HomeFilmsMarathi

जून २०२४ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी | List of Marathi Movies released in June 2024

जून २०२४ मध्ये प्रदर्शित झालेले हे मराठी चित्रपट तुम्ही पाहिलेत का.?

Written by : आकांक्षा कोलते

Updated : ऑगस्ट 11, 2024 | 12:22 AM

खरं तर आता वेबसिरीज चा जमाना असल्यामुळे प्रेक्षकांच्या चित्रपटांच्या बाबतीत अपेक्षा वाढल्या आहेत. त्यातही नवीन आलेल्या चित्रपटांमध्ये ओरिजनल कंटेट कमीच असतो. परंतु आशयघन आणि दर्जेदार कथानक हा मराठी चित्रपटांचा गाभा आहे. मराठी चित्रपट हे नेहमीच वास्तववादी आणि चांगला कंटेंट घेऊन भेटीला येतात हे आता प्रेक्षकांच्या लक्षात येत आहे. त्यामुळे मराठी चित्रपटांना प्रेक्षक आता भरभरून प्रतिसाद देतात.
आज या लेखात आपण जून २०२४ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपट आम्हाला कसे वाटले ते सांगणार आहोत. ज्यामुळे ते बघायला हवे की नको ते ठरवणं तुम्हाला सोपं जाईल.

June 2024 marathi movie list 1
१. मल्हार
२०२४. नाटक. १ तास ४३ मिनिटे. [ यु / ए ]
लेखक विशाल कुंभार, अपूर्वा पाटील
दिग्दर्शकविशाल कुंभार
कलाकारऋषी सक्सेना, अंजली पाटील, श्रीनिवास पोकळे, विनायक पोतदार, शारिब हाश्मी, महंमद सामद, अक्षता आचार्य
निर्माताप्रफुल पासड
प्रदर्शित तारीख७ जून २०२४
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.३⭐/ ५

मल्हार” चित्रपट समीक्षा :-

मल्हार हा चित्रपट म्हणजे तीन वेगवेगळ्या विषयांवर आधारित आहे. अशा तीन कथा ज्या एकमेकां मध्ये फार गुंतलेल्या नसल्या तरी काही समान धागे नक्कीच आहेत. विशाल कुंभार यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून हा चित्रपट एकाच वेळी हिंदी आणि मराठी भाषेत प्रदर्शित झाला आहे.
गुजरात मधील कच्छ भागात या कथा घडत आहेत. पहिल्या कथेत दोन मित्रांची गोष्ट,जावेद आणि भैरव यांची मैत्री बघायला मिळते. त्यातील एकाला ऐकू येत नसल्याने तो श्रवणयंत्र वापरत असतो परंतु ते तुटल्यावर नवीन श्रवणयंत्र घेण्यासाठी पैसे नसतात. तेव्हा पंधराशे रुपये वाचवण्यासाठी ते श्रवणयंत्र समजून ब्लूटूथ डिव्हाईस घेतात. ही गोष्ट अतिशय उत्कटतेने मांडली आहे. तर दुसऱ्या कथेत प्रेम आणि आंतरधर्मीय विवाह यावर भाष्य करण्यात आलं आहे. यात जावेदची बहीण जतीन या एका मराठी मुलावर प्रेम करत असते. परंतु त्या दोघांना काय संघर्ष करावा लागतो हे या कथेत बघायला मिळतं. तर तिसऱ्या कथेत स्त्री जर आई होऊ शकत नसेल तर तिला किती त्रास, टोमणे आणि छळ या सगळ्याला सामोरं जावं लागतं हे बघायला मिळतं. गावातील सरपंच यांची सून केसर ही काही कारणाने आई होऊ शकत नाहीय आणि सरपंचांना काही करून घराण्याला वारस हवा आहे. त्यासाठी ते केसरला कसं छळतात हे बघून आजही मुल होणं न होणं यासाठी फक्त स्त्रियाच कशा जबाबदार आहेत हा गैरसमज अजूनही कसा आपली मुळ घट्ट धरून आहे हे बघायला मिळतं. यातच केसरच्या आयुष्यात कोणीतरी येतं आणि एक ट्विस्ट येतो. आता तो ट्विस्ट काय हे बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल.
चित्रपटाचे तिन्ही विषय छान आहेत. परंतु पटकथा आणि संवाद तेवढे परिणामकारक वाटत नाहीत. दिग्दर्शन ठिकठाक आहे. सगळ्या कलाकारांनी अभिनय चांगला केला आहे परंतु प्रेक्षकांना हा चित्रपट किती आवडेल ही शंका आहे. फार मसाला नसलेला असा समाजातील काही समस्यांवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर आल्यावर चित्रपट बघू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.


२. अल्याड पल्याड (Alyad Palyad)
२०२४. भयपट, विनोदी. २ तास ९ मिनिटे. [ यु / ए ]
लेखक प्रितम एसके पाटील
दिग्दर्शकप्रितम एसके पाटील
कलाकारमकरंद देशपांडे, संदीप पाठक, सुरेश विश्वकर्मा, गौरव मोरे, सक्षम कुलकर्णी, भाग्यम जैन, अनुष्का पिंपुटकर
निर्माताशैलेश जैन, महेश निंबाळकर
प्रदर्शित तारीख१४ जून २०२४
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.७⭐/ ५

अल्याड पल्याड” चित्रपट समीक्षा :-

अल्याड पल्याड हा एक विनोदी भयपट असून प्रितम एस के पाटील यांनी या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. कोकणात काही गावांमध्ये ठराविक दिवसांसाठी संपूर्ण गाव हा वेशीबाहेर जातो आणि तिकडेच तीन चार राहतो. अगदी पाळीव प्राण्यांना घेऊन अख्खा गाव वेशीबाहेर जाऊन राहतो माचं कारण म्हणजे असा समज किंवा अशी अंधश्रद्धा आहे की या दिवसांत गावात काही आत्मे येतात किंवा भुताखेतांचा वावर असतो. म्हणून गावपळण या प्रथेनुसार संपूर्ण गाव वेशीबाहेर जातो. यावरच आधारित अल्याड पल्याड हा चित्रपट बनवण्यात आला आहे.
ओरस या कोकणातील एका गावात गावपळण प्रथेसाठी संपूर्ण गाव बाहेर जाण्याची तयारी करत असतो तेव्हा गावातील पंक्या(भाग्यम जैन) हा आपल्या मित्रांना, चतुर (गौरव मोरे), किश्या (सक्षम कुलकर्णी) यांना घेऊन गावात येतो. त्यांना सुद्धा सगळ्यांसोबत वेशीबाहेर जावं लागतं. परंतु हे तिघे ठरवतात की आपण परत गावात जाऊन बघायचं की खरंच भुतं येतात का.? ठरल्याप्रमाणे ते तिघे दिल्या(संदिप पाठक) या नावाड्याला घेऊन परत गावात येतात. त्यांना गावात आल्यावर एक मुलगी दिसते. आणि त्यांची घाबरगुंडी उडते. आता ही मुलगी भुत आहे की माणूस हे बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल.
प्रितम एस के पाटील यांनी लिहिलेली कथा तेवढी सक्षम वाटत नाही. दिग्दर्शन सुद्धा ठिकठाक आहे. गौरव मोरे, संदिप पाठक, मकरंद देशपांडे यांचा अभिनय छान आहे. आजकाल भयपट बनवताना तांत्रिक गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात, त्या बाबतीत हा चित्रपट कमी पडतो. परंतु एकदा मनोरंजन म्हणून बघायला हरकत नाही. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.


३. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील (Sangharsh Yoddha Manoj Jarange Patil)
२०२४. जीवनचरित्र, नाटक. २ तास २९ मिनिटे. [ यु / ए ]
लेखक गोवर्धन दोलताडे
दिग्दर्शकशिवाजी दोलताडे
कलाकाररोहन पाटील, मोहन जोशी, गायत्री जाधव, संदिप पाठक, सागर कारंडे, शुभांगी लाटकर
निर्मातागोवर्धन दोलताडे
प्रदर्शित तारीख१४ जून २०२४
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.९⭐/ ५

संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील” चित्रपट समीक्षा :-

आता या चित्रपटाबद्दल फार वेगळं काही सांगण्याची गरज नाही. गेल्या काही महिन्यांपासून किंवा एक दोन वर्षांपासून मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या एका आंदोलनाची ही कथा आहे. मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक होऊन ,उपोषणं करून अनेक वेळा आंदोलने केली. त्यावरच आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांचा जीवनपट उलगडून दाखवला आहे.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये अशी मागणी किंवा भुमिका छगन भुजबळ यांची आहे तर ॲड. गुणरत्न सदावर्ते यांचं म्हणतर हे आरक्षण दिलंच जाऊ नये असं आहे. याचा सुद्धा आढावा या चित्रपटात घेतला गेला आहे. एकंदर मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या पाठीशी उभा राहणारा(अपवाद वगळता) मराठा समाज यांच्या संघर्षाची कहाणी सांगणारा हा चित्रपट आहे.
चित्रपटात मनोज जोशी, संदिप पाठक, सागर कारंडे आणि मनोज पाटील यांची भूमिका साकारणारे रोहन पाटील यांनी चांगला अभिनय केला आहे. परंतु एका ठराविक वर्गातील किंवा समाजातील लोकं हा चित्रपट जाऊन बघण्याची शक्यता आहे. त्यात पण हा चित्रपट किती मनोरंजन करेल ही शंका आहे. दिग्दर्शन ठिकठाक आहे. परंतु चित्रपट म्हणावा तेवढा प्रभावी नाही. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.


४. बारा वर्षे सहा महिने (Bara Varsh Saha Mahine)
२०२४. नाटक. १ तास ५६ मिनिटे. [ U ]
लेखक आशिर्वाद तू. पिपरे
दिग्दर्शकआशिर्वाद तू. पिपरे
कलाकारविजय पाटकर, संजीवनी शर्मा, गणेश परदेशी, तन्वी गांजावाला, योगेश राजगुरु , हरि अभ्यंकर, बेबी क्रिटिना
निर्माताजितेंद्र प्रजापति
प्रदर्शित तारीख१४ जून २०२४
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.५⭐/ ५

“बारा वर्षे सहा महिने” चित्रपट समीक्षा :-

जितेंद्र प्रजापति यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच बारा वर्षे सहा महिने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. बालकामगार आणि त्यांचं शोषण, त्यांच्या समस्या, त्यांचं भावविश्व उलगडून दाखवणारा हा चित्रपट आहे.
या चित्रपटाचा हिरो एक राजू नावाचा मुलगा आहे. आणि चित्रपटाची कथा याच राजू भोवती फिरत असते. बालविकास संस्थेच्या काही अधिकाऱ्यांचं म्हणणं असतं की राजू हा एका हॉटेलमध्ये बालकामगार म्हणून काम करत आहे, परंतु हॉटेल मालक अण्णाचं म्हणणं आहे की राजू हा त्याच्याकडे काम करत नसून तो तेथील भाजी विक्रेत्यां साठी काम करत आहे. शेवटी हा वाद न्यायालयात जातो. परंतु तिथे राजू एक वेगळंच सत्य सर्वांसमोर आणतो, जे त्याच्यासोबत घडलंय. आता ते सत्य काय आहे.? राजू हा खरंच बालकामगार म्हणून काम करत असतो का.? या प्रश्नांची उत्तरे हा चित्रपट पाहील्यावर मिळतील.
चित्रपटाचा विषय चांगला असला तरी कथा पटकथा तेवढे प्रभावी नाहीत. चित्रपट आताच्या घडीला मागे पडल्यासारखा वाटतो. दिग्दर्शन, गाणी, संवाद सगळंच फसलेलं आहे. एकंदर मनोरंजन करण्यासाठी हा चित्रपट कमी पडतो. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार.


५. सोहम (Soham)
२०२४. नाटक. १ तास ४५ मिनिटे. [ U ]
लेखक पुंडलिक धुमाळ
दिग्दर्शकपुंडलिक यशोदा लक्ष्मण धुमाळ
कलाकारसुहास पळशीकर, पंकज विष्णू, ज्योती निमसे, सावी
निर्मातासंजय भैरे, सुचिता भैरे
प्रदर्शित तारीख१४ जून २०२४
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.५⭐/ ५

सोहम” चित्रपट समीक्षा :-

आजकाल भोंदू बाबा बुवा यांचं प्रमाण इतकं वाढलं आहे की त्यांच्या कडून भक्तांना फसवणूकीच्या कित्येक घटना ऐकायला मिळतात. परंतु काही सिद्ध पुरुष असेही असतात की अध्यात्माचा मार्ग असला तरीही विज्ञानाची कास धरून ते भक्तांना मार्गदर्शन करत असतात. असेच च्या काळात असलेले अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज. त्यांच्याच जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. काडसिद्धेश्वर महाराज हे विज्ञान, तंत्रज्ञान याची गरज आणि महत्व ओळखून आहेत. पर्यावरण, निसर्ग याबाबत सुद्धा ते जागरूक आहेत. या सगळ्याचं दर्शन या चित्रपटात बघायला मिळतं. निसर्गाला संपवून माणूस सुखी होणार नाही असा संदेश ते नेहमी देतात.
त्यांचं कार्य, उपक्रम हे समाजोपयोगी असतात. त्यांच्या कोल्हापुरातील कणेरी मठात त्यांच वास्तव्य असून तिथे मोठ्या प्रमाणावर गोसंवर्धन प्रकल्प, व इतर उपक्रम सुरू असतात.
याच आधुनिक आणि पुढारलेल्या विचारांच्या काडसिदधेश्वर महाराजांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाची कथा तेवढ्या सक्षमपणे मोठ्या पडद्यावर मांडताना लेखक दिग्दर्शक बऱ्याच ठिकाणी कमी पडले असं वाटतं. या चित्रपटातील विकास(पंकज विष्णू) हा भोंदू बाबा साधू बुवा यांच्या विरोधात असून त्याचे वडील मात्र काडसिदधेश्वर महाराजांचे भक्त असतात. यावरूनच या दोघांमध्ये नेहमी वाद होत असतो. आता आनंद(सुहास पळशीकर) हे आपल्या मुलाला काडसिदधेश्वर महाराजांचा महीमा किंवा ते भोंदूगिरी कलत नसून विज्ञानाच्या युगात तंत्रज्ञान वापर करून समाजोपयोगी उपक्रम कसे करत आहेत हे पटवून देण्यात यशस्वी होतात का हे बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल. चित्रपटाचा विषय किंवा अशा महान पुरुषाची आयुष्यगाथा उलगडण्याचा प्रयत्न चांगला असला तरी कथा पटकथा संवाद दिग्दर्शन सगळंच अजून चांगल्या प्रकारे मांडता आलं असतं तर चित्रपट प्रभावी झाला असता. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार.


६. गाभ (Gaabh)
२०२४. नाटक. २ तास ६ मिनिटे. [ UA ]
लेखक अनुप जत्राटकर
दिग्दर्शकअनुप जत्राटकर
कलाकारकैलास वाघमारे, सायली बांदकर
निर्मातासुमन नारायण गोटुरे, मंगेश नारायण गोटुरे
प्रदर्शित तारीख२१ जून २०२४
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.७⭐/ ५

“गाभ” चित्रपट समीक्षा :-

पश्चिम महाराष्ट्रातील ही एक आगळीवेगळी प्रेमकथा पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न लेखक दिग्दर्शक अनुप जत्राटकर यांनी केला आहे. चित्रपटात नायक नायिका तर आहेतच परंतु चित्रपटाची मुख्य कथा आणि मांडणी एक म्हैस आणि रेडा यांच्याभोवती फिरते.
गावातील नायक दादू हा आपल्या आजीसोबत राहत असतो. आजीच्या प्रेमासाठी आणि तिला आवड म्हणून तो एक म्हैस घेऊन येतो. एकदा दादू सरपंचाची म्हैस नैसर्गिकरीत्या गाभण रहावी यासाठी समागम करण्यासाठी तो फुलवा कडे असलेल्या रेड्याकडे घेऊन येतो. अशा समागमासाठी गावातील म्हैशींना रेडा देणं हा फुलवाचा व्यवसाय असतो कारण गावात हा एकमेव रेडा असतो. परंतु याचमुळे तिला अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. याच म्हैशीमुळे आणि रेड्यामुळे दादू आणि फुलवा यांची प्रेमकथा सुरू होते. परंतु फुलवा करत असलेल्या धंद्यामुळे तिला इतक्या अडचणी येतात की तिला रेडा घेऊन पळून जावं लागतं. आता ती का पळून जाते.? दादू आणि तिच्या प्रेमाचं काय होतं.? हे बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल.
पश्चिम महाराष्ट्रातील जनावरांचा बाजार, शेतकरी आणि प्राण्यांमधील प्रेम, ते नातं या सगळ्यावर प्रकाश टाकणारा हा चित्रपट आहे. स्त्री भ्रूणहत्या या विषयावर सुद्धा या चित्रपटात भाष्य करण्यात आले आहे. एकंदर चित्रपटाची कथा,पटकथा, विषय सगळंच वेगळं आहे. दिग्दर्शन उत्तम आहे. कलाकारांचा अभिनय सुद्धा उत्तम आहे. चित्रपट चांगला आहे परंतु आजकालच्या प्रेक्षकांना हा चित्रपट कितपत आवडेल ही शंका आहे. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.


७. झाड (Jhad)
२०२४. नाटक. २ तास ५ मिनिटे. [ U ]
लेखक सचिन डोईफोडे
दिग्दर्शकसचिन डोईफोडे
कलाकारदिलिप डोईफोडे, प्रकाश धोत्रे, संदिप वायबसे, कैलास मुंडे, प्रल्हाद उजगरे
निर्मातायोगेश राजपूत
प्रदर्शित तारीख२१ जून २०२४
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.०⭐/ ५

“झाड” चित्रपट समीक्षा :-

बीड सारख्या दुष्काळग्रस्त भागात झाडांचं महत्त्व किती हे सांगणं अवघड. ज्या भागात दुष्काळ पडून शेती न पिकल्यामुळे शेतकरी आत्महत्या करतो त्या भागात पाऊस पडणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी पर्यावरण,निसर्ग जपणं आणि पर्यायाने आहेत ती झाडं राखणं आणि नवीन झाडं लावणं हे गरजेचं आहे. हेच झाडांचं महत्त्व पटवून देण्यासाठी या चित्रपटाची निर्मिती योगेश राजपूत यांनी केली असून सचिन डोईफोडे यांनी या चित्रपटाची कथा पटकथा संवाद लिहिले आहेत आणि चित्रपटाचं दिग्दर्शन सुद्धा त्यांनीच केलेलं आहे.
बीडमध्येच या चित्रपटाचं चित्रीकरण करण्यात आलेल आहे. एका गावातील पाटील हा एक पुढारी नेता आहे ज्याला गावातील जंगलात स्टील फॅक्टरी उभी करायची आहे आणि त्यासाठी तो जंगलतोड करत सुटलेला असतो परंतु या जंगलतोडीला आणि फॅक्टरी उभारणीला गावातील तरुणांचा विरोध असतो. या तरुणांचं नेतृत्व करत असतो शिव जो चित्रपटाचा नायक आहे. त्यांचा विरोध मोडण्यासाठी पाटील अनेक गुंड पाठवतो परंतु प्रत्येक वेळी हे तरुण झाडं वाचवण्यासाठी जिवाची बाजी लावून लढत असतात. तर आता या लढाईत कोण जिंकतं.? फॅक्टरी उभी राहते की झाडं वाचतात हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
पर्यावरण संवर्धन आणि झाडांचं महत्त्व पटवून देणारा हा चित्रपट सगळ्यांनाच आवडेल असं काही नाही. केवळ मनोरंजन करणं हा या चित्रपटाचा उद्देश नाही त्यामुळे असे चित्रपट प्रेक्षकांना कमी आवडतात. चित्रपटाचा विषय चांगला आहे परंतु पटकथा आणि दिग्दर्शन यात चित्रपट कमी पडतो. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.


८. विठ्ठला तूच (Vitthala Tuch)
२०२४. नाटक. २ तास ३ मिनिटे. [ U ]
लेखक प्रफुल्ल मस्के
दिग्दर्शकप्रफुल्ल मस्के
कलाकारयोगेश जम्मा, उषा बीबे, सुप्रित निकम,मोहन जोशी
निर्मातावाय जे प्रॉडक्शन्स
प्रदर्शित तारीख२१ जून २०२४
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.७⭐/ ५

“विठ्ठला तूच” चित्रपट समीक्षा :-

विठ्ठला तूच हा चित्रपट प्रफुल्ल मस्के यांनी दिग्दर्शित केलेला असून चित्रपटाची कथा सुद्धा त्यांनीच लिहिली आहे. यात योगेश जम्मा आणि उषा बीबे हे नवोदित कलाकार मुख्य भूमिका साकारत आहेत.
भक्तांच्या संकटसमयी धावून जाणारा विठुराया हा सगळ्यांचा लाडका देव आहे. असाच विठ्ठलाच्या रूपात गावातील गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणारा विठ्ठल शिंदे हा त्या गावातील लोकांसाठी देवच आहे. याच विठ्ठल शिंदेचा जीवनप्रवास उलगडत चित्रपट पुढे सरकत असतो. यातच विठ्ठल शिंदे आणि राधा यांची प्रेमकथा सुरू होते परंतु असं एक राजकीय वळण येतं की त्यांच्या प्रेमात दुरावा येतो. आता नक्की काय होतं हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
गावातील पार्श्वभूमी असलेल्या या चित्रपटात प्रेमकथा दाखवण्यात आली असली तरी कथा मुख्यपणे नायकाभोवती जास्त फिरते. कथा म्हणावी तेवढी सक्षम नाही की चित्रपट मनोरंजन करू शकेल. त्यात कलाकारांची निवड सुद्धा अशी का केली असावी असा प्रश्न पडतो. एकंदर चित्रपट प्रभावी नाही. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार.


९. अ व्हॅलेंटाईन्स डे (A Valentine Day)
२०२४. नाटक, रोमान्स. २ तास ६ मिनिटे. [ UA ]
लेखक अजित दिलीप पाटील
दिग्दर्शकरोहीत राव नरसिंगे
कलाकारअरुण कदम, संजय खापरे, सुरेश विश्वकर्मा, अभिजित चव्हाण, अभिनेता, निर्माता फैरोज माजगावकर, अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी, चैताली चव्हाण
निर्माताफैरोज माजगांवकर
प्रदर्शित तारीख२१ जून २०२४
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.०⭐/ ५

“अ व्हॅलेंटाईन्स डे” चित्रपट समीक्षा :-

मराठीमध्ये सस्पेन्स थ्रिलर चित्रपट बनवण्याचा प्रयत्न कमी दिग्दर्शक किंवा निर्माते करतात परंतु आजकाल हे प्रमाण वाढत चाललं आहे. वेबसिरीजकडे प्रेक्षक वळल्यामुळे की काय सस्पेन्स थ्रिलर हॉरर चित्रपटांची निर्मिती मराठी मध्ये सुद्धा ओत आहे. असाच एक चित्रपट २१ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.
रोहीत राव नरसिंगे यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट सस्पेन्स थ्रिलर प्रकारचा आहे.
शहरातील मुली अचानक गायब होऊ लागल्यावर पोलिस प्रशासनाला जाग येते आणि या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी एका महीला पोलिस अधिकऱ्याची नियुक्ती करण्यात येते. या गायब होणाऱ्या मुली फेब्रुवारी महिन्यात जास्त गायब होत असतात. आता ते का.? याचा शोध लागतो का.? या सगळ्यामागे कोण असतं हा सस्पेन्स बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल.
सस्पेन्स थ्रिलर चित्रपट बनवण्याचा प्रयत्न चांगला असला तरी चित्रपट बघताना बऱ्याचदा कथा आणि प्रसंग सुसंगत वाटत नाहीत. दिग्दर्शन ठिकठाक आहे. काही कलाकारांचा अभिनय चांगला आहे. हिंदी चित्रपटांची कॉपी केल्यासारखा वाटतो. ठिकठाक म्हणू शकतो असा हा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.

तर मंडळी गेल्या महिन्यात तुम्ही यातील कोणकोणते चित्रपट पाहिले ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *