डिसेंबर २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी
डिसेंबर २०२३ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेले हे हिंदी चित्रपट तुम्ही पाहीलेत का?
Written by : आकांक्षा कोलते
Updated : जानेवारी 01, 2024 | 10:58 PM
खरं तर आता वेबसिरीज चा जमाना असल्यामुळे प्रेक्षकांच्या चित्रपटांच्या बाबतीत अपेक्षा वाढल्या आहेत. त्यातही नवीन आलेल्या चित्रपटांमध्ये ओरिजनल कंटेट कमीच असतो. बरेच चित्रपट हे रिमेक असतात. त्यामुळे चित्रपटगृहात प्रेक्षकांना खेचून आणणं हे आता निर्माते आणि दिग्दर्शक यांच्यापुढे नवीन आव्हान आहे. आता प्रेक्षकांच्या चित्रपटांच्या बाबतीत असलेल्या अपेक्षा पूर्ण होतायत की नाही हे आमच्या परीने सांगण्याचा प्रयत्न या लेखात आम्ही करणार आहोत.
२०२३ या वर्षात बरेच चित्रपट प्रदर्शित झाले. काही चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला तर काही चित्रपट चांगलेच आपटले. आज आपण वर्षाअखेर म्हणजेच डिसेंबर २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले चित्रपट या लेखात बघणार आहोत. त्यातील तुम्हाला कोणते आवडले हे मात्र आम्हाला नक्की कळवा.
१. ॲनिमल |
लेखक | संदीप रेड्डी वंगा, प्रणय रेड्डी वंगा, सौरभ गुप्ता |
दिग्दर्शक | संदीप रेड्डी वंगा |
तारांकित | रणबीर कपूर, अनिल कपूर, बॉबी देओल, राश्मिका मंदाना, |
निर्माता | भूषण कुमार, क्रिशन कुमार, मुराद खेतानी, प्रणय रेड्डी वंगा |
प्रदर्शित तारीख | १ डिसेंबर २०२३ |
देश | भारत |
भाषा | हिंदी |
“ॲनिमल” चित्रपट समीक्षा :-
२०२३ हे बघता बघता संपलं आणि या वर्षात बरेच चित्रपट प्रदर्शित झाले. परंतु काही चित्रपट इतक्या मोठ्या प्रमाणावर ट्रोल झाले आणि परिणामी बॉक्स ऑफिसवर चांगले चालले. आजकाल ट्रोलिंग हा प्रमोशनचा एक भाग असावा असं वाटतंय. हे सांगण्याचं कारण म्हणजे १ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेला ॲनिमल हा चित्रपट. यातील हिंसक, बीभत्स अशी मारहाणीच्या दृश्यामुंळे आणि इतर बऱ्याच कारणांमुळे हा चित्रपट मोठ्या प्रमाणावर ट्रोल झाला. परंतु तो तेवढाच चालला आणि अजुनही प्रेक्षक चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट बघत आहेत.
ॲनिमल हे चित्रपटाचं नाव सार्थ करण्यासाठी अतिरिक्त हिंसाचार आणि बीभत्सपणाचा इतका भडिमार करावाच लागणार हे बहुधा दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी गृहीत धरून हा चित्रपट बनवला आहे. आतापर्यंतचा सगळ्यात जास्त व्हायोलेन्स या चित्रपटात पहायला मिळेल, किंवा हिंसा काय असते हे तुम्हाला या चित्रपटात कळेल. बरं फक्त हिंसा, द्वेष, राग, रौद्ररूप इतकंच नाही तर अश्लील दृश्य, इंटीमेट सीन्सच्या नावाखाली नको तेवढे बोल्ड सीन्स, सेक्स हे सगळं इतकं या चित्रपटात आहे की कुटुंबासोबत चुकुनही हा चित्रपट तुम्ही बघू शकत नाही.
स्टोरी बद्दल सांगायचं तर रणविजय म्हणजेच आपला द सुपरस्टार (या चित्रपटात त्याने हे सिद्ध केलंय) रणबीर कपूर हा आपल्या वडिलांच्या प्रेमासाठी आसुसलेला असतो. परंतु त्याचे वडील बलबीर सिंह(अनिल कपूर) जे अरबपती आहेत ते आपल्या कामात इतके व्यस्त असतात की त्यांना कुटुंबाकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. परंतु रणविजय हा जीवाचं रान करत असतो की आपल्या वडिलांनी आपल्याला जवळ घ्यावं, वेळ द्यावा, कौतुक करावं परंतु या उलट बलबीर हे नेहमीच त्याला कोणत्या ना कोणत्या कारणाने ओरडत असतात.
परिणामी रणविजय हा त्याच्याही नकळत रागीट, हिंस्र स्वभावाचा बनत जातो. काही कारणाने बापलेकांत भांडणं होतं त्यामुळे विजय आपल्या प्रेमिकेसोबत लग्न करून परदेशी निघून जातो. आणि जेव्हा त्याला कळतं की त्याच्या वडिलांवर हल्ला झालाय तेव्हा तो त्याचा शोध घेण्यासाठी भारतात परत येतो. आता तो हल्ला कोणी केला,का केला, रणविजय ते शोधून काढतो का वैगरे हे सगळं सांगून स्पॉयलर नक्कीच देणार नाही. परंतु आपल्या वडिलांवर गोळी कोणी झाडली याचा शोध आणि बदला घेण्यासाठी रणबीर जे काही स्क्रीन वर जे काही करतो ते केवळ आणि केवळ हिंसक, मन चलबिचल करणारं आहे. तो स्वतःला अल्फा मेल म्हणजेच असा पुरुष जो स्वतःला एका समुहाचा नेता समज असतो. स्त्रियांना एक वापरायची वस्तू समजत असतो. अर्थातच हे सगळं तुम्हाला खटकेल.
चित्रपटात चांगलं काय हे सांगायचं झालं तर रणबीर कपूर चा अभिनय, बॉबी देओल चा जोरदार कमबॅक, तृप्ती डेमरीचा सुंदर अभिनय, मराठमोळा अभिनेता उपेंद्र लिमये याचा छोट्याशा रोलमध्ये पण धमाकेदार अभिनय हे नक्कीच कौतुकास्पद आहे.
तुम्ही मनाने संवेदनशील असाल तर हा चित्रपट तुमच्या साठी नाही. आणि तुम्हाला मारामारी, हिंसक दृश्यं, सेक्स, बोल्ड सीन्स थोडक्यात साऊथ इंडियन चित्रपटांचे तुम्ही शौकीन असाल तर हा चित्रपट तुम्हाला आवडेल. माझ्याकडून मात्र या चित्रपटाला अडीच स्टार.
२. सॅम बहादुर |
लेखक | भवानी अय्यर, शांतनु श्रीवास्तव, मेघना गुलजार |
दिग्दर्शक | मेघना गुलजार |
कलाकार | विकी कौशल, सान्या मल्होत्रा, फातिमा सना शेख, नीरज काबी, मोहम्मद जीशान अय्यूब |
निर्माता | रॉनी स्क्रूवाला |
प्रदर्शित तारीख | १ डिसेंबर २०२३ |
भाषा | हिंदी |
“सॅम बहादुर” चित्रपट समीक्षा :-
१ डिसेंबर २०२३ रोजी ॲनिमल या चित्रपटासोबत प्रदर्शित झालेल्या सॅम बहादुर या चित्रपटाला दुर्दैवाने ॲनिमल चित्रपटाइतकी प्रसिद्धी मिळाली नाही. भारताचे पहिले फिल्ड मार्शल असलेले सॅम होर्मसजी फ्रामजी जमशेदजी माणेकशॉ म्हणजेच सॅम बहादुर यांची जीवनगाथा उलगडून दाखवणारा हा चित्रपट आहे.
राझी या चित्रपटानंतर मेघना गुलजार यांनी प्रेक्षकांच्या भेटीला एका नवीन योद्ध्याची ओळख करून देणारा चित्रपट आणला आहे जो योद्धा एक दोन नव्हे तर तब्बल पाच युद्धामध्ये लढला. चित्रपटाची सुरुवात ही माणेकशॉ यांना सॅम हे नाव कसं पडलं इथून होते. आणि पुढे चित्रपटात अनेक युद्ध, लढायांमधील प्रसंग पहायला मिळतात.
अगदी पश्चिम बंगाल ची निर्मिती होण्यामागे सॅम बहादुर यांचा मोठा वाटा होता. १९४७ साली झालेल्या भारत पाकिस्तान युद्धात सुद्धा सॅम यांचा सहभाग होता. १९६२ साली झालेलं भारत चीन युद्धात सुद्धा सॅम बहादुर सहभागी होते. एकंदरच त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा, कार्याचा आढावा या चित्रपटात मेघना यांनी घेतला आहे.
चित्रपट नक्कीच बघावा असा आहे, परंतु त्यातील प्रसंग अजून एकसंध दाखवता आले असते तर अजून परिणामकारक चित्रपट झाला असता हे नक्की. विकी कौशल याने अक्षरशः सॅम बहादुर पडद्यावर जिवंत केले आहेत. ही भूमिका तो नखशिखांत जगला आहे. त्यांचे डोळे, मिशा त्यांचं चालणं, बोलणं प्रत्येक गोष्ट अगदी हुबेहूब. त्याच्याव्यतिरिक ही भूमिका इतकी चांगली अजून कोणी करू शकलं असतं का ही शंका आहे. सगळ्याच कलाकारांनी अभिनय चांगला केला आहे. तेव्हाच्या काळातील काही प्रसंगाच्या ओरिजनल चित्रफितींचा उपयोग मेघना यांनी सुंदररित्या केला आहे. चित्रपटातील संगीत, पार्श्वसंगीत सिनेमॅटोग्राफी, संकलन, कलादिग्दर्शन, मेकअप सगळंच अफलातून आहे.
हि एक नक्कीच उत्तम कलाकृती आहे. आणि असे चित्रपट लहान मुलांना सुद्धा आवर्जून दाखवले पाहिजेत. माझ्याकडून या चित्रपटाला साडेतीन स्टार.
३. द आर्चीज |
लेखक | जोया अख्तर , रीमा कागती, आयशा देवित्रे ढिल्लों |
दिग्दर्शक | जोया अख्तर |
कलाकार | अगस्त्य नंदा, सुहाना खान, खुशी कपूर, वेदांग रैना, मिहिर आहूजा, युवराज मेंडा, अदिति सैगल, विनय पाठक, अली खान |
निर्माता | जोया अख्तर, रीमा कागती |
प्रदर्शित तारीख | ७ डिसेंबर २०२३ |
भाषा | हिंदी |
“ द आर्चीज” चित्रपट समीक्षा :-
“द आर्चीज” या कॉमिक्स ला भारतीय तडका देऊन चित्रपटाच्या रूपात पुन्हा एकदा त्या कॉमिक्स मधील पात्रं प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहेत दिग्दर्शिका जोया अख्तर यांनी. तुम्हाला जर आर्चीज हे कॉमिक्स आणि त्यातील सात मित्र मैत्रिणी आठवत असतील तर हा चित्रपट तुम्हाला जुन्या आठवणींना उजाळा देणारा ठरेल. नेटफ्लिक्स वर प्रदर्शित झालेला हा चित्रपट इतर चित्रपटांपेक्षा वेगळा आहे.
१९७० च्या आधीचा हा काळ म्हणजेच साठच्या दशकातील आहे. रेवरडेल नावाचं एक पाचेक हजार वस्ती असलेलं गावं आहे जे की एक हिलस्टेशन आहे. या हिलस्टेशन चं मुख्य आकर्षण आहे शहराच्या मधोमध असलेल एक ग्रीन पार्क. ज्या पार्कमध्ये ही मित्र मंडळी भेटायला जमते. आता त्या पार्कवर एक हॉटेल उभं करण्याचा प्रयत्न एका उद्योगपती कडून होत असतो. आणि तोच प्रयत्न हाणून पाडण्यासाठी हे सातजण काय करतात हे या चित्रपटात पहायला मिळतं.
या चित्रपटातची प्रदर्शनापूर्वीच खूप चर्चा होती त्याचं कारण म्हणजे यातील कलाकार. बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान याची मुलगी सुहाना खान, श्रीदेवी ची दुसरी मुलगी खुशी कपूर, आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा यांनी या चित्रपटाद्वारे चित्रपट सृष्टीत पदार्पण केले आहे. यांच्या सुमार अभिनयासाठी ट्रोल सुद्धा करण्यात आलं परंतु चित्रपट बघताना अभिनय अगदीच वाईट नाही असं जाणवतं. अगस्त्य याने आर्ची हे मुख्य पात्र छान रंगवलं आहे. सुहानाने आत्मविश्वास असलेली, हुशार परंतु एक श्रीमंत बिघडलेली मुलगी असं पात्र साकारलं आहे. तिचा अभिनय करण्याचा प्रयत्न बरा होता. खुशीने सुद्धा चांगला अभिनय केला आहे.
चित्रपटाचा पुर्वार्ध जेवढा रंजक वाटतो तेवढा उत्तरार्धात चित्रपट संथ वाटतो. जेव्हा जास्त अपेक्षा किंवा उत्सुकता वाढते तिथं चित्रपट निराशा करतो. एक वेगळा प्रयोग या चित्रपटाच्या निमित्ताने जोया अख्तर यांनी केला आहे. खरं तर या आधी नेटफ्लिक्स वर या कॉमिक्स वर आधारित एक वेबसिरीज प्रदर्शित झालेली आहेच. परंतु हा चित्रपट थोडा वेगळा आहे. आता काय वेगळं आहे यासाठी मात्र चित्रपट बघावा लागेल. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.
४. जोरम |
लेखक | देवाशीष मखीजा |
दिग्दर्शक | देवाशीष मखीजा |
कलाकार | मनोज वाजपेयी, स्मिता तांबे, मोहम्मद झीशान अयूब, मेघना ठाकुर, तनिष्ठा चटर्जी, धनीराम प्रजापति |
निर्माता | शारिक पटेल,आशिमा अवस्थी चौधरी, अनुपमा बोस, देवाशीष मखीजा |
प्रदर्शित तारीख | ८ डिसेंबर २०२३ |
भाषा | हिंदी |
“जोरम” चित्रपट समीक्षा :-
ही कथा दसरू आणि त्याची तीन महिन्यांची आईविना वाढत मुलगी जोरम यांची आहे. आजही आपल्याकडे आदिवासी समाजातील लोकांना काय नरकयातना भोगाव्या लागतात याचं चित्रण या चित्रपटात पहायला मिळतं. मग तो आदिवासी भाग देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात का असेना. दसरू(मनोज वाजपेयी जपेयी) आणि त्याची पत्नी वानो(स्मिता तांबे) हे दोघं मुळचे झारखंड मधील एका आदिवासी पाड्यात राहणारे असतात परंतु ते मुंबईत मजुरी करून जगत असतात. पण एका रात्री एका हल्ल्यात दसरूची पत्नी मरते व दसरू आपल्या तीन महिन्यांच्या मुलीला जोरमला आपल्या पोटाला साडीने बांधून पुन्हा आदिवासी पाड्यात येतो. इथून पुढे जे काही बघायला मिळतं ते बघून हृदय पिळवटून निघतं.
सरकारकडून विकासाच्या नावाखाली होत असलेली निसर्गाची हानी, पर्यावरणाचा खेळखंडोबा, या सगळ्याचा आदिवासी समुहांवर होणारा परिणाम आणि तरीही त्याविरोधात आवाज उठवला तर त्याचे होणारे विपरीत परिणाम या सगळ्यात त्यांची काय फरफट होते हे या चित्रपटात पहायला मिळतं.
देवाशीष मखीजा लिखित आणि दिग्दर्शित जोरम हा चित्रपट समाजाला आरसा दाखवण्याचं काम करतो परंतु समाजाचे सध्या डोळे बंद आहेत आणि मुळात प्रेक्षकांना आता मसालेदार चित्रपट बघायला जास्त आवडतात. त्यामुळे अशा वास्तववादी चित्रण असलेल्या अशा महत्त्वाच्या विषयांवर आधारित चित्रपट लोकांना फारसे आवडत नाहीत.
मनोज वाजपेयी हा एक चतुरस्त्र अभिनेता आहेच परंतु या चित्रपटात त्याने अभिनयाला एका वरच्या स्थानावर नेऊन ठेवले आहे. आणि तेवढ्याच ताकदीचा अभिनय स्मिता तांबे हीने केला आहे. झीशान अय्यूब हा देखील एक गुणी कलाकार आहे. परंतु अशा कलाकारांचं महत्व आणि त्यांची दखल सगळेच उशिरा घेतात ही शोकांतिका आहे. जोरम हा एक मन हेलावून टाकणारा नितांत सुंदर चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला चार स्टार.
५. कडक सिंह |
लेखक | विराफ सरकारी, रितेश शाह, अनिरुद्ध रॉय चौधरी |
दिग्दर्शक | अनिरुद्ध राय चौधरी |
कलाकार | पंकज त्रिपाठी, संजना सांघी,पार्वती टी , जया अहसान, दिलीप शंकर,परेश पाहूजा, वरुण बुद्धदेव |
निर्माता | महेश रामनाथन, विराफ सरकारी,एंड्रे टिमिन्स सब्बास जोसेफ |
प्रदर्शित तारीख | ८ डिसेंबर २०२३ |
भाषा | हिंदी |
“कडक सिंह” चित्रपट समीक्षा :-
८ डिसेंबर रोजी झी फाईव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेला “कडक सिंह” हा चित्रपट म्हणावा तेवढा “कडक” निघाला नाही. मुख्य भूमिकेत पंकज त्रिपाठी , पिंक सारख्या चित्रपटाचं दिग्दर्शन करणारा दिग्दर्शक अनिरूद्ध राय चौधरी, आणि पिंक, कहाणी, एअरलिफ्ट सारख्या चित्रपटांची पटकथा लिहिणारे रितेश शाह हे तिघं असल्यावर नक्कीच काहीतरी कडक आणि अफलातून बघायला मिळणार ही अपेक्षा होती. ट्रेलर नंतर हा नक्की काय सस्पेन्स आहे हि उत्सुकता होती परंतु चित्रपट पाहिल्यानंतर तुमचा भ्रमनिरास होऊ शकतो.
आर्थिक गुन्हेगारी विभागातील ए.के. सिंह हा एक अधिकारी चिंट फंड घोटाळा सारख्या महत्त्वाच्या केस वर काम करत असताना अचानक त्याच्याच कार्यालयात आत्महत्या करतो. परंतु सुदैवाने तो वाचतो परंतु त्याची स्मृती मात्र जाते. त्याचा भुतकाळ त्याला पुर्णपणे आठवत नाहीय. दोन मुलांपैकी एकाला ओळखतो तर आपल्याला मुलगी आहे हे मात्र त्याला आठवत नाहीय.
तर आता सस्पेन्स हाच आहे की तो आत्महत्या का करतो.? त्याच्या आजुबाजुचे त्याचा भुतकाळ सांगत असल्यापैकी नक्की खरं काय.? पण हा सगळा सस्पेन्स जेवढा हवा तेवढा शेवटपर्यंत टिकून राहत नाही. पटकथा कुठेतरी कमी पडल्याचं जाणवतं. पंकज त्रिपाठी सारखा चतुरस्त्र अभिनेता असताना दिग्दर्शकाने त्यांच्याकडून अजून काहीतरी चांगलं करून घ्यायला हवं होतं असं वाटतं. एकंदरच ठिकठाक म्हणावा असा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.
६. मस्त मे रेहने का |
लेखक | विजय मौर्या |
दिग्दर्शक | विजय मौर्या |
कलाकार | जैकी श्रॉफ, नीना गुप्ता , अभिषेक चौहान , मोनिका पवार,राखी सावंत, फैसल मलिक |
निर्माता | पायल अरोड़ा, विजय मौर्या |
प्रदर्शित तारीख | ८ डिसेंबर २०२३ |
भाषा | हिंदी |
“मस्त मे रेहने का” चित्रपट समीक्षा :-
चित्रपटाच्या नावावरून लक्षात आलंच असेल की चित्रपटाची कथा काय असू शकते. कोणत्याही परिस्थितीत छान, आनंदी आयुष्य जगता आलं पाहिजे हेच या चित्रपटातून सांगण्याचा प्रयत्न लेखक दिग्दर्शक विजय मौर्या यांनी केला आहे.
ॲमेझॉन प्राईम वर प्रदर्शित झालेला “मस्त मे रेहने का” हा चित्रपट फक्त वयस्कर किंवा एकट्या राहणाऱ्या लोकांसाठी आहे असं नाहीय. सगळ्या वयातील सगळ्यांनीच हा चित्रपट बघावा असा आहे. आयुष्यात जेव्हा एकटेपण येतं तेव्हा रडत न बसण्यापेक्षा हसतखेळत आयुष्य कसं जगावं हे सांगणारा हा चित्रपट आहे. जॅकी श्रॉफ आणि नीना गुप्ता यांची केमिस्ट्री विशेष भावते.
चित्रपटाची कथा मुख्य दोन जोड्यांभोवती फिरते ज्यांचं तसं एकमेकांशी काही नातं नाहीय. कामत हे एक वयस्कर गृहस्थ म्हणजेच जॅकी श्रॉफ हे एकटेच राहत असतात. त्यांची रोजची दिनचर्या ठरलेली असते. एकदा त्यांच्या घरात अभिषेक चौहान नावाच्या चोराने त्यांच्या घरात चोरी केल्यावर ते सतर्क होतात आणि अशा एकट्या राहणाऱ्या लोकांना एकत्र घेऊन काहीतरी केलं पाहिजे त्यादृष्टीने पावलं उचलतात.
एकीकडे प्रकाश कौर म्हणजेच नीना गुप्ता या आपल्या मुलासोबत भांडून भारतात परत एकट्याच आल्या आहेत. त्या बिनधास्त, बोल्ड आयुष्य जगत असतात. त्यांची आणि कामत यांची सुरूवातीला तू तू मैं मैं झाल्यावर पुढे छान मैत्री होते. परंतु या दोघांचं आणि कामत यांच्याकडे चोरी करणाऱ्या अभिषेक चं काय कनेक्शन ही एक वेगळीच गोष्ट.
मोजक्या कलाकारांना घेऊन एक हलकीफुलकी अशी ही कथा आहे. फार मसाला नसला तरीही मनोरंजन करणारा हा चित्रपट नक्कीच आहे. राखी सावंत, प्रियदर्शन जाधव, उदय सबनीस या मराठमोळ्या कलाकारांच्या छोट्या पण महत्वपूर्ण भूमिका सुंदर झाल्या आहेत.
एकंदरच हा चित्रपट एकदा बघायला हवा असा आहे. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.
७. कैसी ये डोर |
लेखक | रत्ना नीलम पांडे |
दिग्दर्शक | रत्ना नीलम पांडे, संदीप चौधरी |
कलाकार | ब्रिजेंद्र काला, सुनीता राजवर, अश्वत्थ भट, निखिल पांडे, रत्ना निखिल पांडे, जश्न अग्निहोत्री |
निर्माता | कोमल पाटील, रोहित पाटील |
प्रदर्शित तारीख | १५ डिसेंबर २०२३ |
भाषा | हिंदी |
“कैसी ये डोर” चित्रपट समीक्षा :-
हल्ली प्रेमविवाह करण्याचं प्रमाण वाढत आहे. परंतु काही ठिकाणी आजही पारंपरिक पद्धतीने बोलणी करून लग्न ठरवणे वैगरे सगळं केलं जातं. आईवडील म्हणतील ती पूर्व दिशा. आईवडील म्हणतील त्याच मुलाशी किंवा मुलीशी लग्न लावून दिलं जातं. मग त्यानंतर ते लग्न यशस्वी होणं न होण्याची जबाबदारी सुद्धा त्यांचीच असते. अशाच एका जबरदस्तीने लावून दिलेल्या आणि फसलेल्या लग्नाची ही गोष्ट आहे. रत्ना नीलम पांडे लिखित आणि दिग्दर्शित हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला खरा परंतु तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला असता तरी चाललं असतं.
बनारस मधील त्रिपाठी कुटुंबाची ही गोष्ट आहे. सब इन्स्पेक्टर असलेल्या त्रिपाठी यांचा मुलगा अभिमन्यू हा एक टुरिस्ट गाइड म्हणून काम करत असतो. हे काम करत असताना त्याचं अमेरिकेतून आलेल्या रश्मी नावाच्या टुरिस्ट वर प्रेम जडतं. अर्थातच त्या दोघांचं प्रेम फुलत असतं. घरातील वातावरण आणि एकीकडे अभिच्या घरचे त्याचं लग्न विद्या सोबत ठरवत असतात. आणि एक दिवस अचानक रश्मी परत निघून जाते. आता पुढे काय होतं ते बघण्यासाठी मात्र तुम्हाला हा चित्रपट बघावा लागेल. संगीत, पार्श्वसंगीत, सिनेमॅटोग्राफी, स्क्रीन प्ले, सगळंच ठिकठाक आहे. तांत्रिकदृष्ट्या हा चित्रपट बऱ्याच ठिकाणी फसलेला दिसतो. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार.
८. डंकी |
लेखक | राजकुमार हिरानी, अभिजात जोशी, कणिका धिल्लन |
दिग्दर्शक | राजकुमार हिरानी |
कलाकार | शाहरुख खान, तापसी पन्नू, विक्की कौशल, बोमन इराणी, विक्रम कोचर, अनिल ग्रोवर |
निर्माता | राजकुमार हिरानी |
संगीत | प्रीतम, अमन पंत |
प्रदर्शित तारीख | २१ डिसेंबर २०२३ |
देश | इंडिया |
भाषा | हिंदी |
“डंकी” चित्रपट समीक्षा :-
राजकुमार हिरानी दिग्दर्शीत शाहरुख खानच्या “डंकी” चित्रपटाचा जेवढा डंका वाजला होता त्यामानाने प्रेक्षकांना हा चित्रपट फारसा आवडलेला नाही. खरं तर राज कुमार हिराणी म्हटलं की एक चांगली कलाकृती बघायला मिळणार याची खात्री असते, परंतु यावेळी मात्र त्यांचा “डंकी” चा डाव नक्कीच फसला.
चित्रपटाची कथा ही अवैध मार्गाने परदेशात प्रवास करणं किती धोकादायक आहे, किंवा या प्रवासात काय काय अडचणी येतात यावर आधारित आहे. तसंच मानवी तस्करी या मुद्द्यावर सुद्धा हा चित्रपट उजेड टाकतो.
पंजाब मधील तीन मित्र अवैध मार्गाने म्हणजेच बेकायदेशीर प्रवास करत ब्रिटनला जातात. अशा प्रकारच्या प्रवासाला “डॉंकी रूट” ने प्रवास करणं असं म्हणतात. हा प्रवास सुखकर करून त्यांना ब्रिटनला पोहचवण्याची जबाबदारी हार्डी म्हणजेच आपल्या शाहरुख खान वर असते. मनू(तापसी पन्नू), बल्ली(अनिल ग्रोव्हर), बलिंदर(विक्रम कोच्चर) या तिघांना व्हिसा मिळवण्यासाठी असणाऱ्या परिक्षेत उत्तीर्ण होता येत नाही आणि त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे व्हिसा मिळत नाही. म्हणुनच त्यांना हार्डी ची मदत घेऊन हा बेकायदेशीर प्रवास किंवा स्थलांतर करावं लागतं. आता हा प्रवास त्यांचा कसा होतो, ते सुखरूप पोहचतात का? तिकडे गेल्यावर त्यांना काय काय अडचणींना तोंड द्यावं लागतं या सगळ्याचा प्रवास म्हणजे या चित्रपटाची कथा.
चित्रपटाची कथा, दिग्दर्शन, संवाद, स्क्रीन प्ले हे सगळं बघताना हा चित्रपट हिराणी यांचा आहे हे विसरायला होतं. एकंदरच ठिकठाक श्रेणीतील हा चित्रपट आहे. शाहरुख खान याने आपलं वाढतं वय आता स्विकारायला हवं. त्याचा अभिनय, पडद्यावरचा वावर नक्कीच चांगला आहे. तापसीने चांगला अभिनय केला आहे. शाहरुख चे फॅन असाल तर हा चित्रपट तुम्ही एंजॉय करू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.
९. ड्राय डे |
लेखक | सौरभ शुक्ला |
दिग्दर्शक | सौरभ शुक्ला |
कलाकार | जितेंद्र कुमार, श्रिया पिळगांवकर, अन्नू कपूर, सुनील पलवल |
निर्माता | एम ए एंटरटेनमेंट |
प्रदर्शित तारीख | २२ डिसेंबर २०२३ |
भाषा | हिंदी |
“ड्राय डे” चित्रपट समीक्षा :-
आजकाल बरेचसे चित्रपट थेट चित्रपटगृहात प्रदर्शित न होत ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होतात. बऱ्याच वेळा चित्रपटांना स्क्रीन मिळत नाही, किंवा चित्रपट ठिकठाक असतात तेव्हा ते ओटीटी वर येतात. बऱ्याचदा असे चित्रपट प्रेक्षकांना बघता येत नाही किंवा असे चित्रपट प्रदर्शित झालेत हे कळत नाही. त्यापैकीच एक म्हणजे आता २२ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेला श्रिया पिळगांवकर आणि जितेंद्र कपूर यांचा “ड्राय डे”.
ड्राय डे हा चित्रपट तसा मनोरंजन करण्यात ड्राय पडला असं म्हणू शकतो. एका दारूड्या राजकारणी कार्यकत्याची ही गोष्ट आहे. जग्गू(जितेंद्र कुमार) हा दाऊजी(अन्नु कपूर) या नेत्यासाठी काम करणारा हाडाचा कार्यकर्ता असतो. दाऊजी म्हणतील ती पूर्व दिशा आणि ते सांगतील ते आज्ञा पाळण्याचं काम तो करत असतो. परंतु तो प्रचंड प्रमाणात दारू पिणारा असतो. म्हणूनच त्याची बायको निर्मला(श्रिया पिळगांवकर) त्याला दारू सोडण्यासाठी धमकी देते.
त्यानंतर जग्गू ती धमकी इतकी मनावर घेतो की संपूर्ण गावात दारूबंदी लागू करण्यासाठी आमरण उपोषणाला वैगरे बसतो. आता ती धमकी काय? त्याची मागणी पूर्ण होते का.? तो खरंच दारू सोडतो का.? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे या चित्रपटात मिळतील. अन्नू कपूर यांनी साकारलेले दाऊजी नक्कीच चांगले आहेत. परंतु एकंदर चित्रपटाची कथा फार रटाळ आणि संथपणे पुढे सरकते. नवीन असं काही बघायला मिळत नाही परंतु एकदा बघायला हरकत नाही.
जर शिव्या सहन होत असतील तर संपूर्ण कुटुंबासोबत बघता येईल असा हा एक सामाजिक संदेश देणारा हा ठिकठाक असा विनोदी चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.
१०. खो गये हम कहां |
लेखक | जोया अख्तर,अर्जुन वरैन सिंह, रीमा कागती |
दिग्दर्शक | अर्जुन वरैन सिंह |
कलाकार | सिद्धांत चतुर्वेदी,आदर्श गौरव,अनन्या पांडे, रोहन गुरबख्शानी, कल्कि केकलां, विजय मौर्या, आन्या सिंह |
निर्माता | फरहान अख्तर,रितेश सिधवानी,जोया अख्तर, रीमा कागती |
प्रदर्शित तारीख | २२ डिसेंबर २०२३ |
भाषा | हिंदी |
“खो गये हम कहां” चित्रपट समीक्षा :-
आजकालची तरुण पिढीच नव्हे तर वयस्कर मंडळी सुद्धा आपल्या दिवसाची सुरुवात व्हॉट्सॲप वर गुड मॉर्निंग ते रात्री गुड नाईटचे मेसेज फॉरवर्ड करून करतात. थोडक्यात आता सगळ्यांनाच मोबाईल, सोशल मीडियाचं व्यसन लागल्यासारखं झालंय. या आभासी दुनियेत काय खरं काय खोटं याची शहानिशा न करता सगळे या सोशल मीडिया वर आपला आनंद शोधण्यासाठी हरवून गेले आहेत. याच धर्तीवर दिग्दर्शक अर्जुन वरैन सिंह यांचा खो गये हम कहां हा चित्रपट २२ डिसेंबर रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे.
असं म्हणतात की एक मुलगा आणि एक मुलगी यांच्यात फक्त मैत्री कधी असूच शकत नाही. आणि हेच विधान खोडून काढणारा हा चित्रपट आहे. हि कथा तीन मित्रांची आहे. त्यापैकी आहाना(अनन्या पांडे) आणि इमाद(सिद्धांत चतुर्वेदी) हे दोघं एकाच फ्लॅट मध्ये राहत असतात. विशेष म्हणजे एकत्र राहून सुद्धा या दोघांमध्ये फक्त मैत्रीचं नातं असतं. त्यांचा तिसरा मित्र नील(आदर्श गौरव) हा एक जिम ट्रेनर असतो आणि त्याला स्वतःची जिम चालू करायची असते जिथे अहाना त्याला मदत करणार असते.
इमाद एक स्टॅण्ड अप कॉमेडियन असून तो श्रीमंत असतो. वरवर पाहता तिघांचं आयुष्य चांगलं चालू आहे परंतु प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही समस्या आहेत. जे हवंय ते मिळत नाहीय. आणि या सगळ्यात ते नक्की काय करतात, आनंद मिळवण्यासाठी कुठे हरवतात, त्यांचं प्रेम, मैत्री या सगळ्यात काय अडचणी येतात याची गोष्ट म्हणजे हा चित्रपट. आयुष्य जगताना स्वतःसाठी कमी पण सोशल मीडिया वर स्वतःची इमेज चांगली आकर्षक ठेवण्यासाठी आताची पिढी जास्त प्रयत्न करते हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
विशेष म्हणजे या चित्रपटात तुम्हाला एक सरप्राइज पॅकेज मिळतं ते म्हणजे अनन्या पांडे चा अभिनय. आजपर्यंतच्या तिच्या चित्रपटांपैकी या चित्रपटात चांगलं काम केलं आहे. एकंदर आजच्या पिढीला आपली वाटेल अशी चित्रपटाची कथा आहे. दिग्दर्शन आणि संवाद प्रभावी आहेत. एकदा बघायला हवा असा हा चित्रपट आहे. नेटफ्लिक्स वर हा चित्रपट तुम्ही बघू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.
११. सफेद |
लेखक | संदिप सिंह |
दिग्दर्शक | संदिप सिंह |
कलाकार | मीरा चोपड़ा, अभय वर्मा,बरखा बिष्ट,छाया कदम, जमील खान |
निर्माता | संदीप सिंह, विशाल गुरनानी,जूही पारेख मेहता, जफर मेहदी |
प्रदर्शित तारीख | २९ डिसेंबर २०२३ |
भाषा | हिंदी |
“सफेद” चित्रपट समीक्षा :-
समाजाची एक काळी बाजू दाखवण्याचा प्रयत्न आपल्या “सफेद” या चित्रपटातून दिग्दर्शक संदीप सिंह यांनी केला आहे. २९ डिसेंबर २०२३ रोजी झी फाईव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेला सफेद या चित्रपटातून विधवा स्त्रीया आणि तृतीयपंथी यांचं समाजात काय स्थान आहे आणि त्यांचं एकंदर वैयक्तिक आयुष्य कसं असतं हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. कायद्याने मान्यता दिली तरी समाजाने मात्र तृतीयपंथी लोकांना स्वीकारलं नाही. तसंच समाज कितीही पुढारलेल्या विचारांचा असला तरी विधवा स्त्रियांसाठी अजुनही काही नियम, बंधनं आहेतच हेच सांगण्याचा प्रयत्न दिग्दर्शक संदीप सिंह यांनी केला आहे. या चित्रपटाचं लेखन सुद्धा संदिप सिंह यांनी केलं आहे.
नुकतंच वैधव्य नशिबी आलेली काली ही कारणांमुळे घर सोडून एका संस्थेत दाखल होते. ते कारण काय ते दाखवण्यात दिग्दर्शक कमी पडले. असो, तर ही काली विधवा झाल्यामुळे स्वतःच्या जिवाला कंटाळून नदीत उडी मारून आत्महत्या करण्याचा विचार करते. तेव्हाच तिला चंडी भेटतो जो एक तृतीयपंथी असतो. परंतु ही गोष्ट कालीला माहीत नसते. चंडी सुद्धा जीव देण्यासाठीच आलेला असतो कारण मनाविरुद्ध देहविक्री करणं त्याला मान्य नसतं. दोघांमध्ये ओळख होते. पुढे जाऊन प्रेम होतं. आपल्याला आयुष्य जगण्याचं कारण मिळालं असं वाटतं.
परंतु जेव्हा कालीला चंडीबद्दल खरं काय आहे ते कळतं तेव्हा ती त्याचा स्वीकार करते का.? तृतीयपंथी लोकांबद्दल घृणा असलेली काली पुढे काय करते हे बघण्यासाठी हा चित्रपट तुम्हाला बघावा लागेल.
कालीची भुमिका साकारणारी मीरा चोपडा आणि चंडीची भूमिका साकारली आहे तो अभय वर्मा या दोघांनी आपल्या भुमिकेला योग्य तो न्याय दिला आहे. परंतु सहकलाकारांचा अभिनय ठिकठाक आहे. संवाद कमी आणि शिव्यांचा जरा जास्तच भडीमार केला आहे. लोकेशन्स, सिनेमॅटोग्राफी, स्क्रीन प्ले आणि तांत्रिक गोष्टींमध्ये हा चित्रपट नक्कीच कमी पडला आहे. विषय चांगला असला तरी चित्रपटाची मांडणी काही खास नाही. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.
तर मंडळी यापैकी कोणते चित्रपट तुम्ही पाहीलेत आणि कोणते आवडलेत हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा
“ नवीन वर्षाच्या “जगभरून” तर्फे तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.!”
हे पण वाचा :-
फेब्रुवारी २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी
फेब्रुवारी २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी
मार्च २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी
मार्च २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी
एप्रिल २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी
एप्रिल २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी
मे २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी
मे २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी
जून २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी
जून २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी
जुलै २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी
जुलै २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी
ऑगस्ट २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी
ऑगस्ट २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी
सप्टेंबर २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी
सप्टेंबर २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी
ऑक्टोबर २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी
ऑक्टोबर २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी
नोव्हेंबर २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी
नोव्हेंबर २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी