रदर्शित तारीख | २७ ऑक्टोबर २०२३ |
भाषा | हिंदी |
“मंडळी” चित्रपट समीक्षा :-
निर्माते, दिग्दर्शक यांनी चांगल्या विषयावर आधारित चित्रपट काढला खरा परंतु प्रमोशन नाही, जाहिरात नाही त्यामुळे तो चालला तर ठीक नाहीतर सब भगवान भरोसे असं एकंदरीत या चित्रपटाच्या बाबतीत आहे.
उत्तर भारतात दसऱ्याच्या दिवशी रामलीला सादर केली जाते. ज्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्रात दशावतार ही कला सादर केली जाते तसंच ही रामलीला. याच रामलीला सादर करणाऱ्या कलाकारांची कहाणी सांगणारा हा चित्रपट आहे. या कलाकारांची होणारी उपेक्षा यात दाखवण्यात आली आहे. हल्ली मनोरंजनाची साधने आणि मार्ग इतके आहेत रामलीला सारख्या पारंपरिक कलेकडे लोकं आता वळत नाहीत.
म्हणूनच ही रामलीला बघण्यासाठी प्रेक्षक गोळा करण्यासाठी आयोजक एक आयटम साँग ठेवतात आणि त्यावरून खरे रामभक्त याविरोधात आवाज उठवतात. आता पुढे काय होतं हे या चित्रपटात पहायला मिळेल. एकंदर चित्रपटाची कथा, विषय नक्कीच विचार करायला लावणारे आहेत. आपल्याकडे असणाऱ्या बऱ्याच पारंपरिक कला लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. त्या जपणं गरजेचं आहे हे सांगणारा हा चित्रपट आहे. दिग्दर्शन, अभिनय उत्तम आहे. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.
तर मंडळी यापैकी कोणते चित्रपट तुम्ही पाहीलेत आणि कोणते आवडलेत हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.
हे पण वाचा :-
फेब्रुवारी २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी
फेब्रुवारी २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी
मार्च २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी
मार्च २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी
एप्रिल २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी
एप्रिल २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी
मे २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी
मे २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी
जून २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी
जून २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी
जुलै २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी
जुलै २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी
ऑगस्ट २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी
ऑगस्ट २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी
सप्टेंबर २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी