फेब्रुवारी २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी
Written by : आकांक्षा कोलते
Updated : एप्रिल 7, 2023 | 11:25 PM
आशयघन आणि दर्जेदार कथानक हा मराठी चित्रपटांचा गाभा आहे. मराठी चित्रपट हे नेहमीच वास्तववादी आणि चांगला कंटेंट घेऊन भेटीला येतात हे आता प्रेक्षकांच्या लक्षात येत आहे. त्यामुळे मराठी चित्रपटांना प्रेक्षक आता भरभरून प्रतिसाद देतात.
२०२२ चा शेवट वेड या चित्रपटाने लोकांना अक्षरशः वेड लावून केला. तर २०२३ ची सुरुवात दणक्यात झालीय का ते आपण बघूया. आज आम्ही तुम्हाला २०२३ मध्ये फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित झालेले चित्रपट सांगणार आहोत.
१. गडद अंधार |
लेखक | प्रज्ञेश कदम |
दिग्दर्शक | प्रज्ञेश कदम |
कलाकार | जय दुधाणे, नेहा महाजन, शुभांगी तांबळे, आकाश कुंभार |
प्रदर्शित तारीख | ३ फेब्रुवारी २०२३ |
भाषा | मराठी |
“गडद अंधार” चित्रपट समीक्षा :-
मराठी चित्रपटसृष्टीतील पहिला वहीला” सुपरनॅचरल आणि अंडरवॉटर शूट झालेला” अशी या चित्रपटाची ओळख झाली आहे. खरं तर अशाप्रकारे ११० फूट पाण्याखाली शूट झालेला हा पहिलाच चित्रपट. बिग बॉस फेम जय दुधाने याने या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे.
गडद अंधार या चित्रपटाची कथा ही चार मित्रांची आहे. पराग , चिन्मयी, राजीव आणि माया हे चौघेही प्रोफेशनली स्कुबा डायव्हिंग करणारे असतात. ते चौघेही ट्रीपसाठी कोकणात जातात. आणि तिकडे गेल्यावर ते अर्थातच स्कुबा डायव्हिंग करायला समुद्रात जातात. आणि तिथे त्यांना समुद्रात खोलवर एक पेटी सापडते. कशीबशी ती पेटी वरती घेवून येण्यात त्यांना यश मिळते. पण जेव्हा ती पेटी ते उघडतात. त्यांना विचित्र अनुभव यायला सुरुवात होते. आणि इथूनच चित्रपटाचा थरार चालू होतो.
कथा नेहमीपेक्षा वेगळी आहे. चित्रपटात बरेच ट्विस्ट आणि टर्न्स आहेत त्यामुळे शेवटपर्यंत चित्रपट बघण्याची उत्सुकता कायम टिकते. कलाकारांचा अभिनय सुद्धा चांगला झालेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चित्रपटाचं दिग्दर्शन. ते अतिशय उत्तम झालेलं असून हा चित्रपट तुम्ही नक्कीच बघायला हवा. माझ्याकडून या चित्रपटाला साडेतीन स्टार.
२. जग्गू आणि ज्युलियेट |
लेखक | अंबर हडप, महेश लिमये, गणेश पंडित |
दिग्दर्शक | महेश लिमये |
कलाकार | मेय वाघ, वैदेही परशूराम, उपेंद्र लिमये, प्रवीण तरडे, समीर धर्माधिकारी, समीर चौघुले, अविनाश नारकर, सुनील अभ्यंकर, जयवंत वाडकर, सविता मालपेकर, अंगद म्हसकर, अभिज्ञा भावे आणि मनोज जोशी |
निर्माता | पुनित बालन |
प्रदर्शित तारीख | १० फेब्रुवारी २०२३ |
भाषा | मराठी |
“जग्गू आणि ज्युलियेट” चित्रपट समीक्षा :-
जसं मी आधी म्हणाले की, मराठी चित्रपट हे नेहमीच आशयघन असतात. तीच प्रेमकथा, तीच मारामारी, तोच ड्रामा यापेक्षा वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न नेहमीच मराठी चित्रपटांमध्ये होतो. जग्गू आणि ज्युलियेट हा चित्रपट सुद्धा नेहमीपेक्षा नक्कीच वेगळा आहे.
हा चित्रपट म्हणजे एक प्रवास आहे. प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रवास. नात्यांमधील बंध जोडण्याचा प्रवास. खरं तर नावावरून वाटेल की हा चित्रपट म्हणजे जग्गू आणि ज्युलियेट यांच्यापुरता मर्यादित असेल पण तसं नाहीय. या चित्रपटात बऱ्याच नातेसंबंधांवर भाष्य करण्यात आले आहे.
चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटाचं नव्वद टक्के चित्रिकरण हे उत्तराखंड या सुंदर प्रदेशात झालेलं आहे. त्यामुळे संपूर्ण चित्रपट बघताना नयनरम्य अशी मेजवानी मिळते.
चित्रपटाचा नायक जग्गू म्हणजेच अमेय वाघ हा उत्तराखंडला ट्रीपसाठी गेलेला असतो. या ट्रिपची तिकीट हे त्याच्या वडिलांना एका लॉटरी मध्ये मिळालेलं असतं. तिथेच या प्रवासात त्याची ओळख होते अमेरिकेत जन्माला आलेल्या ज्युलियेट चितळे हिच्यासोबत. खरं तर तिथे अजून एक योगा ग्रुप आलेला असतो फिरण्यासाठी. त्या सगळ्यांच्या प्रत्येकाच्या आयुष्यात बरंच काही चालू असतं, ते दिग्दर्शकाने अतिशय सुंदर दाखवले आहे.
ज्युलियेटचं तिच्या वडीलांसोबत पटत नसतं, ती त्यांचा एकही फोन उचलत नाही पण जेव्हा तीची ओळख जग्गू सोबत होते आणि ती त्याच्या वडिलांसोबत असलेलं त्याचं नातं बघते तेव्हा तिच्या मनात तिच्या वडिलांबद्दल सुद्धा प्रेम निर्माण होतं.
अभिनय, उत्तम सिनेमॅटोग्राफी, लोकेशन , दिग्दर्शन या सगळ्या बाबतीत चित्रपट नक्कीच उत्तम आहे. कलाकारांची फौज सुद्धा बरीच मोठी आहे. पण या कलाकारांना म्हणावा तसा वाव मिळाला नाही. सुरूवातीला चित्रपटाची कथा थोडी संथ गतीने पुढे सरकत राहते पण मध्यंतरानंतर मात्र कथा पकड घेते.
माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.
३. ढिश्यक्यांव |
लेखक | संजय नवगिरे |
दिग्दर्शक | प्रितम एस के पाटील |
कलाकार | संदीप पाठक, अहेमद देशमुख, सुरेश विश्वकर्मा, मेघा शिंदे |
प्रदर्शित तारीख | १० फेब्रुवारी २०२३ |
भाषा | मराठी |
“ढिश्यक्यांव” चित्रपट समीक्षा :-
बऱ्याचदा काही चित्रपटांची भट्टी खूप जास्त बिघडते. ढिश्यक्यांव हा चित्रपट म्हणजे अशीच एक बिघडलेली भट्टी म्हणू शकतो.
सन्या म्हणजेच प्रथमेश परब हा चित्रपटाचा नायक असून त्याला बंदूक शोधण्याचं वेड लागलेलं असतं. त्याला काही करून बंदूक शोधायची असते. याच गोष्टीवरून लक्ष हटवण्यासाठी त्याच्या घरचे काय करतात हे पाहण्यासाठी चित्रपट बघणं गरजेचं आहे. पण खरं तर बघण्यासारखं असं या चित्रपटात काहीच नाही. कॉमेडी, लव्हस्टोरी, डबल मिनींगचे जोक्स असं बरंच काही असलं तरी चित्रपट अतिशय सुमार दर्जाचा आहे त्यामुळे तो बघायचा की नाही हा तुमचा चॉइस आहे. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार.
४. आलंय माझ्या राशीला |
लेखक | अजित शिरोळे |
दिग्दर्शक | अजित शिरोळे |
कलाकार | चिन्मय मांडलेकर, अलका कुबल, मोहन जोशी, निर्मिती सावंत, प्रसाद ओक, मंगेशदेसाई |
निर्माता | अश्विनी पिंपळकर |
प्रदर्शित तारीख | १० फेब्रुवारी २०२३ |
भाषा | मराठी |
“आलंय माझ्या राशीला” चित्रपट समीक्षा :-
चित्रपटाच्या नावावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल की हा चित्रपट “राशी” भोवती फिरणारा आहे. प्रसिद्ध वास्तुतज्ञ , जोतिर्विद आनंद पिंपळकर यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाची कथा म्हणजे बारा राशींच्या बारा वेगवेगळ्या लोकांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना आहेत.
आपण लहानपणी वर्तमानपत्रात येणारं आठवड्याचं राशीभविष्य न चुकता वाचायचो. आजही बरीच लोकं वर्तमानपत्रात किंवा टीव्हीवर दाखवण्यात येणारं राशीभविष्य रोज सकाळी न चुकता बघतात. हा चित्रपट असाच राशींवर, राशीभविष्य या सगळ्यावर आधारित आहे.
चिन्मय मांडलेकर, अलका कुबल, मोहन जोशी, निर्मिती सावंत, अतुल परचुरे, प्रसाद ओक, मंगेश देसाई, उषा नाईक, भार्गवी चिरमुले, अश्विनी कुलकर्णी, पौर्णिमा अहिरे, दिगंबर नाईक, संग्राम चौगुले, स्वप्निल राजशेखर, सिद्धार्थ खिरीड अशी प्रचंड मोठी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन अजित शिरोळे यांनी केले आहे.
आता या बारा जणांच्या आयुष्यात काय घडतंय हे बघण्यासाठी हा चित्रपट बघायला हवा. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.
५. टर्री |
लेखक | महेश रावसाहेब काळे |
दिग्दर्शक | महेश रावसाहेब काळे |
कलाकार | ललित प्रभाकर,गौरी नलावडे, शशांक शेंडे, अनिल नगरकर, योगेश डिंबळे, स्नेहा जोशी |
निर्माता | प्रतिक चव्हाण, अक्षय पाटील |
प्रदर्शित तारीख | १७ फेब्रुवारी २०२३ |
भाषा | मराठी |
“टर्री” चित्रपट समीक्षा :-
ललित प्रभाकर हा तसा सगळ्यांनाच आवडणारा चॉकलेट हिरो. त्याच्या संयमी, शांत भुमिकांमधून तो नेहमीच प्रेक्षकांना भावला आहे. पण टर्री या चित्रपटात त्याचं वेगळं बेदरकार असं रूप पहायला मिळतं.
खेळ कोणता पण असो, सुरु करणारा तोच आणि खल्लास करणारा बी तोच’ असं म्हणणारा आणि त्याच अंदाजात आयुष्य जगणाऱ्या संग्राम ची ही गोष्ट आहे. यात त्याची साथ देण्यासाठी गौरी नलावडे ही नायिकेच्या भूमिकेत आहे.
मैत्रीसाठी, प्रेमासाठी वाट्टेल ते करायला तयार असणाऱ्या डॅशिंग टर्री अशा संग्राम ही कथा अजून छान खुलवता आली असती. ललित आणि गौरी यांनी त्यांच्या भुमिकेला नक्कीच न्याय दिला आहे. पण चित्रपट तुम्हाला फार नवीन, विशेष असा काही अनुभव देत नाही. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.
६. घोडा |
लेखक | जमीर अत्तार |
दिग्दर्शक | टी. महेश |
कलाकार | कैलास वाघमारे, अर्चना महादेव , दिलीप धनावडे, राहुल बेलापुरकर, शिवराज नाळे, देवेंद्र देव, प्रफुल्ल कांबळे, वज्र पवार |
प्रदर्शित तारीख | १७ फेब्रुवारी २०२३ |
भाषा | मराठी |
“घोडा” चित्रपट समीक्षा :-
बाप आणि मुलाच्या नात्यातील ओलावा अधोरेखित करणारा हा चित्रपट आहे. आई आणि मुलं या नात्यातील ओलावा आपल्या सगळ्यांनाच दिसतो. पण बाप आणि मुलगा हे नातं प्रत्येकासाठी जरा वेगळं असतं. त्यावर फार कमी बोललं जातं.
हि कथा आहे एका बांधकाम मजूराची आणि त्याच्या मुलाचा हट्ट पुरवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची. आपल्या शेजारच्या मुलाकडे घोडा आहे म्हणून आपल्याला पण तसाच घोडा हवा आहे असा हट्ट या मजूराचा मुलगा त्याच्या वडिलांजवळ करतो. पण बांधकाम मजूराची व्यथा, परिस्थिती आपल्याला माहीत आहेच. त्याला हा हट्ट पुरवणं जवळजवळ अशक्य असतं. पण तरीही तो काय पराकाष्ठा करतो हे दाखवणारा हा चित्रपट आहे.
कैलास वाघमारे हा अतिशय उत्तम अभिनेता आहे. त्याने या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली असून त्याने या भुमिकेला पूर्ण न्याय दिला आहे. बांधकाम मजूर किंवा समाजातील असे गरीब दुर्लक्षित घटक आणि उच्चभ्रू वर्ग यांच्यामधील दरी पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवते. माझ्याकडून या चित्रपटाला साडेतीन स्टार.
७. रगील |
लेखक | राकेश, योगेश |
दिग्दर्शक | योगेश राकेश |
कलाकार | प्रशांत बोडगिरे, प्रणव रावराणे, शिवानी काठळे, अक्षय गवसाणे |
निर्माता | दीपक एस. आहेर |
प्रदर्शित तारीख | १७ फेब्रुवारी २०२३ |
भाषा | मराठी |
“रगील” चित्रपट समीक्षा :-
हिंदी चित्रपट असो किंवा मराठी एखादा चित्रपट हिट झाला की त्याच धाटणीचे, किंवा त्याच विषयावर आधारीत बरेच चित्रपट प्रदर्शित होतात. इकडे तिकडे थोडाफार बदल केला जातो. रगील हा चित्रपट बघताना बऱ्याच चित्रपटांचे संदर्भ तुम्ही लावता.
ग्रामीण भागातील प्रेमकथेवर आधारित याआधीही चिक्कार चित्रपट मराठीत येऊन गेले आहेत. त्यामुळे तेच तेच बघण्याचा खरं तर कंटाळा येतो. योगेश राकेश दिग्दर्शित रगील हा चित्रपट १७ फेब्रुवारी २०२३ रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची नायिका थोडी वेगळ्या अंदाजात दिसते इतकंच काय ते विशेष. तीचा बोल्ड, डॅशिंग, टपोरी अंदाज या चित्रपटात बघायला मिळतो. शिवानीने ही भूमिका उत्तम साकारली आहे. चित्रपटाची कथा, पटकथा फारशी दमदार नसल्याने दिग्दर्शकाला करायला काही स्कोप उरत नाही तसं या चित्रपटाच्या बाबतीत झालं आहे.
माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.
हे पण वाचा –
फेब्रुवारी २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी
तर मित्रांनो, यापैकी कोणते चित्रपट तुम्ही पाहीलेत आणि या विकेंड ला कोणते बघायला जाणार आहात हे कमेंट करून नक्की सांगा.