HomeFilmsHindi

जानेवारी २०२४ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी

Written by : आकांक्षा कोलते

Updated : फेब्रुवारी 11, 2024 | 4:22 PM

खरं तर आता वेबसिरीज चा जमाना असल्यामुळे प्रेक्षकांच्या चित्रपटांच्या बाबतीत अपेक्षा वाढल्या आहेत. त्यातही नवीन आलेल्या चित्रपटांमध्ये ओरिजनल कंटेट कमीच असतो. बरेच चित्रपट हे रिमेक असतात. त्यामुळे चित्रपटगृहात प्रेक्षकांना खेचून आणणं हे आता निर्माते आणि दिग्दर्शक यांच्यापुढे नवीन आव्हान आहे. आता प्रेक्षकांच्या चित्रपटांच्या बाबतीत असलेल्या अपेक्षा पूर्ण होतायत की नाही हे आमच्या परीने सांगण्याचा प्रयत्न या लेखात आम्ही करणार आहोत.
२०२४ या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारी महिन्यात अवघे चार चित्रपट प्रदर्शित झाले. आता ते बघण्यासारखे आहेत की नाही ते सांगण्याचा प्रयत्न या लेखात आज आम्ही करणार आहोत.

Hindi films released in jan 2024 and films review and information
१. तौबा तेरा जलवा
२०२४, विनोदी, प्रणय. ३ तास १० मिनिटे. [ यु / ए ]
लेखक आकाशादित्य लामा
दिग्दर्शकआकाशादित्य लामा
कलाकारअमीषा पटेल, जतिन खुराना,राजेश शर्मा, नीरज सूद, अनिल रस्तोगी, एहसान खान एंजेला क्रिस्लिनजकी
निर्मातामदन लाल खुराना, नरेश बंसल
प्रदर्शित तारीख५ जानेवारी २०२४
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.३⭐/ ५

तौबा तेरा जलवा” चित्रपट समीक्षा :-

असं म्हणतात की नवीन वर्ष सुरू झाल्यावर पहिल्या शुक्रवारी बरेचसे निर्माते हे आपला चित्रपट प्रदर्शित करणं टाळतात कारण तो चित्रपट फारसा चालत असा समज आहे. हा समज खरा असो किंवा नसो परंतु ५ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित झालेला तौबा तेरा जलवा हा चित्रपट कोणत्याही दिवशी प्रदर्शित केला असता तरी तो आपटलाच असता.
“तौबा तेरा जलवा” हा चित्रपट बघून तौबा मेरा कसूर म्हणायची वेळ येते. एक अतिशय सुमार दर्जाचं कथानक, तेवढंच सुमार दिग्दर्शन आणि तेवढाच सुमार अभिनय असं कॉम्बिनेशन असलेल्या या चित्रपटात सुरूवातीपासून शेवटपर्यंत बघण्यासारखं काहीही नाही.
उत्तर प्रदेशातील एका धनाढ्य व्यावसायिकाच्या आयुष्यात अचानक दोघांची एन्ट्री होते आणि त्याच्या आयुष्यात काय काय होतं याभोवती ई कथा फिरते. रोमी त्यागी हा एक यशस्वी रियल इस्टेट व्यवसाय करणारा व्यावसायिक असून त्याचे मोठमोठ्या लोकांशी संबंध असतात. त्याचं स्वतःचं एक साम्राज्य असतं. तो आणि त्याची पत्नी रिंकू हे सुखात राहत असतात परंतु अचानक त्यांच्या आयुष्यात प्रोफेसर सय्यद आणि लैला हे दोघं येतात. आणि रोमीच्या आयुष्यात वादळ येतं. परिणामी काही दिवसांतच रोमीला तुरुंगात जावं लागतं.
आता हे दोघं कोण असतात.? रोमी जेल मध्ये का जातो.? त्यातून तो बाहेर येतो का वैगरे हे सगळं बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल. परंतु आमचं ऐकाल तर वेळ वाया जाऊ नये असं वाटत असेल तर चित्रपट न बघितलेला बरा.
गदर २ च्या भरघोस यशानंतर लैला ची भुमिका साकारणारी अमिषा पटेल इथे मात्र घोर निराशा करते. चित्रपटाचं दिग्दर्शन, स्क्रीन प्ले, अभिनय, पार्श्वसंगीत, जेल असलेला सेट, लोकेशन सगळं फसलय म्हणायला हरकत नाही. माझ्याकडून या चित्रपटाला एक स्टार.


२. मेरी ख्रिसमस
२०२४. रोमांचक, नाटक. २ तास २४ मिनिटे. [ यु / ए ]
लेखक श्रीराम राघवन, पूजा लढा सुरती,अरिजित बिस्वास, अनुकृति पांडे
दिग्दर्शकश्रीराम राघवन
कलाकारकैटरीना कैफ, विजय सेतुपति, विनय पाठक, प्रतिमा कन्नन, टीनू आनंद, अश्विनी काळसेकर, संजय कपूर, परी माहेश्वरी शर्मा
निर्मातारमेश तौरानी,संजय राउतराय, केवल गर्ग
प्रदर्शित तारीख१२ जानेवारी २०२४
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.९⭐/ ५

मेरी ख्रिसमस” चित्रपट समीक्षा :-

श्रीराम राघवन दिग्दर्शित मेरी ख्रिसमस या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना ख्रिसमस चं लेट पण एक सुंदर सरप्राइज मिळालंय असं म्हणायला हरकत नाही. १२ जानेवारी रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.
हा एक सस्पेन्स थ्रिलर चित्रपट असून फार काही मसाला नसला तरीही संपूर्ण वेळ तुम्हाला खिळवून ठेवण्यात हा चित्रपट यशस्वी ठरतो. विजय सेतुपती आणि आपली कैटरीना कैफ या दोघांना एकत्र काम करताना बघून तुम्ही नक्कीच अचंबित व्हाल. सुरूवातीला कितीही शंका वाटली तरी त्यांची केमिस्ट्री उत्तम जुळून आली आहे.
हि फक्त एका रात्रीत घडणारी गोष्ट आहे परंतु दिग्दर्शक श्रीराम राघवन यांनी ज्याप्रकारे ती सादर केली आहे त्याला तोड नाही. कैटरीना ने या वेळी अभिनयाच्या बाबतीत षटकार लगावला आहे. चित्रपटाची कथा एका फ्रेंच कादंबरी वर आधारित आहे.
हा तो काळ आहे जेव्हा मोबाईल नव्हते. आत्ता सारखं फेसबुक आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म नव्हते. आताची मुंबई तेव्हा बॉम्बे होती, हा तो काळ आहे. ख्रिसमस ची रात्र असते. अल्बर्ट म्हणजेच विजय सेतुपती हा बऱ्याच वर्षांनी आपल्या शहरात आलेला आहे. आणि मारिया म्हणजे कैटरीना आपल्या मुलीला घेऊन बाहेर फिरायला गेलेली आहे. अल्बर्ट आणि मारिया यांची चुकुन भेट होते. अल्बर्ट चा भुतकाळ त्याला त्रास देतोय तर मारिया चा वर्तमान. याच दोन गोष्टींमुळे या दोन अनोळखी असलेल्या व्यक्ती एकमेकांच्या जवळ येतात. परंतु अचानक एक मर्डर मिस्ट्री दोघांच्या मधे येते आणि खरा चित्रपट सुरू होतो. या कथेबद्ददल अजून काही सांगितलं तरी तो स्पॉयलर ठरेल. त्यामुळे इतकंच सांगू शकतो तुमच्या बुद्धीला आव्हान देत ही कथा पुढे सरकत राहते.
आता त्या दोघांना भेटलेली डेड बॉडी कोणाची असते? या दोघांचा त्याच्याशी काही संबंध असतो का.? या प्रश्नांची उत्तरं चित्रपटातच मिळतील. तुम्हाला मर्डर मिस्ट्री, सस्पेन्स थ्रिलर असे चित्रपट आवडत असतील तर हा चित्रपट लवकर बघा. विजय आणि कैटरीना यांचा अभिनय तर उत्तम आहेच पण त्याचबरोबर राधिका आपटे, विनय पाठक या सहकलाकारांचा अभिनय सुद्धा छान आहे. चित्रपटाचं संगीत छान आहे. दिग्दर्शन उत्तम. परंतु चित्रपटाचा आत्मा असलेली चित्रपटाची कथा ही सगळ्यात जास्त अप्रतिम आहे. जरूर बघावा असा हा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला साडेतीन स्टार.


३. मैं अटल हूं
२०२४, जीवनचरित्र, नाटक. २ तास १९ मिनिटे. [ यु / ए ]
लेखक रवि जाधव, ऋषि विरमानी
दिग्दर्शकरवि जाधव
कलाकारपंकज त्रिपाठी, एकता कौल, पीयूष मिश्रा, पायल नायर, दया शंकर पांडे,प्रमोद पाठक, पॉला मैकग्लिन
निर्माताविनोद भानुशाली
प्रदर्शित तारीख१९ जानेवारी २०२४
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३⭐/ ५

मैं अटल हूं” चित्रपट समीक्षा :-

आता तुम्हाला हे सांगायला नकोच की हा चित्रपट कशावर आधारित आहे. अर्थातच भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. परंतु तुम्हाला जर असं वाटत असेल की त्यांचा फक्त राजकीय प्रवास यात दाखवला असेल तर तो तुमचा गैरसमज आहे. एक कवी, राजकारणी आणि एक उत्तम व्यक्तीमत्व म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांच्याबद्दल काही लिहायचं आणि तेसुद्धा त्यांच्या बायोपिक साठी चित्रपटाची कथा लिहिणं म्हणजे शिवधनुष्य उचलण्या सारखं आहे. आणि हे शिवधनुष्य रवी जाधव आणि ऋषी विरमाणी यांनी लिलया उचललं आहे.
अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म हा भारत स्वतंत्र होण्यापूर्वी झाल्यामुळे अर्थातच त्यांना स्वातंत्र्य मिळाल्याची जाणीव आणि राष्ट्रासाठी काहीतरी केलं पाहिजे हि ओढ नसानसात होती. त्यांचं बालपण, तारुण्य ते त्यांचा प्रधानमंत्री होण्यापर्यंत चा प्रवास या चित्रपटात पहायला मिळतोच परंतु त्याचसोबत त्यांच्या प्रेमाची एक नाजूक बाजू सुद्धा या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना पहायला मिळते. त्यांच्या आयुष्यात आलेलं प्रेम, ते मिळवण्यासाठी केलेली धडपड हे अर्थातच कोणाला माहीत नाही. अशा अनेक माहिती नसलेल्या गोष्टी या चित्रपटात दाखवण्यात आल्या आहेत.
आणि अर्थातच त्यांच्या राजकीय भुमिका, बाबरी मशीद प्रकरण, पोखरण अणुबॉम्ब चाचणी सारख्या ज्या महत्वाच्या ऐतिहासिक घटनांमध्ये त्यांचा असणारा सहभाग, कारगिल मध्ये घुसू बघणाऱ्या पाकिस्तान ला धडा शिकवणं हे सगळं एका वेगळ्या प्रकारे या चित्रपटात पहायला मिळतं. त्यामुळे एका राजकीय नेत्याचा बायोपिक असुनही तो तेवढ्याच रंजक पद्धतीने मांडण्यात लेखक दिग्दर्शक यशस्वी झाले आहेत.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अटलबिहारी वाजपेयी सारख्या नेतृत्वाची भुमिका साकारणं हे जिकिरीचं काम. परंतु यात सुद्धा पंकज त्रिपाठी यांची केलेली निवड सार्थ ठरते. पंकज त्रिपाठी हा एक कसलेला अभिनेता आहे हे त्याने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. संपूर्ण चित्रपटात ज्या पद्धतीने हा कलाकार अटल बिहारी वाजपेयी म्हणून वावरत आहे ते केवळ प्रशंसनीय आहे. इतर सहकलाकारांचा अभिनय सुद्धा उत्तम आहे.
एक राजकीय प्रवास असलेला कोणताही चित्रपट किंवा कलाकृती बनवणं हे फार जबाबदारीचं काम असतं. काही उलटसुलट झालं की सगळीच गणितं फसतात परंतु दिग्दर्शक रवी जाधव यांनी कोणतीच चुक न करता हा एक फक्त राजकीय प्रवास न दाखवता एक उत्तम आत्मचरित्र पडद्यावर उलगडून दाखवलं आहे. तर लवकरात तिकिट काढून टाका आणि चित्रपट बघून या. माझ्याकडून या चित्रपटाला साडेतीन स्टार.


४. फायटर
२०२४, ॲक्शन, नाटक, रोमांचक. २ तास ४७ मिनिटे. [ यु / ए ]
लेखक सिद्धार्थ आनंद,रमन छिब,हुसैन दलाल, अब्बास दलाल,विश्वपति सरकार
दिग्दर्शकसिद्धार्थ आनंद
कलाकारऋतिक रोशन,दीपिका पादुकोण, अनिल कपूर, करण सिंह ग्रोवर,अक्षय ओबेरॉय, ऋषभ साहनी
निर्मातासिद्धार्थ आनंद, ममता आनंद, ज्योती देशपांडे, अजित अंधारे, अंकू पांडे, रमण छिब्ब, केविन वाझ
प्रदर्शित तारीख२५ जानेवारी २०२४
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.९⭐/ ५

फायटर” चित्रपट समीक्षा :-

आजपर्यंत देशभक्तीपर असे बरेच चित्रपट प्रदर्शित होऊन ते सुपरहिट सुद्धा झाले आहेत. फायटर सुद्धा तसाच एक चित्रपट आहे. परंतु या चित्रपटाचं वेगळेपण म्हणजे हा एक एरियल ॲक्शन चित्रपट आहे. हा पहिलाच असा चित्रपट आहे. भारतीय हवाई दल कसं काम करतं किंवा हवाई दल हे भारताचं रक्षण कसं करतं हे या चित्रपटात पहायला मिळतं.
पुलवामा हल्ल्यात आपले ४० जवान शहीद झाले होते. त्याचच प्रतिउत्तर देण्यासाठी त्या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर जे हवाई हल्ले केले त्यावर आधारित हा चित्रपट आहे. पुलवामा हल्ला हा पाकिस्तानी आतंकवादी अजहर अख्तर याने केला होता आता त्याला पकडण्यासाठी भारताच्या स्पेशल फोर्स टास्कने एक मिशन प्लॅन केलं आहे. या हवाई हल्ल्याची जबाबदारी ग्रुप कॅप्टन रॉकी म्हणजे अनिल कपूर याच्यावर आहे. त्याच्यासोबत त्याच्या टिम मध्ये पॅटी म्हणजे ऋतिक रोशन, मिनल राठोड म्हणजे दिपिका पादुकोण, ताज म्हणजे करण सिंग ग्रोवर, बशीर खान म्हणजे अक्षय ओबेरॉय हे असतात. आता हि टिम आपल्या देशावर झालेल्या हल्ल्याचा कसा बदला घेते हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
चित्रपटातील हवाई हल्ल्याची दृश्यं, व्हिज्युअल इफेक्ट्स, फायटर प्लेन हे सगळं बघताना अजिबात नकली वाटत नाही. एकंदर तांत्रिकदृष्ट्या हा एक परिपूर्ण चित्रपट आहे. ऋतिक रोशन याने पुन्हा एकदा अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अनिल कपूर आणि दीपिका सुद्धा कसोटीत खरे उतरले आहेत. चित्रपटाची कथा सुद्धा सुंदररित्या लिहिण्यात आणि पडद्यावर मांडण्यात आली आहे. “दुनिया में मिल जाएगे आशिक कईं, पर वतन से हसीन सनम नहीं होता, हीरो में, सोने से लिपट कर मरते कई होंगे, तिरंगे से हसीन कफ़न नहीं होता” हृतिक रोशनचा हा डायलॉग ऐकून आपण भारतीय असल्याचा अभिमान वाटतो.
मधे मधे काही ठिकाणी चित्रपट थोडा संथ वाटतो परंतु क्लायमॅक्स इतका सुपर आहे की छोट्या मोठ्या चुकांकडे तुम्ही दुर्लक्ष करू शकता. परंतु एकदा बघायला हवा असा हा चित्रपट नक्कीच आहे. माझ्याकडून या चित्रपटाला साडेतीन स्टार.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *