HomeFilmsMarathi

जून 2025 मध्ये रिलीझ झालेल्या मराठी चित्रपटांची यादी आणि त्यांची समीक्षा

List of Marathi Movies released in June 2025 and their reviews

Written by : आकांक्षा कोलते

Updated : ऑगस्ट 05, 2025 | 10:50 PM

जून २०२५ मध्ये प्रदर्शित झालेले हे मराठी चित्रपट तुम्ही पाहिलेत का.?

    खरं तर आता वेबसिरीज चा जमाना असल्यामुळे प्रेक्षकांच्या चित्रपटांच्या बाबतीत अपेक्षा वाढल्या आहेत. त्यातही नवीन आलेल्या चित्रपटांमध्ये ओरिजनल कंटेट कमीच असतो. परंतु आशयघन आणि दर्जेदार कथानक हा मराठी चित्रपटांचा गाभा आहे. मराठी चित्रपट हे नेहमीच वास्तववादी आणि चांगला कंटेंट घेऊन भेटीला येतात हे आता प्रेक्षकांच्या लक्षात येत आहे. त्यामुळे मराठी चित्रपटांना प्रेक्षक आता भरभरून प्रतिसाद देतात. असं असलं तरीही हल्ली इतके चित्रपट प्रदर्शित होत असतात की ते तेवढे दर्जेदार असतातच असं नाही. त्यामुळे आम्ही हे सांगण्याचा प्रयत्न करू की प्रदर्शित झालेला एखादा चित्रपट खरंच बघायला हवा की नको. 

   आज या लेखात आपण जून २०२५मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपट आम्हाला कसे वाटले ते सांगणार आहोत. ज्यामुळे ते बघायला हवे की नको ते ठरवणं तुम्हाला सोपं जाईल. 
List of Marathi Movies released in June 2025 and their reviews

१. जारण (Jarann)
२०२५. भयपट, थ्रिलर, साइकोलॉजी. २ तास ५ मिनिटे. [U/A १६+]
लेखक हृषिकेश गुप्ते
दिग्दर्शकहृषिकेश गुप्ते
कलाकारअनिता दाते, अमृता सुभाष, राजन भिसे, किशोर कदम, ज्योती मालशे,सीमा देशमुख,विक्रम गायकवाड, अवनी जोशी
निर्माताअमोल भगत, नितीन भालचंद्र कुलकर्णी
रिलीज तारीख६ जून २०२५
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.०⭐/ ५

“जारण” चित्रपट समीक्षा :-

मे महिन्यात प्रदर्शित झालेल्या बऱ्याच चित्रपटांपैकी एक दोन चित्रपट सोडल्यास बाकी चित्रपट काही खास नव्हते. परंतु जुन महिन्याची सुरुवात मात्र दमदार झाली आहे. नाव वाचूनच भीती वाटावी असा “जारण” चित्रपट एक सायकॉलॉजीकल थ्रिलर चित्रपट आहे. हृषिकेश गुप्ते दिग्दर्शित हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे याचं कारण म्हणजे मराठीत एक वेगळा प्रयोग आणि त्यातील कलाकारांचा अभिनय. अंधश्रद्धेला खतपाणी घातल्यावर आणि तिचा मनावर खोल परिणाम झाला की काय घडतं हे या चित्रपटात पहायला मिळतं.
चित्रपटाची कथा एका गावातील जुन्या वाड्यात घडणारी आहे. राधा म्हणजे अमृता सुभाष ही बऱ्याच वर्षांनी आपल्या मुलीसोबत गावी आपल्या वाड्यात आलेली असते. तिचे वडील म्हणजे राजन भिसे हा वाडा विकणार असतात म्हणून सगळे नातेवाईक एकत्र आलेले असतात. परंतु राधाच्या बाबतीत या वाड्यात तिच्या लहानपणी असं काही घडलेलं असतं की अजुनही त्या प्रसंगाचा परिणाम तिच्या मनावर झालेला जाणवत असतो. तिच्या लहानपणी त्या वाड्यात वरच्या मजल्यावर राहणाऱ्या गंगुटी म्हणजे अनिता दाते ही राहत असते. ती करणी, काळी जादू करणारी असते म्हणून अख्खा गाव घाबरत असतो. गावाच्याच सांगण्यावरून राधाचे वडील तिला वाड्यातून हाकलून देतात. याचात बदला म्हणून गंगुटीने राधावर “जारण” ही काळी जादू केलेली असते.
आणि त्याचे परिणाम राधा भोगत असतेच. आणि त्यासाठी ती मानसोपचारतज्ञ डॉ. धनंजय कुलकर्णी म्हणजे किशोर कदम यांच्याकडे उपचार घेत असते.
परंतु इतक्या वर्षांनी त्या वाड्यात परत आल्यावर पुन्हा एकदा गंगुटीने केलेल्या जारणचा परिणाम दिसायला लागतो. आणि दरम्यान अनेक भयानक ट्विस्ट समोर येतात. आता ते काय.? हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल. राधा म्हणून अमृता सुभाष हिने अप्रतिम अभिनय केला आहे. परंतु चित्रपटाचा आत्मा म्हणजे गंगुटी ही थोड्या थोड्या वेळासाठी स्क्रीन वर दिसते परंतु यात अनिता दाते हिने जो काही अभिनय केला आहे तो थरकाप उडवणारा आहे. एकंदरीत सगळ्याच कलाकारांनी अभिनय उत्तम केला आहे.
खरं तर या चित्रपटाची जेवढी चर्चा झाली किंवा क्रिटिक्सने जे काही रिव्ह्यू दिले आहेत ते बघून जर तुम्ही चित्रपट बघाल तर थोडी निराशाच पदरी पडू शकते. बऱ्याच गोष्टी न पटणाऱ्या आहेत. कथानक म्हणावं इतकं सक्षम नाही. चित्रपटाचा उत्तरार्ध थोडा संथ वाटतो, परंतु शेवट नक्कीच चांगला आहे. फार डोकं आणि लॉजिक न लावता चित्रपट पाहिला तर नक्कीच आवडेल. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.


२. आंबट शौकीन (Aambat Shoukin)
२०२५. विनोदी, ड्रामा. २ तास १५ मिनिटे. [U/A १६+]
लेखक निखिल वैरागर
दिग्दर्शकनिखिल वैरागर
कलाकारनिखिल वैरागर, पार्थ भालेराव, किरण गायकवाड, अक्षय टंकसाळे, पूजा सावंत, प्रार्थना बेहेरे
निर्माताप्रफुल्ल काकणी, रंजना लखोटिया,अनघा भुताडा, निलेश राठी
रिलीज तारीख१३ जून २०२५
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.०⭐/ ५

“आंबट शौकीन” चित्रपट समीक्षा :-

मराठी चित्रपटसृष्टीत खरं तर पूर्वी दर्जेदार आणि आशयघन विषय यावर चित्रपट बनत असत, भले तेव्हा त्यातील काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालले नसतील परंतु आज ते चित्रपट आवर्जून बघीतले जातात. पण आता मात्र दिवसेंदिवस मराठी चित्रपटांचा दर्जा घसरत चालला आहे. त्यातही एखादं आयटम साँग असेल तर चित्रपट चालेल हा मोठा गैरसमज निर्माते दिग्दर्शक यांचा झालेला आहे. असाच एक चित्रपट जुन रोजी प्रदर्शित झाला असून चित्रपटाचं दिग्दर्शन निखिल वैरागर याने केलेलं आहे.
चित्रपटाची कथा अतिशय सामान्य आहे. ही तीन मित्रांची गोष्ट आहे. वरुण (अक्षय टंकसाळे), ललित (निखिल वैरागर) आणि रेड्डी (किरण) असे हे तिघे सतत मुलींच्या मागे असतात. मुली, शारीरिक आकर्षण, व्हिडिओ चॅट, पॉर्न व्हिडिओ हे सगळं त्यांच्यासाठी नॉर्मल असतं. परंतु याच सेक्स साठी ते एका मोठ्या जाळ्यात अडकतात. आजकाल सुरू असलेल्या हनीट्रॅप अडकल्यानंतर त्यांच्या लक्षात येत की हे एक मोठं रॅकेट आहे. आता हे रॅकेट कोण चालवत असतो आणि पुढे काय होतं हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
अत्यंत बोगस आणि बटबटीत सादरीकरण असलेल्या या चित्रपटातून एक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे परंतु एक चित्रपट म्हणून अगदीच सुमार आहे. कथा, दिग्दर्शन अभिनय कशातच राम नसलेल्या या चित्रपटात गौतमी पाटील हिचं आयटम साँग आहे. कदाचित तिच्या साठी प्रेक्षक चित्रपट बघतील अशी अपेक्षा होती असेल पण असो, प्रेक्षक सुज्ञ आहेत. एकंदरीत फसलेला चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला एक स्टार.


३. शातीर द बिगीनिंग (Shaatir: The Beginning)
२०२५. गुन्हेगारी, थ्रिलर. २ तास ७ मिनिटे. [U/A १६+]
लेखक सुनील वायकर
दिग्दर्शकसुनील वायकर
कलाकाररेश्मा वायकर, योगेश सोमण, रमेश परदेशी, अनिल नगरकर, मीर सरवर
निर्मातारेश्मा वायकर
रिलीज तारीख१३ जून २०२५
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.०⭐/ ५

“शातीर द बिगीनिंग” चित्रपट समीक्षा :-

आजकाल मराठी चित्रपट म्हणजे स्वतःला अभिनय करायचा असेल तर स्वतः चित्रपट निर्मिती करून हौस पूर्ण करावी असं झालेलं आहे. रेश्मा वायकर यांची निर्मिती असलेला शातीर द बिगीनिंग हा त्यांचा पहिला चित्रपट आहे. या चित्रपटात त्यांनी एका धडाकेबाज, बिनधास्त अशा मुलीची भूमिका साकारली असून हा एक सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आहे. समाजातील ड्रग्सच्या विळख्यात अडकलेली तरुणाई आणि ड्रग्स मुळे या तरुण मुलांचं उध्वस्त होणारं आयुष्य अशा प्लॉटवर चित्रपटाची कथा बेतलेली आहे. एका सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट आधारित आहे.
पुण्यातील एका कॉलेज मध्ये घडणारी ही कथा आहे. कॉलेजच्या होस्टेलमधील एका मुलाने आत्महत्या केल्यानंतर त्याने तसं का केलं याचा शोध सुरू होतो. यातुनच कॉलेज मध्ये सुरू असलेल्या ड्रग्स रॅकेटचे धागेदोरे उलगडत जातात. कॉलेजमध्ये शिकत असलेली नायिका आकांक्षा म्हणजेच रेश्मा वायकर ही या सगळ्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करते. तिला या रॅकेटच्या मागे कोण आहे हे शोधून काढायचं असतं. परंतु या सगळ्यात तिला खूप गोष्टींना, संकटांना सामोरं जावं लागतं. आता असं असताना ती या सगळ्याचा शोध लावते की नाही हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
चित्रपटाची कथा सस्पेन्स थ्रिलर जॉनरची असली तरी ती अतिशय सामान्य आणि अगदीच जुनी आहे. सुनील वायकर यांचं दिग्दर्शन देखील सुमार आहे. रेश्मा वायकर हीने डॅशिंग आणि बोल्ड, बिनधास्त अशी भूमिका साकारली आहे परंतु अभिनय नाटकी वाटतो. इतर कलाकार सुद्धा ठिकठाक आहेत. योगेश सोमण यांना फार भूमिका मिळाली नाही. एकंदरीत फसलेला चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला एक स्टार.


४. समसारा (Samsara)
२०२५. ॲक्शन, साहसी, माइथोलॉजिकल, थ्रिलर. २ तास. [U/A १६+]
लेखक सागर लढे, समीर मानेकर, विश्वेश वैद्य
दिग्दर्शकसागर लढे
कलाकारपुष्कर श्रोत्री, डॉ गिरीश ओक, नंदिता धुरी, प्रियदर्शनी इंदलकर, तनिष्का विशे, यशराज डिंबळे, कैलास वाघमारे
निर्मातापुष्कर गुप्ता
रिलीज तारीख२० जून २०२५
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.०⭐/ ५

“समसारा” चित्रपट समीक्षा :-

२० जून रोजी प्रदर्शित झालेला सागर लढे दिग्दर्शित समसारा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांची सहनशीलता तपासण्यासाठी बनवलेला असावा असा माझा अंदाज आहे. सायली संजीव आणि ऋषी सक्सेना यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट एक हॉरर थ्रिलर सस्पेन्स चित्रपट आहे. म्हणजे किमान तसा बनवण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
चित्रपटाची कथा दोन काळात घडताना बघायला मिळते. १९९५ चा एक काळ आणि आताचा एक काळ. १९९५ मध्ये एक जोडप्यासोबत असं काही घडतं की २०२५ मध्ये सुद्धा तो भुतकाळ त्यांचा पाठलाग करत असतो. खरं तर ही एका असुराची कथा आहे. जो अतृप्त आहे. १९९५ मध्ये भानवी म्हणजेच सायली संजीव जी धर्मशास्त्र विषयाची प्राध्यापक आहे ती तिच्या नवऱ्यासोबत गोव्यात असते तेव्हा तिच्यासोबत विचित्र घटना घडतात. ती गरोदर असताना तिला भयानक स्वप्न पडत असतात. यामागे एक कारण असतं. हे एका काळात बघायला मिळतं तर २०२५ मध्ये विधी आणि तिच्या मुलाचं अपहरण होतं. त्यामागे सुद्धा तेच कारण असतं. आता ते काय हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
चित्रपटाची कथा बरी होती परंतु ज्याप्रकारे ही पटकथा संवाद लिहिले गेले आहेत त्यामुळे पदरी फक्त निराशा पडते. कलाकारांचा अभिनय बरा आहे. दिग्दर्शन सुद्धा अगदीच सुमार. सगळ्यात हास्यास्पद काय असेल तर चित्रपटातील व्हिएफएक्स, स्पेशल इफेक्ट्स आणि ॲनिमेशन संबंधित सगळं काम. म्हणजे चित्रपटातील असुर बघून अक्षरशः हसावं की रडावं हा प्रश्न पडतो. अतिशय बोगस आणि दर्जाहीन काम झालेलं आहे. एकंदरीत सपशेल फसलेला चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला एक स्टार.


५. सजना (Sajana)
२०२५. ड्रामा. रोमँटिक. २ तास २४ मिनिटे. [U/A १३+]
लेखक शशिकांत धोत्रे
दिग्दर्शकशशिकांत धोत्रे
कलाकारआकाश सर्वगोड,संभाजी पवार,तृप्ती मोरे
निर्माताशशिकांत धोत्रे
रिलीज तारीख२७ जून २०२५
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.१⭐/ ५

सजना” चित्रपट समीक्षा :-

शशिकांत धोत्रे दिग्दर्शित सजना हा चित्रपट २७ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा चित्रपट पाहिल्यानंतर सैराटची आठवण आल्याशिवाय राहत नाही. आपल्या समाजात आजही जातपात, स्पृश्य अस्पृश्य समाज हे सगळं चित्र बघायला मिळतं. ठराविक स्थान, मंदिर किंवा गावातील वरच्या जातीतील लोकांच्या घरात आजही दलित समाज किंवा चर्मकार समाजातील लोकांना प्रवेश दिला जात नाही. महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी हे चित्र आजही आहे. अशा वेळी एखाद्या खालच्या जातीतील मुलाने उच्च जातीतील मुलीशी लग्न करण्याचा विचार करणं म्हणजे आत्महत्या करण्यासारखं आहे. कितीही कटू वाटलं तरी हेच सत्य आहे. याच पार्श्वभूमीवर आधारित या चित्रपटाची कथा लिहिली आहे.
सजना (आकाश सर्वगोड) हा एक खालच्या जातीतील तरुण असतो ज्याला प्रशिक्षण घेऊन पोलीस भरतीत दाखल व्हायचं आहे. सजना याला वंदना (तृप्ती मोरे) ही आवडत असते. अर्थातच वंदना ही एका प्रतिष्ठित घरातील वरच्या जातीतील मुलगी असते. वंदनाला देखील सजना आवडत असतो. दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम असतं. परंतु या कथेत प्रेमाचा त्रिकोण आहे त्यामुळे तिच्या समाजातील दिन्या (संभाजी पवार)याला देखील वंदना आवडत असते. आता या तिघांचं पुढे काय होतं याचा अंदाज तुम्हाला आल असेलच परंतु जाणून घेण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
चित्रपटाची कथा नेहमीचीच आहे. पटकथा संवाद यात फार दम नाही. कलाकार सुद्धा नवखे आहेत. जमेची बाजू इतकीच आहे या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी. अतिशय सुंदर असं छायाचित्रण, एडिटिंग आहे. पार्श्वसंगीत सुद्धा छान आहे. परंतु मुळात कथाच नवीन नाही त्यात अभिनय दिग्दर्शन ठिकठाक असल्यामुळे चित्रपट तेवढा प्रभावी वाटत नाही. माझ्याकडून या चित्रपटाला एक स्टार.



६. ऑल इज वेल (All Is Well)
२०२५. विनोदी. गुन्हेगारी. २ तास ८ मिनिटे. [U/A १६+]
लेखक प्रियदर्शन जाधव
दिग्दर्शकयोगेश जाधव
कलाकारअभिनय बेर्डे, प्रियदर्शन जाधव, रोहित हळदीकर, दिशा काटकर, नक्षत्रा मेढेकर
निर्माताअमोद मुचंडीकर, वाणी हलप्पनवार
रिलीज तारीख२७ जून २०२५
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.१⭐/ ५

“ऑल इज वेल” चित्रपट समीक्षा :-

२७ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आलेला “ऑल इज वेल” या चित्रपटाचं दिग्दर्शन योगेश जाधव याने केलेलं असून प्रियदर्शन जाधव याची कथा आहे. परत एकदा तीच कथा, तोच विषय आणि तेच विनोद घेऊन हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे. प्रियदर्शन जाधव याने विनोदी कथा लिहिली परंतु हे अशा प्रकारचं कथानक घेऊन याआधी इतके चित्रपट आलेत की या चित्रपटात नवीन असं काही नाही.
चित्रपटाची कथा अमर, अकबर आणि अर्थातच ॲंथनी अशा तिघांभोवती फिरते. अमर(अभिनय बेर्डे) हा सोशल मीडियावर ओळख झालेल्या एका मुलीला भेटायला नागपूर वरून मुंबईत आलेला आहे.‌ परंतु त्याने दिलेली अंगठी घेऊन ती मुलगी गायब झालेली आहे. तर अकबर हा मालेगाव वरून आपलं नशीब आजमावून बघायला मुंबईत येतो परंतु आल्या आल्या त्याचं‌ पाकिट चोरीला जातं. आणि ॲंथनी हा गोव्यावरून अभिनय क्षेत्रात नाव कमवायचं ठरवून स्वप्नांच्या दुनियेत आलेला असतो परंतु या तिघांसोबत काही ना काही घडतं आणि ते रस्त्यावर येतात. रहायला जागा मिळत नसते आणि ते एकमेकांना भेटल्यावर यातून मार्ग काढण्यासाठी काही ना काही शक्कल लढवतात. परंतु या सगळ्या नादात ते एका खुनाच्या आणि चोरीच्या आरोपावरून तुरुंगात जातात. आता पुढे काय होतं हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
मुळात कथानकच इतकं जुनं आणि त्यात तेच तेच पांचट विनोद आणि ओढून ताणून केलेले विनोदी सीन्स. कलाकारांचा अभिनय ठिकठाक. प्रियदर्शन जाधवने ओव्हर ॲक्टिंग कमी केली असती तरी चाललं असतं. पार्श्वसंगीत ठिकठाक. दिग्दर्शन सुद्धा काही खास नाही. ओटीटीवर आल्यावर बघायला काहीच नाही तर बघू शकता असा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला एक स्टार.

   तर मंडळी यापैकी तुम्ही कोणते चित्रपट पाहीलेत आणि आवडलेत का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसंच या विकेंडला वरीलपैकी कोणता चित्रपट बघायला आवडेल हे सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *