HomeHindi

फेब्रुवारी २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी

Written by : आकांक्षा कोलते

Updated : मार्च 29, 2023 | 10:14 PM

काही म्हणा पण गेली २-३ वर्ष जरा बॉलिवूडला उतरती कळा लागली होती हे खरंय. लॉकडाऊन काय किंवा नंतर काय बॉलिवूडचा करिष्मा जरा फिका पडत चालला आहे. याला आता कारणं पण बरीच आहेत म्हणा. प्रेक्षकांना आता नुसताच मसाला किंवा आयटम साँग वैगरे असे तडके फारसे रूचत नाही.
‌त्यात हल्ली साऊथ इंडियन चित्रपटांनी प्रेक्षकांना जणू भुरळ घातली आहे. भरीस भर नवीन आलेला बॉयकॉट ट्रेंड. या सगळ्याचा हिंदी चित्रपटसृष्टीला वाईट फटका बसला आहे. म्हणूनच आता २०२३ मध्ये हिंदी चित्रपटसृष्टीला दमदार कमबॅक करणं गरजेचं आहे. आणि तशी सुरूवात सुद्धा झालेली आहे. या लेखात आपण फेब्रुवारी २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले चित्रपट बघणार आहोत.

Feb 2023 hindi movie list

१. अल्मोस्ट प्यार विथ डि. जे. मोहब्बत
२०२३. संगीत, प्रणय, नाटक. २ तास १ मिनिटे. [ यु / ए ]
लेखकअनुराग कश्यप
दिग्दर्शकअनुराग कश्यप
कलाकारविकी कौशल, करण मेहता, अलाया एफ.
निर्मातारंजन सिंग, अक्षय ठक्कर, कबिर अहुजा, ध्रुव जगासिया, अजय राय
प्रदर्शित तारीख३ फेब्रुवारी २०२३
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.८⭐/ ५

अल्मोस्ट प्यार विथ डि. जे. मोहब्बत” चित्रपट समीक्षा :-

अनुराग कश्यप याचे चित्रपट हे नेहमीच वेगळ्या धाटणीचे आणि विविध विषयांवर भाष्य करणारे असतात. बऱ्याच काळानंतर अनुराग कश्यप दिग्दर्शित “अल्मोस्ट प्यार विथ डि. जे. मोहब्बत” हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ३ फेब्रुवारी २०२३ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात विकी कौशल, करण मेहता, अलाया एफ यांच्या मुख्य भूमिका आहेत.
चित्रपटाची कथा हि दोन वेगवेगळ्या भागातील प्रेमकथा आहे. एक गोष्ट घडतेय डलहौजी मध्ये. अमृता, जी शाळेत शिकणारी एक विद्यार्थिनी आहे. तीचं प्रेम आहे एका नुसत्याच उनाडक्या करणाऱ्या याकुब याच्यावर. अमृता ही डि. जे. मोहब्बत म्हणजेच विकी कौशल याची चाहती आहे. डि. जे. मोहब्बत याच्या गाण्यांची अमृता ही खूप मोठी फॅन असते. म्हणूनच जेव्हा त्याच्या लाइव्ह कॉन्सर्टची जेव्हा तिला माहिती मिळते तेव्हा तो बघण्यासाठी ती तिचा प्रियकर याकुब सोबत पळून जाते. ते दोघे तिकडे पोहचतात का.?कि त्यांना कोणत्या अडचणींना तोंड द्यावं लागतं हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
कथानकातील दुसरी गोष्ट ही लंडनमध्ये घडते. लंडनमध्ये राहणारी आयेशा ही एक श्रीमंत पण वाया गेलेली मुलगी आहे. तीचं पण एकतर्फी प्रेम असतं एका हरमीत नावाच्या डीजेवाल्यावर. पण हरमीतला त्याचं करिअर जास्त महत्त्वाचं असतं. पण आयशाचं एकतर्फी प्रेम बघून तोही तिच्या प्रेमात पडतो. त्यांची नक्की लव्हस्टोरी काय आहे हे सिनेमा बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल.
तुम्ही अनुराग कश्यपचे फॅन असाल तर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता. काही ठिकाणी न पटणारी अन खूप गुंतागुंतीची कथा आहे असं वाटू शकतं. हा चित्रपट तुम्ही सिनेमागृहात जाऊन बघू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.


२. फराज
२०२३. ॲक्शन, रोमांचक. १ तास ५० मिनिटे. [ ए ]
लेखकरितेश शाह, कश्यप कपूर, राघव कक्कर
दिग्दर्शकहंसल मेहता
कलाकारआदित्य रावल, जहान कपूर, जुही बब्बर, आमिर अली, जतीन सरीन, रेशम सहानी
निर्माताभुषण कुमार, क्रिष्णन कुमार, अनुभव सिन्हा, साहील सहिगल, साक्षी भट, मजाहीर
प्रदर्शित तारीख३ फेब्रुवारी २०२३
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.७⭐/ ५

“फराज” चित्रपट समीक्षा :-

दहशतवादावर आधारित बरेचसे चित्रपट या आधी आलेले आहेत. फराज हा चित्रपट सुद्धा एका दहशतवादी हल्ल्यावर आधारित आहे पण हा दहशतवादी हल्ला २०१६ साली बांग्लादेशामधील ढाका येथे “होली आर्टिसन बेकरी” वर झाला होता. ज्या मध्ये मुस्लिम सोडून उपस्थित बाकी सगळ्यांची निघृण हत्या करण्यात आली होती. आणि जे मुस्लीम होते त्यांना ओलीस ठेवण्यात आले होते.
या चित्रपटातील “फराझ” हा बांग्लादेशामधील एका व्यावसायिकाचा मुलगा होता जो अमेरिकेतून सुट्टीसाठी आला होता. त्याला दहशतवाद्यांनी बेकरी सोडून जाण्याची परवानगी दिली होती पण आपल्या मित्रांना मृत्यूच्या दारात सोडून जाणं हे त्याला पटलं नाही. म्हणूनच तो शेवटपर्यंत हल्ल्याचा प्रतिकार करत राहीला. पण फराझचा या हल्ल्यात निष्कारण बळी गेला.
फराझ या चित्रपटात खरा हिरो फराझ म्हणजे जहान कपूर हा असला तरी चित्रपटाचा बराचसा भाग हा दहशतवादी निब्रास म्हणजे आदित्य रावल याच्यावर फोकस्ड वाटतो. आदित्य रावल आणि जहान कपूर यांनी उत्तम अभिनय केला आहे. स्कॅम १९९२ सारखी उत्कृष्ट वेबसिरीज दिग्दर्शित केल्यानंतर हंसल मेहता यांच्याकडून नक्कीच अपेक्षा वाढल्या आहेत. त्या पूर्ण होतात की नाही हे बघण्यासाठी चित्रपट नक्की बघा. या चित्रपटाला बऱ्याच कमी ठिकाणी स्क्रीन मिळाल्या असून शोज सुद्धा कमी आहेत. तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जर हा चित्रपट उपलब्ध असेल तर नक्की बघा. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.


३. शिव शास्त्री बलबोआ
२०२३. विनोदी, नाटक. २ तास ६ मिनिटे. [ यु / ए ]
लेखकअजय वेणुगोपालन
दिग्दर्शकअजय वेणुगोपालन
कलाकारअनुपम खेर , नीना गुप्ता , शारिब हाशमी , जुगल हंसराज , नरगिस फाखरी
निर्माताकिशोर वरिथ
प्रदर्शित तारीख१० फेब्रुवारी २०२३
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.७⭐/ ५

“शिव शास्त्री बलबोआ” चित्रपट समीक्षा :-

“शिव शास्त्री बलबोआ” हा चित्रपट बऱ्याच जणांना माहितच नाही की तो कधी प्रदर्शित झाला. अजयन वेणुगोपालन दिग्दर्शित हा चित्रपट १० फेब्रुवारी २०२३ रोजी प्रदर्शित झाला. अनुपम खेर आणि नीना गुप्ता यांच्यासारखे मातब्बर कलाकार या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत.
आपल्याकडे एक सर्वसाधारण समज आपण करून घेतलेला असतो की रिटायरमेंट नंतर वयस्कर मंडळीनी फार काही स्वप्न बघू नयेत. याच चुकीच्या समजुतीला छेद देणारा हा चित्रपट आहे.
मध्यप्रदेश मधील शिवशास्त्री यांची ही गोष्ट आहे. एका हॉलिवूड सिरीजने ते इतके प्रभावित होतात की ते गावात एक बॉक्सिंग क्लब चालू करतात जेव्हा की बॉक्सिंगशी त्यांचा काही संबंध नसतो. पण कालांतराने ते सगळं विकून परदेशी , अमेरिकेत आपल्या मुलाकडे जातात. तिथे त्यांची भेट जवळच काम करणाऱ्या एल्सा सोबत होते. एल्सा ही मुळची हैदराबादची असते. तीच्या मालकाने तीचा पासपोर्ट काढून घेतलेला असतो व तीचा पगार परस्पर हैदराबादला तो पाठवत असतो त्यामुळे एल्साला भारतात परतणं जवळजवळ अशक्य असतं. पण काही करून तिला परत भारतात यायचं असतं. आणि शिवशास्त्री तिला शब्द देतात की ते तिला भारतात घेऊन जाणार. आणि हे दोघं रोडट्रिप करत ॲडव्हेंचर करत प्रवासाला निघतात. आता हा प्रवास कसा होतो.? एल्साचं हे स्वप्न आणि शिवशास्त्री यांचा शब्द पूर्ण होतो का..? हे बघणं म्हणजेच हा चित्रपट.
उतारवयात सुद्धा आयुष्य आनंद उपभोगत जगायचं असतं हा सकारात्मक विचार हा चित्रपट आपल्याला देतो. अभिनयाच्या बाबतीत म्हणाल तर प्रश्नच नाही. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.


४. लॉस्ट
२०२३. नाटक, रोमांचक. तास ४ मिनिटे. [ यु / ए ]
लेखकश्यामल सेनगुप्ता, रितेश शहा
दिग्दर्शकअनिरुद्ध रॉय चौधरी
कलाकारयामी गौतम,पंकज कपूर,राहुल खन्ना,पिया वाजपेयी,तुषार पांडे
प्रदर्शित तारीख१६ फेब्रुवारी २०२३
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.६⭐/ ५

“लॉस्ट” चित्रपट समीक्षा :-

चित्रपटाची कथा हि चित्रपटाच्या नावाशी संबंधितच आहे. एका हरवलेल्या तरुणाची ही गोष्ट आहे. यामी गौतम आणि तुषार पांडे हे या चित्रपटात मुख्य भूमिकेत पहायला मिळतात.
कोलकाता शहरात घडणारी ही कथा आहे. तुषार पांडे म्हणजेच चित्रपटातील ईशान भारती या तरुणाची ही गोष्ट आहे. त्याचं प्रेम एका अंकीता नावाच्या मुलीवर असतं आणि त्याला नाटक बघण्याचं वेड असतं. अचानक एक दिवस तो बेपत्ता होतो. त्यानंतर पोलिस त्याच्यावर तो नक्षलवादी गटामध्ये सहभागी आहे असा आरोप लावतात.‌ आणि त्या अनुषंगाने त्याच्या कुटुंबीयांची चौकशी सुरू होते. या चौकशीत त्याच्या कुटुंबीयांना काय काय सहन करावं लागतं, यात राजकारण्यांचा काय हात असतो हे दाखवणारा हा चित्रपट आहे.
यामी गौतमी ही या चित्रपटात क्राइम रिपोर्टर म्हणजेच विधी सहानीची भुमिका करत आहे. ती आपल्या आजोबांसोबत (पंकज कपूर) राहात असते. तिला मात्र या केस मध्ये काहीतरी गडबड असल्याचं जाणवत आणि त्या दिशेने तीचा शोध चालू होतो. एका सच्चा पत्रकाराला खरं वागताना आणि लोकांसमोर खरं मांडताना कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागते हे विधीकडे बघून कळतं.
खरं तर चित्रपटाची कथा, विषय चांगला आहे पण दिग्दर्शक अभिषेक रॉय यांना “पिंक” चित्रपटा सारखी जादू इथे जमली नाही. बऱ्याच ठिकाणी कथा संथ आणि विस्कटलेली वाटते. आपले अंदाज चुकतात. एकदा बघायला हरकत नाही असा हा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.

५. शेहझादा
२०२३. ॲक्शन, नाटक. २ तास २२ मिनिटे. [ यु / ए ]
लेखकत्रिविक्रम श्रीनिवास
दिग्दर्शकरोहीत धवन
कलाकारकार्तिक आर्यन, क्रिती सेनन, परेश रावल, मनिषा कोईराला
निर्माताभुषण कुमार, क्रिशन कुमार, अमन गिल, अल्लू अरविंद, एस.राधा क्रिष्णन, कार्तिक आर्यन
प्रदर्शित तारीख१७ फेब्रुवारी २०२३
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.७⭐/ ५

“शेहझादा” चित्रपट समीक्षा :-

“शेहजादा” हा चित्रपट २०२०मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आला वैकुंठपुरमलो’ या तेलुगु चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात साऊथ सुपरस्टार अलू अर्जून आणि पूजा हेगडे यांच्या मुख्य भूमिका होत्या. तर शेहजादा मध्ये आपला नव्या उमेदीचा कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनन हे मुख्य भूमिकेत आहेत.
चित्रपटाची कथा ही तुम्हाला नव्वदच्या दशकात घेऊन जाते. लहानपणी आपल्या खऱ्या आईवडिलांपासून दूर गेलेला , हरवलेला बंटू म्हणजेच कार्तिक आर्यन पुढे मोठा झाल्यावर खऱ्या आईवडिलांचा शोध घेतो पण काही कारणांमुळे तो ती ओळख जगासमोर आणू शकत नाही. तो आपल्या वडिलांना, कुटुंबाला बऱ्याच संकटातून बाहेर काढतो पण अर्थातच बंटू म्हणून. पूर्वी असे चित्रपट बरेच चालायचे. पण हा चित्रपट तुम्हाला आवडेल की नाही शंका आहे. कार्तिक आर्यन, क्रिती सेनन,परेश रावल यांच्या भूमिका चांगल्या आहेत. रोहित धवन यांना दिग्दर्शक म्हणून फार स्कोप नव्हता पण तरीही रोहीत यांनी त्यांच्या कामाला न्याय दिला आहे. माझ्याकडून या चित्रपटाला दीड स्टार.

६. सेल्फी
२०२३. विनोदी, ॲक्शन, नाटक. २ तास २३ मिनिटे. [ यु / ए ]
लेखकत्रिविक्रम श्रीनिवास
दिग्दर्शकराज मेहता
कलाकारअक्षय कुमार, इम्रान हाश्मी, डायना
निर्माताकरण जोहर
प्रदर्शित तारीख२४ फेब्रुवारी २०२३
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.०⭐/ ५

“सेल्फी” चित्रपट समीक्षा :-

रोजी प्रदर्शित झालेल्या सेल्फी या चित्रपटाने प्रेक्षकांची घनघोर निराशा केलेली आहे. सेल्फी हा चित्रपट मुळ मल्याळम चित्रपट ‘ड्रायव्हिंग लायसन्स’चा हिंदी रिमेक आहे. इम्रान हाश्मी आणि अक्षय कुमार हे या चित्रपटात मुख्य भूमिका करत आहेत.
अक्षय कुमार चित्रपट निवडताना फार विचार करत नाही हे त्याने याआधीही बऱ्याचदा सिद्ध केलं आहे. सेल्फी चित्रपटाच्या निमित्ताने हे तुम्हाला परत एकदा जाणवेल. या चित्रपटात सुद्धा अक्षय कुमार एक सुपरस्टार दाखवण्यात आला आहे.
तो सुपरस्टार असल्यामुळे त्याचे बरेच चाहते आहेत त्यापैकीच आरटीओ अधिकारी असलेला ओमप्रकाश म्हणजेच इम्रान हाश्मी हा सुद्धा विजयकुमार म्हणजे अक्षय कुमार चा चाहता आहे. एका चित्रपटाच्या शुटिंगसाठी विजयकुमार भोपाळला म्हणजे ओमप्रकाश च्या शहरात आलेला आहे. पण काही कारणास्तव विजय कुमार याला ड्रायव्हिंग लायसन्स ची गरज पडते जे नेमकं हरवलेलं असतं पण ओमप्रकाश त्याला यात मदत करतो. पण ओमप्रकाश जेव्हा त्याच्यासोबत सेल्फी घेण्याची विनंती करतो तेव्हा असं काही घडतं की तोच चाहता सुपरस्टार विरोधात उभा राहतो. त्यानंतर चाहता विरूद्ध सुपरस्टार असा वाद मिडियाला मिळतो. मग पुढे काय होतं हे बघण्यासाठी हा चित्रपट तुम्हाला बघावा लागेल.
माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार. जवळच्या चित्रपटगृहात जाऊन तुम्ही हा चित्रपट पाहू शकता.

हे पण वाचा –

जानेवारी २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी | या मराठी चित्रपटांनी केली २०२३ ची धमाकेदार सुरवात!

२०२३ ची दमदार सुरुवात करणारे “हे” धमाकेदार चित्रपट तुम्ही पाहीलेत का.? | जानेवारी २०२३ मधील प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपट

    तर मंडळी यापैकी कोणते चित्रपट तुम्ही पाहीलेत आणि कोणते आवडलेत हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. 

Content Writer
Writer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *