HomeFilmsMarathi

ऑगस्ट २०२४ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी | List of Marathi Movies released in August 2024

*ऑगस्ट २०२४ मध्ये प्रदर्शित झालेले हे मराठी चित्रपट तुम्ही पाहिलेत का.?

Written by : आकांक्षा कोलते

Updated : ऑक्टोबर 12, 2024 | 04:16 PM

खरं तर आता वेबसिरीज चा जमाना असल्यामुळे प्रेक्षकांच्या चित्रपटांच्या बाबतीत अपेक्षा वाढल्या आहेत. त्यातही नवीन आलेल्या चित्रपटांमध्ये ओरिजनल कंटेट कमीच असतो. परंतु आशयघन आणि दर्जेदार कथानक हा मराठी चित्रपटांचा गाभा आहे. मराठी चित्रपट हे नेहमीच वास्तववादी आणि चांगला कंटेंट घेऊन भेटीला येतात हे आता प्रेक्षकांच्या लक्षात येत आहे. त्यामुळे मराठी चित्रपटांना प्रेक्षक आता भरभरून प्रतिसाद देतात. असं असलं तरीही हल्ली इतके चित्रपट प्रदर्शित होत असतात की ते तेवढे दर्जेदार असतातच असं नाही. त्यामुळे आम्ही हे सांगण्याचा प्रयत्न करू की प्रदर्शित झालेला एखादा चित्रपट खरंच बघायला हवा की नको.
आज या लेखात आपण जुलै २०२४ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपट आम्हाला कसे वाटले ते सांगणार आहोत. ज्यामुळे ते बघायला हवे की नको ते ठरवणं तुम्हाला सोपं जाईल.

List of Marathi Movies released in August 2024 Movie review and information
१. लाईफ लाईन (Life Line)
२०२४. ड्रामा. २ तास ७ मिनिटे. [U/A]
लेखक राजेश शिरवईकर
दिग्दर्शकसाहिल शिरवईकर
कलाकारअशोक सराफ,माधव अभ्यंकर,भरत दाभोळकर,जयवंत वाडकर,हेमांगी कवी,शर्मिला शिंदे
निर्मातालालजी जोशी, कविता शिरवईकर, अमि भुता.
प्रदर्शित तारीख२ ऑगस्ट २०२४
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.६⭐/ ५

“लाईफ लाईन” चित्रपट समीक्षा :-

दिग्दर्शक साहिल शिरवईकर यांनी अवयव दान या अत्यंत महत्त्वाच्या आणि गरजेच्या विषयावर हा चित्रपट आहे. मृत्यू नंतर अवयवदान केल्यामुळे कित्येकांना नवीन आयुष्य मिळू शकतं परंतु काही जुन्या चालीरीती परंपरा यामुळे आपल्याकडे अजूनही अवयवदान करण्याचं प्रमाण कमी आहे. या चित्रपटात जुन्या परंपरा आणि विज्ञान यातील संघर्ष बघायला मिळतो.
चित्रपटाची कथा ही विज्ञानवादी असलेले डॉक्टर विक्रम देसाई (अशोक सराफ) आणि मृत्यू नंतर अंतिम संस्कार आणि क्रियाकर्म करणारे ब्राह्मण केदारनाथ अग्निहोत्री (माधव अभ्यंकर) यांच्यातील वैचारिक संघर्ष दाखवणारी आहे. विक्रम देसाई हे एक अतिशय निष्णात डॉक्टर असतात. आपल्या वैद्यकीय ज्ञानामुळे कित्येकांचे प्राण त्यांनी वाचवलेले असतात. तर एकीकडे केदारनाथ अग्निहोत्री हे स्वतःला किरवंत म्हणून संबोधणारे स्वार्थी आणि अहंकारी असतात व्यक्ती असतात. एकदा डॉ. देसाई हे अवयवदानाचं महत्व पटवून देण्यासाठी थेट स्मशानात जाऊन पोहचतात जिथे त्यांची भेट केदारनाथ यांच्याशी होते. आणि अर्थातच इथून संघर्ष सुरू होतो. कारण अवयवदान ही केदारनाथ यांच्या व्यवसायावर गदा आणणारी गोष्ट असते. परंतु जेव्हा आपल्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी हेच केदारनाथ कसे हतबल होतात हे बघायला मिळतं. आता डॉ देसाई हे केदारनाथ यांचं मत बदलण्यात यशस्वी होतात का.? त्यांना अवयवदानाचं महत्व पटतं का. ? हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
चित्रपटाची कथा चांगली होती परंतु पटकथेची मांडणी भरकटलेली वाटते. दिग्दर्शन ठिकठाक आहे. उत्तम कलाकार असले तरीही दिग्दर्शन आणि उत्तम पटकथा नसेल तर चित्रपट प्रभावी होत नाही. या चित्रपटाच्या बाबतीत तेच झालेलं आहे. गाणी चांगली आहेत. चित्रपट तांत्रिक गोष्टींमध्ये कमी पडलेला वाटतो. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.


२. बाबू (Babu)
२०२४. ड्रामा, ॲक्शन. २ तास २२ मिनिटे. [U/A]
लेखक मयूर मधुकर शिंदे
दिग्दर्शकमयूर मधुकर शिंदे
कलाकारअंकित मोहन, संजय खापरे, नेहा महाजन, रुचिरा जाधव
निर्मातासुनिता बाबू भोईर
प्रदर्शित तारीख२ ऑगस्ट २०२४
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.१⭐/ ५

“बाबू” चित्रपट समीक्षा :-

“बाबू नाही बाबू शेठ” अशी टॅग लाईन असलेला अस्सल आगरी कोळी भाषेचा तडका असलेला पहीला वहीला आगरी चित्रपट २ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला असून मयूर मधुकर शिंदे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं आहे. रेती माफिया आणि या धंद्यातील दुश्मनी अशा धर्तीवर हा चित्रपट बनवण्यात आला आहे. अर्थात याला प्रेमकथेची झालर आहे.
बाबू म्हणजेच अंकीत मोहन हा एक रेती माफिया असून रेती चोरी आणि अवैध विक्री वाहतूक असे त्याचे धंदे असतात. एका बाजूला बाबूची प्रेमकथा सुद्धा सुरू असते. दिवसेंदिवस बाबूची दहशत आणि साम्राज्य वाढत असतं आणि त्याचा सामना होतो तांडेल म्हणजे संजय खापरे याच्यासोबत. तांडेलसाठी बाबू हा सर्वात मोठा दुश्मन आणि अडथळा असतो आणि इथून मग संघर्ष, मारामारी, ॲक्शन सीन्स सगळं सुरू होतं. याच दुश्मनीमुळे तांडेल बाबूला अडकवून तुरुंगात पाठवतो. त्यामुळे बाबूच्या प्रेमकथेला सुद्धा फुलस्टॉप मिळतो. आता बाबू तुरुंगातून सुटून आल्यावर उत्तरार्धात काय घडतं ते बघण्यासाठी मात्र तुम्हाला चित्रपट बघावा लागेल.
मराठी मध्ये ॲक्शन सीन्स करताना बऱ्याच गोष्टींची कमतरता जाणवते किंवा ते तेवढे प्रभावी वाटत नाहीत हेच इथे सुद्धा झालेलं आहे. कथा पटकथा काही नवीन नाही. कलाकार चांगले आहेत त्यामुळे चित्रपट थोडा सुसह्य होतो. परंतु एकंदर मनोरंजन करण्यासाठी हा चित्रपट तेवढा प्रभावी वाटत नाही. परंतु आगरी कोळी पार्श्वभूमीवर पहील्यांदाच असा चित्रपट बनवण्यात आला आहे. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.


३. रघूवीर (Raghuveer)
२०२४. जीवनचरित्र, ड्रामा, भक्तिमय. २ तास ५ मिनिटे. [U]
लेखक नीलेश कुंजीर ,अभिराम भडकमकर
दिग्दर्शकनीलेश कुंजीर
कलाकारविक्रम गायकवाड, ऋतुजा देशमुख, अनुश्री फडणीस, नवीन प्रभाकर, शैलेश दातार,राहुल मेहेंदळे, निनाद कुलकर्णी
निर्माताअभिनव विकास पाठक
प्रदर्शित तारीख२३ ऑगस्ट २०२४
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.६⭐/ ५

“रघूवीर” चित्रपट समीक्षा :-

चित्रपटाच्या नावावरूनच समजते की हा चित्रपट कोणावर आधारित आहे. महाराष्ट्राला लाभलेल्या समृद्ध अशा संत संप्रदायातील एक संत म्हणजे समर्थ रामदास स्वामी. समर्थ रामदास स्वामी यांचं आयुष्य उलगडून दाखवणारा हा चित्रपट नीलेश कुंजीर यांनी दिग्दर्शित केलेला आहे.
सुर्याजी पंत आणि राणुबाई यांच्या पोटी जन्माला आलेला नारायण ते समर्थ रामदास हा संपूर्ण प्रवास या चित्रपटात पहायला मिळतो. लहानपणापासूनच अध्यात्माची ओढ आणि रामभक्त असलेले नारायण यांना अर्थातच संसारात अडकायचे नव्हते त्यामुळेच भर लग्नाच्या मंडपातून माघार घेऊन नारायण यांनी उर्वरित आयुष्य मनोपासन, बलोपसना यांचे तरुणांना धडे शिकवण्यात घालवलं. इतर तरुणांना अध्यात्म आणि वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून दासबोध आणि मनाचे श्लोक लिहीले. आज शाळाशाळांमध्ये हेच मनाचे श्लोक म्हटले जातात. आपण गणपती बाप्पाची म्हणत असलेली सुखकर्ता दुःखहर्ता ही आरती सुद्धा समर्थ रामदास स्वामी यांनीच लिहीलेली आहे. या सगळ्याची पार्श्वभूमी या चित्रपटात पहायला मिळते. तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांची झालेली अजरामर भेट सुद्धा पहायला मिळते. एकंदरच समर्थ रामदास स्वामी यांचा अद्भुत जीवनप्रवास या चित्रपटात पहायला मिळतो.
समर्थ रामदास यांची भुमिका विक्रम गायकवाड यांनी साकारली असून त्यांनी या भुमिकेला नक्कीच न्याय दिला आहे. इतर कलाकारांचा अभिनय उत्तम झालेला आहे. सिनेमॅटोग्राफी सुद्धा छान आहे. एकंदर चित्रपट चांगला झाला आहे, चित्रपटाची मांडणी अजून आकर्षक असायला हवी होती. गोष्ट स्वरूपात ती मांडण्यासाठी पटकथा अजून चांगल्या पद्धतीने मांडायला हवी होती परंतु एकंदर समर्थ रामदास यांच्याबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर हा त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बघावा असा आहे. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.


४. युवानेता (Yuvaneta)
२०२४. ड्रामा, थ्रिलर. २ तास १ मिनिटे. [U/A]
लेखक अंकुर क्षीरसागर
दिग्दर्शकयोगेश रमेश जाधव
कलाकारअंकुर क्षीरसागर, मीरा जगन्नाथ, संजय खापरे, माधव अभ्यंकर, कमलेश सावंत
निर्माताराजू राठोड, जगदीश कुमावत
प्रदर्शित तारीख२३ ऑगस्ट २०२४
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.०⭐/ ५

“युवानेता” चित्रपट समीक्षा :-

युवानेता या नावावरून लक्षात आलं असेल की चित्रपटात राजकारण हे असणारच. राजकारण , मारामारी त्यातच कथेचा नायक कसा युवानेता बनून खलनायका विरोधात लढतो वैगरे अशी घासूनपुसून गुळगुळीत झालेली कथा असलेला हा चित्रपट २३ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला असून योगेश रमेश जाधव यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.
चित्रपटाची कथा अजिबात नवीन नाही. एक नायक आहे जो मित्रांमध्ये लाडका आहे. नेहमी सगळ्यांच्या मदतीला धावून वैगरे जाणारा. आणि म्हणूनच तो इतका फेमस होतो की तिथल्या आमदाराच्या(संजय खापरे) डोळ्यात खुपायला लागतो. हा आमदार अर्थातच खलनायक प्रवृत्तीचा असतो. त्यातच त्याची वाईट नजर अंकुरची प्रेयसी आणि उद्योगपती कारखानीस यांची मुलगी सुप्रिया हिच्यावर असते. मग इथून पुढे त्यांच्यातील दुश्मनी, मारामारी हे सगळंच सुरू होतं. या आमदारामुळे गावात हातभट्टी वैगरे असे प्रकार सर्रासपणे सुरू असतात. त्यामुळे गावातील सर्व आणि मित्र मंडळी अंकुरला निवडणुकीत उभं रहाण्यासाठी प्रोत्साहन देत असतात. आता अंकुर निवडणुकीसाठी उभा राहतो का.? तो जिंकतो का.? सुप्रिया ला आमदारापासून वाचवतो का.? हे सगळं बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
एका वाक्यात सांगायचं झालं तर अगदीच रिकामी वेळ आहे आणि करायला काहीच नाही तर रच हा चित्रपट बघू शकता. चित्रपटाचा नायक म्हणून प्रेक्षकांच्या मनात एक इमेज असते, त्यानुसार अंकुर क्षीरसागर कितपत प्रेक्षकांना नायक म्हणून आवडतील यात शंका आहे. संजय खापरे, माधव अभ्यंकर यांसारख्या जाणकार कलाकारांनी अभिनय चांगला आहे परंतु बाकी सगळा आनंदी आनंद आहे. असो, एकंदर मनोरंजन करण्यासाठी हा चित्रपट नक्कीच रेकमेंड करावा असा नाही.‌ माझ्याकडून या चित्रपटाला एक स्टार.


. नेता गीता (Neta Geeta)
२०२४. ड्रामा, रोमँटिक. २ तास ९ मिनिटे. [U/A]
लेखक सुधांशू महेश बुडुख
दिग्दर्शकसुधांशू महेश बुडुख
कलाकारसुधांशू बुडुख, रोहित कोकाटे, अनिल नगरकर, विठ्ठल काले, अजय तापकिर, विराज अवचिते, सुहास जोशी, सुचेत गवई, विक्रांत धीवरे
निर्मातासुधांशू महेश बुडुख, श्रुती बुडुख
प्रदर्शित तारीख३० ऑगस्ट २०२४
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.०⭐/ ५

“नेता गीता” चित्रपट समीक्षा :-

मराठी चित्रपट बघायला प्रेक्षक चित्रपटगृहात जात नाही अशी निर्माते दिग्दर्शक यांची बोंब असते परंतु खरं तर या परिस्थितीला जबाबदार तेच असतात. तेच तेच विषय आणि कथानक घेऊन बनवलेले चित्रपट बघण्यात प्रेक्षकांना काहीच रस नसतो. कॉलेज, प्रेम आणि कॉलेजमधील राजकारण आणि दुश्मनी यावर आतापर्यंत ढिगभर चित्रपट आलेले आहेत. त्यात आता अजून एक भर म्हणजे गेल्या महिन्यात प्रदर्शित झालेला नेता गीता हा चित्रपट. यात नावीन्य काय म्हणाल तर या सगळ्याला किनार जोडलीय ती भगवद्गीतेमधील अध्याय आणि विचारांची. जेव्हा अधर्माचा हाहाकार माजतो तेव्हा कृष्णाला जन्म घ्यावा लागतो अशी एकंदर स्टोरीलाईन असलेला हा चित्रपट आहे.
चित्रपटाची कथा कॉलेज मध्ये घडणाऱ्या गोष्टींभोवती फिरते. कुणाल हा खलनायक नावापुरता कॉलेजमध्ये जात असला तरी त्याचा कॉलेजमधील राजकारणात सक्रिय सहभाग असतो‌. खरं तर राजकारणासाठीच त्याने तिथे प्रवेश घेतलेला असतो. त्याच्यामुळे कॉलेजमध्ये अधर्म कसा वाढलेला असतो.? यात हीरोची एन्ट्री कशी होते..? श्रीकृष्णासारखा तो धर्माचं रक्षण करतो का.? हे सगळं जाणून घेण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
खरं सांगायचं तर निर्माता, दिग्दर्शक आणि नायक अशा तिहेरी भूमिकेत असलेल्या सुधांशू महेश बुडुख यांचा चित्रपट निर्मितीचा हा प्रयत्न सपशेल फसलेला आहे. लागीर झालं जी या मालिकेतील शिवानी बोरकर आणि रोहीत कोकाटे सोडले तर इतर कलाकार नविन आहेत. चित्रपटाची तांत्रिक बाजू, डबिंग, गाणी, पार्श्वसंगीत अशा सगळ्याच गोष्टी डळमळीत आहेत. एकंदर फसलेला चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला एक स्टार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *