HomeFilmsMarathi

फेब्रुवारी 2025 मध्ये रिलीझ झालेल्या मराठी चित्रपटांची यादी आणि त्यांची समीक्षा

फेब्रुवारी 2025 मध्ये रिलीझ झालेल्या मराठी चित्रपटांची यादी आणि त्यांची समीक्षा | List of Marathi movies released in February 2025 and their reviews

फेब्रुवारी २०२५ मध्ये प्रदर्शित झालेले हे मराठी चित्रपट तुम्ही पाहिलेत का.?

Written by : आकांक्षा कोलते

Updated : जून 12, 2025 | 10:15 PM

बघता बघता २०२४ हे साल सरलं. २०२४ मध्ये सुद्धा मराठी चित्रपटसृष्टीत नवीन नवीन प्रयोग केले गेले. काही प्रेक्षकांना आवडले तर काही सपशेल फसले. आता २०२५ मध्ये नवीन काय काय बघायला मिळेल हे येणारं वर्षच सांगेल. आज या लेखात वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे फेब्रुवारी महिन्यात कोणते मराठी चित्रपट प्रदर्शित झाले आणि ते कसे आहेत ते बघू.
खरं तर आता वेबसिरीज चा जमाना असल्यामुळे प्रेक्षकांच्या चित्रपटांच्या बाबतीत अपेक्षा वाढल्या आहेत. त्यातही नवीन आलेल्या चित्रपटांमध्ये ओरिजनल कंटेट कमीच असतो. परंतु आशयघन आणि दर्जेदार कथानक हा मराठी चित्रपटांचा गाभा आहे. मराठी चित्रपट हे नेहमीच वास्तववादी आणि चांगला कंटेंट घेऊन भेटीला येतात हे आता प्रेक्षकांच्या लक्षात येत आहे. त्यामुळे मराठी चित्रपटांना प्रेक्षक आता भरभरून प्रतिसाद देतात. असं असलं तरीही हल्ली इतके चित्रपट प्रदर्शित होत असतात की ते तेवढे दर्जेदार असतातच असं नाही. त्यामुळे आम्ही हे सांगण्याचा प्रयत्न करू की प्रदर्शित झालेला एखादा चित्रपट खरंच बघायला हवा की नको.
आज या लेखात आपण फेब्रुवारी २०२५ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपट आम्हाला कसे वाटले ते सांगणार आहोत. ज्यामुळे ते बघायला हवे की नको ते ठरवणं तुम्हाला सोपं जाईल.

List of Marathi Movies released in February 2025 & Movie review and information

१. स ला ते स ला ना ते (Sa La Te Sa La Na Te)
२०२५. सस्पेंस, ड्रामा, थ्रिलर. २ तास २३ मिनिटे. [U/A]
लेखक संतोष कोल्हे
दिग्दर्शकसंतोष कोल्हे
कलाकारसाईंकीत कामत, उपेंद्र लिमये, छाया कदम
निर्मातासंतोष कोल्हे
रिलीज तारीख७ फेब्रुवारी २०२५
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.९⭐/ ५

स ला ते स ला ना ते” चित्रपट समीक्षा :-

संतोष कोल्हे लिखित आणि दिग्दर्शित सलाते सलानाते हा चित्रपट ७ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला. दुर्दैवाने फारशा स्क्रीन न मिळाल्याने आणि कदाचित प्रमोशन न झाल्याने चित्रपटाला कमी प्रतिसाद मिळाला. चित्रपटाची कथा, आशय हे नेहमीच्या चित्रपटांपेक्षा वेगळा आहे. त्याच त्याच प्रेमाचा त्रिकोण असलेल्या कथा किंवा बायोपिक वगैरे यापेक्षा वेगळा विषय संतोष कोल्हे यांनी या चित्रपटात मांडला आहे.
“नात्यांच्या व्याकरणाची गोष्ट” अशी टॅग लाईन असलेल्या या चित्रपटात तेजस देशमुख (साईंकीत कामत) हा विदर्भातील चंद्रपूर भागातील एक असा तरूण आहे ज्याला वेगवेगळे व्हिडिओ बनवून सोशल मिडियावर पोस्ट करायला आवडत असतात. असंच एकदा एक व्हिडिओ बराच व्हायरल होतो आणि मग तेजस पत्रकार बनतो. हा त्याच्या आयुष्यातील मोठा टर्निंग पॉइंट ठरतो. दरम्यान त्याच्या आयुष्यात समिधा (रिचा अग्निहोत्री) येते. समिधा बोलताना अडखळत बोलते त्यामुळे पहिल्याच भेटीत जेव्हा ती तेजसच पूर्ण नाव उच्चारू शकत नाही त्यामुळे मग ते दोघं एकमेकांना स आणि ते अशा नावाने हाक मारतात. या स आणि ते च्या नात्याची गोष्ट एकीकडे सुरू होते परंतु तेजस पैसे कमावण्यासाठी राजकीय नेत्यांच्या मागणीनुसार जेव्हा खोटे व्हिडिओ बनवायला लागतो तेव्हा याच नात्याची गोष्ट कशी बिघडत जाते हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल. खोटे व्हिडिओ बनवल्यामुळे चंद्रपूरच्या जंगलातील अनेक रहस्यं बाहेर येतात. याचाच शोध घेण्यासाठी पोलिस अधिकारी म्हणून छाया कदम यांची दमदार भूमिका बघायला मिळते.
उपेंद्र लिमये यांनी नकारात्मक भूमिका साकारली असून अर्थात त्यांनी ती उत्तम साकारली आहे. सगळ्याच कलाकारांनी अभिनय उत्तम केला आहे. चंद्रपूर मधील निसर्गाच सौंदर्य या चित्रपटात पहायला मिळतं. माणूस, राजकारण, पर्यावरण या सगळ्यांचं एकमेकांशी असलेलं नातं या चित्रपटात पहायला मिळतं. एक वेगळ्या प्रकारचा चित्रपट म्हणून नक्की बघायला हवा. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.


२. एक राधा एक मीरा (Ek Radha Ek Meera)
२०२५. ड्रामा. रोमँटिक. २ तास १२ मिनिटे. [U/A]
लेखक किरण यज्ञोपवीत
दिग्दर्शकमहेश मांजरेकर
कलाकारगश्मिर महाजनी, सुरभी भोसले, संदीप पाठक, मेधा मांजरेकर आणि आरोह वेलणकर
निर्माताअविनाशकुमार प्रभाकर अहले
रिलीज तारीख७ फेब्रुवारी २०२५
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.४⭐/ ५

एक राधा एक मीरा” चित्रपट समीक्षा :-

थेट स्लोव्हेनियामध्ये चित्रिकरण करण्यात आलेला चित्रपट म्हणजे “एक राधा एक मीरा” हा ७ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला होता परंतु आता तो ॲमेझॉन प्राईम वर उपलब्ध आहे. बाहेरच्या देशात चित्रिकरण ही गोष्ट सोडली तर चित्रपट अगदीच सुमार आहे. मुळात चित्रपट बघताना हेहमहेश मांजरेकर यांचं दिग्दर्शन आहे यावर विश्वास ठेवणं जरा जड जातं.
“प्रेमाचा त्रिकोण” हे टिपिकल चित्रपटाचा कथानक आहे. चित्रपटाचा नायक कृष्णा(गश्मिर महाजनी) याचं सानवी(सुरभी भोसले) हीच्यावर प्रेम असतं. परंतु ज्या मुलीच्या वडिलांकडे आपले वडील ड्रायव्हर म्हणून काम करतात त्या मुलीसमोर प्रेम कसं व्यक्त करावं म्हणून तो प्रेम कधी सांगत नाही. सानवी ही एक लाडावलेली एकुलती एक लाडकी मुलगी असते. कृष्णा आणि सानवी यांच्यात खूप घट्ट मैत्री असते. तर एकीकडे कृष्णा नंतर उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशात जातो. तिकडे त्याच्या आयुष्यात मनस्वी(मृण्मयी देशपांडे) येते. अतिशय बिनधास्त आणि नावाप्रमाणे मनस्वी आयुष्य जगत असलेल्या मनस्वी आणि कृष्णा यांच्या मध्ये कालांतराने प्रेम निर्माण होतं. आता पुढे नक्की कोणाचं लग्न कोणासोबत होतं हे बघण्यासाठी मात्र हा चित्रपट बघावा लागेल.
किरण यज्ञोपवीत यांनी एक अतिशय सामान्य आणि अजिबात नावीन्य नसलेली कथा लिहिली असून तेवढंच सामान्य ठिकठाक दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केलं आहे. बाहेरच्या देशातील चित्रिकरण सोडलं तर चित्रपटात बघण्यासारखं काही नाही. भडक मेकअप, आलिशान बंगले, छान लोकेशन्स, चांगले कपडे या सगळ्या पेक्षा कथानकावर अजून काम केलं असतं तर कदाचित चित्रपट बरा तरी बनला असता. मृण्मयी देशपांडे हिचा असा अवतार का असा प्रश्न पडावा अशी वेशभूषा आणि मेकअप आहे. गश्मिर महाजनी बरा आहे. इतर पण सगळं खूपच नाटकी आणि ओढून ताणून केलंय असं वाटतं. एकंदर फसलेला चित्रपट आहे. नाही बघितला तरी चालेल. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार.


३. वहिवाट (Wahiwat)
२०२५. ड्रामा. १ तास ४५ मिनिटे. [U/A]
लेखक विजय पवार
दिग्दर्शकडॉ. संजय तोडकर
कलाकारराज वरक, प्रणवी पाटील, रुकैया शिलेदार, एन डी कार्वेकर, तनुजा कदम, अमृत सावंत, भक्ती गोमई, संजय टिपुगडे
निर्माताडॉ. संजय तोडकर
रिलीज तारीख७ फेब्रुवारी २०२५
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.४⭐/ ५

वहिवाट” चित्रपट समीक्षा :-

आजकाल प्रत्येकाला विकास हवाय. परंतु विकासाची व्याख्या मात्र प्रत्येकासाठी वेगळी असते. सामान्य माणसासाठी हवा असलेला विकास आणि राजकीय नेते यांना हवा असलेला विकास यामागे खूप वेगळी भूमिका आणि हेतू असतो. विकास म्हटलं की निसर्गावर आक्रमक हे पर्यायाने येतंच. आणि निसर्गावर घातलेला प्रत्येक घाव हा माणसाला व्याजासह परत करावा लागतो. याचीच जाणीव करून देणारा वहिवाट हा चित्रपट डॉ संजय तोडकर यांनी दिग्दर्शित केला असून ७ फेब्रुवारी रोजी तो प्रदर्शित झाला.
एका आदिवासी पाड्यावर घडणारी ही कथा आहे. आदिवासी पाड्यावरील माणसाचं जीवन हे पूर्णपणे निसर्गावरच अवलंबून असते. निसर्ग हाच त्यांच्यासाठी देव असतो. अशाच एका आदिवासी पाड्यावर गावचा विकास करून देणारा एक प्रस्ताव येतो. ते गाव दत्तक घेतल्याचा उदात्तपणाचा आव आणून गावकऱ्यांची फसवणूक होत असते. अर्थात हा विकास हवा असणारा एक गट असतो तसंच त्यामागचं कारस्थान आणि पर्यायाने पाड्याचं होणारं नुकसान समजणारा एक गट असतो. आता पुढे नक्की काय होतं हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल. खरं तर हा चित्रपट खूप कमी ठिकाणी प्रदर्शित झाला.
चित्रपटाचा विषय अत्यंत महत्त्वाचा आणि चांगला आहे परंतु सादरीकरण आणि इतर तांत्रिक गोष्टी बघता अजून चांगल्या प्रकारे करता आल्या असत्या. दिग्दर्शन बरं आहे. कलाकार नवीन आहेत हे अभिनयातून लक्षात येतेच. एकंदर चित्रपटाचा विषय चांगला असला तरी मनोरंजन करण्यात चित्रपट कमी पडतो. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार.


४. चिकीचिकी बूबूम बूम (ChikiChiki BooBoomBoom)
२०२५. विनोदी, सस्पेंस. २ तास ७ मिनिटे. [U/A १३+]
लेखक प्रथमेश शिवलकर, प्रसाद खांडेकर
दिग्दर्शकप्रसाद खांडेकर
कलाकारस्वप्नील जोशी, प्रार्थना बेहेरे, प्राजक्ता माळी, प्रसाद खांडेकर, रोहित जोशी
निर्मातासुनील नारकर
रिलीज तारीख२८ फेब्रुवारी २०२५
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.५⭐/ ५

चिकीचिकी बूबूम बूम” चित्रपट समीक्षा :-

मराठी चित्रपटांना प्रेक्षक प्रतिसाद देत नाहीत, चित्रपटांना चित्रपटगृहात स्क्रीन मिळत नाही म्हणून नेहमीच निर्माते दिग्दर्शक यांची तक्रार असते परंतु चिकीचिकी बूबूम बूम सारखे चित्रपट काढल्यावर प्रेक्षक चित्रपटगृहात जाऊन का असे चित्रपट बघतील यावर निर्माते दिग्दर्शक यांनी विचार करणं गरजेचं आहे.
प्रसाद खांडेकर यांनी यापूर्वी सुद्धा अशाच धर्तीवर असाच प्लॉट असलेला चित्रपट काढला होता. चांगले कलाकार असून सुद्धा तो चित्रपट सपशेल आपटला म्हटल्यावर त्यांनी यावेळी काहीतरी वेगळं करणं अपेक्षित होतं. काहीशी तशीच वाटणारी ही गोष्ट सुद्धा सस्पेन्स आणि कॉमेडी अशी आहे. एका बंगल्यात घडणारी ही धमाल गोष्ट पाच मित्र आणि त्यांना सापडलेले दोन मृतदेह यांच्याभोवती फिरणारी आहे. आदित्य(प्रथमेश शिराळकर), वैभव(स्वप्नील जोशी), भैया (प्रसाद खांडेकर), तुमदेव (रोहित माने), रवी (प्राजक्ता माळी) आणि धनश्री (प्रार्थना बेहेरे) हे सगळे मित्र मैत्रिणी गेट टुगेदर निमित्त एका बंगल्यात भेटतात. वैभव(स्वप्नील जोशी) याने या गेट टुगेदर चं आयोजन केलेलं होतं. सगळी धमाल करण्याचं आयोजन परंतु ट्विस्ट काही वेगळा येतो. या मित्रांना‌ त्या ठिकाणी दोन मृतदेह आढळतात. आणि मग ते मृतदेह लपविण्यासाठी एक वेगळीच धमाल उडते. थोड्या थोड्या वेळाने कोणी ना कोणी बंगल्यावर येत असतं. अशातच मग पोलिस निरीक्षक विठ्ठल मांजरेकर (अभिजीत चव्हाण) हे तिथे पोहचतात. आणि मग शोध सुरू होतो तपासाचा. आता ते दोघं कोण असतात.? त्यांचा खून कोणी आणि का केलेला असतो.? हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
प्रथमेश शिवलकर आणि प्रसाद खांडेकर यांनी लिहिलेल्या या कथेत काहीच नाविन्य नाही. प्रसाद खांडेकर यांचं दिग्दर्शन सुद्धा बरं म्हणावं असंच आहे. कलाकारांचा अभिनय चांगला आहे परंतु चित्रपट म्हणावा तसा प्रभावी नाही. मराठी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक यांनी जरा वेगळे विषय घेऊन चित्रपट निर्मिती करायला हवी. ओटीटी प्लॅटफॉर्म वर आल्यावर विनोदी म्हणून एकदा बघायला हरकत नाही असा हा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार.


५. गौरीशंकर (GauriShankar)
२०२५. ॲक्शन, ड्रामा. २ तास ४ मिनिटे. [U/A १६+]
लेखक हरेकृष्णा गौडा
दिग्दर्शकहरेकृष्णा गौडा
कलाकारकाव्या सूर्यवंशी, हरेकृष्ण गौडा
निर्माताविशाल संपत
रिलीज तारीख२८ फेब्रुवारी २०२५
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.५⭐/ ५

गौरीशंकर” चित्रपट समीक्षा :-

प्रेम, ताटातूट आणि त्या रागातून घेतला जाणारा बदला यावर आधारित असलेला गौरीशंकर हा चित्रपट २८ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला असून हरेकृष्णा गौडा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं आहे. दाक्षिणात्य चित्रपटाचा तडका असलेला हा चित्रपट म्हणजे एक फसलेला प्रयोग आहे.
गौरी (काव्या सूर्यवंशी) आणि शंकर (हरेकृष्ण गौडा) चित्रपटाचे नायक आणि नायिका आहेत. त्यांचं एकमेकांवर प्रेम असतं परंतु अशा काही घटना घडतात की त्यांची ताटातूट होते. आणि इथुनच सुडाची आग पेटते आणि शंकर अन्यायाविरुद्ध पेटून उठतो.आता त्याला न्याय मिळतो का हे बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल.
साऊथ इंडियन चित्रपटाची कॉपी वाटेल असाच हा चित्रपट आहे. ॲक्शन सीन्स, मारामारी आवडत असेल तर चित्रपट एकदा बघू शकता. परंतु नवीन असं चित्रपटात काही नाही. दिग्दर्शन ठिकठाक आहे. कलाकारांचा अभिनय सुद्धा बरा म्हणावा असाच आहे. तांत्रिक पार्श्वभूमीवर सुद्धा चित्रपट कमी पडतो. एकंदर फसलेला चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार.

    तर मंडळी यापैकी तुम्ही कोणते चित्रपट पाहीलेत आणि आवडलेत का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसंच या विकेंडला वरीलपैकी कोणता चित्रपट बघायला आवडेल हे सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *