फेब्रुवारी २०२४ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी
फेब्रुवारी २०२४ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेले हे हिंदी चित्रपट तुम्ही पाहीलेत का?
Written by : Akanksha Kolte
Updated : फेब्रुवारी 27, 2024 | 11:41 PM
खरं तर आता वेबसिरीज चा जमाना असल्यामुळे प्रेक्षकांच्या चित्रपटांच्या बाबतीत अपेक्षा वाढल्या आहेत. त्यातही नवीन आलेल्या चित्रपटांमध्ये ओरिजनल कंटेट कमीच असतो. बरेच चित्रपट हे रिमेक असतात. त्यामुळे चित्रपटगृहात प्रेक्षकांना खेचून आणणं हे आता निर्माते आणि दिग्दर्शक यांच्यापुढे नवीन आव्हान आहे. आता प्रेक्षकांच्या चित्रपटांच्या बाबतीत असलेल्या अपेक्षा पूर्ण होतायत की नाही हे आमच्या परीने सांगण्याचा प्रयत्न या लेखात आम्ही करणार आहोत.
फेब्रुवारी महिन्यात कोणते चित्रपट प्रदर्शित झाले आहेत आणि ते कसे आहेत ते सांगण्याचा प्रयत्न या लेखात आज आम्ही करणार आहोत.

१. तेरी बातों में ऐसा उलझा जिया |
लेखक | अमित जोशी, आराधना शाह |
दिग्दर्शक | अमित जोशी, आराधना शाह |
कलाकार | शाहिद कपूर,क्रीती सेनन,धर्मेंद्र, डिंपल कपाड़िया, राजेश कुमार, राकेश बेदी, अनुभा फतेहपुरिया, जान्हवी कपूर |
निर्माता | दिनेश विजन,ज्योति देशपांडे, लक्ष्मण उतेकर |
प्रदर्शित तारीख | ९ फेब्रुवारी २०२४ |
भाषा | हिंदी |
“तेरी बातों में ऐसा उलझा जिया” चित्रपट समीक्षा :-
सध्या AI चा जमाना आहे आणि हेच AI नक्की फायदेशीर ठरेल की त्याच्यामुळे माणसाची किंमत कमी होईल हे येणारा काळच सांगेल. परंतु सध्या या आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्स मुळे बऱ्याच गोष्टी धोक्यात आल्या आहेत हे निश्चित. कामाच्या ठिकाणी रोबोटिक्स वैगरे ठिक आहे पण घरात , माणसांच्या नात्यांमध्ये सुद्धा जर या रोबोटने जागा घेतली तर काय होईल हे सांगणारा किंवा या धर्तीवर आधारित हा चित्रपट आहे.
याआधी आपण बऱ्याच चित्रपटात आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स वैगरे हे सगळं पाहीलेलं आहे. परंतु शाहिद कपूर आणि क्रिती सेनन यांची लव्हस्टोरी असलेला हा चित्रपट त्या चित्रपटांपेक्षा थोडा वेगळा नक्कीच आहे.
रोबोटिक्स इंजिनिअर असलेला आर्यन(शाहिद कपूर) त्याच्या मावशीकडे एका प्रोजेक्टच्या निमित्ताने अमेरिकेत जातो तेव्हा मावशीच्या घरी असलेल्या सिफ्रा(क्रीती सेनन) च्या तो प्रेमात पडतो. त्याची मावशी (डिंपल कपाडिया) हीसुद्धा रोबोटिक्स मध्ये नवनवीन प्रयोग करत असते आणि तिच्याकडूनच आर्यन ला कळतं की सिफ्रा ही सुद्धा एक रोबोट आहे. परंतु तोपर्यंत आर्यन हा तिच्या प्रेमात पुर्णपणे गुंतलेला असल्यामुळे तो मात्र आता गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेला असतो. म्हणूनच तो तिला घेऊन भारतात येतो घरच्यांना भेटवण्यासाठी. आणि इथुनच खरी धमाल सुरू होते. आता घरच्यांना तो तिच्याबद्दल तो सगळं खरं सांगतो का.? घरचे तयार होतात का वैगरे हे सगळं बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
लव्हस्टोरी असलेला या चित्रपटात कॉमेडीचा तडका दिलेला आहे. तो सगळ्या चित्रपटात नसला तरी मधे मधे हसवण्याच काम करतो. एक हलकाफुलका मनोरंजन करणारा, फार लॉजिक न लावता बघावा असा हा चित्रपट आहे. त्यासाठी चित्रपटगृहात जाऊनच बघायला हवा असं नाही. ओटीटी वर येण्याची वाट बघू शकता. सगळ्यांचा अभिनय चांगला आहे. शाहिद ने उडता पंजाब, हैदर सारखे चित्रपट अजून करावेत असं वाटल्याशिवाय राहत नाही. लेखक दिग्दर्शक म्हणून अमित जोशी आणि आराधना शाह यांनी जरा अजून मेहनत घ्यायला हवी होती. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.
२. भक्षक |
लेखक | पुलकित, ज्योत्स्ना नाथ |
दिग्दर्शक | पुलकित |
कलाकार | भूमि पेडनेकर,आदित्य श्रीवास्तव,संजय मिश्रा,साई तम्हणकर, सत्यकाम आनंद |
निर्माता | गौरी खान, गौरव वर्मा |
प्रदर्शित तारीख | ९ फेब्रुवारी २०२४ |
भाषा | हिंदी |
“भक्षक” चित्रपट समीक्षा :-
पुलकित यांनी दिग्दर्शित केलेला भक्षक चित्रपट पुन्हा एकदा मानवी तस्करी या महत्त्वाच्या आणि गंभीर विषयावर उजेड टाकणारा चित्रपट आहे. अशा प्रकारच्या चित्रपटाची निर्मिती करणं हे एक प्रकारे धाडस आहे.
चित्रपटाची कथेत मुख्यपणे अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या वैशाली सिंह(भूमी पेडणेकर) हिची मध्यवर्ती भूमिका आहे. बिहारमधील मुनव्वरपुर मध्ये घडणारी ही गोष्ट आहे. तेथील राजकारणी मंत्री आणि सरकारी यंत्रणेला हाताशी धरून कोवळ्या मुलींची तस्करी करणाऱ्या बन्सी साहू या गुंडाविरूद्ध लढणाऱ्या वैशाली सोबत तिचा एकमेव सहकारी भास्कर तिला मदत करत असतो. खरं तर हा जगासमोर एक देवमाणूस म्हणून वावरत असतो. अनाथ मुलींना आधार देण्याच्या नावाखाली त्यांचीच विक्री करत असतो आणि याविरुद्ध लढा देत असतात फक्त वैशाली आणि भास्कर. चित्रपटात हेच पहायला मिळतं की कशाप्रकारे सरकारी यंत्रणा, पोलिस आणि अशी कृत्ये करणाऱ्या गुंडांची कशी मिलीभगत असते. आणि मदत करू बघणाऱ्या पोलिसांचे हात सुद्धा कसे दगडाखाली असतात. चित्रपटात मुख्य कथा या सगळ्या भोवती फिरते.
नव्वदच्या दशकात घडलेल्या एका सत्यघटनेवर आधारित असलेला हा चित्रपट बऱ्याच विषयांना हात घालतो. नेटफ्लिक्स वर उपलब्ध असलेला हा चित्रपट एकदा नक्की बघायला हवा. भुमी पेडणेकर हिच्या अभिनयाचं कौतुक तर आहेच आहे परंतु संजय मिश्रा यांच्या अभिनयाचं कौतुक करावं तेवढं कमीच. एक चालतं बोलतं अभिनयाचं विद्यापीठ म्हटलं तरी चालेल. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.
३. लंटरानी |
लेखक | दुर्गेश सिंह |
दिग्दर्शक | कौशिक गांगुली,भास्कर हजारिका, गुरविंदर सिंह |
कलाकार | जॉनी लीवर,जिशु सेन गुप्ता,जितेंद्र कुमार , निमिषा सजायन,बोलोराम दास, प्रीति हंसराज शर्मा |
निर्माता | प्रणय गर्ग, पीयूष दिनेश गुप्ता |
प्रदर्शित तारीख | ९ फेब्रुवारी २०२४ |
भाषा | हिंदी |
“लंटरानी” चित्रपट समीक्षा :-
९ फेब्रुवारी रोजी झी फाईव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेला लंटरानी या चित्रपटात एकुण तीन वेगवेगळ्या कथा आहेत ज्यांचा एकमेकांशी काही संबंध नाही. तीन वेगवेगळ्या दिग्दर्शकांनी दिग्दर्शन केलेल्या या कथा आहेत.
पहील्या कथेत जॉनी लीवर आणि जिशु सेनगुप्ता ही जोडी बघायला मिळते. “हुड़ हुड़ दबंग” नावाची ही कथा चोर आणि पोलिस यांची गोष्ट सांगणारी आहे. आयुष्यभर पोलिस स्टेशनमध्ये नुसतीच कारकुनी केलेल्या एका हवालदाराला(जॉनी लिव्हर) निवृत्त होण्याआधी एक मोठी जबाबदारी पार पाडण्याची संधी मिळते. ती म्हणजे एका चोराला(जिशु सेन गुप्ता) कोर्टात सादर करण्यासाठी त्याला तिथे घेऊन जाणे. या कथेत याच दोघांचा न्यायालयात जाण्यापर्यंतचा प्रवास दाखवला आहे. चोर असला तरी त्याची एक हळवी बाजू दाखवली आहे आणि अर्थातच जॉनी लिव्हर म्हटलं की कॉमेडी ओघाने आलीच. तर हलकीफुलकी ही चोर पोलिस यांची गोष्ट आहे.
दुसरी कथा “धरना मना है” ही गुरविंदर सिंह यांनी दिग्दर्शित केली आहे. या कथेत जितेंद्र कुमार आणि मल्याळम अभिनेत्री निमिशा सजायनहे दोघं प्रमुख भुमिकेत आहेत. दोघांनीही चांगला अभिनय केला आहे. दलित समाजातील एक स्त्री पंचायत समिती सदस्य म्हणून काही काम करू बघत असते परंतु तिच्या वाटेत इतक्या अडचणी येतात आणि त्याविरुद्धच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसते. तिच्या संघर्षाची ही कथा आहे.
सैनिटाइज्ड समाचार नावाच्या तिसऱ्या कथेचं दिग्दर्शन भास्कर हजारिका यांनी केले आहे. कोरोनाची लाट आली तेव्हा सरसकट सगळेच यात भरडले गेले. आणि याला न्यूज चॅनल सुद्धा अपवाद नाही. ही गोष्ट अशाच एका न्युज चॅनल आणि त्यावरील एका फेमस ॲंकरची आहे. जे चॅनल लॉकडाऊन मुळे बंद पडण्याच्या मार्गावर आहे. आणि अशातच एका सॅनिटायझरच्या जाहिरातीचा प्रस्ताव आपल्या फायद्यासाठी हे चॅनल स्विकारते. यातून पैशांसाठी काम करणारे मिडिया आणि न्युज चॅनलवर भाष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. अशा बिकाऊ न्युज चॅनलना सुद्धा सॅनिटायझरची गरज आहे का असा प्रश्न उपस्थित करणारी ही कथा आहे.
या तिन्ही कथा वेगवेगळ्या असल्या तरी त्या अनेक सामाजिक विषयांवर, प्रश्नांवर भाष्य करतात. एकदा बघायला हरकत नाही असा हा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.
४. दशमी |
लेखक | शंतनु अनंत तांबे |
दिग्दर्शक | शंतनु अनंत तांबे |
कलाकार | वर्धन पुरी, गौरव सरीन,अंकित खेरा,तीर्थ भानुशाली, मोनिका चौधरी,आदिल खान, खुशी हजारे, ऐश्वर्य अनिष्का |
निर्माता | संजना विनोद तांबे, सारिका विनोद तांबे |
प्रदर्शित तारीख | १६ फेब्रुवारी २०२४ |
भाषा | हिंदी |
“दशमी” चित्रपट समीक्षा :-
एखादी ब*लात्काराची बातमी वाचली की आपण बऱ्याचदा असं रागाने म्हणतो की यांना पोलिस किंवा न्यायालयाने शिक्षा देण्यापेक्षा जनतेने शिक्षा द्यावी. असाच काहीसा विचार करून काही तरूण अशा बलात्काऱ्यांना शिक्षा देण्यासाठी स्वतः पुढे सरसावले आहेत. न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेल्या या राक्षसांना संपवण्यासाठी या तरूणांनी विजयादशमीचा दिवस निवडला आहे म्हणून चित्रपटाचं नाव दशमी असं आहे.
सोहेल, सचिन, सृष्टी, तेजस आणि रिशभ असे हे पाच मित्रमैत्रिणी आहेत. बलात्कारासारखं घाणेरड कृत्य करून मोकाट फिरणाऱ्यांना पकडून त्यांचा गुन्हा त्यांच्याकडून वदवून घेऊन तो व्हिडिओ वैगरे बनवून व्हायरल करणं अशी टिपिकल तीच जुनी झालेली गोष्ट आता परत बघताना खरं तर नवीन काही वाटत नाही. आणि इतकं सगळं घडत असताना पोलिस यंत्रणा फार काही करू शकत नाही हे बघताना पटत नाही. बऱ्याच गोष्टींमध्ये फसलेला हा चित्रपट आहे.
लेखक दिग्दर्शक शंतनू तांबे यांचं दिग्दर्शन तर ठिकठाक म्हणावं असं आहे परंतु त्याचसोबत चित्रपटाची कथा सुद्धा अगदीच सुमार आणि मुख्य म्हणजे प्रेक्षकांना पाठ असलेली आहे. कलाकारांचा भरणा तर इतका असला तरी विशेष म्हणावा असा कोणाचाच अभिनय नाही. त्यामुळे उगीच वेळ आणि पैसा वाया न घालवता हा चित्रपट बघू नये हे उत्तम. माझ्याकडून या चित्रपटाला एक स्टार.
५. कुछ खट्टा हो जाए |
लेखक | राज सलूजा, निकेत पांडे,विजय पाल सिंह, शोभित सिन्हा |
दिग्दर्शक | जी अशोक |
कलाकार | गुरु रंधावा,सई मांजरेकर, अनुपम खेर,इला अरुण,अतुल श्रीवास्तव,परितोष त्रिपाठी, परेश गनात्रा, ब्रह्मानंद |
निर्माता | अमित भाटिया, लवीना भाटिया |
प्रदर्शित तारीख | १६ फेब्रुवारी २०२४ |
भाषा | हिंदी |
“कुछ खट्टा हो जाए” चित्रपट समीक्षा :-
आजपर्यंत बरेच असे हिंदी गायक होऊन गेले ज्यांनी अभिनय करण्याचा निष्फळ प्रयत्न केला जो अर्थातच फसला. आता याच गायकांच्या रांगेत अजून एक नवीन नाव जोडलं गेलं आहे ते एक पंजाबी गायक गुरू रंधावा. कुछ खट्टा हो जाए या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं आहे.
१६ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट जी अशोक यांनी दिग्दर्शित केला आहे. हिर(गुरू रंधावा) आणि इरा(सई मांजरेकर) या दोन मुख्य भूमिकांच्या भोवती चित्रपटाची कथा फिरते. आग्रा शहरात घडणारी ही कथा आहे. याआधी अशा प्रकारच्या कथा, विषय आपण असंख्य चित्रपट मालिकांमध्ये बघत आलेलो आहोत. हिर हा थोडा आळशी असा चावला खानदानातील मुलगा आहे जो स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे. ज्याचं त्याच क्लासमध्ये शिकणाऱ्या इरावर प्रेम आहे. आणि इराला या सगळ्यात न पडता “आय ए एस” बनायचं आहे. परंतु योगायोगाने या दोघांच्या घरचे यांचं लग्न लावून देतात. एकीकडे आता हिरचे आजोबा आपल्याला पणतू होईल या आशेवर जगत असतात आणि एकीकडे इराने हिरकडून एक वचन घेतलेलं आहे की त्या दोघांमध्ये नवरा बायको हे नातं नसेल तर फक्त मित्र मैत्रिण म्हणुन राहतील. परंतु काही दिवसांतच अचानक एकदा इरा प्रेग्नंट आहे असा सगळ्यांचा समज होतो आणि सगळा गोंधळ सुरू होतो.
आता खरंच तसं काही होतं का.? इरा आय ए एस बनते का.? त्या दोघांचं पुढे काय होतं हे सगळं बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल. चित्रपटाची कथा पटकथा संवाद सगळं ठिकठाक म्हणावं इतकं पण ठिक नाही. कथा एकसंध वाटत नाही. अनुपम खेर सारख्या काही कलाकारांचा अभिनय सोडला तर बाकीच्यांच्या अभिनयाच्या बाबतीत तर एक स्टार द्यावा लागेल इतका सुमार अभिनय आहे. संगीत पार्श्वसंगीत सुद्धा काही खास नाही. विषय चांगला असला तरी चित्रपटाची कथा दिग्दर्शन यामुळे चित्रपट परिणामकारक नाही. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार.
६. क्रॅक |
लेखक | आदित्य दत्त, रेहान खान,सरीम मोमिन,मोहिंदर प्रताप सिंह |
दिग्दर्शक | आदित्य दत्त |
कलाकार | विद्युत जामवाल,नोरा फतेही,अर्जुन रामपाल, एमी जैक्सन |
निर्माता | विद्युत जामवाल, अब्बास सैय्यद |
प्रदर्शित तारीख | २३ फेब्रुवारी २०२४ |
भाषा | हिंदी |
“क्रॅक” चित्रपट समीक्षा :-
स्वतः चित्रपटाची निर्मिती करत आणि अर्थातच त्यात मुख्य भूमिका साकारत विद्युत जामवाल याने पुन्हा एकदा आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना निराश केलेलं आहे. याआधी सुद्धा विद्युत याने आयबी ७१ या चित्रपटाची निर्मिती केली होती. आताचा “क्रॅक – जितेगा तो जिएगा” हा चित्रपट एक स्पोर्ट्स ॲक्शन चित्रपट आहे.
चित्रपटाची कथा अर्थातच एका जीवघेण्या खेळावर आधारित आहे. चित्रपटाचा नायक सिद्धार्थ याला अंडरग्राउंड एक्सट्रीम हा खेळ खेळण्यासाठी जायचं असतं. मुंबईत एका चाळीत राहणाऱ्या सिद्धार्थला नवनवीन स्टंट करण्याचा शौक असतो. त्याला हा खतरनाक खेळ खेळून पैसे कमवायचे असतात परंतु त्याच्या भावाचा(अंकीत मोहन) याच खेळामुळे जीव गेलेला असतो त्यामुळे त्याच्या घरातून या खेळाला विरोध असतो.
तरीही हा विरोध न जुमानता सिद्धू हा खेळ मैदानावर खेळण्यासाठी पोलंडला पोहचतो. तिथे या खेळाचे सामने देव(अर्जुन रामपाल) याने भरवलेले असतात. तिथे गेल्यावर सिद्धार्थ ला कळतं की आपल्या भावाचा मृत्यू खेळामुळे न होता यामागे कोणाचा तरी हात होता. आता सिद्धार्थ शोधू शकेल का.? तो या खेळात जिंकेल का वैगरे हे सगळं बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल.
मुळात चित्रपटाची कथा चांगली असली की चित्रपट चांगला होतो परंतु इथे त्याचीच कमतरता आहे. त्यात भरीस भर म्हणजे आदीत्य दत्त यांचं बरं म्हणावं का नाही असं दिग्दर्शन. लेखन आणि दिग्दर्शन दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडताना एकही धड पार पाडली गेली नाही याचं उदाहरण म्हणजे हा चित्रपट. विद्युतचा अभिनय ॲक्शन मध्ये शोधावा लागेल जो सापडत नाहीच. नोराचं पात्र कशासाठी असा प्रश्न पडतो. एकंदर अगदीच फसलेला हा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार.
७. आर्टिकल ३७० |
लेखक | आदित्य धर, मोनल ठाकूर |
दिग्दर्शक | आदीत्य जांभळे |
कलाकार | यामी गौतमी, प्रियामणी, अरूण गोवील, किरण करमरकर, इरावती हर्षे, वैभव तत्ववादी |
निर्माता | आदित्य धर, लोकेश धर, ज्योती देशपांडे |
प्रदर्शित तारीख | १६ फेब्रुवारी २०२४ |
भाषा | हिंदी |
“आर्टिकल ३७०” चित्रपट समीक्षा :-
२०२३ मध्ये आलेल्या सॅम बहादुर या चित्रपटात आपण पाहीलं होतं की काश्मीर मध्ये कलम ३७० हे का लागू करण्यात आलं होतं. तर ते कलम लागू झाल्यानंतर काश्मीरमध्ये काय परिस्थिती निर्माण झाली ते कलम रद्द होईपर्यंतचा आणि झाल्यानंतरचा प्रवास आर्टिकल ३७० या चित्रपटात पहायला मिळतो. या कलमानुसार जम्मू आणि काश्मीर ला विशेष राज्य म्हणून दर्जा मिळाला होता आणि अतिशय चुकीचे परिणाम सुद्धा झाले होते.
या चित्रपटात यामी गौतमी हीने एक गुप्तचर विभागातील फिल्ड अधिकारी झूनी हक्सर ही भूमिका साकारली आहे. तिच्या दमदार ॲ*क्शन सीन्सनेच चित्रपटाची सुरुवात होते. २०१६ चा साधारण हा काळ दाखवला आहे. काश्मीरमधील अतिरेकी कारवाया, स्थानिक राजकारणी यांची मनमानी यांच्याबद्दल तिला खूप राग असतो. आणि याच रागाच्या भरात ती आपल्या वरिष्ठांचा आदेश डावलून एका अतिरेकी संघटनेच्या बुरहान वानी या म्होरक्याला ती ठार करते. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे तिच्या विरोधात अनेक आंदोलने होतात. दगडफेक होते. यामुळे तीची बदली थेट दिल्लीत करण्यात येते. आणि इथुनच खऱ्या चित्रपटाला सुरुवात होते.
त्यानंतर २०१९ मध्ये झालेल्या पुलवामा हल्ल्यानंतरची पार्श्वभूमी बघायला मिळते. या हल्ल्याच्या निषेधार्थ अनेक निर्णय घेण्यासाठी तेव्हाच दिल्लीत भारत सरकार अनेक योजना आखत असते. तसेच पंतप्रधानांची सचिव राजेश्वरी यांच्या देखरेखीखाली कलम ३७० कसं रद्द करण्यासाठी सुद्धा अनेक गुप्त योजना, मिशनचे प्लॅन बनत असतात. यासाठी राजेश्वरी झूनीला निवडते आणि एका खास मिशन साठी तिला पुन्हा काश्मीर मध्ये पाठवते. जेणेकरून हे कलम रद्द तर होईलच पण त्यासोबत काश्मीर मधील दहशतवाद संपून शांतता प्रस्थापित होईल.
थोडक्यात हे कलम रद्द करण्यासाठी विविध पातळ्यांवर काय काय प्रयत्न करण्यात आले. त्याचे परिणाम काय झाले. आणि ते करणं कीती गरजेचं होतं हे सांगणारा हा चित्रपट आहे. अर्थात याबद्दल प्रेक्षकांमध्ये, क्रिटीक्स मध्ये वेगवेगळी मतं आहेत परंतु एक कलाकृती म्हणून चित्रपट उत्तम झाला आहे. यामी गौतमी हिचा अभिनय अफलातून झालेला आहे, प्रियामणी, अरूण गोवील, किरण या सगळ्यांनीच उत्तम अभिनय केला आहे. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.
८. ऑल इंडिया रॅंक |
लेखक | वरूण ग्रोवर |
दिग्दर्शक | वरूण ग्रोवर |
कलाकार | बोधिसत्व शर्मा, समता सुधीक्षा, शशि भूषण, गीता अग्रवाल, शीबा चड्ढा |
निर्माता | संजय रावतरे, सरिता पाटिल |
प्रदर्शित तारीख | १६ फेब्रुवारी २०२४ |
भाषा | हिंदी |
“ऑल इंडिया रॅंक” चित्रपट समीक्षा :-
आजकालच्या मुलांकडून असलेल्या पालकांच्या अवास्तव अपेक्षा आणि त्याचं मुलांना येत असलेलं दडपण आणि त्यातून त्या मुलांच्या बाबतीत होणारे वाईट परिणाम अशा आशयाचे आजपर्यंत अनेक चित्रपट येऊन गेले. वरूण ग्रोवर लिखित आणि दिग्दर्शित “ऑल इंडिया रॅंक” हा चित्रपट सुद्धा अशाच धाटणीचा आहे.
साधारण नव्वदच्या दशकातील लखनऊ मध्ये घडणारी ही कथा आहे. तिथे वीज विभागात काम करणाऱ्या आर के सिंह यांना त्यांच्या मुलाने, विवेकने आयआयटी मधून शिकून इंजिनिअर बनावं असं वाटत असतं त्यासाठी त्याच्या मनाविरुद्ध ते त्याला प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी कोटाला घेऊन जातात. तिथे त्याला काही मित्र भेटतात. एकाची आवड एक असते आणि हा अभ्यास मनाविरुद्ध करत असतो. एकजण अभ्यास करत नाही दाडवत खूप अभ्यास करतो्. असे काही सीन्स बघून तुम्हाला थ्री इडियट्स चित्रपटाची आठवण येऊ शकते. विवेक सुरूवातीला मनापासून अभ्यास करत असतो नंतर मात्र त्याचं मन विचलित व्हायला सुरुवात होते. त्याच्या कोचिंग क्लास मधील सारीका त्याला आवडायला लागते. आता एकीकडे त्याचे आईवडील पोटाला चिमटा काढून याल शिकवत असतात. आपल्या गरजा कमी करून याल पैसे पुरवत असतात. अशा मध्ये विवेक काय करतो.? तो आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करतो का हे बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल.
चित्रपटात खरं तर बघण्यासारखं विशेष काही नाही. या विषयावर, कथेवर आधारित खूप चित्रपट येऊन गेल्यामुळे नवीन असं काही बघायला मिळत नाही. कलाकारांचा अभिनय चांगला असला तरी विषय, कथा पटकथा दिग्दर्शन सगळं फसलेलं आहे. माझ्याकडून या चित्रपटाला दीड स्टार.
तर मंडळी या वीकेंडला तुम्ही कोणता चित्रपट बघायला जाताय हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.