ऑक्टोबर 2024 मध्ये रिलीझ झालेल्या हिंदी चित्रपटांची यादी आणि चित्रपटांची समीक्षा
ऑक्टोबर 2024 मध्ये रिलीझ झालेल्या हिंदी चित्रपटांची यादी आणि चित्रपटांची समीक्षा | List of Hindi Movies released in October 2024 and Movie Reviews
Written by : आकांक्षा कोलते
Updated : ऑक्टोबर 30, 2024 | 11:06 PM
ऑक्टोबर २०२४ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेले हे हिंदी चित्रपट तुम्ही पाहीलेत का?
खरं तर आता वेबसिरीज चा जमाना असल्यामुळे प्रेक्षकांच्या चित्रपटांच्या बाबतीत अपेक्षा वाढल्या आहेत. त्यातही नवीन आलेल्या चित्रपटांमध्ये ओरिजनल कंटेट कमीच असतो. बरेच चित्रपट हे रिमेक असतात. त्यामुळे चित्रपटगृहात प्रेक्षकांना खेचून आणणं हे आता निर्माते आणि दिग्दर्शक यांच्यापुढे नवीन आव्हान आहे. आता प्रेक्षकांच्या चित्रपटांच्या बाबतीत असलेल्या अपेक्षा पूर्ण होतायत की नाही हे आमच्या परीने सांगण्याचा प्रयत्न या लेखात आम्ही करणार आहोत.
आज या लेखात ऑक्टोबर महिन्यात प्रदर्शित झालेले चित्रपट कोणते आहेत आणि बघायला हवेत की नको याबद्दल आमचं मत सांगणार आहोत.

१. सीटीआरएल (CTRL) |
लेखक | अविनाश संपत, विक्रमादित्य मोटवानी |
दिग्दर्शक | विक्रमादित्य मोटवानी |
कलाकार | अनन्या पांडे, विहान समत, देविका वत्स कामाक्षी भट, अपारशक्ति खुराना |
निर्माता | संजय गुप्ता, अनुराधा गुप्ता |
रिलीज तारीख | ६ सप्टेंबर २०२४ |
भाषा | हिंदी |
“सीटीआरएल” चित्रपट समीक्षा :-
विक्रमादित्य मोटवानी दिग्दर्शित सीटीआरएल (CTRL) हा चित्रपट नेटफ्लिक्स वर प्रदर्शित रोजी प्रदर्शित झाला असून या चित्रपटाची कथा अविनाश संपत आणि विक्रमादित्य मोटवानी यांनी मिळून लिहीली आहे. CTRL म्हणजेच कंट्रोल. आजकाल सोशल मीडिया आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झालेला आहे. याच सोशल मीडियामुळे आपण आपल्या आयुष्यातील वैयक्तिक गोष्टींचा सुद्धा कंट्रोल कोणाच्या हाती देतोय आणि त्यामुळे आपल्या आयुष्यात काय वादळ येऊ शकतं हे सांगणारा हा चित्रपट आहे.
आर्टिफिशियल इंटिलिजन्स म्हणजेच एआय चा वापर आणि त्यातील नवीन तंत्रज्ञान यामुळे काही गोष्टी सहज सोप्या झाल्या तरीही त्याचे उलट गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात हे पटवून देणारा हा चित्रपट आहे. चित्रपटाची कथा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर नलिनी उर्फ नेल्ला (अनन्या पांडे) हीची आहे. ती आणि तिचा बॉयफ्रेंड मस्करेनस (विहान समत) हे दोघं मिळून एंजॉय हे एक सोशल मीडिया चॅनल चालवत असतात. अर्थात ते दररोज त्यावर त्या दोघांचे फोटो, व्हिडिओ पोस्ट करत असतात. त्यांचे फॉलोअर्स सुद्धा लाखोंच्या संख्येत असतात. सगळं छान सुरू असतं. परंतु एक दिवस लाईव्ह व्हिडिओ मध्ये नेल्ला मस्करेनसला दुसऱ्याच मुलीसोबत किस करत असताना बघते. आणि इथेच खरा चित्रपट सुरू होतो. बॉयफ्रेंड ने फसवल्यामुळे नेल्ला कोसळून जाते. फॉलोअर्स कडून सुद्धा खूप प्रमाणात ट्रोलिंग होतं. म्हणून या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी नेल्ला AI असिस्टंट एलेन ची मदत घेते. सोशल मीडिया वरून ती तिचे आणि मस्करेनसचे फोटो व्हिडिओ डिलीट करते. परंतु खरा ट्विस्ट तेव्हा येतो जेव्हा मस्करेनस खरोखरच गायब होतो. आता तो कसा गायब होतो.? एलेन नक्की कशी मदत करत असतो.? आणि पुढे काय होतं हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
चित्रपटाची कथा तशी विशेष नाही, आधुनिक तंत्रज्ञान, सोशल मीडिया किंवा आता आर्टिफिशियल इंटिलिजन्स या सगळ्यातून होणाऱ्या फसवणुकीपासून सावधान करणारा हा एक चित्रपट आहे. अनन्या ने बरा अभिनय केला आहे. विक्रमादित्य मोटवानी यांचं दिग्दर्शन चांगलं आहे. एडिटिंग चांगलं आहे. परंतु खास असं या चित्रपटात काही नाही. परंतु एकदा मनोरंजन म्हणून बघायला हरकत नाही. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.
२. अमर प्रेम की अमर कहानी (Amar Prem Ki Prem Kahani) |
लेखक | रूपिंदर इंदरजीत |
दिग्दर्शक | हार्दिक गज्जर |
कलाकार | सनी सिंह,आदित्य सील, प्रनूतन बहल निर्माता : ज्योती देशपांडे, पार्थ गज्जर, पुनम श्रॉफ |
निर्माता | ज्योती देशपांडे, दीपक पंत, गज्जर पार्थ, पूनम श्रॉफ |
रिलीज तारीख | ४ ऑक्टोबर २०२४ |
भाषा | हिंदी |
“अमर प्रेम की अमर कहानी” चित्रपट समीक्षा :-
हार्दिक गज्जर दिग्दर्शित अमर प्रेम अमर कहानी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित न होता जिओ सिनेमा वर प्रदर्शित झाला आहे. समलैंगिकता या मुद्यावर भाष्य करणारा आणि त्याभोवतीच या चित्रपटाची कथा लिहिलेली आहे. त्यामुळे अर्थातच विनोदी, ड्रामा असलेल्या या चित्रपटातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
खरं तर हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित केला नाही हे एका अर्थाने बरं झालं. एका चांगल्या विषयाला धरून चित्रपटाची कथा लिहिली खरी परंतु विनोद निर्मितीच्या नावाखाली त्या विषयाचं गांभीर्य दिसत नाही. अमर हा एक पंजाबी मुलगा असून त्याला मुलींबद्दल आकर्षण नसतं तर त्याला त्याच्या गावातील समीर हा आवडत असतो. अर्थात त्याला समलैंगिक आहोत हे समजलेलं असतं परंतु घरच्यांची भीती आणि लोक काय म्हणतील या विचाराने या सगळ्यांपासून दूर पाळण्यासाठी तो लंडन गाठतो. तिकडे त्याला एक प्रेम नावाचा तरूण भेटतो आणि मग चित्रपटाच्या नावाप्रमाणेच अमर प्रेम ची अमर कहाणी सुरू होते. परंतु एकदा अमरच्या घरचे त्याला भारतात बोलवून घेतात आणि मग तिकडे गेल्यावर अमरला कळतं की त्याचं लग्न ठरवलं जात आहे आणि आता त्या दोघांच्या प्रेमकथेतील संघर्ष सुरू होतो. आता पुढे या संघर्षात जिंकत कोण हे चित्रपट बघीतल्यावरच कळेल.
चित्रपटातील काही सीन्स तर अगदीच बालिश वाटतात. डोकं आणि लॉजिक बाजूला ठेवलं तरी काही ठिकाणी अतिरेक वाटतो. एका संवेदनशील विषयावर भाष्य करणारा चित्रपट अशा प्रकारे लिहीला जाऊ शकतो हे नवल. एकंदर फसलेला चित्रपट आहे. अभिनय ठीक आहे. बाकी संगीत, गाणी दिग्दर्शन यात कुठेच काही खास नाही. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार.
३. द सिग्नेचर (The Signature) |
लेखक | गजेंद्र अहिरे |
दिग्दर्शक | गजेंद्र अहिरे |
कलाकार | अनुपम खेर , अन्नू कपूर , महिमा चौधरी , मनोज जोशी , स्नेहा पॉल , केविन गांधी , रणवीर शौरी , संगीता बोकाडिया जैन और नीता कुलकर्णी |
निर्माता | के सी बोकाडिया |
रिलीज तारीख | १३ ऑक्टोबर २०२४ |
भाषा | हिंदी |
“द सिग्नेचर” चित्रपट समीक्षा :-
“द सिग्नेचर” हा चित्रपट मराठी चित्रपट अनुमती या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. गजेंद्र अहिरे लिखित आणि दिग्दर्शित हा चित्रपट वृद्धापकाळाकडे झुकलेल्या प्रत्येकाला आपला वाटणारा आहे. आयुष्यभर मुलांसाठी खस्ता खाऊन त्यांना मोठं करून आयुष्याच्या उतारवयात मात्र मुलं जेव्हा त्यांच्यासाठी उभी राहत नाहीत तेव्हा आई वडिलांना काय वाटतं किंवा त्यांची परिस्थिती काय असते हे या चित्रपटात पहायला मिळतं. गजेंद्र अहिरे यांनी अतिशय महत्त्वाचा विषय खूप संवेदनशील पणे मांडला असून अनुपम खेर आणि इणर कलाकारांनी या चित्रपटाला योग्य तो न्याय दिला आहे. मराठी चित्रपट अनुमती यातील सुद्धा द विक्रम गोखले यांचा सहजसुंदर नैसर्गिक अभिनय बघून डोळ्यात पाणी आल्या शिवाय राहत नाही.
चित्रपटाची कथा निवृत्त झालेले अरविंद पाठक (अनुपम खेर) यांची आहे. त्यांची पत्नी मधु (नीना कुलकर्णी) आणि ते निवृत्ती नंतर युरोट ट्रीप ला जात असताना एअरपोर्ट वर मधु यांचं ब्रेन हॅमरेज होऊन त्या तिथेच कोसळतात. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्यानंतर पुढे काय होतं हे या चित्रपटात महत्वाचं आहे. व्हेंटिलेटरवर असणाऱ्या आपल्या पत्नीला वाचवण्यासाठी धडपडणारे अरविंद पाठक जीवाचं रान करून पैसे गोळा करत असतात. तर एकीकडे त्यांचा मुलगा त्यांना हॉस्पिटलच्या त्या फॉर्म वर सही करायला सांगत असतो ज्यामुळे मधु यांचे उपचार थांबवून व्हेंटिलेटर बंद केला जाईल. म्हणजेच त्यांचा मृत्यू अटळ असणार आणि हेच अरविंद यांना स्विकारणं अशक्य आहे. अशा वेळी ते कसे हतबल होऊन दारोदार फिरून पैशांची जमवाजमव करत असतात ते बघून हुंदके आवरणं निव्वळ अशक्य. आपल्या पत्नीला ते वाचवू शकतात की नाही हे बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल.
अनुपम खेर यांनी या भूमिकेला न्याय दिला असून एक सहज परंतु तेवढ्याच खोलीची ही कलाकृती नक्की बघावी अशी आहे. माझ्याकडून या चित्रपटाला साडेतीन स्टार.हा चित्रपट झी फाईव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्म वर तुम्ही बघू शकता.
४. जिगरा (Jigra) |
लेखक | देबाशीष इरेंगबाम, वासन बाला |
दिग्दर्शक | वासन बाला |
कलाकार | आलिया भट्ट, वेदांग रैना, मनोज पाहवा, राहुल रवींद्रन, हर्ष ए सिंह |
निर्माता | आलिया भट्ट, करण जौहर, सोमेन मिश्रा |
रिलीज तारीख | ११ ऑक्टोबर २०२४ |
भाषा | हिंदी |
“जिगरा” चित्रपट समीक्षा :-
आपल्या छोट्या भावाला वाचविण्यासाठी एका जिगरबाज बहीणीचा संघर्ष म्हणजे जिगरा चित्रपट. वासन बाला दिग्दर्शित जिगरा या चित्रपटाची कथा देबाशीष इरेंगबाम आणि वासन बाला यांनी मिळून लिहीली आहे. नेहमीपेक्षा थोडी वेगळी आणि हटके अशी कथा असलेल्या या चित्रपटात आलिया भट्ट हिने एका ब्रेक नंतर पुनरागमन केलेलं आहे.
हि गोष्ट आहे सत्या(आलिया भट्ट) आणि भाऊ अंकुर (वेदांग रैना) या दोन भावंडांची. आईवडील नसलेली ही दोघं एकमेकांसाठी एकमेकांच जग असतात. मोठी बहीण सत्या आपल्या छोट्या भावाला प्रत्येक संकटातून बाहेर काढण्यासाठी सदैव पाठीशी उभी असते. वेळप्रसंगी थोडीशी सनकी असलेली ही सत्या भावासाठी जीव देऊ शकते आणि एखाद्याचा जीव घेऊ सुद्धा शकते. आईवडील नसल्यामुळे या दोघांना त्यांचे काका सांभाळत असतात. अंकुर आपल्या काकांच्या बिझनेस मध्ये मदत करत असतो. असंच कामानिमित्त त्याचे काका त्याला त्यांच्या मुलासोबत कबीर सोबत परदेशी पाठवतात परंतु तिकडे कबीर कडे ड्रग्स सापडतात आणि कबीर आणि अंकुर ला पोलिस तिकडचे पोलिस तुरुंगात टाकतात. अंकुर ने सगळा गुन्हा आपल्या नावावर घ्यावा अशी जबरदस्ती त्याच्यावर करण्यात येते. या सगळ्यात त्याला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात येते. परंतु ती अंमलात येण्यासाठी अजून तीन महिने बाकी असतात. आता या तीन महिन्यांत सत्या आपल्या भावाला सोडवण्यासाठी जे काही करते हे एखाद्या हॉलिवूड चित्रपटापेक्षा कमी नाही. आता ते काय हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
आलिया भट्ट, वेदांग रैना आणि मनोज पाहवा यांचा अभिनय चांगला आहे. चित्रपटाची कथा चांगली आहे परंतु पटकथा थोडी कमकुवत वाटते. संगीत ठिकठाक आहे. काही सीन्स न पटण्यासारखे आहेत. परंतु एकदा मनोरंजन म्हणून हा थ्रिलर ड्रामा बघायला हरकत नाही. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.
५. विकी विद्या का वो वाला व्हिडिओ (Vicky Vidya Ka Woh Wala) |
लेखक | राज शांडिल्य |
दिग्दर्शक | राज शांडिल्य |
कलाकार | राजकुमार राव, तृप्ति डिमरी,विजय राज , मल्लिका शेरावत, अर्चना पूरण सिंह, मुकेश तिवारी, टीकू तलसानिया, राकेश बेदी, अश्विनी कळसेकर |
निर्माता | भूषण कुमार, कृष्ण कुमार, एकता कपूर, शोभा कपूर, विपुल डी शाह, अश्विन वरदे, राजेश बहल, राज शांडिल्य, विमल लाहोटी |
रिलीज तारीख | ११ ऑक्टोबर २०२४ |
भाषा | हिंदी |
“विकी विद्या का वो वाला व्हिडिओ” चित्रपट समीक्षा :-
विकी विद्या का वो वाला व्हिडिओ हा चित्रपट एक धमाल विनोदी चित्रपट असून राजकुमार राव याने स्त्री २ नंतर पुन्हा एकदा कॉमेडीची जबरदस्त बॅटिंग केली आहे. राज शांडिल्य यांनी १९९७ च्या काळात घडणारी ही कथा लिहिली असून या चित्रपटाचं दिग्दर्शन सुद्धा केलं आहे.
चित्रपटाच्या नावाप्रमाणेच विकी(राजकुमार राव)
आणि विद्या(तृप्ती डिमरी) या दोघांच्या “त्या” वाल्या व्हिडिओ भोवती फिरणारी चित्रपटाची कथा पटकथा आहे. ९७ च्या काळात घडणारी कथा आहे. विकी आणि विद्या हे लग्न करतात आणि लग्नानंतर पहील्या रात्री ते आपल्या “त्या” रात्रीचा व्हिडिओ करायचं ठरवतात. आणि ते तसं करतात सुद्धा. परंतु अचानक एक दिवस त्यांच्या घरी चोरी होते आणि त्यांची “त्या” व्हिडिओ सीडी सुद्धा चोरीला जाते. आणि इथुनच खरी धमाल सुरू होते. ती सीडी मिळवण्यासाठी ते दोघं काय काय करतात आणि शेवटी भलताच क्लायमॅक्स समोर येतो. हे सगळं बघताना हसून हसून पुरेवाट होते इतकं नक्की. शेवटी एक महत्त्वाचा संदेश सुद्धा देण्याचा प्रयत्न केला आहे.
फार काही मसाला किंवा बोल्ड सीन्स वैगरे असं काही नाही. एक हलका फुलका विनोदी चित्रपट बघायचा असेल तर नक्की बघू शकता. अधूनमधून स्त्री २ चित्रपटाची झलक जाणवते. राजकुमार राव आणि तृप्ती ने अभिनय छानच केला आहे परंतु मल्लिका शेरावत, विजय राज आणि इतर सहकलाकारांचा अभिनय सुद्धा चांगला आहे. दिग्दर्शन चांगलं आहे. सुरूवातीला चित्रपट खेचल्यासारखा वाटतो तो अर्धा तास कमी करता आला असता. परंतु एकंदर मनोरंजन करणारा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.
६. आयुष्मति गीता मॅट्रिक पास (Aayushmati Geeta Matric Pass) |
लेखक | नवनीतेश सिंग |
दिग्दर्शक | प्रदीप खैरवार |
कलाकार | कशिका कपूर ,अनुज सैनी, अतुल श्रीवास्तव,अलका अमीन,प्रणय दीक्षित |
निर्माता | प्रदीप खैरवार |
रिलीज तारीख | १८ऑक्टोबर २०२४ |
भाषा | हिंदी |
“आयुष्मति गीता मॅट्रिक पास” चित्रपट समीक्षा :-
“बेटी बचाव बेटी पढ़ाव” हा नारा या चित्रपटात पहायला मिळतो. महिला सक्षमीकरण आणि महीलांचं शिक्षण या महत्त्वाच्या मुद्द्यांवर आधारीत या चित्रपटाची कथा लिहिली आहे.
विद्याधर (अतुल श्रीवास्तव ) यांना आपल्या मुलीने लग्न होण्याआधी शिकून सवरून आपल्या पायावर उभं रहायला हवं असं वाटत असतं परंतु उत्तर प्रदेश मधील एअआ छोट्याशा गावात राहणाऱ्या विद्याधर यांचे विचार गावकऱ्यांना पटत नसतात. परंतु त्या सगळ्यांच्या विरोधात जाऊन ते आपली मुलगी गीता( कशिका कपूर) हिला शिकवत असतात. तर एकीकडे गावकरी आणि नातेवाईक यांच्यामुळे गिताचं लग्न ठरवण्याचा घाट घातला जातो परंतु यखच दरम्यान गिता दहावीच्या परीक्षेत नापास होते. खरं तर गिताचं ज्याच्यासोबत लग्न ठरलंय त्या मुलाला गिता आणि गिताला तो मुलगा आवडलेला असतो. परंतु नापास झाल्यामुळे गिताचे वडील या लग्नाला तयार नसतात. गिता मॅट्रिक पास झाल्याशिवाय लग्न नाही असा ते निर्धार करतात. आता पुढे काय होतं हे बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल.
एका चांगल्या विषयावर चित्रपटाची कथा पटकथा लिहिलेली आहे. परंतु कशिका कपूर काय किंवा इतर कलाकार, अभिनय ठिकठाक आहे. संगीत छान आहे. दिग्दर्शन सुद्धा बरं म्हणावं इतपत आहे. विषयाचं गांभीर्य अजून खुलवून मांडता आलं असतं. एकंदर ठिकठाक चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.
७. दो पत्ती (Do Patti) |
लेखक | कनिका सिंह ढिल्लों |
दिग्दर्शक | शशांक चतुर्वेदी |
कलाकार | काजोल, कृति सेनन, तनवी आजमी, शाहीर शेख, बृजेंद्र काला, प्राची शाह पांड्या, चितरंजन त्रिपाठी, विवेक मुश्रान |
निर्माता | क्रिती सेनन, कनिका सिंह ढिल्लों |
रिलीज तारीख | २५ ऑक्टोबर २०२४ |
भाषा | हिंदी |
“दो पत्ती” चित्रपट समीक्षा :-
“दो पत्ती” हा चित्रपट नेटफ्लिक्स वर प्रदर्शित झाला असून क्रिती सेनन हिने या चित्रपटाच्या निमित्ताने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं आहे. कनिका सिंह ढिल्लों हिने या चित्रपटाची कथा लिहिली असून शशांक चतुर्वेदी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.
दोन जुळ्या बहींणींमधील दुश्मनी, द्वेष आणि बदला, सुड अशा सगळ्यांचं मिश्रण या कथेत आहे. सौम्या आणि शैली अशी दोन जुळ्या बहिणींची दुहेरी भूमिका क्रीती सेनने साकारली आहे. सौम्या नावाप्रमाणेच सौम्य तर शैली बिनधास्त, रावडी अशी असते. सतत आजारी असल्यामुळे सौम्या ला घरातून सहानुभूती मिळत असते आणि हेच शैलीच्या रागाचं मुळ असतं. दोघींमध्ये टोकाची दुश्मनी. यातच सौम्या च्या आयुष्यात आलेला ध्रुव शैलीला देखील आवडत असतो.परंतू सौम्या आणि ध्रुव चं लग्न होतं. ट्विस्ट म्हणजे ध्रुव लग्नानंतर सौम्या ला मारहाण करतो आणि तिच्या आजारपणाचं निमित्त साधून शैलीच्या जवळ जातो. आता या सगळ्यात शैली संधी साधून सौम्यावरचा सुड पूर्ण करते की अजून काय करते हे बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल.
या चित्रपटात काजोल ही पोलिस अधिकारी आणि वकील अशा दोन्ही भूमिका साकारताना दिसते. असं का ते शेवटपर्यंत कळत नाही. खरं तर ती कोणत्याच भुमिकेत चपखल बसत नाही. चित्रपटाची कथा पटकथा दिग्दर्शन सगळच फसलेलं आहे. कोर्टरूम ड्रामा अगदीच मुळमुळीत आहे. क्रितीने काम बरं केलंय. बाकी काजोल म्हणून बघायला जाल तर निराशा पदरी पडू शकते. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार.
८. बंदा सिंग चौधरी (Bandaa Singh Chaudhar) |
लेखक | अभिषेक सक्सेना, शाहीन इकबाल |
दिग्दर्शक | अभिषेक सक्सेना |
कलाकार | अरशद वारसी, मेहेर विज, शिल्पी मारवाह, जीवेशु अहलूवालिया, अलिशा चोपड़ा, सचिन नेगी |
निर्माता | अरबाज खान, मनीष मिश्रा |
रिलीज तारीख | २५ ऑक्टोबर २०२४ |
भाषा | हिंदी |
“बंदा सिंग चौधरी” चित्रपट समीक्षा :-
१९७१ साली झालेल्या भारत पाकिस्तान युद्धानंतर बरेच परिणाम हिंदू, सिख लोकांना भोगावे लागले. याच धर्तीवर आधारित हा चित्रपट असून अभिषेक सक्सेना यांनी दिग्दर्शित केलेला आहे. चित्रपटाची कथा चांगली होती परंतु कमकुवत मांडणी आणि प्रदर्शन यामुळे चित्रपट फसला.
पिढ्यानपिढ्या पंजाब मध्ये राहत असणाऱ्या एका घरातील बंदा सिंह चौधरी (अरशद वारसी) आणि सिख लल्ली (मेहर विज) हे दोघं गुण्यागोविंदाने नांदत असतात. त्याच्या जवळ राहणारा त्याचा जिवलग मित्र सरदार (जीवेश वालिया) आणि बंदा यांच्यातील मैत्री जीवाला जीव देणारी असते. सगळं छान सुरू असतं परंतु अचानक एक दिवस त्यांच्या गावात आतंकवादी घुसतात. भारत पाकिस्तान युद्धानंतर बांगलादेश चा बदला घेण्यासाठी हे आलेले असतात. ते घोषणा करतात की सगळ्या हिंदू लोकांनी पंजाब सोडून जायचं आणि कोणत्याही सिख माणसाने हिंदू ची मदत करायची नाही. आता या युद्धात बंदा आणि सरदार यांच्या मैत्रीचं काय होतं.? बंदा ही लढाई कसा लढतो.? पुढे काय होतं हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
अतिशय कमकुवत कथानक आणि पटकथा मांडल्यामुळे चित्रपट प्रभावी झालेला नाही. आतंकवाद, धार्मिक तेढ हे दाखवताना मर्यादा आल्यामुळे कदाचित दिग्दर्शक फारसा खोल गेलेला दिसत नाही. दिग्दर्शन ठिकठाक आहे. संगीत चांगलं आहे. बाकी चित्रपटात खास काही नाही. आरशद वारसीचे फॅन असाल तर बघू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार.
९. द मिरांडा ब्रदर्स (The Miranda Brothers) |
लेखक | समीर हाफिज, मिलाप जावेरी |
दिग्दर्शक | संजय गुप्ता |
कलाकार | हर्षवर्धन राणे,जेनीफर,राहुल देव, मिजान ज़ाफ़री,साहेर बाम्बा, मानसी रॉय |
निर्माता | ज्योती देशपांडे, अजय राय |
रिलीज तारीख | २५ ऑक्टोबर २०२४ |
भाषा | हिंदी |
“द मिरांडा ब्रदर्स” चित्रपट समीक्षा :-
“द मिरांडा ब्रदर्स” हा स्पोर्ट्स ड्रामा असलेला चित्रपट जिओ सिनेमा वर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटात बघण्यासारखं किंवा प्रेक्षकांना आवडेल असं काही नाही याची निर्माते दिग्दर्शक यांना खात्री असल्यामुळे हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित करण्याचं धाडस त्यांनी केलं नाही. एका अर्थी ते बरंच झालं. स्पोर्ट्स ड्रामा मध्ये नावापुरता स्पोर्ट्स आणि भरकटलेली कथा असा एकंदर चित्रपटाचा प्लॉट आहे.
सांगण्यासारखं विशेष काहीच नाही. जुलियो(हर्षवर्धन राणे) आणि रेगेलो(मिजान) हे दोघं भाऊ असतात. रेगेलो हा जुलियोच्या आईला कचऱ्यात सापडलेला मुलगा असतो. ज्याचा ती पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळ करते. दोघं भाऊ उत्तम फुटबॉल प्लेअर असतात. परंतु काही कारणास्तव गोवा फुटबॉल टिममध्ये फक्त रेगेलोचं सिलेक्शन होतं तर जुलियोचं होत नाही. आता ट्विस्ट म्हणजे रेगेलो जुलियो नाही म्हणून टीममध्ये खेळायला नकार देतो.
खरं तर जुलियो ड्रग्स सारख्या वाईट मार्गाला लागलेला असतो. दरम्यान त्यांच्या आईचा मृत्यू होतो. आता आईचा मृत्यू कशामुळे होतो हा सस्पेन्स आहे. ते दोघे खेळतात की नाही? पुढे काय होतं.? ड्रग्स च्या जाळ्यात जुलियो अडकतो का.? हे बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल. परंतु वेळ वाया घालवायचा नसेल तर चित्रपट न बघणे उत्तम.
आधीच भरकटलेली कथा त्यात त्या दोघांची लव्हस्टोरी चित्रपटाची कथा अजून खिळखिळी करून टाकते. दिग्दर्शन अगदीच सुमार आहे. एकंदर पाहीला नाही तरी चालेल असा चित्रपट आहे. चित्रपट काढण्याच्या धैर्याला एक स्टार.
१०. नवरस कथा कोलाज (Navras Katha Collage) |
लेखक | प्रवीण हिंगोनिया |
दिग्दर्शक | प्रवीण हिंगोनिया |
कलाकार | प्रवीण हिंगोनिया, रेवती पिल्लयी, स्वर हिंगोनीया, दयानंद शेट्टी, राजेश शर्मा, अलका अमिन, अमरदिप झा |
निर्माता | प्रवीण हिंगोनिया, अभिषेक मिश्रा |
रिलीज तारीख | २७ ऑक्टोबर २०२४ |
भाषा | हिंदी |
“नवरस कथा कोलाज” चित्रपट समीक्षा :-
नावाप्रमाणेच हा चित्रपट म्हणजे नऊ वेगवेगळ्या कथांचं कोलाज आहे. या नऊ कथांमधून नऊ रसांचं वर्णन केलेलं आहे. हास्य, करूण, श्रृंगार, वीर, अद्भुत, रौद्र, शांत, भयानक आणि विभत्स अशा नवरसांवर आधारित या नऊकथा आहेत. प्रवीण हिंगोनिया यांनी या चित्रपटाच्या कथा लिहिल्या असून त्यांनी स्वतःच दिग्दर्शन करत मुख्य भूमिका सुद्धा साकारली आहे.
पहीलीच कथा हुंडाबळी या विषयावर आधारित आहे. कोयल नावाच्या मुलीची ही कथा आहे. तल दुसरी कथा दिल्ली मधील बस बलात्कार प्रकरण यावर आधारित आहे. तर एक कथा वडील आणि मुलाच्या नात्यावर भाष्य करणारी आहे. तर एक देशभक्तीवर आधारित आहे. अशा विविध विषयांवर आधारित या कथा मानवी स्वभावाचे पैलू उलगडून दाखवणाऱ्या आहेत.
दोन तासात नऊ वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळ्या कथा एकाच चित्रपटात सादर करणं तसं अवघड परंतु या कथा चांगल्या प्रकारे लिहिल्या आहेत. कथा आणि विषय चांगले असले तरी मांडणी आणि एकंदर दिग्दर्शन जरा कमकुवत वाटते. तांत्रिक बाजू सुद्धा कमकुवत असल्यामुळे चित्रपट प्रभावी झालेला नाही. प्रवीण हिंगोनिया आणि इतर सहकलाकारांचा अभिनय चांगला आहे परंतु प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात चित्रपट अयशस्वी ठरला. सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न चांगला आहे म्हणून एकदा बघायला हरकत नाही. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.
तर मंडळी या वीकेंडला तुम्ही कोणता चित्रपट बघताय हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.