नोव्हेंबर 2024 मध्ये रिलीझ झालेल्या मराठी चित्रपटांची यादी आणि चित्रपटांची समीक्षा
नोव्हेंबर 2024 मध्ये रिलीझ झालेल्या मराठी चित्रपटांची यादी आणि चित्रपटांची समीक्षा | List of Marathi Movies released in November 2024 and Movie Reviews
Written by : आकांक्षा कोलते
Updated : जानेवारी 02, 2025 | 12:09 AM
खरं तर आता वेबसिरीज चा जमाना असल्यामुळे प्रेक्षकांच्या चित्रपटांच्या बाबतीत अपेक्षा वाढल्या आहेत. त्यातही नवीन आलेल्या चित्रपटांमध्ये ओरिजनल कंटेट कमीच असतो. परंतु आशयघन आणि दर्जेदार कथानक हा मराठी चित्रपटांचा गाभा आहे. मराठी चित्रपट हे नेहमीच वास्तववादी आणि चांगला कंटेंट घेऊन भेटीला येतात हे आता प्रेक्षकांच्या लक्षात येत आहे. त्यामुळे मराठी चित्रपटांना प्रेक्षक आता भरभरून प्रतिसाद देतात. असं असलं तरीही हल्ली इतके चित्रपट प्रदर्शित होत असतात की ते तेवढे दर्जेदार असतातच असं नाही. त्यामुळे आम्ही हे सांगण्याचा प्रयत्न करू की प्रदर्शित झालेला एखादा चित्रपट खरंच बघायला हवा की नको.
आज या लेखात आपण नोव्हेंबर २०२४ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपट आम्हाला कसे वाटले ते सांगणार आहोत. ज्यामुळे ते बघायला हवे की नको ते ठरवणं तुम्हाला सोपं जाईल.
नोव्हेंबर २०२४ मध्ये प्रदर्शित झालेले हे मराठी चित्रपट तुम्ही पाहिलेत का.?

१. हया गोष्टीला नावच नाही (Hya Goshtila Navach Nahi) |
लेखक | संदिप सावंत |
दिग्दर्शक | संदिप सावंत |
कलाकार | जयदीप कोडोलीकर, प्रथमेश अत्रे, चैतन्य जवळगेकर, अनुराधा धमाणे, अवधूत पोतदार |
निर्माता | डॉ. सतिश कुमार आदगोंडा पाटील, कुमार पाठक, अभिषेक पाठक, डॉ. अंजली सतीश कुमार पाटील |
रिलीज तारीख | ८ नोव्हेंबर २०२४ |
भाषा | मराठी |
“हया गोष्टीला नावच नाही” चित्रपट समीक्षा :-
डॉ. सतिश कुमार आदगोंडा पाटील यांच्या मृत्यू स्पर्श या कादंबरीवर आधारित ह्या गोष्टीला नावच नाही हा चित्रपट दिग्दर्शक संदिप सावंत यांनी दिग्दर्शित केलेला आहे. अडीअडचणीच्या काळात, संकटसमयी किंवा आयुष्याच्या कठीण काळात कुटुंब नातेवाईक मित्रमैत्रिणी या सगळ्यांचा आधार किती महत्त्वाचा असतो हे अधोरेखित करणारा हा चित्रपट आहे. त्याचसोबत अवयवदाना सारख्या महत्वाच्या विषयावर सुद्धा हा चित्रपट भाष्य करतो.
चित्रपटाची कथा मुकुंद(जयदिप कोडोलीकर) नावाचा तरुण आणि त्याच्या कुटूंबाभोवती फिरणारी आहे. आपल्या मित्रासोबत मुकुंद टेक्सटाइल इंजिनिअरींग शिकण्यासाठी शहरात आलेला असतो. गावी घरी अत्यंत हलाखीची परिस्थिती, एकटा मोठा भाऊ कमावणारा, गरीब आईवडील अशी परिस्थिती असल्यामुळे मुकुंदाला आपल्या परिस्थितीची पूर्ण जाणीव असते. अभ्यासात हुशार असल्याने तो मन लावून शिकत असतो. आपल्या भावाची स्वप्न त्याला पूर्ण करायची असतात. परंतु आजुबाजुला मित्र मंडळी वाढल्याने थोडं अभ्यासाकडे दुर्लक्ष व्हायला सुरुवात होते आणि त्यातच त्याच्या आयुष्यात अमृता(अनुराधा धामणे) हीची एन्ट्री होते आणि कथेत ठरल्याप्रमाणे त्यांच्यात आकर्षण, चिडवाचिडव वैगरे सुरू होते परंतु अचानक मुकुंदच्या आयुष्यात असं काहीतरी घडतं की तो निराशेच्या गर्तेत ढकलला जातो आणि त्याच्या याच कठीण काळात त्याचं अख्खं कुटुंब त्याला साथ देतं.
आता असं नक्की काय घडतं..? मुकुंद त्याच्या भावाचं स्वप्न पूर्ण करतो का.? आणि अवयवदान महत्वाचं आहे याचा आणि कथेचा काय संबंध हे जाणून घेण्यासाठी चित्रपट बघावा लागेल.
चित्रपटाची पटकथा तेवढी सक्षम नाही. त्यात दिग्दर्शन सुद्धा अगदीच ठिकठाक आहे. कलाकारांचा अभिनय सुद्धा म्हणावा असा खास नाही. एकंदर चित्रपट फसलेला आहे. सिनेमॅटोग्राफी चांगली आहे इतकीच जमेची बाब. परंतु प्रेक्षकांना कथा, अभिनय या गोष्टी जास्त महत्त्वाच्या असतात. त्याची इथे कमतरता जाणवते. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार.
२. मूषक अख्यान (Mushak Aakhyan) |
लेखक | हेमंत एदलाबादकर |
दिग्दर्शक | मकरंद अनासपुरे |
कलाकार | मकरंद अनासपुरे, प्रकाश भागवत, स्वाती देशमुख |
निर्माता | सुरेश पठारे, मच्छिंद्र लंके, शिल्पा अनासपुरे, त्रिशला देशमाने |
रिलीज तारीख | ८ नोव्हेंबर २०२४ |
भाषा | मराठी |
“मूषक अख्यान” चित्रपट समीक्षा :-
८ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झालेला मूषक अख्यान हा चित्रपट मराठीतील एक आगळा वेगळा प्रयोग म्हणता येईल. मकरंद अनासपुरे यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात त्यांनी मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. या चित्रपटात मकरंद अनासपुरे यांनी नऊ वेगवेगळ्या भूमिका साकारलेल्या आहेत. हेच या चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे. परंतु नऊ रंगाच्या नऊ ढंगातील भूमिका असलेला मकरंद अनासपुरे यांचा हा विनोदी चित्रपटाचा नवीन प्रयोग थोडा फसलेला आहे .
आबा मिसाळवाले, वॉर्डबॉय, मेडिकल हेड क्लार्क गरुड, बाबुराव चिरपुटकर, गायतोंडे, अन्न अधिकारी गरगटे, हवालदार तुकाराम धायगुडे आणि पंजाबराव अशा वेगवेगळ्या नऊ रूपात वावरणाऱ्या कालीची(मकरंद अनासपुरे) ही गोष्ट आहे. हेमंत एदलाबादकर यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. कालीला सतत अप्पा यांचं वर्चस्व जाणवत असतं. आणि म्हणूनच तो अशा वेगवेगळ्या नऊ व्यक्तीमत्वांच्या रूपात वावरत असतो. आता तो तसं का करतो हे समजण्यासाठी मात्र चित्रपट बघावा लागेल. हेमंत एदलाबादकर यांनी लिहिलेली पटकथा तेवढी सक्षम नाही. मकरंद अनासपुरे यांनी नऊ वेगवेगळ्या भूमिका साकारून हसवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे परंतु कमजोर कथा पटकथा यामुळे नुसत्या अभिनयावर चित्रपट चालला नाही. मकरंद अनासपुरे हे कलाकार म्हणून खूप हसवतात परंतु दिग्दर्शक म्हणून ते नक्कीच कमी पडले आहेत. आजकालच्या तरुणांमध्ये असलेली गौतमी पाटीलची क्रेझ जाणून तिची लावणी चित्रपटात बघायला मिळते परंतु त्याचा काही फारसा उपयोग झालेला दिसत नाही. मकरंद अनासपुरे यांचे चाहते असाल तर हा चित्रपट तुम्ही बघू शकता. बाकी चित्रपटात खास असं काही नाही. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार.
३. मनमौजी (Manmauji) |
लेखक | शीतल शेट्टी |
दिग्दर्शक | शीतल शेट्टी |
कलाकार | भूषण पाटील, रिया नलावडे, सायली संजीव,जयवंत वाडेकर ,अरुण नलावडे ,निशिगंधा वाड ,भाऊ कदम, संदीप पाठक |
निर्माता | विनोद मलगेवार |
रिलीज तारीख | ८ नोव्हेंबर २०२४ |
भाषा | मराठी |
“३. मनमौजी” चित्रपट समीक्षा :-
८ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांपैकी मनमौजी हा चित्रपट शीतल शेट्टी यांनी दिग्दर्शित केलेला असून या चित्रपटाची कथा त्यांनीच लिहिलेली आहे. स्त्री आवडत नाही किंवा स्त्री बद्दल आकर्षण नाही असा पुरुष विरळाच. परंतु या चित्रपटाच्या कथेचा गाभाच हा आहे की एका पुरुषाला स्त्रिया आवडत नाहीत. भूषण पाटील याने ही भूमिका साकारली आहे असून रिया नलावडे, सायली संजीव,जयवंत वाडेकर ,अरुण नलावडे,निशिगंधा वाड ,भाऊ कदम आणि संदीप पाठक असे मराठीतील चांगल्या जाणत्या सहकलाकारांची हजेरी यात लागलेली आहे.
एक जाहिरात एजन्सी चालवणारा श्री(भूषण पाटील) हा स्त्रीयांना नेहमी कमी लेखत असतो. त्याला स्त्रीयांबद्दल आदर तर नसतोच उलट त्यांना तो तुच्छ लेखत असतो परंतु त्याच्या एजन्सी मध्ये काम करणाऱ्या स्त्रियांची संख्या जास्त असते. अशा या श्री च्या ऑफिस मध्ये आणि आयुष्यात जेव्हा मीरा(रिया नलावडे) येते तेव्हा सगळी बाजू पलटते. अर्थात श्री मीराच्या प्रेमात पडतो परंतु ट्विस्ट येतो जेव्हा श्री ला कळतं की मीरा ही विवाहित आहे. आता हे कळल्यावर श्री काय करतो हे बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल.
शीतल शेट्टी यांनी एक ठिकठाक कथा लिहिली आहे ज्यात नवीन किंवा विशेष असं काही नाही. त्यांचं दिग्दर्शन सुद्धा अगदीच ठिक म्हणावं असं आहे. केवळ कलाकारांचा अभिनय चांगला आहे परंतु मनोरंजन करण्यात हा चित्रपट कमी पडतो. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार.
४. पाणीपुरी (PaniPuri) |
लेखक | रमेश चौधरी |
दिग्दर्शक | रमेश चौधरी |
कलाकार | मकंरद देशपांडे, सायली संजीव, हृषीकेश जोशी, भारत गणेशपुरे, कैलास वाघमारे, प्राजक्ता हनमघर, शिवाली परब, विशाखा सुभेदार, अनुष्का पिंपुटकर, अभय गीते, सचिन बांगर |
निर्माता | संजीवकुमार अग्रवाल |
रिलीज तारीख | १५ नोव्हेंबर २०२४ |
भाषा | मराठी |
“पाणीपुरी” चित्रपट समीक्षा :-
आजकाल प्रेमविवाह करण्याचं प्रमाण जेवढं वाढलं आहे तेवढंच लग्नानंतर जरा पटलं नाही की घटस्फोट घेणाऱ्यांचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे. स्वभाव, विचार पटले नाही किंवा थोडंसं काही खटकलं की समजुतदारपणा न दाखवता घटस्फोट घेणं सोपं असतं असं आजकालच्या जोडप्यांमध्ये समज झालेला आहे. परंतु ते नातं संवाद साधून, समजून घेऊन सांधून ठेवण्याचं शहाणपण फार कमी जण दाखवतात. याच विषयावर विनोदी पद्धतीने भाष्य करणारा पाणीपुरी हा चित्रपट रमेश साहेबराव चौधरी यांनी दिग्दर्शित केलेला आहे.
आता लग्न, घटस्फोट म्हटलं की वकील हवाच. अशीच जमादार वकिलांची(मकरंद देशपांडे) या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका आहे. ज्या वकीलाकडे अनेक जोडपी घटस्फोटासाठी येत असतात. नवीन जोडपी असोत किंवा लग्नाला पंधरा वीस वर्षे झालेली असोत प्रत्येक जोडप्यामध्ये काही ना काही खटके उडतच असतात. अशीच चार जोडपी जमादार वडीलांकडे घटस्फोट मागण्यासाठी येतात परंतु दरवेळी घटस्फोट मिळवून देण्यासाठी प्रसिद्ध असलेले जमादार वकील यावेळी मात्र त्या चार जोडप्यांमध्ये समेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न करतात. यामागे त्यांची मुलगी निमा (सायली संजीव) आणि तिचा नवरा कार्तिक (पियुष मांडवकर) यांचा घटस्फोट हे कारण असतं. आता त्या दोघांचा घटस्फोट नक्की का झालेला असतो.? आणि उरलेल्या चार जोडप्यांचं काय होतं हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
चित्रपटाचा विषय, गाभा गंभीर विषयावर आधारित असला तरी विनोदी बाज आणि भन्नाट कलाकारांमुळे हा चित्रपट धमाल करत मनोरंजन करतो. दिग्दर्शन ठिकठाक आहे. संगीत सुद्धा म्हणावं असं खास आ. परंतु सगळ्याच कलाकारांनी विनोदी अभिनयाची फटकेबाजी करत जिथं जिथं कमतरता आहे ती भरून काढलेली आहे. माझ्याकडून तरी या चित्रपटाला तीन स्टार.
५. नाद (Naad) |
लेखक | संतोष दाभोळकर, दिपक पवार |
दिग्दर्शक | प्रकाश जनार्दन पवार |
कलाकार | किरण गायकवाड,सपना माने |
निर्माता | रुपेश दिनकर, संजय पगारे, वैशाली पवार, रूपाली पवार |
रिलीज तारीख | १५ नोव्हेंबर २०२४ |
भाषा | मराठी |
“नाद” चित्रपट समीक्षा :-
संतोष दाभोळकर आणि दिपक पवार यांनी लिहिलेला नाद चित्रपट १५ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला असून प्रकाश जनार्दन पवार यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. हा असा चित्रपट आहे जो बघीतल्यावर का या चित्रपटाचा आपण नाद केला असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो.
एक डॅशिंग नायक, एक सोज्वळ सुंदर नायिका त्यांच्या प्रेमाची गोष्ट आणि त्या गोष्टीत एक खलनायक अशी एक टिपिकल तीच तीच जुनी झालेली या चित्रपटाची कथा आहे. एका गावात घडणारी ही कथा आहे. चित्रपटात नावीन्य असं काही नाही. सगळ्याच बायकांवर वाईट नजर ठेवणारा खलनायक अजिंक्य(यशराज डिंबळे)जेव्हा शुभ्राचा(सपना माने) हट्ट करतो तेव्हा उदय(किरण गायकवाड)हे या चित्रपटात पहायला मिळतं.
शुभ्राच्या भुमिकेतील सपना माने हिला नायिका म्हणून का निवडलं असावं हे एक कोडं आहे. किरण गायकवाड आणि अजिंक्य यांचा अभिनय चांगला आहे. इतर सहकलाकारांचा अभिनय देखील चांगला आहे. पार्श्वसंगीत छान आहे. परंतु दिग्दर्शन, कथानक या गोष्टी अगदीच ठिकठाक आहेत. माझ्याकडून या चित्रपटाला एक स्टार.
६. धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज – भाग एक (Dharmarakshak Mahaveer Chhatrapati Sambhaji Maharaj) |
लेखक | संदीप रघुवंतराव मोहिते पाटील, डॉ. सुधीर निकम |
दिग्दर्शक | तुषार शेलार |
कलाकार | ठाकूर अनूप सिंग |
निर्माता | शेखर पाटील, धर्मेंद्र बोरा, सौजन्य निकम |
रिलीज तारीख | २२ नोव्हेंबर २०२४ |
भाषा | मराठी |
“धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज – भाग एक” चित्रपट समीक्षा :-
छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट बनवणं म्हणजे शिवधनुष्य उचलणं. त्यातही याआधी अनेक चित्रपट आलेले असताना पुन्हा नवीन चित्रपट म्हणजे खूप अभ्यास आणि खूप मेहनत अपेक्षित असते. परंतु या चित्रपटाच्या बाबतीत ही मेहनत पटकथा आणि दिग्दर्शन यामध्ये कमी जाणवते.
ठाकूर अनूप सिंग यांनी छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारली आहे आणि त्यांचं काम नक्कीच चांगलं आहे. अमृता खानविलकर महाराणी येसूबाई म्हणून चपखल बसते. किशोरी शहाणे यांनी जिजाबाईंची भूमिका चोख साकारली आहे. अनिल गवस, उज्ज्वल चोप्रा, प्रदिप काबरा हे इतर कलाकार सुद्धा आपली छाप सोडून जातात.
छत्रपती संभाजी महाराज यांचा पराक्रम, इतिहास दोन तीन तासात मांडणं शक्य नाही. म्हणूनच याघा दुसरा भाग अपेक्षित आहे. पहील्या भागात भव्य दिव्य सेट आहेतच परंतु दिग्दर्शन आणि पटकथा अजून चांगल्या प्रकारे मांडायला हवी होती. महाराजांचा इतिहास इतका रोमांचक थरार अनुभवायला लावणारा आहे त्या मानाने पडद्यावर तो दिसत नाही. छायाचित्रण, सिनेमॅटोग्राफी छान आहे. पार्श्वसंगीत अजून प्रभावी हवं होतं. परंतु आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जाणून घेण्यासाठी एकदा बघायला हवा असा हा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.
७. रानटी (Raanti) |
लेखक | हृषिकेश कोळी |
दिग्दर्शक | समित कक्कड |
कलाकार | शरद केळकर,संजय खापरे,छाया कदम,शान्वी श्रीवास्तव,संतोष जुवेकर,संजय नार्वेकर,नागेश भोसले |
निर्माता | पुनित बालन, राहुल तुळसकर |
रिलीज तारीख | २२ नोव्हेंबर २०२४ |
भाषा | मराठी |
“रानटी ” चित्रपट समीक्षा :-
दाक्षिणात्य चित्रपट प्रेक्षकांना जास्त आवडतात याचं कारण त्यात असलेली मारामारी, रक्तरंजित ॲक्शन सीन्स, सुड बदल्याची भावना मध्यवर्ती ठेवून लिहिलेली कथा हे मुख्य आकर्षण असतं. हेच लक्षात घेऊन आता बॉलिवूड मध्ये सुद्धा तसेच चित्रपट निर्मिती होत आहे. आणि याचंच अनुकरण मराठी निर्माते दिग्दर्शक सुद्धा करत आहेत. असाच एक सुड बदल्याची धगधगती गोष्ट मांडणारा चित्रपट म्हणजे “रानटी.”
हि कथा आहे पाताळपूर मधील विष्णू आंग्रे (शरद केळकर) नावाच्या तरूणाची. विष्णू आणि त्याचा मित्र बाळा यांचे वडील पाताळपूरच्या धक्क्यावर तस्करी करत असतात. परंतु अशा कामातही ते प्रामाणिकपणाचे नियम पाळत असतात. परंतु एका वादाचं निमित्त होऊन विष्णू च्या वडिलांचा खून होतो. सध्या राजकारणात सक्रिय असलेला परंतु गुंड पार्श्वभूमी असलेल्या शिवरुद्र (नागेश भोसले) याच्या सांगण्यावरून विष्णूच्या वडीलांची हत्या सदा राणे (संजय नार्वेकर) या गुंडाने केलेली असते. याच खुनाचा बदला घेण्यासाठी विष्णू आणि बाळा रानटी होऊन रक्ताचा सडा पाडत असतात. आता ते आपला बदला पुर्ण करतात का.? विष्णूच्या वडीलांची हत्या नक्की कोणत्या कारणासाठी केलेली असते.? हे बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल.
दाक्षिणात्य चित्रपटाचा हा रिमेक असून समित कक्कड यांनी मराठी मध्ये एक चांगला ॲक्शन चित्रपट
बनवण्याचा प्रयत्न केला आहे. ॲक्शन सीन्स, हिंसक मारामारी या सगळ्याचा ओव्हर डोस झालेला वाटतो. गाणी संगीत यात काही दम नाही. ज्यांना दाक्षिणात्य चित्रपट आवडतात त्यांना ह चित्रपट आवडू शकतो. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.
८. गुलाबी (Gulaabi) |
लेखक | भारद्वाज जोशी |
दिग्दर्शक | अभ्यंग कुवळेकर |
कलाकार | मृणाल कुलकर्णी,अश्विनी भावे,श्रुती मराठे,अभ्यंक कुवळेकर,निखिल आर्य,राधिका देशपांडे,सुहास जोशी,प्रदीप वेलणकर |
निर्माता | सोनाली शिवणीकर, शीतल शानभाग, स्वप्नील भामरे |
रिलीज तारीख | २२ नोव्हेंबर २०२४ |
भाषा | मराठी |
“गुलाबी” चित्रपट समीक्षा :-
स्त्रीयांची मध्यवर्ती भूमिका असलेले कैक मराठी चित्रपट आहेत. काळानुरूप कितीही बदल झाले तरी स्त्रीयांच्या भावनिक समस्या किंवा भावनिक कोंडी ही तशीच न फुटणारी असते. घर, मुलं, जबाबदाऱ्या या सगळ्यात स्त्रीयांचं स्वतःसाठी जगायचं राहून जातं. तडजोड हा त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असतो. या सगळ्यात त्यांच्या आयुष्यातील मैत्री, प्रेम, नाती या सगळ्यात कसे चढ उतार होत असतात हे सांगणारा हा चित्रपट आहे.
प्रवासाला निघालेल्या तीन वेगवेगळ्या भागातून, वेगवेगळ्या पार्श्वभूमी असलेल्या तिघींची ही गोष्ट आहे. मध्यमवयीन असलेल्या गौरी आणि मधुरा तर त्यांच्यापेक्षा थोडी लहान रिया या राजस्थानला ट्रिप साठी गेलेल्या असतात. मधुरा (मृणाल कुलकर्णी) ही प्राध्यापक असते ही वय उलटून गेलं तरी लग्न न झाल्याने सिंगलच असते,तर डॉक्टर असलेली गौरी (अश्विनी भावे) हीचं लग्न होऊन वीस वर्ष झाली तरी नवऱ्यासोबत काहीच बंध न जुळलेली आहे. तर रिया (श्रुती मराठे)ही इव्हेंट मॅनेजमेंटच्या क्षेत्रात कार्यरत असते. तिच्या आयुष्यात दोन वेळा प्रेम झालं परंतु ती कोणाच्याच बाबतीत सिरियस नसते. अशा तिघी एकमेकींना भेटतात तेव्हा काय होतं त्याची ही गोष्ट.
फार मसाला नसल्याने थोडी संथ गतीने चालणारी कथा आहे. कोणता ट्विस्ट नाही की अनपेक्षित धक्के नाही की थक्क करणारा क्लायमॅक्स नाही. एकंदर भावनिक असा साधा सरळ चित्रपट आहे. तिन्ही अभिनेत्रींनी अभिनय उत्तम केला आहे. फक्त एका प्रवासात सुद्धा स्वतःची नव्याने ओळख होऊन आयुष्य बदलू शकतं हे सांगणारा हा चित्रपट आहे. वेळ असेल तर एकदा बघायला हरकत नाही. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.
तर मंडळी गेल्या महिन्यात तुम्ही यातील कोणकोणते चित्रपट पाहिले ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा.