ऑक्टोबर 2024 मध्ये रिलीझ झालेल्या मराठी चित्रपटांची यादी आणि चित्रपटांची समीक्षा
ऑक्टोबर 2024 मध्ये रिलीझ झालेल्या मराठी चित्रपटांची यादी आणि चित्रपटांची समीक्षा | List of Marathi Movies released in October 2024 and Movie Reviews
Written by : आकांक्षा कोलते
Updated : ऑक्टोबर 28, 2024 | 11:37 PM
खरं तर आता वेबसिरीज चा जमाना असल्यामुळे प्रेक्षकांच्या चित्रपटांच्या बाबतीत अपेक्षा वाढल्या आहेत. त्यातही नवीन आलेल्या चित्रपटांमध्ये ओरिजनल कंटेट कमीच असतो. परंतु आशयघन आणि दर्जेदार कथानक हा मराठी चित्रपटांचा गाभा आहे. मराठी चित्रपट हे नेहमीच वास्तववादी आणि चांगला कंटेंट घेऊन भेटीला येतात हे आता प्रेक्षकांच्या लक्षात येत आहे. त्यामुळे मराठी चित्रपटांना प्रेक्षक आता भरभरून प्रतिसाद देतात. असं असलं तरीही हल्ली इतके चित्रपट प्रदर्शित होत असतात की ते तेवढे दर्जेदार असतातच असं नाही. त्यामुळे आम्ही हे सांगण्याचा प्रयत्न करू की प्रदर्शित झालेला एखादा चित्रपट खरंच बघायला हवा की नको.
आज या लेखात आपण ऑक्टोबर २०२४ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपट आम्हाला कसे वाटले ते सांगणार आहोत. ज्यामुळे ते बघायला हवे की नको ते ठरवणं तुम्हाला सोपं जाईल.
१. एक डाव भुताचा (Ek Daav Bhutacha) |
लेखक | संदीप मनोहर नवरे |
दिग्दर्शक | संदीप मनोहर नवरे |
कलाकार | मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, नागेश भोसले,अक्षय कुलकर्णी, हर्षद नायबळ, मयूरी देशमुख, अश्विनी कुलकर्णी, नंदिनी वैद्य, वर्षा दांदळे |
निर्माता | रेवा अग्रवाल |
रिलीज तारीख | ४ ऑक्टोबर २०२४ |
भाषा | मराठी |
“एक डाव भुताचा” चित्रपट समीक्षा :-
संदीप मनोहर कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केलेला एक डाव भुताचा हा चित्रपट ४ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाची कथा सुद्धा संदीप यांनी लिहीली आहे. चित्रपटात मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव यांच्या मुख्य भूमिका आहेत. आणि हे दोघं आहेत म्हटल्यावर अर्थातच चित्रपट विनोदी आहे.
चित्रपटाची कथा नवीन नाही. याआधी सुद्धा अशा प्लॉट वर आधारित अनेक चित्रपट आलेले आहेत. मदन(सिद्धार्थ जाधव) हा तरुण मधुमती(मयुरी देशमुख) हिच्यावर प्रेम करत असतो परंतु तिच्यासमोर ते व्यक्त करण्याचं धाडस मात्र त्याच्याकडे नसतं. मदन कडे एक अविश्वसनीय कला किंवा देणगी असते ती म्हणजे तो भुतांना बघू शकतो, त्यांच्याशी बोलू शकतो. त्याचमुळे शशिकांत (मकरंद अनासपुरे)चं भुत त्याला एक ऑफर देतं की मदनचं प्रेम मिळवण्यासाठी ते त्याला मदत करेर परंतु त्या बदल्यात मदन ने त्याला त्याच्या खुन्यांना पकडण्यासाठी मदत करायची. आता मदन ती मदत करतो का.? मदनला मधुमती हो बोलते का.? शशिकांत ला त्याचा भुतकाळ कळतो का.? या सगळ्या प्रश्नांची हा चित्रपट बघीतल्यावर तुम्हाला मिळतील.
चित्रपटाचा पुर्वार्ध चांगला आहे, प्रेक्षकांना हसवतो परंतु नंतर नंतर कथा प्रेडिक्टेबल होते आणि थोडीशी लांबल्यामुळे कंटाळवाणी देखील वाटते. संदीप यांचं दिग्दर्शन ठिकठाक आहे. बाकी संगीत, कॅमेरा वर्क, संकलन वैगरे ठिक आहे. एकदा मनोरंजन म्हणून बघायला हरकत नाही असा हा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.
२. एक नंबर (Yek Number) |
लेखक | तेजस्विनी पंडित, धैर्य घोलप |
दिग्दर्शक | राजेश मापुस्कर |
कलाकार | धैर्य घोलप, सायली पाटील, तेजस्विनी पंडित, पुष्कर श्रोत्री, संजय मोने, अजित भुरे, आनंद इंगळे |
निर्माता | तेजस्विनी पंडित, वरदा नाडियादवाला |
रिलीज तारीख | १० ऑक्टोबर २०२४ |
भाषा | मराठी |
“एक नंबर” चित्रपट समीक्षा :-
१० ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झालेला “एक नंबर” या चित्रपटाची निर्मिती तेजस्विनी पंडित हिने केली असून यावेळी अभिनयासोबत कथा लेखन सुद्धा तेजस्विनी पंडित
हिने स्वतः केलेलं आहे. तिच्यासोबत धैर्य घोलप याने सुद्धा कथा पटकथा लेखन आणि अभिनय केला आहे. धैर्य याची या चित्रपटात मुख्य भूमिका आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाची कथा मनसे प्रमुख राज ठाकरे यांचं आयुष्य आणि कारकीर्द याभोवती फिरणारी आहे.
चित्रपटाची कथा साधी सरळ सरधोपट पणे मांडलेली आहे. सधनपुर अशा काल्पनिक गावात ही कथा घडताना दाखवलेली आहे. प्रताप(धैर्य घोलप) हा तरुण गावातील एक राजकारणी कार्यकर्ता असतो. तो त्याच्याच गावातील पिंकी वर मनापासून प्रेम करत असतो परंतु पिंकी काही त्याला भाव देत नसते. तो तिचं प्रेम मिळवण्यासाठी काही करायला तयार असतो. याच धर्तीवर पिंकी त्याला अट घालते की जर तो राज ठाकरे यांना त्यांच्या गावात घेऊन आला तर ती प्रतापला हो बोलेल. आणि याचसाठी प्रताप मुंबईत पोहचतो. परंतु तिकडे गेल्यावर काही वेगळंच घडतं. राज ठाकरे यांना भेटण्यासाठी तो एक पथनाट्य सादर करून जनजागृती करणारा ग्रुप जॉईन करतो परंतु खरं तर नंतल समोर येतं की तो ग्रुप राज ठाकरे यांना मारण्यासाठी आलेला एक पाकिस्तानी दहशतवाद्यांचा ग्रुप आहे. आता प्रताप यात अडकतो की राज ठाकरे यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करतो.? पिंकी ची मागणी पूर्ण होते का.? पिंकी प्रतापचं प्रेम स्विकारते का.? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं म्हणजे हा चित्रपट. खरं तर ही एक गोष्ट आहे परंतु मुख्य चित्रपटाचा हेतू म्हणजे राज ठाकरे यांची कारकीर्द, त्यांनी केलेलं काम पडद्यावर मांडणं. त्यांची जुनी भाषणं या चित्रपटात मधे मधे ऐकायला मिळतात. त्यांनी केलेलं काम कथेच्या अनुषंगाने मांडणं हे दिग्दर्शक राजेश यांनी अचूक साधलेलं आहे.
दिग्दर्शन तसं ठिकठाक आहे. कलाकारांचा अभिनय चांगला आहे. एडिटिंग अजून चांगलं असायला हवं होतं. संगीत छान आहे. काही गाणी चांगली जमली आहेत. एकंदर मनोरंजन करणारा चित्रपट आहे. मनसे आणि राज ठाकरे यांच्या फॅन ना हा चित्रपट नक्कीच आवडेल. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.
३. फुलवंती (Phullwanti) |
लेखक | बाबासाहेब पुरंदरे (कथा), पटकथा, संवाद – प्रविण तरडे |
दिग्दर्शक | स्नेहल प्रविण तरडे |
कलाकार | प्राजक्ता माळी, गश्मीर महाजनी, स्नेहल तरडे, वैभव मांगले, क्षितिश दाते, ऋषिकेश जोशी, दिप्ती लेले, सुनील अभ्यंकर |
निर्माता | प्राजक्ता माळी |
रिलीज तारीख | १३ ऑक्टोबर २०२४ |
भाषा | मराठी |
“फुलवंती” चित्रपट समीक्षा :-
बाबासाहेब पुरंदरे यांच्या फुलवंती या कादंबरीवर आधारित फुलवंती हा चित्रपट १३ ऑक्टोबर रोजी चित्रपट गृहात प्रदर्शित झाला. प्राजक्ता माळी हिने अभिनय, उद्योग याचसोबत निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत पहीला चित्रपट ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला निवडला. या चित्रपटाच्या निमित्ताने स्नेहल प्रविण तरडे हिने सुद्धा प्रथमच दिग्दर्शनाची जबाबदारी स्वीकारली. बुद्धीमत्ता आणि कला यांतील संघर्ष या चित्रपटात पहायला मिळतो. खरं तर या चित्रपटाची बरीच चर्चा झाली, प्रमोशन झालं. बऱ्याच सकारात्मक प्रतिक्रिया किंवा समीक्षणं मांडली गेली परंतु प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर चित्रपटात त्रुटी सुद्धा तेवढ्याच आहेत आणि एक ठराविक प्रेक्षक वर्गाला चित्रपट खूप भारी वाटू शकतो तर त्याच वेळी काही जणांना तो ठिकठाक वाटू शकतो.
पेशवे काळात घडणारी ही कथा आहे. संपूर्ण दिल्लीत जिच्या सौंदर्यचा आणि नृत्याविष्काराचा डंका आहे अशी फुलवंती जेव्हा महाराष्ट्रात पुण्यात पेशव्यांच्या शनिवार वाड्यात येते तेव्हा व्यंकट शास्त्री आणि तिच्या मधे एक पैज लागते. त्यावरच हा संपूर्ण चित्रपट बेतलेला आहे. अतिशय बुद्धिमान, न्यायप्रिय असलेले विद्वान पंडीत व्यंकट शास्त्री हे शनिवार वाड्यात फुलवंतीचा अपमान करतात आणि तो अपमान जिव्हारी लागल्यामुळे फुलवंती भर दरबारात शास्त्रींना एक आव्हान देते. आणि जर ती यात हरली तर आयुष्यभर ती त्यांची दासी म्हणून राहील असं सांगते. आता ते आव्हान काय असतं.? बुद्धीमत्ता आणि कला या संघर्षात कोण जिंकत.? अर्थात हे बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल. ॲमेझॉन प्राईम वर हा चित्रपट उपलब्ध आहे.
प्रविण तरडे यांचे संवाद चांगले असले तरी पटकथा मात्र आकर्षक झाली नाही. स्नेहल तरडे हिचं दिग्दर्शन ठिक आहे. प्राजक्ता माळी ही अख्ख्या महाराष्ट्राला फुलवंती म्हणून आवडली पण मला मात्र ती फुलवंती म्हणून फारशी भावली नाही. एक तडफदार, तिखट आणि ठाम असलेली फुलवंती साकारताना प्राजक्ता ला खूप कष्ट घ्यावे लागलेत असं जाणवतं, त्यात सहजता आणि नैसर्गिकपणाचा अभाव जाणवतो. जो ऑरा जाणवायला हवा होता तो दिसला नाही. नृत्यदिग्दर्शन छान आहे. परंतु एकदा एक ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला चित्रपट बघायचा असेल तर हा चित्रपट तुम्ही नक्कीच एंजॉय कराल. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.
४. लाईक आणि सबस्क्राईब (Like Aani Subscribe) |
लेखक | अभिषेक मेरूकर |
दिग्दर्शक | अभिषेक मेरूकर |
कलाकार | अमेय वाघ, अमृता खानविलकर, शुभंकर तावडे, जुई भागवत,राजसी भावे, पु्ष्कराज चिरपूटकर, गौतमी पाटील, विठ्ठल काळे |
निर्माता | नितीन वैद्य, अभिषेक मेरूकर |
रिलीज तारीख | १८ ऑक्टोबर २०२४ |
भाषा | मराठी |
“लाईक आणि सबस्क्राईब” चित्रपट समीक्षा :-
सध्या मोबाईल आणि पर्यायाने सोशल मीडिया म्हणजे प्रत्येक माणसाच्या आयुष्यातील अविभाज्य भाग झालेला आहे. त्यामुळे फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा अशी विनंती सगळ्यांकडूनच ऐकायला मिळते. त्यातल्या त्यात तरूण वर्ग या जाळ्यात जास्त अडकत चालला आहे. असंच व्लॉगींग करणारे व्लॉगर, इन्फ्लुएन्सर आपल्या दैनंदिन जीवनातील गोष्टी दाखवत असतात आणि लाखो लोकं त्यांना फॉलो करून ते बघत असतात. अशाच एका व्लॉगर असलेल्या तरूणीला व्हिडिओ बनवताना एक मृतदेह सापडतो आणि पुढे काय घडतं याभोवती ही कथा गुंफलेली आहे.
खुशी(जुई भागवत) ही एक व्लॉगर आहे परंतु खरं तर अभिनय क्षेत्रात आपलं नशीब आजमवायला मुंबईत येऊन स्ट्रगल करणारी ती एक अभिनेत्री आहे. पेशाने मालिका साठी लेखिका म्हणून स्ट्रगल करणाऱ्या आपली मैत्रीण श्रुतीसोबत (राजसी भावे) ती खोली भाड्याने घेऊन रहात असते. एक दिवस असंच संध्याकाळी समुद्र किनारी व्लॉगींग चा व्हिडिओ शूट करत असताना तिथे खुशीला एक पिशवी सापडते, त्यातील सामान बघून पत्ता शोधत शोधत ती पिशवी देण्यासाठी पत्त्यावर पोहचते परंतु त्या घरात तिला एक मृतदेह आढळतो. अर्थात हे सगळं व्हिडिओ मध्ये शूट होत असतं. आता तो मृतदेह कोणाचा.? खुशीचा या सगळ्याशी काही संबंध आहे का.? पुढे काय होतं हे बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल.
अमेय वाघ याने रोहीदास ही भूमिका अगदी सुंदर साकारली आहे. अमृता खानविलकर हिने पत्रकार आणि एनजीओ साठी काम करणारी तडफदार तरुणी उत्तम साकारली आहे. कथा शेवटपर्यंत खिळवून ठेवते. शेवटी क्लायमॅक्स तर अप्रतिम आहे. विशेष म्हणजे गौतमी पाटील हिचे फॅन असाल तर तिचं आयटम साँग सुद्धा आहे बरं, ते खास नाही ही गोष्ट वेगळी. परंतु बऱ्याच दिवसांनी मराठीत चांगला सस्पेन्स चित्रपट आला म्हणायला हरकत नाही. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.
५. पाणी (Paani) |
लेखक | नितीन दीक्षित |
दिग्दर्शक | आदिनाथ कोठारे |
कलाकार | आदिनाथ कोठारे, सुबोध भावे, ऋचा वैद्य , किशोर कदम, गिरीश जोशी, रजित कपूर, नितीन दीक्षित |
निर्माता | नेहा बडजात्या, प्रियांका चोप्रा जोनास, महेश कोठारे |
रिलीज तारीख | १८ ऑक्टोबर २०२४ |
भाषा | मराठी |
“पाणी” चित्रपट समीक्षा :-
चित्रपटाच्या नावावरूनच समजतं की चित्रपटात पाणी टंचाई आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या भिषण परिस्थितीवर भाष्य करणारा हा चित्रपट असेल. आदिनाथ ठाकरे याने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत पहीलाच विषय इतका महत्त्वाचा आणि ज्वलंत समस्या मांडणारा आहे.
मराठवाडा म्हटलं की डोळ्यासमोर फक्त दुष्काळ, भेगा पडलेली कोरडी जमीन येते. आणि पाण्यासाठी वणवण करणारी माणसं, डोक्यावरून भांडी घेऊन दूरवर पायी चालत जाऊन पाणी आणणाऱ्या बायका आठवतात. अगदी हेच सगळं या चित्रपटात बघायला मिळतं.
हनुमंत केंद्रे (आदिनाथ कोठारे) हा या कथेचा नायक आहे. मराठवाड्यातील नागदरवाडी गावात राहणाऱ्या हनुमंतचं लग्न (आदिनाथ कोठारे) दुसऱ्या गावातील सुर्वणाशी (ऋचा वैद्य) ठरलेलं असतं परंतु नागदरवाडी गावात पडणाऱ्या सततच्या दुष्काळामुळे तिच्या घरचे हे लग्न ऐन वेळी मोडतात परंतु तोपर्यंत हनुमंत हा सुवर्णाच्या प्रेमात पडलेला असतो. त्यामुळे हे लग्न मोडल्यावर गावातील पाण्याची समस्येची त्याला जास्त जाणीव होते. तो ठरवतो की काही करून गावात पाणी आणायचं आणि लग्न फक्त सुवर्णा सोबतच करायचं. आता त्याच्या पाणी आणण्यात तो यशस्वी होतो का.? हनुमंत आणि सुवर्णा यांचं लग्न होतं का.? हे बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल.
पर्यावरण वाचवणं किती गरजेचं आहे हा संदेश देण्याचा प्रयत्न आदिनाथ ने या चित्रपटातून केलेला आहे. सामाजिक ,पर्यावरण पूरक संदेश देणाऱ्या चित्रपटाला प्रेमकथेचा ओलावा आहे. चित्रपटाची कथा सुरूवातीला खूप रेंगाळते परंतु उत्तरार्धात पकड घेते. बऱ्याच ठिकाणी चित्रपट संथ वाटतो. आदिनाथचा दिग्दर्शनाचा प्रयत्न चांगला आहे परंतु करण्यासारखं अजून खूप काही होतं. सगळ्यांचा अभिनय चांगला आहे. मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त परिस्थिती चांगली चित्रित केली आहे. एकंदर सामाजिक समस्येवर भाष्य करणारा, मसाला नसलेला एक साधा सरळ चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.
६. राजा राणी (Raja Rani) |
लेखक | गोवर्धन दोलताडे |
दिग्दर्शक | शिवाजी दोलताडे |
कलाकार | रोहन पाटील, वैश्नवी शिंदे, सुरज चव्हाण |
निर्माता | गोवर्धन दोलताडे |
रिलीज तारीख | १८ ऑक्टोबर २०२४ |
भाषा | मराठी |
“राजा राणी” चित्रपट समीक्षा :-
गोवर्धन दोलताडे यांनी लिहिलेली कथा आणि शिवाजी दोलताडे यांच्या दिग्दर्शनाखाली राजा राणी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. खरं तर सैराट या चित्रपटाला समोर ठेवून त्याचीच कॉपी करण्याचा हा एक प्रयत्न आहे असं म्हणावं इतपत चित्रपटाचा प्लॉट सारखा आहे.
राजा आणि राणी हे दोघं चित्रपटाचे नायक आणि नायिका एकाच गावात शेजारी शेजारी राहत असतात. दोघांचं अर्थातच एकमेकांवर प्रेम असतं परंतु दोघांचे वडिल एकमेकांचे पक्के वैरी असतात. त्या दोघांमध्ये जमिनीवरून वाद असतात. हे वाद इतके टोकाचे असतात की त्यांच्यात हाणामारी सुद्धा होत असते. आता इतकी दुश्मनी असताना त्यांच्या मुलांचं प्रेम स्विकारण्याचा प्रश्नचं येत नाही. आता अशा परिस्थितीत राजा राणी पुढे काय करतात हे बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल परंतु तो बघून तुमचा वेळ वाया न घालवणं उत्तम.
दिग्दर्शन अगदीच सुमार आहे. कथा पटकथा नवीन नाही. बघताना सैराट ची आठवण नक्की होईल. कलाकारांचा अभिनय चांगला आहे परंतु बिग बॉस फेम सुरज चव्हाण याला या चित्रपटात फक्त प्रसिद्धीमुळे घेतलंय हे लक्षात येतं. तो माणूस म्हणून साधा चांगला असेल कदाचित परंतु अभिनय आणि त्याचा दूरवर संबंध नाही. एकंदर फसलेला चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला एक स्टार.
७. कर्मयोगी आबासाहेब (Karmayogi Abasaheb) |
लेखक | अल्ताफ दादासाहेब शेख |
दिग्दर्शक | अल्ताफ दादासाहेब शेख |
कलाकार | अनिकेत विश्वासराव, हार्दिक जोशी, प्रदीप वेलणकर, विजय पाटकर |
निर्माता | मारूती बनकर, बाळासाहेब एरंडे |
रिलीज तारीख | २५ ऑक्टोबर २०२४ |
भाषा | मराठी |
“कर्मयोगी आबासाहेब ” चित्रपट समीक्षा :-
“लाल परीचाआमदार” अशी ओळख असणाऱ्या सामान्य माणसासाठी सामान्य राहून काम करणाऱ्या कर्मयोगी आमदार गणपतराव देशमुख म्हणजेच आबासाहेब यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते व सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख हे महाराष्ट्रातील एकमेव असे आहेत ज्यांनी तब्बल अकरा वेळा विधानसभा निवडणुक जिंकली होती. ते नेहमीच एसटी ने प्रवास करत त्यामुळेच लोकं त्यांना लालपरीचा आमदार म्हणून ओळखत होते. खरं तर असा राजकीय नेता असणं ही विश्वास ठेवण्यासाठी अशक्य गोष्ट. परंतु आबासाहेब हे असे नेता होते की त्यांनी राजकारणापेक्षा समाजकल्याण जास्त केले. महिला, मागासलेले, शेतकरी, कामगार यांच्यासाठी त्यांनी केलेलं समाजकार्य विशेष दखल घेण्यासारखं होतं. त्यांची ही संपूर्ण कारकीर्द उलगडून दाखवणारा हा चित्रपट अल्ताफ दादासाहेब शेख यांनी दिग्दर्शित केलेला असून या चित्रपटाची कथा सुद्धा त्यांनी लिहिली आहे.
परंतु चित्रपटाची कथा, मांडणी आणि दिग्दर्शन या सगळ्यात हा चित्रपट कमी पडला. अनिकेत विश्वासराव याने आबासाहेब यांची भूमिका चांगली साकारली आहे परंतु संवाद सुद्धा प्रभावी पणे लिहिलेले नसल्यामुळे चित्रपट मनोरंजन करण्यात अयशस्वी ठरतो. इतर सहकलाकारांचा अभिनय चांगला आहे. अवधूत गुप्ते यांचं संगीत ठिकठाक आहे. गाणी खास नाही. एकंदर मनोरंजन करणारा चित्रपट नाही परंतु आबासाहेब म्हणजेच गणपतराव देशमुख यांच्या बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी चित्रपट बघायला हरकत नाही. एक कलाकृती म्हणून माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार.
८. द एआय धर्मा स्टोरी (The A.I. Dharma Story) |
लेखक | पल्लवी वैद्य |
दिग्दर्शक | पुष्कर जोग |
कलाकार | पुष्कर जोग, दिप्ती लेले, स्वराली खोमणे, स्मिता गोंदकर, चिन्मय मांडलेकर |
निर्माता | तेजल पिंपळे, पराग संखे |
रिलीज तारीख | २५ ऑक्टोबर २०२४ |
भाषा | मराठी |
“द एआय धर्मा स्टोरी” चित्रपट समीक्षा :-
आजकाल आर्टिफिशियल इंटिलिजन्स म्हणजेच “एआय” या तंत्रज्ञानाचा वापर बऱ्याच प्रमाणात वाढला आहे. परंतु हे तंत्रज्ञान जेवढं चांगलं आहे तेवढंच ते मारक आहे. त्याचे विपरीत परिणाम आणि चुकीच्या पद्धतीने वापर केल्यामुळे एखाद्याचं आयुष्य कसं उध्वस्त होऊ शकतं हेच या चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न दिग्दर्शक अभिनेता पुष्कर सुरेखा जोग याने केलेला आहे.
हि कथा स्कॉटलंड मधील एका शहरात घडते. एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या अरविंद धर्माधिकारी(पुष्कर जोग) या तरूणाच्या आयुष्यात अचानक एक वादळ येतं. त्याच्या लॅपटॉप वरून मुलींचे डीप फेक व्हिडिओ व्हायरल होतात आणि त्यामुळेच त्यातील काही जणी आत्महत्या करतात. तर काही दिवसांनी धर्माच्या मुलीचं अपहरण होतं. आणि आपल्या मुलीला सोडवून आणण्यासाठी केलेला संघर्ष म्हणजेच य चित्रपटाचा गाभा आहे. या सगळ्यात धर्माची पत्नी श्रेया(दिप्ती लेले )हिची मैत्रीण जी इनव्हेस्टींग करत असते ती मदत करत असते. आता खरंच धर्मा ते फेक व्हिडिओ बनवत असतो का.? त्याच्या मुलीला कोण किडनॅप करतं.?तो आपल्या मुलीला सोडवतो का.? हे सगळं बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल.
हा एक थरारक चित्रपट आहे. परंतु पटकथा मांडताना काही गोष्टींचं लॉजिक बाजूला ठेवून कथा लिहिली आहे असं वाटतं. कथा पटकथा अजून चांगल्या प्रकारे लिहीली असती तर कदाचित दिग्दर्शन अजून चांगलं झालं असतं. एक वेगळा, थरारक चित्रपट म्हणून एकदा बघायला हरकत नाही. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.
९. गारुड (Gaarud) |
लेखक | डॉ. प्रमोद रत्नाकर खाडीलकर |
दिग्दर्शक | प्रताप विठ्ठलराव सोनाळे |
कलाकार | गिरीश कुलकर्णी, शशांक शेंडे, पायल पांडे, सचिन वळंजू, धनंजय सरदेशपांडे |
निर्माता | ध्रुव दास, तृप्ती संजय राऊत, श्वेता देवेंद्र गुजर-शाह |
रिलीज तारीख | २५ ऑक्टोबर २०२४ |
भाषा | मराठी |
“गारुड” चित्रपट समीक्षा :-
गारूड या चित्रपटात गिरीश कुलकर्णी आणि शशांक शेंडे हे पट्टीचे कलाकार एकत्र आलेले आहेत.
डॉ. प्रमोद रत्नाकर खाडीलकर यांनी या चित्रपटाची कथा लिहिली असून प्रताप विठ्ठलराव सोनाळे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं आहे. इतर नवीन कलाकार या चित्रपटात बघायला मिळतात.
गारूड या चित्रपटाची कथा थोडीशी गुढ, थरारक अशा प्रकारची आहे. कोकणातील एका गावात घडणारी ही कथा आहे. गावातील खोत म्हणजे मानाचं आणि बऱ्यापैकी श्रीमंत प्रस्थ. या खोतांचा मुलगा श्रीकांत याची काहीतरी वेगळी स्वप्नं आहेत,त्या स्वप्नांचं गारूड त्याच्यावर आहे. ती स्वप्नं पूर्ण करण्यासाठी तो कोणत्या थराला जातो आणि त्यासाठी तो कोणाच्या प्रभावाखाली असतो हे बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल. कारण काही कथा या शब्दांमध्ये मांडण्यापेक्षा त्या पडद्यावर अनुभवणं हे वेगळं असतं.
माणूस आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी जगत असतो किंवा माणूस स्वप्नांच्या पलीकडे जाऊन आयुष्य जगण्यासाठी कारण शोधत असतो. ही गोष्ट अशा जगण्याच्या प्रवासाची आहे. शशांक शेंडे, गिरीश कुलकर्णी यांचा अभिनय नेहमीप्रमाणेच अवाक करणारा आहे. नवीन कलाकारांनी सुद्धा चांगला अभिनय केला आहे. परंतु कथा पटकथा आणि दिग्दर्शन या सगळ्या बाजू कमकुवत पडल्यामुळे चित्रपट म्हणावा तेवढा प्रभावी झाला नाही. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.
तर मंडळी गेल्या महिन्यात तुम्ही यातील कोणकोणते चित्रपट पाहिले ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा.