ओटीटी प्लॅटफॉर्मवर जानेवारी ते ऑगस्ट २०२३ पर्यंत प्रदर्शित झालेल्या टॉप फाईव्ह वेबसिरीज भाग -१
Written by : आकांक्षा कोलते
Updated : ऑगस्ट 18, 2023 | 03:47 AM
नमस्कार मंडळी.! आज आम्ही तुम्हाला २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या आणि प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरलेल्या “टॉप फाईव्ह” वेबसिरीज सांगणार आहोत.
हल्ली प्रेक्षकांना चित्रपटांपेक्षा वेबसिरीज बघायला जास्त आवडतं. एक ठराविक वर्ग सोडला तर जास्तीत जास्त मंडळी घरात निवांत बसून ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या वेबसिरीज बघणं जास्त पसंत करतात. सस्पेन्स, थ्रिलर, क्राईम, फॅमिली ड्रामा, कॉमेडी अशा विविध धाटणीच्या सिरीज विविध प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत राहतात. पण त्यातील काहीच वेबसिरीज असतात ज्या प्रेक्षकांना खास आवडतात. चला तर मग बघुया २०२३ मध्ये आलेल्या आणि ट्रेंडिंग लिस्ट वर असलेल्या या पाच हिंदी वेबसिरीज.
१. फर्जी |
लेखक | सीता मेनन, सुमन कुमार, राज आणि डिके |
दिग्दर्शक | राज आणि डिके |
कलाकार | शाहीद कपूर, विजय सेतुपती, के के मेनन, राशी खन्ना, भुवन अरोरा |
निर्माता | राज आणि डिके |
सीजन | १ |
एपिसोड | ८ |
प्रदर्शित तारीख | १० फेब्रुवारी २०२३ |
भाषा | हिंदी |
डबिंग भाषा | कन्नड, तमिळ, तेलुगु, मल्याळम |
“फर्जी” चित्रपट समीक्षा :-
सस्पेन्स थ्रिलर क्राईम अशा जॉनरच्या वेबसिरीज म्हणजे काही नवीन नाही. प्रेक्षकांना हेच बघायला जास्त आवडतं. त्यामुळे सिरियल किलिंगवर आधारित किंवा ड्रग्स, गुन्हेगारी विश्व अशा धाटणीच्या सिरीज नेहमीच येत राहतात. पण या सगळ्यांपेक्षा वेगळी अशी फर्जी हि वेबसिरीज १० फेब्रुवारी रोजी ॲमेझॉन प्राईम वर प्रदर्शित झाली होती.
अभिनेता शाहीद कपूर याने या सिरिज मधून ओटीटी क्षेत्रात अगदी दणक्यात पदार्पण केले आहे. सोबतच विजय सेतुपती, राशी खन्ना, के के मेनन यांनी सुद्धा या सिरीज मध्ये महत्वाचे रोल केले आहेत.
“काउंटरफिट करन्सी” या वेगळ्या विषयावर ही सिरीज आधारित आहे. खरं तर बनावट नोटा, काळा पैसा हे सगळं आपण नेहमीच्या आयुष्यात ऐकतो, बऱ्याचदा खोट्या नोटांमुळे फसवणूक सुद्धा होते. पण मोठ्या स्केलवर जेव्हा बनावट नोटांचा धंदा केला जातो त्यामुळे देशाच्या आर्थिक उलाढाली वर काय परिणाम होतो हे या सिरीजमध्ये बघायला मिळतं.
हि कथा असते सनी(शाहिद कपूर) नावाच्या एका कलाकाराची. तो अतिशय उत्तम असे पेंटिंग, स्केचिंग करत असतो. तो आणि त्याचा एक मित्र सनीच्या आजोबांकडे लहानाचे मोठे झालेले असतात. सनीच्या वडिलांनी त्याला वाऱ्यावर सोडून दिलेलं असतं त्यामुळे त्याचा संपूर्ण संभाळ हा आजोबांनी केलेला असतो. त्याच्या आजोबांची स्वतःची प्रेस असते. “क्रांतीपत्रिका” नावाच्या मुखपत्रिकेचे ते संपादक असतात. पण हि मुखपत्रिका काही चालत नसते त्यामुळे प्रेसवर कर्जाचा डोंगर उभा असतो. आणि यातूनच सनीला बाहेर पडायचं असतं. आपली प्रेस वाचवाचवायची असते.
याचसाठी तो आपल्या कलेचा वापर करून खोट्या नोटांचं डिझाईन बनवतो व त्या छापतो. त्या इतक्या खऱ्या वाटतात की मशीन मध्ये सुद्धा पकडल्या जात नाही. पुढे जाऊन याच खोट्या नोटांमुळे त्याचा व त्याच्या मित्रांचा संबंध गुन्हेगारी विश्वाशी कसा येतो हा प्रवास या सिरीजची कथा आहे. विजय सेतुपती आणि राशी खन्ना हे काउंटरफिट करन्सी या प्रकाराला आळा घालण्यासाठी कसे काम करतायत , हे दोघं सनीपर्यंत पोहचतात का.? हे सगळं बघण्यासाठी ही सिरिज नक्की बघा.
माझ्याकडून या वेबसिरीजला साडेतीन स्टार.
२. नाईट मॅनेजर १ व २ |
लेखक | डेविड फार, श्रीधर राघवन, अक्षत घिल्डीयाल, शांतनू श्रीवास्तव |
दिग्दर्शक | संदिप मोदी, प्रियंका घोसे |
कलाकार | अनिल कपूर, आदित्य रॉय कपूर, शोभिता धुलिपाला, तिलोत्तमा शोम, शाश्वत चॅटर्जी |
निर्माता | रिशी नेगी, दिपक धर, राजेश चढ्ढा |
सीजन | १ |
एपिसोड | ७ |
प्रदर्शित तारीख | सिजन पहिला :-१६ फेब्रुवारी २०२३, सिजन दुसरा :- २९ जून २०२३ |
भाषा | हिंदी |
डबिंग भाषा | मराठी, तमिळ, तेलुगु, बेंगाली, मल्याळम, कन्नड |
“नाईट मॅनेजर १ व २” चित्रपट समीक्षा :-
एका ब्रिटीश टीव्ही सिरीजचा रिमेक असलेली नाईट मॅनेजर ही डिस्नी हॉटस्टार वर प्रदर्शित झालेली वेबसिरीज प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. अनिल कपूर आणि आदित्य रॉय कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या सिरिजचं कथानक गुन्हेगारी विश्व, शस्त्रे, हत्यारांचा काळा बाजार यावर आधारित आहे. अनिल कपूर हा एक कसलेला अभिनेता आहे. वयाच्या मानाने त्याचा वावर हा अचंबित करणारा आहे. शेली म्हणून एक आर्म्स डिलर या भुमिकेचा एक वेगळाच अंदाज या सिरीजमध्ये बघायला मिळतो.
नाईट मॅनेजर ची कथा ही ढाका येथे सुरू होते. आदित्य रॉय कपूर हा एक एक्स नेव्ही ऑफिसर असून आता तो तेथील एका आलिशान हॉटेलमध्ये नाईट मॅनेजर म्हणून काम करत असतो. तर शैलेंद्र रोंगटा म्हणजेच अनिल कपूर हा एक मोठा बिझनेसमन असल्याचं दाखवत असला तर तो खरं तर एक आर्म्स डिलर असतो. त्याचा खरा धंदा हा शस्त्रांची अवैध तस्करी आणि पुरवठा करणे हा असतो.
तर कथा अशी आहे की आदित्य रॉय कपूर हा नाईट मॅनेजर म्हणून काम करत असताना त्याच्या हॉटेल मध्ये अशी काही घटना घडते की त्याच्या आयुष्यात शैलेंद्र रोंगटाची एन्ट्री होते. हॉटेलच्या मालकाची बायको सफीना हिचा खून झालेला प्रत्यक्ष पाहिल्यानंतर शान म्हणजे आदित्य रॉय कपूर हा इतका डिस्टर्ब होतो की त्याला सफीना ला न्याय मिळवून द्यायचा असतो. कारण सफीनाने तिथून सुरक्षित पणे भारतात परतण्यासाठी शानकडे मदत मागितलेली असते. परंतु हे वाटतं तेवढं सोपं नसतं. कारण अप्रत्यक्षरीत्या या खुनाशी शैली याचा संबंध असतो.
शैली याचे अंडरवर्ल्ड कनेक्शन असतात आणि आता तो असं डील करणार असतो ज्यामुळे देशाची सुरक्षा पणाला लागलेली असते. या सगळ्याचा अंदाज असलेली लिपिका(तिलोत्तमा शोम) हि सुद्धा जिवावर उदार होऊन शैली म्हणजे शैलेंद्र रोंगटा याला अटक व्हवी म्हणून प्रयत्न करत असते. या सिरीजच्या दुसऱ्या सिझन मध्ये हेच दाखवण्यात आलं आहे की कसा शान हा शैलीच्या मुलाला वाचवतो व तो शैली याच्या गटात सामील होऊन एक आंतरराष्ट्रीय एजंट म्हणून काम करायला सुरुवात करतो. खरं तर हा लिपिका आणि शान यांच्या प्लान चा एक भाग असतो. हे सगळं बघताना नक्कीच काळजाचे ठोके चुकतात.
शैलेंद्र रोंगटा म्हणजेच शैली याने उभं केलेलं साम्राज्य टिकविण्यासाठी तो कोणत्याही थराला जाऊ शकतो. त्यामुळे शान, लिपिका यांच्या प्रयत्नांना यश मिळतं की नाही हे बघण्यासाठी हि संपूर्ण सिरीज बघणं गरजेचं आहे.
अनिल कपूर, आदित्य रॉय कपूर यांचा अभिनय उत्तम झाला आहे. शैलीची गर्लफ्रेंड म्हणजे शोभिता धुलिपाला हिने सुद्धा चांगला अभिनय केला असून तीची भुमिका सुद्धा महत्वाची आहे. सगळ्याच कलाकारांनी त्यांच्या भुमिकांना न्याय दिला आहे. पहिल्या सिजन नंतर प्रेक्षकांना दुसऱ्या सिजनची प्रतिक्षा होती. आणि कमी कालावधीतच हि प्रतिक्षा पूर्ण झाल्यामुळे प्रेक्षक खूश आहेत.
डिस्नी हॉटस्टार वर सर्वाधिक पाहीली गेलेली हि वेबसिरीज आहे. त्यामुळे लवकरात लवकर हि सिरीज बघा. माझ्याकडून या वेबसिरीजला साडेतीन स्टार.
३. आसूर २: राईज ऑफ द डार्क साईड |
लेखक | गौरव शुक्ला |
दिग्दर्शक | ओनी सेन |
कलाकार | अर्शद वारसी, बरूण सोबती, अमेय वाघ, विशेष बंसल |
निर्माता | गौरव शुक्ला |
सीजन | २ |
एपिसोड | ८ |
प्रदर्शित तारीख | १ जून २०२३ |
भाषा | हिंदी |
डबिंग भाषा | मराठी, तमिळ, तेलुगु, बेंगाली, मल्याळम, कन्नड, भोजपुरी |
“आसूर २: राईज ऑफ द डार्क साईड” चित्रपट समीक्षा :-
सोनी लिव्ह वर प्रदर्शित झालेल्या आसूर या वेबसिरीजला प्रेक्षकांचा अतिशय उत्तम असा प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे दुसऱ्या सिझनची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते. नैतिकतेच्या कसोटीवर चांगलं वाईट यातील युद्ध पहिल्या सीझन मधे दाखवण्यात आलं होतं. शुभ जोशी याला त्याच्यासोबत बालपणी झालेल्या अत्याचारामुळे मोठं झाल्यावर आसूर व्हायचं असतं आणि हिच कथा पुढे दुसऱ्या सिझन मध्ये चालू करण्यात आली आहे.
हा सिझन यावेळी जिओ सिनेमा वर प्रदर्शित करण्यात आला आहे. शुभ जोशी हा एक सिरीयल किलर आहे जो अतिशय विकृतपणे आणि निघृणपणे हत्या करत सुटलेला असतो. त्याला हे सिद्ध करायचं असतं की कठीण प्रसंगी माणूस नैतिकता विसरून स्वार्थी बनतो. प्रत्येकजण आसूरच असतो हे संपूर्ण जगाला पटवून देण्यासाठी तो यावेळी मोठी योजना आखत आहे. त्यामुळे फॉरेन्सिक तज्ञ निखिल नायर म्हणजे बरूण सोबती आणि सीबीआय ऑफिसर धनंजय राजपूत म्हणजेच अर्षद वारसी यांच्या समोर खूप मोठं आव्हान आहे.
या सिरीजच्या निमित्ताने आर्टिफिशियल इंटेलिजन्स नक्की कसं काम करतं हे बघायला मिळतं. शुभ जोशी त्याची संपूर्ण योजना आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आधाराने चालवत आहे. त्यामुळे तो नेहमीच सीबीआय च्या एक पाऊल पुढे असतो. शुभ जोशी याचा पौराणिक कथांचा गाढा अभ्यास असून त्याची सारी तत्वं हि त्यावरच आधारित आहेत. त्यामुळे हि एक उत्तम पौराणिक थ्रिलर सस्पेन्स वेबसिरीज आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजन्सची एक काळी बाजू सुद्धा या सिरीजच्या निमित्ताने कळते. अतिशय उत्तम प्रकारे या सिरिजचं कथानक आणि दिग्दर्शन असून सगळ्या कलाकारांनी अभिनय उत्कृष्ट केला आहे. त्यातही शुभ जोशीची भुमिका साकारणारा विशेष बंसल हा विशेष लक्षात राहतो. या सिरीजचा तिसरा पार्ट येऊ शकतो अशी शक्यता वाटतेय.
जिओ सिनेमा वर अगदी मोफत हि वेबसिरीज तुम्ही बघू शकता. माझ्याकडून या वेबसिरीजला साडेतीन स्टार.
४. दहाड |
लेखक | रिमा कागती, रूचिका शाह, झोया अख्तर |
दिग्दर्शक | रिमा कागती, रूचिका ओबेरॉय |
कलाकार | सोनाक्षी सिन्हा, विजय वर्मा, सोहम शाह, गुलशन देवय्या |
निर्माता | रिमा कागती, झोया अख्तर |
सीजन | १ |
एपिसोड | ८ |
प्रदर्शित तारीख | १२ मे २०२३ |
भाषा | हिंदी |
डबिंग भाषा | कन्नड, मल्याळम, तेलुगु, तमिळ, तुर्की |
“दहाड” चित्रपट समीक्षा :-
क्राईम, सस्पेन्स थ्रिलर प्रकारच्या वेबसिरीज बघणं प्रेक्षक जास्त पसंत करतात. त्यामुळेच ॲमेझॉन प्राईम वर प्रदर्शित झालेली दहाड ही वेबसिरीज ट्रेंडिंग लिस्ट वर आहे.
दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा आणि विजय वर्मा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या सिरीजमध्ये एकूण २७ मुलींची गुढ हत्या की आत्महत्या याचा तपास दाखवण्यात आला आहे. विजय वर्मा याने नेहमीच प्रेक्षकांवर त्याच्या अभिनयाची छाप सोडली आहे. या सिरीजमध्ये पुन्हा एकदा त्याचा सशक्त अभिनय पहायला मिळतो.
राजस्थान मधील एका गावातील एक मुलगी हरवल्याची तक्रार करायला एक गरीब घरातील भाऊ पोलिस स्टेशनमध्ये जातो पण त्याच्य तक्रारी कडे फारसं लक्ष दिलं जात नाही. पण तेव्हाच तो भाऊ बघतो की एक हिंदू मुलगी एका मुस्लिम मुलासोबत पळून गेल्यामुळे धर्माचं राजकारण करून त्या मुलीला शोधण्यासाठी पोलिसांवर दबाव आणून शोधकार्य जोरात सुरू आहे. म्हणून तो सुद्धा खोटी तक्रार दाखल करतो की त्याची बहीण सुद्धा मुस्लिम मुलासोबत पळून गेली आहे. इथुनच कथानकाला सुरूवात होते. या मुलीचा शोध घेता घेता एकूण सत्तावीस मुली गायब झाल्याचं दिसून येतं.
सोबतच मुलींना एका विशिष्ट पद्धतीने सार्वजनिक शौचालयात कोंडून मारण्याच्या केसेस एकापाठोपाठ एक अशा निदर्शनास येतात. हे खून फक्त गरीब घरातील मुलींचे होत असतात. आणि ते अशा पद्धतीने केले जातात की ती आत्महत्या भासावी. विजय वर्मा याने सायको किलरची भुमिका अतिशय थंडपणे आणि उत्तम साकारली आहे.
आता या सगळ्या मुलींच्या हत्येचा शोध लावण्यात इन्स्पेक्टर अंजली भाटे यशस्वी होते का.? शिक्षक म्हणून काम करणाऱ्या आनंद स्वर्णकर म्हणजेच विजय वर्मा चा राक्षसी चेहरा जगासमोर येतो का हे बघण्यासाठी ही सिरिज नक्की बघा. माझ्याकडून या वेबसिरीजला तीन स्टार.
५. स्कूप |
लेखक | मृण्मयी लागू, मिरत त्रिवेदी |
दिग्दर्शक | हंसल मेहता |
कलाकार | करिष्मा तन्ना, मोहम्मद जीशान अय्युब, प्रोसेनजीत चॅटर्जी , हरमन बावेजा, तनिष्ठा चॅटर्जी, देवेन भोजानी |
निर्माता | हंसल मेहता |
सीजन | 1 |
एपिसोड | ६ |
प्रदर्शित तारीख | २ जून २०२३ |
भाषा | हिंदी |
डबिंग भाषा | तमिळ, तेलुगु, इंग्लिश |
“स्कूप” चित्रपट समीक्षा :-
नेटफ्लिक्स वर स्ट्रीम होत असलेली आणि सध्याच्या व्यवस्थेवर नेमकं भाष्य करणारी वेबसिरीज स्कूप ही बघायलाच हवी या कॅटेगरी मधील आहे. आपण बऱ्याचदा बऱ्याच वर्तमानपत्रात एकच बातमी एकाच प्रकारे किंवा वेगवेगळ्या ॲंगलने लिहीली गेलेली वाचतो. आता हि बातमी आपल्यापर्यंत पोहचवण्यासाठी पत्रकारांना त्यातील तथ्य, खरं खोटं तपासून बघावं लागतं. आणि यातूनच एक स्पर्धा सुरू होते. बातम्यांच्या दुनियेतील सर्वात मोठी बातमी जी समाजव्यवस्था ढवळून टाकू शकते, अशी बातमी म्हणजे “स्कूप”.
पत्रकार आणि अंडरवर्ल्ड यांच्या दुनियेतील खऱ्या खोट्या गोष्टींचा उलगडा करणारी ही वेबसिरीज आहे. काही वर्षांपूर्वी नावाजलेले क्राईम रिपोर्टर जे. डे. यांची हत्या करण्यात आली होती. हत्येपूर्वी त्यांनी बरेच खुलासे करून पत्रकारितेच्या दुनियेत खळबळ उडवून दिली होती. आणि याच कारणामुळे हत्या करण्यात आली असावी असा अंदाज आहे. पण या सगळ्यात जिग्ना वोरा या महिला पत्रकराला अटक करण्यात आली होती. आणि संपूर्ण राज्यासाठी हा मोठा धक्का होता. पण कालांतराने त्यांची निर्दोष सुटका झाली.
याच अनुभवाचं लिखाण त्यांनी “बिहाईंड बार्स इन भायखळा : माय डेज इन प्रिझन” या पुस्तकात केले असून त्याच पुस्तकावर आधारित ही वेबसिरीज आधारित आहे.
हि वेबसिरीज बघताना एक गोष्ट लक्षात येते की अंडरवर्ल्ड कनेक्शन , पत्रकारिता, पोलिस हे सगळंच आपण बातम्यांमधून बघतो ते तेवढंच नसतं.
या सिरीजमध्ये जागृती वोरा हि क्राईम रिपोर्टर आहे जिचं नुकतंच प्रमोशन झालेलं आहे. खूप कष्टाने तिने इथपर्यंत प्रवास केलेला आहे. पण स्पर्धेच्या या युगात प्रतिस्पर्धी , पाय खेचणारे हे असतातच. या सगळ्यांवर मात करून ती “डेप्युटी ब्युरो चीफ” बनते. यात पत्रकारांमध्ये असणारी चढाओढ, स्कूप साठी केले जाणारे प्रयत्न त्यासाठी त्यांची धडपड सगळंच पहायला मिळतं.
कथेदरम्यान जयदेब सेन या प्रसिद्ध सिनियर पत्रकाराची हत्या करण्यात येते. खरं तर जयदेब यांनी काही महत्त्वाच्या बातम्या उघडकीस आणलेल्या असतात आणि त्यांचा तपास सुरूच असतो. आणि याच कारणामुळे हि हत्या करण्यात येते. परंतु या सगळ्यात अडकवलं जातं ते म्हणजे जागृती वोरा यांना. त्यांच्याविरोधात तशी परिस्थिती निर्माण केली जाते. वरिष्ठ पोलीस अधिकारी ते छोटा राजन सारख्या अंडरवर्ल्ड सोबत त्यांचे कामानिमित्त असलेले संबंध नको त्या पद्धतीने समोर आणले जातात. त्यांना अटक झाल्यानंतर कारागृहात त्यांना मिळणारी वागणूक हे सगळं बघून व्यवस्थेविरुद्ध चीड नक्कीच निर्माण होते.
आता खरंच हा खून जागृती यांच्या सांगण्यावरून झाला होता का.? की नक्की काय झालं होतं हे बघण्यासाठी ही सिरिज नक्की बघा. माझ्याकडून या वेबसिरीजला साडेतीन स्टार.
तर मंडळी यापैकी कोणते चित्रपट तुम्ही पाहीलेत आणि कोणते आवडलेत हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा.
हेही वाचा :
ओटीटी प्लॅटफॉर्मवर जानेवारी ते ऑगस्ट २०२३ पर्यंत प्रदर्शित झालेल्या टॉप फाईव्ह वेबसिरीज भाग – २