डिसेंबर 2024 मध्ये रिलीझ झालेल्या हिंदी चित्रपटांची यादी आणि चित्रपटांची समीक्षा
डिसेंबर 2024 मध्ये रिलीझ झालेल्या हिंदी चित्रपटांची यादी आणि चित्रपटांची समीक्षा | List of Hindi Movies released in December 2024 and Movie Reviews
Written by : आकांक्षा कोलते
Updated : जानेवारी 12, 2025 | 03:57 PM
बघता बघता २०२४ हे साल सरलं. या वर्षी सुद्धा हिंदी चित्रपटसृष्टीत नवीन नवीन प्रयोग केले गेले. काही प्रेक्षकांना आवडले तर काही सपशेल फसले. आज या लेखात वर्षाच्या सरतेशेवटी कोणते हिंदी चित्रपट प्रदर्शित झाले आणि ते कसे आहेत ते बघू.
खरं तर आता वेबसिरीज चा जमाना असल्यामुळे प्रेक्षकांच्या चित्रपटांच्या बाबतीत अपेक्षा वाढल्या आहेत. त्यातही नवीन आलेल्या चित्रपटांमध्ये ओरिजनल कंटेट कमीच असतो. बरेच चित्रपट हे रिमेक असतात. त्यामुळे चित्रपटगृहात प्रेक्षकांना खेचून आणणं हे आता निर्माते आणि दिग्दर्शक यांच्यापुढे नवीन आव्हान आहे. आता प्रेक्षकांच्या चित्रपटांच्या बाबतीत असलेल्या अपेक्षा पूर्ण होतायत की नाही हे आमच्या परीने सांगण्याचा प्रयत्न या लेखात आम्ही करणार आहोत.
आज या लेखात डिसेंबर महिन्यात प्रदर्शित झालेले चित्रपट कोणते आहेत आणि बघायला हवेत की नको याबद्दल आमचं मत सांगणार आहोत.
डिसेंबर २०२४ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेले हे हिंदी चित्रपट तुम्ही पाहीलेत का?

१. अग्नी (Agni) |
लेखक | राहुल ढोलकिया, विजय मौर्या |
दिग्दर्शक | राहुल ढोलकिया |
कलाकार | प्रतीक गांधी, संयमी खेर, जितेंद्र जोशी, दिव्येंदु, साई तम्हणकर, उदित अरोड़ा, अनंत जोग |
निर्माता | फरहान अख्तर, रितेश सिधवानी |
रिलीज तारीख | ६ डिसेंबर २०२४ |
भाषा | हिंदी |
“अग्नी” चित्रपट समीक्षा :-
आपल्या देशाचं रक्षण करणारे सीमेवर लढणारे आपले जवान, आपल्या शहरात सुव्यवस्था राखण्यासाठी दक्ष असणारे पोलिस हे सगळे तर सुपरहिरो आहेतच. परंतु एखाद्या ठिकाणी आगीचं तांडव सुरू झाल्यावर, एखादी इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यावर तिथं आपल्या जीवाची बाजी लावून नागरिकांना सुरक्षित आणि सुखरूप बाहेर काढणारे अग्निशमन दलाचे जवान यांना आपण अगदी सोयिस्करपणे विसरून जातो. त्यांनी केलेलं काम हे नेहमीच दुर्लक्षीत राहतं. त्यांचं कधी ना कौतुक केलं जातं ना टिव्ही, पेपरमध्ये त्यांचे फोटो झळकत. हिच खंत व्यक्त करणारा चित्रपट म्हणजे अग्नी.
विठ्ठल सुर्वे(प्रतिक गांधी) हा अग्निशमन दलाचा प्रमुख असतो. त्याची बायको(सई ताम्हणकर)आणि मुलासोबत तो राहत असतो परंतु कुटुंबासोबत कमी आणि शहरातील आग विझवून नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी तो सदैव तत्पर असतो. परंतु त्याच्या मुलाला आपल्या वडिलांचं फारसं कौतुक नसतं त्याउलट त्याच्या माझ्याबद्दल त्याला भारी अप्रुप वाटत असतं. विठ्ठलचा मेहुणा समित(दिव्येंदू) हा पोलिस खात्यात कार्यरत असतो. पोलिस भारी आणि अग्निशमन दलाचे जवान असं हे शीतयुद्ध विठ्ठल आणि समित मध्ये कायमच धगधगताना पहायला मिळतं. कथेची खरी सुरुवात होते जेव्हा शहरात अचानक मोठमोठ्या इमारतींमध्ये आग लागण्याचा सिलसिला सुरू होतो. विठ्ठलच्या तपासातून ही आग कोणीतरी मुद्दाम लावत असल्याचं लक्षात येतं परंतु पोलिस असलेला समितला ते खरं वाटत नाही. आता खरंच ही आग कोण लावत असतं.? पुढे काय होतं हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
वन टाईम वॉच असा हा चित्रपट आहे. बऱ्याच मराठी कलाकारांची वर्णी या चित्रपटात लागली आहे. सगळ्याच कलाकारांनी अभिनय उत्तम केला आहे. एका चांगल्या विषयावर आणि अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांचा विचार करून पहिल्यांदाच अशा प्रकारच्या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.
आगीचे सीन्स दाखवण्यासाठी व्हिएफएक्सचा वापर अप्रतिम केला आहे. दिग्दर्शन सुद्धा चांगलं आहे. शेवट थोडा अजून छान पद्धतीने दाखवता आला असता. क्लायमॅक्स थोडा प्रेडिक्टेबल झाला परंतु एकंदर प्रत्येकाने बघावा असा हा चित्रपट आहे. ॲमेझॉन प्राईम वर हा चित्रपट तुम्ही बघू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.
२. झीरो से रिस्टार्ट (Zero Se Restart) |
लेखक | जसकुंवर कोहली |
दिग्दर्शक | जसकुंवर कोहली |
कलाकार | विक्रांत मैसी, मेधा शंकर, विधु विनोद चोपड़ा, अंशुमान पुष्कर |
निर्माता | विधु विनोद चोपड़ा |
रिलीज तारीख | १३ डिसेंबर २०२४ |
भाषा | हिंदी |
“जगभरून फिल्म्स” चित्रपट समीक्षा :-
झीरो से रिस्टार्ट हा खरं तर एक चित्रपट नसून एक प्रकारची डॉक्युमेंटरी फिल्म आहे असं म्हणू शकतो जी फिल्म चित्रपटगृहात नाही तर ओटीटी प्लॅटफॉर्म वर प्रदर्शित केली असती तरी चालण्यासारखं होतं. २०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या विधु विनोद चोपड़ा यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेल्या “ट्वेल्थ फेल” या चित्रपटाने अनपेक्षित कमाल केली होती. ज्या चित्रपटाकडून अपेक्षा नव्हत्या त्या चित्रपटाला सगळीकडूनच भरभरून प्रतिसाद मिळाला. बॉक्स ऑफिसवर सुद्धा हा चित्रपट सुपरडुपर हिट झाला. त्याच चित्रपटाच्या मेकींगची गोष्ट सांगणारा चित्रपट म्हणजे “झीरो से रिस्टार्ट”.
“ट्वेल्थ फेल” या चित्रपटाची कथा वाचल्यावर विधू विनोद चोपडा यांना ती आवडली होती आणि निर्मिती करण्यासाठी ते तयार सुद्धा होते परंतु कोणी दिग्दर्शक तयार होत नव्हता. शेवटी दिग्दर्शन आपण स्वतःच करायचं ठरवून ट्वेल्थ फेलचा श्री गणेशा झाला. एका अत्यंत दुर्गम खेड्यातून, अती मागास वर्गातून आलेला एक मुलगा खडतर प्रवास आणि खूप कष्टाने आयपीएस अधिकारी कसा बनतो याची प्रेरक गोष्ट आपण या चित्रपटात पाहीली. मनोज कुमार यांच्या आयुष्यावर आधारित हा एक प्रेरणादायी चित्रपट आहे. आणि प्रेक्षकांना हा चित्रपट इतका भावला की बॉक्स ऑफिसनंतर ओटीटीवर सुद्धा या चित्रपटाला पसंती मिळाली. सुरूवातीला नाकारलेल्या या चित्रपटाच्या निर्मितीची स्वतःची अशी एक प्रेरक कथा आहे. तीच कथा झीरो से रिस्टार्ट या चित्रपटात पहायला मिळते. कलाकारांची निवड कशी केली गेली, शुटिंग साठी लोकेशन्स कसे शोधले हे सगळं यात पहायला मिळतं. ट्वेल्थ फेलमध्ये मनोजकुमार तर झीरो से रिस्टार्ट या चित्रपटातून विधू विनोद चोपडा यांच्याकडून प्रेरणा मिळते. नवीन दिग्दर्शक, निर्माते, कलाकार या सगळ्यांसाठीच ही एक उत्तम डॉक्युमेंटरी आहे असं म्हणू शकतो. परंतु प्रेक्षकांना यात कितपत रस असेल सांगू शकत नाही. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.
३. डीस्पॅच (Despatch) |
लेखक | इशानी बनर्जी, कनु बहल |
दिग्दर्शक | कनु बहल |
कलाकार | मनोज बाजपेयी, अर्चिता अग्रवाल, शहाना गोस्वामी, ऋतुपर्णा सेन, मामिक, पार्वती सहगल |
निर्माता | रॉनी स्क्रूवाला |
रिलीज तारीख | १३ डिसेंबर २०२४ |
भाषा | हिंदी |
“डीस्पॅच” चित्रपट समीक्षा :-
वर्षाच्या सरतेशेवटी म्हणावे असे चित्रपट प्रदर्शित झाले नाहीत. झाले त्यापैकी काही थेट ओटीटी वर प्रदर्शित करण्यात आले. त्यापैकीच डीस्पॅच हा चित्रपट. मनोज वाजपेयी याची मध्यवर्ती भूमिका असलेल्या या चित्रपटात क्राईम ड्रामा बघायला मिळतो.
जॉय बाग(मनोज वाजपेयी) हा डीस्पॅच नावाच्या एका वृत्तपत्रात क्राईम रिपोर्टर म्हणून काम करत असतो. कोणत्याही प्रकरणाच्या मुळाशी जाऊन त्याची खोलवर माहीती काढण्यासाठी तो जीवाचं रान करतो. आता तो एका अंडरवर्ल्ड आणि करोडोंचा घोटाळा याचं कनेक्शन या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी धडपडत असतो. एकीकडे नेहमी प्रमाणे त्याचं पत्नी शहाना गोस्वामी(श्वेता बाग) पटत नाहीय. नेहमी पेक्षा वेगळा ट्विस्ट म्हणजे या चित्रपटात मनोज वाजपेयी म्हणजे जॉय बाग हा जरा ढिला कॅरेक्टर वालं प्रकरण आहे. त्याचं त्याची सहकारी अर्चिता अग्रवाल म्हणजेच प्रेरणा प्रकाश हिच्याशी अफेअर सुद्धा चालू आहे आणि म्हणूनच त्याचं आणि बायकोचं घटस्फोटापर्यंत जाऊन पोहोचलं आहे. आता या सगळ्यात तो काम करत असलेल्या घोटाळ्याचा पर्दाफाश करतो का.? हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
प्रेक्षकांना आजकाल थ्रिलर किंवा क्राईम सस्पेन्स असे चित्रपट बघायला आवडतात हे खरंय परंतु सशक्त कथानक असावं ही सुद्धा प्रेक्षकांना हवं असतं. याच बाबतीत कनु बहल कमी पडलेले दिसतात. दिग्दर्शन सुद्धा अगदीच ठिकठाक आहे. फार काही ट्विस्ट आणि टर्न्स नाही, मसाला नाही त्यामुळे शेवटपर्यंत खिळवून ठेवण्यात चित्रपट कमी पडतो. शेवट सुद्धा गडबडलेला आहे. फक्त मनोज वाजपेयी यांच्या अभिनयासाठी चित्रपट बघू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार.
४. वनवास (Vanvaas) |
लेखक | अनिल शर्मा, सुनील सिरवैया, अमजद अली |
दिग्दर्शक | अनिल शर्मा |
कलाकार | नाना पाटेकर, खुशबू सुंदर, उत्कर्ष शर्मा, सिमरत कौर, राजपाल यादव, अश्विनी कलसेकर, परितोष त्रिपाठी, मनीष वाधवा, राजेश शर्मा |
निर्माता | सुमन शर्मा |
रिलीज तारीख | २० डिसेंबर २०२४ |
भाषा | हिंदी |
“वनवास” चित्रपट समीक्षा :-
अपने ही देते है अपनो को वनवास अशी टॅग लाईन असलेला वनवास हा चित्रपट २० डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेला असून हा चित्रपट बघून बागबान या चित्रपटाची नक्की आठवण येईल. २०२३ मध्ये गदर २ या धमाकेदार चित्रपटाचं दिग्दर्शन करणारे अनिल शर्मा यावेळी एक भावूक करणारा कौटुंबिक चित्रपट घेऊन आलेले आहेत.
चित्रपटाची कथा ही दीपक त्यागी (नाना पाटेकर) यांच्या भोवती फिरणारी आहे. आपली पत्नी विमला (खुशबू) हिच्यावर जीवापाड प्रेम करणारे त्यागी हे पत्नीच्या मृत्यूनंतर एकटेपणा अनुभवत असतात. तीन मुलं, सुना नातवंडे असा भरलेला परिवार असून सुद्धा त्यागी एकटे पडलेले असतात. स्मृतीभ्रंश या आजाराने त्रस्त असलेल्या त्यागींना घरच्यांकडून प्रेम आपुलकी यातलं काही मिळत तर नसतंच उलट त्यांच्यापासून मुक्तता कशी मिळवावी याचा विचार सगळे करत असतात. परंतु त्यागींना आपल्या बंगल्याचं रूपांतर ट्रस्ट मध्ये करून त्याचा वापर इतर वृद्ध गरजू लोकांसाठी करायचा असतो. आणि म्हणूनच सगळे मिळून त्यागींना वाराणसी ला घेऊन जातात आणि तिकडेच सोडून येतात. स्मृतीभ्रंश झाल्यामुळे त्यागींना काहीच आठवत नसतं आणि ते तिकडे मुलांना शोधत फिरत राहतात. तिकडेच त्यांना वीरू (उत्कर्ष शर्मा) नावाचा एक भुरटा चोर भेटतो. अर्थात सुरूवातीला वीरू त्यागींना फसवत असतो परंतु काही काळाने त्यांची सत्य परिस्थिती त्याच्या लक्षात येते. त्यानंतर वीरू काय करतो हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
हा एक भावनात्मक कौटुंबिक चित्रपट असल्यामुळे आजकालच्या प्रेक्षकांना तो कितपत आवडेल ही शंका आहे. पंधरा वीस वर्षांपूर्वी कदाचित हा सुपर डुपर हिट झाला असता. मध्ये मध्ये विनोदी प्रसंग आल्यामुळे थोडं मनोरंजन होतं. परंतु शेवटपर्यंत खुर्चीत बसवून ठेवण्यासाठी तेवढं पुरेसं नाही. तांत्रिकदृष्ट्या हा चित्रपट अगदीच फसलेला आहे. डबिंग मुळे चित्रपटाच दर्जा अजूनच घसरला आहे. अभिनय सोडला तर बाकी सगळ्याच गोष्टी गडबडलेल्या आहेत. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार.
५. बेबी जॉन (Baby John) |
लेखक | एटली, कालीस, सुमित अरोड़ा |
दिग्दर्शक | कालीस |
कलाकार | वरुण धवन, कीर्ति सुरेश, वामिका गब्बी, जैकी श्रॉफ, राजपाल यादव, शीबा चड्ढा, जाकिर हुसैन, जारा जियाना, ओंकारदास मानिकपुरी, सोनाली शर्मिष्ठा |
निर्माता | एटली, ज्योति देशपांडे, मुराद खेतानी |
रिलीज तारीख | २५ डिसेंबर २०२४ |
भाषा | हिंदी |
“बेबी जॉन” चित्रपट समीक्षा :-
२५ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेला बेबी जॉन हा चित्रपट म्हणजे २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या विजय सेतूपतीच्या थेरी या तमिळ चित्रपटाचा रिमेक आहे. आजकाल बॉलिवूड निर्माते दिग्दर्शक यांच्याकडे रिमेक करण्यावाचून गत्यंतर नाही अशी परिस्थिती ओढवलेली दिसते. रिमेक बनवताना निदान त्यात काही तरी नवीन, वेगळं असावं हि साधी अपेक्षा सुद्धा पूर्ण होताना दिसत नाही. जशास तसे सीन्स, डायलॉग कॉपी केल्यामुळे या चित्रपटात फक्त कलाकार वेगळे बघायला मिळतात.
जॉन डिसिल्व्हा हा एक निवृत्त पोलिस अधिकारी असतो. त्याच्या भुतकाळापासून दूर तो निघून दुसऱ्या शहरात आलेला असतो. त्याची मुलगी खुशी(झारा झन्ना) हेच विश्व असतं. ते दोघंच एकमेकांसाठी असतात. थेरी चित्रपटात दाखवलंय त्याप्रमाणेच तारा (वामिका गब्बी) नावाची शिक्षिका खुशीला गुंडांपासून वाचवते आणि तेव्हाच जॉन चा भुतकाळ पुन्हा समोर उभा ठाकतो. जर तुम्ही थेरी चित्रपट पाहिला नसेल तर जॉनचा भुतकाळ काय असतो.? गुंड, पोलिस त्याच्या मागावर का असतात.? पुढे काय होतं हे सगळं बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
आधीच सांगितल्याप्रमाणे या चित्रपटात नवीन काहीच नाही. वरूण धवन हा एक पोलिस अधिकारी म्हणून जरा कमी पडलेला वाटतो. कालीस चं दिग्दर्शन, ठिकठाक आहे. थेरी न बघीतलेल्यांना तो आवडू शकतो कारण तुलना केल्यास बेबी जॉन सोबत थेरी उजवा ठरतो. ओटीटी प्लॅटफॉर्म वर आल्यावर बघायला हरकत नाही. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.
६. किसको था पता (Kisko Tha Pata) |
लेखक | रत्ना सिन्हा |
दिग्दर्शक | रत्ना सिन्हा |
कलाकार | अक्षय ओबेरॉय, आदिल खान, अशनूर कौर |
निर्माता | अकुल त्रिपाठी |
रिलीज तारीख | २५ डिसेंबर २०२४ |
भाषा | हिंदी |
“किसको था पता” चित्रपट समीक्षा :-
“किसको था पता” हा चित्रपट कधी प्रदर्शित झाला हेच माहीत नाही त्यामुळे या चित्रपटाच्या बाबतीत किसको पता था असं म्हणावं लागतंय. रत्ना सिन्हा यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित न करता २५ डिसेंबर रोजी टेलिव्हिजन च्या झी सिनेमावर या चित्रपटाचा प्रिमियम शो दाखवण्यात आला. टेलिव्हिजनचे कलाकार अक्षय ओबेरॉय, आदिल खान आणि अशनूर कौर यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत.
चित्रपटाची कथा काही नवीन किंवा फार विशेष नाही. प्रेमाचा त्रिकोण अशा आशयाची कथा आहे. आश्ना ही एक अशी मुलगी आहे जिच्या आयुष्याच्या जोडीदाराकडून खूप अपेक्षा आहेत. आणि तशा जोडीदाराच्या शोधात आहे. आणि कबीरच्या रूपाने ते प्रेम तिला मिळतं परंतु असं काहीतरी घडतं की कबीर आणि आश्नाच्या नात्यात दुरावा येतो. आणि मग अर्थातच कथेच्या अनुषंगाने विहान म्हणजेच आदिलची एन्ट्री होते. आता पुढे या तिघांचं काय होतं..? आश्ना आणि आदिल यांचं लग्न होतं की कबीर मुळे काही वादळ येतं हे सगळं बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल. अजून तरी कोणत्याही ओटीटी प्लॅटफॉर्म वर हा चित्रपट उपलब्ध नाही परंतु काही दिवसांनी झी फाईव्ह वर येण्याची शक्यता आहे.
ज्यांना प्रेमकथा, रिव्हेंज वैगरे असे चित्रपट बघायला आवडतात त्यांना हा चित्रपट आवडेल. दिग्दर्शन चांगलं आहे, संगीत, अभिनय चांगला आहे. परंतु एकंदर चित्रपट एखाद्या टेलिव्हिजन मालिकेप्रमाणे वाटतो परंतु एकदा मनोरंजन होईल असा हा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.
तर मंडळी २०२४ हे वर्ष कसं गेलं आणि या वर्षाभरात तुम्ही पाहिलेल्या चित्रपटांपैकी आवडलेले चित्रपट आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसंच या वीकेंडला तुम्ही कोणता चित्रपट बघताय हे सुद्धा सांगा.