HomeFilmsHindi

नोव्हेंबर 2024 मध्ये रिलीझ झालेल्या हिंदी चित्रपटांची यादी आणि चित्रपटांची समीक्षा

नोव्हेंबर 2024 मध्ये रिलीझ झालेल्या हिंदी चित्रपटांची यादी आणि चित्रपटांची समीक्षा | List of Hindi Movies released in November 2024 and Movie Reviews

Written by : आकांक्षा कोलते

Updated : डिसेंबर 24, 2024 | 11:18 PM

नोव्हेंबर २०२४ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेले हे हिंदी चित्रपट तुम्ही पाहीलेत का?

खरं तर आता वेबसिरीज चा जमाना असल्यामुळे प्रेक्षकांच्या चित्रपटांच्या बाबतीत अपेक्षा वाढल्या आहेत. त्यातही नवीन आलेल्या चित्रपटांमध्ये ओरिजनल कंटेट कमीच असतो. बरेच चित्रपट हे रिमेक असतात. त्यामुळे चित्रपटगृहात प्रेक्षकांना खेचून आणणं हे आता निर्माते आणि दिग्दर्शक यांच्यापुढे नवीन आव्हान आहे. आता प्रेक्षकांच्या चित्रपटांच्या बाबतीत असलेल्या अपेक्षा पूर्ण होतायत की नाही हे आमच्या परीने सांगण्याचा प्रयत्न या लेखात आम्ही करणार आहोत.
आज या लेखात नोव्हेंबर महिन्यात प्रदर्शित झालेले चित्रपट कोणते आहेत आणि बघायला हवेत की नको याबद्दल आमचं मत सांगणार आहोत.

List of Hindi Movies released in November 2024 and Movie Reviews
१. भूलभुलैया ३ (Bhool Bhulaiyaa 3)
२०२४. विनोदी, भयपट. २ तास ३८ मिनिटे. [U/A]
लेखक आकाश कौशिक
दिग्दर्शकअनीस बज्मी, विक्रमादित्य मोटवानी
कलाकारमाधुरी दीक्षित, विद्या बालन, कार्तिक आर्यन, तृप्ति डिमरी, राजपाल यादव, विजय राज, संजय मिश्रा, अश्वनी कलेकर, राजेश शर्मा, अरुण कुशवाह
निर्माताभूषणकुमार, कृष्णकुमार, मुराद खेतानी
रिलीज तारीख१ नोव्हेंबर २०२४
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.०⭐/ ५

भूलभुलैया ३” चित्रपट समीक्षा :-

२००७ साली आलेली मंजुलिका आजही लोकांच्या डोक्यात आहे. अक्षय कुमारचा खळखळून हसवणारा भूलभुलैया हा चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता.
त्यानंतर दुसऱ्या भागात सुद्धा कार्तिक आर्यनला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. आणि आता भूलभुलैया ३ मध्ये कार्तिक आर्यनसोबत माधुरी दीक्षित, विद्या बालन आणि तृप्ती डिमरी असा ट्रिपल धमाका आहे. सोनू निगमच्या आवाजातील मेरे ढोलना हे गाणं या चित्रपटाचं खास आकर्षण आहे.
चित्रपटाची कथा किंवा मध्यांतरापर्यंतचा चित्रपट हा लॉजिक बाजूला ठेवून बघावा लागेल. रक्तघाट राज्यातील एका मोठ्या महालातील मंजुलिकाचं भूत घालवण्यासाठी राजकुमारी मीरा (तृप्ती डिमरी) ही मांत्रिक रुहान उर्फ रूह बाबाला (कार्तिक) घेऊन येते. परंतु हा रूह बाबा एक नकली बाबा असून त्याला भूतांची भाषा वैगरे असलं काहीही येत नसतं. त्यात ट्विस्ट म्हणजे २०० वर्ष जुन्या असलेल्या या महालातील मंजुलिकाचा आत्मा कैद केलेल्या खोलीचा दरवाजा उघडल्यावर त्यातून एक नाही तर दोन मंजुलिका बाहेर पडतात. आता त्यापैकी खरी कोण हे बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल.
चित्रपटात अर्थात हॉरर सोबत कॉमेडी आहे. विद्या बालनचं काम नेहमीप्रमाणे छान आहे. परंतु माधुरी दीक्षित कडून ज्या अपेक्षा असतात त्या पूर्ण होत नाहीत. कार्तिक आर्यनचा अभिनय म्हणजे अक्षय कुमारची कॉपी वाटते. खूप कमी सीन्स मध्ये कार्तिक आर्यनचा स्वतःचा अभिनय बघायला मिळतो. चित्रपटाची कथा सुरूवातीला फारच भरकटलेली वाटते, परंतु शेवटचा क्लायमॅक्स चांगला असल्यामुळे चित्रपट तरून गेला असं म्हणू शकतो. काही जणांना हा चित्रपट खूप आवडू शकतो तर ज्या लोकांना लॉजिक लागतं त्या प्रेक्षकांसाठी हा चित्रपट म्हणजे वेस्ट ऑफ टाईम आणि वेस्ट ऑफ मनी असा आहे. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.


२. सिंघम अगेन (Singham Again)
२०२४. ॲक्शन, ड्रामा. २ तास २४ मिनिटे. [U/A]
लेखक क्षितिज पटवर्धन, यूनुस सजावल, संदीप साकेत,अनुषा नंद कुमार, अभिजीत खुमन, शांतनु श्रीवास्तव, मिलाप झावेरी, विधि घोड़गांवकर, रोहित शेट्टी
दिग्दर्शकरोहित शेट्टी
कलाकारअजय देवगन, अक्षय कुमार, रणवीर सिंह, दीपिका पादुकोण, करीना कपूर खान, टाइगर श्रॉफ, जैकी श्रॉफ, अर्जुन कपूर
निर्माताअजय देवगन, ज्योति देशपांडे, रोहित शेट्टी
रिलीज तारीख१ नोव्हेंबर २०२४
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.०⭐/ ५

“सिंघम अगेन” चित्रपट समीक्षा :-

एखादा पदार्थ चवदार होण्यासाठी काही मसाले टाकले जातात पण उगीच नको तेवढे मसाले टाकले तर तो पदार्थ दिसायला चांगला झाला तरी बेचव होतो, मुळ चव गायब होते. तसंच काहीसं सिंघम अगेन या चित्रपटाच्या बाबतीत झालेलं आहे.
अजय देवगण याची सिंघम म्हणून एक प्रतिमा लोकांच्या मनात अढळ झालेली आहे. परंतु या चित्रपटात इतर कलाकारांचा इतका भरणा झाला की अजय देवगण च्या वाट्याला भूमिकाच कमी आली. त्यात कथा पटकथा लिहायला इतक्या लेखंकांची फौज इतकी की पटकथा गडबडलेली दिसते.
यावेळी रामायणाचा संदर्भ घेऊन कथा लिहिली गेली आहे. बाजीराव सिंघम(अजय देवगण) हा काश्मीर मध्ये ड्युटी साठी तैनात असून त्याने एक खतरनाक अतिरेकी पकडलेला असतो. परंतु त्याला पकडल्यावर कळतं की म्होरक्या कोणी अजून वेगळाच आहे. नंतर सिंघमच्या पत्नीचं अवनी(करिना कपूर) हिचं अपहरण झाल्यानंतर सिंघमची पूर्ण सेना अवनी ला सोडविण्यासाठी जीवाचं रान करते. आता अर्थात ज्याप्रमाणे रावणाने सीतेचे हरण केले होते तसंच अवनीचं अपहरण झालेलं असतं. त्यामुळे पुढे काय होणार हे आधीच कळतं.
अभिनयाच्या बाबतीत बोलायचं झालं तर अजय देवगण आणि रणवीर सिंग यांच्यामुळे मनोरंजन होतं. बाकी कलाकार त्यांचं त्यांचं काम करून जातात. ॲक्शन सीन्स चांगले आहेत. गाणी, संगीत, पटकथा सगळंच फसलेलं आहे. सलमान खानच्या कॅमिओ मुळे बरेच जण खुश होते परंतु चित्रपटगृहात गेल्यावर त्यांच्या पदरी निराशाच पदरी आली. अर्जुन कपूर ची संवादफेक वगळता ॲक्टिंग जरा बरी आहे. असो, एकंदर फसलेला चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.


३. विजय ६९ (Vijay 69)
२०२४. ड्रामा. १ तास ५२ मिनिटे. [U/A]
लेखक अक्षय रॉय, अब्बास टायरवाला
दिग्दर्शकअक्षय रॉय
कलाकारअनुपम खेर, चंकी पांडे, गुड्डी मारुति, अद्रिजा सिन्हा, परितोष संड, व्रजेश हीरजी, मिहिर आहूजा
निर्मातामनीष शर्मा
रिलीज तारीख८ नोव्हेंबर २०२४
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.२⭐/ ५

विजय ६९” चित्रपट समीक्षा :-

विजय ६९ हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्म वर ८ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झालेला असून अनुपम खेर यांची यात मुख्य भूमिका आहे. जिद्द असेल तर स्वप्न पूर्ण करण्यासाठी वयाचं बंधन वा अडचण नसते हे दाखवून देणारा हा एक प्रेरणादायी चित्रपट आहे.
वय वर्षे ६९ असलेले विजय मॅथ्यू हे एक जलतरणपटू असतात. परंतु आपल्या पत्नीच्या निधनानंतर ते कोलमडून जातात आणि एके दिवशी दारूच्या नशेत समुद्र किनारी जातात ते परत येतच नाहीत. त्यांनी आत्महत्या केली असावी असं घरच्यांना वाटतं परंतु त्यांच्याच शोकसभेत ते हझर झाल्यावर खरं काय ते कळतं. या दरम्यान आपल्या शोकसभेत बोलण्यासाठी लोकांकडे काहीच नव्हतं, आपलं काहीच कर्तृत्व नाही याची जाणीव झाल्यावर विजय मॅथ्यू एका वेगळ्याच जिद्दीने पेटून उठतात. ते ट्रायथलॉन’ स्पर्धेत सहभागी होण्याचं ठरवतात. दीड किलोमीटर पोहोणं, चाळीस किलोमीटर सायकल चालवणं आणि दहा किलोमीटर धावणं अशी ही ‘ट्रायथलॉन’ पूर्ण करणारा पहिला वहीला वयोवृद्ध भारतीय असा विक्रम त्यांना करायचा असतो.
आता त्यांचं हे स्वप्न पूर्ण होतं की नाही हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल. चित्रपटाचा विषय नक्कीच चांगला आहे परंतु कथानक तेवढ्या सक्षमपणे मांडण्यात दिग्दर्शक कमी पडले. अनुपम खेर यांचा अभिनय नेहमीप्रमाणेच अवाक करणारा आहे. परंतु एकंदर चित्रपट खूप लांबलेला आणि अतिशयोक्ती वाटेल इतपत खेचलेला वाटतो. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.


४. एल्ला
२०२४. साहसी, कल्पना. १ तास ३१ मिनिटे. [U/A]
लेखक रोशन फर्नांडिस
दिग्दर्शकरोशन फर्नांडिस
कलाकारमकरंद देशपांडे, इशा तलवार, सरण्या शर्मा
निर्माताप्रतिक शेट्टी, किशोर कुमार पुत्तूर, उदय शेट्टी, वोल्से तौरो
रिलीज तारीख८ नोव्हेंबर २०२४
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.८⭐/ ५

एल्ला” चित्रपट समीक्षा :-

८ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झालेला एल्ला हा चित्रपट रोशन फर्नांडिस यांनी दिग्दर्शित केलेला असून या चित्रपटाची कथा सुद्धा त्यांनीच लिहिली आहे. या चित्रपटाचं प्रमोशन न झाल्याने असेल कदाचित परंतु हा चित्रपट आला आहे हेच माहीत नसल्याने प्रेक्षकांनीही या चित्रपटाकडे पाठ फिरवली.
चित्रपटाची कथा पटकथा अगदीच ठिकठाक आहे. एल्ला नावाच्या ९ वर्ष मुलीची ही गोष्ट आहे. तिच्या अचानक गायब होण्याने चित्रपटाची सुरुवात होते. चित्रपटाची संपूर्ण कथा एल्ला आणि तिच्याकडे असलेल्या एका कासवाभोवती फिरते. या कासवामुळे एल्लाच्या मागे अख्खी पोलिस यंत्रणा, गुंडांची टोळकी, मोठमोठे क्रिमिनलल्स सगळे लागलेले असतात. असं त्या कासवामध्ये विशेष काय असतं.? ते कासव तिच्याकडेच असतं की हरवतं.? एल्ला सापडते का.? ती अचानक गायब कशी होते.? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे या चित्रपटात मिळतील.
चित्रपटाची कथा फार काही विशेष नाही. दिग्दर्शन सुद्धा सुमार आहे. कलाकारांचा अभिनय बरा आहे. एकंदर मनोरंजन करण्यात हा चित्रपट अगदीच ठिकठाक आहे. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार.


५. ख्वाबों का झमेला (Khwaabon Ka Jhamela)
२०२४. ड्रामा. १ तास ५३ मिनिटे. [A]
लेखक दानिश असलम, हैरी बावेजा, अर्पिता चटर्जी, विकी बाहरी
दिग्दर्शकदानिश असलम
कलाकारप्रतीक बब्बर, सयानी गुप्ता, कुबरा सैत
निर्माताज्योति देशपांडे, पम्मी बावेजा, हैरी बावेजा, विकी बाहरी
रिलीज तारीख८ नोव्हेंबर २०२४
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.४⭐/ ५

“ख्वाबों का झमेला” चित्रपट समीक्षा :-

आजकाल निर्माते दिग्दर्शक यांना जेव्हा खात्री असते की चित्रपट चालणार नाही तेव्हा ते चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित न करता ओटीटी वर प्रदर्शित करून शहाणपणाचा निर्णय घेतात. दानिश असलम दिग्दर्शित “ख्वाबों का झमेला” हा चित्रपट त्यापैकीच एक. राज बब्बर आणि स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतिक बब्बर हा या चित्रपटाचा नायक आहे.
चित्रपटाची कथा जुबिन(प्रतिक बब्बर) या युवकाची आहे. ज्याचं शेहनाज नावाच्या मुलीवर प्रेम असतं किंबहुना ती त्याची गर्लफ्रेंड असते. या जुबिनचं लंडनला जाण्याचं स्वप्न असतं परंतु त्याच्याकडे तेवढा आत्मविश्वास नसतो. तो शेहनाजला आपल्या सोबत यावं म्हणून विचारतो परंतु जुबिनमध्ये असलेल्या काही कमतरतेमुळे शेहनाज नकार देते. आता जुबिन लंडनला जातो का.? तिकडे गेल्यावर त्याला अजून कोण भेटते का.? त्याच्यात आत्मविश्वास निर्माण होतो का.? पुढे काय होतं हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
हा एक रोमॅंटीक असा चित्रपट असून स्वतःचा शोध घेणाऱ्या तरुणाईची गोष्ट यात बघायला मिळते. आजच्या तरुण पिढीला आवडेल असा हा चित्रपट आहे. फार अपेक्षा नसताना चित्रपट बऱ्यापैकी मनोरंजन करतो. दिग्दर्शन बरं आहे. अभिनय सुद्धा ठीक आहे. एकंदर वेळ असेल तर बघायला हरकत नाही असा हा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.


६. द साबरमती रिपोर्ट
२०२४. ड्रामा, हिस्टोरिकल. २ तास ३ मिनिटे. [U/A]
लेखक अविनाश सिंग तोमर, अर्जुन भंडेगावकर
दिग्दर्शकधीरज सरना
कलाकारधीविक्रांत मेस्सी, राशी खन्ना, रिधी डोगरा
निर्माताएकता आर कपूर, शोभा कपूर, अमूल मोहन, अंशुल मोहन
रिलीज तारीख१५ नोव्हेंबर २०२४
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.५⭐/ ५

द साबरमती रिपोर्ट” चित्रपट समीक्षा :-

“द साबरमती रिपोर्ट” हा चित्रपट १५ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला असून विक्रांत मेस्सी च्या या चित्रपटाची आधीपासूनच खूप चर्चा होती. खुद्द भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा चित्रपट बघावा असं आवाहन पर ट्विट केलेलं होतं. काही राज्यांमध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला परंतु इतक करूनही बॉक्स ऑफिसवर मात्र या चित्रपटाला आपली जादू दाखवता आली नाही.
आजकाल काश्मीर फाइल्स, केरळा स्टोरी अशा चित्रपटांची वर्णी जास्त लागत आहे. कितीही नाही म्हटलं तरी हे चित्रपट जाणीवपूर्वक प्रदर्शित केले जातात यात वाद नाही.
२००२ साली घडलेल्या गोध्रा हत्याकांड यावर हा चित्रपट आधारित आहे. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांना आदरांजली म्हणून हा चित्रपट बनवण्यात आला आहे. अयोध्येवरून निघालेल्या साबरमती एक्स्प्रेस मधील एस ६ या डब्याला आग लागून आत असलेले तब्बल ५९ प्रवासी जिवंत जळून मृत्यूमुखी पडले होते. याच दुर्दैवी घटनेवर आधारित हा चित्रपट आहे. विक्रांत मेस्सी याने एका पत्रकाराची भूमिका यात साकारली असून त्याने नेहमीप्रमाणे अभिनय दमदार केलेला आहे. यात रिधी डोगरा ही सुद्धा आपल्याला एका पत्रकाराच्या भूमिकेत दिसते. घडलेल्या घटनेमागे नक्की कोमाचा हात, सत्य नेमकं काय हे जगासमोर आणण्यासाठी समर कुमार हा पत्रकार काम करत असतो.
एकंदर चित्रपटाचा कल असा आहे की ट्रेन मध्ये लागलेली आग ही हिंदू प्रवाश्यांना जाळून मारण्यासाठी मुद्दाम लावलेली होती परंतु तेव्हा ती चित्र काही वेगळं दाखवण्यात आलं आणि हेच सत्य या चित्रपटातून दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय असं निर्माते दिग्दर्शक यांचं म्हणणं आहे. आता हे सत्य आताच का सांगावं वाटलं याबद्दल न बोललेलं बरं. असो एक कलाकृती म्हणून अभिनय, दिग्दर्शन, तांत्रिक गोष्टी या सगळ्या बाबतीत चित्रपट उजवा आहे. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.


७. नाम (Naam)
२०२४. ड्रामा, रहस्य, थ्रिलर. २ तास १६ मिनिटे. [U/A]
लेखक हुमायूं मिर्ज़ा
दिग्दर्शकअनीस बज्मी
कलाकारअजय देवगन,भूमिका चावला,समीरा रेडी,यशपाल शर्मा, राहुल देव, मुकेश तिवारी
निर्माताअनिल रूंगटा
रिलीज तारीख२२ नोव्हेंबर २०२४
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.६⭐/ ५

“नाम” चित्रपट समीक्षा :-

आजकाल प्रत्येकाला सगळं नवं हवं असतं त्यात जर २००८ साली बनवलेला एखादा चित्रपट २०२४ मध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित करत असेल तेही कोणत्याही प्रकारचं प्रमोशन न करता तर प्रेक्षकांकडून कसल्या अपेक्षा न ठेववलेल्याच बऱ्या. अजय देवगण आणि जुही चावला यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन अनीस बज्मी यांनी केलेलं आहे.
चित्रपटाची कथा प्रोफेशनल किलर अमर कुमार उर्फ माइकल(अजय देवगण) याच्यापासून सुरू होते. एका ॲक्सिडंट मध्ये त्याची स्मरणशक्ती जाते आणि तो त्याचं आधीचं आयुष्य विसरून एका नव्या आयुष्याला सुरुवात करतो. त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर सोबत लग्न करून त्यांना एक मुलगी सुद्धा होते. त्याचा व्यवसाय छान सुरू असतो. परंतु अचानक त्याच्या आयुष्यावर आधीच्या आयुष्याची काळी सावली पडायला सुरुवात होते. त्याला मारायला त्याच्या मागे कोणीतरी लागलेलं असतं. आता त्यांना त्याला का मारायचं असतं.? त्याने अपघात होण्यापूर्वी नक्की काय केलेलं असतं.? पुढे काय होतं हे बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल.
२००८ साली जो चित्रपट चित्रित करण्यात आला त्या चित्रपटाकडून संकलन, सिनेमॅटोग्राफी, किंवा इतर तांत्रिक गोष्टींची अपेक्षा करणंच चुकीचं. त्यात कथा, पटकथा संवाद अभिनय सगळंच नाटकी वाटावं असं. एकंदर वेळ आणि पैसा दोन्ही वाचवण्यासाठी चित्रपट न बघणं उत्तम. माझ्याकडून या चित्रपटाला एक स्टार.


८. आय वॉन्ट टू टॉक (I Want to Talk)
२०२४. ड्रामा, परिवार. २ तास २ मिनिटे. [U/A]
लेखक रितेश शाह
दिग्दर्शकशूजित सरकार
कलाकारअभिषेक बच्चन,अहिल्या बामरू,जॉनी लीवर,जयंत कृपलानी,क्रिस्टीन गुडार्ड
निर्माताशील‌कुमार, रोनी लेहरी, कुमार ठाकुर, करण वाढवा
रिलीज तारीख२२ नोव्हेंबर २०२४
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.९⭐/ ५

“आय वॉन्ट टू टॉक” चित्रपट समीक्षा :-

शूजित सरकार दिग्दर्शित आय वॉन्ट टू टॉक या चित्रपटात अभिषेक बच्चन याने मुख्य भूमिका साकारली आहे. हा चित्रपट खऱ्याखुऱ्या आयुष्यावर प्रेरित होऊन बनवण्यात आला आहे. आयुष्य जगत असताना जर समजलं की तुमच्या हातात आता काही मोजकेच दिवस शिल्लक आहेत तर अशा आपण एक तर घाबरून जाऊन रडत बसू किंवा राहीलेत ते दिवस अपूर्ण इच्छा पूर्ण करत जगू. परंतु त्याही पलीकडे जाऊन त्या आजारावर मात करून मृत्यूलाच कोणी आव्हान देत असेल तर.? असंच काहीसं या चित्रपटात बघायला मिळतं. हा एक नक्कीच प्रेरणादायी चित्रपट आहे.
अर्जुन सेन(अभिषेक बच्चन) या तरुणाची ही कथा आहे. बायकोपासून घटस्फोट घेतल्यानंतर त्याला आळीपाळीने मुलीजवळ राहण्याची संधी मिळत असते. संसाराची गाडी डगमगलेली असली तरीही तो त्याच्या प्रोफेशनल आयुष्यात जोमाने काम करत असतो. परंतु अशातच अचानक त्याला लायरेंजिअल कॅन्सर आहे असं कळतं आणि इतकच नाही तर आता फक्त जेमतेम शंभर दिवस त्याच्याकडे उरले आहेत. आता अशा परिस्थितीत अर्जुन काय करतो हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
चित्रपटात इतका मोठा आजार समजल्यावर झालेला आघात, पत्नीची साथ नसल्याने एकाकीपण, फक्त मुलीचा आधार वाटून मुलगी आणि बापाचं नातं घट्ट होणं, हार न मानता आजारावर मात कलण्याची जिद्द हे सगळं अभिषेकने खूप छान पद्धतीने अभिनयातून साकारलं आहे. काही ठिकाणी कथा खूप जास्त संथ वाटते. दिग्दर्शन खूप छान आहे. खऱ्या घटनेवर आधारित एका चांगल्या विषयावरचा हा चित्रपट नक्कीच बघावा असा आहे. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.


९. सिकंदर का मुकद्दर (Sikandar Ka Muqaddar)
२०२४. ॲक्शन, थ्रिलर. २ तास २३ मिनिटे. [U/A]
लेखक नीरज पांडे, विपुल के रावल
दिग्दर्शकनीरज पांडे
कलाकारजिमी शेरगिल, अविनाश तिवारी, तमन्ना भाटिया, दिव्या दत्ता, जोया अफरोज, ऋद्धिमा पंडित, राजीव मेहता, शांतनु घटक, प्रफुल जोशी, अश्रुत जैन
निर्माताशीतल भाटिया
रिलीज तारीख२९ नोव्हेंबर २०२४
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.०⭐/ ५

“जगभरून फिल्म्स” चित्रपट समीक्षा :-

“बेबी”, “स्पेशल छब्बीस”, “वेनस्डे” यांसारखे चित्रपट देणारे नीरज पांडे यांची एक वेगळी शैली आहे. २९ नोव्हेंबर रोजी नेटफ्लिक्स वर प्रदर्शित झालेला “सिकंदर का मुकद्दर” हा चित्रपट सुद्धा नीरज पांडे लिखित आणि दिग्दर्शित असून यात सुद्धा चोर पोलिस हे सगळं आहेच.
मुंबईतील एका भव्य दिव्य हिऱ्यांच्या प्रदर्शनात जवळपास साठ कोटी रुपयांच्या हिऱ्यांची चोरी होते आणि इथून चित्रपटाची कथा सुरू होते. या चोरीचा तपास करण्यासाठी जसविंदर सिंहवर (जिमी शेरगील) या पोलिस अधिकाऱ्याची एन्ट्री होते. अर्थात मग एक्झिबिशन मध्ये चोरी झाली तेव्हा उपस्थित असलेल्या लोकांवर संशय घेऊन तपासाच्या दिशा फिरतात. परंतु मुख्यतः ही संशयाची सुई मंगेश देसाई (राजीव मेहता), सिकंदर शर्मा (अविनाश तिवारी) आणि कामिनी सिंह (तमन्ना भाटिया) या तिघांकडे जास्त असते. आता यापैकी चोरी कोणी केलेली असते का.? की ते निर्दोष मुक्त होतात. पुढे त्यांचं काय होतं हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
यावेळी नीरज पांडे फ्लेवर थोडा कमी जाणवतो. चोरी झाल्यानंतर पंधरा वर्षांचा काळ लोटला असं दाखवल्यामुळे भुतकाळ आणि वर्तमान यातील सांगड घालून कथानक मांडण्यात दिग्दर्शक म्हणून नीरज पांडे जरा गडबडलेले दिसतात. काही ठिकाणी कथा वेग पकडते तर काही ठिकाणी ती खेचलेली वाटते. एकंदर सिकंदर का मुकद्दर हा चित्रपट बरा आहे म्हणू शकतो. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.

    तर मंडळी या वीकेंडला तुम्ही कोणता चित्रपट बघताय हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *