HomeFilmsHindi

जुलै 2025 मध्ये रिलीझ झालेल्या हिंदी चित्रपटांची यादी आणि त्यांची समीक्षा

List of Hindi Movies released in July 2025 and their reviews

Written by : आकांक्षा कोलते

Updated : डिसेंबर 28, 2025 | 04:34 PM

खरं तर आता वेबसिरीज चा जमाना असल्यामुळे प्रेक्षकांच्या चित्रपटांच्या बाबतीत अपेक्षा वाढल्या आहेत. त्यातही नवीन आलेल्या चित्रपटांमध्ये ओरिजनल कंटेट कमीच असतो. बरेच चित्रपट हे रिमेक असतात. त्यामुळे चित्रपटगृहात प्रेक्षकांना खेचून आणणं हे आता निर्माते आणि दिग्दर्शक यांच्यापुढे नवीन आव्हान आहे. आता प्रेक्षकांच्या चित्रपटांच्या बाबतीत असलेल्या अपेक्षा पूर्ण होतायत की नाही हे आमच्या परीने सांगण्याचा प्रयत्न या लेखात आम्ही करणार आहोत.

 आज या लेखात जुलै २०२५ महिन्यात प्रदर्शित झालेले चित्रपट कोणते आहेत आणि बघायला हवेत की नको याबद्दल आमचं मत सांगणार आहोत.

जुलै २०२५ मध्ये प्रदर्शित झालेले हे हिंदी चित्रपट तुम्ही पाहिलेत का.?

List of Hindi Movies released in July 2025 and their reviews

१. मेट्रो इन दिनो (Metro In Dino)
२०२५. ड्रामा, रोमॅन्स. २ तास ३ मिनिटे. [U/A १६+]
लेखक अनुराग बसु, सम्राट चक्रवर्ती, संदीप श्रीवास्तव
दिग्दर्शकअनुराग बसु
कलाकारअनुपम खेर, नीना गुप्ता, पंकज त्रिपाठी, कोंकणा सेन शर्मा, अली फजल, फातिमा सना शेख, आदित्य रॉय कपूर, सारा अली खान
निर्माताअनुराग बसु, भूषण कुमार, कृष्ण कुमार, तानी बसु
रिलीज तारीख४ जुलै २०२५
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.०⭐/ ५

मेट्रो इन दिनो” चित्रपट समीक्षा :-

२००७ साली प्रदर्शित झालेल्या अनुराग बसू दिग्दर्शित “लाईफ इ‌न अ मेट्रो” या चित्रपटाचा सिक्वेल म्हणजे “मेट्रो इन दिनो” हा चित्रपट ४ जुलै रोजी नेटफ्लिक्स वर प्रदर्शित झाला. अनुराग बसू म्हटल्यावर दर्जेदार संगीत आणि काळाच्या पुढे जाऊन विचार करून केलेली कलाकृती हे समीकरण असतं. आधीचा लाइफ इन मेट्रो हा चित्रपट उत्तम होताच परंतु त्या तुलनेत मेट्रो इन दिनो हा चित्रपट कसा आहे हे जाणून घेऊया.
या चित्रपटात देखील चार वेगवेगळ्या शहरात घडणाऱ्या परंतु एकमेकांशी निगडित असलेल्या चार वेगवेगळ्या कथा आहेत. मुख्यतः सध्याचं जीवनमान आणि नात्यांमधील गुंता त्यातूनच निर्माण होणारे अनैतिक नाती, विवाहबाह्य संबंध यावर आधारित ही कथा आहे. मोंटी (पंकज त्रिपाठी) आणि काजोल (कोंकणा सेन शर्मा) हे मुंबईत राहणारं एक जोडपं आहे. ज्यांना एक पंधरा वर्षांची मुलगी आहे आणि त्या दोघांच्या नात्यात एक प्रकारचा अबोला आहे. वरवर बघता सगळं सुरळीत असूनही नवरा बायको म्हणून असलेलं नातं कोमेजलेलं आहे. दोघंही एकमेकांशी न बोलता मोबाईल वर वेळ घालवणं पसंत करतात. अशातच मोंटीला मित्रांकडून डेटींग ॲप बद्दल माहिती मिळते, तर दुसरीकडे काजोलचं देखील असंच काहीसं चालू आहे. यांचं पुढे काय होतं ही या दोघांची गोष्ट.
तर दिल्लीत राहणारी काजोलची बहीण चुमकी (सारा अली खान) हिचं लग्न आनंद (कुश जोतवानी) याच्यासोबत ठरलेलं असताना अचानक तिच्या आयुष्यात एक ब्लॉगर असलेला पार्थ (आदित्य रॉय कपूर) येतो आणि तिचाही नात्यांमधील गुंता वाढतो. तर तिसरी गोष्ट पार्थची मैत्रीण श्रुति (फातिमा सना शेख) आणि तिचा नवरा आकाश (अली फजल) यांची आहे . म्युझिक मध्ये करिअर करू बघणाऱ्या आकाशला इतक्यात मुल नकोय तर श्रुतीला मात्र आई व्हायचं आहे . यावरून दोघांमध्ये वाद असतात. तर चौथी गोष्ट आहे काजोल आणि चुमकीची आई शिवानी (नीना गुप्ता) आणि तिचा कॉलेज मधील मित्र परिमल (अनुपम खेर)यांची आहे. दोघंही आपापल्या लग्नानंतर बऱ्याच वर्षांनी परत एकत्र आलेले आहेत. तर या सगळ्यांच्या आयुष्यात असलेल्या समस्या, एकटेपणा, घुसमट आणि या सगळ्या मधून बाहेर पडण्यासाठी त्यांनी निवडलेले‌ मार्ग आणि बनवलेली ही नाती या सगळ्यावर हा चित्रपट आहे. या सगळ्याचा शेवट काय हे बघण्यासाठी अर्थात हा चित्रपट बघावा लागेल.
चित्रपट चांगला आहे. संगीत, गाणी छान आहेत. परंतु आधीच्या चित्रपटात जे होतं ते या चित्रपटात सापडत नाही ते म्हणजे ते कनेक्शन. आपण रिलेट करतो असं चित्रपटात फार काही घडत नाही. उलट काही गोष्टी पचनी पडत नाही. चित्रपट बघताना काही गोष्टी खटकतात. विवाहबाह्य संबंध असणं यात काही गैर नाही असा एक संदेश आडून आडून दिला जातो जे चुकीचं वाटतं. अनुराग बसू यांचं दिग्दर्शन चांगलं आहे. आदित्य रॉय कपूर, अनुपम खेर, नीना गुप्ता यांचा अभिनय उत्तम आहे. एकंदरीत चित्रपट ठिकठाक झालेला आहे . माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.


२. कालीधर लापता (Kaalidhar Laapata)
२०२५. ड्रामा, विनोदी. १ तास ४९ मिनिटे. [U]
लेखक मधुमिता
दिग्दर्शकमधुमिता
कलाकारअभिषेक बच्चन,दैविक भगेला,मोहम्मद जीशान अय्यूब,निमरत कौर
निर्माताउमेश केआर बन्सल, प्रगती देशमुख, मोनिशा अडवाणी, मधु भोजवानी आणि निखिल अडवाणी
रिलीज तारीख४ जुलै २०२५
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.⭐/ ५

“कालीधर लापता” चित्रपट समीक्षा :-

कालिधर लापता हा चित्रपट मधुमिता यांनी दिग्दर्शित केलेला असून हा एका तमिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. कालिधरची गोष्ट आपण आपल्या आजुबाजुला बऱ्याचदा घडताना बघत असतो. कुटुंबातील थोरली व्यक्ती, ज्या व्यक्तीने आपलं अख्खं आयुष्य आपल्या कुटुंबासाठी खर्ची घातलेलं असतं अशी व्यक्ती जेव्हा म्हातारी होते, तेव्हा त्या व्यक्तीची घरातील किंमत आपोआप कमी होते. वयोवृद्ध माणसं जणू टाकाऊ होतात आणि नकोशी होतात. सगळ्या नसली तरीही बऱ्याच घरांमध्ये ही परिस्थिती असते. अशाच परिस्थितीवर बेतलेला कालिधर लापता हा चित्रपट बऱ्याच सामाजिक आणि कौटुंबिक जीवन मुल्यांवर भाष्य करतो.
कालिधर(अभिषेक बच्चन) हा चाळीशी पार केलेला आणि पन्नाशी गाठत असलेला एक इसम आहे ज्याला अल्झायमर असल्यामुळे तो स्वतःचं नाव देखील बऱ्याचदा विसरतो. आईवडिलांच्या मागे आपल्या लहान भावंडांना मोठं करून त्यांना मार्गी लावलेलं आहे. परंतु तो स्वतः जेव्हा या आजारामुळे त्रासलेला आहे तेव्हा मात्र हीच भावंडं त्याला प्रॉपर्टीच्या कागदपत्रांवर अंगठा घेऊन
एका जत्रेत सोडून येतात कारण त्यांच्यासाठी आता तो निरूपयोगी आहे. तिकडे आपण हरवलोय आणि आपल्या भावंडांनी हे जाणूनबुजून केलं आहे हे लक्षात आल्यावर कालिधर खूप एकटा पडतो. परंतु त्याच्या आयुष्यात एक बल्लू नावाचं नवीन छान वळण येतं. बल्लू हा एक अनाथ मुलगा असतो. तो कालिधरचा कसा आधार बनतो, त्याच्या अपूर्ण इच्छा, स्वप्नांना कसं पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो हे खूप भावनिक पद्धतीने दाखवलं आहे. हसवता हसवता डोळ्यात पाणी आणणारा हा चित्रपट आहे.
अभिषेक बच्चन आणि दैविक भगेला यांनी उत्तम काम केलेलं आहे. कलिधरला शोधण्यासाठी प्रयत्न करणारा पोलिस (जीशान अय्यूब) याने देखील नेहमीप्रमाणे काम छान केलं आहे. दिग्दर्शन अर्थातच छान आहे परंतु बऱ्याचदा चित्रपट रेंगाळलेला वाटतो. कथा तुकड्या तुकड्यांनी जोडलेली वाटते. परंतु एकदा बघायला हवा असा हा चित्रपट नक्कीच आहे. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.


३. अक्षरधाम : ऑपरेशन वज्रशक्ती (Akshardham: Operation Vajra Shakti)
२०२५. ॲक्शन, ड्रामा, वॉर, सस्पेंस. १ तास ४८ मिनिटे. [U/A १६+]
लेखक विल्यम बोर्थविक सायमन फॅन्टाउझो
दिग्दर्शककेन घोष
कलाकारअक्षय खन्ना,अभिमन्यु सिंह, गौतम रोडे, विवेक दहिया, अक्षय ओबेरॉय, अभिलाष चौधरी, चंदन रॉय, शिवम भार्गव
निर्माताअभिमन्यु सिंह
रिलीज तारीख४ जुलै २०२५
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.⭐/ ५

“अक्षरधाम : ऑपरेशन वज्रशक्ती” चित्रपट समीक्षा :-

४ जुलै रोजी प्रदर्शित झालेला अक्षरधाम हा चित्रपट खरं तर या आधी झी फाईव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्म वर २०२१ मध्येच स्टेट ऑफ सीज: टेम्पल ॲटॅक या नावाने प्रदर्शित झाला होता. परंतु परत एकदा नवीन नावाने मोठ्या पडद्यावर हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. २००२ साली गुजरात मधील अक्षरधाम मंदिरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर आधारित हा चित्रपट आहे.
२४ सप्टेंबर २००२ हा दिवस अख्ख्या भारत देशासाठी काळा दिवस ठरला. याच दिवशी गुजरातच्या गांधीनगरमधील अक्षरधाम मंदिरावर दोन दहशतवाद्यांनी घुसून त्यांच्या एके ५६ रायफलमधून बेछूट अंधाधुंद गोळीबार करत हल्ला केला होता. या हल्ल्यात ३० लोकांनी आपले प्राण गमावले होते तर ८० लोक गंभीर जखमी झाले होते. त्यावेळी ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आणि भाविकांची सुटका करण्यासाठी एनएसजी कमांडो ना पाचारण करण्यात आलं होतं. आपल्या जीवावर उदार होऊन या कमांडो नी त्या दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.
मेजर हनुत सिंह(अक्षय खन्ना) याने एनएसजी कमांडोची भूमिका उत्तम साकारली आहे. दिग्दर्शन अर्थातच उत्तम आहे. एखाद्या विकेंड ला बघण्यासाठी हा चित्रपट एक नक्कीच चांगला पर्याय आहे. झी फाईव्ह आणि ॲमेझॉन प्राईमवर हा चित्रपट तुम्ही बघू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.


४. मालिक (Maalik)
२०२५. ॲक्शन, ड्रामा. २ तास २९ मिनिटे. [A]
लेखक ज्योत्सना नाथ, पुलकित
दिग्दर्शकपुलकित
कलाकारराजकुमार राव, मानुषी छिल्लर, अंशुमान पुष्कर, सौरभ शुक्ला, प्रोसेनजीत चटर्जी, हुमा कुरैशी
निर्माताभूषण कुमार, कृष्ण कुमार, अनीता टंडन, संदीप शर्मा
रिलीज तारीख११ जुलै २०२५
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.⭐/ ५

“मालिक ” चित्रपट समीक्षा :-

राजकुमार राव म्हटलं की काहीतरी चांगलं, दर्जेदार बघायला मिळणार हे एक ठरलेलं आहे परंतु यावेळी राजकुमार राव याचा ११ जुलै रोजी प्रदर्शित झालेला मालिक हा चित्रपट बघितल्यावर तुमची निराशा होऊ शकते.
थेट ऐंशीच्या दशकात घडणारी कथा म्हणजे नवीन पॅकेजिंग पण जुनाच माल अशी अवस्था आहे.
इलाहाबाद मध्ये घडणारी ही कथा आहे. टिपिकल नव्वदच्या काळातील चित्रपटांसारखी कथा आहे. संजय दत्त चा वास्तव किंवा मनोज वाजपेयी चा सत्या असे चित्रपट तुम्हाला आठवतील. एका गरीब दुसऱ्याच्या शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याच्या घरात जन्माला आलेला पण स्वतःला मालक म्हणून सिद्ध करू बघणाऱ्या दिपक (राजकुमार राव)ची ही कथा आहे. राजेंद्र गुप्ता या शेतकऱ्याचा हा मुलगा आपल्या वडिलांच्या मालकाच्या पाया पडण्यासाठी नकार देत आपण स्वतः मालकासारखं आयुष्य जगलं पाहिजे या तत्वावर गुंडगिरी करत आपलं वर्चस्व प्रस्थापित करत असतो. त्यासाठी अख्ख्या चित्रपटात फक्त मारामारी, बंदूकीच्या गोळ्या झाडणं, रक्तपात इतकंच तो करत असतो. त्याच्या गुंडगिरीचा दबदबा इतका निर्माण होतो की त्याला संपवायला एन्काऊंटर स्पेशालिस्ट एसपी प्रभु दास (प्रोसेनजीत चटर्जी) याला त्याच्या मागे लावलं जातं. या सगळ्यात मालिकवर प्रेम करणारी मानुषी छिल्लर पण आहे जिचे हावभाव संपूर्ण चित्रपटात एकसारखे दिसतात. एकंदरीत चित्रपट इतका फसलाय की राजकुमार रावने स्क्रिप्ट न वाचताच चित्रपट साईन केला असावा असं वाटतं. त्याचा अभिनय सोडल्यास चित्रपटात काही बघण्यासारखं नाही. क्लायमॅक्स पण बरा आहे. पटकथाच इतकी रटाळ आणि जुनी आहे की दिग्दर्शकाला करण्यासाठी काही स्कोपच नाही. राजकुमार रावचे फॅन असाल तर चित्रपट बघू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार.


५. आँखो की गुस्ताखियां (Aankhon Ki Gustaakhiyan)
२०२५. ड्रामा, रोमॅन्स. २ तास १९ मिनिटे. [U/A १६+]
लेखक मानसी बागला
दिग्दर्शकसंतोष सिंह
कलाकारविक्रांत मेस्सी, शनाया कपूर, झैन खान दुरानी, विक्रम कोचर
निर्मातामानसी बागला, वरूण बागला
रिलीज तारीख११ जुलै २०२५
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – .⭐/ ५

“आँखो की गुस्ताखियां” चित्रपट समीक्षा :-

११ जुलै रोजी प्रदर्शित आँखो की गुस्ताखियां या चित्रपटाची कथा लेखक रस्किन बॉन्ड याचं प्रसिद्ध पुस्तक “’द आईज हॅव इट’ पर आधारित आहे. दिग्दर्शक संतोष सिंह याने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं असून संजय कपूरची मुलगी शनाया कपूर हीने या चित्रपटात पदार्पण केलं आहे.
“प्रेम आंधळं असतं” या एका टॅग लाईन वर चित्रपट आधारित आहे. चित्रपटाचा विषय बरा होता परंतु कथा आणि दिग्दर्शन इतकं बालिश आहे की असा चित्रपट का बनवला आणि आपण तो का बघितला असा पश्चात्ताप होईल. चित्रपटाची गोष्ट अशी आहे की नायिका सबा(शनाया कपूर) हिला अंध मुलीच्या भूमिकेची ऑडिशन द्यायची असते त्यासाठी ती प्रॅक्टिस म्हणून डोळ्यावर पट्टी बांधूनच ट्रेनने प्रवास करायला जाते. म्हणजे दिग्दर्शकाने काय विचार करून असे सीन्स दिलेत हा प्रश्न पडतो. बरं त्या प्रवासात तिला शेरगिल(विक्रांत मेस्सी) हा भेटतो. जो खराखुरा अंध असतो. अभिनयाच्या बाबतीत परफेक्ट असलेल्या विक्रांतचा अभिनय इथे कमी पडतो. बरं या दोघांची प्रवासादरम्यान ओळख होते, मैत्री होते आणि अर्थातच डेहराडूनरा पोहचेपर्यंत प्रेम सुद्धा होतं. परंतु जहान हा पाहू शकत नाही हे सबाला माहीत नसतं. ते सांगण्याची हिंमत न दाखवताच जहान काही नन सांगता तिच्या आयुष्यातून निघून जातो. प्रेमभंग झालेली सबा सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी लग्न करत असते तेव्हा हा जहान पुन्हा तिच्या आयुष्यात येतो. आता तो कसा आणि मग ती दुसऱ्या मुलासोबत लग्न करते का.? ती जहानला ओळखते का हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
लॉजिकला गुंडाळून ठेवून लिहीलेली कथा आणि दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाला माझ्याकडून दिड स्टार. लव्हस्टोरी असलेले चित्रपट बघायला आवडत असतील तर हा चित्रपट झी फाईव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्म वर बघू शकता.


६. आप जैसा कोई (Aap Jaisa Koi)
२०२५. रोमॅन्स. १ तास ५५ मिनिटे. [U/A १३+]
लेखक राधिका आनंद, जेहान हांडा
दिग्दर्शकविवेक सोनी
कलाकारआर माधवन,फातिमा सना शेख,मनीष चौधरी,आयशा रजा मिश्रा,नमित दास,करण वाही
निर्माताकरण जोहर, अपूर्व मेहता, सोमेन मिश्रा, आदर पूनावाला
रिलीज तारीख११ जुलै २०२५
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.३⭐/ ५

“आप जैसा कोई” चित्रपट समीक्षा :-

११ जुलै रोजी नेटफ्लिक्स वर प्रदर्शित झालेला “आप जैसा कोई” हा चित्रपट वर वर बघता विनोदी असला तरी तो स्त्रीयांच्या हक्क आणि अधिकार यावर भाष्य करणारा आहे. “मिनाक्षी सुंदरेश्वर” हा सुंदर चित्रपट सुद्धा विवेक सोनी यांनी दिग्दर्शित केलेला आहे, या दोन्ही चित्रपटांमध्ये दिग्दर्शकाची स्त्रीवादी भूमिका स्पष्ट दिसून येते. बऱ्याचदा असं बोललं जातं किंवा ऐकायला मिळतं की सुनेला किंवा बायकोला नोकरी करण्याची आम्ही परवानगी दिली आहे, आम्ही काही अडवत नाही वगैर, परंतु अडवणारे‌ किंवा परवानगी देणारे हे कोण.? हेच पुरूषांच्या बाबतीत ऐकायला का मिळत नाही.? थोडक्यात स्त्रीवादी विचार आणि स्त्री पुरुष समानता या विषयावर महत्वाचं भाष्य करणारा हा चित्रपट आहे. आप जैसा कोई चित्रपट विवाहबाह्य संबंधांसारख्या काही चुकीच्या गोष्टींचं समर्थन करतो किंवा खतपाणी घालण्याचं काम करतो, ते वगळता बाकी चित्रपट नक्कीच चांगला आहे.
चित्रपटाची कथा जमशेदपुर मध्ये घडणारी आहे. श्रीरेणु त्रिपाठी (आर माधवन) हा चाळीशी ओलांडलेला परंतु अजून लग्न न झालेला एक अविवाहित पुरुष आहे. संस्कृत विषयाचा शिक्षक असलेल्या श्रीरेणूला विविध कारणांमुळे नकार मिळत असतो. अशा वेळी निराश असलेल्या श्रीरेणुच्या आयुष्यात आप जैसा कोई या एका डेटींग ॲप मुळे काहीतरी घडायला सुरुवात होते. नवीन नवीन छान छान मुलींशी गप्पा मारून श्रीरेणुच्या चेहऱ्यावर जरा हसू येतं. अशातच आश्चर्य म्हणजे कोलकाता मधील एक सुंदर मुलगी मधु बोस (फातिमा सना शेख) हिच्या सोबत त्याचं लग्न ठरतं. फ्रेंच विषय शिकवणारी मधू आपल्या आयुष्यात आली आहे हे पचवणं कठीण जात असतानाच एक ट्विस्ट येतो जेव्हा श्रीरेणू ला कळतं की ज्या मुलीशी आपण बोलायचो ती दुसरी तिसरी कोणी नसून मधूशीच बोललोय. हे कळल्यावर मात्र त्याचं वागणं बदलतं.
संकुचित विचारसरणीचा प्रभाव असलेल्या श्रीरेणू एका डेटींग ॲप वर असलेल्या मुलीशी लग्न करणं चुकीचं वाटतं. दुसरीकडे स्वतंत्र विचारांची मधू तिला असे कोणाचे विचार असू शकतात हेच पटत नाही. आता त्यानंतर काय होतं ते बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
आर माधवन नेहमीप्रमाणे क्यूट वाटतोय. अभिनय सुद्धा छान आहे. दिग्दर्शन उत्तम आहे. सिनेमॅटोग्राफी छान आहे. फक्त अफेअर, विवाहबाह्य संबंध या विषयांना ग्लोरीफाय न करता स्त्री स्वातंत्र्य आणि स्त्री पुरुष समानता हे विषय हाताळले जाऊ शकतात याचा दिग्दर्शकाने पुनर्विचार करावा. बाकी चित्रपट चांगला आहे. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.


७. सैयांरा (Saiyaara)
२०२५. रोमॅन्स, म्युजिक. २ तास ३६ मिनिटे. [U/A १+]
लेखक रोहन शंकर, संकल्प सदानाह
दिग्दर्शकमोहित सूरी
कलाकारआहान पांडे,अनीत पड्डा
निर्माताआदित्य चोपड़ा, अक्षय विधानी
रिलीज तारीख१८ जुलै २०२५
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.⭐/ ५

“सैयांरा ” चित्रपट समीक्षा :-

    जेन Z या पिढीला रडवणारा आणि चित्रपटगृहात गडाबडा लोळायला लावणारा पहीला किंवा एकमेव चित्रपट कोणता असा कधी प्रश्न विचारला गेला तर त्याचं उत्तर अर्थातच सैयांंरा हे असेल. चित्रपटातील प्रेमभंग बघून इतक्या टोकाच्या प्रतिक्रिया देण्याइतपत या तरुणांना नक्की काय कळलं हे कोडं आहे. दिग्दर्शक मोहित सुरी याचा हा चित्रपट सुद्धा आशिकी २ सारखाच आहे. 
   चिडखोर, रागिट असलेला कृष कपूर (अहान पांडे) हा नायक जो मोठा गायक बनण्याचं स्वप्न बघतोय तर नायिका जी खूप शांत आणि समंजस आहे, वाणी (Aneet Padda) पत्रकार म्हणून काम करत असते. खरं तर कविता लिहायला आवडणाऱ्या वाणीचं लग्न मोडलेलं असतं. आणि या ब्रेकअपच्या दुःखात तिने कविता लिहीणं सोडून दिलं आहे परंतु तिची भेट जेव्हा आपला हिरो कृषसोबत होते तेव्हा खरी गोष्ट सुरु होते. तिनेच लिहिलेली कविता कंपोज करून तो गाणं बनवतो आणि मग अर्थातच त्यांची लव्हस्टोरी सुरू होते. परंतु इंटरवल नंतर असा ट्विस्ट येतो की पूर्ण गोष्टच बदलून जाते. आता तो ट्विस्ट काय, यांच्या प्रेमाची गोष्ट पूर्ण होते की नाही हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल. 
   जेवढी हवा या चित्रपटाची केली गेली तेवढं नक्कीच या चित्रपटात काही नाही. संगीत हा या चित्रपटाचा आत्मा आहे. मोहित सुरी नेहमीच संगीत उत्कृष्ट कसं होईल याला प्राधान्य देतो आणि त्याने काही प्रमाणात इप्सित साध्य होतं. 

आहान पांडे आणि अनीत पड्डा हे दोघं नवीन कलाकार असले आणि नेपोकीड्स असले तरीही त्यांनी अभिनय उत्तम केला आहे हे विशेष. एकंदरीत एकदा बघायला हरकत नाही असा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.


८. तन्वी द ग्रेट (Tanvi the Great)
२०२५. ड्रामा. २ तास ३९ मिनिटे. [U]
लेखक अभिषेक दीक्षित, अनुपम खेर, सुमन अंकुर
दिग्दर्शकअनुपम खेर
कलाकारअनुपम खेर, शुभांगी दत्त, बोमन ईरानी, पल्लवी जोशी, जैकी श्रॉफ, इयान ग्लेन, करण टैकर, अरविंद स्वामी
निर्माताअनुपम खेर
रिलीज तारीख१८ जुलै २०२५
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – .⭐/ ५

“तन्वी द ग्रेट” चित्रपट समीक्षा :-

स्वप्नं बघण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, हे सांगणारा चित्रपट तन्वी द ग्रेट हा अनुपम खेर यांनी दिग्दर्शित केलेला असून या चित्रपटाची कथा सुद्धा त्यांनी लिहिलेली आहे. खरं तर त्यांनी स्वतःची भाची तन्वी हिची सत्य आणि प्रेरक कथा जगासमोर आणण्यासाठी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
चित्रपटाची कथा तन्वी(शुभांगी दत्त) हिच्या भोवती फिरते. तन्वी ही एक ऑटिझम मुलगी असते जी आपल्या आईसोबत(पल्लवी जोशी) दिल्लीमध्ये राहत असते. अशाच मुलांची डॉ असलेली रैना एका समीट साठी अमेरिकेत जाते, तेव्हा ती आपल्या मुलीला उत्तराखंडमधील लॅन्सडाऊन या शहरात तिच्या आजोबांकडे सोडते. खरं तर सैन्यातून रिटायर्ड झालेले कर्नल प्रताप रैना यांचं आयुष्य आणि तन्वीचं आयुष्य यात जमीन आस्मानाचा फरक असतो जो प्रताप यांना क्षणोक्षणी जाणवत असतो. तन्वी चे वडील कॅप्टन समर रैना(करण टैंकर) हे तिच्या लहानपणीच हे जग सोडून गेलेले असतात. तन्वीला त्यांचं सियाचीन मध्ये तिरंगा फडकवण्याचं स्वप्न पूर्ण करायचं असतं. परंतु तिचे आजोबा मात्र तिचा हा वेडेपणा समजतात. आता तन्वीचं हे स्वप्नं पूर्ण होतं की काय होतं.? कर्नल प्रताप आणि तन्वी यांचं नातं कशाप्रकारे फुलतं हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
बऱ्याच गोष्टी आकलनाच्या पलिकडच्या आहेत. प्रेरणादायी असला तरीही काही गोष्टी खटकतात. परंतु हे नक्की की स्वप्न पूर्ण होईल न होईल परंतु प्रत्येकाला स्वप्न बघण्याचा अधिकार आहे. अनुपम खेर यांनी बऱ्याच वर्षांनी दिग्दर्शनाचा प्रयत्न केला आहे जो बऱ्यापैकी जमला आहे. शुभांगी दत्त हिने पदार्पण करत उत्तम अभिनय केला आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म वर आल्यावर एकदा बघू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार.

  तर मंडळी यापैकी तुम्ही कोणते चित्रपट पाहीलेत आणि आवडलेत का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसंच या विकेंडला वरीलपैकी कोणता चित्रपट बघायला आवडेल हे सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. 

९. निकिता रॉय (Nikita Roy)
२०२५. भयपट, रोमॅन्स, रहस्य. १ तास ५४ मिनिटे. [U/A १३+]
लेखक पवन कृपलानी
दिग्दर्शककुश एस सिन्‍हा
कलाकारसोनाक्षी सिन्हा,अर्जुन रामपाल,परेश रावल,सुहैल नय्यर
निर्मातानिकी आणि विकी भगनानी, किंजल घोणे, अंकुर टकरानी, दिनेश गुप्ता, निकिता पै
रिलीज तारीख१८ जुलै २०२५
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.०⭐/ ५

“निकिता रॉय” चित्रपट समीक्षा :-

१८ जुलै रोजी प्रदर्शित झालेला निकिता रॉय हा एक हॉरर जॉनरचा सुपरनॅचरल आणि सायकॉलॉजीकल थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन शत्रुघ्न सिन्हा यांचा मुलगा कुश सिन्हा याने केलेलं आहे तर या चित्रपटात मध्यवर्ती भुमिकेत त्याची बहीण म्हणजेच सोनाक्षी सिन्हा आहे. चित्रपटात बऱ्याच अंधश्रद्धा, भूत पिशाच्च यांच्याबद्दलचे समज गैरसमज, सत्यता यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. कितीही विज्ञानवादी झालो तरी एक समाज अजूनही अंधश्रद्धेच्या गर्तेत अडकलेलाच आहे, त्याचाच फायदा भोंदूबाबा कसा घेतात आणि सोकॉल्ड भोळ्याभाबड्या भक्तांना फसवतात हे या चित्रपटात दाखवलेलं आहे.
चित्रपटाची कथा थेट लंडनमध्ये घडताना पहायला मिळते. लंडनमधील सनल रॉय (अर्जुन रामपाल) हा एक अंधश्रद्धा निर्मूलन करणारी संस्था चालवत असतो. आजुबाजुला घडणाऱ्या अतर्क्य घटनांमागे विज्ञान आहे हे तो पटवून देण्याचा प्रयत्न करत असतो परंतु या सगळ्यात त्याच्या मागे एक गुढ शक्ती लागते आणि त्याचा मृत्यू होतो असं चित्र निर्माण होतं परंतु त्याची बहीण निकिता (सोनाक्षी सिन्हा) जी एक लेखक असते आणि ती सुद्धा या संस्थेसाठी काम करत असते तिला या सगळ्याचा संशय येतो. आणि यामागे नक्कीच कोणाचा तरी हात आहे असं तिला वाटतं म्हणून ती लंडनमध्ये जाते. तिथे गेल्यावर तिला कळतं की तिचा भाऊ एका स्वतःला आध्यात्मिक गुरु म्हणवणाऱ्या आणि लोकांना फसवणाऱ्या अमर देव (परेश रावल) चा पर्दाफाश करणार असतो. परंतु हा गुरू इतका मोठा असतो, त्याचे अनुयायी मोठ्या संख्येने त्याच्या पाठीशी उभे असतात, त्यामुळे निकिता एकटी त्याच्याविरुद्ध पुरावे गोळा करणं शक्य नसतं म्हणून ती तिचा ऊक्स बॉयफ्रेंड जॉली (सुहैल नैय्यर) याची मदत घेते. आता ती अमर देव याचं खरं रूप जगासमोर आणते का..? तो खरंच भोंदूबाबा असतो की त्याच्याकडे खरंच कोणती दिव्य शक्ती असते.? सनल रॉय च्या मृत्यू मागे खरंच त्याचा हात असतो का.? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट बघावा लागेल.
चित्रपटाची कथा पटकथा नक्कीच खिळवून ठेवणारी आहे. सुरूवातीला चित्रपट थोडा संथ गतीने सरकतो परंतु सेकंड हाफ नक्कीच चांगला आहे. सोनाक्षी सिन्हा, अर्जून सगळ्यांचाच अभिनय उत्तम आहे. परेश रावल यांचा अभिनय बघून टेबल नंबर २१ या चित्रपटाची आठवण होते. पहिल्यांदाच दिग्दर्शन करत असलेल्या कुश याचे प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहेत. हॉरर, सुपरनॅचरल सीन्स उत्तम जमलेले आहेत. एकंदरीत चित्रपट चांगला आहे. सैयांरा मुळे हा चित्रपट झाकोळला गेला हे नक्की. तुम्हाला हॉरर थ्रिलर चित्रपट आवडत असतील तर ओटीटी प्लॅटफॉर्म वर आल्यावर हा चित्रपट नक्की बघू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.


१०. मर्डरबाद (Murderbaad)
२०२५. क्राईम, ड्रामा, रोमॅन्स. २ तास मिनिटे. [A]
लेखक अर्णब चॅटर्जी
दिग्दर्शकअर्णब चॅटर्जी
कलाकारशारिब हाशमी,नकुल रोशन सहदेव
निर्माताअर्णब चॅटर्जी
रिलीज तारीख१८ जुलै २०२५
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.३⭐/ ५

“मर्डरबाद” चित्रपट समीक्षा :-

सध्या सायकॉलॉजीकल थ्रिलर सस्पेन्स चित्रपटांची चलती आहे. प्रेक्षकांना सुद्धा अशाच धाटणीचे चित्रपट जास्त आवडतात. असाच एक कमी चर्चा झालेला सस्पेन्स थ्रिलर चित्रपट १८ जुलै रोजी प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाचं लेखन, निर्मिती आणि दिग्दर्शन सारं काही अर्णब चॅटर्जी याने केलं आहे. बऱ्याचदा चित्रपट चांगले असतखत परंतु नीट प्रमोशन न झाल्याने किंवा फारशी चर्चा न झाल्याने प्रेक्षकांना असे चित्रपट उशिरा समजतात. मर्डरबाद हा चित्रपट देखील असाच आहे.
चित्रपटाची कथा नेहमीचीच आहे. एक मुलगी गायब होते आणि मग तिचा खून होतो आणि या सगळ्याचा शोध. हा प्लॉट काही नवीन नाही परंतु अर्णब याने ज्या पद्धतीने ही पटकथा मांडली आहे ती बघताना आपला मेंदू कामाला लागतो इतकं नक्की.
चित्रपटाची कथा राजस्थान मधील जयपूर येथे घडते. मक्सूद(शारिब हाशमी)हा आपल्या मित्राला जयेशला(नकुल रोशन सहदेव) एका टूरिस्ट कंपनीत एक टूरिस्ट गाइड म्हणून कामाला लावतो. जयेश हा टूरिस्ट गाइड म्हणून छान काम करत असतो, लोकांच मनोरंजन करत तो माहीती देत असतो. त्याच्या अशा स्वभावामुळे टुरिस्ट ग्रूप मधील एक एनआरआय मुलगी इसाबेला(कनिका कपूर) त्याच्या प्रेमात पडते. दोघं एकमेकांकडे आकर्षित झालेले असतात. अशातच ग्रुपमधील एक मुलगी अचानक गायब होते. आणि तिचा खून होतो. या पार्श्वभूमीवर टुरिस्ट गाइड जयेश हा सुद्धा पळून जातो त्यामुळे संशयाची पहीली सुई त्याच्याकडे जाते. परंतु इन्स्पेक्टर सुर्यकांत(मनीष चौधरी) जस जसा तपास सुरू करतो तसे अनेक जण संशयित म्हणून नजरेत येतात. आता नक्की त्या मुलीच्या खुनामागे कोणाचा हात असतो.? तिचा खून का होतो.? हे चित्रपट बघितल्यावर कळेल. क्लायमॅक्स प्रेडिक्टेबल आहे .
एक तर चित्रपट उगाच लांबवल्यासारखा वाटतो. कथा पकड घ्यायलाच वेळ लावते. इंटरेस्ट येईपर्यंत शेवट काय असेल याचा अंदाज येतो. चित्रपटात बऱ्याच त्रुटी आहेत. सस्पेन्स थ्रिलर चित्रपटांना पार्श्वसंगीत दमदार असेल तर चित्रपट प्रभावी बनतो परंतु त्याची इथे कमतरता आहे. एकंदरीत शेवटपर्यंत खिळवून ठेवण्यात चित्रपट अयशस्वी ठरतो.
शारिब हाशमी हा एक कसलेला उत्तम अभिनेता आहे हे परत एकदा लक्षात येतं. सगळ्याच कलाकारांनी अभिनय चांगला केला आहे. दिग्दर्शन अजून चांगलं होऊ शकतं परंतु पहीलाच प्रयत्न चांगला आहे. जर तुम्हाला सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आवडत असतील तर हा चित्रपट बघू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार.


११. संत तुकाराम (Sant Tukaram)
२०२५. जीवनचरित्र, ड्रामा. २ तास १५ मिनिटे. [U]
लेखक आदित्य ओम
दिग्दर्शकआदित्य ओम
कलाकारसुबोध भावे, अरुण गोविल, ट्विंकल कपूर, शीना चौहान, संजय मिश्रा
निर्माताबी. गौतम
रिलीज तारीख१८ जुलै २०२५
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.१⭐/ ५

“संत तुकाराम” चित्रपट समीक्षा :-

आदित्य ओम दिग्दर्शित संत तुकाराम हा चित्रपट १८ जुलै रोजी प्रदर्शित झाला असून संत तुकाराम महाराज यांची जीवनगाथा सांगणारा हा पहिलाच हिंदी चित्रपट आहे. यात विशेष म्हणजे संत तुकाराम ही भूमिका सुबोध भावे याने साकारली आहे.
महाराष्ट्रातील १७ व्या शतकात होऊन गेलेल्या काही महान संतांपैकी एक नाव म्हणजे संत तुकाराम महाराज. एका वाण्याच्या कुटुंबात जन्माला आलेल्या सामान्य तुकाराम यांचे संत तुकाराम कसे झाले याची ही गाथा. तुकाराम महाराज यांचे पूर्वज विश्वंभर महाराज यांना त्यांच्या बागेत विठ्ठलाची मूर्ती सापडल्यानंतर तिथं विठ्ठलाचं मंदिर बांधण्यात आले. याचमुळे तुकाराम महाराज यांना विठ्ठलाची भक्ती आणि किर्तनाची गोडी लागली. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात त्यांच्या जवळची माणसं त्यांना सोडून गेल्यानंतर ते भक्तीमार्गाला अधिक लागले. तुकाराम महाराज यांनी आपल्या समाजाला, जगाला दिशा देणारी आणि मराठी भाषेला अधिक समृद्ध करणारी अभंगवाणी दिली आहे.
त्यांची पहिली पत्नी सतत आजारी या कारणाने त्यांचा दुसरा विवाह आवलीसोबत होतो. ही आवली व्यावहारिक असल्यामुळे आणि तुकाराम महाराज सदानकदा विठ्ठलाचं नामस्मरण करत असल्यामुळे ती त्यांच्यावर सतत वैतागत असे. त्यामुळेच कित्येकदा महाराज जंगलात जाऊन नामस्मरण करत बसत. आवलीची भूमिका शीना चौहान हीने उत्तम केली आहे.
सुबोध भावे याने संत तुकाराम महाराज यांची भूमिका अक्षरशः जिवंत केली आहे. खरं तर हा चित्रपट प्रत्येकाने बघावा असा आहे. परंतु मसाला नसलेला, त्यातही सत्य आणि संतांवर आधारित चित्रपट बघणाऱ्यांची संख्या कमीच. संत तुकाराम महाराज हे मराठी कुटुंबात जन्माला आले आणि हा चित्रपट हिंदी भाषेत असल्यामुळे थोडं बघताना आणि मराठी हिंदी मिक्स ऐकताना वेगळं वाटतं. काही ठिकाणी चित्रपट एक कलाकृती म्हणून कमी पडतो. परंतु सगळ्या कलाकारांनी एवढ्या मोठ्या संताची जीवनगाथा पडद्यावर मांडतांना घेतलेले कष्ट दिसतात. एकंदरीत चित्रपट चांगला आहे. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.


१२. महाअवतार नरसिंह (Mahavatar Narsimha)
२०२५. ॲनिमेशन, ॲक्शन, पौराणिक, ड्रामा. २ तास ३ मिनिटे. [U/A १३+]
लेखक जयपूर्णा दास
दिग्दर्शकअश्विन कुमार
कलाकारआदित्य राज शर्मा, हरिप्रिया मट्टा, संकेत जायसवाल, प्रियंका भंडारी, वसुंधरा बोस, हरजीत वालिया, संचित
निर्माताशिल्पा धवन
रिलीज तारीख२५ जुलै २०२५
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.३⭐/ ५

“महाअवतार नरसिंह” चित्रपट समीक्षा :-

भक्त प्रल्हादाची गोष्ट माहीत नाही असा विरळाच. भगवान विष्णूने आपला भक्त प्रल्हादासाठी चौथा नरसिंहाचा अवतार धारण करत हिरण्यकश्यपू राक्षसाचा वध केला होता. याच कथेवर आधारित महाअवतार नरसिंह हा चित्रपट आहे.
कथेच्या सुरुवातीला महर्षी कश्यप आणि पत्नी दिती यांच्यातील प्रसंगाने होते. पुत्रप्राप्तीची इच्छा व्यक्त करत सहवासासाठी दिती महर्षींना प्रार्थना करते. परंतु शास्त्रानुसार ती वेळ योग्य नसून यावेळी सहवास लाभला तर गर्भधारणा राहील्यास त्याचे अनिष्ट परिणाम होऊन आसुरी वृत्तीची संतान जन्माला येऊ शकते. तरीही दिती ऐकत नाही आणि जे व्हायचे तेच होते. याचाच परिणाम म्हणून दितीच्या पोटी पुढे जाऊन हिरण्यक्ष आणि हिरण्यकश्यप सारखे राक्षसी पुत्र जन्माला येतात. जे इतका हाहाकार माजवतात, की या दोघांचा नाश करण्यासाठी विष्णूला वराह आणि नरसिंह असे अवतार धारण करावे लागतात.
या चित्रपटात हिरण्यकश्यपचा मुलगा प्रल्हाद जो लहानपणापासून भगवान विष्णूचा कट्टर भक्त आहे त्याच्याच रक्षणासाठी विष्णूंनी अर्धा सिंह आणि अर्धा मनुष्य असं रूप धारण करत हिरण्यकश्यपचा वध केला. एकंदरीत चित्रपटाची कथा हिरण्यकश्यप, प्रल्हाद आणि नरसिंह अवताराभोवती फिरते.
हा एक उत्तम ॲनिमेटेड चित्रपट आहे. लहान मुलांना दाखवण्यासाठी अतिशय छान आहे. काही ठिकाणी व्हीएफएक्स अजून चांगल्या प्रकारे केलं असतं तर प्रभाव वाढला असता. पार्श्वसंगीत आणि छायाचित्रण या चित्रपटाच्या जमेच्या बाजू आहेत. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.


१३. सो लाँग व्हॅली (So Long Valley)
२०२५. गुन्हेगारी, थ्रिलर. २ तास ३ मिनिटे. [U/A १३+]
लेखक मान सिंग
दिग्दर्शकमान सिंग
कलाकारत्रिधा चौधरी, विक्रम कोचर, मान सिंह, आकांक्षा पुरी,अलीशा परवीन
निर्मातामान सिंग,मोहसीन मुश्ताक खान,करण सिंग चौहान
रिलीज तारीख२५ जुलै २०२५
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.५⭐/ ५

“सो लाँग व्हॅली” चित्रपट समीक्षा :-

२५ जुलै रोजी प्रदर्शित झालेला सो लॉंंग व्हॅली हा चित्रपट सस्पेन्स थ्रिलर चित्रपट असून मान सिंग हे या चित्रपटाचे सर्वेसर्वा आहेत. लेखन, निर्मिती ,दिग्दर्शन आणि चित्रपटातील इन्स्पेक्टर देव ही भूमिका अशा अनेक भूमिका त्यांनी निभावल्या आहेत. सगळ्यात आधी सांगायचं झालं तर या चित्रपटाचं प्रमोशन झालं नव्हतं त्यामुळे अर्थातच चित्रपटाला स्क्रीन मिळाल्या नव्हत्या, प्रेक्षकांना असा चित्रपट आला होता हेच माहीत नाही. आणि ज्या मोजक्या लोकांनी हा चित्रपट पाहिला त्यांनी हा चित्रपट म्हणजे टेलिव्हिजनच्या सावधान इंडिया सोबत या चित्रपटाची तुलना केली. चित्रपट बघितल्यावर तुम्हाला देखील हे पटेल.
चित्रपटाची कथा शिमला मनाली मध्ये घडणारी आहे. टॅक्सी ड्रायव्हर असलेला कुलदीप (विक्रम कोचर) हा एक सायकोपॅथ आहे. मुलींना किडनॅप करून तो त्यांच्याशी अमानवी पद्धतीने वागणं, विकृतपणे छळणं हा त्याचा जणू छंदच. त्याच्याच टॅक्सीत बसून मनालीला जात असलेली रिया(आकांक्षा पुरी) ही गायब झाल्यावर त्याची तक्रार नोंदवण्यासाठी मौसमी (अलीशा परवीन) ही पोलिस स्टेशन मध्ये जाते. इन्स्पेक्टर सुमन (त्रिधा चौधरी) हिच्याकडे ही केस येते. यात तिला शिमला पोलिस इन्स्पेक्टर देव(मान सिंह) हा मदत करतो. दोघं मिळून रिया ला शोधण्यासाठी प्रयत्न करतात. सुरूवातीला आपल्याला जे वाटतं तो अंदाज चुकतो. आता नक्की रिया कुठे गायब होते आणि तिला कोणी गायब केलेलं असतं हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
खरं तर सस्पेन्स थ्रिलर चित्रपट करायचा म्हणजे सायकोपॅथ किलर हवाच, काहीतरी विकृत मानसिकता दाखवून अतिशय हिंसक आणि विचित्र काहीतरी दाखवायचं म्हणजे चित्रपट चांगला होतो असा गैरसमज बऱ्याच दिग्दर्शकांचा झालेला आहे. या चित्रपटात देखील असंच काहीसं झालं आहे. कलाकारांचा अभिनय बरा आहे. शिमला मनाली असल्यामुळे सिनेमॅटोग्राफी, लोकेशन, दृश्यं हे सगळं छान आहे. परंतु ज्या पद्धतीने कथा सुरू होते आणि पुढे सरकते त्यावरून त्या कथेला काही ताळमेळ लागत नाही. दिग्दर्शन बरं आहे. क्लायमॅक्स प्रेडिक्टेबल आहे. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार. अजून तरी ओटीटीवर हा चित्रपट आलेला नाही.


१४. सरजमीन (Sarzameen)
२०२५. ड्रामा, थ्रिलर, वॉर. २ तास ३ मिनिटे. [U/A १३+]
लेखक सोमिल शुक्ला-अरुण सिंह
दिग्दर्शककायोज ईरानी
कलाकारकाजोल, पृथ्वीराज सुकुमारन, इब्राहिम अली खान, जितेंद्र जोशी, मिहिर अहूजा, बोमन ईरानी
निर्माताकरण जौहर, हीरू यश जौहर, अपूर्वा मेहता, अदार पूनावाला
रिलीज तारीख२५ जुलै २०२५
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.०⭐/ ५

“सरजमीन” चित्रपट समीक्षा :-

करण जोहर निर्मित आणि कायोज ईरानी दिग्दर्शित सरजमीन हा एक देशभक्तीपर चित्रपट आहे. देशापुढे, मातृभूमी पुढे काहीच नाही, अगदी स्वतःचा मुलगा सुद्धा नाही अशी टॅग लाईन असलेल्या या चित्रपटात अर्थातच एका देशभक्त असलेल्या जवानाची कथा आहे. चित्रपटाचा विषय उद्देश चांगला असला तरी पडद्यावर चित्रपट मांडतांना तो सपशेल फसलेला आहे. सरजमीन चित्रपटाच्या कथेला, दिग्दर्शनाला ना सर सर आहे ना जमीन.
आर्मी ऑफिसर कर्नल विजय मेनन (पृथ्वीराज सुकुमारन) याची पोस्टिंग काश्मीर मध्ये असते, तिथे झालेल्या एका चकमकीत तो दोन आतंकवादी आबिल आणि काबिल यांना पकडतो. आणि या दोघांना सोडून द्यावं म्हणून विजयचा मुलगा हरमन (इब्राहिम अली खान) याचं आतंकवाद्यांकडून अपहरण करण्यात येतं. एक तर आबिल आणि काबिल यांना सोडून द्या आणि हरमनला घेऊन जा किंवा मुलला विसरून जा अशी मागणी ठेवून विजय समोर मोठा पेच निर्माण करण्यात येतो. देश, मातृभूमी आणि स्वतःचा सख्खा मुलगा यात काय निवडायचं अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर विजय सुरूवातीला आपली पत्नी मेहरूनिसा (काजोल हिच्यामुळे हरमनसाठी आतंकवाद्यांना सोडायला तयार होतो परंतु ऐन वेळी त्याच्यातील सच्चा एकनिष्ठ भारतीय जवान जागा होतो. आणि तो आपल्या मातृभूमीशी आपलं इमान निवडतो. याचा परिणाम असा होतो की आठ वर्षांनंतर हरमन विजयसमोर एक आतंकवादी म्हणून उभा राहतो. त्यानंतर पुढे काय होतं हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
चित्रपटाचं दिग्दर्शन इतकं बालिशपणे केलेलं आहे की भारतीय सेनेतील एखाद्या जवानाने हा चित्रपट बघितला तर डोक्यावर हात मारून घेईल. म्हणजे आतंकवाद्यांना सोडून देणं आणि हरमनला सोडवणं हि निर्णय एकटा कर्नल विजय घेत असतो, विजयची पत्नी त्याचे ईमेल वाचू शकते, ती कधीही कुठेही जाऊ शकते हे सगळं इतकं हास्यास्पद आहे की दिग्दर्शकाने काय विचार करून दिग्दर्शन केलंय असा प्रश्न पडतो. मुळात ज्या प्लॉट वर चित्रपटाची मांडणी केली गेली आहे त्याचं गांभीर्य स्वतः दिग्दर्शक याच्या लक्षात आलेलं नाही. क्लायमॅक्स सुद्धा अगदीच न पटणारा आहे. अतिशय वाईट पद्धतीने फसलेला चित्रपट आहे. ध बघाल तर उत्तम. माझ्याकडून या चित्रपटाला एक स्टार.


१५. रसा (Rasa)
२०२५. फँटसी थ्रिलर. २ तास १२ मिनिटे. [U/A १३+]
लेखक अंगित जयराज, प्रीतिश जयराज, रुतुजा पाटील
दिग्दर्शकअंगित जयराज, प्रीतिश जयराज
कलाकारशिशिर शर्मा, ऋषी बिस्सा,विशिष्ठा चावला
निर्माताअंगित जयराज, प्रीतिश जयराज, रुतुजा पाटील
रिलीज तारीख२५ जुलै २०२५
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.०⭐/ ५

“रसा” चित्रपट समीक्षा :-

अंगित जयराज आणि प्रीतिश जयराज दिग्दर्शित “रसा” हा एक वेगळाच चित्रपट २५ जुलै रोजी प्रदर्शित झाला. फार ठिकाणी चित्रपटाचे शोज न लागल्याने प्रेक्षकांना चित्रपटाबद्दल जास्त माहिती मिळाली नाही.
वरुण(ऋषी बिस्सा) या शेफची ही गोष्ट आहे. वरूण हा एक स्ट्रगल करत असलेला शेफ असतो. अशातच वरूणला प्रसिद्ध शेफ अनंत नायर (शिशिर शर्मा) यांच्या अनंत कॅफे या रेस्टॉरंटमध्ये काम करण्याची आणि शिकण्याची संधी मिळते. आणि या संधीचा पुरेपूर वापर करून संधीचं सोनं करण्याचं त्याचं स्वप्न असतं. शेफ अनंत नायर यांच्या हातचा पदार्थ इतका चविष्ट असतो की खाल्ल्यानंतर खाणारा मंत्रमुग्ध होऊन जातो. जणू एक प्रकारची नशा चढते. सुरूवातीला या सगळ्यात वरूणला काही वेगळं वाटत नाही. परंतु जसजसं तो तिथे काम करायला लागतो त्याल काहीतरी वेगळी ऊर्जा जाणवते. एका मागोमाग एक अशी अनेक रहस्य उलगडत जातात. डार्क सिक्रेट्स म्हणावी अशी. आता ती रहस्यं कोणती.? शेफ नायर यांच्या हातचा पदार्थ खाल्ल्याने नक्की कसली धुंदी चढते.? त्या कॅफे मध्ये असं काय घडत असतं हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
हा एक सुपरनॅचरल थ्रिलर चित्रपट असून एक आगळावेगळा अनुभव मिळतो. दिग्दर्शन उत्तम आहे. कलाकारांचा अभिनय चांगला आहे. एकंदरीत चित्रपट चांगला आहे. ओटीटीवर आल्यावर नक्की बघायला हवा असा हा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.

Hindi Movie list 2025
Hindi Movie 2025
Hindi Movie list July 2025

  तर मंडळी यापैकी तुम्ही कोणते चित्रपट पाहीलेत आणि आवडलेत का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसंच या विकेंडला वरीलपैकी कोणता चित्रपट बघायला आवडेल हे सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *