HomeFilmsMarathi

डिसेंबर 2024 मध्ये रिलीझ झालेल्या मराठी चित्रपटांची यादी आणि चित्रपटांची समीक्षा

डिसेंबर 2024 मध्ये रिलीझ झालेल्या मराठी चित्रपटांची यादी आणि चित्रपटांची समीक्षा | List of Marathi Movies released in December 2024 and Movie Reviews

Written by : आकांक्षा कोलते

Updated : जानेवारी 05, 2025 | 08:14 PM

बघता बघता २०२४ हे साल सरलं. या वर्षी सुद्धा मराठी चित्रपटसृष्टीत नवीन नवीन प्रयोग केले गेले. काही प्रेक्षकांना आवडले तर काही सपशेल फसले. आज या लेखात वर्षाच्या सरतेशेवटी कोणते मराठी चित्रपट प्रदर्शित झाले आणि ते कसे आहेत ते बघू.
खरं तर आता वेबसिरीज चा जमाना असल्यामुळे प्रेक्षकांच्या चित्रपटांच्या बाबतीत अपेक्षा वाढल्या आहेत. त्यातही नवीन आलेल्या चित्रपटांमध्ये ओरिजनल कंटेट कमीच असतो. परंतु आशयघन आणि दर्जेदार कथानक हा मराठी चित्रपटांचा गाभा आहे. मराठी चित्रपट हे नेहमीच वास्तववादी आणि चांगला कंटेंट घेऊन भेटीला येतात हे आता प्रेक्षकांच्या लक्षात येत आहे. त्यामुळे मराठी चित्रपटांना प्रेक्षक आता भरभरून प्रतिसाद देतात. असं असलं तरीही हल्ली इतके चित्रपट प्रदर्शित होत असतात की ते तेवढे दर्जेदार असतातच असं नाही. त्यामुळे आम्ही हे सांगण्याचा प्रयत्न करू की प्रदर्शित झालेला एखादा चित्रपट खरंच बघायला हवा की नको.
आज या लेखात आपण डिसेंबर २०२४ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपट आम्हाला कसे वाटले ते सांगणार आहोत. ज्यामुळे ते बघायला हवे की नको ते ठरवणं तुम्हाला सोपं जाईल.

डिसेंबर २०२४ मध्ये प्रदर्शित झालेले हे मराठी चित्रपट तुम्ही पाहिलेत का.?

List of Marathi Movies released in December 2024 & Movie review and information

१. हॅशटॅग तदेव लग्नम (Hashtag Tadev Lagnam)
२०२४. ड्रामा. परिवार, रोमँटिक. १ तास ५८ मिनिटे. [U]
लेखक आनंद दिलीप गोखले, सई झेंडे
दिग्दर्शकआनंद दिलीप गोखले
कलाकारसुबोध भावे, तेजश्री प्रधान
निर्माताशेखर विठ्ठल मते
रिलीज तारीख२० डिसेंबर २०२४
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.०⭐/ ५

हॅशटॅग तदेव लग्नम” चित्रपट समीक्षा :-

आजकालच्या तरुण पिढीचा लग्नसंस्था फारशी पटत नाही. लग्न करणं म्हणजे त्यांना एक बंधन वाटतं. त्यामुळे आजकाल लग्नापेक्षा लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्यांची संख्या वाढतेय. लग्न न करण्याची प्रत्येकाची कारणं असतात. प्रत्येकाची एक बाजू असते. हीच आजच्या तरुण मंडळींची एक बाजू मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शक आनंद गोखले यांनी हॅशटॅग तदेव लग्नम या चित्रपटाद्वारे केलेला आहे.
चित्रपटाची कथा चाळीशी गाठलेल्या परंतु लग्न न झालेल्या अथश्री(सुबोध भावे) आणि गायत्री(तेजश्री प्रधान) या जोडीभोवती फिरणारी आहे. दोघांनाही लग्न करायचं नाहीय आणि त्यासाठी त्यांची स्वतःची अशी कारणं आहेत. परंतु त्यांच्या आईवडिलांनी एका विवाहसंस्थेत नावं नोंदवल्याने दोघांना एकमेकांना भेटावं लागतं. ते दोघं भेटल्यावर अर्थात दोघं नाही म्हणता म्हणता एकमेकांना आवडतात परंतु पुढे त्यांचं लग्न होतं की नाही हे बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल. कारण याच प्लॉट वर कथेची बांधणी केलेली आहे.
चित्रपटाची कथा पटकथा अजिबातच नवीन नाही ‌ याआधी मराठीतच असे अनेक चित्रपट आलेले आहेत. परंतु सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान यांना एकत्र बघणं हा एक चांगला अनुभव असू शकतो. फार मसाला नसलेला, खूप ढिंचाक गाणी वैगरे नाही असा हा एक साधा चित्रपट आहे. आजच्या तरुण पिढीचं मत मांडणारा हा एक चांगला चित्रपट आहे. संगीत, पार्श्वसंगीत छान आहे. एकंदर एकदा बघायला हरकत नाही असा हा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.


२. श्री गणेशा (Shree Ganesha)
२०२४. ड्रामा, विनोदी, परिवार. १ तास ५३ मिनिटे. [U/A]
लेखक मिलिंद कवडे
दिग्दर्शकमिलिंद कवडे
कलाकारप्रथमेश परब, शशांक शेंडे, मेधा धाडे, सृष्टी माळवंडे
निर्मातासंजय माणिक भोसले, कांचन संजय भोसले
रिलीज तारीख२० डिसेंबर २०२४
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.०⭐/ ५

श्री गणेशा” चित्रपट समीक्षा :-

तेजश्री आणि सुबोध भावे यांच्या “हॅशटॅग तदेव लग्नम” या चित्रपटासोबत २० डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या श्री गणेशा या चित्रपटाला सुद्धा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मिलिंद कवडे लिखित आणि दिग्दर्शित “श्री गणेशा” हा एक रोड ट्रिप चित्रपट आहे. आजकाल मराठीत सुद्धा हळूहळू असे रोड ट्रिप किंवा हॅप्पी जर्नी सारखे चित्रपट येत आहेत.
श्री गणेशा या चित्रपटात एका बापलेकाची गोष्ट आहे. एक वाया गेलेला मुलगा आणि त्याला सरळ मार्गावर आणण्यासाठी प्रयत्न करत असलेला एक बाप अशी ही गोष्ट आहे. टिकल्या(प्रथमेश परब) हा आपल्या गर्लफ्रेंड संगी ला भेटवस्तू पुरवण्यासाठी अक्षरशः स्वतःच्या घरात चोरी करायला सुरुवात करतो तेव्हा त्याचे वडील भाऊसाहेब(शशांक शेंडे) हे त्याला बालसुधारगृहात पाठवतात. परंतु काही दिवसांनी टिकल्या सुधारला असेल असं वाटत असल्याने भाऊसाहेब टिकल्या ला आणायला जातात परंतु टिकल्याची पाटी कोरी ती कोरीच असते. कारण तेव्हाही त्याच्या डोक्यात उलटसुलट विचारच चालू असतात. परंतु त्याला कळतं की त्याची आई ब्रेन ट्युमर मुळे अंथरूणाल खिळून आहे तेव्हा तो घरी जायला तयार होतो. ते दोघं त्यांच्या घरी कोकणात जातानाच्या प्रवासात त्यांना ऊक फूड व्लॉगर भेटते. अजून बरेच जण भेटतात. परंतु टिकल्या ला अशी एक व्यक्ती भेटते आणि एक सत्य कळतं की ज्यामुळे त्याघा दृष्टीकोन च बदलून जातो. आता असं त्याला काय कळतं हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
कथा तशी जुनीच आहे. आतापर्यंत असे अनेक विषय मराठी चित्रपटांत मांडले गेलेले आहेत. मिलिंद कवडे यांची कथा आणि संजय नवगिरे यांची पटकथा तशी परिचित परंतु ज्या पद्धतीने वडील आणि मुलाच्या नात्याचे पैलू प्रवासादरम्यान हळूवार पणे उलगडून दाखवले गेले आहेत ते छान आहे. शशांक शेंडे आणि प्रथमेश परब यांनी नेहमीप्रमाणे अभिनय उत्तम केला आहे. मिलिंद कवडे यांचं दिग्दर्शन ठिकठाक आहे. चित्रपटात बाकी विशेष असं काही खास नाही परंतु एक भावनात्मक कौटुंबिक चित्रपट आवडण असेल तर ओटीटी प्लॅटफॉर्म वर आल्यावर एकदा बघायला हरकत नाही असा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.


३. रूखवत (Rukhwat)
२०२४. रहस्य, सस्पेंस, थ्रिलर. १ तास ५७ मिनिटे. [U/A]
लेखक विक्रम प्रधान
दिग्दर्शकविक्रम प्रधान
कलाकारसंतोष जुवेकर, प्रियदर्शनी इंदलकर, अशोक समर्थ, अभिजीत चव्हाण, राजेंद्र शिरसाटकर
निर्माताबिंद्रा अग्रवाल
रिलीज तारीख२७ डिसेंबर २०२४
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.५⭐/ ५

रूखवत” चित्रपट समीक्षा :-

हिंदी पाठोपाठ मराठी निर्माते दिग्दर्शक सुद्धा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट निर्मिती कडे जास्त वळत आहेत. कारण प्रेक्षकांना आजकाल असेच चित्रपट जास्त आवडतात. २७ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेला रूखवत हा मराठी चित्रपट सुद्धा पुनर्जन्म या संकल्पनेवर आधारित असा थरार अनुभवायला लावणारा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आहे.
पुरातत्वशास्त्र विभागाचे काही विद्यार्थी अभ्यासाचा भाग म्हणून एका ४०० वर्ष जुन्या वाड्यात जातात. जो वाडा आता एक संग्रहालय म्हणून प्रसिद्ध आहे. पुरातत्वशास्त्र विभागाचे हे विद्यार्थी तिथे गेल्यावर त्यातील महीमा(प्रियदर्शनी इंदलकर) आणि अमर(संतोष जुवेकर) या दोघांना जरा वेगळे भास व्हायला सुरुवात होते. या संग्रहालयात एका ठिकाणी एक पारंपरिक लग्नाचा रुखवत मांडलेला असतो. त्यात सगळा संसार, नवरा नवरी असे दोन बाहुली बाहुला असं सगळं मांडलेलं असतं. त्या रूखवतासमोर गेल्यावर त्या दोघांना आवाज ऐकू येतात.‌ आणि इथुनच खरी कथा सुरू होते. परंतु त्या वेळी तिथे फिरायला आलेल्या एका कुटुंबातील दोन लहान मुलं ते दोन बाहुले चोरून घेऊन जातात. आणि अमर आणि महिमा या दोघांना विचित्र अनुभव यायला सुरुवात होते आणि या सगळ्याचा शोध सुरू होतो. आता हा शोध कुठे संपतो.? त्या दोन बाहुल्या आणि रुखवत या सगळ्याचा अमर आणि महीमा यांच्याशी काय संबंध असतो हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
एक सस्पेन्स थ्रिलर चित्रपट बनवण्याचा प्रयत्न ठिकठाक असला तरी तो तेवढासा थरारक अनुभव देत नाही. संतोष जुवेकर पेक्षा प्रियदर्शनी चा अभिनय चांगला आहे. विक्रम प्रधान यांची कथा किंवा दिग्दर्शन यापैकी काहीच दमदार नाही. एकंदर फसलेला चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार.

   तर मंडळी २०२४ हे वर्ष तर सरलं. यावर्षी प्रदर्शित झालेले सगळे चित्रपट कसे आहेत हे तर आम्ही तुम्हाला सांगितलं आहेच. आता प्रतिक्षा २०२५ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांची. तोपर्यंत राहून गेलेले चित्रपट बघा आणि त्यापैकी कोणता विशेष आवडला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *