HomeFilmsHindi

जून २०२४ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी | List of Hindi Movies released in June 2024

जून २०२४ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेले हे हिंदी चित्रपट तुम्ही पाहीलेत का?

Written by : आकांक्षा कोलते

Updated : ऑगस्ट 11, 2024 | 1:54 PM

खरं तर आता वेबसिरीज चा जमाना असल्यामुळे प्रेक्षकांच्या चित्रपटांच्या बाबतीत अपेक्षा वाढल्या आहेत. त्यातही नवीन आलेल्या चित्रपटांमध्ये ओरिजनल कंटेट कमीच असतो. बरेच चित्रपट हे रिमेक असतात. त्यामुळे चित्रपटगृहात प्रेक्षकांना खेचून आणणं हे आता निर्माते आणि दिग्दर्शक यांच्यापुढे नवीन आव्हान आहे. आता प्रेक्षकांच्या चित्रपटांच्या बाबतीत असलेल्या अपेक्षा पूर्ण होतायत की नाही हे आमच्या परीने सांगण्याचा प्रयत्न या लेखात आम्ही करणार आहोत.
आज या लेखात मे महिन्यात प्रदर्शित झालेले चित्रपट कोणते आहेत आणि बघायला हवेत की नको याबद्दल आमचं मत सांगणार आहोत.

Hindi movie list release in June 2024, movie reviews and information
१. मल्हार (Malhar)
२०२४. नाटक. १ तास ४३ मिनिटे. [ UA ]
लेखक विशाल कुंभार, अपूर्वा पाटील
दिग्दर्शकविशाल कुंभार
कलाकारऋषी सक्सेना, अंजली पाटील, श्रीनिवास पोकळे, विनायक पोतदार, शारिब हाश्मी, महंमद सामद, अक्षता आचार्य
निर्माताप्रफुल पासड
प्रदर्शित तारीख७ जून २०२४
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.३⭐/ ५

“मल्हार” चित्रपट समीक्षा :-

मल्हार हा चित्रपट म्हणजे तीन वेगवेगळ्या विषयांवर आधारित आहे. अशा तीन कथा ज्या एकमेकां मध्ये फार गुंतलेल्या नसल्या तरी काही समान धागे नक्कीच आहेत. विशाल कुंभार यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून हा चित्रपट एकाच वेळी हिंदी आणि मराठी भाषेत प्रदर्शित झाला आहे.
गुजरात मधील कच्छ भागात या कथा घडत आहेत. पहिल्या कथेत दोन मित्रांची गोष्ट,जावेद आणि भैरव यांची मैत्री बघायला मिळते. त्यातील एकाला ऐकू येत नसल्याने तो श्रवणयंत्र वापरत असतो परंतु ते तुटल्यावर नवीन श्रवणयंत्र घेण्यासाठी पैसे नसतात. तेव्हा पंधराशे रुपये वाचवण्यासाठी ते श्रवणयंत्र समजून ब्लूटूथ डिव्हाईस घेतात. ही गोष्ट अतिशय उत्कटतेने मांडली आहे. तर दुसऱ्या कथेत प्रेम आणि आंतरधर्मीय विवाह यावर भाष्य करण्यात आलं आहे. यात जावेदची बहीण जतीन या एका मराठी मुलावर प्रेम करत असते. परंतु त्या दोघांना काय संघर्ष करावा लागतो हे या कथेत बघायला मिळतं. तर तिसऱ्या कथेत स्त्री जर आई होऊ शकत नसेल तर तिला किती त्रास, टोमणे आणि छळ या सगळ्याला सामोरं जावं लागतं हे बघायला मिळतं. गावातील सरपंच यांची सून केसर ही काही कारणाने आई होऊ शकत नाहीय आणि सरपंचांना काही करून घराण्याला वारस हवा आहे. त्यासाठी ते केसरला कसं छळतात हे बघून आजही मुल होणं न होणं यासाठी फक्त स्त्रियाच कशा जबाबदार आहेत हा गैरसमज अजूनही कसा आपली मुळ घट्ट धरून आहे हे बघायला मिळतं. यातच केसरच्या आयुष्यात कोणीतरी येतं आणि एक ट्विस्ट येतो. आता तो ट्विस्ट काय हे बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल.
चित्रपटाचे तिन्ही विषय छान आहेत. परंतु पटकथा आणि संवाद तेवढे परिणामकारक वाटत नाहीत. दिग्दर्शन ठिकठाक आहे. सगळ्या कलाकारांनी अभिनय चांगला केला आहे परंतु प्रेक्षकांना हा चित्रपट किती आवडेल ही शंका आहे. फार मसाला नसलेला असा समाजातील काही समस्यांवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर आल्यावर चित्रपट बघू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.


२. बजरंग और अली (Bajrang Aur Ali)
२०२४. नाटक. २ तास २ मिनिटे. [ UA ]
लेखक जयवीर
दिग्दर्शकजयवीर
कलाकारजयवीर, सचिन पारिख, रिद्धि गुप्ता, युगांत बद्री पांडे, गौरी शंकर सिंह
निर्मातासुरेश शर्मा, मिथिलेश शर्मा और विशाला वर्मा
प्रदर्शित तारीख७ जून २०२४
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.३⭐/ ५

“बजरंग और अली” चित्रपट समीक्षा :-

चित्रपटाच्या नावावरून लक्षात आलं पाहिजे की चित्रपट सर्वधर्मसमभाव ही शिकवण शिकविणारा असणार. बजरंग और अली या चित्रपटाची कथा जयवीर यांनी लिहीली असून या चित्रपटाचं दिग्दर्शन करत या चित्रपटात बजरंग ही भूमिका मुख्य भूमिका सुद्धा त्यांनी साकारलेली आहे.
बजरंग (जयवीर) आणि अली(सचिन पारिख) या दोन मित्रांची ही गोष्ट आहे. दोन वेगवेगळ्या धर्मातील हे दोघं एकमेकांचे जिवलग मित्र असतात. हसणं, खेळणं, मस्करी, कुठेही जाणं येणं, कोणाच्या मदतीला धावून जाणं हे सगळीकडे एकत्र असतात. दोघांच्या मैत्रीत दोघांच्या धर्माची आडकाठी कधीच आली नव्हती. परंतु कालांतराने असं वळणं येतं की धर्म किंवा मैत्री पर्यायाने माणुसकी यापैकी एक काहीतरी निवडायची वेळ येते. अशा वेळी हे दोघं काय करतात हे बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल.
थोडक्यात हा चित्रपट हेच सांगतो की कोणत्याही धर्मापेक्षा माणुसकी महत्वाची. आणि प्रत्येक धर्म हेच शिकवत असतो. जयवीर यांनी एक चांगली कथा लिहिली आहे. दिग्दर्शन सुद्धा चांगलं आहे परंतु काही गोष्टींमध्ये चित्रपट कमी पडतो. संगीत अजून चांगलं असतं तर चित्रपट प्रभावी झाला असता. परंतु प्रत्येक भारतीयाने बघावा असा हा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.


३. ब्लॅकआउट (Blackout)
२०२४. विनोदी, थ्रिलर. १ तास ५६ मिनिटे. [ UA ]
लेखक देवांग भावसार, अब्बास दलाल, हुसैन दलाल
दिग्दर्शकदेवांग भावसार
कलाकारविक्रांत मेस्सी, मौनी रॉय, सुनील ग्रोवर, जिशू सेनगुप्ता, रुहानी शर्मा, अनंत विजय जोशी, छाया कदम, प्रसाद ओक
निर्माताज्योति देशपांडे, नीरज कोठारी
प्रदर्शित तारीख७ जून २०२४
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.२⭐/ ५

“ब्लॅकआउट” चित्रपट समीक्षा :-

जिओ सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेला ब्लॅकआउट हा चित्रपट म्हणजे मनोरंजनाचा ब्लॅकआउट झाल्यासारखं आहे. म्हणजे हा चित्रपट का बनवला असावा असा प्रश्न पडतो. विक्रांत मेस्सीने ट्वेल्थ फेल चित्रपटात ज्या दर्जाचं काम केलं आहे ते बघून त्याने हा चित्रपट का निवडला असावा हे कोडं आहे.
चित्रपटाच्या कथेबद्दल सांगण्यासारखं असं काही नाही. कारण संपूर्ण चित्रपटात एका रात्रीत घडलेला गोंधळ आहे. संपूर्ण शहरातील लाईट गेल्यावर एका स्टिंग ऑपरेशन करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या क्राइम रिपोर्टर लेनी डिसूजा (विक्रांत मैसी) सोबत काय काय घडतं याची गोष्ट म्हणजे हा चित्रपट. खाण्यासाठी बाहेर पडलेल्या लेनीची गाडी एका दुसऱ्या गाडीवर आदळते. नेमकी ती गाडी सोनं लुटून आणलेल्या चोरांची असते. ते सोनं बघून लेनीला हाव सुटते. ते सोनं चोरून पळत असताना परत त्याच्या गाडीखाली एक माणूस येतो आणि तो मरतो. आणि हे सगळं एक दारूडा बघतो. मग त्याला हाताशी धरून लेनी पुढे काय काय करतो. पुढे अजून या सगळ्यात भ्रष्ट पोलिस, राजकारणी नेता, गॅंगस्टर,गुंड हू सगळे कसे सामिल होतात हे या चित्रपटात अतिशय नाटकी आणि कंटाळवाण्या पद्धतीने दाखवलं आहे. चित्रपट पूर्ण बघाल की नाही ही शंका आहे. करायचा म्हणून केलेला हा चित्रपट न बघाल तर उत्तम. माझ्याकडून या चित्रपटाला एक स्टार.


४. मुंज्या (Munjya)
२०२४. भयपट, विनोदी. २ तास ३ मिनिटे. [ UA ]
लेखक योगेश चांदेकर, निरेन भट्ट
दिग्दर्शकआदित्य सरपोतदार
कलाकारअभय वर्मा, शरवरी वाघ, मोना सिंह, सत्यराज, सुहास जोशी
निर्मातादिनेश विजन, अमर कौशिक
प्रदर्शित तारीख७ जून २०२४
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.०⭐/ ५

“मुंज्या” चित्रपट समीक्षा :-

सध्या संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांना मुंजाने झपाटलेलं आहे. ७ जून रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळत आहे. आदित्य सरपोतदार यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट एक हॉरर कॉमेडी या प्रकारातील असून योगेश चांदेकर आणि निरेन भट्ट यांनी ही कथा लिहिली आहे. चित्रपट हिंदी असला तरी त्याचा गाभा मराठी आहे.
कोकणात मुंजा च्या गोष्टी आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. त्याच मुंजा ची ही गोष्ट आहे. कोकणातील एका गावात राहणाऱ्या गोट्या नावाच्या मुलाला त्याच्या पेक्षा वयाने मोठ्या असलेल्या मुन्नीसोबत लग्न करायचं असतं यावरून गोट्या ला घरातून मार देखील मिळतो. त्याची मुंज देखील केली जाते. आणि त्याच दरम्यान मुन्नीचं लग्न दुसऱ्यासोबत होतं. हे सहन न झाल्याने गोट्या चेटुकवाडीला जाऊन करणी करून आपल्या बहीणीचा नरबळी देऊन मुन्नी ला मिळवण्याचा प्रयत्न करतो परंतु यात त्याचाच मृत्यू होतो. आणि मुंज झाल्यावर दहा दिवसांत जर मृत्यू झाला तर ते भूत म्हणजे तो अतृप्त आत्मा मुंजा म्हणून फिरत राहतो. आता हा गोट्या म्हणजे मुंजा पुढे जाऊन मुन्नी च्या नातीसोबत बेलासोबत(शर्वरी)सोबत लग्न करू पाहत असतो. त्यासाठी तो त्याचं झाड म्हणून त्याच्याच घरातील एक वारस बिट्टू च्या शरीराचा वापर करत असतो. आता हा बिट्टू मुंज्यापासून स्वतःला आणि घरच्यांना कसं वाचवतो हे या चित्रपटात रंजक, विनोदी आणि थरारक पद्धतीने दाखवलं आहे.
एकंदर मनोरंजन करणारा चित्रपट आहे. कलाकारांनी अभिनय चांगला केला आहे. काही ठिकाणी दृश्यं भडक वाटतात. व्हिएफएक्स चा वापर चांगल्या प्रकारे करण्यात आला आहे. दिग्दर्शन चांगलं आहे. कॉम्प्युटर द्वारे तयार केलेलं मुंजा हे पात्र चांगलं झालं आहे. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.


५. फूली (Phooli)
२०२४. नाटक. १ तास ४८ मिनिटे. [ U ]
लेखक अविनाश ध्यानी
दिग्दर्शकअविनाश ध्यानी
कलाकारअविनाश ध्यानी, रिया बलूनी, सुरुचि सकलानी, प्रिन्स जुयाल,ऋषि राज भट्ट
निर्मातामनीष कुमार, अविनाश ध्यानी, ललित जिंदाल, राजीव शर्मा, मनोज कुमार सिंग
प्रदर्शित तारीख७ जून २०२४
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.४⭐/ ५

“फूली” चित्रपट समीक्षा :-

फूली हा एक खऱ्या घटनेवर किंवा प्रसंगांवर आधारित असून हा एक प्रेरणादायी चित्रपट आहे. पहाडी प्रदेशातील ही गोष्ट आहे. अविनाश ध्यानी यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून या चित्रपटाची कथा सुद्धा त्यांनीच लिहिली आहे.
पहाडी प्रदेशातील फूली नावाच्या एका छोट्या मुलीची ही गोष्ट आहे. जी आपल्या दारूड्या वडीलांसोबत राहत असते. फूली ला शाळेत जायला आवडत असतं. अभ्यास करायला आवडत असतो. परंतु तिच्या बापाला मात्र तिने शाळेत न जाता शेतात काम करून पैसे कमवावे असं वाटतं म्हणून तो तिला शाळेत पाठवत नाही. तिने मिळवलेल्या पैशांची तो दारू पिऊन तो दिवस दिवस नशेत पडून असतो. त्याच्यामुळे फूलीची शाळा बंद व्हारची वेळ आलेली असते तेवढ्यातच तिच्या शाळेत एक जादूगार येतो आणि फूलीचं आयुष्य बदलून जातं. तिची शाळा सुरू होते. आता हा जादूगार नक्की काय करतो हे बघण्यासाठी हा चित्रपट बघायला.
“बेटी बचाओ बेटी पढा़ओ” या संकल्पनेवर आधारित ही कथा आहे. विशेषतः पहाडी भागात मुलींना शिकवणं गरजेचे आहे हे सांगणारा हा चित्रपट आहे. अविनाश ध्यानी यांनी एक चांगला विषय घेऊन चित्रपट बनवला आहे. परंतु चित्रपटगृहात जाऊन बघण्यासाठी प्रेक्षकांना हवा तो मसाला यात नाही. ओटीटी प्लॅटफॉर्मवर आल्यावर बघायला हरकत नाही असा हा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.


६. चंदू चॅम्पियन (Chandu Champion)
२०२४. खेळ. ॲक्शन, जीवनचरित्र, नाटक. २ तास २२ मिनिटे. [ UA ]
लेखक कबीर खान, सुमित अरोड़ा, सुदीप्तो सरकार
दिग्दर्शककबीर खान
कलाकारकार्तिक आर्यन, भाग्यश्री बोरसे, भुवन अरोड़ा, यशपाल शर्मा, विजय राज, राजपाल यादव, श्रेयस तळपदे, सोनाली कुलकर्णी
निर्मातासाजिद नाडियाडवाला
प्रदर्शित तारीख१४ जून २०२४
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.५⭐/ ५

“चंदू चॅम्पियन” चित्रपट समीक्षा :-

आजपर्यंत असे अनेक “अनसंग रिअल हिरो” होऊन गेले असतील किंवा अजूनही हयात असतील ज्यांनी स्वतःच्या जीवाची बाजी लावून भारताची मान उंचावली आहे परंतु हे खरे हिरो आपल्या भारतीय जनतेला माहीत देखील नाहीत. अशाच एका शूरवीर, जिद्दी खेळाडूची प्रेरणादायी गाथा सांगणारा “चंदू चॅम्पियन” हा चित्रपट गेल्या महिन्यात प्रदर्शित झाला आहे. आपल्या भारताला पहिलं वहीलं पॅरालिम्पिक सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या महाराष्ट्रातील सांगली मधील मुरलीकांत पेटकर यांची ही थक्क करून सोडणारा हा प्रवास दिग्दर्शक कबीर खान यांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी करत मोठ्या पडद्यावर मांडला आहे.
एखाद्या लहान मुलाने स्वप्न बघून त्याचा पाठपुरावा करून ते पूर्ण करण्याची ही खरीखुरी कहाणी. कुस्ती स्पर्धेत ऑलिम्पिक मध्ये पदक मिळवून आणलेल्या खाशाबा जाधव यांची गावकऱ्यांनी काढलेली भव्य मिरवणूक बघून मुरली यांनी लहानपणीच ठरवलं होतं की आपण सुद्धा ऑलिम्पिक जिंकून पदक मिळवायचं. आणि त्या दृष्टीने त्यांनी कुस्ती शिकत प्रवास सुरू केला. परंतु काही कारणास्तव ते प्रशिक्षण बंद झालं आणि त्यांनी थेट भारतीय सैन्यात प्रवेश झाल्यावर ते बॉक्सिंगचं प्रशिक्षण घेऊ लागले. त्याच दरम्यान १९६५ साली झालेल्या एका युद्धात त्यांना एक दोन नव्हे तर तब्बल नऊ गोळ्या लागल्या आणि त्य अपघातात त्यांच कमरेखाली शरीर म्हणजे पाय निकामी झाले. तरीही जिद्द न सोडता, आत्महत्या करावी वाटत असताना देखील पुन्हा नव्या उमेदीने उभं राहून निराश न होता त्यांनी पोहण्याचं प्रशिक्षण घेणं चालू केलं. आणि पहिल्यांदाच भारताला पॅरालिम्पिक फ्री स्टाईल स्विमिंग स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवून दिलं. पण आपलं दुर्दैव हे की या महान खेळाडू, किंवा देशासाठी लढलेल्या या जवानाबद्दल आपल्याला काहीच माहीत नव्हतं.
कबीर खान यांनी उत्तम दिग्दर्शन केले आहे. काही ठिकाणी काही प्रसंग किंवा काही गोष्टी पटत नाहीत. परंतु ही एक प्रेरणादायी शौर्यगाथा बघताना काही गोष्टी नजरेआड करू शकतो. कार्तिक आर्यन चा आतापर्यंतचं बेस्ट काम या चित्रपटात पहायला मिळतं. इतर सगळ्या सहकलाकारांनी उत्तम साथ दिली आहे. चित्रपटाचा क्लायमॅक्स बघून तुम्हाला नक्कीच अभिमान वाटेल. प्रत्येक भारतीयाने बघावा असा हा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला साडेतीन स्टार.


७. मनीहार (Manihar)
२०२४. नाटक. विनोदी. [ UA ]
लेखक संजीव कुमार राजपूत
दिग्दर्शकसंजीव कुमार राजपूत
कलाकारबदरुल इस्लाम, रोशनी रस्तोगी, पंकज बेरी, एहसान कुरेशी
निर्मातामयंक शेखर, नम्रता सिंग
प्रदर्शित तारीख१४ जून २०२४
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.५⭐/ ५

“जगभरून फिल्म्स” चित्रपट समीक्षा :-

संजीव कपूर राजपूत यांनी दिग्दर्शित केलेला मनीहार हा चित्रपट १४ जून रोजी प्रदर्शित झाला परंतु अपेक्षेप्रमाणे या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. हा एक विनोदी चित्रपट असला तरी मनोरंजन करण्यात कमी पडतो.
चित्रपटाची कथा बल्लू नावाच्या नायकाभोवती फिरणारी आहे. उत्तरप्रदेश मधील एका छोट्याशा गावात हा बल्लू बांगड्या विकण्याचा व्यवसाय करत असतो. घरोघरी जाऊन तो बायकांना हातात बांगड्या भरून देत असतो. बल्लूचं लग्न अजून ठरत नसतं. त्याच गावातील सादीराम बल्लूसाठी सावित्रीचं स्थळ घेऊन येतो आणि इथून खरी गोष्ट सुरु होते. बल्लू आणि सावित्री एकमेकांना पसंत करून त्यांची लव्हस्टोरी सुरू पण होते. लग्न ठरतं परंतु त्यानंतर बल्लू ला रातांधळेपणा येतो. आणि सावित्रीचा भाऊ बळवंत जो एक कुस्तीपटू असतो त्याला कळतं. त्यामुळे तो हे लग्न मोडतो. त्याचाच राग म्हणून, बदला म्हणून बल्लू शपथ घेतो की तो बळवंत ला कुस्तीत हरवणार. अर्थात हे सगळं विनोदी पद्धतीने दाखवलं आहे.
चित्रपटाची कथा, पटकथा कमकुवत आहे त्यामुळे चित्रपट म्हणावा तेवढा प्रभावी झाला नाही. दिग्दर्शन सुद्धा ठिकठाक आहे. चित्रपटात विशेष असं काही नाही. एक विनोदी चित्रपट म्हणून एकदा बघू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार.


८. लव्ह की अरेंज मॅरेज (Luv Ki Arrange Marriage)
२०२४. विनोदी. परिवार, रोमान्स. [ UA ]
लेखक राज‌ शांडील्य
दिग्दर्शकइशरत खान
कलाकारसनी सिंग, अवनीत कौर, अन्नू कपूर, राजपाल यादव, सुप्रिया पाठक
निर्माताकमलेश भानूशाली, विनोद भानूशाली,विमल लाहोटी, राज शांडिल्य
प्रदर्शित तारीख१४ जून २०२४
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.०⭐/ ५

“लव्ह की अरेंज मॅरेज” चित्रपट समीक्षा :-

लव्ह की अरेंज मॅरेज या चित्रपटाबद्दल एका वाक्यात सांगायचं झालं तर हा चित्रपट तुम्ही न बघणे हे उत्तम. इशरत खान यांनी ओढून ताणून एक कथा लिहून त्यावर चित्रपट काढला आहे आणि चित्रपटाचं दिग्दर्शन सुद्धा तसंच ओढून ताणून करत विनोदी चित्रपट बनवण्याचा हा प्रयत्न अगदीच फसलेला आहे.
मध्यप्रदेशातील ही गोष्ट आहे. “लव्ह” नावाचा हा हीरो अरेंज मॅरेज करायचं म्हणून म्हणजेच पारंपरिक पद्धतीने लग्न करण्यासाठी मुलगी बघायला जातो. पण तिथे गेल्यावर उलटच घडतं. हिरोच्या वडिलांना म्हणजे अनू कपूर ला हिरोईन ची आई म्हणजे सुप्रिया पाठक आवडते. आता नक्की कोणाचं लग्न ठरतं आणि कोणाची प्रेमकहाणी सुरू होते हे सगळं या चित्रपटात गमतीशीर, विनोदी पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे परंतु हे बघताना हसणं तर सोडा पण वैताग नक्की येतो.
सनी सिंग आणि अवनीत कौर यांनी अभिनय म्हणजे काय हे एकदा शिकून घेणे गरजेचे आहे. त्यातल्या त्यात राजपाल यादव हा एक आशेचा किरण आहे परंतु त्याला देखील फार वाव नाही. सुप्रिया पाठक, अनू कपूर या जेष्ठ कलाकारांनी हा चित्रपट का निवडला हा एक प्रश्न आहे. एकंदर चित्रपट न बघावा असाच आहे. माझ्याकडून या चित्रपटाला एक स्टार.


९. इश्क विश्क रिबाऊंड (Ishq Vishk Rebound)
२०२४. विनोदी, रोमान्स. १ तास ४७ मिनिटे. [ यु / ए ]
लेखक वैशाली नायक, विनय छावल, केतन पडगांवकर, आकर्ष खुराना
दिग्दर्शकनिपुण अविनाश धर्माधिकारी
कलाकाररोहित सराफ, पश्मीना रोशन, जिब्रान खान, नायला ग्रेवाल, सुप्रिया पिळगांवकर, आकर्ष खुराना, कुशा कपिला, शीबा चड्ढा, शताफ फिगार
निर्मातारमेश तौरानी, जया तौरानी
प्रदर्शित तारीख२१ जून २०२४
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.३⭐/ ५

“इश्क विश्क रिबाऊंड” चित्रपट समीक्षा :-

२००३ मध्ये प्रदर्शित झालेला शाहीद कपूर आणि अमृता राव यांचा इश्क विश्क हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. चित्रपटाची कथा फार वेगळी, खास होती असं काही नाही परंतु या चित्रपटातील गाणी, तेव्हाच्या काळाला अनुसरून असलेली कथा यामुळे चित्रपट प्रेक्षकांना आवडला होता. याच चित्रपटाचा संदर्भ घेऊन तब्बल २० वर्षांनी इश्क विश्क रिबाऊंड हा चित्रपट निपुण धर्माधिकारी यांनी दिग्दर्शित केला असून रमेश तौरानी यांची निर्मिती आहे.
चित्रपटाची कथा तीच आहे जी आतापर्यंत असंख्य चित्रपटांमध्ये पाहीलेली आहे. प्रेमाचा त्रिकोण चौकोन सगळंच या कथेत आहे. राघव(रोहीत सराफ), साहीर(जिब्रान खान), सान्या(पश्मिना रोशन) हे तिघांमध्ये चांगली मैत्री आहे. साहीर आणि सान्या या दोघांचं एकमेकांवर प्रेम असतं परंतु त्यांच्यामध्ये सतत काही ना काही कुरबुर चालू असते. आणि प्रत्येक वेळी त्यांच्यातील दुरावा घालवण्यासाठी राघव प्रयत्न करत असतो. परंतु या दोघांची भांडणं इतक्या प्रमाणात असतात की यांची भांडणं सोडवता सोडवता राघवची गर्लफ्रेंड रिया त्याला सोडून जाते. पुढे साहीर डिफेन्स अकॅडमी जॉइन करतो त्यामुळे सान्या आणि साहीरमध्ये दुरावा निर्माण होतो. या दरम्यान सान्या आणि राघव जवळ येतात. आता पुढे नक्की कोण कोणासोबत राहतं हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
निपुण धर्माधिकारी यांचं दिग्दर्शन चांगलं असलं तरी मुळात कथेमध्ये फार वाव नाही त्यामुळे चित्रपट म्हणावा तेवढा प्रभावी नाही. सुरूवातीला थोडीफार इंटरेस्टिंग वाटत असलेली कथा नंतर अगदीच प्रेडिक्टेबल आणि गुंडाळलेली वाटते. रोहित सराफने सुंदर अभिनय केला आहे. देहरादून मधील सुंदर निसर्ग छान पद्धतीने दाखवला आहे, सिनेमॅटोग्राफी छान आहे. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.


१०. महाराज (Maharaj)
२०२४. नाटक, गुन्हेगारी. २ तास ११ मिनिटे. [ UA ]
लेखक विपुल मेहता, स्नेहा देसाई
दिग्दर्शकसिद्धार्थ पी मल्होत्रा
कलाकारजुनैद खान,जयदीप अहलावत, शालिनी पांडे, शर्वरी वाघ, जय उपाध्याय, स्नेहा देसाई, विराफ पटेल, धर्मेंद्र गोहिल, संजय गोराडिया,माहेर विज
निर्माताआदित्य चोपड़ा
प्रदर्शित तारीख२१ जून २०२४
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.५⭐/ ५

“महाराज” चित्रपट समीक्षा :-

२१ जून रोजी नेटफ्लिक्स वर प्रदर्शित झालेला महाराज हा चित्रपट प्रदर्शित होण्या आधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. ठराविक धर्मावर आधारित चित्रपट असला की हा वाद अपेक्षित असतो. असो, तर
१९६० च्या दशकातील एक सत्यकथा आहे. समाजसुधारक व पत्रकार करसनदास मुळजी यांच्या आयुष्यावर हा चित्रपट आधारित आहे. त्यांच्या जन्मापासून ते वैष्णव धर्मातील एका मोठ्या धर्मगुरू विरोधात केलेल्या लढ्याची ही कथा आहे. एका वैष्णव संप्रदायातील गुजराती कुटुंबात करसनदास यांचा जन्म होतो. परंतु धर्म, देव यांच्याबद्दल असंख्य प्रश्न त्यांना लहानपणापासूनच पडत होते. याचाच परिणाम पुढे जाऊन एक क्रांती घडवतो.
करसनदास(जुनैद खान) हे साधारण दहा वर्षांचे होते तेव्हा गुजरात सोडून तत्कालीन बॉम्बे ला आले. ते राहत असतात तिथे एका हवेलीच्या धर्मगुरू जेजे यांचं बरंच स्तोम असतं. एकदा होळी साजरी करत असताना करसनदास आणि त्यांची होणारी पत्नी किशोरी हे देखील जेजे च्या दर्शनाला गेलेले‌ असतात तेव्हा जेजे किशोरी यांना आपल्या सेवेसाठी निवडतात. साहजिकच देवभोळ्या किशोरी यांना आनंद होतो परंतु पुढे जाऊन जेजे तीचं शोषण करतो. आणि हीच वेळ आपल्या बहीणीवर येणार हे समजतं तेव्हा किशोरी आत्महत्या करते. हे सगळं सहन न झालेले करसनदास स्वतःचं पत्रक सुरू करून जेजेचं पितळ उघडं पाडण्याचा प्रयत्न करतात परंतु जेजे त्यांच्यावरच अब्रुनुकसानीचा दावा दाखल करतात. आता पुढे काय होतं हे बघण्यासाठी मात्र हा चित्रपट बघावा लागेल.
चुकीच्या प्रथा, चालिरिती, स्त्रीयांच्या बाबतीत असलेल्या अघोरी प्रथा या सगळ्या विरुद्ध करसनदास यांनी त्या काळी उठवलेला आवाज कौतुकास्पद आहे. एक सत्य घटना म्हणून हा चित्रपट नक्कीच बघायला हवा. काही ठिकाणी चित्रपट रेंगाळतो. परंतु एकंदर मनोरंजन करणारा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.


११. हमारे बारह (Hamare Baarah)
२०२४. नाटक. २ तास २८ मिनिटे. [ UA ]
लेखक राजन अग्रवाल, कमल चंद्रा, पीयूष सिंह, सूफी खान
दिग्दर्शककमल चंद्रा
कलाकारअन्नू कपूर, इशलिन प्रसाद, अदिति भटपहरी, अश्विनी कलसेकर, मनोज जोशी, राहुल बग्गा, परितोष त्रिपाठी, पार्थ समथान
निर्मातारवि एस गुप्ता, बीरेंद्र भगत, संजय नागपाल, शिव बालक सिंह
प्रदर्शित तारीख२१ जून २०२४
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.९⭐/ ५

“हमारे बारह” चित्रपट समीक्षा :-

हमारे बारह हा चित्रपट कमल चंद्रा यांनी दिग्दर्शित केला असून हा चित्रपटा बाबतीत सुद्धा बरेच वादविवाद झाले. एका ठराविक जातीतील लोकांमुळे कशी लोकसंख्या वाढते हे दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे परंतु अर्थात तसं करण्याचा उद्देश नाही हे सांगून. वाढती लोकसंख्या आणि महीला सशक्तीकरण या महत्त्वाच्या मुद्द्यांवर हा चित्रपट भाष्य करतो.
चित्रपटाच्या खलनायका भोवती फिरणारी कथा आहे.कव्वाल असणाऱ्या मुस्लिम खान साहेबांना(अन्नू कपूर) आधी एकुण अकरा मुलं आहेत आणि आता त्यांची दुसरी पत्नी गरोदर असल्यामुळे बाराचा आकडा पूर्ण होणार असतो. परंतु त्यांची ही पत्नी त्यांच्यापेक्षा वयाने खूप लहान आणि नाजूक आहे त्यामुळे तिच्या जिवाला धोका असतो. त्याचमुळे खान साहेबांची मोठी मुलगी अल्फिया तिच्या या आईच्या पाठीशी उभी राहते परंतु गर्भपात करणे हे धर्मात बसत नाही असं सांगत खानसाहेब गर्भपात करण्यास नकार देतात.
खानसाहेब हे कट्टर मुस्लिमवादी असून स्त्रियांना घरात कस्पटासमान वागणूक देणे, मुलांची रांग लावणे, घरात त्यांचीच तानाशाही चालत असते. परंतु या सगळ्याला न जुमानता आईचा गर्भपात करण्यास संमती मिळावी म्हणून त्यांचीच मुलगी स्वतःच्या वडिलांना थेट कोर्टात खेचते. आता पुढे काय होतं हे बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल.
चित्रपट एकसंध वाटत नाही. दिग्दर्शन ठिकठाक आहे. अन्नू कपूर यांनी अभिनय चांगला केला आहे. परंतु ठराविक अजेंडा घेऊन चित्रपट बनवण्यात आला आहे असं वाटतं आणि त्याच नादात चित्रपट भरकटला आहे. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार.


१२. पुश्तैनी (Pushtaini)
२०२४. नाटक. १ तास ३० मिनिटे. [ UA ]
लेखक विनोद रावत
दिग्दर्शकविनोद रावत
कलाकारराजकुमार राव, विनोद रावत,रिता हीर
निर्माताअंकीत गांधी
प्रदर्शित तारीख२१ जून २०२४
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.०⭐/ ५

“पुश्तैनी” चित्रपट समीक्षा :-

विनोद रावत यांनी दिग्दर्शित केलेला पुश्तैनी हा चित्रपट एका वेगळ्या संवेदनशील विषयावर भाष्य करणारा आहे. यात एकाच वेळी बऱ्याच विषयांना हात घातलेला आहे. फिल्म इंडस्ट्रीत चालणारा कास्टींग काउच हा प्रकार असेल किंवा गाव सोडून तरूण वर्ग शहराकडे गेल्यावर गावची वाटणारी ओढ असेल, असे बरेच कंगोरे चित्रपटात पहायला मिळतात.
फिल्म इंडस्ट्रीत चालणारा कास्टींग काउच हा प्रकार पुरूषांच्या बाबतीत चालत असेल तरी त्याबद्दल आजपर्यंत कोणी अवाक्षरही काढलेलं नाही, परंतु हा चित्रपट त्यावर उजेड टाकतो. हा एक नक्कीच धाडसी प्रयोग आहे.
चित्रपटाची कथा भुप्पी या तरुणा भोवती फिरणारी आहे. त्याला अभिनेता व्हायचं असतं म्हणून तो शहरात जातो. खूप स्ट्रगल केल्यानंतर त्याला राजकुमार राव सोबत एक छोटासा रोल करण्याची संधी मिळते. परंतु त्याच्या आयुष्यात वादळ येतं जेव्हा ज्याच्यामुळे हा रोल मिळाला आहे ती व्यक्ती त्याला एक व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल करत असते. एका आठवड्यात आठ लाख रूपयांची मागणी असते नाहीतर तो व्हिडिओ लीक केला जाईल अशी धमकी दिली जाते. शेवटचा पर्याय म्हणून पैशांसाठी भुप्पी आपल्या गावी नैनीताल ला पोहचतो. कारण त्याचं आणि त्याच्या वडिलांचं नातं तेवढं चांगलं नसतं. परंतु तिथे गेल्यावर एक नवीन वळण त्याच्या आयुष्यात येतं. आता नक्की काय होतं हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
चित्रपटाचा विषय नक्कीच कौतुकास्पद आहे. कथ देखील चांगली आहे. क्लायमॅक्स, नैनीतालचं सौंदर्य दाखवणारी सिनेमॅटोग्राफी छान आहे. परंतु अशा प्रकारचे चित्रपट ठराविक प्रेक्षकांना आवडतात. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार


१३. जहांगीर नॅशनल युनिव्हर्सिटी (Jahangir National University)
२०२४. नाटक. २ तास ३२ मिनिटे. [ A ]
लेखक विनय शर्मा
दिग्दर्शकविनय शर्मा
कलाकारसिद्धार्थ बोडके,उर्वशी रौतेला, रवि किशन, विजय राज, पीयूष मिश्रा, रश्मि देसाई, सिद्धार्थ भारद्वाज, कुंज आनंद, अतुल पांडेय, शिवज्योति राजपूत,उमर शरीफ
निर्माताप्रतिमा दत्ता
प्रदर्शित तारीख२१ जून २०२४
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.०⭐/ ५

“जहांगीर नॅशनल युनिव्हर्सिटी” चित्रपट समीक्षा :-

“जहांगीर नॅशनल युनिव्हर्सिटी” नावावरून थोडी कल्पना येते की चित्रपट नक्की कोणत्या युन्हिव्हर्सिटी वर आधारित आहे. त्यामुळे अर्थात त्या युन्हिव्हर्सिटीचा आणि चित्रपटातील कथेचा कसा आणि काय संबंध हे चित्रपट पाहील्यावर कळतंच. चित्रपटाची कथा अर्थातच देशातील आणि विशेषतः जहांगीर नॅशनल युनिव्हर्सिटी येथील राजकारण यावर आधारित आहे. विनय शर्मा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून डाव्या आणि उजव्या विचारसरणी मधील फरक दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
चित्रपटाची कथा युन्हिव्हर्सिटी मधील विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून लिहीली आहे. सौरभ शर्मा (सिद्धार्थ बोडके) हा एक विद्यार्थी या विद्यापीठात शिकायला आला आहे परंतु तिथे आल्यावर तिथे चालणार राजकारण, आणि डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांमुळे तो अस्वस्थ होतो. डाव्या गटातील किसना कुमार आणि सौरभ शर्मा यांच्यातील वाद, कट्टर दुश्मनी सुरू होते. सौरभ मते डाव्या गटातील सगळे देशद्रोही असून देशाविरुद्ध विचार करतात आणि म्हणूनच त्यांच्याविरुद्ध तो आवाज उठवतो. त्या दृष्टीने तो एक एक पाऊल उचलतो यात त्याला अखिलेश पाठक ऊर्फ बाबा (कुंज आनंद) यांचा मार्गदर्शन मिळतं. एकंदर डाव्या विचारसरणीचे लोक कसे देशद्रोही असतात हे दाखवून देण्याचा हा छुपा अजेंडा आहे असं वाटू शकतं.
चित्रपटात अशाच वेगवेगळ्या घटना, किस्से बघायला मिळतात. शिव्यांचा भडीमार जास्त आणि डायलॉग कमी अशी परिस्थिती बऱ्याचदा जाणवते. काही कलाकारांनी अभिनय चांगला केला आहे. आपण बातम्यांमध्ये जे बघत आलोय तेच या चित्रपटात वेगळ्या ॲंगलने अर्थातच दिग्दर्शकाच्या ॲंगलने बघायला मिळतं. पॉलिटिकल ड्रामा ज्यांना आवडतो त्यांना हा चित्रपट आवडू शकतो. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.


१४. रौतू का राझ (Rautu Ka Raaz)
२०२४. गुन्हेगारी, रहस्य, नाटक. १ तास ५५ मिनिटे. [ UA ]
लेखक शारिक पटेल, आनंद सुरपुर
दिग्दर्शकआनंद सुरापुर
कलाकारनवाजुद्दीन सिद्दकी, राजेश कुमार, अतुल तिवारी,अनूप त्रिवेदी, समृद्धि चंदोला
निर्माताउमेश बंसल, आनंद सुरपुर, चिंटू श्रीवास्तव
प्रदर्शित तारीख२८ जून २०२४
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.३⭐/ ५

“रौतू का राझ” चित्रपट समीक्षा :-

आनंद सुरापूर दिग्दर्शित ‘रौतू का राझ’ हा चित्रपट एक रहस्यपट आहे. आजकाल सस्पेन्स थ्रिलर चित्रपट बनवण्याचा घाट बरेचसे निर्माते दिग्दर्शक घालत असतात, कारण प्रेक्षकांना तेच आवडतं. एखादा खुन, नाहीतर खुनांची मालिका, आणि मग एका मागोमाग एक उलगडत जाणारी रहस्यं, अचंबित करणारे ट्विस्ट आणि टर्न्स आणि आपल्याला वाटत असतं त्यापेक्षा भलताच काहीतरी भन्नाट क्लायमॅक्स. हे सगळं प्रेक्षकांना आवडत असतं. परंतु तेच तेच चित्रपट सतत येत असल्याने नवीन काही बघायला मिळत नाही. ‘रौतू का राझ’ या चित्रपटात सुद्धा तेच होतं. हा, क्लायमॅक्स चांगला आहे परंतु चित्रपटाची कथा पटकथा ठिकठाक आहे.
उत्तराखंडमधील ‘रौतू की बेली’ या छोट्याशा पहाडी गावातील ही एक गोष्ट आहे. गाव छोटासा , लोकसंख्या जेमतेम त्यामुळे फार काही गुन्हे तिथे घडण्याचा प्रश्न येत नाही. त्यामुळे पोलिसांना फारसं काम नाही. परंतु चित्रपट म्हटल्यावर काहीतरी कथा असणारच. अचानक या गावात एक खुन होतो. खरं तर हा खुन की नैसर्गिक मृत्यू इथून कथा सुरू होते. एका अंध विद्यार्थ्यांच्या निवासशाळे मधील वॉर्डन म्हणून काम करणाऱ्या संगीता यांचा (नारायणी शास्त्री) संशयास्पद मृत्यू होतो. आणि याची तपासणी, चौकशी करण्यासाठी कित्येक दिवस कामाचा अनुभव नसलेले पोलिस अधिकारी दीपक नेगी (नवाझुद्दीन सिद्दीकी) हे येतात. सब इन्स्पेक्टर नरेश डिमरी (राजेश कुमार) आणि नेगी या खुनाचा तपास सुरू करतात तसतशा नवीन गोष्टी समोर येत जातात. आणि हा नैसर्गिक मृत्यू नसून हत्या आहे हा संशय दृढ होतो. शाळेचे ट्रस्टी मनोज केसरी यांच्यावर जाणारी संशयाची सुई शेवटपर्यंत बऱ्याच जणांवर फिरत राहते. आता ही हत्या कोणी आणि का केली हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल. क्लायमॅक्स नक्कीच वेगळा आणि छान आहे.
झी फाईव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट तुम्ही बघू शकता. एकदा बघायला हरकत नाही असा हा चित्रपट आहे. कमी बजेट घेऊन चित्रपट बनवण्यात आला आहे हे प्रकर्षाने जाणवतं. नवाजुद्दीन याने नेहमीप्रमाणे चित्रपट स्वतःच्या खांद्यावर पेलला आहे. दिग्दर्शन ठिकठाक आहे. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.


१५. शर्मा जी की बेटी (Sharmajee Ki Beti)
२०२४. नाटक. १ तास ५५ मिनिटे. [ UA ]
लेखक ताहिरा कश्यप
दिग्दर्शकताहिरा कश्यप
कलाकारसाक्षी तंवर, दिव्या दत्ता, सैयामी खेर, प्रवीण डबास, शारिब हाशमी, वंशिका तपाड़िया, अरिस्ता मेहता
निर्माताअतुल कसबेकर,तनुज गर्ग,समीर नायर, दीपक सहगल
प्रदर्शित तारीख२८ जून २०२४
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.४⭐/ ५

“शर्मा जी की बेटी” चित्रपट समीक्षा :-

आजकाल महीला सशक्तीकरण, स्त्रियांच्या समस्या, थोडक्यात स्त्रियांशी संबंधित मुद्द्यांवर आधारीत बरेच चित्रपट येत असतात. असाच “शर्मा जी की बेटी” हा चित्रपट ॲमेझॉन प्राइम वर प्रदर्शित झाला आहे. ताहिरा कश्यप हीने या चित्रपटाची कथा लिहिली असून दिग्दर्शन केलेलं आहे. या चित्रपटात फार मोठ्या समस्या किंवा कोणत्या क्रांतीकारी बदलांवर भाष्य न करता स्त्रीयांच्या रोजच्या आयुष्यात येणारे छोटे मोठे प्रसंग, त्यांच्या भावना यावर आधारित ही कथा आहे.
पाच वेगवेगळ्या स्त्रीयांच्या गोष्टी या कथेत बघायला मिळतात ज्या एकमेकांशी निगडित आहेत. एकाच शाळेत शिकणाऱ्या स्वाती (वंशिका तपाड़िया) आणि गुरवीन (अरिस्टा मेहता) या दोघी आपापल्या टेन्शनमध्ये असतात. स्वाती ला अजून मासिक पाळी सुरू न झाल्याचं टेन्शन तर गुरवीनच्या लक्षात येतंय की तिला मुलांऐवजी मुलींच आकर्षण आहे. तर एकीकडे स्वातीला वाटतंय की आपल्या आईचं ज्योती (साक्षी तंवर)आपल्या कडे लक्ष नाही, जेव्हा की ज्योती घर आणि नोकरी सांभाळत तारेवरची कसरत करत असते. नवऱ्याची मदत मिळून आपल्या कडुन जबाबदारी पार पाडली जात नाहीय अशी खंत तिला वाटतेय.
तर दुसरीकडे गुरवीन ची आई(दिव्या दत्ता) जी पटियाला वरून मुंबईत आल्यावर नवऱ्या बरोबर फारसं पटत नसल्याने एकटी पडलीय‌. अजून एक गोष्ट म्हणजे राज्य पातळीवर खेळणारी तन्वी शर्मा(सैयामी खेर), जी क्रिकेट चं स्वप्न उराशी घेऊन वडोदरा वरून मुंबईत आलेली आहे. परंतु तिचा प्रियकर रोहन (रवजीत सिंह) हा तिची साथ न देता लग्नासाठी तिच्या मागे लागला आहे.
अशा वेगवेगळ्या समस्यां मधून आपापला मार्ग काढत या सगळ्याजणी पुढे जात आहेत. या सगळ्यांसोबत शेवटी काय होतं हे चित्रपट बघीतल्यावर कळेल. ॲमेझॉन प्राइम वर हा चित्रपट तुम्ही बघू शकता. ठिकठाक स्टोरी लाईन असलेला चित्रपट आहे. कलाकारांनी अभिनय चांगला केला आहे. क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टी स्त्रियांच्या आयुष्यात किती महत्त्वाच्या असू शकतात हे सांगणारा हा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.


१६. कूकी (Kooki)
२०२४. नाटक. १ तास ५५ मिनिटे. [ UA ]
लेखक जुनमोनी देवी खाउंद, प्रणव देका
दिग्दर्शकप्रणव देका
कलाकाररितिशा खाउंद, बोधिसत्व शर्मा, राजेश तेलंग, नैन्सी सिंह,दीपानिता शर्मा, देवलीना भट्टाचार्जी, रितु शिवपुरी
निर्माताजुनमोनी देवी खाउंद
प्रदर्शित तारीख२७ जून २०२४
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.५⭐/ ५

“कूकी” चित्रपट समीक्षा :-

कूकी हा एक असा चित्रपट आहे जो सरळ न्यायव्यवस्थेला प्रश्न विचारतो. एखाद्याची हत्या हा जर मोठा अपराध असू शकतो तर एखाद्या स्त्री वर होणारा बलात्कार हा मोठा अपराध का असू शकत नाही. कारण आपल्याकडे अजूनही बलात्काराच्या बाबतीत कायदे तेवढे कठोर नाहीत. कूकी हा चित्रपट अशाच अनेक प्रश्नांवर भाष्य करतो.
कूकी ही एक साधारण सोळा वर्षांची मुलगी आहे. नुकतंच तारुण्यात पदार्पण होत असताना किती तरी भावना उचंबळून येत असतात. आकर्षण, प्रेम हे सगळं हवंहवंसं वाटत असतं. हे वय खरं तर आडमुठं आणि परिपक्व नसतं. पण कूकी सुद्धा या सगळ्याला अपवाद नसते. तिच्या आयुष्यात सप्तर्षी नावाचा एक मुलगा येतो जो तिला आवडत असतो. अर्थात तिला सुद्धा तो आवडत असतो. परंतु एक अशी भयानक काळी रात्र कूकीच्या आयुष्यात येते की तिचं आयुष्य उध्वस्त होतं.
अल्पवयीन कूकीवर अतिशय विकृत आणि हिंसक पद्धतीने सामुहिक बलात्कार होतो आणि कूकीचं आयुष्य बदलून जातं. या सगळ्या विरोधात सामान्य जनता रस्त्यावर उतरून आंदोलन करते. न्याय मागते. आता तो न्याय कूकीला मिळतो की नाही हे बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल.
कथा आणि विषय परिचयाचा असला तरी तो वेगळ्या पद्धतीने हाताळला आहे. कलाकारांनी उत्तम अभिनय केला आहे. दिग्दर्शन सुद्धा चांगलं आहे. परंतु या आधी असे अनेक चित्रपट येऊन गेले आहेत त्यामुळे प्रेक्षकांना तो कितपत आवडेल ही शंका आहे. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.


तर मंडळी या वीकेंडला तुम्ही कोणता चित्रपट बघायला जाताय हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *