ऑगस्ट २०२४ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी | List of Hindi Movies released in August 2024
ऑगस्ट २०२४ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेले हे हिंदी चित्रपट तुम्ही पाहीलेत का?
Written by : आकांक्षा कोलते
Updated : ऑक्टोबर 21, 2024 | 08:37 PM
खरं तर आता वेबसिरीज चा जमाना असल्यामुळे प्रेक्षकांच्या चित्रपटांच्या बाबतीत अपेक्षा वाढल्या आहेत. त्यातही नवीन आलेल्या चित्रपटांमध्ये ओरिजनल कंटेट कमीच असतो. बरेच चित्रपट हे रिमेक असतात. त्यामुळे चित्रपटगृहात प्रेक्षकांना खेचून आणणं हे आता निर्माते आणि दिग्दर्शक यांच्यापुढे नवीन आव्हान आहे. आता प्रेक्षकांच्या चित्रपटांच्या बाबतीत असलेल्या अपेक्षा पूर्ण होतायत की नाही हे आमच्या परीने सांगण्याचा प्रयत्न या लेखात आम्ही करणार आहोत.
आज या लेखात ऑगस्ट महिन्यात प्रदर्शित झालेले चित्रपट कोणते आहेत आणि बघायला हवेत की नको याबद्दल आमचं मत सांगणार आहोत.
![List of Hindi Movies released in August 2024 Movie review and information](https://jugbharunfilms.com/wp-content/uploads/2024/10/August-2024-Hindi-Movie-list-1-1024x1024.jpg)
१. औरों में कहां दम था (Auron Mein Kahan Dum Tha) |
लेखक | नीरज पांडे |
दिग्दर्शक | नीरज पांडे |
कलाकार | अजय देवगन, तब्बू, शांतनु महेश्वरी, सई मांजरेकर, जिमी शेरगिल,हार्दिक सोनी, सयाजी शिंदे |
निर्माता | शीतल भाटिया, नरेंद्र हीरावत, संगीता अहीर, कुमार मंगत पाठक |
प्रदर्शित तारीख | २ ऑगस्ट २०२४ |
भाषा | हिंदी |
“औरों में कहां दम था” चित्रपट समीक्षा :-
२ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या “औरों में कहां दम था” या चित्रपटाच्या कथेतच फारसा दम नसल्याने प्रेक्षकांनीही या चित्रपटाकडे पाठ फिरवली. नीरज पांडे लिखित आणि दिग्दर्शित हा चित्रपट एका प्रेमकथेवर आधारित आहे.
कृष्णा (अजय देवगण) आणि वसुधा(तब्बू) ही दोघं एक चाळीत राहत असतात. लहानपणापासून एकत्र राहणाऱ्या या दोघांमध्ये मैत्री आणि अर्थातच नंतर प्रेमकहाणी फुलते. परंतु कथेत ट्विस्ट येतो जेव्हा वसुधा ला गुंडांपासून वाचवण्यासाठी कृष्णाच्या हातून खून होतो आणि त्याला तुरुंगात जावं लागतं. परंतु त्याचं प्रेम इतकं असतं की तो वसुधा ला सांगतो की तू दुसऱ्या सोबत लग्न करून सुखी रहा. आता वसुधा तसं करते का.? कृष्णा तुरुंगातून बाहेर आल्यावर काय होतं.? हे बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल. ॲमेझॉन प्राइम वर हा चित्रपट तुम्ही बघू शकता.
कथा म्हणावी तेवढी सक्षम नाही. बेबी, स्पेशल २६ सारखे चित्रपट किंवा स्पेशल ऑप्स सारखी वेबसिरीज दिग्दर्शित करणारे नीरज पांडे यांना प्रेमकथा तेवढ्या ताकदीने मांडता आली नाही. कदाचित कथा कमजोर असल्याने फारसा वाव मिळाला नाही. अजय देवगण आणि तब्बू यांनी अभिनय चांगला केला आहे. थोड्या वेळासाठी असलेला जिमी शेरगील चा वावर चांगला वाटतो. गाणी, संगीत ठिकठाक. एकंदर फसलेला चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार.
२. उलझ (Ulajh) |
लेखक | सुधांशु सरिया,परवेज शेख, अतिका चौहान |
दिग्दर्शक | सुधांशु सरिया |
कलाकार | जान्हवी कपूर, गुलशन देवैया, रोशन मैथ्यू, मेयांग चांग, राजेश तेलंग, आदिल हुसैन, जितेंद्र जोशी, जेमिनी पाठक, अली खान, राजेंद्र गुप्ता |
निर्माता | विनीत जैन |
प्रदर्शित तारीख | २ ऑगस्ट २०२४ |
भाषा | हिंदी |
“उलझ” चित्रपट समीक्षा :-
भारतीय गुप्तहेर म्हणजेच स्पाय वैगरे अशा रोमांचक थरारक कथांवर आधारित चित्रपट प्रेक्षकांना आवडतात खरे परंतु कथा चांगली असावी त्याचसोबत दिग्दर्शन, कलाकार या गोष्टी सुद्धा उत्तम असाव्यात तर तो चित्रपट बघायला मजा येते. कथा चांगली होती, विषय थोडा वेगळा आणि नवीन होता परंतु सामान्य पटकथे मुळे चित्रपट तेवढा प्रभावी झाला नाही.
धनराज भाटिया (आदिल हुसैन) यांची मुलगी सुहाना(जान्हवी कपूर) हीची IFS(इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस) अधिकारी म्हणून लंडनला नियुक्ती होते. परंतु इथे सुद्धा तिला नेपोटीजमच्या ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. सुहाना एका खास कामगिरी साठी लंडनला गेलेली असते. विरोधक आणि स्वतःच्या वडीलांसमोर तिला स्वतःला सिद्ध करायचं असतं परंतु तिच्या आयुष्यात नकुल शर्मा (गुलशन देवैया) नावाचं एक वादळ येतं आणि संपूर्ण आयुष्य ३६० अंश कोनातून फिरतं. हा नकुल प्रेमाचं नाटक करून तिच्यासोबतचे नाजूक क्षण व्हिडिओ मध्ये कैद करून एमएमएस बनवून तिला ब्लॅकमेल करायला सुरुवात करतो. आता पुढे काय होतं हे बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल.
सुरूवातीपासून बऱ्याच गोष्टी खटकणाऱ्या आहेत. एक इंटेलिजन्स ऑफिसर कोणत्याही मुलावर विश्वास ठेवून इतक्या सहजपणे फसते हे ध पटणारं आहे. मोठमोठ्या डिप्लोमसी पार्टी आणि कार्यक्रमात कोणीही येऊ शकतं हे अविश्वसनीय वाटतं. अशा बऱ्याच गोष्टी सिनेमॅटिक लिबर्टी च्या नावाखाली खपवल्या गेल्या आहेत. जान्हवी कपूर ची मेहनत दिसते परंतु नैसर्गिक अभिनय अजून कमी पडतो. इतर कलाकारांचा अभिनय चांगला आहे. काही सीन्स अतिशय नाटकी वाटतात. बाकी सिनेमॅटोग्राफी, पार्श्वसंगीत छान आहे. काही गाणी चांगली आहेत. एकंदर ठिकठाक चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.
३. आलिया बासू गायब हैं (Aliya Basu Gayab Hai) |
लेखक | ब्लेकेसन, गिब्रान नुरानी |
दिग्दर्शक | प्रिती सिंग |
कलाकार | विनय पाठक, राइमा सेन, सलीम दीवान |
निर्माता | डॉ. सत्तार दीवान, जोनू राणा |
प्रदर्शित तारीख | ९ ऑगस्ट २०२४ |
भाषा | हिंदी |
“आलिया बासू गायब हैं” चित्रपट समीक्षा :-
आजकाल प्रेक्षकांना सस्पेन्स थ्रिलर चित्रपट जास्त आवडतात. असाच एक चांगला सस्पेन्स जॉनरचा चित्रपट ९ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला असून विनय पाठक, राइमा सेन आणि सलीम दीवान यांच्या मुख्य भूमिका यामध्ये आहेत. कथा किंवा विषय नवीन नसला तरीही चित्रपटाची मांडणी थोडी वेगळी आहे असं म्हणता येईल. परंतु चित्रपटातून मनोरंजन मात्र गायब आहे.
पूर्ववैमनस्यातून बदला म्हणून गौतम बसु या एका धनाढ्य व्यापाऱ्याच्या मुलीचं आलिया बासू हीच दीपक आणि विक्रम हे दोघं अपहरण करतात. परंतु अपहरण केल्यानंतर विक्रम(विनय पाठक) याला आपल्या मित्राचा खरा प्लॅन आणि हेतू कळतो. जो भयानक असतो. आलिया या सगळ्यातून सुटण्यासाठी कसे प्रयत्न करते, यांना हवी असलेली रक्कम घेण्यासाठी गेल्यावर तिथे कशाप्रकारे त्यांचा डाव उलटतो, मग पुढे काय होतं हे सगळं बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल कारण सस्पेन्स चित्रपटाची कथा सांगितल्यावर बघण्याची मजा निघून जाते.
प्रिती सिंग यांनी दिग्दर्शित केलेला हा अशा प्रकारचा पहिलाच चित्रपट. कोणतेही भंपक, बटबटीत,भडक सीन्स नसल्यामुळे चित्रपट संथ वाटू शकतो. मध्ये मध्ये ट्विस्ट आणि टर्न्स येत राहतात त्यामुळे शेवटपर्यंत खिळवून ठेवण्यात चित्रपट यशस्वी झाला आहे. कलाकारांनी सुद्धा उत्तम अभिनय केला आहे. एकंदर सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आवडणाऱ्या लोकांनी बघायला हरकत नाही. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.
४. फिर आयी हसीन दिलरुबा (Phir Aayi Hasseen Dillruba) |
लेखक | कनिका ढिल्लों |
दिग्दर्शक | जयप्रद देसाई |
कलाकार | तापसी पन्नू, विक्रांत मैसी, सनी कौशल, जिमी शेरगिल, आदित्य श्रीवास्तव, भूमिका दुबे, सपना परितोष संड, आलोक पांडे, मानवेंद्र कुमार त्रिपाठी |
निर्माता | आनंद एल राय, हिमांशु शर्मा, भूषण कुमार, कृष्ण कुमार |
प्रदर्शित तारीख | ९ ऑगस्ट २०२४ |
भाषा | हिंदी |
“फिर आयी हसीन दिलरुबा” चित्रपट समीक्षा :-
२०२१ मध्ये प्रदर्शित झालेला ‘हसीन दिलरुबा’ हा चित्रपट सगळ्यांनाच आवडला होता. आता या चित्रपटाचा सिक्वेल आला असून नेटफ्लिक्स वर प्रदर्शित झाला आहे. ‘फिर आयी हसीन दिलरुबा’ या चित्रपटात दिनेश पंडित यांची नवीन कथा घेऊन आले आहेत तापसी, विक्रांत मेस्सी आणि सनी कौशल.
ज्वालापूर मधून पळून आलेले राणी कश्यप (तापसी पन्नू) आणि रिशु सक्सेना (विक्रांत मॅसी) आता आग्रा येथे सेटल झालेले असले तरी ते पोलिसांच्या भीतीमुळे एकत्र न राहता वेगवेगळे राहत असतात. त्यांचं एकमेकांवर तेवढंच प्रेम असतं परंतु नाईलाजाने रिशूला त्याच्या घरमालकीन सोबत प्रेमाचं नाटक करावं लागतय तर राणीसाठी अभिमन्यू(सनी कौशल) वेडा झालेला असतो. आता खरं राणी आणि रिशू यांना भारताबाहेर पळून जायचं असतं परंतु तेवढ्यात त्यांच्या आयुष्यात नवीन वादळ येतं. आता ते काय वादळ हे मात्र चित्रपटात बघा.
पहीला भाग जेवढा प्रेक्षकांना आवडला होता तेवढाच हा सुद्धा आवडेल. अभिनय सगळ्यांनीच चांगला केला आहे. जयप्रद देसाई यांचं दिग्दर्शन चांगलं आहे. शेवटपर्यंत खिळवून ठेवण्यात चित्रपट यशस्वी होतो. काही ठिकाणी चित्रपटाची पकड सैल होते. क्लायमॅक्स तेवढा प्रभावी झाला नाही तरी एकंदर मनोरंजन करणारा हा चित्रपट नक्की बघा. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.
५. घुड़चढ़ी (Ghudchadi) |
लेखक | दिपक कपूर भारद्वाज |
दिग्दर्शक | बिनॉय के गांधी |
कलाकार | संजय दत्त, रवीना टंडन, खुशाली कुमार, पार्थ समथान, अरुणा ईरानी |
निर्माता | भूषण कुमार, क्रिशन कुमार, निधी दत्ता, बिनोय गांधी |
प्रदर्शित तारीख | ९ ऑगस्ट २०२४ |
भाषा | हिंदी |
“घुड़चढ़ी” चित्रपट समीक्षा :-
९ ऑगस्ट रोजी घुड़चढी़ हा चित्रपट जिओ सिनेमा वर प्रदर्शित झाला असून बिनॉय के गांधी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटाची कथा पटकथा विषय सगळंच सुमार आहे. या चित्रपटात जेष्ठ अभिनेत्री अरुणा इराणी यांनी बऱ्याच वर्षांनी पुनरागमन केलं आहे.
चित्रपटाची कथा, विषय या आधी बऱ्याच चित्रपटांमध्ये पाहिलेला आहे. चिराग शर्मा(पार्थ समाथान) हा आपल्या वडिलांसोबत म्हणजे वीर शर्मा(संजय दत्त) आणि आजी(अरुणा इराणी) यांच्यासोबत राहत असतो. त्याच्या आयुष्यात देविका (खुशाली कुमार)येते आणि अर्थातच त्यांच्या प्रेमाची गोष्ट सुरु होते. परंतु ट्विस्ट येतो जेव्हा कळतं की देविकाची आई मेनका(रवीना टंडन) आणि वीर शर्मा यांचं पूर्वी एकमेकांवर प्रेम होतं. आणि आता पुन्हा त्यांची भेट झालेली असून परत त्यांच्या प्रेमाला बहर आलेला असतो. आता ही गोष्ट चिराग आणि देविकाला कळल्यावर काय होतं.? तेव्हा वीर आणि मेनका यांचं लग्न का झालं नव्हतं.? या प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर हा चित्रपट बघावा लागेल.
अत्यंत सुमार कथा आणि मांडणी असल्यामुळे चित्रपट फसलेला आहे. फक्त सिनेमॅटोग्राफी, लोकेशन्स छान आहेत. दिग्दर्शन ठिकठाक आहे. एकंदर बराच रिकामी वेळ असेल तर बघायला हरकत नाही असा हा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार.
६. घुसपैठिया (Ghuspaithiya) |
लेखक | सुसी गणेशन |
दिग्दर्शक | सुसी गणेशन |
कलाकार | उर्वशी रौतेला, विनीत कुमार, अक्षय ओबेरॉय |
निर्माता | रमेश रेड्डी, ज्योतिका शेनॉय, मंजिरी सुसी गणेशन |
प्रदर्शित तारीख | ९ ऑगस्ट २०२४ |
भाषा | हिंदी |
“घुसपैठिया ” चित्रपट समीक्षा :-
बरीच वर्ष रखडलेला घुसपैठीया हा चित्रपट शेवटी ९ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला असून सुसी गणेशन यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. आजकाल वाढत असलेल्या डिजिटल माध्यमांचा अतिवापर आणि सोशल मीडिया मुळे आपल्या रोजच्या आयुष्यात काय घडू शकतं, कोणत्या प्रकारचं संकट येऊ शकतं हे सांगणारा हा चित्रपट आहे.
विषय चांगला असला तरी नवीन मात्र नक्कीच नाही. याआधी सुद्धा अशा प्रकारच्या विषयावर अनेक चित्रपट आलेले आहेत. चित्रपटाची कथा एका पोलिस अधिकारी आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्य याभोवती फिरणारी आहे. रवि राणा(विनीत कुमार सिंह) हा एक प्रामाणिक मेहनती पोलिस अधिकारी असतो. एका विशिष्ट उद्देशाने त्याचे वरिष्ठ त्याच्यावर एक कामगिरी सोपवतात की खात्यातील भ्रष्ट अधिकारी शोधण्यासाठी आणि त्यांची पोलखोल करण्यासाठी त्यांचे फोन कॉल्स रेकॉर्ड करायचे. परंतु या दरम्यान तो एके दिवशी स्वतःच्या पत्नीचा आभाचा(उर्वशी रौतेला )कॉल ऐकतो ज्यामध्ये त्याच्या पत्नीला एक अंशुमन हा सायबर हॅकर ब्लॅकमेल करत असतो. हा कॉल ऐकल्यावर त्याच्या आयुष्यात वादळ येतं. आता अंशुमन आभा ला का ब्लॅकमेल करत असतो.? या सगळ्यात रवी राणा काय करतो.? आणि एकंदरच पुढे काय होतं हे बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल.
चित्रपटाची कथा पटकथा संवाद यातलं काही विशेष खास नाही. अभिनयाबद्दल न बोललेलं बरं. एकंदर ठिकठाक चित्रपट आहे. नाही पाहीला तरी चालेल. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार.
७. खेल खेल में (Khel Khel Mein) |
लेखक | मुदस्सर अजीज |
दिग्दर्शक | मुदस्सर अजीज |
कलाकार | अक्षय कुमार,तापसी पन्नू,वाणी कपूर,फरदीन खान,एमी विर्क,प्रज्ञा जायसवाल,आदित्य सील |
निर्माता | भूषण कुमार, विपुल शाह |
प्रदर्शित तारीख | १५ ऑगस्ट २०२४ |
भाषा | हिंदी |
“खेल खेल में” चित्रपट समीक्षा :-
आजकाल मोबाईल ही प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट झालेली आहे. कुठेही जाताना बाकी काही नाही पण हा मोबाईल कोणी विसरत नाही. प्रत्येकाचे हजारो सीक्रेट्स या मोबाईल मध्ये कैद असतात. एखादा माणूस खराखुरा कसा आहे हे तपासायचं असेल तर त्याचा मोबाईल उघडून पहावं. हा झाला गंमतीचा भाग. पण समजा आपल्या मोबाईल मधील सगळ्या गोष्टी चुकून आपल्या माणसांसमोर आल्या तर.? तर काय होऊ शकतं हेच दाखवणारा धमाल विनोदी चित्रपट १७ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला आहे. याआधी या मुळ इटालियन चित्रपटाचे एकुण २७ रिमेक बनवण्यात आले आहेत. या चित्रपटात आपला अक्की म्हणजेच अक्षय कुमार बऱ्याच वेळाने परत आलेला आहे.
रिषभ मलिक (अक्षय कुमार) आणि वर्तिका खन्ना( वाणी कपूर) हे जोडपं आपल्या मित्रमैत्रिणींसोबत वर्तिकाच्या बहीणीच्या लग्नाला आलेले असतात. ही एकुण तीन जोडपी असतात आणि त्यांचा सगळ्यांचा मित्र कबीर (फरदीन खान) हा सुद्धा असतो. बऱ्याच दिवसांनी सगळे भेटलेले असतात. त्यामुळे खूप मजामस्ती चालू असते. असंच एकदा संगीत कार्यक्रम संपल्यावर वर्तिका एक खेळ खेळूया असं सुचवते ज्यामध्ये सगळ्यांनी आपापले मोबाईल अनलॉक करून टेबलवर ठेवायचे आणि ज्याला कोणाला त्यानंतर कॉल, मेसेज येतील ते सगळ्यांसमोर मोठ्याने वाचायचं किंवा सगळ्यांना कॉल ऐकवायचा. नाही नाही म्हणता म्हणता सगळे या खेळासाठी तयार होतात परंतु जसं जसं मोबाईल वाजायला सुरुवात होते तसतशी प्रत्येकाची गुपीतं बाहेर यायला सुरुवात होते. आता ती गुपीतं काय.? पुढे काय धमाल होते.? हे सगळं बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
एका गंभीर विषयाला विनोदी झालर लावून एक चांगला चित्रपट बनवला आहे. बऱ्याच दिवसांनी कोणतेही वल्गर आणि अश्लील डायलॉग नसलेला विनोदी चित्रपट बघायला मिळतो. अक्षय कुमारने चांगला कमबॅक केला आहे. इतर सगळ्याच कलाकारांनी अभिनय चांगला केला आहे. बॉक्स ऑफिसवर हिट नसला तरी मनोरंजन करणारा हा चित्रपट तुम्हाला नक्कीच आवडेल. दिग्दर्शन चांगलं आहे. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.
८. वेदा (Vedaa) |
लेखक | असीम अरोरा |
दिग्दर्शक | निखिल आडवाणी |
कलाकार | शर्वरी वाघ,जॉन अब्राहम,अभिषेक बनर्जी,तमन्ना भाटिया,आशीष विद्यार्थी,कुमुद मिश्रा |
निर्माता | उमेश बन्सल, मोनिशा आडवाणी, मधू भोजवानी, जॉन अब्राहम |
प्रदर्शित तारीख | १५ ऑगस्ट २०२४ |
भाषा | हिंदी |
“वेदा” चित्रपट समीक्षा :-
१५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित जॉन अब्राहम आणि शर्वरी वाघ यांचा वेदा हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे असं म्हटलं जातं. आजही आपल्याकडे जातपात, धर्म, उच्च नीच हे सगळं पाहीलं जातं. अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या लोकांना आजही अमानवी वागणूक दिली जाते. प्रमाण कमी झालं असलं तरीही हा जातींमधील भेदभाव संपलेला नाही.
चित्रपटाची कथा राजस्थान मधील बाड़मेर घडताना दिसते. वेदा(शर्वरी वाघ) ही एका खालच्या जातीतील दाखवण्यात आली आहे. वेदाच्या गावातील जितेंद्र सिंह (अभिषेक बनर्जी) हा एक उच्च जातीतील मुख्य गावकरी असून तो गुंड प्रवृत्तीचा आहे. जातीपातीचं राजकारण करून गावातील लोकांना छळणं, त्यांच्यावर अत्याचार करणं हे त्याचं रोजचं काम. आणि म्हणूनच बॉक्सिंगची आवड असणाऱ्या वेदाला या सगळ्या विरुद्ध उभं राहून बॉक्सिंग शिकता येत नाही. परंतु जेव्हा तिची ओळख अभिमन्यु कंवर (जॉन अब्राहम) सोबत होते तेव्हा तिच्या स्वप्नांना सत्यात साकारण्याची संधी मिळते. अभिमन्यू हा कोर्ट मार्शल झालेला मेजर असतो जो तिच्या कॉलेज मध्ये बॉक्सिंग कोच म्हणून रूजू झालेला आहे. या सगळ्यात वेदाच्या मोठ्या भावामुळे तिच्या घरच्यांवर संकट आलेलं असतं. त्याला एका उच्च जातीतील मुलीवर प्रेम केल्याची शिक्षा म्हणून आपला जीव गमवावा लागतो. या सगळ्याघा परिणाम वेदावर होत असतो. परंतु या सगळ्या विरुद्ध लढण्यासाठी अभिमन्यू तिला तयार करतो. आता वेदा या सगळ्याचा बदला कसि घेते.? अभिमन्यूसोबत कोर्ट मार्शल का झालेलं असतं.? वेदाच्या भावाला कोण मारतं.? हे सगळं बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
एक चांगला ॲक्शनपट असलेल्या या चित्रपटात पटकथा बऱ्याच ठिकाणी कमकुवत पडलेली दिसते. बॅकग्राऊंड म्युझिक चांगलं आहे. गाणी ठिकठाक आहेत. दिग्दर्शन चांगलं आहे. जॉनचे ॲक्शन सीन्स चांगले आहेत. विशेष अभिनय शर्वरी चा म्हणावा लागेल. तीने ही भूमिका चांगली साकारली आहे. ॲक्शन सीन्स आवडत असतील तर हा चित्रपट तुम्हाला आवडेल. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.
९. स्त्री २ (Stree 2) |
लेखक | निरेन भट्ट |
दिग्दर्शक | अमर कौशिक |
कलाकार | श्रद्धा कपूर, राजकुमार राव, पंकज त्रिपाठी, अपारशक्ति खुराना, अभिषेक बनर्जी, वरुण धवन, अक्षय कुमार |
निर्माता | दिनेश विजन, ज्योति देशपांडे |
प्रदर्शित तारीख | १५ ऑगस्ट २०२४ |
भाषा | हिंदी |
“स्त्री २” चित्रपट समीक्षा :-
सध्या एकाच चित्रपटाने सगळीकडे धुमाकूळ घातलेला आहे तो म्हणजे स्त्री २. श्रद्धा कपूर चा हा चित्रपट प्रेक्षकांना आवडला असून प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देत आहेत.
पहीला चित्रपट स्त्री याघा हा सिक्वेल असून कथा त्याच चंदेरी गावात सुरू होते. यावेळी कथेमध्ये सरकटा नावाचं भूत आहे जे गावातील मुलींना गायब करत असतं. चित्रपटाची सुरुवात एका पत्रापासून होते हे पत्र गावातील रूद्र भैय्या म्हणजे पंकज त्रिपाठी यांना आलेलं असतं ज्यामध्ये गावावर येऊ पाहणाऱ्या संकटांबद्दल संकेत देणारं असतं. हे संकट म्हणजेच धडापासून मुंडकं वेगळ असलेला सरकटा भूत. याच्यापासून सुटका कशी करावी आणि गावातील मुलींना कसं वाचवावं याचा विचार विकी(राजकुमार राव) आणि भैय्या करत असतात. यात त्यांची मदत करण्यासाठी बिट्टू (अपारशक्ती खुराणा), जना (अभिषेक बॅनर्जी) आणि अर्थातच स्त्री म्हणजे श्रद्धा कपूर येतात. आता या हॉरर थ्रिलर कॉमेडी चित्रपटाबद्दल फार काही स्पॉयलर न देणं उत्तम. कारण संपूर्ण चित्रपटात काय घडतं ते पडद्यावर बघण्यात जास्त मजा आहे.
यावेळी सुद्धा कथा रंजकपणे मांडण्यात लेखक निरेन भट आणि दिग्दर्शक अमर कौशिक यांना यश आलेलं आहे. कलाकारांचा अभिनय ही तर जमेची बाजू. सिनेमॅटोग्राफी, कॅमेरा वर्क छान झालेलं आहे. पार्श्वसंगीत उत्तम आहे. गाणी छान आहेत हे तर तुम्हाला माहित असेलच. एकंदर कॉमेडी आणि हॉररचा मिक्स तडका जमून आल आहे परंतु काही ठिकाणी चित्रपट उगीचच खेचल्यासारखा वाटतो. क्लायमॅक्स म्हणावा तेवढा प्रभावी वाटत नाही. परंतु वेगळं काहीतरी धमाल विनोदी हसवणारा आणि त्याच वेळी घाबरवणारा चित्रपट बघायचा असेल तर हा चित्रपट नक्कीच बघायला हवा. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.
१०. तिकडम (Tikdam) |
लेखक | पंकज निहलानी, अनिमेश वर्मा |
दिग्दर्शक | विवेक आंचलिया |
कलाकार | अमित सियाल,सोनम अरोड़ा, दिव्यांशी दिवेदी |
निर्माता | ज्योती देशपांडे, पुनम श्रॉफ |
प्रदर्शित तारीख | २३ ऑगस्ट २०२४ |
भाषा | हिंदी |
“तिकडम” चित्रपट समीक्षा :-
जिओ सिनेमा वर प्रदर्शित झालेला तिकडम हा चित्रपट बऱ्याच जणांना माहित नसावा कारण या चित्रपटाचं प्रमोशन जाहिरात फारशी झालेली नाही. ग्लोबल वॉर्मिग, झाडांचं महत्त्व, पाण्याचं महत्त्व अशा पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या गोष्टींवर भाष्य करणारा आणि खास करून लहान मुलांनी बघावा असा हा चित्रपट आहे. विवेक आंचलिया यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून पंकज निहलानी आणि अनिमेश वर्मा यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे.
चित्रपटाची कथा साधी सोपी आणि सरळ आहे. सुखतल हे एक पर्यटन स्थळ असून या गावात हल्ली बर्फ पडण्याचं प्रमाण कमी झालं असून याघा परिणाम पर्यटन व्यवसायावर होत असतो. या गावात प्रकाश म्हणजेच अमित सियाल हा आपल्या आईवडील, बायको आणि मुलांसोबत राहत असतो. त्याला जास्त पगाराची नोकरी मिळत असून तो आपल्या कुटुंबाला सोडून जायला तयार नसतो. परंतु एक दिवस तो ज्या हॉटेलमध्ये काम करत असतो ते हॉटेल बंद होतं आणि प्रकाश ला नाइलाजाने मुंबईत जावं लागतं. आणि इथे खरी गोष्ट सुरु होते. आपल्या वडिलांनी गावात परत यावं यासाठी त्याची दोन्ही मुलं अनोखी तिकडम प्रयत्न करतात. बर्फ पडला तर आपले वडील परत येतील या भावनेने ही मुलं काय काय करतात हे या चित्रपटात पहायला मिळतं.
कथा साधी सरळ असली तरीही खूप सुंदर प्रकारे वडील आणि मुलांचं नातं, भावविश्व उलगडून दाखवणारा हा चित्रपट आहे. आजी आजोबा छोट्या छोट्या गोष्टी सांगत मुलांना खूप महत्त्वाची शिकवण देत असतात. अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्यांचं महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे. कलाकारांनी अभिनय उत्तम केला आहे. दिग्दर्शन सुद्धा चांगलं आहे. नक्की बघावा आणि लहान मुलांना आवर्जून दाखवावा असा हा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला साडेतीन स्टार.
११. अ वेडींग स्टोरी (A Wedding Story) |
लेखक | शुभो शेखर भट्टाचार्जी |
दिग्दर्शक | अभिनव पारीक |
कलाकार | वैभव तत्वावादी, मुक्ति मोहन, लक्षवीर सिंह सरन, मोनिका चौधरी, प्रतीक पचौरी, अक्षय आनंद |
निर्माता | विनय रेड्डी, शुभो शेखर भट्टाचार्जी |
प्रदर्शित तारीख | ३० ऑगस्ट २०२४ |
भाषा | हिंदी |
“अ वेडींग स्टोरी” चित्रपट समीक्षा :-
मुंजा, स्त्री २ आणि नंतर अ वेडींग स्टोरी हा भयपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. वैभव तत्वावादी, मुक्ति मोहन, लक्षवीर सिंह सरन, मोनिका चौधरी, आणि प्रतीक पचौरी यात मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाची कथा विषय नवीन नाही. मागे मराठीमध्ये एकदा पंचक कालावधीत व्यक्ती मृत पावल्यानंतर काय होतं हे सांगणारा विनोदी चित्रपट आला होता. परंतु हा चित्रपट अजिबात विनोदी नाहीय त्यामुळे जर तुम्हाला थ्रिलर हॉरर चित्रपट आवडत असतील तरच हा चित्रपट तुम्ही बघू शकता.
भारद्वाज कुटुंबाभोवती फिरणारी ही कथा आहे. या कुटुंबातील तरूण(लक्षवीर सरण) याच्या वडिलांचा मृत्यू होतो. हा मृत्यू पंचांगानुसार “पंचक” या अशुभ काळात होतो. अशा पद्धतीने या काळात जर मृत्यू झाला असेल तर त्या कुटुंबावर अनिष्ट येऊ शकते. त्यामुळे उपाय म्हणून त्या मृतदेहासोबत अजून पाच पुतळ्यांचं दहन करावं म्हणजे कुटुंबावर संकट ओढवणार नाही अशी प्रचलित परंपरा आहे. या पुतळ्यांची प्राणप्रतिष्ठा करणं सुद्धा महत्वाचं असतं. ही सगळी प्रक्रिया सुरू असताना परदेशी असलेला तरूण आपल्या वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी येतो आणि अर्थातच त्याला हे सगळं पटत नाही. आणि तो हे सगळं करण्यासाठी नकार देतो. ते पुतळे फेकून देतो. परंतु असं केल्यामुळे पुढे ज्या काही भयंकर घटना घडायला सुरुवात होते त्या घटना म्हणजेच हा चित्रपट.
तरूणचा चुलत भाऊ विक्रम(वैभव तत्ववादी) त्यालख समजावण्याचा प्रयत्न करतो परंतु तरुण कोणाचंच ऐकत नाही. याच्याच परिणामांची सुरूवात विक्रमची होणारी पत्नी प्रीती (मुक्ती मोहन) हिच्यापासून होते. आता नक्की या कुटुंबात काय अघटीत घटना घडतात.? हे कुटुंब यातून सुखरूप बाहेर पडतं का.? हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
चित्रपटाची मांडणी ठिक आहे परंतु पटकथा भरकटलेली असल्यामुळे चित्रपट खिळवून ठेवण्यात तेवढा यशस्वी होत नाही. काही सीन्स अर्धवट सोडल्यासारखे वाटतात. काही प्रश्न अनुत्तरित राहतात. हॉरर चित्रपटात क्लायमॅक्स महत्वाचा असतो तो इथे प्रभावी वाटत नाही. बॅकग्राऊंड म्युझिक चांगलं आहे. एकंदर वेळ असेल तर ओटीटी वर आल्यावर हा चित्रपट बघू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.
१२. पड़ गए पंगे (Pad Gaye Pange) |
लेखक | मनीष कुमार |
दिग्दर्शक | संतोष कुमार |
कलाकार | समर्पण सिंह, राजेश शर्मा, राजपाल यादव, फैसल मलिक |
निर्माता | गौतम शर्मा, डॉ. योगेश लखानी |
प्रदर्शित तारीख | ३० ऑगस्ट २०२४ |
भाषा | हिंदी |
“पड़ गए पंगे” चित्रपट समीक्षा :-
आपल्या आयुष्यात कधी काय घडेल त्यातल्या त्यात मरण कधी आणि कसं येईल हे तर अजिबातच हे सांगू शकत नाही. परंतु जर एखाद्या आजारामुळे आपल्याकडे कमी दिवस उरलेत हे जर समजलं तर किती गंभीर परिस्थिती निर्माण होते. परंतु हीच परिस्थिती विनोदी शैलीत मांडण्याचा आणि त्यातून छोटेमोठे संदेश देण्याचा प्रयत्न दिग्दर्शक संतोष कुमार यांनी केलेला आहे.
चित्रपटाची कथा अशी आहे की, ६० वर्षांचे निवृत्त गणिताचे शिक्षक शास्त्री जी (राजेश शर्मा) आपल्या मुलासोबत आणि सुनेसोबत राहत असतात. सुनेला त्यांच वागणं अर्थात आवडत नाही, त्यांच्या वागण्याचा तिला त्रास होत असतो. तर शास्त्रीजी आपल्या पत्नीच्या आठवणींमध्ये उरलेले दिवस काढत आहेत. तर दुसरा ट्रॅक असा आहे की शास्त्रीजींचा माजी विद्यार्थी आयुष (समर्पण सिंह) आपली प्रेयसी पारुल सोबत लग्न ठरल्यामुळे खुश आहे आणि सगळं कसं छान चालू आहे. कथेमध्ये मोठा ट्विस्ट येतो जेव्हा शास्त्रीजी आणि आयुष एका लोकल हेल्थ चेकअप कॅम्प मध्ये चेकअप करतात आणि दोघांनाही कॅन्सर असून तो लास्ट स्टेजला असल्याचं कळतं. या घटनेनंतर अख्खा प्लॉट बदलून जातो. मरणासारख्या गोष्टीला सुद्धा इतक्या सहजपणे हलक्याफुलक्या विनोदी पद्धतीने दाखवण्यात आलं आहे.
चित्रपटाचा विषय चांगला असला तरी कथा, पटकथा अजून सक्षम असायला हवी होती. एक हलकाफुलका विनोदी चित्रपट म्हणून एकदा बघायला हरकत नाही. दिग्दर्शन ठिकठाक आहे. कलाकारांचा अभिनय चांगला आहे. गाणी संगीत म्हणावं असं खास नाहीत. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.
तर मंडळी या वीकेंडला तुम्ही कोणता चित्रपट बघायला जाताय हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.