नोव्हेंबर २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी
Written by : आकांक्षा कोलते
Updated : डिसेंबर 25, 2023 | 06:53 PM
आशयघन आणि दर्जेदार कथानक हा मराठी चित्रपटांचा गाभा आहे. मराठी चित्रपट हे नेहमीच वास्तववादी आणि चांगला कंटेंट घेऊन भेटीला येतात हे आता प्रेक्षकांच्या लक्षात येत आहे. त्यामुळे मराठी चित्रपटांना प्रेक्षक आता भरभरून प्रतिसाद देतात.
आपण आतापर्यंत ऑक्टोबर २०२३ पर्यंत प्रदर्शित झालेले चित्रपट पाहीले आहेत. आज आपण या लेखात नोव्हेंबर २०२३ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेले चित्रपट पाहुया
१. सिंगल |
लेखक | सतीश समुद्रे |
दिग्दर्शक | चेतन चवडा |
कलाकार | अभिनय बेर्डे, प्रथमेश परब, प्राजक्ता गायकवाड, राजेश्वरी खरात |
निर्माता | किरण कुमावत, हर्षवर्धन गायकवाड, अमोलकागणे, गौरी सागर पाठक |
प्रदर्शित तारीख | ३ नोव्हेंबर २०२३ |
भाषा | मराठी |
“सिंगल” चित्रपट समीक्षा :-
प्रथमेश परब आणि अभिनय बेर्डे या दोघांचा सिंगल हा चित्रपट ३ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला. प्रथमेश परब याला स्वतःला एकाच धाटणीच्या भूमिका करून कंटाळा आला नसेल कदाचित परंतु प्रेक्षकांना मात्र आता तेच तेच बघून कंटाळा आला असेल. काहीही वेगळं नसलेल्या या चित्रपटाबद्दल फारसं सांगण्यासारखं सुद्धा नाही.
दोन मित्र, कॉलेज लाईफ, मैत्री, प्रेम, ब्रेकअप या सगळ्यावर आधारित हा चित्रपट प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात कमी पडला आहे. राहुल (प्रथमेश) आणि अभिनय (अभिनय बेर्डे) हे दोघं मित्र असतात. कॉलेज मध्ये असताना जे जे करायचं ती सगळी मजा हे दोघं करत असतात. आता पण कोणत्याही मुलीला फसवायचं नाही असं ठरवल्यानंतर मात्र पुढे काय होतं याची कथा म्हणजे हा चित्रपट.
प्रथमेश, अभिनय सोबतच प्राजक्ता गायकवाड आणि राजेश्वरी खरात या दोघी या चित्रपटात पहायला मिळतात. हा विनोदी चित्रपट असला तरी तो बघताना कंटाळवाणा वाटतो. कथा, पटकथा संवाद अजून चांगले असते तर कदाचित काहीतरी वेगळं बघता आलं असतं. त्यात संगीत सुद्धा ओके ओके म्हणू शकतो असंच आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर आल्यावर सुद्धा हा चित्रपट नाही बघितला तरी चालेल. माझ्याकडून या चित्रपटाला एक स्टार.
२. शॉर्ट ॲण्ड स्वीट |
लेखक | स्वप्नील बारस्कर |
दिग्दर्शक | गणेश दिनकर कदम |
कलाकार | सोनाली कुलकर्णी, हर्षद अतकरी, श्रीधर वत्सर, रसिका सुनील |
निर्माता | पायल गणेश कदम, विनोद राव |
प्रदर्शित तारीख | ३ नोव्हेंबर २०२३ |
भाषा | मराठी |
“शॉर्ट ॲण्ड स्वीट” चित्रपट समीक्षा :-
२०२३ मध्ये बरेच मराठी चित्रपट प्रदर्शित झाले. त्यातील काही अगदीच फ्लॉप तर काही चांगला कंटेट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आले. परंतु काही चित्रपटांचा विषय कितीही चांगला असला किंवा तो चित्रपट वेगळ्या धाटणीचा असेल तर अर्थातच त्याचा एक ठराविक प्रेक्षकवर्ग तयार होतो. बाकीच्या लोकांना एकतर तो चित्रपट, विषय आवडत नाही आणि काही लोक न बघता तो चित्रपट ट्रोल करतात. नेमकं हेच झालंय सोनाली कुलकर्णी यांच्या शॉर्ट ॲण्ड स्वीट या चित्रपटाच्या बाबतीत.
एक हॅण्डसम, देखणा, उंचापुरा तरूण मुलगा जेव्हा आयुष्यात पहिल्यांदाच आपल्या उंचीने ठेंगणे असणाऱ्या वडिलांना बघतो तेव्हा त्याला काय वाटतं.? किंवा तो स्विकारायला तयारच नसतो की हे त्याचे वडील असू शकतात. अशा आशयाचा हा आगळावेगळा चित्रपट दिग्दर्शित केला आहे गणेश कदम यांनी.
उंचीने ठेंगणे असणाऱ्यांना आपण नेहमीच हसतो. किंवा आतापर्यंतच्या चित्रपटांमध्ये सुद्धा त्यांची टिंगलच उडवली गेली आहे. परंतु या चित्रपटातून एक वेगळीच बाजू मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शक गणेश यांनी केला आहे. संजू म्हणजेच हर्षद अतकरी याला त्याच्या आईने एकटीनेच मोठं केलेलं असतं. परंतु अचानक इतक्या वर्षांनी तो प्रथमच आपल्या वडिलांना बघतो तेव्हा त्याला वाटणाऱ्या भावना हर्षदने उत्तमरीत्या अभिनयातून व्यक्त केल्या आहेत. सोनाली कुलकर्णी यांच्या अभिनयाच्या प्रेमात तुम्ही नव्याने पडाल याची खात्री आहे. विशेष म्हणजे वडिलांची भूमिका साकारणारे अभिनेते श्रीधर वत्सर यांनी उत्कृष्ट अभिनय केला आहे. रसिका सुनील ही संजूची प्रेयसी दाखवली असून तिने सुद्धा चांगला अभिनय केला आहे.
चित्रपट बघताना कंटाळवाणा वाटत नाही हे चित्रपटाचं यश आहे. अजून एक जमेची बाजू म्हणजे संगीत. चित्रपटातील गाणी, पार्श्वसंगीत तुम्हाला नक्कीच आवडेल. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.
३. आतुर |
लेखक | तेजस पारसपत्की, आनंद निकम, किरण जाधव |
दिग्दर्शक | शिवाजी लोटन पाटील |
कलाकार | प्रीती मल्लापुरकर, चिन्मय उद्गिरकर, योगेश सोमन, प्रणव रावराणे |
निर्माता | झेनिथ फिल्म्स |
प्रदर्शित तारीख | ३ नोव्हेंबर २०२३ |
भाषा | मराठी |
“आतुर” चित्रपट समीक्षा :-
मराठी चित्रपटांच्या बाबतीत असलेली शोकांतिका म्हणजे चांगल्या चित्रपटांचं पाहिजे तसं प्रमोशन न होणं, आणि हव्या तेवढ्या स्क्रीन न मिळणं. यामध्ये निर्माते दिग्दर्शक यांचं नुकसान तर होतंच परंतु प्रेक्षकांचं सुद्धा नुकसान होतं. एखादी चांगली कलाकृती, चांगला चित्रपट जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित न झाल्यामुळे प्रेक्षकांना तो अनुभव घेताच येत नाही.
३ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झालेला आतुर हा चित्रपट अतिशय सुंदर असून चांगल्या प्रकारे तो सादर करण्यात आला आहे.परंतु बऱ्याच लोकांना असा एखादा चित्रपट आला हेच माहीत नाही. सस्पेन्स थ्रिलर असा हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी. यापूर्वी धग, भोंगा यासारखे दर्जेदार चित्रपटांचं दिग्दर्शन करून त्यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सुद्धा गौरविण्यात आलं आहे.
आतुर या चित्रपटाची कथा एका आईभोवती फिरते जी आपल्या बाळाला भेटण्यासाठी, जन्म देण्यासाठी आतुर आहे. परंतु वरवर सहज, साधी दिसणारी ही कथा तेवढी साधी नाही. हा एक सस्पेन्स थ्रिलर चित्रपट असल्यामुळे फारसं काही न बोललेलं उत्तम. कारण ओटीटी प्लॅटफॉर्मवर आल्यावर हा चित्रपट तुम्ही नक्कीच बघायला हवा. प्रीती मल्लापुरकर यांनी आईची भूमिका साकारली असून उत्तम अभिनय केला आहे. चिन्मय उद्गिरकर हा सुद्धा डॉक्टर च्या भुमिकेत शोभला आहे. दिग्दर्शन अर्थातच उत्तम आहे. एकंदरच चित्रपटाची कथा नेहमीपेक्षा वेगळी आहे. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.
४. रंगीले फंटर |
लेखक | अक्षय गोरे |
दिग्दर्शक | निशांत धापसे |
कलाकार | हंसराज जगताप, रुपेश बने, जीवन करलकर, यश कुलकर्णी, मिलिंद शिंदे, किशोर चौघुले, सिया पाटील, पलक अडसूळ, डॅनी अडसूळ, वैशाली दाभाडे |
निर्माता | प्रशांत अडसुळ, शशिकांत अडसूळ |
प्रदर्शित तारीख | ३ नोव्हेंबर २०२३ |
भाषा | मराठी |
“रंगीले फंटर” चित्रपट समीक्षा :-
प्रेमाला काही वय नसतं. ते केव्हा पण, कुठं पण आणि कसं पण व्हतं हे सांगणारा रंगीले फंटर हा चित्रपट ३ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला. पण हे सांगणारे याआधी इतके चित्रपट येऊन गेलेत की आता प्रेक्षकांना तेच तेच बघून कंटाळा आलाय.
शालेय जीवनात झालेलं प्रेम, त्या वयात वाटणारं आकर्षण आणि ते मिळवण्यासाठी चालणारी धडपड हा या कथेचा पाया आहे. एकाच शाळेत शिकणारे चार मित्र आणि त्यांना आवडणारी एक मुलगी, तिच्यासाठी ते काय काय करतात वैगरे हे सगळं चित्रपटात पहायला मिळतं. वेगळं, विशेष असं काही नाही. “दोस्तीत कुस्ती नाय पायजे” अशी टॅग लाईन असणाऱ्या या चित्रपटात अर्थातच मुलीमुळे मित्रांमध्ये होणारी भांडणं तुम्हाला या चित्रपटात पहायला मिळतील.
नवोदित कलाकारांचा अभिनय चांगला आहे. परंतु आधी म्हटल्याप्रमाणे नवीन काही नसल्याने चित्रपट फार काही मनोरंजन करणारा नाही. पलक अडसूळ ही मुख्य भूमिकेत असून हंसराज जगताप, रुपेश बने, यश कुलकर्णी, जीवन कऱ्हाळकर हे चौघं चार मित्रांची भुमिका साकारत आहेत. ठिकठाक असणाऱ्या या चित्रपटाला माझ्याकडून दिड स्टार
५. नाळ २ |
लेखक | सुधाकर रेड्डी यंकट्टी, नागराज मंजुळे |
दिग्दर्शक | सुधाकर रेड्डी यंकट्टी |
कलाकार | नागराज मंजुळे,देविका दफ्तरदार,जितेंद्र जोशी,दीप्ती देवी,श्रीनिवास पोकळे,त्रिशा ठोसर |
निर्माता | नागराज मंजुळे, सुधाकर रेड्डी यंकट्टी, गार्गी कुलकर्णी |
प्रदर्शित तारीख | १० नोव्हेंबर २०२३ |
भाषा | मराठी |
“नाळ २” चित्रपट समीक्षा :-
सध्याच्या काळात हिंसा, अश्लीलता आणि शिव्यांचा भडीमार असलेल्या चित्रपटांच्या गर्दीत तरल भावभावनांचं दर्शन घडवणारा आणि थेट तुमच्या काळजापर्यंत पोहचणारा चित्रपट म्हणजे नाळ २.
पहिल्या नाळ या चित्रपटाचा मा सिक्वेल असून यावेळी सुद्धा हा चित्रपट पाहिल्यानंतर तेवढंच समाधान मिळतं जेवढं पहिल्या भागात मिळालं होतं. पहिल्या भागात शेवटी आपल्याला चुटपुट लागून राहिली होती की चैत्याची खरी आई नक्की कोण आणि नक्की ही गुंतागुंत काय आहे. खऱ्या आईला भेटण्यासाठी चाललेली चैत्याची धडपड या भागात संपते.
परंतु हा भाग सुद्धा तेवढाच मनोरंजक आहे. या भागात चैत्याला कळतं की त्याला एक मोठा भाऊ आणि एक छोटीशी बहीण देखील आहे. बहीण भावाच्या नात्यांचं सुंदर सादरीकरण या चित्रपटात पहायला मिळतं. छोट्या त्रिशाने अभिनयाचा सिक्सर मारून सगळ्यांनाच चकीत केलं आहे.
अतिशय साधी सरळ वाटणारी ही कथा परंतु ज्या प्रकारे पटकथा संवाद लिहिले गेले आहेत त्याला तोड नाही. जुन्नर मध्ये चित्रपटाचं चित्रीकरण करण्यात आलं असून सुंदर सिनेमॅटोग्राफी पाहायला मिळते. एक एक फ्रेम तुमच्या लक्षात राहण्यासारखी आहे. सगळ्याच कलाकारांनी नैसर्गिक असा अभिनय केला आहे. अशा कलाकृती आवर्जून बघायला हव्या असं हा चित्रपट पाहिल्यानंतर नक्की वाटतं. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.
६. श्यामची आई |
लेखक | सुनील सुकठनकर |
दिग्दर्शक | सुजय डहाके |
कलाकार | ओम भूतकर, गौरी देशपांडे, संदीप पाठक, ज्योती चांदेकर, अक्षया गुरव, उर्मिला जगताप |
निर्माता | अमृता अरूण राव |
प्रदर्शित तारीख | १० नोव्हेंबर २०२३ |
भाषा | मराठी |
“जगभरून फिल्म्स” चित्रपट समीक्षा :-
वाचकांसाठी मराठी साहित्य आणि मराठी पुस्तके म्हटलं की “श्यामची आई” हे नाव ओघाने आलंच पाहिजे. स्वतः साने गुरुजी यांनी लिहिलेल्या या पुस्तकावर आधारित आचार्य अत्रे यांनी चित्रपट काढला होता. परंतु आताच्या या काळात सर्वज्ञात असलेल्या “श्यामची आई” बद्दल या चित्रपटात त्याच गोष्टी नव्या अंदाजात पाहायला मिळतात.
छोटा श्याम ते साने गुरुजी यांची कारावासात विनोबा भावे यांच्यासोबत झालेली भेट, त्यांचा स्वातंत्र्यलढ्यातील सहभाग, आणि श्यामची आई या पुस्तकाचा जन्म हा सगळा प्रवास या चित्रपटात पहायला मिळतो. विशेष म्हणजे हा संपूर्ण चित्रपट कृष्णधवल म्हणजेच ब्लॅक अँड व्हाईट दाखवण्यात आला आहे. चित्रपटातील काही प्रसंग दाखवले नसते तर कदाचित चित्रपट इतका लांबला नसता आणि कदाचित जास्त प्रभावी झाला असता.
छोट्या श्यामची भुमिका करणारा शर्व गाडगीळ विशेष लक्षात राहतो. अतिशय मायाळू पण प्रसंगी तेवढीच खंबीर अशी श्यामच्या आईची भूमिका गौरी देशपांडे हीने सुंदररित्या पार पाडली आहे. संदीप पाठक यांनी उभे केलेले श्यामचे वडील निव्वळ अप्रतिम. काही प्रसंग इतके संवेदनशील आणि मन हेलावून टाकणारे आहेत की आपसूकच डोळ्यात पाणी येतं. आणि अर्थातच तरूण वयातील साने गुरुजी यांची भूमिका साकारताना ओम भुतकर याने घेतलेली मेहनत नक्कीच दिसून येते. चित्रपट काही ठिकाणी संथ वाटतो. परंतु एकदा तरी बघायला हवा असा हा चित्रपट नक्कीच आहे. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.
७. सलमान सोसायटी |
लेखक | कैलाश काशीनाथ पवार |
दिग्दर्शक | कैलाश काशीनाथ पवार |
तारांकित | |
निर्माता | रेखा जगताप, शांताराम भोंडवे, वैशाली चव्हाण |
प्रदर्शित तारीख | १७ नोव्हेंबर २०२३ |
भाषा | मराठी |
“सलमान सोसायटी” चित्रपट समीक्षा :-
कैलाश पवार दिग्दर्शित सलमान सोसायटी हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटाची कथा सुद्धा त्यांनीच लिहिली आहे. चित्रपटाची कथा चांगली असेल तर अर्धा चित्रपट तिथेच हिट होतो परंतु कथा, संवाद या गोष्टी व्यवस्थित नसतील तर कलाकार कितीही चांगले असले तरी चित्रपट चालत नाही. हेच सलमान सोसायटी या चित्रपटाच्या बाबतीत झालं आहे.
आजही समाजात अशी कित्येक मुलं आहेत जी परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित आहेत. काहींचे आई वडील असले तरी गरिबीमुळे शिकवत नाही तर काहींना आईवडील नाहीत त्यामुळे ती मुलं शिकत नाहीत. अर्थातच ही मुलं समाजातील अशा भागातील असतात जिथे शिक्षणाला फारसं महत्त्व दिलं जात नाही.
हा चित्रपट म्हणजे सलमान नावाच्या एका मुलाची गोष्ट आहे ज्याला शिकण्याची प्रचंड इच्छा आहे, त्यासाठी तो खटपट करतोय परंतु आईवडील नाहीत हा त्याचा शिक्षणातील अडथळा बनून समोर आल्यावर तो काय करतो हे या चित्रपटात पहायला मिळतं.
चित्रपटातील बालकलाकारांनी चांगला अभिनय केला आहे. परंतु चित्रपटाची कथा, दिग्दर्शन आणि एकंदरच स्क्रीन प्ले, संकलन या गोष्टी फारशा जमून आलेल्या नाहीत. माझ्याकडून या चित्रपटाला एक स्टार.
८. झिम्मा २ |
लेखक | हेमंत ढोमे, इरावती कर्णिक |
दिग्दर्शक | हेमंत ढोमे |
तारांकित | सुहास जोशी,निर्मिती सावंत,सुचित्रा बांदेकर,क्षिती जोग,सायली संजीव,रिंकू राजगुरु,शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर |
निर्माता | आनंद एल राय, ज्योती देशपांडे, क्षिती जोग |
प्रदर्शित तारीख | नोव्हेंबर २०२३ |
भाषा | मराठी |
“झिम्मा २” चित्रपट समीक्षा :-
वर्षाच्या सरतेशेवटी प्रदर्शित झालेला झिम्मा २ हा चित्रपट प्रेक्षकांना खळखळून हसवणारा आणि तेवढाच संवेदनशील असा आहे. पहिल्या भागात असलेला टूर गाईड इथे सुद्धा आहे. तो यावेळी सगळ्यांना एका नव्या टूरवर घेऊन जात आहे.आता सगळ्या म्हणजे त्याच ज्या आधीच्या झिम्मा मध्ये होत्या. त्यात आता दोन नवीन पात्रांची भर पडली आहे. आणि या नवीन पात्रांची निवड अगदी बिनचूक करण्यात हेमंत ढोमे यशस्वी झाला आहे.
आपल्या आयुष्यात अशी काही माणसं येतात त्यांच्यासोबत आपलं काही रक्ताचं नातं नसतं परंतु त्यांच्याशी आपली नाळ इतकी जुळते की वाट्टेल तशी मजा आपण त्यांच्यासोबत करू शकतो. अशाच आधीच्या भागात ट्रिपला भेटलेल्या या मैत्रिणी आता पुन्हा एकदा धमाल करायला नवीन ठिकाणी गेल्या आहेत.
आधीच्या भागात तर धमाल होतीच परंतु या भागात दिग्दर्शक आणि लेखक यांनी सुंदर असे सामाजिक संदेश देण्याचं काम केलं आहे. जसं की “आई होणं म्हणजे स्त्रीत्व असतं असं नाही.” तर स्त्री म्हणजे काय ही प्रत्येक स्त्री ची आपापली वेगळी व्याख्या असू शकते. किंवा करीअर न करता संसार, घर सांभाळणं, घरच्यांची काळजी घेणं हा स्त्रीचा चॉईस असू शकतो आणि त्यात कमीपणाचं काही नाही. अशा बऱ्याच महत्त्वाच्या मुद्द्यांवर चित्रपट अलगदपणे भाष्य करतो.
चित्रपटाची खरी गंमत म्हणजे यातीर कलाकार. ७५ वा वाढदिवस साजरा करायला आलेली तरूण इंदू सुहास जोशी यांनी अफलातून साकारली आहे. तसेच क्षिती जोग, अस्मिता बांदेकर, शिवानी सुर्वे, रिंकू राजगुरू या सगळ्यांनीच कमाल अभिनय केला आहे. सगळ्यात भन्नाट अभिनय केला आहे तो म्हणजे निर्मिती सावंत. जेव्हा जेव्हा स्क्रीन वर निर्मिती सावंत आल्या आहेत तेव्हा प्रत्येक वेळी प्रेक्षकांना हसायला भाग पाडलं आहे. निर्मिती सावंत यांचा अभिनय, त्यांची भूमिका म्हणजे झिम्मा २ चा आत्मा असं म्हटलं तरी चालेल. एकंदरच हा प्रवास, ही मजा एकदा तरी अनुभवायला हवीच. सुंदर लोकेशन, सुंदर सिनेमॅटोग्राफी स्क्रीन प्ले, संवाद, दिग्दर्शन सगळंच छान जुळून आलं आहे. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.
तर मित्रांनो, यापैकी कोणते चित्रपट तुम्ही पाहीलेत आणि या विकेंड ला कोणते बघायला जाणार आहात हे कमेंट करून नक्की सांगा.
हे पण वाचा :-
फेब्रुवारी २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी
फेब्रुवारी २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी
मार्च २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी
मार्च २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी
एप्रिल २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी
एप्रिल २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी
मे २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी
मे २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी
जून २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी
जून २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी
जुलै २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी
जुलै २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी
ऑगस्ट २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी
ऑगस्ट २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी
सप्टेंबर २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी
सप्टेंबर २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी
ऑक्टोबर २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी
ऑक्टोबर २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी
नोव्हेंबर २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी