जून 2025 मध्ये रिलीझ झालेल्या हिंदी चित्रपटांची यादी आणि त्यांची समीक्षा
List of Hindi Movies released in June 2025 and their reviews
Written by : आकांक्षा कोलते
Updated : ऑक्टोबर 23, 2025 | 04:34 PM
खरं तर आता वेबसिरीज चा जमाना असल्यामुळे प्रेक्षकांच्या चित्रपटांच्या बाबतीत अपेक्षा वाढल्या आहेत. त्यातही नवीन आलेल्या चित्रपटांमध्ये ओरिजनल कंटेट कमीच असतो. बरेच चित्रपट हे रिमेक असतात. त्यामुळे चित्रपटगृहात प्रेक्षकांना खेचून आणणं हे आता निर्माते आणि दिग्दर्शक यांच्यापुढे नवीन आव्हान आहे. आता प्रेक्षकांच्या चित्रपटांच्या बाबतीत असलेल्या अपेक्षा पूर्ण होतायत की नाही हे आमच्या परीने सांगण्याचा प्रयत्न या लेखात आम्ही करणार आहोत.
आज या लेखात जून २०२५ महिन्यात प्रदर्शित झालेले चित्रपट कोणते आहेत आणि बघायला हवेत की नको याबद्दल आमचं मत सांगणार आहोत.

| १. स्टोलन (Stolen) |
| लेखक | करण तेजपाल, स्वप्निल सालकर, गौरव ढींगरा, शुभम वर्धन |
| दिग्दर्शक | करण तेजपाल |
| कलाकार | अभिषेक बनर्जी, शुभम वर्धन, मिया मैजलर, हरीश खन्ना, शहीदुर्रहमान, सार्थक दीवान भानु |
| निर्माता | गौरव ढींगरा |
| रिलीज तारीख | ४ जुन २०२५ |
| भाषा | हिंदी |
“स्टोलन” चित्रपट समीक्षा :-
चित्रपट असो किंवा शॉर्ट फिल्म ती प्रभावी होण्यासाठी तुम्ही ती सादर कशी करता ते महत्त्वाचं. आणि हे सुत्र दिग्दर्शक करण तेजपाल याला अचूक उमजलं आहे हे स्टोलन हा चित्रपट पाहिल्यानंतर लक्षात येतं. एक छोटीशी कथा, अगदी दिड तासाचा वेळ परंतु ज्या प्रकारे ही कथा मांडली गेली आहे त्यामुळे संपूर्ण चित्रपट एका वेगळ्या अनामिक भीतीने आपण बघतो. चित्रपट बघताना हृदयाचे ठोके वाढतात, भीतीने सतत पोटात गोळा येत राहतो आणि कित्येकदा आपण स्वतःला त्या ठिकाणी असतो तर असा विचार करून अंगावर काटा उभा राहतो. स्टोलन हा चित्रपट करण तेजपाल याने दिग्दर्शित केलेला असून कथा लिहिली आहे करण तेजपाल, स्वप्निल सालकर, गौरव ढींगरा आणि शुभम वर्धन या सगळ्यांनी मिळून.
सत्य घटनेवर आधारित असलेली कथा लहान मुलांची तस्करी या अतिशय महत्त्वाच्या विषयाला धरून आहे. राजस्थान मधील एका रेल्वेस्टेशनवर कथेची सुरुवात होते. झुंपा(मिया मेल्जर) मी एक मजूर महिला आपल्या पाच महिन्यांच्या मुलीला घेऊन झोपलेली असते आणि ती जोपेत असतानाच तीचं बाळ कोणीतरी चोरून नेतं. परंतु झुंपाला जाग आल्यावर तिला तिथे असलेला गौतम दिसतो आणि तिला त्याचाच संशय येतो. खरं तर तर त्याच स्टेशनवर आपल्या भावाला रमनला (शुभम वर्धन) घेण्यासाठी गौतम (अभिषेक बनर्जी) हा आलेला असतो. परंतु या बाळ चोरण्याच्या घटनास्थळी असल्यामुळे तो संशयित आणि प्रथम साक्षीदार म्हणून त्याची चौकशी सुरू होते. परंतु पुढे पुढे ही केस इतकी गुंतागुंतीची होते की गौतम, रमन आणि बाळाची आई या तिघांचा एक व्हिडिओ व्हायरल होऊन तिघांवर मुलं चोरण्याचा आरोप सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात होतो. शेवटी ते बाळ सापडतं का.? खरा गुन्हेगार कोण असतो हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
चित्रपटाचा क्लायमॅक्स नक्कीच उत्कंठावर्धक आहे. शेवटपर्यंत चित्रपट तुम्हाला खिळवून ठेवतो. या कथेत मानवी स्वभावाचे विविध पैलू दाखवले गेले आहेत. एका भावाला त्या आईला मदत करावी वाटते तर दुसरीकडे दुसऱ्या भावाला मात्र या सगळ्यात कशाला पडायचं असं वाटतं. एकंदरीत मानवी स्वभाव, समाजातील गरीब श्रीमंत ही खोल दरी, शासकीय यंत्रणा अशा विविध विषयांवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. हा नक्कीच बघण्यासारखा आहे. ॲमेझॉन प्राईम वर हा चित्रपट उपलब्ध आहे. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.
| २. हाऊसफुल्ल ५ (Housefull 5) |
| लेखक | साजिद नाडियाडवाला |
| दिग्दर्शक | तरुण मनसुखानी |
| कलाकार | अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, रितेश देशमुख, संजय दत्त, जैकी श्रॉफ, नाना पाटेकर, चित्रांगदा सिंह, फरदीन खान, चंकी पांडे, जॉनी लीवर, श्रेयस तळपदे, जैकलीन फर्नांडीस, सोनम बाजवा, नरगिस फकरी, |
| निर्माता | साजिद नाडियाडवाला |
| रिलीज तारीख | ६ जुन २०२५ |
| भाषा | हिंदी |
“हाऊसफुल्ल ५” चित्रपट समीक्षा :-
ढिगभर मसाले घातले म्हणजे पदार्थ चमचमीत होतो असं नाही, उलट त्या पदार्थाची चव कळतंच नाही. असंच काहीसं झालं आहे हाऊसफुल्ल ५ या चित्रपटाच्या बाबतीत. अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, रितेश देशमुख, नाना पाटेकर असे जवळपास अठरा कलाकार या चित्रपटात एकत्र आहेत तरीही चित्रपट म्हणावा तसा जमलेला नाही. याआधीचे हाऊसफुल्ल १,२,३,४ तुम्ही बघितले असतील तर तुम्हाला कल्पना असेलच की हा चित्रपट बघताना सुद्धा मेंदू बाजूला ठेवून चित्रपट बघावा लागेल. परंतु या चित्रपटात विनोदाच्या नावाखाली काहीही विनोद खपवले गेले आहेत, कथेचा पत्ता नाही. तुम्ही अगदीच या कलाकारांचे फॅन असाल तर कदाचित चित्रपट एंजॉय करू शकता.
चित्रपटाची कथा एका मोठ्या क्रूझ वर घडते. एक अब्जाधीश बिझनेसमन रणजित डोबरियाल (रणजित) याचा शंभरावा वाढदिवस एका आलिशान जहाजावर साजरा करण्यासाठी त्याच्या जवळची माणसं एकत्र आलेली असतात. परंतु सेलिब्रेशन सुरू होण्याआधीच त्याचा मृत्यू होतो. आणि त्याच्या मृत्यूपत्राप्रमाणे त्याने त्याची सगळी संपत्ती त्यांच्या पहिल्या पत्नीचा मुलगा जॉलीच्या नावावर केली आहे असं कळतं. खरं तल तेव्हा तिथे जॉली उपस्थित नसतो परंतु तो येणार असतो. रणजित चा दुसरा मुलगा म्हणजे फरदिन खान हा तिथं उपस्थित असतो. आता ट्विस्ट असा येतो की आपण जॉली आहोत असं सांगणारे तिघेजण तिथे येतात. अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि अभिषेक बच्चन हे तिघेही आपण जॉली आहोत असा दावा करतात. खरा कोण ओळखण्यासाठी डीएनए चाचणी करण्यासाठी डॉ येतात परंतु त्यांचाच खून होतो आणि गुंता अजून वाढतो. या सगळ्याचा तपास करण्यासाठी जॅकी श्रॉफ आणि नाना पाटेकर येतात. आता खून कोणी केला आहे, खरा जॉली कोण हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल. परंतु यातही गंमत अशी की यि चित्रपटाचा क्लायमॅक्स सुद्धा दोन वेगवेगळ्या प्रकारे केला आहे.
एखाद्या विकेंड वा अगदीच मोकळा वेळ असेल आणि काहीही विनोदी बघू शकता अशी मनाची तयारी असेल तल हा चित्रपट बघू शकता. बाकी एकंदर कथा, दिग्दर्शन हे सगळे मुद्दे गौण आहेत. माझ्याकडून या चित्रपटाला एक स्टार.
| ३. सितारे जमीन पर (Sitaare Zameen Par) |
| लेखक | दिव्य निधि शर्मा |
| दिग्दर्शक | आर एस प्रसन्ना |
| कलाकार | आमिर खान, जेनेलिया देशमुख, आरुष दत्ता, सिमरन मंगेशकर, वेदांत शर्मा, गोपी के वर्मा, डॉली अहलूवालिया |
| निर्माता | आमिर खान, अपर्णा पुरोहित |
| रिलीज तारीख | २० जून २०२५ |
| भाषा | हिंदी |
“सितारे जमीन पर” चित्रपट समीक्षा :-
आमिर खान म्हटलं की नक्कीच काहीतरी वेगळं आणि दर्जेदार असं समिकरण असतं. काही अपवाद वगळता आमिर खानचे सगळे चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. आता तब्बल तीन वर्षांनी आमिर खान सितारे जमीन पर हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांसमोर आलेला आहे. २००७ साली आलेल्या तारे जमीन पर या चित्रपटात सुद्धा डिस्लेक्सिया या आजारावर अतिशय संवेदनशील अशी मांडणी करत कथा लिहिली होती. आता आलेल्या या चित्रपटात सुद्धा “विशेष मुलांना”(डाऊन सिंड्रोम) मध्यवर्ती भूमिकेत ठेवून कथा लिहिली आहे.
चित्रपटाची कथा दिल्ली येथे घडणारी आहे. ज्युनिअर बास्केटबॉल कोच गुलशन अरोरा(आमिर खान) हा एक चिडखोर, शीघ्रकोपी थोडक्यात एक सटकलेला माणूस आहे. कोणत्या तरी ट्रॉमा मध्ये जगत असलेला हा गुलशन एकीकडे भित्रा देखील आहे. कमी उंची असलेल्या गुलशनच्या न्यूनगंड असतो. आपल्या पत्नी सोबत (जेनेलिया डिसुझा) पटत नसल्याने तो आपल्या आईसोबत राहत असतो. आपल्या रागावर अजिबात कंट्रोल नसलेल्या या गुलशनला सीनिअर कोच पासवानला (जयदीप राणा) मारहाण केल्याप्रकरणी तुरुंगात पाठवण्या ऐवजी त्याला विशेष मुलांना बास्केटबॉल शिकवण्याची जबाबदारी दिली जाते. परंतु मुळात कमी पेशन्स असलेल्या गुलशन अशा मुलांसोबत राहणं ही तुरुंगवासापेक्षा मोठी शिक्षा वाटते. नाईलाजाने तो हे प्रशिक्षण देत असतो परंतु या दरम्यान त्याच्यात बदल व्हायला सुरुवात होते. अशा बऱ्याच गोष्टी घडत जातात की तो या मुलांना स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तयार करतो. त्यापुढे काय होतं हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
ऑटिज्म, डाऊन सिंड्रोम किंवा बौद्धिक अपंगत्व असणारी मुलं, प्रौढ यांच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा असावा यावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. दिग्दर्शक आर एस प्रसन्ना यांनी या चित्रपटात विशेष मुलांकडून अभिनय करून घेतला आहे त्यामुळे ती मुलं सुद्धा त्यांच्या दृष्टीने नॉर्मलच आहेत हे सिद्ध होतं. एकंदरीत चित्रपट उत्तम आहे. जेनेलिया सोडल्यास सगळ्यांनी अभिनय सुद्धा सुंदर केला आहे. एकदा तरी बघावा असा हा चित्रपट आहे. तुम्ही यूट्यूब वर मा चित्रपट बघू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.
| ४. डिटेक्टिव्ह शेरडिल (Detective Sherdil) |
| लेखक | सागर बजाज, अली अब्बास जफर, रवि छाबड़िया |
| दिग्दर्शक | रवि छाबड़िया |
| कलाकार | दिलजीत दोसांझ, डायना पेंटी, बनिता संधू, सुमीत व्यास, रत्ना पाठक शाह, बोमन ईरानी |
| निर्माता | रवि छाबड़िया |
| रिलीज तारीख | २० जून २०२५ |
| भाषा | हिंदी |
“डिटेक्टिव्ह शेरडिल” चित्रपट समीक्षा :-
आजकाल मर्डर मिस्ट्री, सस्पेन्स, थ्रिलर असे चित्रपट प्रेक्षकांना जास्त आवडतात. परंतु अशा चित्रपटांमध्ये शेवट काय होणार ही उत्सुकता आणि शोध शेवटपर्यंत टिकून राहणं महत्त्वाचं. म्हणजे जर क्लायमॅक्स काय असू शकतो याचा अंदाज आधीच आला तर चित्रपट बघायला मजा येत नाही. असंच काहीसं डिटेक्टिव्ह शेरडिल या चित्रपटात झाल्यामुळे चित्रपट म्हणावा तसा प्रभाव पाडत नाही. दिलजीत मुळे चित्रपट थोडा फार बघीतला जातो परंतु डिटेक्टिव्ह म्हणजे काहीतरी रहस्यमय आणि गुप्तहेर कथानक असणार अशी अपेक्षा ठेवली तर पदरी निराशाच पडते.
चित्रपटाची कथा अर्थातच एका खुनाच्या भोवती फिरणारी आहे. अब्जाधीश असलेल्या पंकज भाटी (बोमन ईरानी)ची अचानक हत्या होते, सुपारी घेऊन ही हत्या केलेली असते असा प्राथमिक अंदाज असतो. दिग्दर्शकाला वाटलं असावं ही केस पोलिस नाही सोडवू शकत म्हणून डिटेक्टीव्ह शेरडील(दिलजीत दोसांझ) आणि त्याची सहकारी नताशा (डायना पेंटी) यांची एन्ट्री होते. तसा संशय तर सगळ्यांवरच असतो. परंतु हत्येनंतर जेव्हा त्याच्या मृत्यूपत्र वाचलं जातं तेव्हा कुटुंबातील सगळ्यांनाच धक्का बसतो. कारण पंकज भाटीने आपली सगळी संपत्ती आपल्या पत्नीच्या किंवा मुलांच्या नावे न करता आपल्या मुलीच्या बॉयफ्रेंडच्या पूर्वक(अर्जून तंवर) नावावर केलेली असते. आणि ट्विस्ट म्हणजे हा पूर्वक हत्या झाल्यापासून गायब असतो. आता खरा खूनी कोण असतो.? पंकज भाटी आपली संपत्ती पूर्वकच्या नावावर का करत असेल.? हे सगळं जाणुन घेण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
खरं तर हा चित्रपट का बघावा यापेक्षा का बघू नये याची बरीच कारणं सांगता येतील. एकतर या चित्रपटाची सुमार दर्जाची कथा, फसलेलं कथानक, पटकथा. कलाकार चांगले असले तरी कमकुवत दिग्दर्शनामुळे तेही फार जादू दाखवू शकले नाहीत. एकंदरीत ना कथेमध्ये दम, ना दिग्दर्शन चांगलं, ना क्लायमॅक्स ना संगीत ना सिनेमॅटोग्राफी. सगळंच फसल्यामुळे दिलजीतच्या चाहत्यांचा हिरमोड होणार हे नक्की. तरीही बघायचा असल्यास झी फाईव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्म वर हा चित्रपट तुम्ही बघू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार.
| ५. मां (Maa) |
| लेखक | साइवन क्वॉद्रस, आमिल खान, अजित जगताप |
| दिग्दर्शक | विशाल फूरिया |
| कलाकार | काजोल, रोनित रॉय, इंद्रनील सेनगुप्ता, जितिन गुलाटी, खेरिन शर्मा, गोपाल सिंह, विभा रानी |
| निर्माता | अजय देवगन , ज्योति देशपांडे और कुमार मंगत पाठक |
| रिलीज तारीख | २७ जून २०२५ |
| भाषा | हिंदी |
“मां” चित्रपट समीक्षा :-
किती काही झालं तरी आपल्या मुलांच्या रक्षणासाठी प्रत्येक आई काय वाट्टेल ते करायला तयार असते. आणि जर प्रश्न मुलांच्या जीवाचा असेल तेव्हा तर ती दुर्गेचं रूप घेऊन रक्षण करायला सज्ज असते. अशीच बंगाल मधील एक आई आपल्या मुलीसाठी मां कालीचं रूप घेऊन कशी लढते हे या चित्रपटात दाखवलं आहे. एका पौराणिक कथेवर आधारित हा एक भयपट आहे. कथा बंगाल मध्ये घडणारी आहे. बंगाल म्हटलं की तसंही बऱ्याच अघोरी प्रथा गोष्टी आपल्या डोक्यात येतातच.
चित्रपटाची कथा बंगाल मधील चंदरपूर नावाच्या गावातील अघोरी प्रथेच्या भोवती फिरणारी आहे. या गावात एक अत्यंत अघोरी प्रथा असते की एखाद्या स्त्री ला जर मुलगी झाली तर त्या अर्भकाचा गावातील दोईत्तो म्हणजे राक्षसासमोर बळी द्यायचा. असंच एकदा एका स्त्रीला एका वेळी एक मुलगा आणि एक मुलगी होते तेव्हा त्या मुलीचा बळी दिला जातो. आणि याचीच धास्ती आणि विरोध म्हणून तेव्हा जन्माला आलेला तो जुळा भाऊ म्हणजे शुभांकुर(इंद्रनील सेनगुप्ता)मोठा झाल्यावर ते गाव सोडून दूर शहरात स्थायिक होतो. अर्थात आपली पत्नी अंबिका(काजोल) आणि मुलगी श्वेता(केरिन शर्मा) या दोघींना याची काही कल्पना नसते. परंतु एकदा आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर तो एकटाच गावी जातो. खरं तर तिथलं सगळं विकून त्या गावाशी कायमचा संबंध तोडून तो परतणार असतो परंतु त्याचा अपघातात मृत्यू होतो. आणि त्याला शोधायला म्हणून मग अंबिका आणि श्वेता त्या गावात येतात आणि इथूनच खरी कथा सुरू होते. आता पुढे काय होतं.? तो राक्षस त्या दोघींसोबत काय करतो.? आपल्या मुलीला वाचविण्यासाठी अंबिका काय करते हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
चित्रपटाची कथा पटकथा चांगली होती परंतु कथानक इतकं लांबवलं आहे की बघताना कंटाळा येतो. चित्रपटात तांत्रिक त्रुटीही बऱ्याच जाणवतात. सगळ्यात मोठी नकारात्मक बाजू चित्रपटात वापरले गेलेले व्हिएफएक्स इफेक्ट्स. या सगळ्यामुळे चित्रपट बघताना मजा येत नाही. परंतु एकंदरीत एक पौराणिक भयकथा, सस्पेन्स, हॉररचा तडका आणि काजोलचा अभिनय बघण्यासाठी एकदा बघायला हरकत नाही. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.
| ६. वेल डन सी ए साहब (Well Done C.A. Sahab!) |
| लेखक | आदित्य त्रिवेदी |
| दिग्दर्शक | सर्वेश कुमार सिंह |
| कलाकार | गौरव पासवाला,ज्योति कपूर,सयानदीप सेनगुप्ता,गोपाल दत्त |
| निर्माता | आदित्य त्रिवेदी, सिद्धांत |
| रिलीज तारीख | २७ जून २०२५ |
| भाषा | हिंदी |
“वेल डन सी ए साहब” चित्रपट समीक्षा :-
सीए म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट ची परीक्षा आणि अभ्यास किती कठीण असतो हे सगळ्यांनाच माहीत आहे. सीए बनणं म्हणजे आयुष्यात खूप मोठं यश मिळवणं. कारण खूप परिश्रम, जिद्द, अभ्यास करण्याची तयारी असेल तेच विद्यार्थी सीए बनण्याचा विचार करतात. अशाच काही विद्यार्थ्यांच्या सीए बनण्याच्या प्रवासातील अनुभवांची गोष्ट म्हणजे “वेल डन सी ए साहब”. सत्य अनुभवांवर आधारित चित्रपटाची कथा आहे.
विद्यासागर शास्त्री (गौरव पासवाला), सिद्धार्थ शाह (सयानदीप सेनगुप्ता) आणि मिथिला (ज्योति कपूर) हे तीन विद्यार्थी सीए बनण्यासाठी भास्कर शर्मा (गोपाल दत्त) यांच्याकडे येतात. खरं तर सी एचा अभ्यासक्रम शिकवता शिकवता भास्कर सर या मुलांना आयुष्याचे धडे देखील शिकवतात. पुढे जाऊन संघर्ष करत हे तिघे सीए उत्तीर्ण होतात परंतु काही काळानंतर आपापल्या आयुष्यात बऱ्याच अडचणी, नैराश्य, मनाविरुद्ध गोष्टी घडणं या सगळ्यामुळे ते तिघे पुन्हा भेटून भास्कर सरांना भेटायचं ठरवतात. परंतु भास्कर सर कुठे असतात हे कोणालाच माहीत नसतं. आता त्या तिघांना ते भेटतात की नाही हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
एका ठराविक प्रेक्षक वर्गाला ह चित्रपट आवडू शकतो. चित्रपटाची कथा परिस्थितीशी संघर्ष, किंवा सत्य घटनेवर आधारित असली तरी त्यात काही मसाला नसल्यामुळे प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी होत नाही. काही सीन्स चांगले जमले आहेत परंतु एकंदरीत चित्रपट तेवढा परिणाम साधत नाही. कथा चांगली असली एक चित्रपट म्हणून रूचत नाही. दिग्दर्शन सुद्धा खास नाही. त्यामुळे चित्रपट म्हणावा तसा प्रभावी नाही. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार.
तर मंडळी यापैकी तुम्ही कोणते चित्रपट पाहीलेत आणि आवडलेत का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसंच या विकेंडला वरीलपैकी कोणता चित्रपट बघायला आवडेल हे सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

