फेब्रुवारी 2025 मध्ये रिलीझ झालेल्या हिंदी चित्रपटांची यादी आणि त्यांची समीक्षा
फेब्रुवारी 2025 मध्ये रिलीझ झालेल्या हिंदी चित्रपटांची यादी आणि त्यांची समीक्षा | List of Hindi movies released in February 2025 and their reviews
फेब्रुवारी २०२५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेले हे हिंदी चित्रपट तुम्ही पाहीलेत का?
Written by : आकांक्षा कोलते
Updated : जून 9, 2025 | 11:11 PM
खरं तर आता वेबसिरीज चा जमाना असल्यामुळे प्रेक्षकांच्या चित्रपटांच्या बाबतीत अपेक्षा वाढल्या आहेत. त्यातही नवीन आलेल्या चित्रपटांमध्ये ओरिजनल कंटेट कमीच असतो. बरेच चित्रपट हे रिमेक असतात. त्यामुळे चित्रपटगृहात प्रेक्षकांना खेचून आणणं हे आता निर्माते आणि दिग्दर्शक यांच्यापुढे नवीन आव्हान आहे. आता प्रेक्षकांच्या चित्रपटांच्या बाबतीत असलेल्या अपेक्षा पूर्ण होतायत की नाही हे आमच्या परीने सांगण्याचा प्रयत्न या लेखात आम्ही करणार आहोत.
आज या लेखात फेब्रुवारी २०२५ महिन्यात प्रदर्शित झालेले चित्रपट कोणते आहेत आणि बघायला हवेत की नको याबद्दल आमचं मत सांगणार आहोत.

१. लवयाप्पा (Loveyapa) |
लेखक | प्रदीप रंगनाथन, स्नेहा देसाई, सिद्धांत मागो |
दिग्दर्शक | अद्वैत चंदन |
कलाकार | जुनैद खान, खुशी कपूर, आशुतोष राणा, तनविका पार्लीकर,किकू शारदा, ग्रुशा कपूर |
निर्माता | प्रदीप रंगनाथन, भावना तलवार, सृष्टि बहल, मधु मंटेना |
रिलीज तारीख | ७ फेब्रुवारी २०२५ |
भाषा | हिंदी |
“लवयाप्पा” चित्रपट समीक्षा :-
आजकाल तमिळ तेलुगू चित्रपटांचे रिमेक बनवणे हा एकमेव पर्याय उरलाय असं बॉलिवूड दिग्दर्शक आणि निर्माते यांना वाटत असावं. लवयाप्पा हा अद्वैत चंदन दिग्दर्शित चित्रपट ७ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला असून २०२२ साली प्रदर्शित झालेला लव्ह टुडे या तमिळ चित्रपटाचा हा रिमेक आहे. खुशी कपूर आणि जुनैद खान या दोघांच्या यात प्रमुख भूमिका आहेत.
अद्वैत चंदन यांनी २०२२ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचा रिमेक २०२५ बनवताना थोडं कथेच्या बाबतीत अपडेट होण्याची गरज होती. पण असो. चित्रपटाची कथा दिल्लीतील एका शहरात घडतेय. कथेचा हिरो गौरव (जुनैद खान) आणि हिरोईन बानी (खुशी कपूर) हे दोघं एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले आहेत. दिवसभरातील काही मोजके तास सोडले तर पूर्ण दिवस रात्र ते फोनवर एकमेकांशी बोलत असतात. त्यामुळे त्यांच्या घरी हे प्रकरण समजणं अगदी साहजिक होतं. तसंच होतं. पण मग ट्विस्ट असा आहे की यांच्या घरचे ठरवतात की लग्न लावून देण्यापूर्वी एका दिवसासाठी या दोघांनी आपापल्या मोबाईलची अदलाबदल करायची. त्यानंतर सुद्धा जर त्यांना वाटलं की आपण एकमेकांना पूर्णपणे ओळखतो आणि लग्न करू शकतो तरच यांचं लग्न लावून दिलं जाईल. आता ठरल्याप्रमाणे मोबाईलची अदलाबदल होते आणि मग पुढे काय काय घडतं हे बघण्यासाठी मात्र चित्रपट बघावा लागेल.
आजकाल एखादी व्यक्ती कशी आहे हे सांगण्यासाठी त्या व्यक्तीचा मोबाईल आणि त्याचा पासवर्ड पुरेसा आहे. आपण ओळखत असलेली व्यक्ती खरी कशी असू शकते हे सांगणं अवघड परंतु मोबाईल आणि त्यात असलेली माहिती ही त्या व्यक्तीची कुंडली असू शकते. आजकालची पिढी आणि सोशल मीडिया तसेच विविध डेटींग ॲप्स या सगळ्याच्या इतकी अधिन आहे की प्रत्येकजण खऱ्या आयुष्यात मुखवटा लावून फिरत असतो. या सगळ्यावरच हा चित्रपट भाष्य करतो.
जुनैद खान याने अभिनय चांगला केला आहे, खुशी कपूर कडून अपेक्षा ठेवणं खरं तर चुकीचं परंतु मुख्य भूमिका असेल तर मेहनत घ्यावी. आशुतोष राणा नेहमी प्रमाणे उत्तम. इतर कलाकारांच्या भूमिका सुद्धा चांगल्या आहेत. दिग्दर्शन ठिकठाक आहे. चित्रपट चांगला आहे. आजकालच्या तरूण पिढीने आवर्जून बघावा. एकदा ओटीटी वर बघायला हरकत नाही. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.
२. बॅडॲस रवी कुमार (Badass Ravi Kumar) |
लेखक | हिमेश रेशमिया, कुशल वेद बख्शी, बंटी राठौर |
दिग्दर्शक | कीथ गोम्स |
कलाकार | हिमेश रेशमिया, कीर्ति कुलहरि, सनी लियोन, संजय मिश्रा, जॉनी लीवर, प्रशांत नारायण |
निर्माता | हिमेश रेशमिया |
रिलीज तारीख | ७ फेब्रुवारी २०२५ |
भाषा | हिंदी |
“बॅडॲस रवी कुमार” चित्रपट समीक्षा :-
“बॅडॲस रवी कुमार” हा चित्रपट म्हणजे हिमेश रेशमिया याने पुन्हा एकदा अभिनयाचा केलेला अयशस्वी प्रयोग आहे. चित्रपटाबद्दल चांगलं काही लिहायला शोधून सापडणार नाही याची पुरेपूर काळजी हिमेश रेशमिया याने घेतलेली आहे.
चित्रपटाची कथा ८० च्या दशकातील आहे. याआधीचा हिमेश रेशमियाचा चित्रपट जर तुम्ही चुकून पाहीला असेल तर डायलॉगबाजी करणारा ॲक्शन मोड ऑन असलेला रवी कुमार माहीत असेल. तोच रवी कुमार आता परत तुमच्या इच्छेविरुद्ध भेटायला आलेला आहे. चित्रपट बघताना लॉजिक वगैरे गुंडाळून बाजूला ठेवून बघणार असखल तर न हसता चित्रपट बघू शकता. भारताची गोपनीय माहिती असलेल्या एक रील मिळवण्यासाठी पाकिस्तान प्रयत्न करत आहे परंतु आपला द रवी कुमार सस्पेंड असूनही ती रील सुरक्षित आणण्यासाठी या कामगिरीवर जातो. अर्थात त्याचा सामना व्हिलन असलेल्या कार्लोस पेड्रो पैंथर म्हणजेच प्रभु देवा याच्या सोबत होतो. इथेही अभिनयाची बोंबाबोंबच आहे. आता रवी कुमार ज्या सिक्रेट मिशनवर जातो ते मिशन पूर्ण होतं की नाही हे बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल. परंतु जर तुम्हाला जर तुमचे दोन तास बावीस मिनिटं वाया घालवायची नसतील तर हा चित्रपट पाहिला नाही तरी चालेल.
चित्रपटाचं दिग्दर्शन अगदीच ठिकठाक आहे. हिमेश रेशमियाची निर्मिती असलेल्या या चित्रपटात क्वचित प्रसंगी हिमेश स्क्रीन वर दिसत नाही. अगदीच सुमार असलेली कथा आणि अभियाची वाणवा असा सगळा मामला आहे. या चित्रपटाला माझ्याकडून एक स्टार.
३. मिसेस (Mrs.) |
लेखक | हरमन बावेजा, अनु सिंह चौधरी, नेहा दुबे, जियो बेबी |
दिग्दर्शक | आरती कडव |
कलाकार | सान्या मल्होत्रा, निशांत दहिया, कंवलजीत सिंह, वरुण बडोला |
निर्माता | हरमन बावेजा, पम्मी बावेजा, ज्योति देशपांडे |
रिलीज तारीख | ७ फेब्रुवारी २०२५ |
भाषा | हिंदी |
“मिसेस” चित्रपट समीक्षा :-
एक काळ होता की जेव्हा स्त्रीयांना प्रत्येक गोष्टीची परवानगी घ्यावी लागत असे. फक्त चुल आणि मुल अशी परिस्थिती होती. परंतु आता तशी परिस्थिती नाहीय. पूर्णपणे परिस्थिती बदलली नसली तरीही स्त्रीया आज घराबाहेर पडून पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या आहेत अशा काळात मिसेस हा चित्रपट फार काळाच्या मागे घेऊन जाणारा वाटतो.
चित्रपटाची कथा अर्थातच लग्न झाल्यानंतर स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणऱ्या बंधंनाची आहे. २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या “द ग्रेट इंडियन किचन” या मल्याळम चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे. परंतु “द ग्रेट इंडियन किचन” ची सर मिसेस ला नाही.) दिवाकर(निशांत दहिया) सोबत लग्न करून आलेल्या ऋचाची (सान्या मल्होत्रा) खूप स्वप्नं असतात. पण मिस ऋचा जेव्हा मिसेस ऋचा बनते तेव्हाच खरं तर या स्वप्नांना सुरूंग लागलेला असतो. ज्या घरात लग्न करून ती येते तिथे पितृसत्ताक कुटुंबपद्धतीचा पगडा असतो. अगदी स्वतः डॉक्टर असलेला दिवाकर सुद्धा स्त्रीयांच्या बाबतीत बुरसटलेल्या आणि मागासलेल्या विचारांचा असतो. घर, घरातील कामं, जेवण बनवणे, भांडी घासणे या सगळ्यातच ऋचा अडकून जाते. परंतु मुळातच महत्वाकांक्षी असलेली ऋचा या सगळ्या विरुद्ध आवाज उठवते का.? हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
बऱ्याच गोष्टी खटकतात परंतु ही परिस्थिती आजही काही घरांमध्ये आहे हे सत्य नाकारता येत नाही. सान्याने व इतर कलाकारांनी अभिनय चांगला केला आहे. परंतु फक्त एकच बाजू दाखविण्याच्या नादात दिग्दर्शिका आरती कडव यांनी काही ठिकाणी अतिशयोक्ती ठरतील असे प्रसंग दाखवले आहेत. एकदा बघायला हरकत नाही, झी फाईव्ह हा चित्रपट तुम्ही बघू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.
४. द मेहता बॉईज (The Mehta Boys) |
लेखक | बमन इराणी, एलेक्स डाइनलारिस |
दिग्दर्शक | बोमन इराणी, एलेक्स डाइनलारिस |
कलाकार | बोमन इराणी, अविनाश तिवारी, श्रेया चौधरी, पूजा सरूप |
निर्माता | बमन ईरानी, दानिश ईरानी, शुजात सौदागर, विपिन अग्निहोत्री |
रिलीज तारीख | ७ फेब्रुवारी २०२५ |
भाषा | हिंदी |
“द मेहता बॉईज” चित्रपट समीक्षा :-
७ फेब्रुवारी रोजी ॲमेझॉन प्राईम वर प्रदर्शित झालेला द मेहता बॉईज हा चित्रपट बोमन इराणी यांनी दिग्दर्शित केलेला असून त्यांनी या चित्रपटाची कथा लिहिण्यासोबत मध्यवर्ती भूमिका सुद्धा साकारली आहे. आतापर्यंत विविध फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाचं बरंच कौतुक झालं आहे.
चित्रपटाची कथा गुजरात मधील शिव मेहता (बोमन ईरानी) आणि त्यांचा मुलगा अमय (अविनाश तिवारी) या दोघांभोवती गुंफलेली आहे. निवृत्त झालेले शिव मेहता हे पत्नी सोबत राहत असतखत परंतु पत्नीचं निधन झाल्यानंतर त्यांना त्यांची मुलं भेटायला आल्यावर काय घडतं ते चित्रपटात पहायला मिळतं. त्यांचा मुलगा शिव हा आर्किटेक्ट असतो परंतु तो वडिलांसोबत राहत नसतो तर मुलगी अनु(पूजा सरूप) ही अमेरिकेला राहत असते. आता ती दोघं वडिलांना भेटायला आलेले असतात आणि अनु जाताना शिव मेहता यांना सोबत घेऊन जाणार असते परंतु काही कारणास्तव त्यांना प्रवास करता येत नाही आणि म्हणूनच अनु एकटी पुढे जाते. तर शिव मेहता यांना नाईलाजाने दोन दिवस आपल्या मुलासोबत राहावं लागतं. या दोन दिवसात बाप मुलाच्या नात्यातील असलेला तणाव, मतभेद, गैरसमज सगळंच पाहायला मिळतं. वडील मुलाच्या नात्यातील असलेला एक वेगळा दृष्टिकोन पाहायला मिळतो.
बोमन इराणी यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन आणि अभिनय दोन्ही उत्तम केला आहे. दिग्दर्शनाचा त्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. कथा थोडी संथ गतीने पुढे सरकत राहते परंतु एकंदर बघायला हरकत नाही असा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.
५. बॉबी और रिशी की लव्हस्टोरी (Bobby Aur Rishi Ki Love Story) |
लेखक | कुणाल कोहली |
दिग्दर्शक | कुणाल कोहली |
कलाकार | कावेरी कपूर, वर्धन पुरी, लिलिएट दुबे, महिमा चौधरी, अरमेंद्र शर्मा |
निर्माता | ज्योति देशपांडे |
रिलीज तारीख | ११ फेब्रुवारी २०२५ |
भाषा | हिंदी |
“बॉबी और रिशी की लव्हस्टोरी ” चित्रपट समीक्षा :-
फना सारख्या चित्रपटाचं दिग्दर्शन करणारे दिग्दर्शक कुणाल कोहली दिग्दर्शित बॉबी और रिशी की लव्हस्टोरी हा चित्रपट डिस्नी हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्म वर प्रदर्शित झाला आहे.
चित्रपटाची कथा अर्थातच लव्हस्टोरी आणि मग त्यातील रूसवेफुगवे यावर आधारित आहे. चित्रपटाचच्या सुरुवातीलाच बॉबी (कावेरी )आणि ऋषि(वर्धन पुरी )हे दोघं नवरा बायको एका मॅरेज काउन्सलर समोर बसलेले आहेत. लव्ह मॅरेज असलेल्या या लग्नाचा आता शेवट व्हायची वेळ आलेली आहे आणि ते नातं टिकवण्यासाठी शेवटचा पर्याय म्हणून काउन्सलर कडे गेलेले आहेत. आणि मग इथुनच ते प्रेमात कसे पडतात हे सांगणारा फ्लॅशबॅक येतो आणि चित्रपट सुरू होतो. एका फ्लाईट मध्ये झालेली ओळख आणि मग लगेच प्रेमात वगैरे पडणं हे सगळं आताच्या काळात घडतंय असं वाटत नाही. आधीच्या ब्रेकअप मुळे नात्यात अडकायला घाबरणारी बॉबी ते मग रिशीचा ठरलेला साखरपुडा मोडून ते दोघं एकत्र येणं हे दोन तीन वर्षांत घडतं. ठरलेल्या नव्वदच्या दशकातील चित्रपटात पहायला मिळायचे तसे काहीसे सीन्स बघायला मिळतात. आता चित्रपटात बघायचं हेच आहे की बॉबी आणि रिशीचं नातं टिकतं की नाही.?
चित्रपटाची कथा पटकथा अगदीच जुनाट आणि इकडून तिकडून जोडलेली वाटते. कथेत नावीन्य नाही. कलाकारांचा अभिनय देखील निराशाजनक असल्यामुळे चित्रपट अगदीच फसला आहे. माझ्याकडून या चित्रपटाला एक स्टार.
६. छावा (Chhaava) |
लेखक | लक्ष्मण उतेकर, ऋषि विरमानी, कौस्तुभ सावरकर, उनमान बंकर, इरशाद कामिल, ओंकार महाजन |
दिग्दर्शक | लक्ष्मण उतेकर |
कलाकार | विक्की कौशल, रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा, नील भूपलम, विनीत सिंह, डायना पेंटी, दिव्या दत्ता |
निर्माता | दिनेश विजन |
रिलीज तारीख | १४ फेब्रुवारी २०२५ |
भाषा | हिंदी |
“छावा” चित्रपट समीक्षा :-
“छावा” या चित्रपटाला प्रेक्षकांनी इतकं प्रेम दिलंय की अजुनही बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट आपली जादू दाखवत आहे. प्रदर्शित झाल्यानंतर एका गाण्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेला हा चित्रपट आता प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. त्याला कारण एकच. महाराष्ट्राचं दैवत असणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज यांचा दैदिप्यमान इतिहास सांगणारा हा चित्रपट
आहे. लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाला विकी कौशल या गुणी अभिनेत्याने संपूर्ण न्याय दिला आहे. या चित्रपटाबद्दल अधिक काही सांगण्याची गरज नाही.
चित्रपटाची कथा अर्थातच आपल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आहे. बालपणी आईचं छत्र हरवलं आणि पित्याचा कमी लाभलेला सहवास, अशा वेळी प्रसंगी त्यांच्या आठवणींत हळवं होणारे शंभू राजे ते अवघ्या नऊ वर्षांत एकही पराभव होता तब्बल १२० लढाया लढणारे छत्रपती संभाजी महाराज हा दैदिप्यमान इतिहास दाखवणारा हा चित्रपट आहे. आणि शेवटी जवळच्यांनीच दगाबाजी केल्यामुळे आपल्या राजांना जिवंतपणी मरणयातना भोगायला लावून क्रुरकर्मा औरंगजेबाने केलेले छळ बघताना हुंदके आवरत नाहीत.
या चित्रपटासाठी घेतलेली प्रत्येक कलाकाराची मेहनत दिसते. कवी कलश यांच्या भूमिकेतील विनीत सिंह विशेष लक्षात राहतात. औरंगजेब याची भूमिका अक्षय खन्नाने ज्या प्रकारे साकारली आहे त्यावरून हाच अक्षय खन्ना का असा प्रश्न पडतो. विकी कौशल बद्दल काही न बोलेलं बरं. त्याने साक्षात महाराज उभे केले आहेत. रश्मिका मंदाना ऐवजी दुसरा चेहरा येसूबाई म्हणून बघायला जास्त छान वाटलं असतं. आता चित्रपट म्हटलं की शंभर टक्के सगळं बरोबर आणि खरं दाखवतील असं काही नाही. परंतु निदान आजच्या पिढीला शंभुराजे कळावे म्हणून हा चित्रपट नक्कीच दाखवायला घेऊन जा. माझ्याकडून या चित्रपटाला साडेतीन स्टार.
७. धुम धाम (Dhoom Dhaam) |
लेखक | आदित्य धर, ऋषभ सेठ, आर्श वोहरा |
दिग्दर्शक | ऋषभ सेठ |
कलाकार | यामी गौतम धर, प्रतीक गांधी, मुकुल चड्ढा , प्रतीक बब्बर, एजाज खान |
निर्माता | आदित्य धर |
रिलीज तारीख | १४ फेब्रुवारी २०२५ |
भाषा | हिंदी |
“धुमधाम” चित्रपट समीक्षा :-
धुमधाम हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्म वर प्रदर्शित झाला असून ऋषभ सेठ याने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. खर तर या चित्रपटाची कथा आदित्य धर याने २०१४ सालीच लिहीली होती परंतु काही कारणास्तव त्यावर चित्रपट निर्मिती रखडली. शेवटी आता स्वतःच्या पत्नीला म्हणजेच यामी गौतमी हीला मध्यवर्ती भूमिकेत घेऊन हा चित्रपट बनवण्यात आला.
चित्रपटाची कथा ही एका नवीन नुकतंच लग्न झालेल्या जोडप्याची आहे. जे जोडपं लग्नाच्या पहिल्याच रात्री गुंडांपासून जीव वाचवण्यासाठी पळतयं. खर तर त्यांची हीच धुमधाम चित्रपटात पहायला मिळते. झालंय असं की कोयल चड्ढा (यामी गौतम) आणि वीर खुराना (प्रतीक गांधी) या दोघांचं लग्न इतक्या झटपट ठरलंय की दोघं एकमेकांना पुरेसं ओळखत नाहीत. त्यात कोयल ही एक अतिशय संस्कारी, सालस आणि गुणी मुलगी आहे असं सागून हे लग्न केलं जातं. परंतु पहिल्याच रात्री जेव्हा चार्ली नामक व्यक्तीला शोधत काही गुंड या दोघांपर्यंत येऊन पोहचतात तेव्हा तिथून पळ काढल्यानंतर कोयलच दुसरं रूप बघून वीर चक्कर येऊन पडायचा बाकी असतो. संस्कारी कोयल जेव्हा फास्ट गाडी चालवते, पाण्यासारखी दारू पिते, मंत्र म्हणावा तशा शिव्या घालते हे सगळं वीरच्या आकलन शक्तीच्या पलीकडचं असतं. आता ते गुंड यांच्या मागे का लागलेले असतात.? चार्ली कोण असतो.? कोयलचं खरं रूप समजल्यावर त्या दोघांच्या नात्याचं काय होतं हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
काही ठिकाणी चित्रपटाची कथा आताच्या काळाशी सुसंगत वाटत नाही. यामीचा अभिनय उत्तम आहे परंतु काही ठिकाणी जरा अतिरेक झाल्यासारखा वाटतो. प्रतिक गांधी ने चांगला अभिनय केला आहे. ऋषभ सेठ याचं दिग्दर्शन ठिक आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म वर प्रदर्शित झाला हे एकप्रकारे चांगलं आहे. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार.
८. मेरे हजबंड की बिवी (Mere Husband Ki Biwi) |
लेखक | मुदस्सर अजीज |
दिग्दर्शक | मुदस्सर अजीज |
कलाकार | अर्जुन कपूर, रकुल प्रीत सिंह, भूमि पेडणेकर, कंवलजीत सिंह, अनीता राज, शक्ति कपूर,हर्ष गुजराल, आदित्य सील |
निर्माता | वाशू भगनानी, जैकी भगनानी, दीपिका देशमुख |
रिलीज तारीख | २१ फेब्रुवारी २०२५ |
भाषा | हिंदी |
“मेरे हजबंड की बिवी ” चित्रपट समीक्षा :-
“पती,पत्नी और वो” या चित्रपटांनंतर तशाच प्रकारचा आता मेरे हजबंड की बिवी हा चित्रपट मुदस्सर अजीज यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाची कथा सुद्धा नवरा बायकोच्या नात्यात तिसरी व्यक्ती आल्यावर काय होतं यावरच आधारित आहे.
कथा दिल्लीतील अंकुर (अर्जुन कपूर) आणि त्याची घटस्फोट घेतल्यानंतरही पिच्छा न सोडणाऱ्या बायकोची प्रभलीन कौर (भूमि पेडनेकर) आहे. सुरूवातीला प्रेम पण लग्नानंतर काही काळानंतर प्रभलीनने अंकुरचं आयुष्यात वादळ निर्माण केलेलं असावं असं अंकुरला पडणाऱ्या स्वप्नांवरून वाटतं. प्रभलीन आणि अंकुरचा घटस्फोट झाल्यानंतर सुद्धा अंकूर अजुनही त्या धक्क्यातून सावरलेला नसतो. आता नवीन नातं किंवा परत लग्न करावं यासाठी तो धजावत नसतो. परंतु त्याचा मित्र रेहान (हर्ष गुजराल) हा त्याल नवीन कोणाच्या तरी प्रेमात पडावं यासाठी मागे लागलेला असतो. अशातच अंकुरला त्याची कॉलेजमधली त्याला आवडणारी मैत्रीण अंतरा खन्ना (रकुल प्रीत)भेटते. आणि अर्थातच अंकूर आणि अंतरा यांच्यातील जुनं नातं नव्याने फुलायला लागतं. परंतु ट्विस्ट असा येतो की एका ॲक्सिडंट मुळे प्रभलीन च्या मेंदू मधून चक्क मधल्या पाच वर्षांच्या आठवणींचा फोल्डर डिलीट झालेला आहे. तिला फक्त अंकूर आणि तिचे चांगले दिवस आठवतात. आता गंमत ही बघायची आहे की अंकूरला मिळवण्यासाठी या दोघी काय काय प्रयत्न करतात.? अंकुर शेवटी कोणाची निवड करतो.?
चित्रपटाची कथा पटकथा यात काहीच नाविन्य नाही. दिग्दर्शन सुद्धा अगदीच ठिकठाक आहे. ओटीटी वर आल्यावर अगदीच बघायला काही नाही तेव्हा बघू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार.
९. कौशलजीज व्हर्सेस कौशल (Kaushaljis vs Kaushal) |
लेखक | सिद्धार्थ गोयल, सीमा देसाई |
दिग्दर्शक | सीमा देसाई |
कलाकार | आशुतोष राणा, शीबा चड्ढा, पवैल गुलाटी, ईशा तलवार, ब्रजेंद्र काला, ग्रुशा कपूर, आशीष चौधरी |
निर्माता | ज्योति देशपांडे, आशीष शुक्ला, पराग देसाई, आशीष वाघ |
रिलीज तारीख | २१ फेब्रुवारी २०२५ |
भाषा | हिंदी |
“कौशलजीज व्हर्सेस कौशल” चित्रपट समीक्षा :-
मूलं मोठी झाल्यावर आणि स्वतःच्या पायावर उभी राहिली की त्यांना आईवडीलांची गरज नसते. निदान त्यांचं वागणं तरी तसंच असतं. शिक्षणानिमित्त किंवा कामानिमित्त मुलं आईवडिलांपासून दूर गेली की स्वतःच्या आयुष्यात रममाण होतात. मग आपले आईवडील आपल्या मागे एकटे पडले असतील ही जाणीव त्यांना राहत नाही. हीच जाणीव करून देणारा एक हलकाफुलका कौटुंबिक चित्रपट डिस्नी हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्म वर प्रदर्शित झाला आहे. सिद्धार्थ गोयल आणि सीमा देसाई यांनी या चित्रपटाची कथा लिहिली असून सीमा देसाई यांनी दिग्दर्शन केलं आहे.
चित्रपटाची कथा अगदीच साधी सरळ एका कुटुंबाभोवती फिरणारी आहे. कन्नौर शहरातील साहिल कौशल (आशुतोष राणा) हे आमीर खुसरो यांचे खूप मोठे चाहते असतात आणि त्यांना सुद्धा कव्वाल बनायची इच्छा असते. परंतु एखाद्या मध्यमवर्गीय कुटुंब प्रमुखाप्रमाणे ते सुद्धा आपल्या स्वप्नांना तिलांजली देऊन अकांऊटंट म्हणून नोकरी स्विकारतात. तर त्यांची पत्नी संगीता (शीबा चड्ढा) हिला वेगवेगळ्या प्रकारचे अत्तर बनवण्याचा छंद असतो अर्थातच तो सुद्धा घरातील जबाबदाऱ्यांमुळे मागे पडतो. त्यांचा मुलगा युग (पवैल गुलाटी) आणि मुलगी कामानिमित्त सतत घराबाहेर असतात. आपल्या आईवडिलांचं काय सुरू आहे याचा त्यांना पत्ता नसतो. अशातच घरी राहून साहिल आणि संगीता सतत भांडत राहतात. भांडैइतकी होतात की दोघं उतारवयात वेगळं होण्याचा निर्णय घेतात आणि मग येतो मोठा ट्विस्ट. त्यांचा मुलगा युग एका मुलीच्या प्रेमात पडतो जी विभक्त कुटुंबातून आलेली असते आणि तिला एक हसतखेळतं कुटुंब हवं असतं. आता पुढे युग साठी त्याचे आईवडील निर्णय बदलतात का.? त्यांचा निर्णय ऐकून युग काय करतो.? हे सगळं बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल.
कधी हसू येतं तर कधी डोळे पाणावतात. असा हा चित्रपट हलक्याफुलक्या पद्धतीने तुमचं मनोरंजन करतो. कथा नेहमीचीच आहे. प्रत्येकाच्या घरात घडणारी आहे त्यामुळे तुम्हाला ती तुमची वाटते. कलाकारांनी अभिनय उत्तम केला आहे. दिग्दर्शन सुद्धा चांगलं आहे. एकदा बघायला हरकत नाही असा हा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.
१०. शैला (Shaila) |
लेखक | सैम डिसूजा, रंजन कुसुगल, सुनील शर्मा |
दिग्दर्शक | साकी शाह |
कलाकार | सारा खान, रोहित चौधरी |
निर्माता | सुनील शर्मा |
रिलीज तारीख | २८ फेब्रुवारी २०२५ |
भाषा | हिंदी |
“शैला” चित्रपट समीक्षा :-
२८ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेला शैला हा चित्रपट कोणाला माहीत असेल तर नवलच. कारण या चित्रपटाचं ना कोणतं प्रमोशन ना कोणती जाहिरात. साकी शाह यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट अर्थातच बॉक्स ऑफिसवर सुद्धा आपटला आहे.
चित्रपटाची कथा परत एकदा लव्हस्टोरी आणि त्यातील धोका मग बदला अशाच काहीशा स्वरूपाची आहे. सैम डिसूजा, रंजन कुसुगल आणि सुनील शर्मा यांनी मिळून एक अतिशय सामान्य आणि अजिबात नावीन्य नसलेली कथा लिहिली आहे. शैला (सारा खान) आणि कुणाल (रोहित चौधरी) यांची ही प्रेमकथा आहे. काश्मीरमध्ये ही कथा घडताना दाखवली आहे त्यामुळे काश्मीरचं सौंदर्य बघायला मिळतं हाच एक प्लस पॉइंट आहे. काश्मीरमध्ये राहणारी शैला हि एक टिव्ही ॲंकर असून एकदा तिच्या गाडीसमोर कुणालचा अपघात होतो. कुणाल हा फोटोग्राफी साठी काश्मीरमध्ये आलेला असतो. आणि इथूनच मग त्यांची प्रेमाची गोष्ट सुरु होते. त्यात भुतकाळातील अनेक ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळतात. आता ते काय हे चित्रपट बघीतल्यावर कळेल.
चित्रपटाची कथा जेवढी सामान्य तेवढंच दिग्दर्शन सुद्धा. कलाकारांचा अभिनय सुद्धा नवख्या कलाकारांप्रमाणेच आहे. त्यामुळे हा चित्रपट नाही बघीतला तरी चालेल. आयएमडिबी रेटींग बघून चित्रपट बघायचा विचार करत असाल तर विचार रद्द करा. माझ्याकडून या चित्रपटाला एक स्टार.
११. क्रेझी (Crazxy) |
लेखक | गिरीश कोहली |
दिग्दर्शक | गिरीश कोहली |
कलाकार | सोहम शाह , शिल्पा शुक्ला , निमिषा सजायन और टीनू आनंद आदि |
निर्माता | अमिता शाह , मुकेश शाह और सोहम शाह |
रिलीज तारीख | २८ जानेवारी २०२५ |
भाषा | हिंदी |
“द रॅबिट हाऊस” चित्रपट समीक्षा :-
२८ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेला क्रेझी हा चित्रपट नावाप्रमाणेच क्रेझी अशा नायकाचा आहे. “वन मॅन शो” अशा या चित्रपटात सोहम शाह याने एकट्यानेच या चित्रपटात संपूर्ण धुरा सांभाळली आहे. गिरीश कोहली यांनी या चित्रपटाची कथा लिहिली असून दिग्दर्शन सुद्धा त्यांनीच केलेलं आहे.
चित्रपटाची कथा डॉक्टर अभिमन्यु सूद (सोहम शाह) यांच्याभोवती फिरणारी आहे. जो एक निष्णात सर्जन असून सुद्धा त्याच्यावर मेडिकल नेग्लिजेंसचा आरोप केलेला असतो. आणि याच प्रकरणात तो अडकलेला असतो. एका ऑपरेशन दरम्यान त्यांच्या चुकीमुळे एका छोट्या मुलीचा जीव गेलेला असतो आणि ती केस मागे घेण्यासाठी मुलीच्या घरच्यांना पाच करोड रुपये देऊन केस सेटलमेंट करायची असते. कारण या एका केसमुळे त्यांचं लायसन्स रद्द होणार असतं. हेच पैसे द्यायला जात असताना अभिमन्यू ला एक फोन येतो की त्याची स्पेशल चाईल्ड असलेली मुलगी किडनॅप झालेली आहे. आणि तिला सोडविण्यासाठी पाच करोडची मागणी होते. खरं तर ही मुलगी मतिमंद असते म्हणूनच अभिमन्यू ने बायकोला घटस्फोट दिलेला असतो आणि त्यांना सोडून तो एकटा राहत असतो. तर आता अभिमन्यू ते पाच करोड देऊन स्वतःचं भविष्य सुरक्षित करेल की आपल्या न आवडत्या मुलीला वाचवेल हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
संपूर्ण चित्रपटात एकटा सोहम शाह याने बॅटिंग केलेली आहे. शेवटच्या काही सीन्स मध्ये मोजके कलाकार दिसतात. त्यातही त्यांनी चांगला अभिनय केला आहे. संपूर्ण चित्रपट ट्विस्ट आणि टर्न्स ने भरलेला आहे. सोहम शाहने अभिनय उत्तम केला आहे. सुरूवातीला कथा थोडी संथ वाटते. परंतु एकच पात्र तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवतं हे कौतुकास्पद आहे. थ्रिलर चित्रपट आवडत असतील तर हा चित्रपट बघायला हरकत नाही. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार
१२. सुपरबॉईज ऑफ मालेगाव (Superboys of Malegaon) |
लेखक | वरुण ग्रोवर |
दिग्दर्शक | रीमा कागती |
कलाकार | शशांक अरोड़ा, आदर्श गौरव, विनीत सिंह, मुस्कान जाफरी,ऋद्धि कुमार, मंजरी पुपाला,अनुज दुहान , पल्लव सिंह |
निर्माता | जोया अख्तर, रीमा कागती, रितेश सिधवानी, फरहान अख्तर |
रिलीज तारीख | २८ फेब्रुवारी २०२५ |
भाषा | हिंदी |
“सुपरबॉईज ऑफ मालेगाव” चित्रपट समीक्षा :-
“सुपरबॉईज ऑफ मालेगाव” हा चित्रपट रीमा कागती यांनी दिग्दर्शित केला असून वरूण ग्रोवर यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे. हा चित्रपट नाशिक जवळील मालेगाव शहरातील चित्रपट निर्माते नासिर शेख यांच्या जीवनावर आधारित असून याआधीही एक डॉक्युमेंटरी फिल्म यावर आलेली आहे.
चित्रपटाची कथा नाशिक मधील मालेगाव मध्ये घडताना बघायला मिळते. साधारण १९९७ चा काळ दाखवला आहे. मालेगाव मध्ये राहणारा नासिर(आदर्श गौरव) याला चित्रपटसृष्टीचं आकर्षण असतं परंतु खेडेगावात राहणाऱ्या अशा कित्येक जणांचं मायानगरीत जाऊन नशीब आजमावून बघण्याचं स्वप्न हवेत विरलं असेल. नासिर त्यातलाच एक. मग आपली हीच आवड जोपासत त्याने गावात व्हिडिओ पार्लर सुरू केलं. त्यात तो वेगवेगळ्या चित्रपटांचे वेगवेगळ्या सीन्सना जोडून दाखवायचा. मात्र पायरसी चा आरोप करून पोलिस त्याच्या व्हिडिओ पार्लर तोडफोड करतात. यानंतर नासिर ठरवतो की आता जे काही करायचं ते शंभर टक्के ओरिजनल असेल.
तो आपल्या मित्रांना सोबत घेऊन चित्रपट निर्मिती करायची ठरवतो. त्याचं म्हणणं असतं की जर कथा चांगली तर तर चित्रपट लोकांना आवडतोच. त्याचा मित्र फारूख (विनीत सिंह) हा चित्रपटाची कथा लिहिण्याचं काम करतो तर शफीक (शशांक अरोड़ा) हा कॅमेरा वर्क आणि इतर टेक्निकल गोष्टी बघतो. बाकी (अनुज सिंह दुहान) आणि इरफान (साकिब अयूब) हे अभिनय व इतर सगळ्याच घ
गोष्टींसाठी मदत करतात. ‘मालेगांव के शोले’, ‘मालेगांव का सुपरमैन’ अशा पॅरोडी चित्रपटांची निर्मिती करत नासिर आणि मित्रांची गाडी सुसाट वेगाने धावते. परंतु जेव्हा स्वतः नवीन चित्रपटांची निर्मिती केल्यावर त्यात अपयश हाती येतं तेव्हा काय होतं हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
चित्रपटाची जमेची बाजू म्हणजे चित्रपटातील कलाकार. कलाकारांनी अभिनय असा केला आहे की आपण नव्वदच्या दशकात पोहचतोच. दिग्दर्शन उत्तम आहे. पार्श्वसंगीत छान आहे. एकदा बघायला हवा असा हा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.
१३. दिल दोस्ती और डॉग्ज |
लेखक | विरल शाह, निसर्ग वैद्य, हार्दिक संघानी |
दिग्दर्शक | विरल शाह |
कलाकार | नीना गुप्ता, शरद केलकर मासुमेह मखीजा, शरद केलकर, कुणाल रॉय कपूर, कीर्ति केलकर, टीनू आनंद, इहान भट्ट |
निर्माता | ज्योती देशपांडे, मासुमेह मखीजा, विरल शाह, दिपेश उपाध्याय |
रिलीज तारीख | २८ फेब्रुवारी २०२५ |
भाषा | हिंदी |
“दिल दोस्ती और डॉग्ज” चित्रपट समीक्षा :-
२८ फेब्रुवारी रोजी डिस्नी हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्म वर प्रदर्शित झालेला “दिल दोस्ती और डॉग्ज” हा चित्रपट बाकी कोणाला आवडो न आवडो श्वान प्रेमींना मात्र हा चित्रपट नक्कीच आवडेल. बऱ्याच लोकांसाठी कुत्रा हा एक फक्त प्राणी नसून घरातील सदस्य असतो. घरातील लहान मुलांना जेवढा जीव लावला जातो तेवढंच प्रेम ही माणसं पाळीव कुत्र्यावर करतात. हा चित्रपट असंच माणूस आणि श्वान यांच्यातील नात्यावर आधारित आहे.
चित्रपटाची कथा अर्थातच श्वान म्हणजेच कुत्रा या प्राण्याला मध्यवर्ती ठेवून लिहीलेली आहे. एकाच वेळी अनेक ट्रॅकवर चित्रपटाची कथा चालते. एक जोडपं आहे ज्यांना मुल होत नाहीय आणि त्यांचं पटत सुद्धा नाही. सतत भांडणं, रूसवेफुगवे चालू असताना एकदा ते एक श्वान मादी घरी आणतात आणि मग काही दिवसांनी त्या मादीला दिवस जातात त्यामुळे या दोघांचं नातं सुधारायला सुरूवात होते. तर एकीकडे एक छोटी मुलगी एका सावत्र वडीलांना आपले वडील म्हणून स्विकारायला तयार नाही. परंतु तिच्या हरवलेल्या कुत्र्यामुळे त्या दोघांमध्ये सुद्धा आपुलकी निर्माण होते. कशी ते चित्रपट बघितल्यावर कळेल. तर एकीकडे एक हॉटेल मालक आहे ज्याचं कुत्र्यामुळे नुकसान झालेलं आहे आणि ते नुकसान भरून काढण्यासाठी सुद्धा कुत्रा च मदत करतो. तर एक वयस्कर स्त्री आहे जिला कुत्रा आवडत नाही. त्यांच्यातील नातं दाखवलं आहे. असं एकंदरीत बरीच वेगवेगळ्या पात्रांच्या आयुष्यात कुत्रा किती महत्त्वाचा आहे हे या चित्रपटात पहायला मिळतं.
एक साधी हलकीफुलकी गोष्ट आहे. श्वान प्रेमींना हा चित्रपट जवळचा वाटेल. परंतु खराब पटकथा आणि सुमार तांत्रिक पार्श्वभूमीवर हा चित्रपट बनवण्यात आला आहे असं जाणवतं. कथा अजून सक्षम असती तर चित्रपट अजून प्रभावी झाला असता. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.
तर मंडळी वर्षाच्या सुरुवातीला तुम्ही कोणते चित्रपट पाहीलेत आणि त्यापैकी तुम्हाला कोणता आवडला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसंच या वीकेंडला तुम्ही कोणता चित्रपट बघताय हे सुद्धा सांगा.