HomeMarathiSongs

गणेशोत्सवाची मराठी चित्रपटातील गाजलेली गाणी | Popular Songs of Ganesh Festival in Marathi Movies

Written by : आकांक्षा कोलते

Updated : ऑगस्ट 31, 2022 | 09:21 PM

 “मराठी चित्रपटातील गाजलेली ही दहा गाणी आता हमखास वाजणार…आणि यावर्षी चा गणेशोत्सव सुद्धा जल्लोषात साजरा होणार….”

       आपलं लाडकं आराध्य दैवत म्हणजेच आपल्या बाप्पाच्या आगमनासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. आता अनुभवता येणार ते फक्त आणि फक्त चैतन्यमय असं भारलेलं वातावरण. चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेला हा आपला बाप्पा येणार म्हटल्यावर आधीचे आठ दिवस सुद्धा मंतरलेले असतात.  एक वेगळाच जल्लोष, टाळाच्या ठोक्यात म्हटल्या जाणाऱ्या आरत्या, ढोल ताशांचा गजर याचसोबत ऐकू येणार ती आपल्या बाप्पाची गाणी..       

        आज आपण अशीच काही गाणी बघणार आहोत. जी मराठी चित्रपटांमध्ये खास गणपती बाप्पा वर चित्रित केली गेलेली आहेत आणि ती ऐकल्याशिवाय दरवर्षीचा गणेशोत्सव साजरा होतच नाही.

This image has an empty alt attribute; its file name is Ganesh-Festival-in-Marathi-movies-1024x1024.jpg
Ganesh Festival in Marathi movies

 ) अष्टविनायका तुझा महिमा कसा….

वर्ष : १९७९   कालावधी : १३ मिनिटे २ सेकंद 
चित्रपट         : अष्टविनायक
गायक           : अनुराधा पौडवाल, जयवंत कुलकर्णी , चंद्रशेखर गाडगीळ, शरद जांभेकर, मल्लेश
संगीतकार    : अनिल – अरूण
कलाकार      : सचिन पिळगावकर, वंदना पंडीत, अशोक सराफ, उषा चव्हाण, रविंद्र महाजनी, आशा काळे , सुधीर दळवी, जयश्री गडकर

         या गाण्याबद्दल काय बोलावं.? प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात एक वेगळी जागा असलेलं हे गाणं १९७९ साली प्रदर्शित झालेल्या “अष्टविनायक” या चित्रपटातील आहे. हे गाणं आलं आणि त्याने एक इतिहास घडवला. जगदीश खेबुडकर यांच्या लेखणीतून अवतरलेल्या या गाण्याला संगीतबद्ध केले होते ते अनिल – अरूण यांनी. अनुराधा पौडवाल, जयवंत कुलकर्णी , चंद्रशेखर गाडगीळ तसेच शरद जांभेकर व मल्लेश इतक्या गायकांनी हे गाणं गायलं होतं.

      आपल्या आजारी पत्नीच्या हट्टामुळे तीचा पती(सचिन पिळगावकर) अष्टविनायकांच्या दर्शनाला तिला घेऊन जातो. त्यावरच संपूर्ण गाणं चित्रित झालेलं आहे. गाण्यात अशोक सराफ, उषा चव्हाण, रविंद्र महाजनी, आशा काळे , सुधीर दळवी, जयश्री गडकर अशा बऱ्याच कलाकारांची पाहुणे कलाकार म्हणून वर्णी लागलेली आहे.

         गणपती बाप्पा विराजमान व्हायच्या आधीच काही दिवस हे गाणं आजुबाजुला वाजत असतं. अष्टविनायकाचा महिमा आणि त्यांचं दर्शन हे गाणं नुसतं बघून आणि ऐकून आपल्याला मिळतं. मोरेगावचा मोरेश्वर, थेऊरचा चिंतामणी, सिद्धटेक चा सिद्धिविनायक , रांजणगावचा महागणपती, ओझरचा विघ्नेश्वर, लेण्याद्री चा गिरिजात्मक , महड गावचा वरदविनायक आणि पालीचा बल्लाळेश्वर या अष्टविनायकांची महती आणि माहीती या गाण्यातून आपल्याला मिळते. अतिशय सुंदर, गोड अशा शब्दांत हे गाणं खेबुडकरांनी शब्दबद्ध केलं आहे.

 ) मोरया मोरया

वर्ष : २००८   कालावधी :  ५ मिनिटे ५८ सेकंद 
चित्रपट          : उलाढाल 
गायक           : अजय गोगावले
संगीतकार    : अजय – अतुल
कलाकार      : मकरंद अनासपुरे 

          हे देवा तुझ्या दारी आलो गुणगान गाया

          तुझ्याविना माणसाचा जन्म जाई वाया….

          हे देवा दिली हाक उद्धार कराया

          आभाळाची छाया तुझी समिंदराची माया….

          मोरया.. मोरया.. मोरया…मोरया….

        हे गाणं नुसतं ऐकलं तरी अंगात एक वेगळंच स्फुरण चढतं. बाप्पा विषयी वाटणाऱ्या प्रेमाने मन भरून येतं. २००८ साली प्रदर्शित झालेल्या “उलाढाल” या चित्रपटातील हे गाणं असून अजय अतुल यांच्या सारख्या अतिशय ताकदीच्या संगीतकारांनी ते संगीतबद्ध केलंय. रसिकांनी डोक्यावर घेतलेलं हे गाणं स्वतः अजय गोगावले यांनी गायलं आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे हे गाणं सुद्धा जगदीश खेबुडकर यांनीच लिहिलेलं आहे.

        अजय अतुल म्हटलं की संगीतक्षेत्रातील एक प्रसिद्ध जोडी. त्यांच्या संगीताची एक वेगळी जादू असते. आणि या गाण्याची जादू तर १२-१४ वर्षांनंतर सुद्धा तशीच आहे. २००८ नंतर तर पुढची काही वर्षे अगदी आताआतापर्यंत सुद्धा शाळा, कॉलेज मध्ये कलागुण प्रदर्शनाच्या कार्यक्रमात या गाण्याच्या नृत्याने होणारी सुरूवात ही ठरलेली. सार्वजनिक गणेशोत्सव आणि स्पीकर वर मोठं मोठ्या आवाजात ऐकू येणारं हे गाणं, हे खास समीकरण. 

 ) प्रथम तुला वंदितो

वर्ष : १९७९  कालावधी : ४ मिनिटे ३० सेकंद 
चित्रपट         : अष्टविनायक
गायक           : वसंतराव देशपांडे, अनुराधा पौडवाल
संगीतकार    : अनिल – अरूण
कलाकार      : वंदना पंडीत

          महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या विघ्नहर्ता बाप्पाची आठवण, आराधना कोणत्याही कामात सगळ्यात आधी असते. 

          प्रथम तुला वंदितो…कृपाळा…

          गजानना गणराया… 

          प्रथम तुला वंदितो…..

   हे गाण्याशिवाय गणपती बाप्पाचं आगमन अपूर्णच. प्रत्येक घरात ऐकू येणारं हे हमखास असं गाणं. 

      सचिन पिळगावकर आणि वंदना पंडीत यांची ‌प्रमुख भूमिका असलेल्या “अष्टविनायक” या मराठी चित्रपटातील हे गाणं १९७९ सालातील असलं तरी आजही तेवढंच लोकप्रिय आहे. अनिल – अरूण यांनी या गाण्याला जादूमय संगीत देऊन हे गाणं अजरामर केलं आहे.

       वसंतराव देशपांडे आणि अनुराधा पौडवाल ज्यांना सुरांचा वरदहस्त रभला आहे त्यांच्या आवाजात असलेल्या या गाण्याचं वेगळं स्थान निर्माण झालं आहे. 

 ) या रे या, सारे या…गजाननाला आळवूया….

वर्ष : २०१६   कालावधी : ३ मिनिटे ४ सेकंद 
चित्रपट         : व्हेंटिलेटर
गायक           : रोहन प्रधान
संगीतकार    : रोहन – रोहन
कलाकार      : 

      गाण्याचे बोलच सारं काही सांगून जातात. आपल्यावर संकट ओढवलं की गणपती बाप्पा ची आठवण आल्याशिवाय राहत नाही. हे गाणं सुद्धा एका मराठी चित्रपटात अशाच एका प्रसंगावर आधारित आहे. आजारी व्यक्तीसाठी घरातील सगळेजण गजाननाला आळवत आहेत.  

        २०१६ साली प्रदर्शित झालेल्या  “व्हेंटिलेटर” या मराठी चित्रपटातील हे गाणं रोहन – रोहन यांनी संगीतबद्ध केलं असून रोहन प्रधान यांनी गायलं आहे. 

       गुणगान तुझे ओठांवर राहू दे…चरणी तुझ्या हे जीवन वाहू दे…

      नाथांचा नाथ तू, मायेची हाक तू….भक्तीचा नाद तू, माऊली तुझी दया…..या रे या…

हे इतके सुंदर अर्थपूर्ण बोल लिहिले आहेत मनोज यादव आणि शांताराम म्हापूसकर यांनी.

 

 ) सूर निरागस हो

वर्ष : २०१५    कालावधी : ४ मिनिटे ४५ सेकंद 
चित्रपट         : कट्यार काळजात घुसली
गायक           : शंकर महादेवन, आनंदी जोशी 
संगीतकार    : शंकर – एहसान – लॉय
कलाकार      : शंकर महादेवन

       सूरसुमनानी भरली ओंजळ

       नित्य रिती व्हावी चरणावर..

       तान्हे बालक सुमधुर हासे

       भाव तसे वाहो सूरातुन……

      मंगेश कांगणे यांच्या कल्पनाशक्तीला दाद दिली पाहिजे. त्यांनी लिहिलेलं हे इतकं सुंदर गाणं संगीतबद्ध केलं आहे शंकर – एहसान – लॉय या तिघांनी आणि गायलं आहे सुरांचा बादशहा शंकर महादेवन यांनी आणि जोडीला आनंदी जोशी. 

     या गाण्याची गंमत म्हणजे शंकर महादेवन यांनी “कट्यार काळजात घुसली” या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच अभिनय केला आहे आणि त्यात सुद्धा त्यांनी विशेष छाप पाडली. खरं तर या चित्रपटातील सगळीच गाणी सुंदर आहेत. पण गणपतीची आराधना करणारे हे गाणं रसिकांना जास्त भावलं. घरात गणपती बाप्पा विराजमान असताना एखाद्या कोपऱ्यात हे गाणं हळू आवाजात चालू असेल तर तेव्हा एक वेगळीच अनुभूती येते.

 )  मोरया

वर्ष :  २०११  कालावधी : ३ मिनिटे ५५ सेकंद 
चित्रपट          : मोरया
गायक           :  अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर, ज्ञानेश्वर मेश्राम
संगीतकार    : अवधूत गुप्ते
कलाकार      : संतोष जुवेकर, चिन्मय मांडलेकर

      तूच माझी आई देवा

      तूच माझा बाप

      गोड मानुनी घे सेवा

      पोटी घाल पाप

        किती खोल अर्थ. २०११ साली प्रदर्शित झालेल्या “मोरया” या चित्रपटातील हे गाणं ऐकून अक्षरशः अंगावर शहारा येतो. संतोष जुवेकर आणि चिन्मय मांडलेकर यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर आणि ज्ञानेश्वर मेश्राम यांनी एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं आहे. 

       चुकलेल्या कोकरा या वाट दाखवाया

       घ्यावा पुन्हा अवतार बाप्पा मोरया…

या गाण्यात काहीतरी वेगळं आहे, खास आहे. हे गाणं ऐकताना डोळ्यात पाणी येतं. जीव व्याकूळ होतो.  

       कधी घडविसी पापे हातून कधी घडविसी पुण्य

       का खेळीसी खेळ असा हा सारे अगम्य

       तारू माझे पैलतीरी पार कराया….

कसे सुचले असतील हे शब्द. किती आतून आलं असेल हे गाणं. पण आपलं दुर्दैव असं की इतक सुंदर गाणं लिहिणारा मात्र अनामिक आहे. 

         गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणूकीत हे गाणं वाजलं नाही असं होत नाही. 

७ मोरया मोरया

वर्ष : २०१७   कालावधी :  ३ मिनिटे २५ सेकंद 
चित्रपट         : दगडी चाळ
गायक           : आदर्श शिंदे
संगीतकार    : अमितराज
कलाकार      : अंकुश चौधरी

        २०१७ साली प्रदर्शित झालेल्या दगडी चाळ या चित्रपटातील हे गाणं. अंकुश चौधरी याच्यावर चित्रित करण्यात आलेलं हे गाणं आताच्या तरूणाईला विशेष आवडलेलं आणि भावलेलं गाणं. आदर्श शिंदे यांनी हे भारदस्त आवाजात हे गाणं गायलं असून या गाण्याला पूर्ण न्याय दिला आहे. मंदार चोळकर यांनी शब्दबद्ध केलेलं हे गाणं अमितराज यांनी संगीतबद्ध केलेलं आहे. 

        आम्हावर राहो तुझी कृपा सावली

        तूच बाप, बंधू सखा

        तूच माउली

        नाव घेते भेटी साठी, तुझी लेकरे

        तुझ्या पायी ठेऊन माथा, एक मागणे

खरचं,‌बाप्पाची कृपादृष्टी सदा आपल्यावर राहो हेच प्रत्येक भक्ताला वाटत असतं आणि हेच या गाण्यातून बाप्पाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. 

        हल्ली सार्वजनिक गणेशोत्सव खुप जल्लोषात साजरा करताना आपण बघतो. आणि मग चित्रपटात पण गणेशोत्सव साजरा करणारं एखादं गाणं असेल तर ते विशेष गाजतं.

 ) गजानना गजानना

वर्ष : २०१५   कालावधी : 2 मिनिटे 10 सेकंद 
चित्रपट         : लोकमान्य एक युगपुरुष
गायक           : शंकर महादेवन
संगीतकार    : समीर म्हात्रे, अजित परब
कलाकार      : सुबोध भावे 

         स्वातंत्र्य चळवळीला चालना देण्यासाठी पर्यायाने हिंदूंना एकत्र आणण्यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला प्रोत्साहन दिले आणि खऱ्या अर्थाने सार्वजनिक गणेशोत्सवाचे ते प्रणेते ठरले. याच टिळकांच्या आयुष्यावर आधारित असलेला “लोकमान्य – एक युगपुरुष” हा चित्रपट २०१५ साली प्रदर्शित झाला होता. आता या चित्रपटात गणेशोत्सव साजरा करताना दाखवणारे एखादे गाणे नसेल तर नवलच. 

        सुबोध भावे यांनी हुबेहूब पडद्यावर साकारलेले लोकमान्य यांच्यावर चित्रित झालेले “गजानना गजानना” हे गाणं शंकर महादेवन यांनी गायलं आहे. शंकर महादेवन यांनी आतापर्यंत बाप्पा वर असलेली बरीच गाणी गायली आहेत आणि ती गाजली आहेत. त्यापैकी च हे एक. 

       गीतकार गुरू ठाकूर आणि अजित परब यांनी लिहिलेल्या या गाण्याला संगीतबद्ध केलंय समीर म्हात्रे आणि अजित परब यांनी. 

 ) हे लंबोदर गजमुख मेरे मोरया

वर्ष : २०११   कालावधी :  मिनिटे  सेकंद 
चित्रपट         : मोरया
गायक           : अवधूत गुप्ते, फरीद साबरी
संगीतकार    : अवधूत गुप्ते
कलाकार      : संतोष जुवेकर, चिन्मय मांडलेकर, सुबोध भावे, अवधूत गुप्ते 

        गणपती बाप्पा म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचं लाडकं दैवत. प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात हक्काचं स्थान असलेला हा विघ्नहर्ता नेहमीच सगळ्यांसाठी धावून येतो. मग फक्त तो मराठी माणसावरचं आपली कृपादृष्टी ठेवतो असं नाही तसंच या बाप्पाचे भक्तगण पण फक्त मराठीच असायला हवे असं ही काही नाही. 

     हेच आपल्याला ही कव्वाली ऐकताना जाणवतं. २०११ साली प्रदर्शित झालेल्या अवधूत गुप्ते दिग्दर्शित “मोरया” या चित्रपटातील कव्वाली खास बाप्पासाठी आहे. संदीप खरे यांनी लिहिलेली ही कव्वाली गायली आहे फरीद साबरी आणि अवधूत गुप्ते यांनी. संगीतबद्ध केलं आहे अर्थात अवधूत गुप्ते यांनीचं. या कव्वाली मध्ये सुबोध भावे यांना एका मौलवीच्या रूपात पाहूण्या कलाकाराच्या भूमिकेत बघायलाच मिळतं. 

          हे लंबोदर गजमुख मेरे मोरया

          मेरे मालिक मेरे मौला मोरया

          कैसे तेरे गुण को गाऊँ….

          तुज बीन अब तो रह नहीं पाऊँ

          रूप सलोना दिखला मेरे मोरया….

भाषा कोणतीही असो बाप्पाची ही कव्वाली ऐकताना ती तेव्हढीच जवळची आणि मंत्रमुग्ध करणारी आहे. 

१० अरे एक नंबर बाप्पा माझा, एक नंबर फॅन मी त्याचा

वर्ष : २०२२  कालावधी :  मिनिटे  सेकंद 
चित्रपट         : मन कस्तुरी रे
गायक           : देव नेगी
संगीतकार    : शोर
कलाकार      : अभिनय बेर्डे, तेजस्वी प्रकाश

      हे गाणं कदाचित तुम्हाला माहित नसेल कारण ते दोन तीन दिवसांपूर्वी च रिलीज झालेलं आहे. अभिनय बेर्डे याची प्रमुख भूमिका असलेला मन कस्तुरी रे हा चित्रपट ४ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. 

         आता जोरात वाजू दे बाजा,

         आला सर्वांच्या दिलाचा राजा…

     असं म्हणतं अभिनय ने धमाकेदार डान्स केला आहे. या गणेशोत्सवात हे गाणं दुमदुमणार हे नक्की. 

      अरे एक नंबर बाप्पा माझा,

      एक नंबर फॅन मी त्याचा…

असं अभिनय बेर्डे या गाण्यात म्हणतोय खरं पण या भावना आपल्या सगळ्यांच्या आहेत. बाप्पा आपला लाडका आहेच पण आपण सुद्धा बाप्पाचे लाडके असायला हवेत असं प्रत्येकाला वाटतं. देव नेगी यांनी गायलेलं हे गाणं यावर्षी गणेशोत्सवात सगळ्यांना थिरकायला लावणार यात शंका नाही. “शोर” यांनी हे गाणं साध्या सोप्या शब्दांत लिहून ते संगीतबद्ध केलं आहे. अभिनय बेर्डे आणि तेजस्वी प्रकाश यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं बरंच व्हायरल होताना दिसतंय. 

     तर मंडळी तुम्हाला हा लेख कसा वाटला ते नक्की सांगा. गाणी वाजवा पण त्याचा इतरांना त्रास होणार नाही हे ही बघा. आणि हो, ‘जगभरून फिल्म्स ‘ तर्फे गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!!

धन्यवाद.

लेखक – आकांक्षा कोलते

Akanksha 20Kolte 20bio

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *