ओटीटी प्लॅटफॉर्मवर जानेवारी ते ऑगस्ट २०२३ पर्यंत प्रदर्शित झालेल्या टॉप फाईव्ह वेबसिरीज भाग – २
या विकेंडला कोणती सिरीज बघायची हा विचार करताय.? मग हा लेख तुमच्यासाठीच.!
Written by : आकांक्षा कोलते
Updated : ऑगस्ट 27, 2023 | 10:41 PM
नमस्कार मंडळी.!आज आम्ही तुम्हाला २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या काही वेबसिरीज सांगणार आहोत त्यापैकी तुम्ही या विकेंडला नक्कीच बघू शकता.
हल्ली प्रेक्षकांना चित्रपटांपेक्षा वेबसिरीज बघायला जास्त आवडतं. एक ठराविक वर्ग सोडला तर जास्तीत जास्त मंडळी घरात निवांत बसून ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या वेबसिरीज बघणं जास्त पसंत करतात. सस्पेन्स, थ्रिलर, क्राईम, फॅमिली ड्रामा, कॉमेडी अशा विविध धाटणीच्या सिरीज विविध प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत राहतात. पण त्यातील काहीच वेबसिरीज असतात ज्या प्रेक्षकांना खास आवडतात.
१. जुबली |
लेखक | सौमिक सेन , विक्रमादित्य मोटवानी, अतुल सभरवाल |
दिग्दर्शक | विक्रमादित्य मोटवानी |
कलाकार | अदिती राव हैदरी, अपारशक्ती खुराणा, सिद्धांत गुप्ता, वामिका गब्बी, प्रोसेनजीत चॅटर्जी, अरूण गोवील, राम कपूर |
निर्माता | विक्रमादित्य मोटवानी , शिबाशीष सरकार, सृष्टी बहल, विक्रम मल्होत्रा |
सीजन | १ |
एपिसोड | १० (एक एपिसोड ४५ मिनिटे – १ तास ) |
प्रदर्शित तारीख | ७ एप्रिल २०२३ |
भाषा | हिंदी |
“जुबली” वेबसिरीज समीक्षा :-
सस्पेन्स थ्रिलर यापेक्षा वेगळी काहीतरी सिरीज बघायची असेल तर तुमच्याकडे जुबली शिवाय उत्तम पर्याय नाही. ७ एप्रिल २०२३ रोजी ॲमेझॉन प्राईम वर प्रदर्शित झालेली जुबली ही सीरिज आतापर्यंतच्या सिरीजपेक्षा नक्कीच वेगळी आहे.
या सिरीजमधील प्रत्येक कलाकाराने हा स्वतःच्या अभिनयाचं कसब पणाला लावून काम केलेलं आहे. बॉलिवूडचा जन्म झाला आणि बॉम्बे टॉकीज नावाचा स्टुडिओ उदयास आला होता. हिमांशू रॉय आणि देविका राणी यांनी खास जर्मनी वरून शिकून येऊन हा स्टुडिओ सुरू केला होता. कालांतराने हिमांशू रॉय यांच्या मृत्यूनंतर देविका राणी यांची एका रूसी सोबत जोडली गेलेली प्रेमकहाणी , याच स्टुडिओमुळे नावारूपाला आलेले अशोक कुमार , याचप्रमाणे या स्टुडिओ सोबत अनेक कथा जोडल्या गेलेल्या आहेत. याच सगळ्यावर आधारित जुबली ही सीरिज आहे.
रॉय टॉकीज मध्ये काम करणाऱ्या एका सामान्य कारकुनाचा सुपरस्टार होण्यापर्यंतचा प्रवास या सिरीजमध्ये बघायला मिळतो. अपारशक्ती खुराणा याने ही भूमिका अक्षरशः जीव ओतून केलेली आहे. सिरीजमधील प्रत्येक पात्राची एक स्वतंत्र वेगळी कथा आहे.
रॉय टॉकीजला एका सुपरस्टारची गरज आहे आणि त्यांनी लखनऊ मधील जमशेद खान ची निवड केल्यानंतर स्टुडिओची मालकीन सुमित्रा कुमारी म्हणजेच अदिती राव ही जमशेद खान ला भेटायला लखनऊ ला जाते तिथे त्यांची प्रेमकहाणी सुरू होते. आणि याची खबर रॉय बाबू यांना लागते. इथुनच मुख्य कथेला सुरुवात होते.
हा काळ स्वातंत्र्यापूर्वी चा दाखवला आहे. यातील अजून एक मुख्य पात्र म्हणजे कराची मधील जय खन्ना. सिद्धांत गुप्ता याने ही भूमिका साकारून त्याच्या अभिनयाची ताकद दाखवली आहे. तो भारतात जमशेद खान याला घेऊन जाण्यासाठी आलेला असतो पण जमशेद खान हा गायब असतो. तो कसा गायब होतो. त्याचं काय होतं.? साधा कारकून बिनोद कुमार कसा सुपरस्टार बनतो.? या सगळ्याचा शोध म्हणजे जुबली.
अभिनेत्री वामिका गब्बी हिने उभी केलेली निलोफर सुद्धा लक्षात राहण्यासारखी आहे. जय खन्ना, बिनोद कुमार या सगळ्यांसोबत कनेक्शन असणारी निलोफर हे महत्त्वाचं पात्र आहे. जमशेद खान याच्या गायब होण्यामध्ये बिनोद कुमार चा हात आहे हे कळल्यावर सुमित्रा कुमारी पेटून उठते. ती तिचा बदला घेण्यासाठी काय करते हे बघण्यासाठी ही सिरिज नक्की बघा.
अतिशय सुंदर कथा, साजेशी पटकथा, त्या काळातील सुंदर चित्रिकरण, सर्व कलाकारांचा सशक्त अभिनय या सगळ्या गोष्टींसाठी ही सीरिज बघायलाच हवी. माझ्याकडून या वेबसिरीजला पाचपैकी चार स्टार.
२. सास, बहू और फ्लेमिंगो |
लेखक | सौरभ डे, करण व्यास, अमन मन्नान, नंदिनी गुप्ता |
दिग्दर्शक | होमी अदजानिया |
कलाकार | डिंपल कपाडिया, राधिका मदान, मोनिका डोगरा, उदित अरोडा, अंगिरा धर, दीपक डोबरियाल, वरूण मित्रा, विक्रम प्रताप, ईशा तलवार, आशिष वर्मा, नसीरुद्दीन शाह |
सीजन | १ |
एपिसोड | ८ (एक एपिसोड ४०-५५ मिनिटे) |
निर्माता | दिनेश विजान |
प्रदर्शित तारीख | ५ मे २०२३ |
भाषा | हिंदी |
“सास, बहू और फ्लेमिंगो” वेबसिरीज समीक्षा :-
डिंपल कपाडिया यांची मुख्य भूमिका असलेली सास, बहू और फ्लेमिंगो ही वेबसिरीज डिस्नी हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आहे. मे प्रदर्शित झालेली ही सीरिज आजही प्रेक्षक बघत आहेत.
नावाप्रमाणेच सासू, सुना आणि फ्लेमिंगो म्हणजेच फ्लेमिंगो नावाच्या अंमली पदार्थावर ही सिरीज आधारित आहे. राजस्थान मधे स्वतःचं “राणी को ऑपरेटिव्ह” या नावाने खोटं साम्राज्य उभं केलेली सावित्रीदेवी ऊर्फ “राणी बा” ही आपल्या दोन सुनांना हाताशी घेऊन ड्रग्स चा धंदा करत आहे. जेव्हा की परदेशात असणारे तिचे दोन्ही मुलं या धंद्याबाबत अनभिज्ञ आहेत.
आपल्या गावातील गरीब गरजू बायकांना रोजगार देऊन आयुर्वेदिक औषधी आणि हस्तकलेच्या वस्तूंच्या बिझनेस च्या नावाखाली ही राणी बा फ्लेमिंगो नावाचं ड्रग्स विकत असते. आता ड्रग्स चा धंदा म्हटल्यावर सावित्रीदेवीचा दुश्मन आलाच. ज्याला राणी बाचं साम्राज्य उध्वस्त करून हा धंदा एकट्याला करायचा आहे. आता मोंक म्हणजे दीपक डोबरियाल याला ते जमतं का हे सिरीज बघूनच कळेल.
सिरीजमध्ये बरेच ॲक्शन सीन सुद्धा आहेत. काही सीन्स हे डिंपल कपाडिया यांनी वयाची साठी ओलांडली असली तरी उत्तम केले आहेत. सिरीजची कथा ही अंमली पदार्थांची तस्करी, सध्या सिरीजमध्ये कॉमन आणि मस्ट असलेले समलैंगिक संबंध, स्वतःचं साम्राज्य निर्माण करण्याची महत्त्वाकांक्षा या सगळ्यांवर बेतलेली आहे.
कथेमधील बऱ्याच गोष्टी खटकतात. सुनांसोबत एवढा मोठा अवैध धंदा करत असताना मुलांना त्यातील काहीच माहीत नसणं, ते परदेशी असणं हे पटत नाही. पण तरीही नेहमीच सासू सुनांच्या भांडणापेक्षा हे नक्कीच वेगळं काहीतरी आहे. सगळ्यांनी अभिनय उत्तम केला आहे. नसीरुद्दीन शाह यांच्याकडून थोडा अपेक्षाभंग झाल्यासारखं वाटू शकतं.
आठ भागांची ही वेबसिरीज मनोरंजन नक्कीच करेल यात शंका नाही. माझ्याकडून या वेबसिरीजला पाचपैकी तीन स्टार.
३. कोहरा |
लेखक | गुंजीत चोप्रा, सुदिप शर्मा, डिग्गी सिसोदिया |
दिग्दर्शक | रणदीप झा |
कलाकार | बरूण सोबती, सुविंदर विक्की, रशेल शैले, मनीष चौधरी, एकावली खन्ना |
सीजन | १ |
एपिसोड | ६ ( एक एपिसोड ४४ – ५१ मिनिटे ) |
निर्माता | सुदिप शर्मा |
प्रदर्शित तारीख | १५ जुलै २०२३ |
भाषा | हिंदी |
“कोहरा” वेबसिरीज समीक्षा :-
नेटफ्लिक्स वर स्ट्रीम होत असलेली “कोहरा” ही वेबसिरीज सस्पेन्स थ्रिलर क्राईम या जॉनरची आहे. समलैंगिक संबंधांना समाजातील मान्यता या अतिसंवेदनशील विषयाला हात घालणारी हि वेबसिरीज आहे. ग्रामीण भागातील विविध गोष्टी आणि पैलू लक्षात घेऊन रणदीप झा यांनी या सिरिजचं उत्तम दिग्दर्शन केले आहे.
पंजाब मधे घडणारी ही कथा आहे. पोलिस अधिकारी बलबीर सिंह आणि अमरपाल गरूंडी हे दोघं या सिरीजमध्ये मध्यवर्ती भुमिकेत आहेत. कथेच्या सुरूवातीलाच एका एनआरआय चा मृतदेह एका शेतात सापडतो आणि त्याचा तपास करण्यासाठी बलबीर आणि अमरपाल हे दोघं येतात.
पंजाबमधील जगराना नावाच्या गावात घडणारी ही कथा आहे. याच गावातील एका श्रीमंत जमीनदाराचा मुलगा जो स्वतःच्या लग्नासाठी गावी आलेला आहे. परंतु लग्नाच्या आदल्या रात्रीच त्याचा खून होतो. याच खुनाचा तपास करताना अनेक रहस्यं, अनेक गुढ गोष्टी समोर येतात. सिरीजच्या प्रत्येक भागात अनेक ट्विस्ट आणि टर्न्स येत राहतात.
सिरीजमध्ये समलैंगिक संबंध, अनैतिक संबंध, पुरुषांची एक हळवी असणारी बाजू अशा बऱ्याच गोष्टींवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. समाजाने घालून दिलेल्या चौकटीत पुरूषांची सुद्धा किती मुस्कटदाबी होते हे पहायला मिळतं. एकंदरच सस्पेन्स कायम ठेवणारी ही वेबसिरीज तुमचं मनोरंजन नक्कीच करेल.
बरूण सोबती याच्या अभिनयाची छाप आपण बऱ्याच वेळा पाहीलेली आहे. पण या सिरीजमध्ये बलबीर सिंह ची भुमिका साकारणारे सुविंदर विक्की हे विशेष लक्षात राहतात. एका असहाय्य बापाची भुमिका साकारताना तेवढाच सशक्त आणि जागरूक पोलिस अधिकारी त्यांनी सुंदररित्या पडद्यावर साकारला आहे. सगळ्याच कलाकारांनी अभिनय चांगला केला आहे. ग्रामीण भागातील चित्रिकरण बघताना कोहरा चा इफेक्ट नक्की जाणवतो. माझ्याकडून या वेबसिरीजला पाचपैकी तीन स्टार.
४. अधुरा |
लेखक | अनन्या बॅनर्जी |
दिग्दर्शक | गौरव के चावला, अनन्या बॅनर्जी |
कलाकार | रसिका दुग्गल, इश्वाक सिंह , श्रेणिक अरोडा, पूजन छाबडा, राहुल देव, जोया मोरानी, रिजूल रे, साहिल सलाथिया, के सी शंकर, जैमिनी पाठक |
सीजन | १ |
एपिसोड | ७ ( एक एपिसोड ४० – ६० मिनिटे ) |
निर्माता | मोनिषा आडवाणी, मधू भोजवानी, निखिल अडवाणी |
प्रदर्शित तारीख | ७ जुलै २०२३ |
भाषा | हिंदी |
“अधुरा” वेबसिरीज समीक्षा :-
ॲमेझॉन प्राईम वर प्रदर्शित झालेली अधुरा ही हिंदीमधील ॲमेझॉन प्राईमची पहिलीच हॉरर वेबसिरीज आहे. ज्यांना हॉरर, थ्रिलर भयपट बघायला आवडतात त्यांना ही सीरिज नक्कीच आवडेल. रसिका दुग्गल हीने या आधी पण बऱ्याच वेबसिरीज मध्ये मुख्य भूमिका किंवा महत्वाचं पात्र साकारलेलं आहे. अधुरा या सिरीजमध्ये ती एका शाळेत काम करणाऱ्या समुपदेशकाच्या भुमिकेत आहे.
याच शाळेत एक लहान मुलगा शिकत आहे जो सगळ्यांच्याच डोळ्यात खुपतो पण काउन्सलर असलेल्या रसिका दुग्गल ला त्याच्यामध्ये स्वतःचा मुलगा दिसतो. त्यामुळे ती त्याच्याकडे विशेष लक्ष देते. या मुलाची भूमिका श्रेणिक अरोडा याने केली आहे.
तर सिरिजची कथा ही ऊटी मधील एका शाळेतील आहे. या शाळेच्या २००७ च्या बॅचचे विद्यार्थी रियुनियन साठी एकत्र आलेले असताना अधिराज जयसिंह म्हणजेच इश्वाक सिंह याला कळतं की त्याचा सगळ्यात जवळचा मित्र रमन निनाद म्हणजेच पूजन छाबडा हा शाळेच्या शेवटच्या दिवशी हरवलेला असतो. जेव्हा त्याला आता जवळपास पंधरा वर्षांनी अधिराजला हे कळतं तो त्याला शोधण्याचा प्रयत्न करतो. तेव्हाच त्याची भेट वेदांत मलिक म्हणजे श्रेणिक अरोडा याच्यासोबत होते.
वेदांत हा मानसिक रित्या अस्थिर असतो. पण वेदांत हा अधिराजला रमन ची आठवण करून देत राहतो. आता वेदांत आणि रमन यांच्यामध्ये काय कनेक्शन आहे हे बघण्यासाठी ही सिरिज बघायला हवी. भुतकाळ आणि वर्तमान अशी समांतर कथा दाखवण्यात आलेली आहे.
रमनच्या शोधकार्यामुळे काय काय संकटं येतात हाच या सिरिजचा महत्त्वाचा भाग आहे. श्रेणिक अरोडा याने या सिरिजला चार चांद लावले आहेत. इश्वाक सिंह याचा अभिनय सुद्धा उत्तम झाला आहे. पण ज्या रसिका दुग्गल कडून फार अपेक्षा ठेवल्या त्यात मात्र रसिका कमी पडली असं जाणवतं. पण एकंदर जर तुम्हाला थ्रिलिंग हॉरर असं काही बघायचं असेल तर या विकेंडला ही सीरिज नक्कीच बघा. माझ्याकडून या वेबसिरीजला पाचपैकी तीन स्टार.
५. द ट्रायल |
लेखक | हुसैन दलाल, अब्बास दलाल, सिद्धार्थ कुमार |
दिग्दर्शक | सुपर्ण वर्मा |
कलाकार | काजोल, कुब्रा सैत, फ्लोरा सैनी, अली खान, जिशू सेनगुप्ता, मनस्वी ममगई, शीबा चढ्ढा |
सीजन | १ |
एपिसोड | ८ ( एक एपिसोड ३९ – ४६ मिनिटे ) |
निर्माता | पराग देसाई, दिपक धर, राजेश चढ्ढा, अजय देवगण |
प्रदर्शित तारीख | १४ जुलै २०२३ |
भाषा | हिंदी |
“द ट्रायल” वेबसिरीज समीक्षा :-
हॉटस्टार डिस्नी वर एकापेक्षा एक सरस वेबसिरीज या येतच असतात. नाईट मॅनेजर नंतर लगेचच सर्वाधिक चर्चा झालेली “द ट्रायल” ही कोर्टरूम मधे रंगणारी वेबसिरीज १४ जुलै ला प्रदर्शित झाली आहे.
“द गूड वाईफ” या सिरिजची हिंदी कॉपी म्हणजे द ट्रायल ही सिरिज. या सिरिजचं टायटलचं “द ट्रायल : प्यार, कानून, धोका” असं आहे. त्यामुळे कोर्टरूम मधे चालणारा ड्रामा यात असणारच. दिग्दर्शक सुपर्ण वर्मा यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिरिजची पटकथा आणि संवाद अजून चांगले असते तर कदाचित ही सिरिज सुद्धा ट्रेडिंग लिस्ट वर असली असती.
असो, एका पतीसोबत संपूर्ण निष्ठा असलेल्या नोयोनिका सेनगुप्ता ची ही कथा आहे. तर नोयोनिका म्हणजे आई, पत्नी आणि एक हुशार वकील अशा तिहेरी भूमिकेत आपल्याला काजोल मध्यवर्ती भुमिकेत दिसते. नोयोनिका सेनगुप्ता चा नवरा राजीव सेनगुप्ता हा एक प्रसिद्ध जज असतो परंतु तो एका सेक्स स्कॅण्डल मध्ये अडकला गेल्यामुळे त्याला अटक झालेली आहे. आणि इथुनच कथेला आणि नोयोनिकाच्या नवीन प्रवासाला सुरुवात होते.
असं आपल्या बाबतीत सुद्धा होतं की आपण जीवापाड प्रेम करत असलेल्या आणि ज्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतो त्यांच्याकडून विश्वासघात केला जातो. असाच विश्वासघात राजीव सेनगुप्ता ने आपल्या पत्नी सोबत केलेला आहे. त्याला अटक झाल्यानंतर एकेकाळी टॉप ची वकील असणारी नोयोनिका ही पुन्हा वकीली करायला सुरुवात करते. तीचा जुना मित्र यासाठी तिला मदत करतो. ज्युनिअर म्हणून जॉईन करून सुद्धा ती अनेक केसेस यशस्वीरीत्या जिंकते. हा सगळा कोर्टड्रामा या सिरीजमध्ये बघायला मिळतो. सिरिज अजून दर्जेदार होऊ शकली असती परंतु पटकथाच कमकुवत पडल्यामुळे सिरिज तेवढी दमदार वाटत नाही.
अनेक पैलू असलेल्या विविध केसेस, त्यांची सुनावणी, नोयोनिका चं वैयक्तिक आयुष्य, त्यातील चढ उतार या सगळ्यात ती नवऱ्याला तुरुंगातून सोडवू शकते का.? हे सगळं बघण्यासाठी ही सिरिज बघायला हवी. पण तुमच्याकडे दुसरा काही चांगला पर्याय नसेल आणि तुम्ही काजोलचे चाहते असाल तर ही सीरिज नक्की बघा. माझ्याकडून या वेबसिरीजला पाचपैकी अडीच स्टार.
तर मंडळी यापैकी कोणती वेबसिरीज तुम्ही या विकेंडला बघणार हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.
हेही वाचा :
ओटीटी प्लॅटफॉर्मवर जानेवारी ते ऑगस्ट २०२३ पर्यंत प्रदर्शित झालेल्या टॉप फाईव्ह वेबसिरीज भाग -१