HomeFilmsHindi

जानेवारी 2025 मध्ये रिलीझ झालेल्या हिंदी चित्रपटांची यादी आणि त्यांची समीक्षा

जानेवारी 2025 मध्ये रिलीझ झालेल्या हिंदी चित्रपटांची यादी आणि त्यांची समीक्षा | List of Hindi movies released in January 2025 and their reviews

Written by : आकांक्षा कोलते

Updated : मार्च 9, 2025 | 11:30 PM

जानेवारी २०२५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेले हे हिंदी चित्रपट तुम्ही पाहीलेत का?

खरं तर आता वेबसिरीज चा जमाना असल्यामुळे प्रेक्षकांच्या चित्रपटांच्या बाबतीत अपेक्षा वाढल्या आहेत. त्यातही नवीन आलेल्या चित्रपटांमध्ये ओरिजनल कंटेट कमीच असतो. बरेच चित्रपट हे रिमेक असतात. त्यामुळे चित्रपटगृहात प्रेक्षकांना खेचून आणणं हे आता निर्माते आणि दिग्दर्शक यांच्यापुढे नवीन आव्हान आहे. आता प्रेक्षकांच्या चित्रपटांच्या बाबतीत असलेल्या अपेक्षा पूर्ण होतायत की नाही हे आमच्या परीने सांगण्याचा प्रयत्न या लेखात आम्ही करणार आहोत.

 आज या लेखात जानेवारी २०२५ महिन्यात प्रदर्शित झालेले चित्रपट कोणते आहेत आणि बघायला हवेत की नको याबद्दल आमचं मत सांगणार आहोत. 
List of Hindi Movies released in January 2024 & Movie review and information

१. द रॅबिट हाऊस (The Rabbit House)
२०२५. थ्रिलर, ड्रामा. २ तास १५ मिनिटे. [U/A]
लेखक वैभव कुलकर्णी
दिग्दर्शकवैभव कुलकर्णी
कलाकारपद्मानभ गायकवाड़, करिश्मा, अमित रियान
निर्मातासुनिता पांढारे, कृष्णा पांढारे
रिलीज तारीख३ जानेवारी २०२५
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.५⭐/ ५

द रॅबिट हाऊस” चित्रपट समीक्षा :-

३ जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शित झालेला द रॅबिट हाऊस हा चित्रपट सस्पेन्स थ्रिलर अशा धाटणीचा आहे. कौटुंबिक हिंसाचार हा मुख्य गाभा असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन वैभव कुलकर्णी यांनी केलं आहे. या चित्रपटाची कथा यांनी लिहिलेली आहे.
हल्ली प्रेक्षकांना सस्पेन्स असलेले थ्रिलर चित्रपट बघायला जास्त आवडतात. हा चित्रपट अशाच धर्तीवर बनवण्यात आलेला आहे. चित्रपटाची कथा एका नवीन लग्न झालेल्या जोडप्याभोवती फिरणारी आहे. श्रीकांत (अमित रियान) आणि कोमल (करिश्मा) हे दोघं लग्नानंतर पहिल्यांदाच फिरायला म्हणून हिमाचल प्रदेशमध्ये गेलेले असतात. तिथे ते एका आगळ्यावेगळ्या जरा विचित्र अशा होम स्टे असलेल्या घरात रहायला असतात. घर विचित्र म्हणजे त्या घराला जवळपास १६ दरवाजे असतात तरीही घरात एकदा गेलं की बाहेर कुठून पडावं हा गोंधळ उडतो. त्यात श्रीकांत हा ओसिडी या आजाराने त्रस्त असतोच परंतु तो जरा सनकी असतो. लग्न झाल्यावर अगदी काही दिवसांतच कोमलला श्रीकांतचं भयानक रूप दिसायला सुरुवात होते. अंगावर धावून जाणे, जोरात आरडाओरडा करणे, सगळं स्वतःच्या मनाप्रमाणे व्हायला हवं असा हट्ट असणे अशा या विचित्र स्वभावाला कोमल घाबरून जाते. कथेमध्ये ट्विस्ट असा येतो की एकदा असंच रागाच्या भरात श्रीकांत कोमलला एका टेकडीवरून धक्का देतो आणि तेव्हापासून कोमल गायब होते. आणि इथुनच खरी कथा सुरू होते. आता कोमलचा तिकडे पडून मृत्यू होतो की अजून काही हे कळत नाही कारण तिचा मृतदेह सापडत नाही.
कोमलला शोधण्यासाठी मग पोलिसांचं पाचारण होतं. शोध सुरू होतो आणि या सगळ्या दरम्यान त्या रहस्यमयी घरातून अनेक रहस्यं बाहेर पडतात. आता ती रहस्यं काय.? कोमल सापडते का.? तिला गायब करण्यात अजून कोणाचा हात आहे का.? हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
चित्रपटाचं फारसं प्रमोशन झालेलं नाही त्यामुळे या चित्रपटाला फारसा प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला नाही. परंतु एकदा बघायला हरकत नाही. कलाकार नवीन असले तरीही अभिनय चांगला आहे. दिग्दर्शन सुद्धा चांगलं आहे. लोकेशन्स उत्तम आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्म वर आल्यावर नक्की बघू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.


२. फतेह (Fateh)
२०२५. ॲक्शन, थ्रिलर, गुन्हेगारी. २ तास ७ मिनिटे. [A]
लेखक सोनू सूद, अंकुर पजनी
दिग्दर्शकसोनू सूद
कलाकारसोनू सूद, जॅकलीन फर्नांडीस, नसीरुद्दीन शाह, विजय राज, शिव ज्योति राजपूत, प्रकाश बेलवाडी, दिब्येंदु भट्टाचार्य
निर्मातासोनाली सूद, उमेश बन्सल
रिलीज तारीख१० जानेवारी २०२५
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.५⭐/ ५

फतेह” चित्रपट समीक्षा :-

कोरोना काळात गरीबांचा मसिहा म्हणून प्रसिद्ध झालेला सोनू सूद याने फतेह या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केलेलं आहे. आजकाल वाढत असलेल्या सायबर क्राईम संबंधित अनेक बातम्या आपण बघतो. दैनंदिन आयुष्यात मोबाईलचा वाढता वापर, सोशल मीडिया,डिजिटल वस्तूंचा वापर या सगळ्यामुळे सायबर गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ होतेय. याच धर्तीवर बनवण्यात आलेला फतेह हा चित्रपट एक चांगला संदेश देणारा व भविष्यातील संकटांची चाहूल देणारा चित्रपट आहे.
चित्रपटाची कथा पंजाब मधील मोगा या गावात राहणाऱ्या फतेह(सोनू सूद) भोवती फिरणारी आहे . इथेही सोनू सूद म्हणजे फतेह हा गावातील लोकांसाठी मसिहाच असतो. एक डेअरी फार्म चालवणाऱ्या फतेहसाठी संपूर्ण गाव हेच त्याचं कुटुंब असतं. पूर्वी स्पेशल फोर्स मध्ये एक कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून काम केलेला फतेह आता सुद्धा गावातील लोकांसाठी लढायला तयार असतो. अशातच गावात एक लोकांना फसवणूक करणारी आणि त्यांचे पैसे बुडवणारा मोठा सायबर स्कॅम ची घटना घडते. दरम्यान त्याच गावातील घटनेशी संबंधित एक निम्रत नावाची मुलगी गायब होते. आणि इथुनच खरी कथा सुरू होते. त्या मुलीला शोधण्यासाठी फतेह शहरात पोहचतो परंतु तिथे त्याला बराच मोठा सामना करावा लागतो. या सगळ्यात त्याला सायबर हॅकर खुशी(जॅकलीन फर्नांडीस)ही मदत करते. आता फतेह निम्रतला शोधून काढण्यात यशस्वी होतो का.? सगळ्या गुन्ह्यांमध्ये कोणाचा हात असतो.? हे पाहण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
सोनू सूद याचा दिग्दर्शनातील हा प्रयत्न चांगला आहे. हा चित्रपट बघताना ॲनिमल चित्रपटातील हिंसाचार जास्त की या चित्रपटात जास्त अशी तुलना करावी असे ॲक्शन सीन्स यात सुद्धा आहेत. सायबर क्राईम या महत्त्वाच्या विषयावर आधारित चित्रपट बनवण्याचा एक चांगला प्रयत्न सोनू सूद यांनी केला आहे. ज्यांना मारपीट, ॲक्शन सीन्स असं बघायला आवडतं त्यांना हा चित्रपट आवडेल. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.


३. संतोष (Santosh)
२०२५. थ्रिलर, गुन्हेगारी, ड्रामा. २ तास ८ मिनिटे. [R]
लेखक संध्या सूरी
दिग्दर्शकसंध्या सूरी
कलाकारशहाना गोस्‍वामी, सुनीता राजवर
निर्मातामाइक गुडरीज, जेम्स बॉशर, बल्थाझर, ऍलन मॅक ॲलेक्स
रिलीज तारीख१० जानेवारी २०२५
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.०⭐/ ५

संतोष” चित्रपट समीक्षा :-

संतोष हा चित्रपट संध्या सूरी यांनी दिग्दर्शित केलेला असून शहाना गोस्वामी यांनी या चित्रपटातील संतोष ही मध्यवर्ती भूमिका साकारलेली आहे. ग्रामीण भागातील दलितांना आजही कोणत्या गोष्टींना तोंड द्यावं लागतं. किंवा एकंदरीतच दलित समाजातील लोकांसोबत जर एखादा गुन्हा घडला असेल तर त्याभोवती समाज, शासकीय यंत्रणा आणि राजकारण या गोष्टी कशा पद्धतीने फिरतात आणि त्याचा काय परिणाम होतो हे या चित्रपटात बघायला मिळतं.
तरूण वयात वैधव्य आल्यावर पतीच्या जागी पोलिस कॉन्स्टेबल म्हणून रूजू झालेल्या संतोष सैनी हीची ही गोष्ट आहे. मुळात आजपर्यंत चुल सांभाळणारी, कधीच घराबाहेर न पडणरी संतोष हीच्या आयुष्यात पतीचा मृत्यू हे अचानक एवढं मोठं वादळ येतं. त्यात तिला पोलिस कॉन्स्टेबल या नोकरीसाठी घराबाहेर पडावं लागतं. या सगळ्याने आधीच गोंधळलेल्या संतोष समोर खरं आव्हान तेव्हा येतं जेव्हा तिला एका दलित मुलीच्या खुनाचा तपास करण्याची जबाबदारी सोपविण्यात येते. त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे या सगळ्यात तिला गीता(सुनिता राजवर) या तिच्यापेक्षा अनुभवाने वरीष्ठ अशा अधिकारीची मदत मिळते. दोघीही या खुनाचा तपास करू शकतील का.? स्त्रीत्वाचा संघर्ष करणाऱ्या संतोषला या सगळ्यात यश मिळतं का.? हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल. चित्रपटात सुनिता राजवर यांचा एक डायलॉग आहे, “ संतोष इस देश में दो तरह के अछूत होते हैं| एक वोह जिने कोई छूना नही चाहता और दुसरा जिन्हे कोई छू नही सकता|” हा डायलॉग हेच या चित्रपटाचं सार आहे. चित्रपट नक्कीच बघावा असा आहे. या चित्रपटाची निवड २०२५ च्या ऑस्कर पुरस्कार नामांकनासाठी झाली आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म वर आल्यावर एकदा बघायला हरकत नाही असा हा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.


४. मॅच फिक्सिंग (Match Fixing)
२०२५. थ्रिलर, ड्रामा, पॉलिटिकल. २ तास २६ मिनिटे. [U/A]
लेखक अनुज एस मेहता, समीर गरुड़
दिग्दर्शककेदार प्रभाकर गायकवाड
कलाकारविनीत कुमार सिंह, अनुजा साठे, मनोज जोशी, किशोर कदम, शताफ फिगार, ललित परिमू, एलेना टुटेजा, राज अर्जुन
निर्मातापल्लवी गुर्जर
रिलीज तारीख१० जानेवारी २०२५
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.०⭐/ ५

मॅच फिक्सिंग” चित्रपट समीक्षा :-

मॅच फिक्सिंग म्हटल्यावर आठवतं ते फक्त क्रिकेट. परंतु फिक्सिंग हे बऱ्याच ठिकाणी केलं जातं. अगदी चित्रपटसृष्टी पासून राजकारणापर्यंत सगळीकडे हे फिक्सिंग चं प्रकरण चालतं. असंच राजकीय पक्ष आणि त्याअंतर्गत चालणारं फिक्सिंग अशा धर्तीवर हा चित्रपट बनवण्यात आलेला आहे. खरं तर हा एक धाडसी प्रयोग करण्याचा प्रयत्न दिग्दर्शक केदार गायकवाड यांनी केला आहे जो काही अंशी फसलेला आहे. निवृत्त आर्मी इंटेलिजेन्स ऑफिसर कर्नल कंवर खटाना यांच ‘द गेम बिहाइंड सॅफरॉन टेरर’ वर आधारित या चित्रपटाची कथा आहे.
२००८ साली मालेगाव येथे झालेला बॉम्बस्फोट ते २६/११ ला झालेला दहशतवादी हल्ला असेल सगळ्या घटनांचा आधार घेत चित्रपटाची कथा पटकथा लिहिली गेली आहे. तत्कालीन सरकारने दहशतवादाचा आधार घेऊन किंबहुना त्याचं राजकारण करून हिंदू मुस्लिम फुट पाडून मतांचा खेळ कसा मांडला किंवा मतदारांचं कसे फिक्सिंग केले गेले हे या चित्रपटात पहायला मिळतं.
लेफ्टनंट कर्नल अविनाश पटवर्धन यांना मालेगाव स्फोट प्रकरणात अडकवण्यासाठी एका उच्च स्तरीय कॅबिनेट मंत्र्याने पाकिस्तानी सरकारशी हातमिळवणी करून कसा प्लान केला होता हे सुद्धा या चित्रपटात पहायला मिळतं. इतकंच नव्हे तर तत्कालीन एटीएसचे प्रमुख किशोर कर्माकर (किशोर कदम) यांनी कर्नल अविनाश पटवर्धन कशा प्रकारे अत्याचार केले आणि २६/११ दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता असलेल्या पुराव्यांची फाईलला कशी केराची टोपली दाखवली हे सुद्धा दाखवलं आहे परिणामी या हल्ल्यात काय काय झालं हे दाखवलं आहे.
अर्थात हे सगळं काल्पनिक आहे असंच हा चित्रपट सांगतो परंतु त्यामागील उद्देश काय हे जाणण्या इतके सगळे सुज्ञ असतात. अभिनयाच्या बाबतीत म्हणाल तर विनित कुमार याने उत्तम अभिनय केला आहे. चित्रपटाची कथा, विषय चांगला आहे परंतु पटकथा भरकटलेली आणि तुकड्या तुकड्यात जोडलेली वाटते. दिग्दर्शन ठिकठाक आहे. संगीत नावाला आहे ते पण ठिकठाक. एकंदर फसलेला चित्रपट आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म वर आल्यावर एकदा बघायला हरकत नाही. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार.


५. इमरजन्सी (Emergency)
२०२५. इतिहास, ड्रामा. २ तास २७ मिनिटे. [U/A]
लेखक कंगना राणावत, रितेश शाह, तनवी केसरी पसुमर्थी
दिग्दर्शककंगना राणावत
कलाकारकंगना राणावत, अनुपम खेर, सतीश कौशिक, श्रेयस तळपदे, मिलिंद सोमण, महिमा चौधरी, अरमेंद्र शर्मा
निर्माताकंगना राणावत, उमेश कुमार बंसल , रेणु पिट्टी
रिलीज तारीख१७ जानेवारी २०२५
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.७⭐/ ५

इमरजन्सी” चित्रपट समीक्षा :-

गेली काही वर्षे चर्चेत असलेला कंगणा राणावत हीचा इमरजन्सी हा चित्रपट शेवटी २०२५ रोजी प्रदर्शित झाला असून या चित्रपटाची कथा लिहिण्यापासून ते निर्मिती पर्यंत सर्व जबाबदारी कंगणा हीनेच घेतली आहे. अगदी दिग्दर्शन सुद्धा स्वतःच केलेलं असून मुख्य भूमिका सुद्धा कंगणाने स्वतः साकारली आहे. अर्थात हा चित्रपट भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आयुष्यावर आधारित असल्यामुळे या चित्रपटाकडे बऱ्याच जणांचं लक्ष लागून होतं. बऱ्याच जणांचा हा पूर्वग्रह होता की कंगणाची निर्मिती म्हणजे इंदिरा गांधी यांची नकारात्मक बाजू दाखवणारा राजकीय अंजेडा असलेला हा चित्रपट असावा. परंतु तसं नसून इंदिरा गांधी यांचं एकुणच आयुष्य उलगडण्यासोबत त्यांचं बालपण, पंतप्रधान होणं, त्यांनी देशासाठी घेतलेल्या महत्त्वाचे निर्णय, त्याचे परिणाम या सगळ्यावरच हा सिनेमा बेतलेला आहे.
देशात आणीबाणी लागू करून जनतेचा रोष ओढवून घेण्यापासून ते भारत पाक युद्ध किंवा फ्रान्स, अमेरिका, लंडनच्या राष्ट्राध्यक्षांना भारताची पावर दाखवून देण्यापर्यंतचा सगळे महत्वाचे क्षण या चित्रपटात पहायला मिळतात. काही ठिकाणी घरगुती कलह, गैरसमज, त्यांच्या मनाची घालमेल अशी भावनिक बाजू सुद्धा दिसते. एकंदरच इंदिरा गांधी यांचा आयुष्यपट उलगडून दाखवणारा हा चित्रपट आहे.
सॅम माणिकशॉ यांच्या भुमिकेत बऱ्याच दिवसांनी मिलिंद सोमण बघायला मिळतात. जयप्रकाश नारायण ही भूमिका श्रेयस तळपदे याने उत्तम साकारली आहे. इतरही सगळ्याच कलाकारांनी अभिनयाच्या बाबतीत चोख कामगिरी बजावली आहे. स्वतः कंगणाने सुद्धा इंदिरा गांधी या भुमिकेसाठी बरीच मेहनत घेतलेली दिसते. दिग्दर्शन सुद्धा चांगलं आहे. फक्त इमरजन्सी हे नाव वाचून आपण वेगळं काहीतरी बघायला मिळेल अशी अपेक्षा ठेवतो. परंतु एकंदर इंदिरा गांधी यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट एकदा तरी बघावा असा नक्कीच आहे. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.


६. आझाद (Azaad)
२०२५. ॲक्शन, ड्रामा. २ तास २५ मिनिटे. [U/A]
लेखक रितेश शाह, सुरेश नाय, अभिषेक कपूर, चंदन अरोड़ा
दिग्दर्शकअभिषेक कपूर
कलाकारअजय देवगन, अमन देवगन, राशा थडानी, डायना पेंटी, मोहित मलिक, पीयूष मिश्रा
निर्मातारॉनी स्क्रूवाला, प्रज्ञा कपूर
रिलीज तारीख१७ जानेवारी २०२५
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.०⭐/ ५

आझाद” चित्रपट समीक्षा :-

फरहान अख्तर, सुशांत सिंग राजपूत आणि सारा अली खान नंतर आता अमन देवगन आणि राशा थडानी या दोघांना बॉलिवूडचे दरवाजे उघडे करून देण्याचं काम दिग्दर्शक अभिषेक कपूर यांनी केला आहे. परंतु अमन आणि राशा यांना त्यांच्या अभिनयाची जादू दाखवण्यासाठी स्क्रिप्ट तशी दमदार मिळाली नाही हे नक्की.
चित्रपटाची कथा स्वातंत्र्यपूर्व काळातील आहे. साधारण १९२० चा काळ दाखवला आहे. भूसर नावाच्या एका गावात इंग्रज सरकार आणि तिथला सावकार मिळून गोरगरिबांना छळत असतात. त्या गावात एक घौडदौडची परंपरा असते. त्यामुळे जमीनदार, सावकार यांच्याकडे घोडे असत आणि अर्थातच त्यांना सांभाळण्यासाठी नोकर. असंच त्या गावातील जमिनदाराकडे गोविंद म्हणजे अमन देवगन हा कामाला असतो परंतु एकदा होळीदिवशी चुकून जमिनदाराच्या मुलीला जानकीला(राशा थडानी) रंग लावल्यामुळे घाबरून तो पळून जातो. कारण यापूर्वी देखील त्याने जमीनदाराकडून मार खाल्लेला असतो. तो पळून जातो तो सरळ बागी ठाकुर विक्रम सिंह (अजय देवगन) याच्या आश्रयाला. तिथे तो ठाकुरचा घोडा आजाद याच्या प्रेमात पडतो. कारण मुळात गोविंदला घोड्यांबद्दल विशेष आकर्षण आणि प्रेम असतं. याच आझाद चं प्रेम मिळवण्यासाठी गोविंद काय काय करतो याभोवती निम्मा चित्रपट संपतो. पुढे मग आझादची साथ आणि ठाकुरचा आशिर्वाद घेऊन गोविंद गावकऱ्यांसाठी कसा लढतो वैगरे अशी टिपिकल कथा आहे.
२०२५ मध्ये अशा प्रकारचे चित्रपट प्रेक्षकांना किती रुचतील ही शंका आहे. १९२० चा काळ दाखवताना दिग्दर्शक नक्कीच कमी पडला आहे. मुळात कथा पटकथा दमदार नसल्याने बाकी गोष्टी फसलेल्या आहेत. आझाद हा घोडा मात्र कमाल आहे. अमन देवगन आणि राशाने पहीला प्रयत्न चांगला केला असला तरी एकंदर चित्रपट खास नाही. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.


७. मिशन ग्रे हाऊस (Mission Grey House)
२०२५. ॲक्शन, थ्रिलर, सस्पेंस, ड्रामा. १ तास ५७ मिनिटे. [U/A]
लेखक झेबा के
दिग्दर्शकनौशाद सिद्दीकी
कलाकारअबीर खान, पूजा शर्मा, राजेश शर्मा, किरण कुमार, कमलेश सावंत, निखत खान, रजा मुराद
निर्मातारफत फिल्म्स एंटरटेनमेंट
रिलीज तारीख१७ जानेवारी २०२५
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.८⭐/ ५

मिशन ग्रे हाऊस” चित्रपट समीक्षा :-

१७ जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शित झालेला मिशन ग्रे हाऊस हा एक सस्पेन्स थ्रिलर चित्रपट असून झेबा के यांनी या चित्रपटाची कथा लिहिली असून नौशाद सिद्दीकी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.
चित्रपटाची कथा आणि चित्रपटाचं नाव ग्रे हाउस नावाच्या बंगल्याभोवती फिरणारी आहे. ज्याचा मालक विक्रांत राणा (किरण कुमार)नुकताच परदेशातून भारतात परत आलेला आहे. परंतु तो परत आल्यावर या बंगल्यात एकापाठोपाठ एक खूनांची मालिका सुरू होते. ज्याचा तपास करण्यासाठी एन्ट्री होते कबीर राठोडची(अबीर खान). कबीरचं पोलिस अधिकारी बनण्याचं स्वप्न असतं. परंतु काही कारणास्तव तो बनू शकत नाही. परंतु या ग्रे हाऊस मध्ये घडणाऱ्या घटनांचा शोध घेतल्यास तो पोलिस अधिकारी बनू शकतो अशी अट मान्य करून तो‌ या तपासाची सूत्रे हातात घेतो. आता तो हा तपास करून खूनी कोण आहे हे शोधून काढतो का हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
खरं तर चित्रपटाची कथा पटकथा दिग्दर्शन सगळंच सुमार आहे. अभिनयाच्या बाबतीत सुद्धा बोंब आहे. सस्पेन्स थ्रिलरच्या नावाखाली एक सुमार चित्रपट काढलेला आहे. आयएमडिबी रेटींग बघून चित्रपट बघणार असाल तर नंतर पश्चात्ताप होऊ शकतो. एकंदर फसलेला चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला एक स्टार.


८. हिसाब बराबर (Hisaab Barabar)
२०२५. विनोदी, सस्पेंस, ड्रामा. १ तास ५१ मिनिटे. [U/A]
लेखक अश्वनी धीर, रितेश शास्त्री, पूर्वा नरेश, डॉल्फी फर्नांडीज
दिग्दर्शकअश्वनी धीर
कलाकारआर माधवन, कीर्ति कुलहरि, नील नितिन मुकेश, राजेश जैस, रश्मी देसाई
निर्माताशरद पटेल, श्रेयांसी पटेल, ज्योति देशपांडे
रिलीज तारीख१७ जानेवारी २०२५
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.०⭐/ ५

हिसाब बराबर” चित्रपट समीक्षा :-

ज्याचा व्यवहार चोख असतो त्यांचा हिशोब सुद्धा पक्का असतो. आणि असंच असावं. कधी कोणाकडून जास्त पैसे घेऊ नये आणि कोणाला जास्त पैसे देऊ नये. हे झालं माणसांच्या बाबतीत. पण जर चक्क तुमची बॅंक च नकळत तुमचे पैसे चोरत असेल तर.? धक्का बसला ना.? पण हो, असं होऊ शकतं. किंबहुना अशा प्रकारचे बॅंक घोटाळे यापूर्वी अनेकदा झालेले आहेत. आणि अशा प्रकारच्या स्कॅम पासून आपण कसं सावध राहावं हे सांगणारा हा चित्रपट आहे.
बऱ्याचदा आपण शॉपिंग मॉल मध्ये किंवा हॉटेल मध्ये जातो तेव्हा ५८९.५० वैगरे असं काहीतरी बील येत मग ती राऊंड फिगर करून ५९० रू. आपल्याकडून घेतले जातात. आपल्यासाठी ते ५० पैसे असतात म्हणून आपण दुर्लक्ष करतो किंवा आपल्या ते लक्षातही येत नाही. परंतु ज्या मॉल मध्ये लाखो लोक शॉपिंग करतात त्यांच्यासाठी वर्षाअखेर हा आकडा किती असू शकतो हे गणित तुम्हीच मांडा. अशाच धर्तीवर या चित्रपटाची कथा आहे.
राधे मोहन शर्मा (आर माधवन) हा रेल्वे मध्ये तिकीट चेकर म्हणून अगदी प्रामाणिकपणे काम करत असतो. तो हिशोबाचा, गणिताचा अगदी पक्का असतो. इतका की अकांऊट मध्ये मार्क कमी असलेल्या मुलीला त्याने लग्नासाठी नकार दिलेला असतो. याच राधेमोहनच्या आयुष्यात एक वादळ येतं जेव्हा त्याच्या एकदा सहज लक्षात येतं की त्याच्या बॅंक खात्यातील २७.५० पैसे कमी आहेत. त्यासाठी तो बॅंके कडे पाठपुरावा करतो. आणि इथुनच पुढे खरा त्याचा संघर्ष सुरू होतो. कारण हाच पाठपुरावा त्याला एका मोठ्या करोडोंच्या घोटाळ्याच्या तळाशी जाऊन पोहचतो. आता हा घोटाळा जगासमोर आणतो का.? त्याला काय संघर्ष करावा लागतो हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
चित्रपटाचा विषय अत्यंत महत्त्वाचा आणि गरजेचा आहे. खरं तर एका प्रकारे जनजागृती करणारा हा चित्रपट आहे. परंतु एक चित्रपट म्हणून बऱ्याच त्रुटी यात आहेत. पटकथा तेव्हढी सक्षम नाही किंवा आपल्याला ती गुंतवून ठेवत नाही. किर्ती कुलहरी ही एका पोलिस ऑफिसरच्या भुमिकेत दिसते पण ती नावालाच. आर. माधवने एकटा तरी तग धरून राहणार, काही ठिकाणी काही गोष्टी खटकतातच. दिग्दर्शन अजून चांगल्या प्रकारे करता आलं असतं. विनोदी लेखन न करता कदाचित विषयाचं गांभीर्य ठेवून चित्रपट बनवला असता तर अजून प्रभावी झाला असता. परंतु एकंदरच एका महत्त्वाच्या विषयाला हात घातला आहे त्यासाठी कौतुक. प्रत्येक नागरिकाने हा चित्रपट बघावा असा आहे. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.


९. स्काय फोर्स (Sky Force)
२०२५. ॲक्शन, थ्रिलर. २ तास ५ मिनिटे. [U/A]
लेखक कार्ल ऑस्टिन, संदीप केवलानी, आमिल कीयान खान, निरेन भट्ट
दिग्दर्शकअभिषेक अनिल कपूर, संदीप केवलानी
कलाकारअक्षय कुमार, वीर पहाड़िया, निमरत कौर, सोहम मजूदार, शरद केळकर, मनीष चौधरी, वरुण बडोला, सारा अली खान
निर्मातादिनेश विजन, अमर कौशिक, ज्योति देशपांडे
रिलीज तारीख२४ जानेवारी २०२५
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.०⭐/ ५

स्काय फोर्स” चित्रपट समीक्षा :-

तेजस, फायटर नंतर पुन्हा एकदा भारतीय सेनेच्या वायुदलाच्या कर्तृत्ववान जवानांची लढाई दाखवणारा चित्रपट स्काय फोर्स आलेला आहे. कार्ल ऑस्टिन, संदीप केवलानी, आमिल कीयान खान आणि निरेन भट्ट अशा चार लेखकांनी मिळून चित्रपटाची कथा लिहिली आहे. तर अभिषेक अनिल कपूर आणि संदीप केवलानी यांचं दिग्दर्शन आहे. भारतीय सैनिक आणि युद्ध त्यातही पार्श्वभूमी जर भारत पाकिस्तान युद्धाची असेल तर प्रेक्षकांनी नेहमीच अशा चित्रपटांना भरभरून प्रतिसाद दिला आहे. हा चित्रपट सुद्धा १९६५ च्या भारत पाक युद्धावर आधारित आहे.
स्क्वाड्रन लीडर टी. कृष्णा विजया उर्फ टॅबी यांनी देशासाठी दिलेलं बलिदान हे या कथेचा गाभा आहे. १९६५ साली झालेल्या युद्धात पाकिस्तान कडून भारतीय हवाई दलांवर अनेक हल्ले करण्यात आले. यासाठी अमेरिकेकडून मिळालेल्या प्रगत लढाऊ विमानांचा वापर करण्यात आला होता. त्यामुळे या हल्ल्यांचा परिणाम आणि नुकसान जास्त झालं होतं. आपले सात जवान या हल्ल्यात शहीद झाले होते. या हल्ल्याचं चोख उत्तर देण्याची जबाबदारी विंग कमांडर केओ आहुजा आणि टिम यांच्यावर येते. ही टिम पाकिस्तानच्या एका एअरबेसवर हल्ला करतात. याच हल्ल्यादरम्यान भारतीय टीम मधील स्क्वाड्रन लीडर टी. कृष्णा विजया उर्फ टॅबी हे बेपत्ता होतात. आणि त्यांचाच शोध घेण्यासाठी केओ आहुजा हे कय काय करतात त्याची शौर्यगाथा सांगणारा हा चित्रपट आहे. भारतीय वायुसेनेचे स्क्वाड्रन लीडर अज्जामद बोपय्या देवय्या यांच्या खऱ्याखुऱ्या आयुष्यावर हा चित्रपट आधारित आहे. प्रत्येक भारतीयाने बघावा असा हा चित्रपट आहे.
अक्षय कुमार तसेच वीर पहाड़िया सोबत इतर सगळ्याच कलाकारांनी अभिनय उत्तम केलेला आहे. संगीत, गाणी सोडली तर चित्रपट उत्तम आहे. दिग्दर्शन सुद्धा छान आहे. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.


१०. स्वीट ड्रीम्स (Sweet Dreams)
२०२४. रोमान्स, ड्रामा. सेंटीमेंटल. १ तास ४७ मिनिटे. [U/A]
लेखक विक्टर मुखर्जी
दिग्दर्शकविक्टर मुखर्जी
कलाकारमिथिला पालकर, मेयांग चांग, सौरसेनी मित्रा, अमोल पराशर, आयशा अदलखा, मोहिनी शिम्पी, फ़ाये डिसूज़ा, सुखराणन वत्स
निर्मातानेहा आनंद, ज्योति देशपांडे, प्रांजल खांधीया
रिलीज तारीख२४ जानेवारी २०२५
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.०⭐/ ५

स्वीट ड्रीम्स” चित्रपट समीक्षा :-

२०१४ साली प्रदर्शित झालेला कॅनेडियन चित्रपट “इन माय ड्रीम्स” या चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे. मिथिला पालकर आणि अमोल पाराशर यांच्या मुख्य भूमिका असलेला हा एक हलकाफुलका थोडासा रोमान्स, थोडासा संदेश देणारा चित्रपट आहे. २४ जानेवारी २०२५ रोजी हा चित्रपट जिओ डिस्नी हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्म वर प्रदर्शित झाला आहे.
दिया(मिथिला पालकर) आणि केनी(अमोल पराशर) या दोघांभोवती चित्रपटाची कथा फिरते. दोघं कधी एकमेकांना प्रत्यक्षात भेटलेले नाही परंतु रोज रात्री एकमेकांना स्वप्नात भेटत असतात. आणि दोघंही एकमेकांना खऱ्या आयुष्यात भेटण्यासाठी प्रयत्न करत आहेत. खरं तर दिया ही ईशान (मीययान चांग)ची प्रेयसी असते परंतु कुठे ना कुठे तिला हे खरं प्रेम वाटत नसतं. तर केनीचं नुकतंच एक ब्रेक अप झालेलं असतं. दोघंही आपापल्या आयुष्यात वेगवेगळ्या समस्यांना तोंड देत एक एक दिवस ढकलत असतात आणि रात्री मात्र झोपताना एकमेकांना रोज भेटत असतात. खरं तर ते स्वप्नातलं ते एकमेकांच्या प्रेमात पडलेले असतात. आता ते खरोखरच्या आयुष्यात खरंच भेटतात का हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
चित्रपटातील कलाकार चांगले आहेत. परंतु कथा पटकथा तेव्हढी सक्षम नाही. दिग्दर्शन सुद्धा गडबडलेलं आहे. अलिबाग मधील सुंदर दृश्य बघायला मिळतात हा प्लस पॉइंट. एकंदर वेळ असेल आणि काहीतरी हलकं फुलकं बघायचं असेल तर हा चित्रपट बघू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.


११. द स्टोरी टेलर (The Storyteller)
२०२५. ड्रामा. सेंटीमेंटल. १ तास ५६ मिनिटे. [U/A]
लेखक किरीट खुराना (सत्यजित रे यांच्या एका गोष्टीवरून)
दिग्दर्शकअनंत महादेवन
कलाकारपरेश रावल, आदिल हुसैन, तनिष्ठा चॅटर्जी
निर्माताज्योति देशपांडे, सुचंदा चटर्जी, सलिल चतुर्वेदी, शुभा शेट्टी
रिलीज तारीख२८ जानेवारी २०२५
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.९⭐/ ५

द स्टोरी टेलर” चित्रपट समीक्षा :-

२८ जानेवारी २०२५ रोजी जिओ डिस्नी हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्म वर “स्‍टोरीटेलर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून बरेच ॲवॉर्ड या चित्रपटाला मिळालेले आहेत. सत्यजीत रे यांच्या ‘गोलपो बोलिये तारिणी खुरो’ या गोष्टीवर हा चित्रपट आधारित आहे.
तारिणी बंदोपाध्याय (परेश रावल) हे आता नोकरीतून निवृत्त झालेले असून त्यांनी आतापर्यंत तब्बल ७५ ठिकाणी नोकरी केलेली असते. आता ते का हे चित्रपटात बघा. तर अशा निवृत्त बंदोपाध्याय यांना आता मात्र स्वतःच्या आवडीची नोकरी मिळालेली असते. तारिणी बंदोपाध्याय यांना गोष्टी लिहीण्याची खूप आवड असते परंतु समाजाच्या भितीने किंवा एक प्रकारचा न्युनगंड त्यामुळे त्यांनी लिहिलेल्या गोष्टी कधी प्रकाशित केल्या नव्हत्या. परंतु आता मात्र त्यांना या गोष्टी कोणाला तरी ऐकवण्याची संधी मिळते. पेपरमधील एक जाहिरात वाचून ते कोलकाता वरून अहमदाबाद ला एका ब‍िजनसमॅन, रतन गरोडिया (आदिल हुसैन) यांच्या घरी पोहचतात. झोप न येण्याच्या आजाराने त्रस्त झालेले रतन यांना झोपताना गोष्टी ऐकवणे हे बंदोपाध्याय यांचं नवीन काम. सुरूवातीला सगळं छान सुरु असतं परंतु कालांतराने बंदोपाध्याय यांच्या हळूहळू लक्षात येतं की रतन गरोडिया यांचा खरा हेतू काही वेगळाच आहे. आता तो हेतू काय हे जाणून घेण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
अनंत महादेवन यांनी सुंदररित्या ही गोष्ट मांडली आहे. परेश रावल आणि आदिल हुसैन या दोघांनीही कमाल अभिनय केला आहे. कोणताही मसाला नाही, आयटम साँग नाही तरीही चित्रपट शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. चित्रपट छान आहे. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.


१२. देवा (Deva)
२०२५. ॲक्शन, थ्रिलर. २ तास ३६ मिनिटे. [U/A]
लेखक बॉबी-संजय, हुसैन दलाल, अब्बास दलाल , अरशद सईद, सुमित अरोड़ा
दिग्दर्शकरोशन एंड्रूज
कलाकारशाहिद कपूर, पूजा हेगड़े, पवैल गुलाटी, प्रवेश राणा, कुब्रा सैत
निर्मातासिद्धार्थ रॉय कपूर, उमेश कुमार बंसल
रिलीज तारीख३१ जानेवारी २०२५
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.३⭐/ ५

देवा” चित्रपट समीक्षा :-

‘कबीर सिंग’, ‘जर्सी’ या रिमेक चित्रपटांनंतर आता शाहिद कपूरने पुन्हा एकदा २०१३ साली प्रदर्शित झालेल्या ‘’मुंबई पुलिस’ या चित्रपटाचा देवा हा रिमेक घेऊन आपल्या भेटीस आलेला आहे. दिग्दर्शक रोशन एंड्रूज याने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं आहे.
हा चित्रपट बघताना कबीर सिंगची आठवण आल्याशिवाय राहत नाही. चित्रपटाची कथा एका दाक्षिणात्य चित्रपटाची असायला हवी तशीच आहे. देवा(शाहीद कपूर) हा एक सनकी पोलिस अधिकारी असतो. एका मोठ्या केसचा उलगडा करून मागे परतताना नेमका त्याचा अपघात होतो आणि त्याची स्मृती गायब होते. आणि ही गोष्ट फक्त डॉक्टर आणि त्याचे वरिष्ठ अधिकारी फरहान(प्रवेश राणा) यांनाच माहीत असते. देवा हा इतका सणकी असतो की गुंडांना मारहाण केल्यावर तो नक्की पोलिस आहे की माफीया अशी चर्चा असते. देवा मुंबई चा मोस्ट वॉन्टेड गॅंगस्टर (मनीष वाधवा) याच्या शोधात असतो परंतु तो प्रत्येक वेळी निसटतो.
स्मृती जाण्यापूर्वी देवा आपल्या जीवलग मित्राचा रोहनचा खूनी शोधत असतो परंतु पोलिस खात्यातच कोणीतरी गद्दार असल्यामुळे देवाला खुन्याचा शोध लागत नाही आणि एकीकडे त्याची स्मृती सुद्धा जाते. परंतु नंतर त्याच केसवर रूजू झाल्यानंतर देवाला एक एक धागे हाती लागत जातात आणि नवीन नवीन ट्विस्ट समोर येतात. आता देवा गॅंगस्टर ला पकडतो का.? रोहनला मारण्या मागे कोणाचा हात असतो.? हे सगळं जाणून घेण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
२०१३ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचा रिमेक आता बनवताना काही गोष्टी अपडेट करण्याची गरज होती परंतु जसच्या तसं कॉपी करण्याची सवय असल्यामुळे ते घडलेलं नाही. त्यामुळे चित्रपट काळाच्या मागे चालतोय असं वाटतं. शाहिद च्या अभिनयातून सतत कबीर सिंगची झलक जाणवते. दिग्दर्शन सुद्धा अगदीच ठिकठाक आहे. एकंदर ॲक्शन, मारझोड आणि साऊथ चित्रपटांचे फॅन असाल तर हा चित्रपट तुम्ही बघू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.

    तर मंडळी वर्षाच्या सुरुवातीला तुम्ही कोणते चित्रपट पाहीलेत आणि त्यापैकी तुम्हाला कोणता आवडला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसंच या वीकेंडला तुम्ही कोणता चित्रपट बघताय हे सुद्धा सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *