जानेवारी २०२४ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी
जानेवारी २०२४ मध्ये प्रदर्शित झालेले हे मराठी चित्रपट तुम्ही पाहिलेत का.?
Written by : Akanksha Kolte
Updated : फेब्रुवारी 18, 2024 | 05:05 PM
खरं तर आता वेबसिरीज चा जमाना असल्यामुळे प्रेक्षकांच्या चित्रपटांच्या बाबतीत अपेक्षा वाढल्या आहेत. त्यातही नवीन आलेल्या चित्रपटांमध्ये ओरिजनल कंटेट कमीच असतो. परंतु आशयघन आणि दर्जेदार कथानक हा मराठी चित्रपटांचा गाभा आहे. मराठी चित्रपट हे नेहमीच वास्तववादी आणि चांगला कंटेंट घेऊन भेटीला येतात हे आता प्रेक्षकांच्या लक्षात येत आहे. त्यामुळे मराठी चित्रपटांना प्रेक्षक आता भरभरून प्रतिसाद देतात.
२०२४ या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारी महिन्यात कोणते चित्रपट प्रदर्शित झाले तेच आज आपण या लेखात बघणार आहोत.

१. पंचक |
लेखक | राहुल आवटे, जयंत जठार |
दिग्दर्शक | राहुल आवटे, जयंत जठार |
कलाकार | दिलिप प्रभावळकर, सतिष आळेकर, भारती आचरेकर,आदिनाथ कोठारे, आनंद इंगळे, तेजश्री प्रधान, दीप्ती देवी, नंदिता पाटकर, संपदा जोगळेकर कुलकर्णी, सागर तळशीकर, आशिष कुलकर्णी, आरती वडगबाळकर, गणेश मयेकर |
निर्माता | माधुरी दीक्षित, श्रीराम नेने |
प्रदर्शित तारीख | ५ जानेवारी २०२४ |
भाषा | मराठी |
“पंचक” चित्रपट समीक्षा :-
धकधक गर्ल माधुरी दीक्षित नेने हिने निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आपला पहिला वहीला चित्रपट प्रदर्शित केला तो म्हणजे मराठी चित्रपट “पंचक”. त्यामुळे या चित्रपटाची बरीच चर्चा होतीच. तर बघुया हा चित्रपट कसा आहे.
या चित्रपटाची कथा ही नयनरम्य कोकणातील एका वाड्यात घडतेय. रूढी परंपरा, श्रद्धा, बऱ्यापैकी अंधश्रद्धा, चालीरीती पाळणारं हे घर खोतांचं असतं. परंतु याच घरातील अनंतराव हे मात्र कोणत्याही चालीरीती, जुन्या परंपरा यांच्या विरोधात असतात. अचानक याच अनंतराव यांचा मृत्यू होतो. ज्या कालावधीत एकाचा मृत्यू झाला की त्या पाठोपाठ घरातील इतर पाच सदस्यांचा मृत्यू होतो अशा पंचक कालावधीत हा मृत्यू झाल्यामुळे घरात आता भितीचं वातावरण पसरतं. आता पुढचा नंबर कोणाचा.? आणि आपला तो नंबर येऊ नये यासाठी चाललेली प्रत्येकाची केविलवाणी धडपड, प्रयत्न हे सगळं खुप विनोदी पद्धतीने दाखवलं आहे. कोकणातील गोड अशा मालवणी भाषेत हा चित्रपट बघणं ही एक वेगळीच मेजवानी आहे.
कलाकारांची बरीच मोठी फौज असलेला हा एक विनोदी चित्रपट असून प्रेक्षकांचं मनोरंजन नक्कीच करतो. दिलीप प्रभावळकर यांची अनंतराव ही छोटी पण महत्वपूर्ण भूमिका इतकी छोटी काही चुटपुट लागून राहते. त्यांचं आणि कोकणाचं विशेष नातं आहे असं वाटतं. संपूर्ण चित्रपटात कोकणातील सौंदर्य, हिरवीगार झाडं, कौलारू घरं, मालवणी भाषा हे सगळं चित्रपटाची जमेची बाजू आहे.
चित्रपटाचा विषय अंधश्रद्धे्र उजेड टाकणारा असला तरी चित्रपटाची मांडणी विनोदी पद्धतीने केल्यामुळे बघताना मजा येते. दिग्दर्शक राहुल आवटे आणि जयंत जठार यांनी उत्म दिग्दर्शन केले आहे. सगळ्याच कलाकारांनी अभिनय उत्तम केला आहे. मंगेश धाकडे यांचं संगीत सुद्धा छान साजेस आहे. चित्रपटाची कथा, पटकथा संवाद छान आहेत परंतु मध्यांतरा नंतर चित्रपट थोडा रेंगाळतो. परंतु एकंदर चित्रपट मनोरंजन करणारा आहे. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.
२. सत्यशोधक |
लेखक | निलेश जळमकर |
दिग्दर्शक | निलेश जळमकर |
कलाकार | संदीप कुलकर्णी, राजश्री देशपांडे, रवींद्र मंकणी, अमोल बावडेकर, अनिकेत केळकर |
निर्माता | प्रवीण तायडे, आप्पा बोराटे, भीमराव पट्टेबहादूर, सुनील शेळके, विशाल वाहूस्वाय |
प्रदर्शित तारीख | ५ जानेवारी २०२४ |
भाषा | मराठी |
“सत्यशोधक” चित्रपट समीक्षा :-
सत्यशोधक या नावावरून लक्षात आलंच असेल की चित्रपट कशावर आधारित आहे. अर्थातच स्त्री शिक्षणाचा पाया रचलेल्या महान व्यक्तीचं आयुष्य उलगडून दाखवणारा हा चित्रपट म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर आधारित आहे. महात्मा फुले म्हटलं की स्त्रीयांना शिक्षणाची दारं उघडी करून दिली आणि स्त्रियांसाठी पहिली शाळा सुरू केली हे इतकच आपल्याला आठवतं. परंतु महात्मा ज्योतिबा फुले यांचं जीवनकार्य अतिशय व्यापक होतं. तत्कालीन समाजात समाजसुधारक म्हणून त्यांनी केलेल्या कार्याचा आढावा या चित्रपटात घेतला आहे.
चित्रपटाच्या सुरुवातीलाच ज्योती आणि सावित्री या दोघांचा बालविवाह होताना दाखवला आहे. शाळा शिकण्याच्या वयात लग्न झाल्यावर दोघंही पती पत्नी या नात्यापेक्षा मैत्रीचं नातं आधी रूजवतात. ज्योतीबा हे मिशनरी शाळेत शिकत असल्यामुळे बाहेरच्या जगात जातपातीचं किती मोठं अवडंबर माजवलं जातंय याची कल्पना नव्हती. परंतु जेव्हा त्यांना शाळेबाहेर आपण शुद्र जातीचे आहोत याची जाणीव करून दिली जाते तेव्हापासून खऱ्या अर्थाने ते पेटून उठतात. ही जातीयता नष्ट करण्यासाठी शिक्षणापेक्षा अजून दुसरा चांगला मार्ग असू शकत नाही आणि त्यादृष्टीने त्यांचं कार्य सुरू करतात.
फक्त शिक्षणच नव्हे तर महिला सक्षमीकरण, विधवा पुनर्विवाह, देवदासी प्रथेविरूद्ध आवाज उठवणं, समाजाकडून आणि घरातीलच पुरूषांकडून शोषण होणाऱ्या विधवा महिलांसाठी काम करणं अशी बरीच समाजसुधारक कार्य ते करताना दिसतात आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभी असलेली अर्थातच सावित्री आपल्याला दिसते.
ज्योतीबा यांची भूमिका साकारणारे संदीप कुलकर्णी आणि सावित्री बाईंच्या भुमिकेतील राजश्री देशपांडे यांनी त्यांच्या भुमिकेला योग्य न्याय दिला आहे. दोघांचाही अभिनय हा उत्तम आहे. स्वतःचं आयुष्य समाजातील तळागाळातील लोकांसाठी खर्ची घातलेल्या या महान जोडीचं कार्य मोठ्या पडद्यावर मांडणं हे खरं तर एक आव्हान आहे. आणि लेखक दिग्दर्शक निलेश जळमकर यांनी ते उत्कृष्टरित्या पार पाडलं आहे. माझ्याकडून या चित्रपटाला साडेतीन स्टार.
३. ओले आले |
लेखक | विपुल मेहता |
दिग्दर्शक | विपुल मेहता |
कलाकार | नाना पाटेकर, सिद्धार्थ चांदेकर, मकरंद अनासपुरे, सायली संजीव, तन्वी आझमी |
निर्माता | रश्मीन मजिठीया |
प्रदर्शित तारीख | ५ जानेवारी २०२४ |
भाषा | मराठी |
“ओले आले” चित्रपट समीक्षा :-
अलिकडेच बीभत्स, हिंसक ॲनिमल चित्रपटात बापलेकाचं नातं अधोरेखित करणारी गोष्ट दाखवण्यात आली आणि ती कशी होती हे तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेलच. परंतु तुम्हाला खरंच जर बाप आणि मुलाच्या नात्याची वीण घट्ट करणारा एक हळुवार सुखद अनुभव देणारा चित्रपट बघायचा असेल तर “ओले आले” हा चित्रपट तुमच्यासाठी आहे.
बाप मुलाची गोष्ट सांगता सांगता लेखक दिग्दर्शक विपुल मेहता यांनी दोन पिढ्यांमधील अंतर आणि जगण्याचा दृष्टीकोन दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. जगातील प्रत्येक देशात आपला व्यवसाय असावा आणि त्यासाठी “ स्वतःसाठी जगणं” सोडून दिवसरात्र मेहनत करणारा मुलगा म्हणजेच आदित्य लेले (सिद्धार्थ चांदेकर)तर आपल्या मुलाने भरभरून आयुष्य जगावं, आनंद साजरा करावा. बाप म्हणून आपल्याला वेळ द्यावा यासाठी प्रयत्न करणारा एक बाप म्हणजेच ओमकार लेले (नाना पाटेकर) या दोघांच्या नात्याचा प्रवास या चित्रपटात पहायला मिळतो.
एक हलकीफुलकी कथा जी तुमचं नक्की मनोरंजन करेल. चित्रपटात उत्तम लोकेशन्स आणि उत्तम सिनेमॅटोग्राफी असल्यामुळे चित्रपट बघताना छान वाटतं. सगळ्याच कलाकारांचा अभिनय छान आहे. नाना पाटेकर यांचा अभिनय नेहमीप्रमाणे उत्तम. परंतु मकरंद अनासपुरे आणि सायली संजीव यांच्या वाट्याला छोट्या भूमिका आल्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाल्यासारखं वाटतं. त्यांना अजुन जास्त स्क्रीन वर बघायला आवडलं असतं. एकंदर एकदा बघायला हवा असा हा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.
४. खुर्ची |
लेखक | संतोष कुसुम हगवणे |
दिग्दर्शक | शिव धर्मराज माने, संतोष कुसुम हगवणे |
कलाकार | आर्यन हगवणे, अक्षय वाघमारे, राकेश बापट, प्रितम कागणे, श्रेया पासळकर, महेश घाग |
निर्माता | संतोष कुसुम हगवणे, योगिता गवळी, प्रदिप नागर |
प्रदर्शित तारीख | १२ जानेवारी २०२४ |
भाषा | मराठी |
“खुर्ची” चित्रपट समीक्षा :-
चित्रपटाच्या नावावरून लक्षात आलंच असेल की चित्रपटात काय बघायला मिळेल. अर्थातच राजकारण आणि खुर्ची साठी चालणारी चढाओढ हेच या चित्रपटात पहायला मिळतं. १२ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला मुळात फार शोज मिळाले नाही. या दिवशी एकमेव हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला तरीही फार कमी ठिकाणी याला स्क्रीन मिळाल्या.
चित्रपटाची कथा राजवीर या मुलाभोवती फिरणारी आहे. लहानपणापासूनच गुंड प्रवृत्तीच्या असलेल्या राजवीरचा खुर्ची साठी केलेला संघर्ष आणि विजय यावर ही कथा आधारित आहे. अतिशय रटाळ आणि कंटाळवाणी पटकथा त्यात सुमार दर्जाचं दिग्दर्शन, कलाकारांचा अभिनय सुद्धा ठिकठाक म्हणावा असाच. चित्रपटातील काही ॲक्शन सीन्स सोडले तर चित्रपटात बघण्यासारखं काहीही नाही. मनोरंजन करण्यात यशस्वी सोडाच परंतु शेवटपर्यंत तो बघावा इतकी सुद्धा इच्छा होत नाही. यावरूनच लक्षात आलं असेल चित्रपट कसा असेल.
चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट बघावा असं मी अजिबातच सांगणार नाही. माझ्याकडून या चित्रपटाला एक स्टार.
५. सूर लागू दे |
लेखक | आशिष देव |
दिग्दर्शक | प्रवीण विजया एकनाथ बिर्जे |
कलाकार | विक्रम गोखले, सुहासिनी मुळये, रीना मधुकर, आशिष नेवाळकर, मेघना नायडू |
निर्माता | अभिषेक किंग कुमार, नितीन उपाध्याय |
प्रदर्शित तारीख | १२ जानेवारी २०२४ |
भाषा | मराठी |
“सूर लागू दे” चित्रपट समीक्षा :-
मराठीतील जेष्ठ आणि ताकदीचे अभिनेते विक्रम गोखले यांचा शेवटचा चित्रपट “सूर लागू दे” हा रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्यांनी शेवटचं काम केलं. सूर लागू दे हा एक कौटुंबिक, भावना प्रधान चित्रपट आहे.
ज्या वयात निवांत आराम करायचा त्या वयात या वृद्ध जोडप्याकडे आपल्या नातवंडांना सांभाळण्याची जबाबदारी आली आहे. आपला मुलगा आणि सून यांचा बॉम्बस्फोटात मृत्यू झाल्यामुळे नातवंडे सांभाळून घर चालवणं अवघड असतानाच त्यांना कळतं की त्यांच्या नातवाला ब्लड कॅन्सर आहे.
त्याच्या उपचारासाठी चालणारी धडपड, बोगस समाजसेवी संस्थांकडून होणारी फसवणूक, डॉक्टर , हॉस्पिटलमध्ये होणारी लूट, सरकारी योजनांच्या नावाखाली पदरी पडणारी निराशा, आर्थिक परिस्थितीमुळे खचलेले असतानाच कुठूनही न मिळणारी मदत या सगळ्यात हे इजी आजोबा कशी जिद्द मनाशी बाळगून लढतात, त्याची ही गोष्ट आहे.
आशिष देव यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे. तर दिग्दर्शन प्रवीण बिर्जे यांनी केले आहे. चित्रपट बघताना थोडं जुन्या काळातील कथा आहे असं वाटतं. आजच्या काळात घडणारी ही कथा असली तरी तिची मांडणी, संदर्भ जुन्या काळातील वाटतात. विक्रम गोखले यांच्यासारखे दिग्गज आणि अनुभवी कलाकार असून दिग्दर्शनामुळे कुठं तरी हा चित्रपट मागे पडल्यासारखा वाटतो. काही प्रसंग, गोष्टी अर्धवट सोडल्यासारख्या वाटतात. संगीत सुद्धा तेवढं प्रभावी नाही. एकंदर विषय आणि कलाकार सोडल्यास बाकी सगळ्या गोष्टी ठिकठाक म्हणाव्या लागतील. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.
६. ८ दोन ७५ |
लेखक | शर्वाणी पिल्लई, सुश्रुत भागवत |
दिग्दर्शक | सुश्रुत भागवत |
कलाकार | शुभंकर तावडे, संस्कृती बालगुडे, संजय मोने, आनंद इंगळे, पुष्कर श्रोत्री, शर्वाणी पिल्लई |
निर्माता | विकास हांडे, लोकेश मांगडे, सुधीर कोलते |
प्रदर्शित तारीख | १९ जानेवारी २०२४ |
भाषा | मराठी |
“८ दोन ७५” चित्रपट समीक्षा :-
१९ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित झालेला “८ दोन ७५” हा चित्रपट सुश्रुत भागवत यांनी दिग्दर्शित केलेला असून शर्वाणी पिल्ले आणि सुश्रुत भागवत यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे. तर संजय मोने यांनी या चित्रपटाचे संवादलेखन केले आहे.
हा चित्रपट देहदान सारख्या महत्वाच्या विषयावर संदेश देणारा आहे. या आधी अशा प्रकारच्या विषयावर चित्रपट कधी बनवला गेला नव्हता. परंतु जेवढा हवा तेवढ्या समर्थपणे तो मांडता आला नाही असं वाटतं.
अमोल मोघे म्हणजे शुभंकर तावडे आणि कविता म्हणजे संस्कृती बालगुडे यांची मेडिकल कॉलेज मध्ये घडणारी प्रेमकथा दाखवता दाखवता चित्रपट अशा टप्प्यावर येऊन पोहचतो जिथं मरणा नंतर देहदान करणे किती आवश्यक आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. या मेडिकल कॉलेज मध्ये मेडिकल विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी एक शव(मृत शरीर)असणं गरजेचं असतं. परंतु तेच नसल्यामुळे विद्यार्थ्यांकडून संप वैगरे करणे असले प्रकार चालू होतात. अशा सगळ्या पटकथा मिळून चित्रपट गुंफला गेला आहे.
चित्रपटाचा विषय, कथा चांगली आहे परंतु दिग्दर्शन कमी पडलं म्हणायला हरकत नाही. आनंद इंगळे, संजय मोने, शुभंकर तावडे यांचा अभिनय चांगला आहे. पार्श्वसंगीत सुद्धा ठिकठाक आहे. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.
७. आईच्या गावात मराठी बोल |
लेखक | ओमी वैद्य, अमृता हर्डीकर |
दिग्दर्शक | ओमी वैद्य |
कलाकार | ओमी वैद्य, संस्कृती बालगुडे |
निर्माता | स्वप्नील कोरे, शार्दुल मोहिते |
प्रदर्शित तारीख | १९ जानेवारी २०२४ |
भाषा | मराठी |
“आईच्या गावात मराठी बोल” चित्रपट समीक्षा :-
ओमी वैद्य लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटाची बरीच चर्चा आणि प्रमोशन चालू होतं. परंतु त्याचा फारसा उपयोग झालेला दिसत नाही. १९ जानेवारी रोजी प्रदर्शित झालेला हा एक विनोदी चित्रपट आहे.
वडिलोपार्जित संपत्ती मिळवण्यासाठी एका तरूणाने केलेली धमाल या चित्रपटात बघायला मिळते. ओमी वैद्य याने या चित्रपटाच्या निमित्ताने तिहेरी भूमिका साकारली आहे. चित्रपटाची कथा सुद्धा ओमी याने लिहीली आहे. आणि अर्थातच दिग्दर्शन आणि मुख्य भूमिका सुद्धा त्यानेच साकारली आहे.
अमेरिकेत राहणारा एक तरूण वडिलांच्या मृत्यूनंतर भारतात आला आहे. आणि वडिलांच्या मृत्यूपत्रानुसार जर त्याने महिनाभरात एक मराठी मुलीशी लग्न केले तरच त्याला त्यांची संपत्ती मिळणार असते. परंतु जिथं मराठी बोलण्याचे वांदे तिथं लग्न करायला मुलगी कशी शोधायची हा प्रश्न आता त्याच्यासमोर आहे. आणि याचसाठी तो करत असलेला खटाटोप म्हणजे ह चित्रपट. आता त्याला मुलगी मिळते का.? लग्न होतं का.? संपत्ती मिळते का.? हे सगळं बघण्यासाठी अर्थातच चित्रपट बघावा लागेल.
काही ठिकाणी मराठी न बोलता आल्यामुळे झालेले विनोद कंटाळवाणे वाटतात. दिग्दर्शन सुद्धा ठिकठाक आहे. परंतु एक बरा विनोदी असलेला हा चित्रपट एकदा बघायला हरकत नाही. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.
८. सापळा |
लेखक | श्रीनिवास भणगे |
दिग्दर्शक | निखिल लांजेकर |
कलाकार | समीर धर्माधिकारी, चिन्मय मांडलेकर, नेहा जोशी, दिप्ती केतकर |
निर्माता | दिग्पाल लांजेकर, प्रज्ञोत पेंढारकर |
प्रदर्शित तारीख | २६ जानेवारी २०२४ |
भाषा | मराठी |
“सापळा” चित्रपट समीक्षा :-
२६ जानेवारी रोजी प्रदर्शित झालेला सापळा हा चित्रपट सस्पेन्स थ्रिलर प्रकारचा असून याचं दिग्दर्शन निखिल लांजेकर यांनी केले आहे. भयकथा, गुढकथा यावर आधारित असे चित्रपट नेहमीच येत असतात. असाच सापळा हा देखील एका गुढकथे वर आधारित चित्रपट आहे.
उदय रोहेकर(समीर धर्माधिकारी) हा एक चित्रपट लेखक, दिग्दर्शक असतो परंतु सतत सगळे चित्रपट अयशस्वी झाल्यामुळे तो आता विचित्र मनस्थितीत असतो. विचित्र वागत असतो. त्यात त्याची पत्नी ही सुद्धा आजारी असते. त्यांच्या घरात त्यांची एक काम करणारी कौसल्या म्हणजेच नेहा जोशी ही देखील असते. जिचं एक रहस्य उदयला माहीत असतं. चित्रपटाची कथा ही या एका बंगल्यातच घडताना बघायला मिळते.
एके दिवशी उदयला भेटायला एक लेखक दिपक(चिन्मय मांडलेकर) एक गुढकथा घेऊन येतो. ती ऐकवत असतानाच उदयच्या पत्नीचा मृत्यू होतो. आता तो कसा होतो.? कौसल्या चं रहस्य काय असतं.? या सगळ्याभोवती ही कथा फिरते. चित्रपटाच्या शेवटी अर्थातच तुम्ही विचार करणार नाही असं रहस्य समोर येतं. आत ते काय हे बघायला चित्रपट बघावा लागेल.
समीर धर्माधिकारी, चिन्मय मांडलेकर नेहा जोशी यांच्यासारखे कसलेले कलाकार असताना देखील चित्रपट तेवढा रंजक वाटत नाही. पटकथा आणि दिग्दर्शन कुठेतरी कमी पडल्याचं जाणवतं. पण तुम्हाला गुढकथा, रहस्यमय भयकथा वैगरे आवडत असतील तर हा चित्रपट एकदा बघायला हरकत नाही. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.
९. नवरदेव बीएससी ॲग्री |
लेखक | राम खाटमोडे |
दिग्दर्शक | राम खाटमोडे |
कलाकार | क्षितीश दाते, प्रियदर्शनी इंदलकर, मकरंद अनासपुरे, गार्गी फुले, प्रविण तरडे |
निर्माता | मिलिंद लडगे |
प्रदर्शित तारीख | २७ जानेवारी २०२४ |
भाषा | मराठी |
“नवरदेव बीएससी ॲग्री” चित्रपट समीक्षा :-
आजकाल शेतकरी मुलांची लग्न ठरवताना किती आणि काय काय अडचणी येतात हे सगळ्यांनाच माहीत आहे. खायला, जगायला भाजीपाला हवा पण ते पिकवणारा नवरा मात्र शेतकरी नको अशी परिस्थिती आहे.
गावात राहून शेती करणाऱ्या मुलांची लग्नं वर्षानुवर्षे रखडतात ही कटू सत्य परिस्थिती आहे. याच धर्तीवर आधारित नवरदेव बीएससी ॲग्री हा चित्रपट २७ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित झाला.
राजा म्हणजे क्षितिश दाते हा बीएससी ॲग्री ही पदवी घेऊन आपल्या गावात परततो. तो तिथेच राहून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करायची व गावातील सगळ्याच शेतकऱ्यांना आपल्या शिक्षणाचा उपयोग झाला पाहिजे या उद्देशाने गावात येतो. परंतु जेव्हा त्याचं लग्न ठरवण्याची वेळ येते तेव्हा मात्र खूप अडचणी येतात.
त्याला आवडलेल्या मुलीचं म्हणजे सुकन्याचं (प्रियदर्शनी इंदलकर)लग्न हे तिच्या आईला पोलिस इन्स्पेक्टर महादेव (हार्दिक जोशी)याच्यासोबत लावून द्यायचं असतं कारण तिला शेतकरी जावई नकोय. आता हेच चित्रपटात बघायचं आहे की सुकन्या कोणासोबत लग्न करते.
हा चित्रपट प्रत्येकाने यासाठी जरूर बघावा की आपल्या महाराष्ट्रात शेतकरी मुलांच्या विशेषतः शिकलेल्या परंतु गावात स्थायिक होऊ इच्छित मुलांच्या काय समस्या आहेत. शेतकरी आई वडिलांची काय मानसिकता असते. हा चित्रपट फक्त शेतकऱ्यांनी बघावा असं नसून तो प्रत्येक मराठी माणसाने बघायला हवा. काही तांत्रिक गोष्टी सोडल्या तर चित्रपट चांगला झाला आहे. दिग्दर्शन अजून चांगल्या प्रकारे करता आलं असतं. संगीत, पार्श्वसंगीत सिनेमॅटोग्राफी या सगळ्या गोष्टी ठिकठाक आहेत. एकंदर एकदा बघायला हरकत नाही असा हा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.
तर मंडळी गेल्या महिन्यात तुम्ही यातील कोणकोणते चित्रपट पाहिले ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा.