HomeFilmsHindiMarathi

भारतीय देशभक्ती वर मराठी-हिंदी चित्रपट तुम्ही बघायलाच हवे | You must watch Marathi-Hindi movies on Indian Patriotism

 खरी देशभक्ती म्हणजे काय हे अनुभवायचं असेल तर हे चित्रपट तुम्ही बघायलाच हवे!_ |  If you want to experience what real patriotism is, you must watch this movie!_

Written by : आकांक्षा कोलते

Updated : ऑगस्ट 14, 2022 | 05:40 PM

 

       उद्या ७५ वा स्वातंत्र्य दिन. स्वातंत्र्यदिन म्हटलं की एक वेगळंच स्फुरण चढतं. आपल्याला स्वातंत्र्यदिन साजरा करताना एक वेगळाच जोश आणि उत्साह असतो. पण हे स्वातंत्र्य इतक्या सहजपणे मिळालेलं नाही. त्यासाठी कित्येकांनी आपल्या जीवाचं बलिदान देऊन हे स्वातंत्र्य मिळवून दिलं आहे. या जवानांच्या, क्रांतिकारकांच्या देशभक्ती समोर सारंच नगण्य. 

Marathi Hindi 20films 20on 20Indian 20Patriotism

     अशाच काही जवानांची, क्रांतिकारकांची आठवण म्हणून बरेच हिंदी मराठी सिनेमे बनवले गेले आहेत. त्यापैकीच काही सिनेमांची नावं आम्ही तुम्हाला सांगणार आहोत जेणेकरून उद्या तुम्ही आपल्या मुलांसोबत ते पाहू शकता. कितीही म्हटलं तरी सिनेमा हे सगळ्यात प्रभावी माध्यम आहे. या चित्रपटांच्या माध्यमातून मुलांच्या मनात तुम्ही देशभक्तीचं बीज पेरू शकता. चला तर मग पाहूया कोणकोणते चित्रपट तुम्ही उद्या पाहू शकता.

१. राझी

२0१८   सीबीएफसी :- यू / ए   कालावधी : – २ तास १८ मिनिटे   
शैली : – ॲक्शन, नाटक, रोमांचक                                     
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – 3.7 / 5
पथकथा                     : –  भवानी अय्यर, मेघना गुलझार
दिग्दर्शक                   : –  मेघना गुलझार 
कलाकार                   : – आलिया भट्ट, विकी कौशल रजित कपूर, अमृता खानविलकर शिशिर शर्मा 
 
“राझी” चित्रपट समीक्षा :

       २०१८ साली प्रदर्शित ,मेघना गुलजार यांच्या अप्रतिम अशा दिग्दर्शनातून निर्माण झालेली कलाकृती राझी हा  सिनेमा निव्वळ अप्रतिम आहे. हा फक्त सिनेमा नाही, तर फक्त देशासाठी आपलं आयुष्य पणाला लावलेल्या एका भारतीय गुप्तहेर स्त्रीची ही कथा आहे. साधारण १९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धा दरम्यान ची ही गोष्ट आहे. एक वीस वर्षाची काश्मिरी मुलगी(आलिया भट्ट) एका पाकिस्तानी लष्करप्रमुखाशी( विकी कौशल) लग्न करते. गुप्तहेर म्हणुन कर्तव्य बजावण्यासाठी आपला देश, आपले आईवडील सगळ्यांना सोडून ती पाकीस्तानात जाते. आणि कशाप्रकारे ती ही जबाबदारी पार पाडते हे पाहताना गुप्तहेर म्हणुन काम करणाऱ्या सगळ्यांचा अभिमान वाटतो.

        “RAW Agent” म्हणजेच गुप्तहेर म्हणुन कर्तव्य बजावत असताना आपल्या वैयक्तिक भावभावनांना, नात्यांना दुय्यम स्थान दिले जाते. तर देशहितासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दुसऱ्या देशात जाऊन स्वतःची ओळख, अस्तित्व विसरून काम करावं लागतं. आणि हेच आलिया ने राझी या चित्रपटात इतकं सुंदर काम केलं आहे की बघताना किती तरी वेळा अंगावर काटा उभा राहतो. पोटात भीतीचा गोळा येतो. हे सगळं अनुभवायला हा चित्रपट एकदा तरी नक्की बघाच. माझ्याकडून या चित्रपटाला  ५ स्टार

पैकी ४ स्टार रेटिंग देईन.

२. उरी : द सर्जिकल स्ट्राईक

२०१९   सीबीएफसी :- यू / ए   कालावधी : – २ तास १८ मिनिटे   
शैली : – ॲक्शन, नाटक, इतिहास                                  
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – 3.9 / 5
लेखक                       : – आदित्या धार
दिग्दर्शक                   : – आदित्या धार
कलाकार                   : – विकी कौशल, परेश रावल, मोहित रोना
 
“उरी : द सर्जिकल स्ट्राईक” चित्रपट समीक्षा :

       आपल्या भारतीय सैन्याची साहसी शौर्यगाथा सांगणारा चित्रपट म्हणजे २०१९ साली प्रदर्शित झालेला “उरी: द सर्जिकल स्ट्राईक”. विकी कौशल याच्या अभिनयाची ताकद पुन्हा एकदा पहायला मिळते.

        १८ सप्टेंबर २०१६ रोजी पाकिस्तानी सैन्याने आपल्या जम्मू काश्मीर मधील उरी इथे असलेल्या भारतीय लष्करी तळावर भ्याड हल्ला केला होता. त्यात आपले १९ जवान शहीद झाले होते. आणि याच हल्ल्याचं प्रतिउत्तर म्हणून भारतीय सैन्याने सर्जिकल स्ट्राईक करून आपला बदला पूर्ण केला होता. 

        प्रत्येक भारतीयाने नक्कीच बघावा असा हा चित्रपट आहे. आपण आपल्याच भावविश्वात मग्न होऊन मजेत जगत असताना आपण सुरक्षित आयुष्य जगावं म्हणून आपल्या जवानांना नक्की काय करावं लागतं, हे समजून घेण्यासाठी तरी हा सिनेमा आवर्जून बघावा. 

“झी 5” या ॲपवर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला  ५ स्टार पैकी ४ स्टार रेटिंग देईन. 

३. मेजर

२०२२   सीबीएफसी :- यू / ए   कालावधी : – २ तास ३० मिनिटे   
शैली : – ॲक्शन, नाटक, जीवनचरित्र                           
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – 3.5 / 5
लेखक                       : – आदिवी शेष (कथा), अब्बूरी रवी (संवाद) 
दिग्दर्शक                   : – साक्षी किरण टिक्का 
कलाकार                   : – आदिवी शेष, प्रकाश राज, रेवथी, मुरली शर्मा, सई मांजरेकर

“मेजर” चित्रपट समीक्षा :

        काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला मेजर हा चित्रपट बघताना तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. कारण २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या संदीप उन्नीकृष्णन यांचा जीवनपट उलगडणारा हा चित्रपट आहे. या दहशतवादी हल्ल्यामध्ये आपले NSG चे एकूण ५१ जवानांना त्यांच्या प्राणांची आहुती द्यावी लागली होती. २६/११ चा तो हल्ला आठवला तरी भीती, चीड, संताप अशा संमिश्र भावना दाटून येतात.

         दाक्षिणात्य सुपरस्टार अदिवि शेष याने “संदीप उन्नीकृष्णन” यांची मुख्य भूमिका साकारली असून अतिशय उत्तम अभिनय केला आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर कमी वेळातच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.

         देशसेवेसाठी सदा तत्पर असलेल्या सैनिकांना सुद्धा वैयक्तिक, वैवाहिक आयुष्य असतं, नातीगोती असतात. आणि हे सगळं मागे टाकून जराही विचार न करता हे जवान आपला प्राण गमवायला तयार होतात ते फक्त आणि फक्त देशासाठी. हेच सगळं तुम्हाला या चित्रपटात पाहायला मिळेल. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्म वर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला  ५ स्टार पैकी ३.८ स्टार रेटिंग देईन. 

४. बॉर्डर

१९९७   सीबीएफसी :- यू / ए   कालावधी : – २ तास ५६ मिनिटे   
शैली : – ॲक्शन, नाटक, इतिहास       
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – 3.8 / 5 
लेखक                       : – जे. पी. दत्ता (पथकथा), ओ. पी. दत्ता (संवाद)
दिग्दर्शक                   : – जे. पी. दत्ता
कलाकार                   : – सनी देवल, सुनील शेट्टी, अक्षय खन्ना, जॅकी श्रॉफ, तब्बू

“बॉर्डर” चित्रपट समीक्षा :

        देशभक्ती आणि हिंदी सिनेमा म्हटलं की “बॉर्डर” या सिनेमाला विसरून चालणार नाही. अक्षय खन्ना, सुनील शेट्टी, सनी देओल, जॅकी श्रॉफ अशी तेव्हाची सुपरस्टार असलेली तगडी स्टारकास्ट या चित्रपटात होती. राजस्थान येथील भारतीय सैन्यतळावर पाकिस्तानी सैन्याकडून झालेल्या हल्ल्याला करण्यात आलेला प्रतिहल्ला अशी एकंदर चित्रपटाची मांडणी आहे. १९९७ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. खास या चित्रपटातील गाणी. 

       “संदेसे आते हैं, हमें तड़पाते हैं…” हे गाणं आजही तेवढंच लोकप्रिय आहे. १५ ऑगस्ट असो किंवा २६ जानेवारी ठिकठिकाणी हे गाणं ऐकायला मिळतं. सीमेवर देशासाठी लढणाऱ्या सैनिकांची मनाची अवस्था या गाण्यातून खूप सुंदर दाखवल्या आहेत. 

ॲमेझॉन प्राईमवर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला  ५ स्टार पैकी ३. ८ स्टार रेटिंग देईन.

५. LOC : कारगील

२००३   सीबीएफसी :- यू   कालावधी : – ४ तास १५ मिनिटे   
शैली : – युद्ध, नाटक, इतिहास         
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – 2.5 / 5 
लेखक                       : – जे. पी. दत्ता (पथकथा), ओ. पी. दत्ता (संवाद)
दिग्दर्शक                   : – जे. पी. दत्ता
कलाकार                   : – संजय दत्त, अजय देवगण, सैफ अली खान, सुनील शेट्टी, अक्षय खन्ना, अभिषेक बच्चन, नागार्जुन, राणी मुखर्जी, करीना कपूर, रवीना टंडन, संजय कपूर
 
“LOC : कारगील” चित्रपट समीक्षा :

       १९९९ साली कारगील येथे झालेल्या भारत पाकिस्तान युद्धावर आधारित हा सिनेमा आहे. भारतीय लष्कराचं सामर्थ्य दाखविणारा एक उत्तम सिनेमा. पाकिस्तानी सैन्यानं घुसखोरी करून पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसखोरी केल्यानंतर भारतीय सैन्याने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा धाडसाने त्या युद्धात विजय मिळवला होता. २६ जूलै १९९९ हाच तो दिवस. सर्वाधिक उंचीवर झालेलं हे एकमेव युद्ध.

       २००३ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट सगळ्यात जास्त लांबीचा म्हणजेच जवळपास चार तास पंधरा मिनिटांचा आहे. संजय दत्त, सुनील शेट्टी, सैफ अली खान, मनोज बाजपेयी, अभिषेक बच्चन, अजय देवगण, अक्षय खन्ना असे अनेक बॉलिवूड स्टार या चित्रपटात आहेत.   

ॲमेझॉन प्राईमवर हा सिनेमा उपलब्ध आहे. माझ्याकडून या चित्रपटाला  ५ स्टार पैकी २.५ स्टार रेटिंग देईन. 

५. विटी दांडू

२०१४   सीबीएफसी :- यू   कालावधी : – १ तास ५७ मिनिटे
शैली : – नाटक, इतिहास        
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – 3 / 5 
लेखक                       : – विकास कदम 
दिग्दर्शक                   : – गणेश कदम 
कलाकार                   : – दिलीप प्रभावळकर, मृणाल ठाकूर, रवींद्र मंकणी
 
“विटी दांडू” चित्रपट समीक्षा :

        २०१४ साली प्रदर्शित झालेला विटी दांडू हा मराठी चित्रपट स्वातंत्र्यपूर्व काळातील एका गोष्टिवर आधारित आहे. आजोबा आणि नातू यांच्या नात्याची ही गोड गोष्ट तर आहेच पण स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच्या अगदी पाच सहा दिवसांची एक गोष्ट आजोबा आपल्या नातवाला सांगतात.

स्वतःच्या आईवडीलांनी आणि गावातील इतर लोकांनी आपल्या देशप्रेमापोटी केलेल्या संघर्षाची आणि बलिदानाची ही कहाणी आहे. 

       उद्याचा स्वातंत्र्य दिनी अजय देवगण निर्मित विटी दांडू हा मराठी चित्रपट तुम्ही नक्कीच बघा. आणि हा सिनेमा तुम्ही “झी 5” या ॲपवर अगदी विनामूल्य पाहू शकता हे विशेष. माझ्याकडून या चित्रपटाला  ५ स्टार पैकी ३ स्टार रेटिंग देईन. 

६. लोकमान्य : एक युगपुरुष

२०१५   सीबीएफसी :- यू    कालावधी : – २ तास १९ मिनिटे
शैली : – नाटक, इतिहास,जीवनचरित्र       
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – 3.5 / 5 
लेखक                       : – ओम राऊत, कौस्तुभ सावरकर
दिग्दर्शक                   : – ओम राऊत 
कलाकार                   : – सुबोध भावे, श्वेता महाडिक, चिन्मय मांडलेकर, प्रिया बापट 
 
“लोकमान्य : एक युगपुरुष”  चित्रपट समीक्षा :

      “लोकमान्य : एक युगपुरुष” हा लोकमान्य टिळक यांच्या आयुष्यावर आधारित असलेला पहिलावहिला मराठी चित्रपट २०१५ साली प्रदर्शित झाला होता. जहाल विचारसरणीचे लोकमान्य टिळक सुबोध भावे यांनी हुबेहूब पडद्यावर रंगवले होते. ओम राऊत दिग्दर्शित हा चित्रपट आपल्याला त्या काळात घेऊन जातो पण आताच्या काळातल्या विचारसरणीशी जोडून ठेवतो. 

          लोकमान्य टिळकांचा आयुष्य पट असा काही तासांमध्ये चित्रित करणे तसे अवघड पण त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे प्रसंग बघायला मिळतात. सार्वजनिक गणेशोत्सव, शिवजयंती, प्लेग ची साथ आली होती तो कठीण काळ, रॅंड नावाच्या इंग्रजाने घातलेला धुमाकूळ, लोकमान्य आणि आगरकरांची मैत्री , काळ्या पाण्याची शिक्षा आणि सुटका हा थरारक प्रवास या चित्रपटात पाहायला मिळतो. माझ्याकडून या चित्रपटाला  ५ स्टार पैकी ३.५ स्टार रेटिंग देईन. 

७. वासुदेव बळवंत फडके 

२००७  सीबीएफसी :– यू   कालावधी : – २ तास ६ मिनिटे
शैली : – नाटक, इतिहास,जीवनचरित्र       
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – 2.5 / 5
लेखक                       : – गजेंद्र अहिरे (संवाद), अजिंक्य देव(पथकथा), आशिष देव (संवाद)
दिग्दर्शक                   : – गजेंद्र अहिरे 
कलाकार                   : – अमिताभ बच्चन, अजिंक्य देव, रमेश देव, सोनाली कुलकर्णी, विजय पाटकर, चंद्रकांत गोखले, विजय कदम
 
“वासुदेव बळवंत फडके” चित्रपट समीक्षा :

       “भारतीय सशस्त्र क्रांतिचे आद्य जनक” म्हणून ओळखले जाणाऱ्या वासुदेव बळवंत फडके यांच्या आयुष्यावर आधारित असलेला हा मराठी चित्रपट २००७ साली प्रदर्शित झाला होता. गजेंद्र अहिरे दिग्दर्शित या चित्रपटात अजिंक्य देव यांनी वासुदेव फडके यांची मध्यवर्ती भुमिका साकारली होती. 

          १८५७ च्या देशव्यापी उठावाच्या पराभवानंतर पुन्हा एकदा फडके यांनीच “स्वदेशी ” चं व्रत स्विकारून इंग्रजांना दिलेले आव्हान, रामोशी टोळ्यांना इंग्रजांविरुद्ध च्या लढाईत सामील करून घेणे, तेव्हाचा दुष्काळ अश्या बऱ्याच गोष्टी या चित्रपटात पाहायला मिळतात. एकूण चित्रपट नक्कीच बघण्यासारखा आहे. माझ्याकडून या चित्रपटाला  ५ स्टार पैकी २.५ स्टार रेटिंग देईन.

८. दि लिजेंड ऑफ भगतसिंग 

२००२  सीबीएफसी :- यू   कालावधी : – ३ तास ३५ मिनिटे
शैली : – नाटक, इतिहास, जीवनचरित्र       
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – 3.5 / 5
लेखक                       : – रणजित कपूर (संवाद), पियुष मिश्रा (संवाद), अंजुम राजाबली (इंग्लिश संवाद)  
दिग्दर्शक                   : –  राजकुमार संतोषी 
कलाकार                   : – अजय देवगण, सुशांत सिंग, डी. संतोष, राज बब्बर, अमृता राव 
“दि लिजेंड ऑफ भगतसिंग” चित्रपट समीक्षा :

      ‘द लिजंड ऑफ भगतसिंग’ हा सिनेमा ७ जून, २००२ रोजी प्रदर्शित झाला होता. क्रांतीकारक भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या देशभक्तीचे दर्शन घडविणारा हा अतिशय लोकप्रिय झाला होता. देशाला स्वातंत्र्य मिळावं यासाठी या तिघांनीही क्रांतिकारी लढा दिला होता. या चित्रपटात अजयन देवगण ने भगतसिंह ही मुख्य भूमिका साकारली होती. 

        देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अवघ्या २३ व्या वर्षी प्राण सोडणाऱ्या शाहिद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या देशभक्तीला तोड नाही. त्यांच्या हौतात्म्याला त्रिवार वंदन. त्यांच्याप्रती आदर म्हणून तरी हा सिनेमा एकदा तरी बघाच. बऱ्याच प्लॅटफॉर्म वर हा सिनेमा तुम्ही विनामूल्य उपलब्ध आहे. माझ्याकडून या चित्रपटाला  ५ स्टार पैकी ४ स्टार रेटिंग देईन. 

९. स्वदेस

२००४  सीबीएफसी :- यू   कालावधी : – ३ तास ९ मिनिटे
शैली : – नाटक, संगीत 
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – 3.3 / 5
लेखक                       : – एम जि. सत्या (कथा), आशुतोष गोवारीकर (कथा), समीर शर्मा (पथकथा) 
दिग्दर्शक                   : – आशुतोष गोवारीकर, 
कलाकार                   : – शाहरुख खान, गायत्री जोशी, मकरंद देशपांडे
 
“स्वदेस” चित्रपट समीक्षा :

       भारतीयांना देशभक्ती वर आधारित सिनेमे नेहमीच आवडतात. त्यामुळे बॉलिवूड मध्ये असे बरेच चित्रपट आजपर्यंत बनवले‌ गेले. पण त्यापैकी काही चित्रपट प्रेक्षकांना विशेष भावले. पैकी एक “स्वदेस”. २००४ साली प्रदर्शित झालेला हा सिनेमा बघून परदेशी गेलेले बरेच लोक भारतात कायमस्वरूपी परतले असं ऐकायला मिळत होतं.

      शाहरुख खान या चित्रपटात फार वेगळा वाटतो. शांत, संयमी पण तेवढाच परिणामकारक. या चित्रपटातील “ये जो देस है तेरा” हे गाणं लोकांना मनावर अजूनही राज्य करतं. हा एकमेव भारतीय चित्रपट आहे की ज्यामध्ये “नासा” सेंटर मध्ये चित्रित केलेली काही दृश्ये बघायला मिळतात. 

       देशभक्तीच्या एका वेगळ्याच पठडीतला हा सिनेमा एकदा तरी जरूर बघा. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्म वर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला  ५ स्टार पैकी ४.५ स्टार रेटिंग देईन. 

१०. “१९७१”

२००७  सीबीएफसी :- यू / ए    कालावधी : – २ तास १६ मिनिटे
शैली : – नाटक, युद्ध
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – 3.2 / 5
लेखक                       : – पियुष मिश्रा 
दिग्दर्शक                   : – अम्रित सागर 
कलाकार                   : – मनोज बाजपेयी, रवी किशन, दीपक डोब्रियल 
 
“१९७१” चित्रपट समीक्षा :

       २००७ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात मनोज बाजपेयी यांची प्रमुख भूमिका असून या भुमिकेसाठी त्यांना दोन राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले आहेत. 

       चित्रपटाचे नावचं “१९७१” असे असून या चित्रपटात भारत पाकिस्तान युद्धाचा थरार दाखवण्यात आलेला आहे. युद्ध संपल्यानंतर पाकिस्तान च्या ताब्यात असलेले सैनिक सहीसलामत मायदेशाकडे देण्याबाबतच्या आंतरराष्ट्रीय कायद्याचं पाकिस्तानने केलेले उल्लंघन आणि त्याभोवती फिरणारी कथा या चित्रपटात पहायला मिळते. 

     १९७१ च्या भखरत पाकिस्तान युद्धानंतर भारताचे बरेच सैनिक पाकिस्तान च्या ताब्यात होते. आणि पाकिस्तानी सैन्याकडून त्यांचा होणारा छळ, आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःची बाजू राखण्यासाठी त्यांना लपवून ठेवणे, अशा बऱ्याच गोष्टी या चित्रपटात पाहायला मिळतात आणि माणूस म्हणून आपण अंतर्मुख होऊन जातो. 

       बऱ्याच भारतीय युद्धकैद्यांची न संपणारी प्रतीक्षा म्हणजे काय हे “१९७१”  हा चित्रपट  सांगतो. खऱ्या प्रसंगावर आधारित हा सिनेमा युद्धकैदी सैनिकांची बाजू अधोरेखित करतो.

युट्युब वर हा सिनेमा विनामूल्य पाहू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला  ५ स्टार पैकी ३.५ स्टार रेटिंग देईन. 

    आम्हाला खात्री आहे उद्या यापैकी एक तरी सिनेमा तुम्ही नक्कीच बघाल. कमेंट करून आठवणीने सांगा तुम्ही कोणता सिनेमा पाहिला आणि स्वातंत्र्यदिन कसा साजरा केला. “जगभरून फिल्म्स” तर्फे सर्व वाचकांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

धन्यवाद.

लेखक – आकांक्षा कोलते

Akanksha 20Kolte 20bio

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *