HomeFilmsFilms NewsMarathi

बॉलिवूडला पण मागे टाकणारे २०२२ मधील पाच सुपरहिट मराठी चित्रपट तुम्ही पाहीलेत का..?

Written by : आकांक्षा कोलते

Updated : नोव्हेंबर 14, 2022 | 10:50 PM

  ओटीटी प्लॅटफॉर्म मुळे सिनेमागृहांमध्ये जाऊन चित्रपट पहाणाऱ्यांची संख्या नाही म्हटलं तरी काही प्रमाणात कमी होत चालली हे नक्की. त्यात मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांना तशी ओढ कमीच. पण हल्ली प्रेक्षकांनी हे विधान खोटं ठरवायचं ठरवलं आहे, कारण हल्ली इतक्या छान आणि दर्जेदार मराठी चित्रपटांची निर्मिती होत आहे. आज असेच काही न चुकता बघावे असे २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या सुपरहिट चित्रपटांची माहिती आम्ही देणार आहोत. 
 
Five superhit Marathi movies 1
१. मी वसंतराव
२०२२. नाटक / संगीत / कौटुंबिक. २ तास ५५ मिनिटे
लेखकनिपुण धर्माधिकारी, उपेंद्र सिद्धये
दिग्दर्शकनिपुण धर्माधिकारी
स्टारकास्टराहुल देशपांडे, अनिता दाते, पुष्कराज चिरपुटकर, अमेय वाघ,
प्रदर्शित तारीख१ / ४ / २०२२
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ४.3✰ / ५✰

” मी वसंतराव” चित्रपट समीक्षा :-
या चित्रपटाबद्दल रिव्ह्यू काय लिहावा.? खरं तर हा एक अनुभव आहे. जो फक्त चित्रपटगृहात जाऊनच अनुभवायला हवा. संगीतप्रेमी प्रेक्षकांसाठी तर सुरांनी भरलेली ही एक सांगितिक मेजवानी आहे.
“मी वसंतराव” या नावावरूनच लक्षात येते की हा चित्रपट म्हणजे संगीतक्षेत्रात स्वतःची वेगळी आणि स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या, स्वतःची विशिष्ट गायकी असणाऱ्या गायक पंडित वसंतराव देशपांडे यांच्यावर आधारित हा चित्रपट आहे.
अविनाश धर्माधिकारी यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाला रसिक प्रेक्षकांनी मनापासून दाद दिली. वसंतराव देशपांडे यांचा जीवनप्रवास उलगडून दाखवताना त्यांच बालपण ते त्यांची शेवटची मैफिल हा प्रवास आपल्याला त्या काळात त्यांच्यासोबत जाऊन जगता येतो. त्यांची संगीत शिकण्याची सुरूवात, त्यांच्या सांसारिक आयुष्यातील चढउतार , संगीत शिकण्याची आवड आणि इच्छा असूनही जबाबदाऱ्या पार पाडायच्या म्हणून संगीतापासून झालेला दुरावा बघताना आपसूकच आपण हळवे होतो. खरं तर याचं श्रेय दिग्दर्शकासोबत राहूल देशपांडे यांचं देखील.
राहुल देशपांडे अक्षरशः ही भूमिका जगले आहेत असं म्हणावं लागेल कारण चित्रपटामध्ये अभिनय करण्याची ही त्यांची पहिलीच वेळ. आणि कदाचित आपल्याच आजोबांची भुमिका साकारताना नक्कीच त्यांच्या भावना अभिनयातून आपल्याला पहायला मिळतात. अनिता दाते हीने सुद्धा त्यांच्या आईची भूमिका अतिशय सुंदर साकारली आहे.
आयुष्यात योग्य मार्गदर्शक म्हणजेच गुरू लाभणं हे किती महत्त्वाचं असतं हे चित्रपट बघताना लक्षात येतं. गाणं गाताना असं गावं की लोकांनी शब्दच विसरावेत. स्वत:चा आवाज विसरावा. विचार करणंच विसराव. दाद द्यायला विसरले म्हणजे ती खरी दाद.! हा मोलाचा सल्ला देणारे गुरू वसंतरावांच्या पाठीशी उभे होते. ”तसंच चांगली संगत, चांगला मित्र आयुष्यात असेल आयुष्य बरंच सोपं होत हे या चित्रपटात भाईंकडे म्हणजेच पु. ल. देशपांडे यांच्याकडे बघून कळत. पुष्कराज चिरपुटकर याने भाईंची केलेली भुमिका म्हणजे या चित्रपटाला लाललेले चार चांद आहेत असं म्हणायला हरकत नाही.
प्रवाहाच्या विरुध्द काही करणाऱ्यांना त्रास देणारी जमात ही आधीपासूनच अस्तित्वात असल्यामुळे वयाच्या चाळीशी नंतर सुरू केलेला वसंतरावांचा संगीतक्षेत्रातील प्रवास हा किती खडतर होता हे या चित्रपटात पहायला मिळते. अशावेळी पु. ल. सारखे मित्र, आई, पत्नी, गुरू हे सगळेच सोबतीला होते म्हणून ते या प्रवासात यशस्वी होऊ शकले. शंकरराव सप्रे, मास्टर दीनानाथ मंगेशकर, पु. ल. देशपांडे, उस्ताद खान, बेगम अख्तर या सगळ्यांच्ं त्यांच्या आयुष्यातील स्थान दाखवण्यात सुद्धा निपुण यशस्वी झाला आहे.
‌कौमुदी, सारंग साठे, अलोक राजवाडे यांना मिळालेल्या भूमिका पण छोट्या असल्या तरी महत्त्वपूर्ण आहेत आणि त्यांनी त्या छान साकारल्या आहेत. लांबीला जास्त असला तरी हा चित्रपट बघताना अजिबात कंटाळा येत नाही. नेटफ्लिक्स, जिओ सिनेमा, वूट, हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्म वर हा चित्रपट उपलब्ध आहे. माझ्याकडून या चित्रपटाला पाचपैकी साडेचार स्टार.

२. पावनखिंड
२०२२. ऐतिहासिक. २ तास ३३ मिनिटे. [ यु / ए ]
लेखकदिग्पाल लांजेकर
दिग्दर्शकदिग्पाल लांजेकर
स्टारकास्टअजय पुरकर, चिन्मय मांडलेकर, अंकीत मोहन, दिग्पाल लांजेकर, मृणाल कुलकर्णी, प्राजक्ता माळी.
प्रदर्शित तारीख१८ फेब्रुवारी २०२२
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.९✰ / ५✰

पावनखिंड चित्रपट समीक्षा:-
पावनखिंडीत झालेली लढाई माहीत नाही किंवा तो इतिहास आपण ऐकला नाही असं नाही. पण तरीसुद्धा पावनखिंड या चित्रपटाच्या निमित्ताने बऱ्याच गोष्टी आपल्याला नव्याने कळतात.
पावनखिंडीतील लढाई म्हटलं की आपल्याला आठवतात ते बाजीप्रभू देशपांडे. आणि त्यांचं स्मरण हे व्हायलाच हवं पण आपल्या बलिदानाने पावनखिंड अजरामर करण्यासाठी बाजीप्रभू देशपांडे सोबत अजून काही मावळे लढले होते ते म्हणजे “बांदल”. बांदलसेना हे नाव बऱ्याच लोकांना आतापर्यंत माहीत नव्हतं पण ते या चित्रपटाच्या निमित्ताने सगळ्यांपर्यंत पोहोचलं. आणि याचं श्रेय अर्थातच दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांना जातं.
दिग्पाल यांनी शिवाजी महाराज आणि त्यांचा इतिहास चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याचं शिवधनुष्य उचललं आणि ते तेवढ्याच समर्थपणे पेललं आहे.
पन्हाळगड ते विशाळगड हे अंतर रात्रीच्या वेळी पार करणं तेसुद्धा शत्रू चा पाठलाग चुकवत, स्वतःला रानावनातून, काट्याकुट्यातून चालत अंतर पायी कापण हे किती अवघड आहे हे चित्रपट बघताना लक्षात येतं. विशाळगडाच्या पायथ्याशी आपल्या आधी आपला शत्रू दबा धरून बसलेला असतानाची लढाई बघताना अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.
बाजीप्रभू देशपांडे, बांदलसेनेच्या शौर्याची त्यांच्या सर्वोच्च बलिदानाची ही गाथा चित्रपटाच्या माध्यमातून बघताना डोळे शेवटपर्यंत पाणावलेलेच राहतात. मोहीमेवर गेलेल्या आपल्या माणसाची वाट बघणाऱ्या अर्धांगिनी बघताना इतकं अस्वस्थ व्हायला होतं की वाटतं कुठून इतकं धैर्य आणत होत्या असतील तेव्हाच्या स्त्रिया.
पावनखिंड हा फक्त सिनेमा म्हणून बघायला जाऊ नका. आपल्या पुढच्या पिढीपर्यंत हा इतिहास पोहचला पाहिजे म्हणून बच्चे कंपनीला घेऊन ही शौर्यगाथा दाखवायला नक्की घेऊन जा. माझ्याकडून या चित्रपटाला चार स्टार. ॲमेझॉन प्राईम वर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता.

३. पांघरूण
२०२२. प्रेमकहाणी. २ तास ११ मिनिटे
लेखकगणेश मतकरी, महेश मांजरेकर
दिग्दर्शकमहेश मांजरेकर
स्टारकास्ट गौरी इंगावळे, अमोल बावडेकर, रोहीत फाळके
प्रदर्शित तारीख४ फेब्रुवारी २०२२
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.८✰ / ५✰

पांघरूण चित्रपट समीक्षा :-
“पांघरूण…पुन्हा एक विलक्षण प्रेमकहाणी” नावाप्रमाणेच हा एक विलक्षण अनुभव आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील कोकणातील एका छोट्याशा खेड्यात घडणारी ही कथा बघताना डोळ्यांचे पारणे फिटल्याशिवाय राहत नाही.
ही कथा आहे लक्ष्मीची. वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी वैधव्य आलेल्या लक्ष्मीचा हा जीवनप्रवास बघताना अनेक नात्यांचे पैलू उलगडताना दिसतात. स्वातंत्र्यपूर्व काळ दाखवला असला तरी विधवा पुनर्विवाहाला समाजात हळूहळू मान्यता मिळत होती तेव्हाचा हा काळ. वडिलांच्या शब्दाबाहेर नसलेली लक्ष्मी वडिलांच्या सांगण्यावरून अंतू भटजी या वडिलांच्या वयाइतक्या व्यक्तीसोबत लग्न करते. तेव्हा फक्त पत्नी म्हणूनच नाही तर स्वतःच्या वयाच्या दोन मुलींची आई म्हणून लक्ष्मी नवीन घरात येते.
पण स्वतःच्या पहिल्या पत्नीला न विसरलेले अंतू भटजी लक्ष्मीला पत्नी म्हणून स्विकारतील का..? स्त्री म्हणून असलेल्या लक्ष्मीच्या गरजा पूर्ण होतील का.? कि त्या न‌ झाल्यामुळे लक्ष्मीचं पाऊल घसरेल का.? हे सगळंच बघताना मानवी नात्यांची गुंफण, घालमेल, अस्वस्थता सगळंच अनुभवायला मिळणार आहे.
“हि अनोखी गाठ कोणी बांधली..? एक झाले उन आणि सावली..” वैभव जोशींच्या या ओळी ऐकताना मनाचा एक कोपरा हळवा होतो. “देह आला की मायेचे पाश त्यांच्याभोवती येणारचं.” हे असे ताकदीने लिहीलेले संवाद ऐकताना चित्रपटाची खोली कळते. तुम्ही संगीतप्रेमी असाल तर हा चित्रपट तर तुम्ही नक्कीच बघा.! माझ्याकडून या चित्रपटाला चार स्टार. झी फाइव्ह वर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता.

४. एकदा काय झालं
२०२२, कौटुंबिक. २ तास १० मिनिटे. [ यु ]
लेखकडॉ. सलील कुलकर्णी
दिग्दर्शकडॉ. सलील कुलकर्णी
स्टारकास्ट उर्मिला कानेटकर, डॉ. मोहन आगाशे, सुहास जोशी, पुष्कर श्रोत्री, अद्वैत गुळेकर, राजेश भोसले, सतिश आळेकर, ऋषिकेश देशपांडे
प्रदर्शित तारीख५ ऑगस्ट २०२२
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.६✰ / ५✰

एकदा काय झालं.. चित्रपट समिक्षा :-
गोष्ट म्हणजे लहान मुलांच्या आवडीचा विषय. पण ही गोष्ट म्हणजेच हा चित्रपट संपूर्ण कुटुंबाने पहावा असा आहे. वाढत्या वयातील मुलगा आणि त्याचे वडील यांच्या नात्यातील बंध उलगडणारा हा सिनेमा म्हणजे “एकदा काय झालं..”
वडिलांचा प्रकाशनाचा चालू असलेला व्यवसाय बंद करून शिक्षणात वेगळे प्रयोग करणारी “नंदनवन” नावाची शाळा सुरू करणारा किरण (सुमीत राघवन) आणि त्याचा मुलगा चिंतन (अर्जुन पूर्णपात्रे) यांची ही गोष्ट आहे. यात किरणची पत्नी श्रुती म्हणून (उर्मिला कानेटकर), तर आई- (सुहास जोशी), वडील (डॉ. मोहन आगाशे) यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
मध्यांतरापर्यंत सिनेमाची कथा छान साधी सोपी वाटत असते आणि अचानक सगळं चित्र बदलायला सुरुवात होते. नंदनवन मधील मुलांना गोष्ट नाट्य रुपात सांगता यावी यासाठी ॲम्फी थिएटर असावं हे स्वप्न बघणाऱ्या किरणच्या आयुष्यात जेव्हा अशा काही गोष्टी घडायला सुरुवात होते की ज्यामुळे कुटुंबातील सगळ्यांचचं आयुष्य बदलून जातं.
आपल्या वडिलांसारखं असावं अशी इच्छा असणारा चिंतन पुढे जाऊन बदलतो का.? त्याच्या वडिलांचं थिएटरचं स्वप्न पूर्ण होतं का.? वडील मुलाच्या नात्यामध्ये बदल होतो का.? हे सर्व पाहण्यासाठी हा चित्रपट नक्कीच बघा.
गोष्ट जर साधी सोपी असेल तर तर ती चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहचवणं तेवढंच कठीण. त्या गोष्टीतील मर्म प्रेक्षकांना समजावण्यासाठी लेखकाच्या लिखाण क्षमतेचा कस लागतो. पण हे काम डॉ. सलील कुलकर्णी यांनी अफलातून केले आहे. या चित्रपटाची पटकथा, त्यात असलेलं संगीत, यातील संवाद या सगळ्याचं जबाबदाऱ्या सलील कुलकर्णी यांनी लीलया पार पाडल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या चित्रपटाचं दिग्दर्शन सुद्धा सलील कुलकर्णी यांनीच केलेलं आहे.
हा चित्रपट बघताना तुम्ही अंतर्मुख होऊन जाल हे नक्की. ही आपलीच गोष्ट आहे असं वाटावं हेच या चित्रपटाचं यश! माझ्याकडून या चित्रपटाला चार स्टार.ॲमेझॉन प्राईम वर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता.

५. गोदावरी
२०२२. कौटुंबिक. १ तास ५२ मिनिटे
लेखकप्राजक्त देशमुख, निखिल महाजन
दिग्दर्शकनिखिल महाजन
स्टारकास्टजितेंद्र जोशी, संजय मोने, नीना कुलकर्णी, विक्रम गोखले, गौरी नलावडे, सानिया भंडारे
प्रदर्शित तारीख११ नोव्हेंबर २०२२
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.४✰ / ५✰

गोदावरी चित्रपट समीक्षा :-
जिंतेंद्र जोशी हा एक हरहुन्नरी चतुरस्त्र असा कलाकार आहे आणि वेळोवेळी त्याने ते सिद्ध केलं आहे. नुकताच म्हणजेच दोन दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या “गोदावरी” या सिनेमात सुद्धा त्याने अभिनेता, निर्माता आणि गीतकार अशा तिहेरी भूमिका अतिशय उत्तमरित्या पार पाडल्या आहेत.
गोदावरी नदीच्या सात शाखांप्रमाणे निशी(जितेंद्र जोशी) या मुख्य पात्राभोवती फिरणाऱ्या अजून सित महत्वाच्या भुमिका यात पहायला मिळतात. नाशिकच्या गोदावरीकाठी अनेक वर्षांपासून वसलेल्या देशपांडे कुटुंबाची ही गोष्ट आहे. पिढ्यानपिढ्या चालत आलेला परंपरागत व्यवसाय जेव्हा मोडीत काढण्याचा प्रयत्न जेव्हा एखादी पिढी करते तेव्हा त्या कुटुंबातील सदस्यांच्या नात्यांमध्ये काय परिणाम होतो हे पडद्यावर दाखवणारा आरसा म्हणजे “गोदावरी”.
मनाविरुद्ध वडिलोपार्जित व्यवसाय करताना होणारी जितेंद्रची घुसमट बघताना अस्वस्थ व्हायला होतं. आई वडिलांविरूद्ध जाता येत नाही म्हणून एकाच घरात राहून पत्नी मुलांपासून सुद्धा अलिप्त असं एका वेगळ्या खोलीत राहणारा निशी किती भावनिक आणि हळवा आहे हे क्षणोक्षणी जाणवतं.
“चार वर्षांचा होतो तेव्हापासून ह्या घाटावरच्या पिंडांवरचा भात खाऊन जगलोय…” प्रियदर्शन चा हा संवाद ऐकताना मनात कालवाकालव होते. कलाकारांच्या बाबतीत बोलायचं झालं तर गोदावरी हा चित्रपट सर्वार्थाने सक्षम आहे. विक्रम गोखले, संजय मोने, नीना कुलकर्णी अशा एकापेक्षा एक सरस अशा कलाकरांनी या चित्रपटाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे.
सध्या सिनेमागृहात जाऊन हा चित्रपट तुम्ही पाहू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला चार स्टार.

“जगभरून फिल्म्स ” च्या पसंतीस उतरलेले हे सुपरहिट मराठी चित्रपट तुम्हाला आवडतात की नाही ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

Content Writer
Writer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *