जुलै २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी
जुलै २०२३ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेले हे हिंदी चित्रपट तुम्ही पाहीलेत का?
Written by : आकांक्षा कोलते
Updated : सप्टेंबर 13, 2023 | 2:00 PM
हल्ली साऊथ इंडियन चित्रपटांनी प्रेक्षकांना जणू भुरळ घातली आहे. भरीस भर नवीन आलेला बॉयकॉट ट्रेंडमुळे हिंदी चित्रपटसृष्टीला वाईट फटका बसला आहे. म्हणूनच आता २०२३ मध्ये हिंदी चित्रपटसृष्टीला दमदार कमबॅक करणं गरजेचं आहे. आणि तशी सुरूवात सुद्धा झालेली आहे. पण खरं तर आता वेबसिरीज चा जमाना असल्यामुळे प्रेक्षकांच्या चित्रपटांच्या बाबतीत अपेक्षा वाढल्या आहेत. आता या अपेक्षा पूर्ण होतायत की नाही हे आमच्या परीने सांगण्याचा प्रयत्न या लेखात आम्ही करणार आहोत. चला तर मग जुलै २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले चित्रपट आज या लेखात आपण बघणार आहोत. त्यातील तुम्हाला कोणते आवडले हे आम्हाला कळवा.

१. नियत |
लेखक | गिरवानी ध्यानी , अनु मेनन , अद्वैत काला, प्रिया वेंकटरमन |
दिग्दर्शक | अनु मेनन |
कलाकार | विद्या बालन , राम कपूर , राहुल बोस , नीरज काबी , अमृता पुरी , शशांक अरोड़ा , निकी वालिया , प्राजक्ता कोळी |
निर्माता | विक्रम मल्होत्रा |
प्रदर्शित तारीख | ७ जुलै २०२३ |
भाषा | हिंदी |
“नियत” चित्रपट समीक्षा :-
तब्बल चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर विद्या बालन हिने पुनरागमन करत प्रेक्षकांच्या अपेक्षा फार उंचावल्या होत्या परंतु या अपेक्षा पूर्ण करण्यात नियत हा चित्रपट सपशेल पराभूत झाला आहे.
सस्पेन्स आणि मर्डर मिस्ट्री असलेला हा चित्रपट फार जादू करू शकला नाही. विद्या बालन ही एक अशी अभिनेत्री आहे जिने बॉलिवूडमध्ये स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर स्वतःला सिद्ध केले आहे. नैसर्गिक अभिनय हे तिचं वैशिष्ट्य. परंतु नियत या चित्रपटाची कथाच इतकी सुमार आहे की विद्या बालन या चित्रपटाला तारू शकली नाही.
चित्रपटाची कथा ही आहे की एक करोडपती बिझनेसमन आशिष कपूर म्हणजे ए.के. याने त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या जवळच्या मित्रमंडळीना सेलिब्रेशनसाठी बोलवलं आहे. ही सेलिब्रेशन पार्टी स्कॉटलंडमध्ये एका समुद्र किनारी असलेल्या बंगल्यात आहे, या बंगल्याचा इतर शहरांशी संपर्क होण्यासाठी एकच रस्ता आणि पूल आहे. अशा शहरापासून दूर एका कोपऱ्यात असलेल्या या बंगल्यात वाढदिवसाच्या दिवशीच आशीष कपूर याचा खून होतो. इथुनच कथा सुरू होते.
चित्रपटाची कथा पटकथा संवाद इतके भरकटलेले आहेत की चित्रपट संपण्याची वाट बघतो. विद्या बालन हि सीबीआय ऑफिसर असून एका केस संदर्भात आशिष कपूर याला अटक करण्यासाठी आलेली असते. परंतु त्याचाच खुन झाल्यावर ती खुन्याला शोधणं चालू करते.
चित्रपटाचं दिग्दर्शन सुद्धा इतकं सुमार आहे की विद्या बालन हिचं पात्र नक्की काय आणि इतकं गोंधळलेलं आहे की शेवटपर्यंत कळतच नाही की ती असं का वागत असते. एकंदरच सगळ्याच कलाकारांनी अभिनय सुमार केला आहे. अगदीच रिकामा वेळ असेल तर हा चित्रपट तुम्ही ॲमेझॉन प्राईम वर बघू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार.
२. तरला |
लेखक | पियुष गुप्ता आणि गौतम वेद |
दिग्दर्शक | पियुष गुप्ता |
कलाकार | हुमा कुरैशी , शारिब हाशमी , राजीव पांडे , भारती अचरेकर , अमरजीत सिंह , पूर्णेंदु भट्टाचार्य , भावना सोमैया |
निर्माता | रॉनी स्क्रूवाला , नितेश तिवारी , अश्विनी अय्यर तिवारी |
प्रदर्शित तारीख | ७ जुलै २०२३ |
भाषा | हिंदी |
“ तरला” चित्रपट समीक्षा :-
२००७ साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या भारतीय शेफ तरला दलाल यांच्या आयुष्यावर आधारित असलेला तरला हा चित्रपट ७ जुलै रोजी प्रदर्शित झाला आहे. यात हुमा कुरेशी हिने तरला यांची भुमिका साकारली आहे.
टेलिव्हिजनच्या पुर्वीचा हा काळ होता जेव्हा मासिकांद्वारे भारतीय रेसिपीज साठी तरला दलाल यांचं नाव घराघरात पोहोचलं होतं. या चित्रपटात हाच सगळा प्रवास दाखवण्यात आला आहे. मुळच्या पुण्यातील असलेल्या तरला लग्नानंतर मुंबईमध्ये वास्तव्यास आल्या. मुळातच हाताला सुंदर चव असल्याने त्यांचे पदार्थ आजुबाजूच्या लोकांना, नातेवाईकांना सगळ्यांनाच आवडत. यातूनच प्रेरणा घेत त्यांनी घरातूनच पाककलेचे क्लासेस घेणं सुरू केलं. पुढे मग सोनी टीव्हीवर “कुक इट अप विथ तरला दलाल” या कार्यक्रमामुळे त्या शेफ तरला दलाल म्हणून प्रसिद्ध झाल्या.
त्यांचा हा सगळा प्रवास हुमा कुरेशीने सहजरित्या पडद्यावर साकारला आहे. चित्रपटाची कथा सुरूवातीला थोडी संथ वाटते. काही ठिकाणी चित्रपटाची पकड सैल वाटते. तरला यांची फूड जर्नी पेक्षा वैयक्तिक आयुष्यावर हा चित्रपट अधिक भाष्य करतो. तरीही एकदा बघायला हवा असा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.
३. ब्लाइंड |
लेखक | शोम मखीजा और सुदीप निगम |
दिग्दर्शक | शोम मखिजा |
कलाकार | सोनम कपूर , पूरब कोहली , विनय पाठक , लिलेट दुबे आदि |
निर्माता | सुजॉय घोष , अविषेक घोष , ह्युनवू थॉमस किम, सचिन नाहर , पिंकेश नाहर , मनीष डब्ल्यू , ज्योति देशपांडे |
प्रदर्शित तारीख | ७ जुलै २०२३ |
भाषा | हिंदी |
“ब्लाइंड” चित्रपट समीक्षा :-
हॉलिवूडचे सिनेमे असोत वा दाक्षिणात्य चित्रपट. बॉलिवूड नेहमीच या चित्रपटांचे रिमेक बनवत आलंय. यावेळी सुद्धा निर्माता सुजॉय घोष याने एका कोरियन चित्रपटाचा रिमेक बनवत ब्लाइंड या चित्रपटाची निर्मिती केली आहे. दिग्दर्शक शोमे मखिजा यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट प्रेक्षकांना थ्रिलिंग अनुभव देण्यास कमी पडतो.
हि कथा आहे स्कॉटलंडमधील एका धाडसी आणि हुशार महिला पोलिस अधिकारी कुशल जिया हिची. हि भुमिका सोनम कपूर हिने साकारली असून तीने चार वर्षांनंतर पडद्यावर पुनरागमन केले आहे. जिया हि एकदा आपल्या भावाला पबमधून बाहेर काढून आपल्या जीपमध्ये बसवून बेड्या घालून त्याला घेऊन जात असताना त्यांच्या गाडीचा अपघात होतो. व याच अपघातात तिच्या भावाचा मृत्यू होतो व तिची दृष्टी जाते. पुढे याचाच परिणाम तिला नोकरीवरून काढून टाकण्यात येते.
पुढे काही दिवसांनी जिया हि एका अनोळखी (पुरब कोहली)व्यक्तीकडे लिफ्ट मागते व तिला संशय येतो की डिक्कीत कोणीतरी आहे. परंतु विचारणा केल्यावर तिलाच गाडीतून उतरवण्यात येतं. आणि नेमकं याच काळात शहरात मुली बेपत्ता होण्याच्या तक्रारी वाढत असतात. त्यामुळे जियाला जास्त संशय येतो. इथुनच सुरू उंदीर मांजराचा खेळ. जिया पोलिस अधिकारी (विनय पाठक) याच्यासोबत या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी प्रयत्न करते. पुरब कोहली याने यात सायको किलरची भुमिका साकारली आहे.
ब्लाइंड हा चित्रपट सस्पेन्स थ्रिलर क्राईम या धाटणीचा असला तरी चित्रपटात सस्पेन्स आणि थ्रिल कमी आहे. पटकथा नीट न मांडता आल्यामुळे शोम मखिजा यांचा प्रयत्न फसला आहे. पुरब कोहली याने अभिनय उत्तम केला आहे. सोनम कपूर ने देखील चांगला अभिनय करण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.
४. ७२ हुरें |
लेखक | अनिल पांडेय |
दिग्दर्शक | संजय पूरन सिंह चौहान |
कलाकार | पवन मल्होत्रा ,आमिर बशीर ,सरू मैनी , राशिद नाज , अशोक पाठक, नम्रता दीक्षित |
निर्माता | गुलाब सिंह तंवर, किरण डागर, अनिरुद्ध तंवर |
प्रदर्शित तारीख | ७ जुलै २०२३ |
भाषा | हिंदी |
“ ७२ हुरें” चित्रपट समीक्षा :-
इस्लाम धर्मात अशी समजूत आहे की पुरूषांच्या मृत्युनंतर जर त्यांना जन्नत मध्ये प्रवेश मिळाला तर त्यांच्यासाठी तिथे ७२ सौंदर्यवतींबरोबर म्हणजे हुरें सोबत रहायला मिळतं. या सौंदर्यवतींचं सौंदर्य शब्दात वर्णन अवघड. एक हुर म्हणजे एक सौंदर्यवती.
आतंकवादी कारवाया करण्यासाठी असे तरूण तयार करताना इस्लाम धर्मातील मौलाना या तरूणांना असं सांगतात की तुम्ही धर्मासाठी हे काम करत असून यात जर मृत्यू झाला तर जन्नत आणि ७२ हुरें तुम्हाला प्राप्त होतील. हेच सांगून सांगून तरूणांचा ब्रेन वॉश केला जातो. असेच ब्रेन वॉश झालेले बिलाल आणि हाकिम यांच्यावर आधारित हा चित्रपट आहे.
मुंबईत “गेट वे ऑफ इंडिया” इथे बॉम्बस्फोट घडवून त्यात मृत्यूमुखी पडल्यावर हाकिम आणि बिलाल जन्नत मध्ये जाण्याची वाट बघत आहेत. ७२ सौंदर्यवतींबरोबर मजा मारण्याची वाट बघत आहेत. परंतु ना जन्नत चा दरवाजा उघडतो ना एक पण हुर तिथं येते. त्यांची वाट बघता बघता हे दोघं एकमेकांशी बोलत असतात. त्याचंच चित्रण दाखवणारा हा चित्रपट आहे. या दोघांनाही कळून चुकतं की निष्पाप माणसांचा जीव घेऊन कधीच जन्नत प्राप्त होऊ शकत नाही.
दिग्दर्शक संजय पुरन सिंह चौहान यांनी उत्तम दिग्दर्शन केले आहे. धर्माच्या नावाखाली चुकीच्या पद्धतीने आतंकवाद घडवणाऱ्यांना हि एक सणसणीत चपराक लगावण्याचा प्रयत्न संजय चौहान यांनी केला आहे. चित्रपटाचा स्क्रीन प्ले अजून चांगला असायला हवा होता. परंतु एकदा तरी पहायला हवा असा हा चित्रपट नक्कीच आहे. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.
५. इश्क ए नादान |
लेखक | सुदिप निगम |
दिग्दर्शक | अविषेक घोष |
कलाकार | मोहित रैना , लारा दत्ता , कंवलजीत सिंह , नीना गुप्ता , श्रिया पिलगांवकर , सुहैल नैय्यर और मृणाल दत्त |
निर्माता | ज्योति देशपांडे , अविषेक घोष और मनीषा डब्ल्यू |
प्रदर्शित तारीख | १४ जुलै २०२३ |
भाषा | हिंदी |
“ इश्क ए नादान ” चित्रपट समीक्षा :-
आयुष्यात बऱ्याचदा काय हवंय हे कळत असुनही फक्त समाजाच्या भीतीपोटी आपण ते करत नाही. किंवा स्विकारत नाही. मग ते उतारवयात झालेलं प्रेम असो किंवा समलैंगिक आकर्षण असो. आपल्याला हे माहीत असतं की या गोष्टी आपण स्वतः सहज स्विकारल्या तर आपलं आयुष्य नक्कीच आनंददायी असेल पण लोक काय म्हणतील या विचारांनी आपणच आपल्या सुखाचा गळा दाबतो. याच संकल्पनेवर, याच भावनांवर आधारित हा चित्रपट आहे.
चित्रपटात तीन वेगवेगळ्या परिस्थितीतून निर्माण झालेल्या तीन वेगवेगळ्या कथा आहेत. चारुलता म्हणजे नीना गुप्ता ही वैधव्य आलेली उतारवयाकडे झुकलेली आणि म्हणूनच एकटेपणाला घाबरत असलेली एक स्त्री आहे. तर लारा दत्ता हिने रमोना सिंह हि समलैंगिक आकर्षण असणारी स्त्री असून ती समाजाला घाबरत चोरून आपले संबंध जपतेय परंतु या सगळ्यात तिचा मित्र बनलेला आशुतोष म्हणजेच मोहीत रैना तिला समजावतो व ताठ मानेने हे संबंध स्विकारण्यासाठी प्रोत्साहन देतो.
तर तिसरी गोष्ट ही सिया म्हणजे श्रीया पिळगांवकर हिची आहे. जी लग्नाआधी गरोदर असून तिला तिचं प्रेम मिषवून देण्यासाठी तिच्यावर प्रेम करणारा पियूष मदत करतो. पियुष ची भुमिका सुहैल नैय्यर याने साकारली आहे. सगळ्यांनीच काम उत्तम केली आहेत तरी मोहीत रैना हा विशेष लक्षात राहतो. दिग्दर्शन अजून एक पायरी वरच्या दर्जाचं असतं तर कदाचित चित्रपट अजून जास्त फुलला असता. असो, हा चित्रपट तुम्ही जिओ सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर बघू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.
६. बवाल |
लेखक | नितेश तिवारी ,अश्विनी अय्यर तिवारी, निखिल मल्होत्रा, श्रेयस जैन |
दिग्दर्शक | नितेश तिवारी |
कलाकार | वरुण धवन , जान्हवी कपूर , मनोज पाहवा , अंजुमन सक्सेना , प्रतीक पचौरी, व्यास हेमंग, शशि वर्मा और मुकेश तिवारी |
निर्माता | साजिद नाडियाडवाला, अश्विनी अय्यर तिवारी. |
प्रदर्शित तारीख | २१ जुलै २०२३ |
भाषा | हिंदी |
“बवाल” चित्रपट समीक्षा :-
बऱ्याचदा असं होतं की तुम्ही इतकं साध सरळ आणि प्रामाणिक आयुष्य जगता की लोक तुम्हाला आदर्श मानू लागतात. समाजात, नातेवाईकांमध्ये तुम्हाला मानतात. खरं तर सत्य काही वेगळंच असतं. आणि हेच टिकवण्यासाठी तुम्ही मग आटोकाट प्रयत्न करू लागता. अशीच स्वतःची प्रतिमा आणि प्रतिष्ठा जपणाऱ्या अज्जू भैया म्हणजे अजय दिक्षित ची ही कथा आहे.
दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात वरूण धवन याने अज्जू ही भूमिका साकारली असून तो लखनऊ मधील एका शाळेत इतिहास विषय शिकवणारा एक सामान्य शिक्षक असतो. आणि लोक त्याला इतकं मानत असतात की तो सगळ्यांसमोर एक आदर्श शिक्षक असतो जेव्हा की त्याने ही शिक्षकाची नोकरी सुद्धा जुगाड करून मिळवलेली असते.
या अज्जूचं लग्न होतं निशासोबत म्हणजे जान्हवी कपूर सोबत. निशा ही अत्यंत हुशार आणि टॉपर असते परंतु तिला आकडी येण्याचा आजार असतो. त्यामुळे यांचे वैवाहिक आयुष्य ढवळून निघालेलं असतं. चित्रपटात पुढे असं काही होतं की अज्जू मुलांना दुसऱ्या महायुद्धाच्या माहीती देण्याच्या निमित्ताने निशाला घेऊन युरोप टुर वर जातो. तिकडे काय होतं.? निशा आणि अज्जूचं नातं खुलतं का.? अज्जुचा खोटा स्वाभिमान आणि खोटी इमेज गळून पडते का.? हे बघण्यासाठी हा चित्रपट तुम्ही ॲमेझॉन प्राईम वर बघू शकता.
वरून धवन यावेळी जरा ओव्हर ॲक्टिंग कमी केलीय असं म्हणता येईल. जान्हवी ने पण बरा अभिनय केला आहे. एकंदर चित्रपट बघावा असा आहे.
७. ट्रायल पिरियड |
लेखक | अलेया सेन |
दिग्दर्शक | अलेया सेन |
कलाकार | जेनेलिया देशमुख, मानव कौल , गजराज राव , शक्ति कपूर , शीबा चड्ढा , स्वरूपा घोष, बरुण चंदा , जिदान ब्राज |
निर्माता | ज्योति देशपांडे , हेमन्त भंडारी , अमित रवीन्द्रनाथ शर्मा , अलेया सेन |
प्रदर्शित तारीख | १ जुलै २०२३ |
भाषा | हिंदी |
“ट्रायल पिरियड” चित्रपट समीक्षा :-
बऱ्याचदा असं होतं की एखादी गोष्ट किंवा वस्तू विकताना दुकानदार बोलून जातो की आधी वापरून बघा नाही पटली तर परत आणून द्या. अर्थात तसं होत नाही. पण याच धर्तीवर आधारित या चित्रपटात चक्क एक “वडील” ट्रायल पिरियड वर आणले आहेत.
कधी कधी मानलेली नाती जास्त घट्ट असतात. नात्यातील हिच वीण उलगडून सांगणारा हा चित्रपट म्हणजे मानव कौल आणि क्युट अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांचा ट्रायल पिरियड.
अनामया रॉय चौधरी म्हणजेच जेनेलिया हि एक सिंगल मदर असते. तिला सहा वर्षांचा रोमी नावाचा गोड मुलगा असतो. असंच रोमी एकदा टिव्ही वर बघतो की तीस दिवसांच्या ट्रायल पिरियड वर वस्तू घरी वापरायला आणू शकतो. आणि हेच बघून तो त्याच्या आईकडे हट्ट करतो की असेच तीस दिवसांच्या ट्रायल पिरियड वर त्याला वडील हवे आहेत.
हा हट्ट पुरवण्यासाठी अनामया जिवाचं रान करते तेव्हा जाऊन तिला नोकरीच्या शोधात असलेला प्रजापती द्विवेदी म्हणजे पि.डी. भेटतो. व तो या कामासाठी तयार होतो. अर्थात हि भुमिका मानव कौल याने साकारली आहे. आता अनामया हिने पिडीला रोमीसोबत वाईट आणि कठोर वागण्याची अट घातलेली असते जेणेकरून रोमीला वडिलांबद्दल द्वेष निर्माण होईल. आता असं होतं की अजून काही वेगळं होतं हे बघण्यासाठी हा चित्रपट बघायला हवा. जेनेलिया आणि मखनव दोघांचाही अभिनय उत्तम आहे. पटकथा उत्तमरित्या मांडता आली असती तर अजून प्रभावी चित्रपट होऊ शकला असता. तुम्ही हा चित्रपट जिओ सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर बघू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.
८. मायनस ३१- द नागपूर फाईल्स |
लेखक | चारुलता मोइत्रो |
दिग्दर्शक | प्रतीक मोइत्रो |
कलाकार | रुचा इनामदार, निशा धर, रघुबीर यादव , राजेश शर्मा, जया भट्टाचार्य, कामभारी, संतोष जुवेकर , शिवांकित परिहार |
निर्माता | ऑरेंज पिक्सेल स्टुडिओ |
प्रदर्शित तारीख | २१ जुलै २०२३ |
भाषा | हिंदी |
“मायनस ३१- द नागपूर फाईल्स” चित्रपट समीक्षा :-
आजकाल मर्डर मिस्ट्री, सस्पेन्स थ्रिलर अशा चित्रपटांना प्रेक्षकांची जास्त पसंती असते त्यामुळे बॉलिवूड मध्ये असे मर्डर मिस्ट्री ड्रामा वाले चित्रपट येतच राहतात. परंतु मर्डर मिस्ट्री, सस्पेन्स, थ्रिलर हे चित्रपट हे असे हवेत की शेवटपर्यंत तुम्हाला विचार करायला भाग पाडतील. ट्विस्ट आणि टर्न्स इतके असावेत की तुमचा अंदाज चुकीचा निघाला पाहिजे पण या सगळ्याच बाबतीत प्रतीक मोइत्रो यांचा चित्रपट नापास होतो.
नागपूर मध्ये ऐन कोरोनाच्या काळात झालेल्या एका मर्डर मिस्ट्री ची ही गोष्ट आहे. त्यावेळी रेमडेसिवीर हे इंजेक्शन अक्षरशः पन्नास पन्नास हजार देऊन लोक विकत घेत होते याचाच गैरफायदा घेत या इंजेक्शन चा काळा बाजार होत होता. हिच परिस्थिती नागपूर मध्ये सुद्धा होती. याच काळात मृत व्यक्तींचे देह नदीत असेच सोडून दिले जात होते.
याचाच फायदा घेऊन नागपूर मधील एका मोठ्या व्यावसायिकाची हत्या करून त्याचा मृतदेह नदीत फेकण्यात येतो. याचाच तपास सब इन्स्पेक्टर असलेली रुचा इनामदार घेत असते. हिच चित्रपटाची कथा आहे. परंतु हि कथा सस्पेन्स निर्माण करण्यात अयशस्वी ठरते. कलाकारांचा अभिनय सुद्धा बरा म्हणावा असा आहे. दिग्दर्शन, स्क्रीन प्ले सगळंच ठिक ठाक आहे. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार.
९. अजमेर ९२ |
लेखक | सुरज पाल रजक,ज्ञानेंद्र प्रताप सिंग, पुष्पेंद्र सिंह |
दिग्दर्शक | पुष्पेंद्र सिंह |
कलाकार | करण शर्मा, ब्रीजेंद्र काला, सयाजी शिंदे, मनोज जोशी, जरीना बहाव |
निर्माता | करण वर्मा, उमेश कुमार तिवारी |
प्रदर्शित तारीख | २१ जुलै २०२३ |
भाषा | हिंदी |
“अजमेर ९२” चित्रपट समीक्षा :-
अजमेर ९२ हा चित्रपट नावाप्रमाणेच १९९२ मध्ये झालेल्या अजमेर मधील “समुह बलात्काराच्या घटनेवर आधारित आहे. साधारण १९८७ ते १९९२ चा काळ होता. केरला स्टोरी नंतर पुन्हा एकदा अशा प्रकारचा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. अजमेर झालेली ही घटना अक्षरशः माणुसकीला काळीमा फासणारी होती. या चित्रपटाचा ट्रेलरच इतका भयावह आणि अंगावर काटा आणणारा होता की या चित्रपटाची प्रेक्षक वाट बघत होते.
त्यावेळी अजमेर मधील एका गॅंग ने शाळा कॉलेज मधील मुलींचे नग्नावस्थेत फोटो काढून त्यांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर बलात्कार करण्याचा विकृत प्रकार एकदा दोनदा नव्हे तर अनेक वेळा केला होता. यात शहरातील मोठमोठे धनदांडगे, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मोठे नेते सुद्धा हे सहभागी होते. एका पत्रकारामुळे मा सगळ्या प्रकाराला वाचा फुटली होती परंतु तोपर्यंत बऱ्याच मुलींनी स्वतःचं आयुष्य संपवलं होतं.
याच सगळ्या घटनेची आठवण करून देणारा हा चित्रपट पुष्पेंद्र सिंह यांनी दिग्दर्शित केलेला आहे. करण शर्मा, सयाजी शिंदे तसेच मनोज जोशी, जरीना बहाव
या सगळ्यांचा अभिनय उत्तम आहे. लवकरच हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर येईल तेव्हा तुम्ही हा चित्रपट नक्कीच बघावा. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.
१०. रॉकी और रानी की प्रेमकहाणी |
लेखक | शशांक खैतन, इशिता मोइत्रो, सुमित रॉय |
दिग्दर्शक | करण जोहर |
कलाकार | रणवीर सिंह,आलिया भट्ट,धर्मेंद्र,शबाना, आजमी,जया बच्चन,टोटा राय चौधरी,आमिर बशीर,नमित दास |
निर्माता | करण जोहर, अपुर्व मेहता, हिरू जोहर |
प्रदर्शित तारीख | २८ जुलै २०२३ |
भाषा | हिंदी |
“रॉकी और रानी की प्रेमकहाणी” चित्रपट समीक्षा :-
२८ जुलै रोजी प्रदर्शित झालेला रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांचा “रॉकी और रानी की प्रेमकहाणी” हा चित्रपट चांगलाच चर्चेत होता. परत एकदा आपल्या दिग्दर्शनाची जादू दाखवायला करण जोहर सज्ज झाला होता. आता ती जादू प्रेक्षकांना आवडलीय की नाही हे तुम्हीच ठरवा.
चित्रपटाच्या कथेबद्दल बोलायचं झालं तर कथेमध्ये नाविन्य असं काही नाही. दोन वेगवेगळ्या स्वभाव, आचार विचार, राहणीमान अशा सगळ्याच विरूद्ध गोष्टी असलेले दोघं एकमेकांच्या प्रेमात पडतात. मग घरच्यांचा विरोध वैगरे. हीच टिपिकल कथा.
रॉकी यामध्ये एक पंजाबी मुलगा असून शिक्षणाचा काहीच संबंध नाहीय. शहरातील सगळ्यात मोठ्या मिठाईवाल्या खानदानाचा तो वारस आहे . एकत्र कुटुंबात राहणारा रॉकी हा अडाणी दाखवला आहे तर या उलट रानी ही उच्चशिक्षित घरातील असते. रॉकी च्या आजोबांची स्मृती परत आणण्यासाठी रानी मदत करत असते. आणि याच सगळ्यात ते दोघं एकमेकांच्या प्रेमात पडतात. आता दोन्ही घरांत जमीन आस्मानाचा फरक असताना यांच्या प्रेमाला यश मिळतं का हे बघण्यासाठीच हा चित्रपट बघणं गरजेचं आहे. तसेच पुरूष प्रधान संस्कृतीवर हा चित्रपट बऱ्यापैकी भाष्य करतो.
करण जोहरच्या चित्रपटांचे फॅन असाल तर नक्की हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन बघा. नाहीतर ओटीटी वर आल्यावर बघीतला तरी फार फरक पडणार नाही. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.
११. वन फ्रायडे नाइट |
लेखक | मनीष गुप्ता, कमल चोप्रा, रमेश |
दिग्दर्शक | मनीष गुप्ता |
कलाकार | रवीना टंडन, मिलिंद सोमण, विधी चितालिया |
निर्माता | करण जोहर, अपुर्व मेहता, हिरू जोहर. |
प्रदर्शित तारीख | २८ जुलै २०२३ |
भाषा | हिंदी |
“वन फ्रायडे नाइट” चित्रपट समीक्षा :-
सस्पेन्स थ्रिलर च्या नावाखाली इतके चित्रपट प्रदर्शित होतात की सगळे सारखे तरी वाटतात किंवा कंटाळवाणे तरी. २८ जुलै रोजी प्रदर्शित झालेला वन फ्रायडे नाइट हा चित्रपट सुद्धा असाच एक सस्पेन्स थ्रिलर क्राईम अशा जॉनरचा आहे, निदान तसा प्रयत्न तरी केला आहे.
राम वर्मा म्हणजेच मिलिंद सोमण हा विवाहीत असूनही त्याचं तो एका मुलीसोबत फार्महाऊसवर मजा करायला जातो. परंतु तिथे गेल्यावर त्याच्यासोबत अपघात होतो. अशा परिस्थितीत काही न सुचल्याने निरोशा म्हणजे रामची गर्लफ्रेंड त्याच्या बायकोला म्हणजे लताला बोलवते कारण लता एक डॉक्टर असते. लताची भुमिका साकारली आहे रवीना टंडन हिने. आता पुढे काय होतं हे अर्थातच आम्ही सांगणार नाही त्यासाठी तुम्हाला हा चित्रपट बघावा लागेल. हा चित्रपट जिओ सिनेमा वर प्रदर्शित झाला आहे.
कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन सगळंच ठिक ठाक आहे. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.
र मंडळी यापैकी कोणते चित्रपट तुम्ही पाहीलेत आणि कोणते आवडलेत हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.
हे पण वाचा :-
फेब्रुवारी २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी
फेब्रुवारी २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी
मार्च २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी
मार्च २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी
एप्रिल २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी
एप्रिल २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी
मे २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी
मे २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी
जून २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी
जुलै २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी
