ऑगस्ट २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी
ऑगस्ट २०२३ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेले हे हिंदी चित्रपट तुम्ही पाहीलेत का?
Written by : आकांक्षा कोलते
Updated : सप्टेंबर 14, 2023 | 11:55 PM
हल्ली साऊथ इंडियन चित्रपटांनी प्रेक्षकांना जणू भुरळ घातली आहे. भरीस भर नवीन आलेला बॉयकॉट ट्रेंडमुळे हिंदी चित्रपटसृष्टीला वाईट फटका बसला आहे. म्हणूनच आता २०२३ मध्ये हिंदी चित्रपटसृष्टीला दमदार कमबॅक करणं गरजेचं आहे. आणि तशी सुरूवात सुद्धा झालेली आहे. पण खरं तर आता वेबसिरीज चा जमाना असल्यामुळे प्रेक्षकांच्या चित्रपटांच्या बाबतीत अपेक्षा वाढल्या आहेत. आता या अपेक्षा पूर्ण होतायत की नाही हे आमच्या परीने सांगण्याचा प्रयत्न या लेखात आम्ही करणार आहोत. चला तर मग ऑगस्ट २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले चित्रपट आज या लेखात आपण बघणार आहोत. त्यातील तुम्हाला कोणते आवडले हे आम्हाला कळवा.
१. पंचक्रीती फाईव्ह इलेमेंट्स |
लेखक | संजय भार्गव |
दिग्दर्शक | संजय भार्गव |
कलाकार | बृजेंद्र काला, उमेश बाजपाई, माही सोनी, सागर वाही, तन्मय चतुर्वेदी |
निर्माता | हरिप्रिया भार्गव, संजय भार्गव |
प्रदर्शित तारीख | ४ ऑगस्ट २०२३ |
भाषा | हिंदी |
“पंचक्रीती फाईव्ह इलेमेंट्स” चित्रपट समीक्षा :-
स्त्री पुरुष समानतेच्या कितीही गप्पा मारल्या तरी अजुनही समाजात स्त्रियांना दुय्यम स्थान आहे. किंवा आजही स्त्रियांच्या बाबतीत महिला सक्षमीकरण असेल, स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी असेल बरेच प्रयत्न करावे लागतात. याच धर्तीवर आधारित हा चित्रपट आहे.
पाच वेगवेगळ्या परंतु एकमेकांशी संबंध असलेल्या या पाच कथा आहेत. खोपडी, परछाई, सुआटा, अम्मा आणि चपेटा अशी या कथांची शिर्षकं असून त्यावरून कल्पना येऊ शकते की कथा कोणत्या प्रकारच्या असतील.
ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडवणारा हा चित्रपट आहे.
बुंदेलखंड मधील चंदेरी या गावात घडणाऱ्या या पाच कथा आहेत. स्त्रियांचं प्रमाण जर कमी झालं तर भविष्यात काय होऊ शकतं याची कल्पना हा चित्रपट पाहिल्यानंतर नक्कीच येईल. आपण बऱ्याचदा बोलतो की चांगला कंटेट असलेले चित्रपट हल्ली येत नाही पण खरं तर हे असे चांगले सामाजिक संदेश देणारे चित्रपट येतात परंतु लोकांना त्याबद्दल माहिती नसते. कोणतीही मोठी स्टार कास्ट नसलेला हा चित्रपट अभिनयाच्या बाबतीत सुद्धा उत्कृष्ट आहे.
लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट येऊ शकतो तेव्हा न चुकता हा चित्रपट बघा. संजय भार्गव यांनी चांगल्या प्रकारे दिग्दर्शन केले आहे . संगीत आणि पार्श्वसंगीत अजून चांगलं असतं तर अजून चित्रपट परिणामकारक झाला असता. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.
२. लफ्जों में प्यार |
लेखक | धीरज मिश्रा, राजा रणदीप गिरी |
दिग्दर्शक | धीरज मिश्रा, राजा रणदीप गिरी |
कलाकार | अनीता राज, जरीना वहाब, विवेक आनंद, कंचन राजपूत, प्रशांत राय, ललित परमो |
निर्माता | अशोक सहानी |
प्रदर्शित तारीख | ४ ऑगस्ट २०२३ |
भाषा | हिंदी |
“लफ्जों में प्यार” चित्रपट समीक्षा :-
चित्रपटाच्या नावावरूनच कळलं असेल की प्रेमकथेवर आधारित हा चित्रपट आहे. धीरज मिश्रा आणि राजा रणदीप गिरी यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाला स्क्रीन न मिळाल्यामुळे बऱ्याच ठिकाणी तो प्रदर्शित झालाच नाही.
हि कथा आपल्यासाठी काही नवीन नाही. प्रेमाचा त्रिकोण आणि त्यातून होणारा गुंता ही नेहमीची कथा. राज हा कथेचा नायक असून त्याला अभ्यासात रस नसल्याने शिक्षण अर्धवट सोडून तो संगीतक्षेत्रात स्वतःला सिद्ध करत असतो. यात त्याला त्याची वहिनी प्रोत्साहन देते. त्यातच राजच्या आयुष्यात प्रिया येते. त्यांचं एकमेकांवर प्रेम असतं परंतु राजच्या घरचे त्याचं लग्न शिवानी सोबत ठरवतात.
आता पुढे नक्की काय होतं.? राज आपल्या कुटुंबियांना सांभाळतो की प्रेम निभावतो हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल. नेहमीची कथा असल्याने फार काही नवीन बघायला मिळत नाही. बाकी दिग्दर्शन, कथा, संगीत सगळं नक्कीच चांगलं आहे. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.
३. गदर २ |
लेखक | शक्तिमान तलवार |
दिग्दर्शक | अनिल शर्मा |
कलाकार | सनी देओल , अमीषा पटेल , उत्कर्ष शर्मा , सिमरत कौर , लव सिन्हा , मनीष वाधवा |
निर्माता | कमल मुकुट, अनिल शर्मा |
प्रदर्शित तारीख | ११ ऑगस्ट २०२३ |
भाषा | हिंदी |
“गदर २” चित्रपट समीक्षा :-
तब्बल बावीस तेवीस वर्षांनी “गदर : एक प्रेमकथा” या चित्रपटाचा सिक्वेल आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पाजी सन्नी देओल यांचे दमदार डायलॉग, ॲक्शन सीन बघायला प्रेक्षक आवर्जून चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट बघत आहेत. बरंच जोरदार प्रमोशन झाल्याने प्रेक्षक गर्दी करत आहेत.
गदर २ या चित्रपटाची कथा सुद्धा आधीसारखीच प्रेमकथा, भारत पाकिस्तान संबंध, हिंदू मुस्लिम या विषयांवर आधारित आहे. या भागात तारा सिंह चा मुलगा जीते पाकिस्तान मध्ये जातो आणि अडकतो. त्याला सोडवण्यासाठी मग आपल्या चित्रपटाचा हिरो अर्थात तारा सिंह पाकिस्तानात पोहचतो. तर तो आपल्या मुलाला तिकडून सोडवून आणतो की नाही त्याची हि कथा म्हणजे गदर २.
या भागात सुद्धा जीते आणि मुस्कान यांची प्रेमकहाणी बघायला मिळते. १९७१ साली झालेल्या भारत पाकिस्तान युद्धाच्या आधीचा हा काळ आहे. आणि या चित्रपटात अजुन पुढच्या भागाची हिंट सुद्धा मिळते. कदाचित अजून एक गदर येऊ शकतो. दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी आपल्या मुलाला या चित्रपटाच्या निमित्ताने लॉन्च केले आहे. परंतु उत्कर्ष ने अभिनयात उत्कर्ष करण्याची गरज आहे. सनी देओल सोडला तर बाकी कलाकारांनी ॲव्हरेज ॲक्टिंग केली आहे. सनीचे चाहते असाल तर चित्रपट बघू शकता. अजुनही प्रेक्षक चित्रपटगृहात हा चित्रपट बघत आहेत. काही दिवसांत ओटीटी वर येईलच. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.
४. ओएमजी २ |
लेखक | अमित राय |
दिग्दर्शक | अमित राय |
कलाकार | अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी, यामी गौतम |
निर्माता | अरुण भाटीया, विपुल शाह, राजेश बहल, अश्विन वर्दे |
प्रदर्शित तारीख | ११ ऑगस्ट २०२३ |
भाषा | हिंदी |
“ओएमजी २” चित्रपट समीक्षा :-
आपला देश प्रगतीपथावर असला आणि लोकं कितीही शिकले तरी काही गोष्टी आजही उघडपणे बोलल्या जात नाहीत. लैंगिक शिक्षण हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय असून त्याबद्दल जनजागृती होणे आवश्यक आहे. परंतु आपल्याकडे या विषयांबद्दल उघडपणे बोलणं लज्जास्पद मानलं जातं. आणि याचमुळे तरूण पिढीला
त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात. हेच अधोरेखित करणारा हा चित्रपट आहे.
हस्तमैथुन सारखा अतिसंवेदनशील विषय घेऊन दिग्दर्शक अमित राय यांनी सेक्स एज्युकेशनचं शिवधनुष्य हाती घेतले आहे. खरं तर हस्तमैथुन याबद्दल बरेच गैरसमज लोकांच्या मनात आहेत आणि उघडपणे न बोलल्यामुळे तरूण पिढी तेच गैरसमज घेऊन जगत आहे. यातूनच बाहेर पडण्यासाठी लोकांची संकुचित वृत्ती नाहीशी होणं गरजेचं आहे.
चित्रपटाची सुरुवात हि कांती शरण यांच्यापासून होते. शंकराची निस्सीम भक्ती करणारे कांतीशरण हे मंदिराबाहेर एक दुकान चालवत असतात. त्यांचा मुलगा विवेक हा चित्रपटाचा केंद्रबिंदू आहे. त्याला हस्तमैथुन करण्याची सवय लागली असून ही गोष्ट शाळेत पसरते. त्याला त्यासाठी शाळेतून काढून टाकण्यात येतं. संपूर्ण घराला शहर सोडावं लागतं याच कारणामुळे विवेक आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो. परंतु यातून त्याला भगवान शंकर यांचा दुत म्हणजेच अक्षय कुमार वाचवतो. आणि इथुनच मग खरी सुरुवात होते.
यापुढे कोर्ट ड्रामा दाखवण्यात आला आहे. कांती शरण हे बऱ्याच लोकांविरुद्ध तक्रार दाखल करतात. परंतु विवेक ला ही सवय का लागते.? कांती शरण नक्की काय करतात? कोर्टात काय होतं हे बघण्यासाठी हा चित्रपट नक्कीच बघावा असा आहे. पंकज त्रिपाठी यांनी सुंदर अभिनय केला आहे. यामी गौतमी सुद्धा नेहमीप्रमाणे छान. दिग्दर्शन उत्तम. खरं तर किशोरवयीन मुलामुलींनी जरूर बघावा असा हा चित्रपट आहे. अशा चित्रपटाला ए सर्टिफिकेट मिळालं हे दुर्दैव म्हणावं लागेल. असो, जेव्हा शक्य असेल आपल्या किशोरवयीन मुलांना हा चित्रपट जरूर दाखवा आणि एक पालक म्हणून तुम्ही सुद्धा जरूर बघा. माझ्याकडून या चित्रपटाला चार स्टार.
५. घूमर |
लेखक | आर बाल्की , राहुल सेनगुप्ता , ऋषि विरमानी |
दिग्दर्शक | आर बल्की |
कलाकार | अभिषेक ए बच्चन , सैयामी खेर , शबाना आजमी, अंगद बेदी , इवांका दास |
निर्माता | अभिषेक बच्चन , राजगोपालन बालकृष्णन |
प्रदर्शित तारीख | १८ ऑगस्ट २०२३ |
भाषा | हिंदी |
“घूमर” चित्रपट समीक्षा :-
अभिषेक बच्चन आणि सैयामी खेर यांचा घूमर हा चित्रपट १८ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला परंतु गदर आणि OMG मुळे चांगला चित्रपट मागे पडला. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिषेक बच्चन याला बऱ्याच वर्षांनी पडद्यावर पहायला मिळतं.
हि कथा आहे जिद्दीची. आयुष्यात काही हवं तर फक्त स्वप्न बघून चालत नाही तर त्यासाठी प्रचंड मेहनत आणि सातत्य असावं लागतं. या चित्रपटाची कथा ही महिला क्रिकेटर अनिनी यांच्या आयुष्यावर आधारित आहे. सैयामी खेर हिने ही भूमिका उत्तमरित्या साकारली आहे.
आपल्याकडे क्रिकेट म्हटलं की आधी बॅटिंग आठवते. तसंच अनिनी ला सुद्धा क्रिकेट मध्ये बॅटिंग च करण्याची आवड असते आणि तिला भारतासाठी खेळायचं असतं परंतु काही कारणास्तव ती खेळू शकत नाही. तेव्हा तिच्या आयुष्यात माजी क्रिकेटपटू पद्मसिंह सोदी हे येतात. जे तिला पटवून देतात की क्रिकेट म्हणजे बॅटिंग नव्हे. ते तिला उत्तम बॉलिंग करण्याचं प्रशिक्षण देतात. आता यापुढे काय होतं हे बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल बरं. अभिषेक ने या चित्रपटात अपेक्षित असा उत्कृष्ट अभिनय केला आहे. अंगद बेदी आणि शबाना आझमी यांच्या छोट्या भूमिका सुद्धा सुंदर झाल्या आहेत. हा एक प्रेरणादायी चित्रपट असून नक्की बघावा असा आहे. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.
६. नॉन स्टॉप धमाल |
लेखक | इरशाद खान |
दिग्दर्शक | इरशाद खान |
कलाकार | अन्नू कपूर, मनोज जोशी, राजपाल यादव, असरानी, प्रियांशु चटर्जी, राजेश जैस, श्रेयस तळपदे, पायल मुखर्जी, वरोनिका वानजी, जॉर्जिया एंड्रियानी |
निर्माता | सुरेश गोंडालिया |
प्रदर्शित तारीख | १८ ऑगस्ट २०२३ |
भाषा | हिंदी |
“नॉन स्टॉप धमाल” चित्रपट समीक्षा :-
चित्रपट निर्मिती करणं हे चित्रपट बघण्याइतकं सोपं नाही. आपल्याला फक्त कलाकार आणि दिग्दर्शन या गोष्टी ठळकपणे माहीत असतात. पण एखाद्या चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी त्या चित्रपटाला निर्माता मिळणं आवश्यक असतं. असंच एका निर्मात्याच्या शोधात असलेल्या एका दिग्दर्शकाची आणि लेखकाची ही गोष्ट आहे. हा कॉमेडी चित्रपट असून थोडा वेळ का होईना तुमचं टेन्शन विसरून तुम्हाला हसायला लावतो.
सतिदंर हा दिग्दर्शक असून त्याला आणि अमर जो लेखक आहे यांना चित्रपट काढायचा आहे त्यासाठी ते निर्माता शोधत आहेत. त्यांचा हा प्रवास म्हणजेच हा चित्रपट. सतिदंर च्या भुमिकेत अन्नु कपूर असून मनोज जोशी यांनी अमर ची भुमिका साकारली आहे. राजपाल यादव सुद्धा या चित्रपटात राजू भंगारवाला या भुमिकेत धमाल करताना दिसतात.
सतिदंर आणि अमर यांना निर्माता भेटल्यावर तो यांच्या प्रोजेक्ट साठी दहा करोड ची गुंतवणूक करतो. परंतु असं काय होतं की यांना ते पैसे दुपटीने देण्याची वेळ येते. आता हा नक्की काय गोंधळ आहे हे बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल. कारण हि मजा अनुभवायची आहे. हा चित्रपट तुमचं मनोरंजन नक्कीच करेल यात शंका नाही. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.
७. ड्रीम गर्ल २ |
लेखक | राज शांडिल्य, नरेश कठुरिया |
दिग्दर्शक | राज शांडिल्य |
कलाकार | आयुष्मान खुराणा, अन्नू कपूर, परेश रावल, विजय राज, असरानी, मनोज जोशी, मनज्योत सिंग, सीमा पाहवा, अनन्या पांडे |
निर्माता | एकता कपूर, शोभा कपूर |
प्रदर्शित तारीख | २५ ऑगस्ट २०२३ |
भाषा | हिंदी |
“ड्रीम गर्ल २” चित्रपट समीक्षा :-
आयुषमान खुराणा याचा ड्रीम गर्ल २ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. परंतु ड्रीम गर्ल या त्याच्या आधीच्या चित्रपटातील जादू या पूजाला या चित्रपटात तितकीशी दाखवता आली नाहीय.
एका मध्यमवर्गीय कुटुंबातील करमची ही गोष्ट आहे. त्याच्या वडिलांनी म्हणजेच अन्नु कपूर यांनी बरीच कर्ज काढून ठेवली आहेत आणि आता त्या कर्जाचा डोंगर त्या दोघांच्या डोक्यावर आहे. करम हा रामलीला, जागरण गोंधळाचे कार्यक्रम वैगरे करत असतो. परंतु त्यातून फार उत्पन्न नसल्याने कर्ज दिवसेंदिवस वाढत चाललय.
एकीकडे त्याची प्रेयसी परी म्हणजेच अनन्या पांडे हिच्या वडिलांची अट आहे की करमच्या अकाउंट ला किमान पंचवीस लाख हवेत. स्वतःचं घर हवं. नोकरी हवी तरच त्या दोघांचं लग्न करून दिले जाईल.
आता या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी करम हा पूजा बनून काय धमाल करतो? डान्स बार मध्ये मुलगी बनून ही पूजा काय काय करते.? हे चित्रपटात पहायला मिळतं. आयुष्मान हा अत्यंत गुणी आणि सक्षम अभिनेता आहे. आतापर्यंत त्याने विविध विषयांवरील सामाजिक व्यवस्थेवर भाष्य करणारे चित्रपट केले आहेत. परंतु यावेळी त्याच्या वाट्याला पटकथा फारशी तगडी न आल्याने चित्रपट तेवढा परिणामकारक वाटत नाही. मनोरंजन, कॉमेडी म्हणून एकदा बघायला हरकत नाही. अनन्या च्या फारसा रोल नाही ही जमेची बाजू म्हणावी लागेल. बाकी सहकलाकारांचा अभिनय उत्तम. ओटीटी वर येण्याची वाट बघू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.
८. अकेली |
लेखक | गुंजन सक्सेना , आयुष तिवारी , असीम अहमद अब्बासी और प्रणय मेश्राम |
दिग्दर्शक | प्रणय मेश्राम |
कलाकार | नुसरत भरूचा , निशांत दहिया , साही हलेवी, राजेश जैस , आमिर बाउट्रॉस |
निर्माता | अपर्णा पडगांवकर , शशांत शाह और विकी सिडाना |
प्रदर्शित तारीख | २५ ऑगस्ट २०२३ |
भाषा | हिंदी |
“अकेली” चित्रपट समीक्षा :-
२०१४ मध्ये इराक मध्ये इसिस ने केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट आहे. तेव्हा इसिस आणि इराकी सैन्य यांच्यामध्ये युद्ध झालं होतं. याच धर्तीवर या युद्धामुळे एका भारतीय मुलीला कोणत्या दिव्यातून जावं लागलं होतं याची कहाणी म्हणजे ‘अकेली’ हा चित्रपट.
इराकमधील मोसुल शहरात नोकरीनिमित्त गेलेल्या ज्योतीची ही गोष्ट आहे. एका कपड्याच्या फॅक्टरी मध्ये काम करत असते. मुळची अमृतसरमधील ज्योती ही अतिशय सामान्य आणि साधी मुलगी असते. तिची आणि पुतण्याची जबाबदारी तिच्यावर असते. परंतु एके दिवशी इसिस द्वारे केलेल्या हल्ल्यामुळे तिचं आयुष्य बदलून जातं.
बॉम्बस्फोट घडवून इसिस आणि इराकी सैन्य यांच्यामध्ये युद्ध सुरू झाल्यावर एक इसिस अतिरेकी तिला पकडतो. तिच्यावर अत्याचार करण्यात येतो तरीही न डगमगता ती त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करते. आता तिच्या प्रयत्नांना यश येत का हे बघण्यासाठी हा चित्रपट नक्कीच बघा. नुसरत हीने अतिशय उत्कृष्ट अभिनय केला असून चित्रपट बघताना अंगावर काटा उभा राहतो. दिग्दर्शक प्रणय मेश्राम यांचं दिग्दर्शन उत्तम झालेलं आहे.
इसिसच्या तावडीत सापडलेली ज्योती आपल्या मायदेशी परतण्यासाठी प्रयत्न करत असते. ती मायदेशी परत येते की नाही हे बघणं अतिशय रोमांचकारी आणि अंगावर काटा आणणारं आहे. सत्यघटनेवर आधारित या चित्रपटाला नुसरत आणि दिग्दर्शक प्रणय मेश्राम यांनी पूर्ण न्याय दिला आहे. माझ्याकडून या चित्रपटाला साडेतीन स्टार.
तर मंडळी यापैकी कोणते चित्रपट तुम्ही पाहीलेत आणि कोणते आवडलेत हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.
र मंडळी यापैकी कोणते चित्रपट तुम्ही पाहीलेत आणि कोणते आवडलेत हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.
हे पण वाचा :-
फेब्रुवारी २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी
फेब्रुवारी २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी
मार्च २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी
मार्च २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी
एप्रिल २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी
एप्रिल २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी
मे २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी
मे २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी
जून २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी
जुलै २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी