HomeFilmsMarathi

जुलै २०२४ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी | List of Marathi Movies released in July 2024

जुलै २०२४ मध्ये प्रदर्शित झालेले हे मराठी चित्रपट तुम्ही पाहिलेत का.?

Written by : आकांक्षा कोलते

Updated : ऑगस्ट 09, 2024 | 02:53 PM

खरं तर आता वेबसिरीज चा जमाना असल्यामुळे प्रेक्षकांच्या चित्रपटांच्या बाबतीत अपेक्षा वाढल्या आहेत. त्यातही नवीन आलेल्या चित्रपटांमध्ये ओरिजनल कंटेट कमीच असतो. परंतु आशयघन आणि दर्जेदार कथानक हा मराठी चित्रपटांचा गाभा आहे. मराठी चित्रपट हे नेहमीच वास्तववादी आणि चांगला कंटेंट घेऊन भेटीला येतात हे आता प्रेक्षकांच्या लक्षात येत आहे. त्यामुळे मराठी चित्रपटांना प्रेक्षक आता भरभरून प्रतिसाद देतात. असं असलं तरीही हल्ली इतके चित्रपट प्रदर्शित होत असतात की ते तेवढे दर्जेदार असतातच असं नाही. त्यामुळे आम्ही हे सांगण्याचा प्रयत्न करू की प्रदर्शित झालेला एखादा चित्रपट खरंच बघायला हवा की नको.
आज या लेखात आपण जुलै २०२४ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपट आम्हाला कसे वाटले ते सांगणार आहोत. ज्यामुळे ते बघायला हवे की नको ते ठरवणं तुम्हाला सोपं जाईल.

List of Marathi Movies released in July 2024 Movie review and information

१. विषय हार्ड (Vishay Hard)
२०२४. विनोदी, ड्रामा, रोमँटिक. १ तास ५३ मिनिटे. [U/A]
लेखक दिपक माडेकर
दिग्दर्शकसुमित पाटील
कलाकारसुमित पाटील, पर्ण पेठे, हसन शेख, विपिन बोराटे, नितीन कुलकर्णी, भुमी पाटील
निर्मातागीतांजली पाटील, सर्जेराव पाटील
प्रदर्शित तारीख५ जुलै २०२४
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.४⭐/ ५

“विषय हार्ड” चित्रपट समीक्षा :-

कोरोनाच्या काळात काय परिस्थिती निर्माण झाली होती हे आजही आठवलं तरी भिती वाटते इतक्या त्या कटू आठवणी आहेत. पण या काळात बरीच लग्न सुद्धा झाली होती. त्यामुळे त्यांच्या नक्कीच चांगल्या आठवणी असतील. अशीच कोरोनाच्या काळात घडलेली एक धमाल प्रेमकहाणी उलगडली आहे दिग्दर्शक सुमित पाटील यांनी “विषय हार्ड” या चित्रपटातून.
डॉली(पर्ण पेठे) आणि संद्या(सुमित पाटील) यांच्या प्रेमाची ही गोष्ट आहे. कथा काही फार वेगळी किंवा नवीन नाही. एका छोट्या गावात घडणारी ही कथा आहे. डॉली आणि संद्या चं एकमेकांवर प्रेम आहे आणि त्यांना लग्न करायचं असतं म्हणून संद्या पैसे कमावण्यासाठी पुण्यात गेलेला असतो. तो एकदा असाच सुट्टी वर येतो तेव्हा नेमकं कोरोनाची साथ पसरते आणि पुण्यावरून आलेल्या संद्याला काही दिवसांसाठी क्वारंटाईन व्हावं लागतं. पण नेमकं तेव्हाच डॉली चे वडील तिचं लग्न एका हवालदारा सोबत ठरवत असतात. आणि हे जेव्हा संद्या ला कळतं तेव्हा तो हे लग्न थांबवण्यासाठी त्या क्वारंटाईन केलेल्या घरातून पळून जातो. त्या नंतरची सगळी धमाल विनोदी पद्धतीने चित्रपटात पहायला मिळते.
आता तो हे लग्न थांबवतो का.? डॉली आणि संद्या चं लग्न होतं का.? हे बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल. एक साधी हलकी फुलकी कथा आहे, दिग्दर्शन चांगलं आहे. कलाकारांनी अभिनय चांगला केला आहे. थोडीशी संथ वाटणारी कथा आहे त्यात कोरोना वैगरे काळातील आहे त्यामुळे आत्ता ती जुनी असल्यासारखी वाटते. कमी बजेट मुव्ही असल्याने तांत्रिकदृष्ट्या तेवढी सक्षम नाही. परंतु एकदा बघायला हरकत नाही असा हा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.


२. आम्ही जरांगे (Amhi Jarange)
२०२४. जीवनचरित्र, ड्रामा. २ तास २४ मिनिटे. [U/A]
लेखक किशोर गरद, संजय नावगिरे, सुरेश पंडीत
दिग्दर्शकयोगेश भोसले
कलाकारमकरंद देशपांडे, सुबोध भावे, अजय पुरकर, प्रसाद ओक, भुषण पाटील, अमृता धोंगडे
निर्मातामधुसूदन मगर, उत्तमराव मगर, योगेश भोसले, दत्ता मोरे
प्रदर्शित तारीख५ जुलै २०२४
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.५⭐/ ५

“आम्ही जरांगे” चित्रपट समीक्षा :-

महाराष्ट्रातील मराठा समाज आणि आरक्षण हा वाद कित्येक दिवसांपासून धगधगत आहे. त्याचसाठी मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी एक आंदोलन सुरू केलं आणि यात मोठ्या संख्येने मराठा समाज त्यांच्या पाठीशी उभा राहिला. हे आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत गेलं, सरकारला दखल घ्यावी लागली. मराठा समाजाच्या हक्कांसाठी, न्यायासाठी संघर्ष करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट योगेश भोसले यांनी दिग्दर्शित केलेला आहे. बरेच दिवस रखडलेला ह चित्रपट शेवटी ५ जुलै रोजी प्रदर्शित झालेला आहे.
चित्रपटाची कथा म्हणजेच मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी केलेला संघर्ष. मनोज जरांगे यांची भूमिका मकरंद देशपांडे यांनी साकारली आहे. परंतु संपूर्ण चित्रपटात ते मनोज जरांगे कमी मकरंद देशपांडे जास्त वाटतात. मकरंद देशपांडे हे खरं तर अतिशय उत्तम कलाकार आहेत परंतु या चित्रपटात त्यांनी अभिनय चांगला केला असला तरी मनोज जरांगे ही भूमिका वठवता आली नाही. बाकी इतर सुबोध भावे, अजय पुरकर आणि प्रसाद ओक यांचा अभिनय उत्तम आहे. बजेट कमी असल्यामुळे तांत्रिक गोष्टी ठिकठाक जमल्या आहेत. एक कलाकृती म्हणून बघायला हरकत नाही. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.


३. बाई गं (Bai Ga)
२०२४. विनोदी, परिवार, ड्रामा. २ तास १४ मिनिटे. [U/A]
लेखक पांडुरंग कृष्ण जाधव
दिग्दर्शकपांडुरंग कृष्ण जाधव
कलाकारस्वप्नील जोशी, प्रार्थना बेहरे, सुकन्या मोने, नम्रता गायकवाड, अदिती सारंगधर, नेहा खान
निर्माताडॉ आशिष अग्रवाल, नितीन वैद्य
प्रदर्शित तारीख१२ जुलै २०२४
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.५⭐/ ५

“बाई गं” चित्रपट समीक्षा :-

“बाई गं” हा चित्रपट बघितल्यावर “बाई गं” कुठून हा चित्रपट बघायला आलो अशी प्रतिक्रिया बऱ्याच प्रेक्षकांनी दिली. पांडुरंग जाधव यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात कलाकारांची फौज आहे परंतु सामान्य पटकथे मुळे चित्रपट तेवढा प्रभावी नाही.
ही गोष्ट आहे एका जोडप्याची, जे लंडनमध्ये राहतात. आपलं छान वैवाहिक आयुष्य असावं असं स्वप्न पाहणाऱ्या धनुषच्या खऱ्याखुऱ्या आयुष्यात मात्र रोजची भांडण आणि कटकटी असतात. धनुष आणि अबोली यांच्या वैवाहिक आयुष्यात सुख कमी आणि भांडणं जास्त असं चालू असतं. याचं कारण जेव्हा धनुष देवाला विचारतो तेव्हा त्याला कळतं की त्याच्या आधीच्या पाच जन्मात त्याने त्याच्या पाचही बायकांना त्रास दिलेला असतो. त्यामुळे आता त्याचं प्रायश्चित्त म्हणून त्या पाच बायका राहीलेल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी परत त्याच्या आयुष्यात येतात. आणि मग आयुष्य सुखी होण्या ऐवजी अजून गोंधळ निर्माण होतो. आता त्या पाचजणी आल्यावर नक्की काय होतं हे बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल.
चित्रपटाची कथा भरकटलेली वाटते. कलाकारांचा अभिनय चांगला आहे परंतु म्हणावं असं विशेष चित्रपटात काही नाही. संगीत सुमार आहे. संवाद अजून चांगले असते तर कदाचित पटकथा थोडी तरून गेली असती. एकंदर ठिकठाक चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार.


४. रांगडा (Rangada)
२०२४. ॲक्शन, ड्रामा. २ तास ४ मिनिटे. [U/A]
लेखक आयुब हवालदार, दिपक ठुबे
दिग्दर्शकआयुब हवालदार
कलाकारभुषण शिवतरे, मयुरी नव्हाते, अमोल लंके, निकीता पेटकर
निर्माताकिरण फाटे, अब्बास मुजावर, मच्छिंद्र लंके आणि इतर
प्रदर्शित तारीख१२ जुलै २०२४
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.५⭐/ ५

“रांगडा” चित्रपट समीक्षा :-

महाराष्ट्रातील कुस्ती आणि बैलगाडी शर्यत यावर मराठीमध्ये बरेच नाही पण काही ठराविक चित्रपट येऊन गेले आहेत. पूर्वी या दोन्ही गोष्टींना खूप महत्त्व होतं, लोकप्रियता होती जी आज काही ठराविक ठिकाणीच बघायला मिळते. आयुब हवालदार यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट याच कुस्ती आणि बैलगाडी शर्यत यावर आधारित आहे.
एका गावातील जय नावाच्या रांगड्या तरूणाची ही गोष्ट आहे. ज्याला कुस्ती आणि बैलगाडा शर्यतीची आवड आहे. कॉलेजमध्ये शिकणाऱ्या जयला खूप संघर्ष करावा लागतो कारण त्या गावातील राजकारणी गुंड सुर्याजी सोबत त्याची दुश्मनी सुरू होते. ॲक्शन, कुस्ती, मारामारी या सगळ्यासोबत प्रेमकथेची झालर सुद्धा या चित्रपटात आहे. जय आणि देविका यांची प्रेमकहाणी सुद्धा यात बघायला मिळते.
चित्रपटाची कथा पटकथा संवाद सुमार आहेत. दिग्दर्शन ठिकठाक आहे. कलाकारांची संवादफेक नाटकी वाटते. सिनेमॅटोग्राफी सुद्धा खास नाही. कमी बजेट चित्रपट असल्यामुळे बऱ्याच गोष्टींची कमतरता जाणवते. महाराष्ट्रातील कुस्ती आणि बैलगाडा शर्यत यावर आधारित चित्रपट करण्याचा प्रयत्न म्हणून बघायला हरकत नाही. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार.


५. यारी (Yaari)
२०२४. विनोदी, ड्रामा, रोमँटिक. २ तास २४ मिनिटे. [U/A]
लेखक चेतन सागडे
दिग्दर्शकचेतन सागडे
कलाकारपवन चौरे, अरबाज शेख, अपेक्षा चव्हाण, सुनील गोडबोले
निर्माताकिरण ढमाले
प्रदर्शित तारीख१२ जुलै २०२४
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.४⭐/ ५

“यारी” चित्रपट समीक्षा :-

आजकाल बरेच मराठी चित्रपट प्रदर्शित होत असतात परंतु काही चित्रपट कधी येतात आणि कधी जातात याचा प्रेक्षकांना पत्ता देखील लागत नाही. एकतर त्याच त्याच कथा पटकथा, तेच प्रेमाचे त्रिकोण, त्यात मग प्रेमापेक्षा मैत्री वरचढ हे दाखवणारे कित्येक चित्रपट येत राहतात. १२ जुलै रोजी प्रदर्शित झालेला यारी हा चित्रपट सुद्धा अशाच प्रकारचा आहे.
चित्रपटाची कथा दोन मित्रांची आणि त्यांच्या प्रेमाची आहे. थोडीफार कॉमेडी, थोडेफार ॲक्शन सीन्स आणि रोमान्स असं सगळं दाखवण्याचा प्रयत्न दिग्दर्शक चेतन सागडे यांनी केला आहे. आपल्या मित्राला त्याचं प्रेम म्हणजे साक्षी, मिळवून देण्यासाठी श्रेयस साक्षीला पळवून नेण्यासाठी मदत करतो. परंतु खरी गोष्ट नंतर सुरू होते कारण याच श्रेयसच्या प्रेमात जेव्हा साक्षी पडते तेव्हा पूर्ण गोष्ट बदलून जाते. पुढे नक्की काय होतं हे बघण्यासाठी मात्र हा चित्रपट बघावा लागेल.
चित्रपटाची कथा पटकथा नवीन नाही. संवाद ठिकठाक आहेत. दिग्दर्शन ठिकठाक आहे. सिनेमॅटोग्राफी, संगीत, गाणी म्हणावं असं विशेष नाही. एकंदर मनोरंजन करण्यासाठी हा चित्रपट कमी पडतो. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार.


६. डंका हरी नामाचा (Danka Hari Namacha)
२०२४. भक्तिमय, ड्रामा. २ तास १६ मिनिटे. [U/A]
लेखक श्रेयस जाधव
दिग्दर्शकश्रेयस जाधव
कलाकारअनिकेत विश्वासराव, अविनाश नारकर, किरण गायकवाड, प्रियदर्शन जाधव, रसिका
निर्मातारविंद्र फड
प्रदर्शित तारीख१९ जुलै २०२४
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.३⭐/ ५

“डंका हरी नामाचा” चित्रपट समीक्षा :-

नावावरून लक्षात आलं असेल की हा चित्रपट आपल्या विठू माउलीवर आधारित आहे. श्रेयस जाधव यांनी या चित्रपटाची कथा लिहिली असून दिग्दर्शन केलेलं आहे. या आधी सुद्धा विठ्ठलाभक्ती वर आधारित असे मराठी मध्ये अनेक चित्रपट येऊन गेले आहेत. हा चित्रपट सुद्धा थोडाफार त्याच धाटणीचा आहे.
जना, सनी आणि बॉबी (अनिकेत विश्वासराव, प्रियदर्शन जाधव आणि किरण गायकवाड) हे तीन तरूण आपल्या गावातील विठ्ठल मंदिर वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. झालंय असं की या मंदिराच्या जागेवर
गावातील राव राजे (सयाजी शिंदे) याचा डोळा असतो. त्याला त्या जागेवर दारूची भट्टी बांधायची आहे. परंतु गावकऱ्यांना हे मान्य नाही. मंदीरातील मुर्ती कुठे आहे याचा शोध घेण्यासाठी जना, सनी आणि बॉबी हे तिघे कसे गोव्यात जाऊन पोहचतात, त्यांना तिथे गेल्यावर काय अनुभव येतो, विठ्ठलाची मुर्ती सापडते का.? हे सारं नाट्यमय पद्धतीने दाखवलं आहे.
चित्रपटाचा विषय चांगला होता परंतु कथा पटकथा नीट गुंफता आली नाही. त्यात इतकी पात्रं आहेत आणि प्रत्येकाची काहीतरी स्टोरी त्यामुळे मुख्य कथेमध्ये खूप गोंधळ निर्माण झाला आहे. कलाकारांचा अभिनय चांगला आहे. विठू माउली सोबत चित्रित झालेले सीन्स सुंदर झाले आहेत. एकंदर मनोरंजन म्हणून एकदा बघायला हरकत नाही असा हा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.


७. एक दोन तीन चार (Ek Don Teen Chaar)
२०२४. विनोदी, ड्रामा, परिवार. २ तास ८ मिनिटे. [U/A]
लेखक वरूण नार्वेकर, निपुण धर्माधिकारी
दिग्दर्शकवरुण नार्वेकर
कलाकारनिपुण धर्माधिकारी, वैदेही परशुरामी, हृषीकेश जोशी, शैला काणेकर, मृणाल कुलकर्णी, करण सोनावणे
निर्माताज्योती देशपांडे
प्रदर्शित तारीख१९ जुलै २०२४
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.९⭐/ ५

“एक दोन तीन चार” चित्रपट समीक्षा :-

फार मसाला नसलेला, भांडणं द्वेष मारामारी कपट कारस्थान असं काही नसलेला साधा सरळ चित्रपट तुम्हाला आवडत असेल तर एक दोन तीन चार हा चित्रपट तुमच्यासाठी आहे.
वरूण नार्वेकर आणि निपुण धर्माधिकारी यांनी मिळून या चित्रपटाची कथा लिहिली असून वरूण नार्वेकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटाची मांडणी हलकी फुलकी विनोदी मधेच गंभीर अशी असली तरी विषय थोडा वेगळा आहे. पीएचडी करत असलेली सायली आणि एचआर असलेला समीर हे दोघं वयाने तसे लहान असतात. सायली आणि समीर हे जोडपं कॉलेज मध्ये असतानाच एकमेकांच्या प्रेमात पडलेलं असतं. लग्नानंतर सुद्धा त्यांचं आयुष्य सरळ मार्गाने हसत खेळत सुरू असतं. पण एके दिवशी अचानक त्यांच्या आयुष्यात बॉम्ब फुटतो. आपण आई बाबा होणार याचा आनंद साजरा करता करता त्यांना कळतं की त्यांना एक दोन नाही तर चार मुलं होणार आहेत. आणि इथुन खरी कथा सुरू होते.
यानंतर मुलं होऊ द्यायची की नाही हा निर्णय घेणे असेल किंवा या प्रक्रियेत सायली चे होणारे मूड स्विंग असतील, किंवा समीरला इतक्या लहान वयात बाप होण्याचं दडपण असेल हे सगळं छान पद्धतीने दाखवलं आहे. बऱ्याच कलाकारांनी अगदी थोडा वेळ स्क्रीन वर अभिनय केला आहे परंतु तो बघायला छान वाटतं. एकंदर एक अवघड किंवा महत्वाचा विषय छान पद्धतीने वरूण नार्वेकर यांनी दाखवला आहे . संगीत गाणी अजून छान असती तर चित्रपट जास्त प्रभावी वाटला असता. परंतु एक कौटुंबिक असा हा चित्रपट विनोदी पद्धतीने मांडल्यामुळे बघायला मजा येते. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.


८. घरत गणपती (Gharat Ganpati)
२०२४. विनोदी. ड्रामा, परिवार. २ तास १९ मिनिटे. [U]
लेखक नवज्योत बांदिवडेकर, आलोक सुतार
दिग्दर्शकनवज्योत बांदिवडेकर
कलाकारशरद भुताडिया, सुषमा देशपांडे, अश्विनी भावे, अजिंक्य देव, शुंभांगी गोखले. भूषण प्रधान, निकिता दत्ता, शुभांगी लाटकर, संजय मोने, परी तेलंग, आशिष पाथोडे, राजसी भावे, समीर खांडेकर
निर्माताअभिषेक पाठक
प्रदर्शित तारीख२६ जुलै २०२४
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.०⭐/ ५

“घरत गणपती” चित्रपट समीक्षा :-

कोकणातील गणेशोत्सव हा खास असतो हे सगळ्यांनाच माहीत आहे. मुंबई पुणे व इतर शहरांत स्थिरावलेला चाकरमानी बाकी कशाला नाही पण गणपतीत मात्र हमखास गावी येतो. असंच एक कोकणातील १२४ वर्षांची परंपरा जपणारं घरत कुटुंब आणि त्यांच्या घरातील गणेशोत्सव यावर हा चित्रपट आधारित आहे.
घरत कुटुंबाचे प्रमुख अप्पा (डॉ. शरद भुताडिया) आणि माई (सुषमा देशपांडे) यांना भाऊ(संजय मोने), शरद(अजिंक्य देव) ही दोन मुलं आणि एक मुलगी कुसुम (शुभांगी गोखले)असते. भाऊ आणि त्याची बायको सुनंदा(शुभांगी लाटकर) हे गावी असतात तर शरद व‌ त्याची पत्नी अहिल्या(अश्विनी भावे) हे शहरात असतात परंतु ते दरवर्षी सुद्धा गणपतीला येत असतात. कोकणातील सर्वसाधारणपणे प्रत्येक घरात एक मुलगा गावचं घर सांभाळत गावी असतो तर एक चाकरमानी. तसंच भाऊ आणि शरद यांचं देखील असतं. परंतु आता त्या दोघांच्या बायकांना पिढ्यान् पिढ्या चालत आलेली गौरी गणपतीची परंपरा रद्द करून दरवर्षी दिड दिवसाचा गणपती आणावा असं वाटतं असतं. परंतु आप्पांजवळ हे बोलणार कोण हे ठलत नसतं. या गणपतीला सगळे आलेले असतात तसंच शरद यांचा दिल्लीला असणारा मुलगा केतन(भुषण प्रधान) हा त्याच्या मैत्रिणीला क्रिती(निकीता दत्त) हिला घेऊन गावी आलेला असतो. घरी तो सांगतो की तिला कोकणातील गौरी गणपतीचा सण बघायचा आहे पण खरं कारण वेगळं असतं. आता ते काय ते तुम्ही समजून घ्याल. आता ते त्याच्या घरच्यांना कळतं की नाही हे बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल. अशी साधी सरळ गोष्ट आहे परंतु सुखाने नांदत असलेल्या एकत्र कुटुंबात जेव्हा अहंकार घुसतो तेव्हा काय गैरसमज निर्माण होतात हे दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर यांनी छान दाखवलं आहे. नात्यांमधील अहंकार कसं माणसाला एकटं पाडू शकतो, आपल्या रुढी परंपरा सण हे नातेसंबंध दृढ होण्यासाठी किती महत्वपूर्ण आहेत हे उत्तमरित्या मांडलेलं आहे. त्यांचा हा पहिलाच चित्रपट असला तरीही दिग्दर्शन उत्तम आहे.
कोकणातील नयनरम्य दृश्यं पडद्यावर बघणं हा सोहळा असतो, सिनेमॅटोग्राफी उत्तम आहे. कलाकारांनी अभिनय उत्तम केला आहे. भुषण प्रधान आणि निकीता यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री छान जुळून आली आहे. एकंदर मनोरंजन करणारा एक हलकाफुलका छान चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.


९. गुगल आई (Google Aai)
२०२४. ड्रामा, थ्रिलर. २ तास ९ मिनिटे. [U/A]
लेखक गोविंद वराह
दिग्दर्शकगोविंद वराह
कलाकारप्राजक्ता गायकवाड, अश्विनी कुलकर्णी, प्रणव रावराणे, सई रेवडीकर, माधव अभ्यंकर
निर्माताडॉलर्स दिवाकर रेड्डी
प्रदर्शित तारीख२६ जुलै २०२४
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.४⭐/ ५

“गुगल आई” चित्रपट समीक्षा :-

मराठी कथेला साऊथ चा तडका देऊन एक वेगळा चित्रपट बनवण्याचा प्रयत्न लेखक दिग्दर्शक गोविंद वराह यांनी केला आहे. गुगल आई हा चित्रपट नावाप्रमाणेच टेक्नॉलॉजी चा वापर करून संकटावर मात कशी करता येईल हे सांगणारा आहे.
एका स्ट्रगल करणाऱ्या दिग्दर्शकाची ही गोष्ट आहे. ज्याच्याकडे कथा आहे परंतु चित्रपट बनवण्यासाठी निर्माता नाही. खूप स्ट्रगल केल्यानंतर त्याला कथा सांगण्यासाठी एकदा पत्नी आणि मुलीसोबत हैदराबाद येथे जावं लागतं. परंतु तिथे असं काही घडतं की त्याच्या आयुष्यात वादळ येतं. त्यांची मुलगी कशी गायब होते. अतिरेक्यांचे मिशन आणि याचं कुटुंब याचा कसा संबंध येतो. आपल्या कुटुंबाला तो‌ कसा वाचवतो हे सगळं ॲक्शन सीन्स, मारामारी सस्पेन्स ठेवून दाखवण्याचा प्रयत्न दिग्दर्शक यांनी केलेला आहे. परंतु चित्रपटातील सीन्स आणि संवाद नाटकी वाटतात. कलाकारांचा अभिनय ठिकठाक आहे.
कमी बजेट असल्यामुळे चित्रपट बऱ्याच ठिकाणी कमी पडतो. असे चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यापेक्षा थेट ओटीटी वर प्रदर्शित करावे. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.

तर मंडळी गेल्या महिन्यात तुम्ही यातील कोणकोणते चित्रपट पाहिले ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *