जुलै २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी
जुलै २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हे मराठी चित्रपट तुम्ही पाहिलेत का.?
Written by : आकांक्षा कोलते
Updated : ऑगस्ट 29, 2023 | 1:52 AM
आशयघन आणि दर्जेदार कथानक हा मराठी चित्रपटांचा गाभा आहे. मराठी चित्रपट हे नेहमीच वास्तववादी आणि चांगला कंटेंट घेऊन भेटीला येतात हे आता प्रेक्षकांच्या लक्षात येत आहे. त्यामुळे मराठी चित्रपटांना प्रेक्षक आता भरभरून प्रतिसाद देतात.
आपण आतापर्यंत मे २०२३ पर्यंत प्रदर्शित झालेले चित्रपट पाहीले आहेत. आज आपण या लेखात जुलै २०२३ मध्ये कोणकोणते चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले ते पाहुया.
१. आठवणी |
लेखक | सिद्धांत सावंत |
दिग्दर्शक | सिद्धांत सावंत |
कलाकार | मोहन आगाशे, सुहास जोशी, सुहृद वार्डेकर, वैष्णवी करमरकर |
निर्माता | अशोक सावंत |
प्रदर्शित तारीख | ७ जुलै २०२३ |
भाषा | मराठी |
“ आठवणी” चित्रपट समीक्षा :-
मराठी चित्रपटसृष्टीचं हे दुर्दैव म्हणावं लागेल की एकापाठोपाठ इतके चित्रपट प्रदर्शित होतात की प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळेपर्यंत, अधिक शोज लागेपर्यंत दुसरा नवाकोरा चित्रपट हजर असतो. त्यामुळे आधीचा चित्रपट कितीही चांगला असला तरी तो काही दिवसांतच गायब होतो. हेच आठवणी या चित्रपटासोबत देखील झालं आहे.
प्रेम म्हणजे प्रेम असतं.. तुमचं आमचं सेम असतं.! असं कितीही म्हटलं तरी ते प्रत्येकासाठी वेगळंच असतं. प्रत्येकाला आयुष्यात प्रेम मिळतचं असं नाही. प्रत्येकाच्या प्रेमाचा शेवट हा गोड होतोच असं नाही. काहीजणांना त्यांच्या प्रेमासोबत आयुष्य घालवता येतं तर काही जण फक्त प्रेमाच्या आठवणींत जगतात. अशीच एक प्रेमाच्या आठवणींची अनोखी गोष्ट सांगणारा चित्रपट म्हणजे “आठवणी”.
मोहन आगाशे आणि सुहास जोशी हे दोघं तसे जेष्ठ आणि अनुभवी कलाकार. त्यांचा नैसर्गिक अभिनय हीच त्यांची खासियत. तर ही प्रेमाच्या आठवणींची गोष्ट म्हणजे रमाकांत आणि सुनंदा यांची गोष्ट.
चित्रपटाच्या कथेबद्दल बोलायचं झालं तर राहुल हा एक लेखक एका नवीन प्रोजेक्ट साठी एक आगळीवेगळी प्रेमकथा लिहिण्याचा प्रयत्न करत आहे. पण काही केल्या त्याच्या मनासारखी कथा त्याला लिहीता येत नाहीय. अशातच त्याची प्रेयसी रिया ही लग्नासाठी घाई करत आहे.
तिच्या घरचे आता दोघांच्या लग्नाच्या मागे लागले आहेत परंतु आपण गेल्या काही दिवसांपासून काही कमवत नसताना लग्न करणं राहुल ला पटत नाही.
अशातच त्याला एक पाकिट सापडतं आणि त्या पाकिटात एक पत्र. रमाकांत यांनी त्यांच्या प्रेयसीचं तब्बल अठ्ठेचाळीस वर्ष जपून ठेवलेलं हे पत्र असतं. राहुलने ते वाचल्यावर तो त्यांच्या शोधात निघतो. या सगळ्यांत त्याला त्याचं आणि रियाचं नातं नव्याने उलगडत जातं. आता राहुलला रमाकांत किंवा सुनंदा हे भेटतात का.? राहुल रमाकांत यांना ते पाकीट परत देऊ शकतो का.? राहुल ला अपेक्षित असलेली कथा या पत्रामुळे सुचते का.? रमा आणि सुनंदा एकमेकांवर इतके जिवापाड प्रेम करत होते तल मग ते वेगळे का झाले या आणि अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला चित्रपट बघितल्यावरच मिळतील.
चित्रपटाची पटकथा संवाद अजून चांगले असते तर कथा अजून छान फुलली असती. सिद्धांत सावंत यांनी दिग्दर्शनात पदार्पण करत हा चित्रपट केला त्यामुळे पहिला प्रयत्न म्हणून काही गोष्टी जमल्या नाही हे खरं. तरी माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.
२. उनाड |
लेखक | सौरभ भावे, कल्याणी पंडित |
दिग्दर्शक | आदित्य सरपोतदार |
कलाकार | आशुतोष गायकवाड, अभिषेक भरते, अविनाश खेडेकर, चिन्मय जाधव, हेमल इंगळे |
निर्माता | प्रीतेश ठक्कर, अजित अरोरा |
प्रदर्शित तारीख | ८ जुलै २०२३ |
भाषा | मराठी |
“उनाड” चित्रपट समीक्षा :-
आठवणी प्रदर्शित झाल्याच्या अगदी दुसऱ्याच दिवशी प्रदर्शित झालेला उनाड हा चित्रपट आदित्य सरपोतदार यांनी दिग्दर्शित केलेला आहे. नावाप्रमाणेच तीन उनाड मित्रांची गोष्ट सांगणारा हा चित्रपट बऱ्याच संवेदनशील विषयांना स्पर्श करतो.
आदित्य सरपोतदार यांनी नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर आधारित आणि वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलेलं आहे. उनाड हा चित्रपट सुद्धा तसाच आहे.
हि तीन मित्रांची गोष्ट असली तरी यातील मुख्य पात्र आहे ते म्हणजे शुभम. शुभमची भुमिका साकारली आहे आशुतोष गायकवाड याने. शुभमचे वडील त्याच्या मागे लागलेले असतात की त्याने त्यांच्या मासेमारी च्या पारंपरिक व्यवसायात लक्ष घालावे परंतु शुभम हा त्याच्या बंड्या आणि जमीर या मित्रांसोबत उनाडक्या करण्यातच धन्यता मानत असतो.
प्रत्येकजण या फेजमधून जातो की जेव्हा ऐन तारुण्यात काही करून दाखवायचं असतं तेव्हा काहीच न करता नुसतंच दिवस ढकलत राहतो. मित्रांसोबत मजा मस्ती उनाडक्या इतकंच आयुष्य आहे असं वाटत राहतं. हेच या तिघांसोबत होत असतं. अशातच यांची ओळख स्वरा सोबत होते आणि शुभम हा तिच्या प्रेमात पडतो. जेव्हा की स्वराच्या मनात तसं काही नसतं.
याच रागातून शुभम अशी काही चुक करतो की या सगळ्यांची आयुष्य ढवळून निघतात. आता तो नेमकं काय करतो.? आणि त्याचे परिणाम काय होतात हे बघण्यासाठी हा चित्रपट तुम्ही नक्कीच बघा. हा चित्रपट तुम्ही जिओ सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अगदी विनामूल्य पाहू शकता.
कोकणात चित्रिकरण केलेल्या या चित्रपटात निसर्गसौंदर्य बघताना एक वेगळा अनुभव घेता येतो. कोकणातील समुद्र किनारा, किनाऱ्यखलगत असणाऱ्या कोळी लोकांचं आयुष्य बघणं हे डोळ्यांसाठी सुखद अनुभव आहे. सर्व कलाकारांची निवड अचुक आहे. सगळ्यांनी अभिनय उत्तम केला आहे. दिग्दर्शन उत्तम आहे. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.
३. डेट भेट |
लेखक | लोकेश गुप्ते, अश्विनी शेंडे |
दिग्दर्शक | लोकेश गुप्ते |
कलाकार | संतोष जुवेकर, सोनाली कुलकर्णी, हेमंत ढोमे |
निर्माता | शिवांशू पांडे, हितेश रूपारेलिया, स्वाती खोपकर |
प्रदर्शित तारीख | १४ जुलै २०२३ |
भाषा | मराठी |
“डेट भेट” चित्रपट समीक्षा :-
“आपली स्टोरी आपोआप घडत नसते, ती घडवावी लागते.” असं मी नाही तर सोनाली कुलकर्णी म्हणजे अनाया पंडित म्हणतेय तिच्या नवीन आलेल्या “डेट भेट” या चित्रपटात. १४ जुलै रोजी प्रदर्शित झालेला डेट भेट हा चित्रपट लोकेश गुप्ते यांनी दिग्दर्शित केला असून त्याचं चित्रीकरण हे लंडन मध्ये करण्यात आलं आहे. त्यामुळे एकि फ्रेश लव्हस्टोरी सोबत लंडनमधील छान छान लोकेशन या चित्रपटात बघायला मिळतात.
हि गोष्ट आहे अनाया पंडितची. तिचा नुकताच घटस्फोट झालेला असून ती सध्या तिच्या एका मित्रासोबत बोलत असते. तिच्या या मित्राची भूमिका साकारली आहे हेमंत ढोमे याने. आणि याच्यासोबत पुन्हा लग्न करू शकतो का..? हा आपला जोडीदार होऊ शकतो का हेच बघण्यासाठी ती त्याच्याच सांगण्यावरून लंडनला आलेली असते. इथे तिची ओळख एक कॅब ड्रायव्हर सोबत म्हणजे संतोष जुवेकर याच्यासोबत होते.
आता स्क्रीनवर संतोष आणि सोनाली यांची लव्हकेमिस्ट्री पहायला मिळते परंतु ती गोंधळलेली असते. प्रेम आणि आयुष्याचा जोडीदार निवडणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी असतात तेच इथे बघायला मिळतं. आता हा गोंधळ नक्की का होतो.? ती पुढे काय करते.? हे बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल. हेमंत ढोमे याने त्याच्या भुमिकेला नक्कीच न्याय दिला आहे. पण बाकीच्यांकडून थोडी निराशा होते. लंडनमधील शहरं, अजून सुंदर लोकेशन्स बघायला मिळाली असती तर कदाचित लंडनला जाऊन शूटिंग केल्याचा फायदा झाला असता. चित्रपटाची कथा तशी फार काही नवीन नसल्याने दिग्दर्शनासाठी तसाही वाव नव्हता. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार. ॲमेझॉन प्राईम वर हा चित्रपट आता तुम्ही पाहू शकता.
४. अफलातून |
लेखक | परितोष पेंटर |
दिग्दर्शक | परितोष पेंटर |
कलाकार | सिद्धार्थ जाधव, परितोष पेंटर, जयेश ठक्कर, जॉनी लिव्हर, जेस्सी लिव्हर, श्वेता गुलाटी, भरत दाभोळकर , विजय पाटकर |
निर्माता | राजीव कुमार सहा |
प्रदर्शित तारीख | २१ जुलै २०२३ |
भाषा | मराठी |
“अफलातून” चित्रपट समीक्षा :-
“अफलातून” हे नाव वाचून तुम्हाला सुद्धा नक्कीच आपल्या लक्ष्या आणि अशोक सराफ यांच्या जुन्या चित्रपटाची आठवण आली असेल. खळखळून हसायला लावणारा हा चित्रपट आजही लोकं युट्यूबवर बघतात.
परंतु आता आपण बोलतोय ते २१ जुलै रोजी प्रदर्शित झालेला सिद्धार्थ जाधव याचा परितोष पेंटर दिग्दर्शित अफलातून या चित्रपटाबद्दल. हा एक विनोदी चित्रपट असून मुक्या, बहिऱ्या आणि आंधळ्या अशा तीन मित्रांची हि कथा आहे.
विनोदी चित्रपट म्हटलं की अर्थातच लॉजिक वैगरे सगळं बाजूला ठेवून फक्त हसायचं. आणि हसवण्याचं काम हा चित्रपट नक्कीच करतो. श्री, आदी,मानव हे तीन मित्र डिटेक्टीव असतात. त्यातील श्री म्हणजे सिद्धार्थ हा अंध असून आदी म्हणजे परितोष पेंटर हा मुका असतो तर मानव म्हणजे जयेश हा बहिरा असतो.
तर चित्रपटाची कथा ही अशी आहे की गोव्यातील मारिया म्हणजे श्वेता गुलाटी हिचा जवळपास दहा कोटी किंमतीचा व्हिला हा भरत दाभोळकर याने फसवणूक करून ताब्यात घेतलेला असतो. तो परत मिळवण्यासाठी ती पोलिसांची मदत घेते. यात पोलिस अधिकारीच्या भुमिकेत तेजस्विनी लोणारी आहे. परंतु काही कारणास्तव पो. इन्स्पेक्टर आलिया ही या सगळ्या प्रकाराचा शोध लावण्यासाठी डिटेक्टिव असलेले श्री, आदी आणि मानव यांची मदत घेते. आता या तिघांनी मिळून केलेली धमाल नक्कीच बघण्यासारखी आहे. अर्थात जॉनी लिव्हर, विजय पाटकर आणि जेस्सी लिव्हर यांनी सुद्धा चित्रपटात विनोदाचा तडका वाढवला आहेच.
आता ती असं का करते.? मारिया ला तिचा बंगला मिळतो का? हे बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल. चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी अतिशय उत्तम झाली आहे. सिद्धार्थ जाधव याचा अभिनय तर उत्तम आहेच परंतु सगळ्यांनी मिळून जी धमाल केलीय ते बघताना थोडं परितोष आणि जयेश यांच्याकडून अजून थोड्या प्रयत्नांची गरज होती असं वाटतं. तरीही जेवढ्या अपेक्षा ठेवून चित्रपट बघतो तेवढी मजा येत नाही. पण एकदा पाहायला हरकत नाही असा हा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.
५. आणीबाणी |
लेखक | अरविंद जगताप |
दिग्दर्शक | दिनेश जगताप |
कलाकार | सयाजी शिंदे, उपेंद्र लिमये, प्रवीण तरडे, वीणा जामकर, संजय खापरे, उषा नाईक, सीमा कुलकर्णी |
निर्माता | दिनीशा फिल्म्स |
प्रदर्शित तारीख | २८ जुलै २०२३ |
भाषा | मराठी |
“आणीबाणी” चित्रपट समीक्षा :-
आणीबाणी हा शब्द वाचूनच तुम्हाला आणीबाणीचा तो काळ आठवला असेल ना.? तर मग हा चित्रपट सुद्धा त्याच धर्तीवर बनवला गेला आहे. इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केल्यानंतर समाजहितासाठीच लोकसंख्या वाढू नये म्हणून पुरूषांची नसबंदी करण्याचा आदेश दिला होता. यासाठी पुरूषांची धरपकड करून नसबंदी करण्यात येत होती.
तर आणीबाणी हा कितीही गंभीर शब्द असला तरी हा चित्रपट मात्र विनोदी आहे. अरविंद जगताप यांनी यंत्रणेला चिमटे काढणारे लिखाण करत या चित्रपटाची कथा पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. परंतु विनोदी धाटणीचा असणारा हा चित्रपट कथा आणि विषय चांगला असुनही पटकथा गुंतागुंतीची झाल्यामुळे भरकटला आहे.
चित्रपटाची कथा ही अभिमन्यू म्हणजे उपेंद्र लिमये आणि त्याची बायको विमल म्हणजे वीणा जामकर यांच्यापासून सुरू होते. दोघांना मुल होत नसल्याने विमल तिच्या नवऱ्याचं लग्न तिच्या दुरच्या बहिणीसोबत ज्योती सोबत लावून देत असते. परंतु या लग्नाला ज्योतीचा पोलिस असलेला भाऊ संजय खापरे याचा विरोध असतो. व ते लग्न होऊ नये यासाठी तो प्रयत्न करत असतो. त्यासाठी तो सरकारने जाहीर केलेल्या नसबंदी साठी अभिमन्यू ला शोधत असतो. आता त्यांच्यात काय दुश्मनी असते..? अभिमन्यू आणि जोतीचं लग्न होतं का.? हे सगळं बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
या चित्रपटाच्या ट्रेलरमुळे ज्या अपेक्षा प्रेक्षकांना होत्या, किंवा या चित्रपटाला लाभलेली तगडी स्टारकास्ट बघता अभिनय सोडला तर हा चित्रपट स्क्रीन प्ले, कॉमेडी किंवा इतर गोष्टींत कमी पडतो. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.
तर मित्रांनो, यापैकी कोणते चित्रपट तुम्ही पाहीलेत आणि या विकेंड ला कोणते बघायला जाणार आहात हे कमेंट करून नक्की सांगा.
हे पण वाचा :-
फेब्रुवारी २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी
फेब्रुवारी २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी
मार्च २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी
मार्च २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी
एप्रिल २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी
एप्रिल २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी
मे २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी
मे २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी