फेब्रुवारी २०२४ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी
Written by : Akanksha Kolte
Updated : फेब्रुवारी 27, 2024 | 12:53 AM
खरं तर आता वेबसिरीज चा जमाना असल्यामुळे प्रेक्षकांच्या चित्रपटांच्या बाबतीत अपेक्षा वाढल्या आहेत. त्यातही नवीन आलेल्या चित्रपटांमध्ये ओरिजनल कंटेट कमीच असतो. परंतु आशयघन आणि दर्जेदार कथानक हा मराठी चित्रपटांचा गाभा आहे. मराठी चित्रपट हे नेहमीच वास्तववादी आणि चांगला कंटेंट घेऊन भेटीला येतात हे आता प्रेक्षकांच्या लक्षात येत आहे. त्यामुळे मराठी चित्रपटांना प्रेक्षक आता भरभरून प्रतिसाद देतात.
आज या लेखात आपण फेब्रुवारी २०२४ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपट सांगणार आहोत. जे तुम्ही बघायला हवे की नको ते ठरवू शकता.

१. मुसाफीरा |
लेखक | एमेरा |
दिग्दर्शक | पुष्कर जोग |
कलाकार | पुष्कर जोग, पूजा सावंत, दिशा परदेशी, स्मृती सिन्हा, पुष्कराज चिरपुटकर |
निर्माता | आनंद पंडित, नितीन वैद्य, पुष्कर जोग |
प्रदर्शित तारीख | २ फेब्रुवारी २०२४ |
भाषा | मराठी |
“मुसाफीरा” चित्रपट समीक्षा :-
स्कॉटिश हायलँड्सच्या आयल ऑफ स्कायवर चित्रित केलेला पहिला वहीला भारतीय चित्रपट अशी चर्चा असलेला हा मराठी चित्रपट पुष्कर जोग याने दिग्दर्शित केला आहे. मैत्रीच्या नात्यावर आधारित हा चित्रपट असून याची निर्मिती आनंद पंडित, नितीन वैद्य, पुष्कर जोग यांनी केली आहे.
ही पाच मित्रांची गोष्ट आहे. जे पाच जण तब्बल पंधरा वर्षांनी भेटले आहेत आणि एकत्र जगाची सफर करायला गेले आहेत. यातील प्रत्येक जण आपापल्या आयुष्यात, कामात व्यस्त आहे तरीही या सगळ्यातून वेळ काढून ते आता सगळे परत एकत्र भेटले आहेत. निशंक(पुष्कर जोग) हा एक संगीतकार आहे, मेघा(पूजा सावंत)जी एक अभिनेत्री आहे, मिथिला (दिशा परदेशी) जी चुलबुली आहे, क्रिया (स्मृती सिन्हा) जी लंडनमध्ये राहते, अमेय(पुष्कराज चिरपुटकर) जो महाराष्ट्रातील एक बिझनेसमन आहे, असे सगळेजण आपली मैत्री पुन्हा जगण्यासाठी एकत्र लंडनमध्ये भेटले आहेत. वरवर आनंदी आहोत असं दाखवणाऱ्या या प्रत्येकाची काहीतरी दुखरी नस आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक हळवी, दुखरी बाजू आहे. आता ते काय आहे हे बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल.
पुष्कर ने दिग्दर्शन चांगलं केलं आहे परंतु चित्रपटाची कथा, पटकथेत दम नसल्यामुळे सुंदर लोकेशन असून सुंदर सिनेमॅटोग्राफीचा तसा उपयोग झाला नाही. कलाकारांचा अभिनय चांगला आहे. संगीत पार्श्वसंगीत चांगलं आहे. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.
२. छत्रपती संभाजी |
लेखक | सुरेश चिखले |
दिग्दर्शक | राकेश दुलगज |
कलाकार | शशांक उदपुरकर, लोकेश गुप्ते, मोहन जोशी, मृणाल कुलकर्णी |
निर्माता | राकेश दुलगज |
प्रदर्शित तारीख | २ फेब्रुवारी २०२४ |
भाषा | मराठी |
“छत्रपती संभाजी” चित्रपट समीक्षा :-
छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आणि पराक्रमाची गाथा सांगणारा चित्रपट तब्बल दहा वर्षांपूर्वी चित्रित करण्यात आला होता परंतु खऱ्या आयुष्यात सुद्धा अनेक दुर्दैवी योग नशीबी आलेल्या शंभू राजांच्या या चित्रपटाच्या बाबतीत सुद्धा इतकी वर्ष प्रदर्शनासाठी तारीख न मिळणं हे सुद्धा दुर्दैव म्हणावं लागेल.
सुरेश चिखले लिखित आणि राकेश दुलगज दिग्दर्शित या चित्रपटाचं शूटिंग, संकलन या सगळ्या गोष्टी २०१४ साली पूर्ण झालेल्या होत्या तरीही हा चित्रपट फक्त प्रदर्शित होण्याच्या प्रतीक्षेत होता तो आता २०२४ मध्ये प्रदर्शित झाला. त्यामुळे चित्रपटातील दृश्यं, व्हिज्युअल इफेक्ट्स, संकलन अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला जुन्या वाटू शकतात. पण आपल्या राजांची एक धगधगती शौर्य गाथा म्हणून हा चित्रपट नक्कीच बघावा असा आहे.
शशांक उदपुरकर यांनी छत्रपती संभाजी महाराजांची मुख्य भूमिका साकारली असून चांगला अभिनय केला आहे. तर लोकेश गुप्ते यांनी कवी कलश ही भूमिका साकारली असून त्यांनी सुद्धा उत्कृष्ट भुमिका साकारली आहे. मृणाल कुलकर्णी आणि मोहन जोशी यांच्या अभिनयाबद्दल विशेष सांगण्याची खर तर गरज नाही. एकंदर अभिनयाच्या बाबतीत चित्रपट चांगला आहे परंतु दहा वर्षांपूर्वी चित्रित केला गेल्यामुळे तांत्रिकदृष्ट्या कुठेतरी कमतरता जाणवते, संगीत सुद्धा म्हणावं असं परिणामकारक नाही परंतु आपल्या शंभू राजांसाठी तुम्ही हा चित्रपट बघायला हवा. माझ्याकडून या चित्रपटाला एक कलाकृती म्हणून पाचपैकी अडीच स्टार.
३. श्रीदेवी प्रसन्न |
लेखक | अदिती मोघे |
दिग्दर्शक | विशाल मोढवे |
कलाकार | सई ताम्हणकर, सिद्धार्थ चांदेकर |
निर्माता | कुमार तौरानी |
प्रदर्शित तारीख | २ फेब्रुवारी २०२४ |
भाषा | मराठी |
“श्रीदेवी प्रसन्न” चित्रपट समीक्षा :-
आजच्या काळात लग्नसंस्थेवर विश्वास असणारे आणि लग्नसंस्थेबद्दल शंका असणारे दोन वर्ग दिसतात. त्यातही प्रेमविवाहाबद्दल बरेच तर्कवितर्क, मतमतांतरे आहेत. लग्न करावं की नाही याबाबत आजच्या तरुणाईची बदलत असलेली मतं आणि दृष्टीकोन आधीच्या पिढीपेक्षा बराच वेगळा आहे. याच धर्तीवर प्रदर्शित झालेला “श्रीदेवी प्रसन्न” हा चित्रपट दिग्दर्शक विशाल मोढावे यांनी दिग्दर्शित केलेला आहे.
चित्रपटाची कथा अर्थातच लग्न करू पाहणाऱ्या दोन परस्परविरोधी स्वभाव आणि आवडी निवडी असलेल्या जोडीची आहे. कोकणातील वेंगुर्ल्यात वाढलेली आणि तिथेच एका कॉलेज मध्ये प्राध्यापिका म्हणून काम करत असलेली श्रीदेवी(सई ताम्हणकर) चित्रपटाची नायिका आहे. तिचे आईवडील, आजी आजोबा हे आधीच्या पिढीतील असले तरी विचारांनी पुढारलेले आहेत. त्यांचा तेव्हाच्या काळात प्रेमविवाह झाला होता. त्यामुळे तिला सुद्धा आपण प्रेमविवाह करावा असं वाटत असतं किंबहुना त्याचं दडपण असतं तर याविरुद्ध आहे कथेचा नायक प्रसन्न. आतापर्यंत बऱ्याच रिलेशनशिप मधून बाहेर पडलेला, प्रत्येक वेळी वेगळा अनुभव आलेल्या प्रसन्न चा लग्नसंस्थेवर फारसा विश्वास नाही परंतु घरचे मात्र त्याच्या लग्नाच्या मागे लागले आहेत. मुंबईत राहणारा आयटी मध्ये काम करणारा प्रसन्न लग्न का करावं हा प्रश्न मनात घेऊन वावरत असतो. अशातच एका लग्न जुळवणाऱ्या संस्थेच्या माध्यमातून श्रीदेवी आणि प्रसन्न हे दोघं एकमेकांना भेटतात. आणि इथुनच मग खऱ्या चित्रपटाची कथा सुरू होते. त्या दोघांचे विचार जुळतात का.? पुढे जाऊन लग्न करतात का हे तर चित्रपट बघितल्यावरच कळेल.
चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, सिनेमॅटोग्राफी , अभिनय सगळ्या गोष्टी छान जुळून आल्या आहेत. मधे मधे चित्रपट बऱ्याच ठिकाणी रेंगाळतो. परंतु एकदा मनोरंजन म्हणून बघायला हरकत नाही. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.
४. गाफील |
लेखक | मिलिंद अशोक ढोके |
दिग्दर्शक | मिलिंद अशोक ढोके |
कलाकार | आदित्य राज, वैष्णवी बेर्डे, राजसी टाकळे, निखिल बहाद्दरपुरे, अंकुर वाढवे |
निर्माता | मनोज भेंडे ,आलेख अग्रवाल |
प्रदर्शित तारीख | २ फेब्रुवारी २०२४ |
भाषा | मराठी |
“गाफील” चित्रपट समीक्षा :-
मराठी प्रेक्षकांना गृहीत धरून सुमार कथा, पटकथा लिहून त्यावर चित्रपट निर्मिती करून तो चित्रपट चालेल अशी अपेक्षा ठेवण्या इतपत मराठी निर्माते दिग्दर्शक यांनी आता “गाफील” राहू नये, हा संदेश गाफील चित्रपटातून सगळ्यांनीच घ्यावा. मिलिंद अशोक ढोके लिखित आणि दिग्दर्शित गाफील हा चित्रपट २ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रदर्शित झाला. खरं तर चित्रपटाचा, कथेचा नक्कीच विषय चांगला आहे. आपल्या मुलं दत्तक घेण्यासाठी बरेच कडक नियम आणि तेवढीच क्लिष्ट, लांबलचक प्रक्रिया आहे. या नियमांप्रमाणे एखादा अविवाहित पुरुष एका मुलीला दत्तक घेऊ शकत नाही या नियमावर प्रकाश टाकणारा किंवा त्यावर आधारित कथेचा प्लॉट आहे.
आदित्य नावाच्या एका प्लेबॉय ची ही गोष्ट आहे. ज्याच्या आयुष्यात मुलींना तो काडीचीही किंमत देत नाही. स्त्री म्हणजे एक कामासाठी आणि उपभोगायला असणारी वस्तू असा थोडाफार दृष्टीकोन असणाऱ्या आदित्यच्या आयुष्यात असं नक्की काय घडतं, की त्याला एका मुलीला दत्तक घ्यावं असं वाटतं परंतु अर्थात ते नियमाच्या विरूद्ध असतं. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल होतात, ते का होतात.? हाच सगळा प्रवास किंवा गोष्ट या चित्रपटात बघायला मिळतो. थोडक्यात एका प्लेबॉय च्या आयुष्यातील बदल आणि त्याचा एका मुलीला दत्तक घेण्यासाठीचा संघर्ष यात बघायला मिळतो.
एकंदर चित्रपटाचा विषय चांगला असला तरी कथा, पटकथा, दिग्दर्शन, संगीत, एडिटिंग, कॅमेरावर्क हे सगळं ठिकठाक आहे. कलाकारांचा अभिनय सुद्धा बरा म्हणावा असा आहे. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार.
५. डिलीव्हरी बॉय |
लेखक | राम खाटमोडे , विनोद वणवे |
दिग्दर्शक | मोहसीन खान |
कलाकार | प्रथमेश परब, पृथ्वीक प्रताप,अंकीता लांडे पाटील, गणेश यादव |
निर्माता | डेव्हिड नादर |
प्रदर्शित तारीख | ९ फेब्रुवारी २०२४ |
भाषा | मराठी |
“डिलीव्हरी बॉय” चित्रपट समीक्षा :-
आपल्याकडे आजही आई झाल्यावरच स्त्रीला पुर्णत्व येतं हा समज समाजात ठाण मांडून बसला आहे. त्यामुळे लाखो रुपये खर्च करून आयव्हीएफ सारखे उपचार करून मुलांसाठी प्रयत्न केले जातात. कारण प्रत्येकाला आपलं स्वतःचं मुल हवं असतं. याच भावनेतून काही जण सरोगसी पद्धतीचा अवलंब करतात. परंतु त्याबद्दल अजून पुरेशी जनजागृती नसल्याने लोकांच्या मनात बऱ्याच शंका आहेत. याच धर्तीवर आधारित डिलीव्हरी बॉय हा चित्रपट गेल्या महिन्यात आपल्या भेटीला आला आहे. खरं तर या विषयावर याआधी बरेच चित्रपट येऊन गेले आहेत. त्यामुळे तसं पहायला या कथेत नावीन्य असं काही नाही.
राम खाटमोडे आणि विनोद वणवे या चित्रपटाची कथा लिहिली असून मोहसीन खान यांनी दिग्दर्शन केले आहे. चित्रपटाची कथा एका गावात घडताना बघायला मिळते. एका गावात एक अमृता (अंकिता लांडेपाटील) देशमुख ही एक डॉक्टर मोठ्या बंगल्याच्या शोधात आहे कारण तीला स्वतःचं हॉस्पिटल आणि फर्टिलिटी सेंटर चालू करायचं आहे. जागेसाठी शोधाशोध करताना तिची ओळख
इस्टेट एजंट म्हणून काम करत असलेल्या दिग्याशी (प्रथमेश परब) होते. दिग्या सोबत त्याचा जिगरी दोस्त चोच्या (पृथ्विक प्रताप) हा सुद्धा असतो. हे दोघं फार काही सरळमार्गी काम करणारे नसतात. ते दोघे डॉ. अमृताला जागा तर शोधून देतातखच परंतु तिच्या फर्टिलिटी सेंटर मधील सरोगसीचं प्रकरण काय आहे हे समजल्यावर त्यासाठी सरोगसी साठी स्त्रिया शोधून आणण्याचं कंत्राट सुद्धा घेतात. त्यासाठी त्यांना कोणकोणत्या दिव्यातून जावं लागतं ते दाखवणारा हा चित्रपट आहे. विषय नाजूक आणि गंभीर असला तरी दिग्या आणि चोच्याचे प्रयत्न फार विनोदी पद्धतीने दाखवले गेले आहेत.
चित्रपटाची कथा चांगली आहे परंतु दिग्दर्शन मात्र अगदीच ठिकठाक आहे. संगीत, सिनेमॅटोग्राफी, लोकेशन्स विनोद सगळं छान आहे, अगदी कलाकारांनी अभिनय सुद्धा उत्तम केला आहे परंतु दिग्दर्शन तेवढ्या ताकदीचं नसल्यामुळे कथा, अभिनय उत्तम असुनही एका दर्जेदार चित्रपटाची डिलीव्हरी प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाही हे खरं. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.
६. लोकशाही |
लेखक | संजय अमर |
दिग्दर्शक | संजय अमर |
कलाकार | डॉ. मोहन आगाशे,तेजश्री प्रधान,डॉ. गिरीश ओक,समीर धर्माधिकारी,शंतनू मोघे,भार्गवी चिरमुले,अमित रियान |
निर्माता | सुशीलकुमार अग्रवाल |
प्रदर्शित तारीख | ९ फेब्रुवारी २०२४ |
भाषा | मराठी |
“लोकशाही” चित्रपट समीक्षा :-
राजकारण आणि राजकीय घराणेशाही यावर आधारित आतापर्यंत हिंदी मराठी कैक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. अशा चित्रपटांच्या कथेचा प्लॉट सुद्धा थोडाफार सारखाच असतो. खुर्ची साठी असणारी स्पर्धा यातील मुख्य विषय असतो. ९ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रदर्शित झालेला लोकशाही चित्रपट सुद्धा याच धर्तीवर आहे. खरं तर लोकशाही आणि हा संपूर्ण चित्रपट किंवा चित्रपटाची कथा यांचा एकमेकांशी काही संबंध नाही तरी लोकशाही हे नाव का दिलं असावं हे एक कोडं आहे.
कथा अर्थातच महाराष्ट्राच्या राजकारणातील एका घराणेशाही आणि खुर्ची याभोवती फिरणारी आहे. गजानन चित्रे (मोहन आगाशे) हे एक राजकारणातील मोठं प्रस्थ असून आता त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली आहे. त्यानंतर त्यांच्या खुर्चीवर अर्थातच त्यांचा मुलगा यशवंतराव चित्रे (समीर धर्माधिकारी) हा विराजमान होणार परंतु तेव्हाच त्यांच्यावर भर सभेत जीवघेणा हल्ला होऊन त्यात ते मृत्युमुखी पडतात. अशा परिस्थितीत यशवंतराव याचा पुतण्या सदाशिव चित्रे (अमित रियान) आता खुर्चीवर डोळा ठेवून आहे परंतु नेमकी तेव्हाच यशवंतरावची मुलगी इरावती (तेजश्री प्रधान) हीची एन्ट्री होते. इरावती ही जन्मापासून तिच्या वडिलांपासून दूर तिच्या आईसोबत राहत असते. त्याचं कारण चित्रपट बघीतल्यावर कळेल. परंतु तिच्या घरी अचानक येण्यामुळे गोंधळ वाढतो. यशवंतरावांच्या मृत्यू नंतर त्यांची राजकीय वारसदार म्हणून पक्षाच्या वतीने इरावतीचं नाव पुढे येतं. अर्थातच ही गोष्ट सदाशिव, त्याची आई सुहासिनी (भार्गवी चिरमुले) यांना आवडत नाही आणि इथुनच चित्रे घराण्यात अंतर्गत संघर्ष सुरू होतो. आता खुर्चीवर कोण बसतं.? यशवंतराव यांचा खून कोणी केलेला असतो.? असे अनेक ट्विस्ट या चित्रपटात आहेत.
अनेक दिग्गज कलाकार मंडळी या चित्रपटात एकत्र आहोत त्यामुळे अभिनयाची जुगलबंदी बघायला मिळते. मधे मधे अनेक ट्विस्ट आणि टर्न्स आहेत परंतु शेवटपर्यंत उत्सुकता कायम राहते. दिग्दर्शन उत्तम आहे परंतु पटकथा आणि संवाद त्यामानाने प्रभावी नाहीत. सिनेमॅटोग्राफी, संगीत या गोष्टी सुद्धा सुमार आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे चित्रपटातील दृश्यं अति लांबलचक असल्याने प्रभाव कमी होतो. त्यात संवाद प्रभावी नाही. संकलन सुद्धा ठीकच म्हणावं असं आहे. परंतु एकदा बघायला हरकत नाही असा हा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.
७. शिवरायांचा छावा |
लेखक | दिग्पाल लांजेकर |
दिग्दर्शक | दिग्पाल लांजेकर |
कलाकार | भूषण पाटील, तृप्ती तोरडमल, समीर धर्माधिकारी, मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, राहुल देव, विक्रम गायकवाड, भूषण शिवतरे, अमित देशमुख, ईशा केसकर, प्रसन्न केतकर, अभिजीत श्वेतचंद्र, ज्ञानेश वाडेकर, आशुतोष वाडेकर, बिपीन सुर्वे, दीप्ती लेले,सचिन भिल्लारे |
निर्माता | वैभव भोर, किशोर पाटकर, मधू |
प्रदर्शित तारीख | १६ फेब्रुवारी २०२४ |
भाषा | मराठी |
“शिवरायांचा छावा” चित्रपट समीक्षा :-
दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या शिवराज अष्टकातील फर्जंद,शेर शिवराज, पावनखिंड सारख्या चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजीराजांचा पराक्रम आणि त्यांचा ज्वलंत इतिहास उलगडून दाखवण्याचं शिवधनुष्य उचलण्याचं काम दिग्पाल यांनी केलं आहे. परंतु यावेळी ते छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास आपल्यापर्यंत पोहचवण्यासाठी शिवरायांचा छावा हा चित्रपट घेऊन आले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या देहावसानानंतर काही दिवसांनी शंभू राजांचा राज्यभिषेक सोहळा पार पडतो आणि रयतेच्या रक्षणासाठी छत्रपती संभाजी महाराज यांचा नवीन प्रवास सुरू होतो. छत्रपती संभाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानेच चित्रपटाची सुरुवात दाखवली आहे. संभाजी राजांनी अनेक लढाया जिंकल्या, खूप पराक्रम गाजवला. त्यापैकीच एक मोहीम चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे ती म्हणजे “बुऱ्हाणपूरची मोहीम”.
याया दिग्पाल लांजेकर यांचे याआधीचे चित्रपट सुद्धा दर्जेदार आहेत, त्यांचं लिखाण, दिग्दर्शन दोन्हीही मध्ये त्यांनी केलेला अभ्यास, बारकावे दिसून येतात. या चित्रपटात सुद्धा ते बघायला मिळतं. परंतु आधीच्या चित्रपटांसारखी जर तुम्ही या चित्रपटाकडून अपेक्षा ठेवत असाल तर थोडी निराशाच होऊ शकते. लांबलचक संवादांमुळे चित्रपट थोडा संथ वाटतो. परंतु कथा, दिग्दर्शन, ऐतिहासिक दृश्यं, ऐतिहासिक वेशभूषा या गोष्टी सुंथर झाल्या आहेत. सगळ्या कलाकारांनी अभिनय सुद्धा उत्तम केला आहे. छ. संभाजी महाराज यांच्या भुमिकेतील भुषण पाटील यांनी थोडं संवादफेक याकडे लक्ष दिलं तर त्यांचा अभिनय सुद्धा अजून प्रभावी होईल. एकंदर चित्रपट बघण्यासारखा नक्कीच आहे. संभाजी महाराजांचा पराक्रम एका चित्रपटात मांडणं शक्य नाही. कदाचित पुढचा भाग येऊ शकतो आणि त्यात महाराजांचा उत्तरार्धातील काळ असू शकतो. या चित्रपटाला माझ्याकडून तीन स्टार.
८. लोचा कॉपीचा |
लेखक | अक्षय सुतार |
दिग्दर्शक | अक्षय सुतार |
कलाकार | प्रवीण भाबल, नवीन कदम, ओंकार कांबळी, चैताली राऊत, श्रद्धा कट्टीमणी |
निर्माता | अमित अशोक काकडे |
प्रदर्शित तारीख | १६फेब्रुवारी २०२४ |
भाषा | मराठी |
“लोचा कॉपीचा” चित्रपट समीक्षा :-
१६ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेला लोचा कॉपीचा हा चित्रपट अक्षय सुतार यांनी दिग्दर्शित केलेला असून चित्रपटाची कथा सुद्धा त्यांनीच लिहिली आहे. आणि या दोन्हीपैकी त्यांना काहीच नीट जमलेलं नाही.
चित्रपटाची कथा शालेय जीवनावर, शाळेत घडणाऱ्या गोष्टींवर, शाळेत जडणाऱ्या प्रेमकथेवर आधारित आहे. आणि एकाच शाळेत शिकणाऱ्या विजय(प्रवीण भाबल),ओंकार (ओंकार कांबळे), नागेश (नवीन कदम)आणि मीनू या सगळ्यांचा ग्रुप असून त्यांच्यात छान मैत्री असते. या शाळेत परीक्षेत मुलं सर्रास कॉपी करून पखस होत असतात. या शाळेत नव्याने आलेली प्रिया (श्रद्धा कट्टीमणी)या ग्रुपसोबत मैत्री करते. आणि अर्थातच ग्रुपमधील विजय हा प्रियाच्या प्रेमात पडतो आणि तिलाही सुरूवातीला तो आवडतो पण परिक्षेत कॉपी वैगरे करणं या सगळ्याच्या विरोधात असणारी प्रिया त्याला टाळू लागते आणि याचाच बदला घेण्यासाठी म्हणून एकदा परिक्षेच्या वेळी विजय मुद्दामहून प्रियाच्या इथे पेपर चीट्स टाकतो आणि नेमके तेव्हाच दिल्लीतील एक शिक्षिका हे कॉपी प्रकरण थांबवण्यासाठी या शाळेत आलेली असते. प्रियाला कॉपी करताना पकडल्यावर पुढे काय होतं.? विजय त्याची चुक कबूल करतो का.? हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
चित्रपटाची कथा,पटकथा, संवाद महत्त्वाचं म्हणजे कलाकारांचा अभिनय यातलं काहीही छान म्हणावं असं नाही. चित्रपटाचा शेवट आणि चित्रपटातील संवाद, संगीत अगदीच निराशाजनक आहेत. माझ्याकडून या चित्रपटाला एक स्टार.
९. आता वेळ झाली |
लेखक | अनंत नारायण महादेवन |
दिग्दर्शक | अनंत नारायण महादेवन |
कलाकार | दिलीप प्रभावळकर, रोहीणी हट्टंगडी |
निर्माता | दिनेश बंसल, जी के अग्रवाल, अनंत महादेवन |
प्रदर्शित तारीख | २३ फेब्रुवारी २०२४ |
भाषा | मराठी |
“आता वेळ झाली” चित्रपट समीक्षा :-
बऱ्याच वेळा आपल्याला एखाद्या निराधार वृद्ध जोडप्याकडे बघून त्यांची दया येते. किंवा एकटे पडणारे निराधार अति वयस्कर महिला किंवा पुरुष यांच्याकडे बघून वाटतं की अशा प्रकारचं इतकं आयुष्य आपल्याला नको त्यापेक्षा वेळेत मरण आलेलं चांगलं. परंतु मृत्यू हा काही आपल्या हातात नसतो आणि आपल्या भारतात तरी इच्छामरणासाठी कायद्याची परवानगी नाही. अशाच इच्छा मरण मिळावं यासाठी न्यायालयात जाणाऱ्या एका वृद्ध जोडप्याची ही गोष्ट चित्रपटाच्या निमित्ताने आपल्यासमोर आणली आहे लेखक, दिग्दर्शक अनंत नारायण महादेवन यांनी.
२०१८ मध्ये घडणारी ही कथा आहे. शशीधर लेले(दिलीप प्रभावळकर) हे वय वर्ष ७० आणि त्याची पत्नी रंजना लेले, वय ६५ हे दोघं मुंबईत राहत असतात. परंतु आता उमेदीचा काळ संपला आहे आणि आता आपल्याला बघणारं कोणी नाही म्हणून दोघांनाही मरावं असं वाटतंय. परंतु आपल्याकडे असं स्वतःहून मरणं म्हणजे आत्महत्या जो की कायद्याने गुन्हा आहे, त्यामुळे हे जोडपं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आणि पंतप्रधानांना इच्छा मरणाला परवानगी द्यावी अशी विनंती करणारं पत्र लिहीतात. अर्थात ती विनंती फेटाळून लावली जाते. दोघांपैकी एक जरी कोण जिवंत राहीला तर मागे राहणाऱ्याचं आयुष्य अवघड होईल ही कल्पना त्यांना असते. मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांनी विनंती फेटाळून लावल्यानंतर हे जोडपं न्यायालयात धाव घेतं परंतु तिथेही निराशा पदरी पडते. पुढे जाऊन कोव्हिड येतो आणि जगभरात धुमाकूळ घालतो तेव्हा मात्र हे जोडपं गरजवंतांसाठी मदतीला धावून जातं.
चित्रपटाची कथा म्हणावी तशी प्रभावी नाही. पटकथा सुद्धा शेवटपर्यंत खिळवून ठेवण्याइतपत सक्षम नाही. दिग्दर्शन सुद्धा ठिकठाक आहे. दिलिप प्रभावळकर आणि रोहीणी हट्टंगडी यांचा अभिनय कसा आहे हे सांगायला नकोच. त्यांचा अभिनय बघण्यासाठी म्हणून हा चित्रपट बघू शकता. सगळ्या वयातील लोकांना हा चित्रपट आवडेल असं नाही. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.
तर मंडळी गेल्या महिन्यात तुम्ही यातील कोणकोणते चित्रपट पाहिले ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा.