HomeFilmsFilms NewsHindi

नागदेवतेवर आधारित असलेले हे पंधरा हिंदी चित्रपट तुम्ही पाहीले आहेत का.?

नाग पंचमी पूर्ण भारत भर साजरी केली जाते. या वर्षी हि साजरी केली जाईल. नागपंचमी वर बरेच चित्रपट रिलीज झाले आहेत. ते आपण आता पाहणार अहोत.

Written by : आकांक्षा कोलते

Updated : ऑगस्ट 21, 2023 | 04:21 AM

These 15 films based on the serpent god, nagpanchami hindi films review and information
१. नागपंचमी (१९५३)
१९५३. काल्पनिक, संगीत. १ तास ४९ मिनिटे.
लेखक चातूरभूज दोशी
दिग्दर्शकरमण बी. देसाई
कलाकारनिरुपा रॉय, मनहर देसाई, दुर्गा खोटे
निर्माताविनोद देसाई
प्रदर्शित तारीख१९५३
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.१⭐/ ५

नागपंचमी (१९५३)” चित्रपट समीक्षा :-

साधारण १९५३ साली प्रदर्शित झालेला नागपंचमी हा चित्रपट रमन बी देसाई यांनी दिग्दर्शित केला होता. तेव्हा सगळेच चित्रपट हे कृष्णधवल(ब्लॅक ॲन्ड व्हाईट) असायचे. त्यामुळे हा चित्रपट सुद्धा ब्लॅक ॲन्ड व्हाईट आहे. 
      या चित्रपटाची कथा भगवान शंकर यांचा परमभक्त चंद्रधर आणि शिवकन्या मनसा यांच्यावर आधारित असून हि एक पौराणिक कथा आहे. चंद्रधर नावाचा एक राजा भगवान शंकराची प्रचंड भक्ती करत असे. तो इतर कोणालाही मानत नव्हता. त्याचवेळी शंकर देव यांची मानलेली कन्या मनसा हिची सुद्धा लोकं मनोभावे पूजा करत होते. परंतु मनसाला वाटत होते की तिला सुद्धा लोकांनी आपल्या आईवडिलांप्रमाणे म्हणजेच भगवान शंकर आणि पार्वती यांच्याप्रमाणेच मान द्यावा. 
    परंतु मान हा मागून मिळत नसतो हे समजावून सुद्धा मनसा ऐकात नाही. त्यावर जर चंद्रधर याने जर तुझी पुजा केली तर इतर लोकं सुद्धा तु्झी पुजा करतील. हे कळल्यावर शिवकन्या मनसा हि राजा चंद्रधर याच्या मागे लागते परंतु भगवान शंकर आणि पार्वती शिवाय कोणालाही न पुजणाऱ्या चंद्रधर कडून मनसाचा अपमान केला जातो. याच अपमानाच्या बदल्याची कथा म्हणजे हा चित्रपट. 
     या चित्रपटात दुर्गा खोटे, निरूपा रॉय मनहर देसाई, वनमाला या कलाकारांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. 
चंद्रधर मनसाची पुजा करतो का की त्याला मनसाच्या कोपामुळे कोणकोणत्या अडचणींना तोंड द्यावं लागतं हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल. युट्यूबवर हा चित्रपट अगदी विनामूल्य उपलब्ध आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जरा जुना काळ अनुभवायचा असेल तर हा चित्रपट जरूर बघावा.


२. नागिण (१९५४)
१९५४. प्रणय, नाटक. २ तास १९ मिनिटे. [ यु ]
लेखक बिजोन भट्टाचार्य, हमीद भट्ट, राजेंद्र किशन
दिग्दर्शकनंदलाल जसवंतलाल
कलाकारवैजयंती माला, प्रदीपकुमार, जीवन
निर्माता
प्रदर्शित तारीख१९५४
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.३⭐/ ५

नागिण (१९५४)” चित्रपट समीक्षा :-

१९५४ साली प्रदर्शित झालेला नागिण या चित्रपटात वैजयंती माला आणि प्रदीपकुमार यांच्या प्रमुख भूमिका होत्या. खरं तर हि एक प्रेमकथा आहे. आदिवासी समाजातील दोन वेगवेगळ्या जमातीतील माला आणि सनातन यांची ही कथा आहे.
     रागी समाजातील सनातन याचा मृत्यू हे ध्येय असणारी नागी समाजाच्या प्रमुखाची मुलगी माला हि कशी सनातनच्या प्रेमात पडते आणि दोघं मिळून आपल्या जमातींना एकत्र आणण्याचा कसा प्रयत्न करतात याची हि कथा आहे. 
    “मन डोले मेरा तन डोले” हे गाणं याच चित्रपटातील असून तेव्हा ते प्रचंड लोकप्रिय झालं होतं आणि आताही लोकांना ते तेवढंच आवडतं. त्या काळात हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. हा चित्रपट युट्यूबवर उपलब्ध आहे.


३. नागपंचमी (१९७२)
१९७२. साहसी, नाटक, काल्पनिक. २ तास १६ मिनिटे. [ यु / ए ]
लेखक मनुभाई देसाई, इंदीवर, पंडित आर. प्रियदर्शिनी, पंडित नर्रोतम
दिग्दर्शकबाबुभाई मिस्त्री
कलाकारजयश्री गडकर, प्रीथ्वीराज कपूर, श्री भगवान
निर्माताएन. डी. कोठारी
प्रदर्शित तारीख४ फेब्रुवारी १९७२
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.४⭐/ ५

नागपंचमी (१९७२)” चित्रपट समीक्षा :-

 १९५३ साली प्रदर्शित झालेल्या ब्लॅक ॲन्ड व्हाईट चित्रपटात जी पौराणिक कथा दाखवण्यात आली आहे तीच राजा चंद्रधर आणि शिवकन्या मनसा यांची कथा या चित्रपटात पहायला मिळते. परंतु हा रंगीत चित्रपट असून जयश्री गडकर, सत्येंद्र कपूर, पृथ्वीराज कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 
    राजा चंद्रधर यांच्याकडून अपमानित झालेल्या शिवकन्या मनसा हिने त्यांच्या सहा पुत्रांना ठार मारून सुद्धा राजा चंद्रधर हे तीची पूजा करण्यास नकार देतात . तेव्हा त्यांचा सातवा पुत्र लक्ष्मेंद्र याला सुद्धा मारल्यावर लक्ष्मेंद्र ची पत्नी बेहूला आपल्या पतीला पुनर्जीवन मिळण्याची चारधाम यात्रा करते. हि सगळी कथा या चित्रपटात दाखवली आहे. हा चित्रपट रंगीत मध्ये शूट करण्यात आले. चित्रपटाची नावे नागाच्या ॲनिमेशन ने केलेली नावे स्क्रीन वर खूप छान दिसतात. जयश्री गडकर यांनी राजकुमारी बेहुला ची भूमिका केली आहे.लक्ष्मेंद्र पुन्हा जिवंत होतो का.? हे बघण्यासाठी हा चित्रपट तुम्ही युट्यूबवर अगदी विनामूल्य पाहू शकता.


 ४. नागिण (१९७६)
१९७६. रोमांचक, नाटक. ३ तास. [ यु ]
लेखक इंदर राज आनंद 
दिग्दर्शकराज कुमार कोहली
कलाकारसुनील दत्त, फिरोज खान, विनोद मेहरा, कबीर बेदी, रिना रॉय, जितेंद्र, रेखा
निर्माताराजकुमार कोहली
प्रदर्शित तारीख१९ जानेवारी १९७६
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.४⭐/ ५

नागिण (१९७६)” चित्रपट समीक्षा :-

राजकुमार कोहली यांनी दिग्दर्शित केलेला नागिण हा पहिला चित्रपट होता जो इच्छाधारी नाग आणि नागिण या संकल्पनेवर आधारित होता. या चित्रपटात कलाकारांची मोठी फौज होती तसेच हा चित्रपट प्रचंड गाजला होता आणि कित्येक मानाचे पुरस्कार सुद्धा पटकावले होते. 
     या चित्रपटात रिना रॉय यांनी इच्छाधारी नागिणीची भुमिका साकारली होती जी आपल्या प्रियकराच्या खुन्यांचा बदला घेण्यासाठी सात मित्रांना मानवरूप घेऊन ठार मारते. 
     इच्छाधारी नाग नागिण असतात या दंतकथेला सत्य मानणारे प्रोफेसर विजय हे सापांवर संशोधन करत असताना मानव रूपातील नागाला म्हणजे जितेंद्र याचा गोळी घालून मारतात याचाच बदला घेण्यासाठी रिना रॉय ही विजय सोबत असलेल्या त्याच्या सगळ्या मित्रांना विविध मानव रूप धारण करून मारून टाकते. अशी या चित्रपटाची कथा असून त्या काळी या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. तुम्ही सुद्धा हा चित्रपट आजही युट्यूबवर पाहू शकता.


५. नागचंपा (१९७६)
१९७६. कल्पना. २ तास १३ मिनिटे.
लेखक पंडीत प्रियदर्शी
दिग्दर्शकएस. एन. त्रिपाठी
कलाकारशशी कपूर, पद्मा खन्ना, रमेश देव, जयश्री टि, अलंकार जोशी, लीला मिश्रा , कनन कौशल
निर्मातामहेंद्र पटेल
प्रदर्शित तारीख१९७६
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.३⭐/ ५

नागचंपा (१९७६)” चित्रपट समीक्षा :-

ही एका जादुगाराची पौराणिक कथा आहे ज्याने अमर होण्यासाठी नागराजाच्या राजपुत्राचा वध केला आहे. तेव्हा त्याला नागराज शाप देतो की राजा धर्मपालाच्या मुलीला जो पुत्र होईल तो जादुगाराला मारून टाकेल. 
     १९७६ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचं एस.एन. त्रिपाठी यांनी दिग्दर्शिन केलं होतं व या चित्रपटाची कथा पंडित प्रियदर्शी यांनी लिहीली होती.


६. नगीना (१९८६)
१९८६. प्रणय. २ तास १७ मिनिटे. [ यु / ए ]
लेखक
दिग्दर्शकहरमेश मल्होत्रा
कलाकारऋषी कपूर, श्रीदेवी, सुषमा सेठ, प्रेम चोपडा
निर्माताहरमेश मल्होत्रा
प्रदर्शित तारीख१९८६
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.०⭐/ ५

नगीना (१९८६) ” चित्रपट समीक्षा :-

९८६ साली सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणजे श्रीदेवी अभिनित नगीना हा चित्रपट. या चित्रपटामुळे श्रीदेवी घराघरांत जाऊन पोहोचली. 
       या चित्रपटात सुद्धा श्रीदेवी हीने रजनी ही भूमिका साकारली होती जी एक इच्छाधारी नागिण आहे. चित्रपटाचा नायक राजीव हा रजनीसोबत लग्न करून सुखी संसार करत असतो जेव्हा की सुरूवातीला राजीवच्या आईला त्याचं लग्न श्रीमंत घरातील ठाकुर च्या मुलीसोबत लावून द्यायचं असतं. काही काळाने भैरवनाथ या मांत्रिकाची एन्ट्री होते आणि खऱ्या कहाणीला सुरूवात होते. 
     हा भैरवनाथ म्हणजेच अमरिश पुरी राजीव च्या खरं सांगतो की रजनी ही सर्वसामान्य मुलगी नसून एक इच्छाधारी नागिण आहे. या नंतर काय होतं.? रजनीचा नक्की हेतू काय असतो.? भैरवनाथ आणि रजनी यांचा नक्की काय संबंध असतो हे सगळं बघण्यासाठी हा चित्रपट नक्कीच बघा. ॲमेझॉन प्राईम वर हा चित्रपट उपलब्ध आहे.


७. निगाहें : नगीना पार्ट २ (१९८९)
१९८९. नाटक, कल्पना. २ तास २० मिनिटे. [ यु ]
लेखक जगमोहन कपूर 
दिग्दर्शकहरमेश मल्होत्रा
कलाकारश्रीदेवी, सनी देओल, अनुपम खेर, गुलशन ग्रोवर, अरुणा इराणी
निर्माताहरमेश मल्होत्रा
प्रदर्शित तारीख११ ऑगस्ट १९८९
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.०⭐/ ५

निगाहें : नगीना पार्ट २ ” चित्रपट समीक्षा :-

१९८६ साली सुपरडुपर हिट झालेल्या नगीना या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजे निगाहें. राजीव आणि रजनी यांचीच गोष्ट या चित्रपटात पुढे चालू होते. पण या भागात रजनी आणि राजीव यांचा अपघात झालेला दाखवला असून त्यांची मुलगी निलम तिच्या राजासाहेब या काकांसोबत राहत असते. निलमची भुमिका सुद्धा श्रीदेवी हिनेच साकारली आहे. तिचं लग्न ठरत असतानाच तिच्या आयुष्यात आनंद म्हणजेच सनी देओलची एन्ट्री होते. पुढे त्यांचं प्रेम होतं परंतु हा आनंद सर्वसामान्य माणूस नसून तो एक इच्छाधारी नाग असतो. 
     तो निलमच्या आयुष्यात मांत्रिक गोरखनाथ याच्या सांगण्यावरून फक्त नागमणी मिळवण्याच्या उद्देशाने आलेला असतो. कारण तो नागमणी कुठे आहे हे फक्त निलमला माहीत असतं. आता आनंद तो नागमणी मिळवतो का.? निलमला आनंद चं सत्य कळतं का.? हे सगळं बघण्यासाठी हा चित्रपट तुम्ही बघू शकता ॲमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर. बघा आणि नक्की कळवा कसा वाटला.


८. नाचे नागिन गली गली (१९८९)
१९८९. कल्पना. भयपट. २ तास ९ मिनिटे. [ यु ]
लेखक के. बी. फाटक
दिग्दर्शकमोहनजी प्रसाद
कलाकारनितीश भारद्वाज, मिनाक्षी शेशाद्री, सत्येंद्र कपूर, सदाशिव अमरापूरकर, सुहास जोशी
निर्माताबी. के. जैस्वाल 
प्रदर्शित तारीख
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.०⭐/ ५

नाचे नागिन गली गली (१९८९)” चित्रपट समीक्षा :-

१९७६ सालापासून इच्छाधारी नाग नागिण यांच्यावर आधारित चित्रपटांचा सुरू झालेला सिलसिला त्या काळात चांगलाच चालू होता. १९८९ साली आलेल्या नाचे नागिन गली गली या चित्रपटाला सुद्धा प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती.
      मिनाक्षी शेशाद्री आणि नितीश भारद्वाज या दोघांनी मोहीणी आणि कमल अशा दोन इच्छाधारी नाग आणि नागिण यांची मुख्य भूमिका यात साकारली होती.
       हे दोघेही हवं तेव्हा मानवरूप धारण करू शकत होते. यांची प्रेमकहाणी इतर चित्रपटांपेक्षा वेगळी होती. त्यांची एकमेकांपासून ताटातूट झाली असून ते एकमेकांना शोधत असतात. अशातच एक काळी जादू करणारा मांत्रिक हा नागमणी च्या शोधात आहे. ज्याला एका स्त्रीकडून मिळालेल्या शापातून मुक्त व्हायचं आहे. 
     आता हा शाप का आणि काय आहे.? मोहीणी आणि कमल एकमेकांना भेटतात का.? हे बघण्यासाठी हा चित्रपट नक्की बघा. युट्यूबवर हा चित्रपट उपलब्ध आहे.


९. नाग नागिण (१९८९)
१९८९. कल्पना
लेखक रामकुमार बोहरा
दिग्दर्शकरामकुमार बोहरा
कलाकारराजीव कपूर, मंदाकिनी, रझा मुराद, राजेंद्रनाथ मल्होत्रा, सतीश शाह
निर्मातारामकुमार बोहरा
प्रदर्शित तारीख१९८९
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.२⭐/ ५

नाग नागिण (१९८९)” चित्रपट समीक्षा :-

या काळात नागदेवतेवर आधारित प्रदर्शित झालेले सर्वच चित्रपट थोड्या फार फरकाने सारखेच असायचे. इच्छाधारी नाग नागिण, एकाचा खून मग उरलेल्या एकाने बदला घेणं, नागमणी साठी मांत्रिक वैगरे हे सगळं सारखंच असायचं. तरीही लोकं प्रत्येक चित्रपट आवडीने बघायचे. 
      १९८९ साली प्रदर्शित झालेला नाग नागिण हा चित्रपट सुद्धा याच कथेवर आधारित आहे. चांदणी आणि कुबेर हे दोघं इच्छाधारी नाग आणि नागिण असतात. एक अघोरी मांत्रिक आणि राणा नागमणी मिळवण्यासाठी त्यांना पकडायचा प्रयत्न करत असतात. मांत्रिकाला संपूर्ण जगावर राज्य करायचं असतं आणि अमर व्हायचं असतं. परंतु त्यांच्या या स्वार्थापायी कुबेरचा त्यांच्याकडून मृत्यू होतो व पुनर्जन्म होतो. 
       चांदणी ही शंकरदेवाच्या सांगण्यावरून घोर तपश्चर्या करून आपल्या पतीच्या शोधात असते. आता तिला तिचा नवरा भेटतो का.? राणा आणि मांत्रिक यांना नागमणी मिळतो का हे बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल. युट्यूबवर हा चित्रपट तुम्ही बघू शकता.


१०. दुध का कर्ज (१९९०)
१९९०. ॲक्शन, कल्पना. नाटक. २ तास ४१ मिनिटे. [ ए ]
लेखक
दिग्दर्शकअशोक गायकवाड 
कलाकारजॅकी श्रॉफ, अरुणा इराणी, निलम, अमरिश पुरी, प्रेम चोपडा, वर्षा उसगावकर 
निर्मातासलीम अख्तर 
प्रदर्शित तारीख१९९०
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.४⭐/ ५

“दुध का कर्ज (१९९०)” चित्रपट समीक्षा :-

१९९० साली प्रदर्शित झालेला दुध का कर्ज हा चित्रपट प्रेक्षक आजही आवडीने बघतात. जॅकी श्रॉफ अरुणा इराणी निलम आणि अमरीश पुरी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन अशोक गायकवाड यांनी केले होते.
     अरूणा इराणी हिच्या गारूडी नवऱ्यावर चोरीचा आळ घेऊन अमरीश पुरी त्याला ठार मारतो. तेव्हाच पार्वती म्हणजेच अरूणा इराणी शपथ घेते की तिच्या नवऱ्याच्या खूनचा ती बदला घेऊनच शांत बसेल. ती आपल्या मुलाला आणि पाळीव नागाला घेऊन धर्मा नावाच्या लोहाराकडे राहते ज्याला ती आपला भाऊ मानते. पुढे जाऊन सुरज(जॅकी श्रॉफ) म्हणजे पार्वती चा मुलगा मोठा होऊन अमरीश पुरीच्या मुलीच्या रेश्माच्या (निलम)प्रेमात पडतो. 
     परंतु कालांतराने त्याला कळतं रेश्माचा बाप हाच आपल्या वडिलांचा खूनी आहे. तेव्हा तो काय करतो..? बदला पुर्ण होतो का.? अमरीश पुरी हा नागमणी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतो, त्याचे प्रयत्न सफल होतात का हे बघण्यासाठी हा चित्रपट नक्कीच बघावा असा आहे. अरूणा इराणी हिने यात सुंदर अभिनय केला आहे. युट्यूबवर हा चित्रपट तुम्ही बघू शकता.


११. शेषनाग (१९९०)
१९९०. कल्पना. २ तास २५ मिनिटे. [ यु ]
लेखक राजेंद्र सिंग
दिग्दर्शकके. आर. रेड्डी
कलाकाररेखा, जितेंद्र, ऋषी कपूर, माधवी
निर्मातासय्यद अयुब, नलिनी शंकर, दिपक अढिया
प्रदर्शित तारीख१९९०
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.९⭐/ ५

शेषनाग (१९९०)” चित्रपट समीक्षा :-

एकापाठोपाठ आलेल्या नगीना आणि निगाहें या दोन्ही चित्रपटांच्या लोकप्रियतेमुळे नाग, नागिण किंवा इच्छाधारी नाग नागिण यांच्यावर आधारित बरेच चित्रपट येऊ लागले होते. त्यापैकीच १९९० साली प्रदर्शित झालेला “शेषनाग”. यात रेखा आणि जितेंद्र यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 
     चित्रपटात एक शेषनागांचं गुढ मंदिर दाखवण्यात आलं आहे जिथे दर चंद्रग्रहणाच्या वेळी मंदिरातील देवता इच्छाधारी नाग आणि नागिणीच्या संरक्षतेखाली एक खजिना उघडतो. 
    जो कोणी हा खजिना मिळवेल आणि ज्याच्यावर चांदण्यांचा वर्षाव होईल त्याला कमरत्व प्राप्त होणार असतं. म्हणूनच अघोरी हा मांत्रिक हा खजिना मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय परंतु भानू आणि प्रितम हे इच्छाधारी नाग आणि नागिण त्या खजिन्याचं रक्षण करत असतात. 
   आता अघोरी त्याचं इप्सित साध्य करेल का.? भानू आणि प्रितम त्याच्या तावडीतून सुटतील का.? हे बघण्यासाठी हा चित्रपट तुम्ही जिओ सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर बघू शकता.


१२. तुम मेरे हो (१९९०)
१९९०. कल्पना, प्रणय. २ तास ९ मिनिटे. [ यु ]
लेखक ताहीर हुसैन, मदन जोशी, कलीम राही
दिग्दर्शकताहीर हुसैन 
कलाकारअमिर खान, जुही चावला
निर्माताताहीर हुसैन 
प्रदर्शित तारीख२५ मे १९९०
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.६⭐/ ५

तुम मेरे हो (१९९०)” चित्रपट समीक्षा :-

तुम मेरे हो हा चित्रपट म्हणजे शिवा आणि पारोची प्रेमकहाणी आहे. सर्पमित्र असलेला शिवा म्हणजेच आमीर खान याला दैवी देणगी लाभलेली असते. तो आणि पारो म्हणजे जुही चावला एकमेकांवर जिवापाड प्रेम करत असतात परंतु पारोच्या जमीनदार वडिलांचा या प्रेमाला विरोध असतो. परंतु जेव्हा शिवा पारोचा सर्पदंश झाल्यावर जीव वाचवतो तेव्हा परिस्थिती बदलते. 
    खरं तर शिवा आणि पारोचं लग्न लहानपणी झालेलं असतं. परंतु एका इच्छाधारी नागिण शिवाला दंश करून मारते परंतु त्याचा मृत्यू न होता त्याचा जीव वाचवून एक गारूडी त्याला जीवनदान देतो व त्याला विद्या शिकवतो. 
       आता ती नागिण शिवाला का मारण्याचा प्रयत्न करते.? हे बघण्यासाठी हा चित्रपट तुम्ही बघणं गरजेचं आहे. युट्यूबवर हा चित्रपट उपलब्ध आहे.


१३. नागमणी (१९९१)
१९९१. कल्पना. २ तास १६ मिनिटे. [ यु ]
लेखक महेंद्र देहालवी
दिग्दर्शकव्ही. मेनन
कलाकारशिक्षा सरूप, अरुणा ईरानी, ​​मंगल ढिल्लन, किरण कुमार, आलोक नाथ, राकेश बेदी, सतीश शाह, सुमित सहगल
निर्मातागुलशन कुमार 
प्रदर्शित तारीख१ जानेवारी १९९१
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.८⭐/ ५

नागमणी (१९९१)” चित्रपट समीक्षा :-

हा चित्रपट सुद्धा नागमणी मिळवून अमर होण्यासाठी त्रिकाल हा प्रयत्न करत असताना त्याला कळतं की या नागमणी ची पुजा एका मंत्राने करायची आहे आणि हा मंत्र जाणून घेण्यासाठी त्याने प्रताप आणि त्याच्या पत्नीला पंधरा वर्षं कैद करून ठेवले आहे. त्याला कोणत्याही परिस्थितीत हा नागमणी आणि मंत्र हवा असतो परंतु मंत्र सांगण्यास प्रताप नकार देतो. 
     पुढे जाऊन प्रतापचा मुलगा शाम आपल्या आईवडिलांना शोधत त्रिकालच्या भुमित येतो आणि त्याच्या मुलीच्या प्रेमात पडतो. आता त्रिकाल हा नागमणी मिळवतो का.? की शाम आपल्या आईवडिलांना वाचवून नागमणी सुरक्षित करतो का. हे बघण्यासाठी हा चित्रपट तुम्ही बघायला हवा. युट्यूबवर उपलब्ध आहे.


१४. जानी दुश्मन : एक अनोखी कहाणी (२००२
२००२. ॲक्शन, भयपट, प्रणय. २ तास ५९ मिनिटे. [ ए ]
लेखक अभिषेक सिन्हा, नवीना भंडारी, रवी शंकर जैसवाल
दिग्दर्शकराजकुमार कोहली
कलाकारअक्षय कुमार, सुनील शेट्टी, सनी देओल, सोनू निगम, अरमान कोहली, जॉनी लिव्हर, अतुल अग्निहोत्री, राज बब्बर, रजत बेदी, अफताब शिवदासानी, अर्शद वारसी, रंभा, अमरीश पुरी, मोहिनी शर्मा
निर्माताराजकुमार कोहली
प्रदर्शित तारीख१६ ऑगस्ट २००२
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.५⭐/ ५

जानी दुश्मन : एक अनोखी कहाणी (२००२)” चित्रपट समीक्षा :-

याआधी सुद्धा राजकुमार कोहली यांनी दिग्दर्शित केलेला नागिन हा चित्रपट सुद्धा कलाकारांची प्रचंड मोठी फौज घेऊन बनवलेला चित्रपट होता. तसाच २००२ साली प्रदर्शित झालेला “जानी दुश्मन” हा चित्रपट सुद्धा कलाकारांची मोठी फौज असलेलाच चित्रपट आहे. 
    यात सुद्धा कपिल म्हणजे अरमान कोहली आणि वसुंधरा म्हणजे मनिषा कोईराला हे दोघं इच्छाधारी नाग आणि नागिण असून त्यांचं एकमेकांवर प्रेम असतं परंतु एकदा त्यांच्यामुळे एका साधूची तपश्चर्या भंग पावल्यामुळे वसुंधरा चा शाप मिळाल्याने मृत्यू होतो. साधूची खूप याचना केल्यावर कपिलला कळतं की वसुंधरा चा पुनर्जन्म होईल. 
     दिव्या म्हणून पुनर्जन्म घेतल्यानंतर वसुंधराला कपिल नागमणी ला स्पर्श करायला सांगून तिचा मागचा जन्म आठवून देतो. परंतु या जन्मी सुद्धा दिव्यावर दोघांनी मिळून बलात्कार केल्यामुळे दिव्या आत्महत्या करते. याचाच बदला घेण्यासाठी कपिल ज्यांनी बलात्कार केला त्यांच्या सगळ्या मित्रांना मारत सुटतो. आता ज्यांचा दोष नाही ते यातून वाचतात का.? कपिल आणि वसुंधरा पुन्हा एकत्र भेटतात याची उत्तरे चित्रपटात मिळतील. युट्यूबवर हा चित्रपट उपलब्ध आहे.


१५.  हिस्स (२०१०)
२०१०. भयपट. कल्पना. १ तास ३८ मिनिटे. [ यु / ए ]
लेखक जेनिफर लिंच, गुल्फाम खान
दिग्दर्शकजेनिफर लिंच
कलाकारमल्लिका शेरावत, इरफान खान, रमन त्रिखा, दिव्या दत्ता ,जेफ डॉसिट
प्रदर्शित तारीख२२ ऑक्टोंबर २०१०
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.४⭐/ ५

हिस्स (२०१०)” चित्रपट समीक्षा :-

एक फसलेला प्रयोग म्हणून हिस्स या चित्रपटाची नोंद होऊ शकते. एक इंग्रज जो भारतात एक नागमणी मिळवण्यासाठी आलेला आहे. त्याला कॅन्सर असल्याचे निदान होऊन त्याच्याकडे फक्त सहा महिने असतात. म्हणून तो एक नाग पकडतो जेणेकरून त्याला सोडवण्यासाठी नागिण येईल आणि नागमणी मिळवता येईल. 
      इरफान खान सारख्या ब्रिलियंट अभिनेत्याने या चित्रपटाला काम केलंय याचं नवल वाटतं. असो, अगदीच रिकामा वेळ आहे आणि नेहमीच्या बॉलिवूड चित्रपटांपेक्षा इच्छाधारी नाग नागिणीवर काढलेला वेगळा चित्रपट बघायचा असल्यास हा चित्रपट तुम्ही बघू शकता. ॲमेझॉन प्राईम वर उपलब्ध आहे.


तर मित्रांनो, यापैकी कोणते चित्रपट तुम्ही पाहीलेत किंवा कोणता बघायला आवडेल हे कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *