भोपाळ दुर्घटनेवर बेतलेल्या नेटफ्लिक्स च्या “द रेल्वे मेन” या सीरिजवर जगभरातून इतका कौतुकाचा वर्षाव का बरं होत आहे.?
भोपाळ दुर्घटनेवर बेतलेल्या नेटफ्लिक्स च्या “द रेल्वे मेन” या सीरिजवर जगभरातून इतका कौतुकाचा वर्षाव का बरं होत आहे.?
Written by : आकांक्षा कोलते
Updated : डिसेंबर 17, 2023 | 11:27 PM

द रेल्वे मेन : द अनटोल्ड स्टोरी ऑफ भोपाळ १९८४ |
लेखक | आयुष गुप्ता |
दिग्दर्शक | शिव रवैल |
कलाकार | आर. माधवन, के के मेनन, दिव्येंदू, बाबिल खान, जुही चावला |
निर्माता | आदित्या चोप्रा, उदय चोप्रा, योगेंद्र मोगरे, अक्षय विधानी |
सीजन | १ |
एकूण एपिसोड | ४ |
प्रदर्शित तारीख | १८ नोव्हेंबर २०२३ |
देश | इंडिया |
भाषा | हिंदी |
कथा :-
“द रेल्वे मेन” सीरिज समीक्षा :-
वेबसिरीज म्हटलं की वास्तववादी चित्रण, वास्तववादी अभिनय दाखवण्याच्या नादात फक्त अश्लीलता, बीभत्सपणा, पडद्यावर दिसणारं खरंखुरं वाटावं म्हणून नुसता शिव्यांचा भडीमार आणि नको तेवढे बोल्ड सीन्स भरलेले असतात. आणि मग अशा सिरीज प्रेक्षकांना सुद्धा आवडतात. पण या सगळ्यातलं काहीही नसताना नेटफ्लिक्स च्या “द रेल्वे मेन” या सिरिजने एक वेगळा विक्रम केला आहे. जगभरात तब्बल ३६ देशांमध्ये ही वेबसिरीज ट्रेंडींग मध्ये आहे. ४ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रदर्शित झालेल्या शिव रवैल दिग्दर्शीत या सिरीजला जगभरातून पसंती मिळत आहे.
२ डिसेंबर १९८४ ची एक काळीकुट्ट भयाण रात्र. मध्यप्रदेशातील भोपाळ मधील युनियन कार्बाईड या कारखान्यातून २ डिसेंबर रोजी पहाटे पहाटे झालेल्या विषारी वायूच्या गळतीने हजारो लोक अक्षरशः तडफडून मरण पावले. लाखो लोक जखमी झाले, लाखो लोकांना त्याचे दुष्परिणाम भोगावे लागले, आजही भोगत आहेत. या सगळ्यात चुक कोणाची हे माहीत असूनही पुढे त्याचं काही झालं नाही. परंतु या दुर्घटनेत असे काही “अनसंग हीरो” होते ज्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता तेथील लोकांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्यासाठी जमेल तशी मदत केली. फॅक्टरी पासून काही अंतरावर असलेल्या भोपाळ जंक्शन स्थानकावर लोकांना वाचवण्यासाठी काय काय प्रयत्न केले गेले, त्या प्रयत्नांची गोष्ट सांगणारी ही सिरीज आहे.
भोपाळ स्टेशनवर ड्युटीवर असलेले स्टेशन मास्तर इफ्तिकार सिद्दिकी (के के मेनन), कॉन्स्टेबल (दिव्यांदू ) शर्मा, इमाद रियाज(बबील खान), रती पांडे (आर माधवन) या चार महत्त्वाच्या पात्रांभोवती ही सिरीज फिरत असली तरी दिब्येंद्रू भट्टाचार्य, जुही चावला, सनी हिंदुजा, मंदीरा बेदी, रघूबिर यादव, प्रितम जैस्वाल या सहकलाकारांच्या सुद्धा महत्वाच्या भूमिका यात आहेत.
काय आहे कथानक.?
या वेबसिरीज मध्ये एकूण फक्त चार एपिसोड आहेत. प्रत्येक एपिसोड बऱ्याच गोष्टींवर भाष्य करतो. पहिल्या भागात युनियन कार्बाईड फॅक्टरी मधील एका टॅंकमधील मिथाईल आयसोसायनाइट या वायूचा पाण्याशी संपर्क आल्यामुळे ही दुर्घटना कशी घडली हे पाहायला मिळतं. आणि इथूनच पुढे काय काय होतं, जवळच असलेल्या भोपाळ जंक्शन स्थानकावर काय परिस्थिती निर्माण होते हे पुढच्या भागांमध्ये पहायला मिळतं.
या परिस्थितीत स्वतःचं कुटुंब किंवा स्वतःचा जीव याला प्राधान्य न देता आपलं कर्तव्य महत्वाचं आहे, आणि माणूस म्हणून काय करायला हवं ते सगळं स्टेशन मास्तर इफ्तिकार सिद्दिकी यांनी केलं. तेव्हा त्यावेळी खरोखर उपस्थित असलेल्या स्टेशन मास्तर गुलाम दस्तगीर यांनी केलेलं हे योगदान या सिरीजच्या निमित्ताने जगासमोर आणण्याचा हा प्रयत्न खरं तर याआधी व्हायला हवा होता. के के मेनन यांनी हे पात्र साकारताना अभिनयाचं सर्वोच्च परिमाण इथं वापरलं असावं. स्वतःला त्रास होत असताना स्टेशनवर उपस्थित लोकांना वाचवणं हे परमकर्तव्य मानून त्यांनी जे काही केलं ते शब्दात व्यक्त करणं निव्वळ अशक्य.
त्याच वेळी तिथे गोरखपूर एक्स्प्रेस ही ट्रेन येणार असते त्यामुळे त्या ट्रेन मध्ये असलेल्या हजारो लोकांना वाचवण्यासाठी इफ्तिकार सिद्दिकी यांच्या मदतीला तत्कालीन सेंट्रल रेल्वेचे जनरल मॅनेजर रती पांडे धावून येतात. अर्थात ही भूमिका आर माधवन शिवाय अजून कोणी इतकी उत्तम केली असती ही शंका आहे.
त्याच वेळी त्या स्टेशनवर एक अतिशय हुशार चोर त्याच स्टेशनवर चोरी करण्यासाठी कॉन्स्टेबलचा वेश परिधान करून आलेला असतो परंतु ही वायुगळती झाल्यावर जी काही परिस्थिती निर्माण झाली त्यानंतर इफ्तिकार सिद्दिकी यांना बघून त्याच्यातील माणुसकी जागी होते आणि तो सुद्धा मदत करतो. दिव्यांदू शर्मा याने त्याला मिळालेल्या या भूमिकेचं सोनं केलं आहे.
इफ्तिकार सिद्दिकी यांना त्यावेळी अजून महत्वाची मदत मिळाली ती म्हणजे इमाद रियाज म्हणजेच बबील खान. इमाद हा आधी युनियन कार्बाईड फॅक्टरीत कामाला असतो परंतु लोको पायलट म्हणून दुर्घटने दिवशी स्टेशन वर त्याचा पहीलाच दिवस असतो. स्टेशनवर उपस्थित प्रवाशांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्याची इमाद याने सुद्धा स्वतःच्या जिवाची पर्वा केली नाही. बबीलने ही भूमिका इतकी जीव ओतून केली आहे की त्याच्या वडिलांप्रमाणे त्याचा अभिनय सुद्धा त्याच्या डोळ्यात दिसतो.
त्यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेले पत्रकार केसवानी यांनी दुर्घटने आधीच ही शक्यता वर्तवली होती. यामध्ये हे पात्र सन्नी हिंदुजा यांनी साकारलं आहे.यात पत्रकार जगमोहन कुमावत असं नाव असून त्यांनी आपल्या वर्तमानपत्रांतून,लेखातून सांगितलं होतं की भोपाळ शहराखाली युनियन कार्बाईड फॅक्टरीच्या रूपात बॉम्ब लावण्यात आला आहे जो कधीही फुटू शकतो. सिरीजची सुरूवात ही जगमोहन कुमावत यांच्यापासूनच होते. सनी हिंदुजा यांनी हे पात्र अगदी मन लावून उभं केलं आहे.
वायू गळती झाल्यावर गाढ झोपेत असणारे लोक जागे होऊन अक्षरशः सैरावैरा पळत सुटले होते. काहींना रक्ताच्या उलट्या झाल्या, डोळे लाल होऊन चुरचुरत होते. लोकांना श्वास घ्यायला जमत नव्हतं. हे इतकं भयाण आणि विदारक होतं की तेव्हा कोणी कोणाला मदत करण्याच्या अवस्थेतच नव्हतं. वायू गळती झाली आहे हे कळल्यावर युनियन कार्बाईड चे मॅनेजर म्हणून काम बघत असलेले काम्रुद्दीन(दिब्येंद्रू भट्टाचार्य) यांनी प्रसंगावधान राखत स्वतःचा जीव गमावला. दिब्येंद्रू यांना मिळालेल्या थोड्याशा भुमिकेत सुद्धा त्यांनी नैसर्गिक अभिनयाची छाप पाडली आहे.
वायू गळती झाल्यावर तो इतक्या वेगाने पसयला की लोकांना कुठे पाळण्यासाठी वेळच मिळाला नाही. बऱ्याच लोकांचा लोंढा भोपाळ स्थानकावर पोहोचला. काही हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी धावले परंतु डॉक्टरांना परिस्थिती नेमकी कशामुळे निर्माण झाली आहे आणि उपचार काय करायचे हेच माहीत नव्हतं. हे सर्व चित्रण इतक्या सहजपणे आणि हुबेहूब पडद्यावर मांडण्यात आलं आहे की आपण त्या काळात, त्या ठिकाणी पोहचलोय असं बघताना वाटतं.
या सीरिजमध्ये भोपाळ दुर्घटना घडल्यानंतर जे जे घडलं ते दाखवलं गेलं आहेच परंतु त्याच सोबत त्यावेळी इंदिरा गांधी यांची हत्या त्यांच्या शीख अंगरक्षकाने केल्यामुळे शीख समुहाबद्दल जो द्वेष निर्माण झाला होता त्याची झलक सुद्धा गोरखपूर एक्स्प्रेस या ट्रेनमध्ये
दाखवली गेली आहे.
दिग्दर्शक शिव रवैल यांनी ही मोठी भयानक दुर्घटना ज्या पद्धतीने पडद्यावर उलगडून दाखवली आहे त्याला तोड नाही. कुठेच भंपकपणा नाही की अतिरेक नाही. फक्त चार भागांत आटोपशीर अशी सिरीज आहे. संपूर्ण भोपाळ जंक्शन स्थानकाचा सेट इतका तंतोतंत उभा केला आहे की संपूर्ण सिरीज बघताना कुठेच जाणवत नाही की हा सेट असू शकतो. सगळ्या कलाकारांची निवड हा या सिरीजचा प्लस पॉइंट आहे. प्रोडक्शन डिझायनिंग, सिनेमॅटोग्राफी, सेट्स, कलाकारांचा अभिनय, संपादन या सगळ्या गोष्टी इतक्या उत्कृष्टपणे पार पाडल्या आहेत की ही सिरीज सर्वार्थाने परिपूर्ण आहे.
भोपाळमध्ये ही वायू गळती झाल्यावर अनेक प्रश्न उपस्थित राहीले. युनियन कार्बाईड या कंपनीला भारतात फॅक्टरी साठी परवानगी मिळण्यापासून ते या दुर्घटनेला जबाबदार कोण असे अनेक प्रश्न उपस्थित होऊन सुद्धा पुढे त्याबद्दल काही झालं नाही. इतकंच काय तर या घटनेवर आधारित याआधी क्वचित एखादा चित्रपट आला असेल इतकं याबद्दल बोलणं , व्यक्त होणं टाळलं गेलं. त्यामुळे या दुर्घटनेबद्दल या सिरीजच्या निमित्ताने पुन्हा एकदा अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. या विषयावर आधारित सिरीज बनवली गेली त्याबद्दल निर्माते आदित्य चोपडा, उदय चोपडा, लेखक आयुष गुप्ता आणि शिव रवैल यांचं विशेष कौतुक. खरं तर जगाच्या औद्योगिक इतिहासातील सर्वात मोठ्या भीषण दुर्घटनेवर आधारित अशा प्रकारची कलाकृती बनवणं ही त्यावेळी बलिदान दिलेल्या सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांना दिलेली मानवंदना आहे.
अभिनयाने संपन्न आणि अभ्यासपूर्ण असलेली ही सिरीज तुम्ही नक्कीच बघायला हवी. सिरीज संपल्यावर राहून राहून एक प्रश्न आपल्याला पोखरत राहतो माणसाचा जीव इतका स्वस्त आहे का.? हा प्रश्न का पडतो हे तुम्ही स्वतः सिरीज बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल. सर्वार्थाने परिपूर्ण असलेल्या या मिनी सिरीजला माझ्याकडून चार स्टार.
“द रेल्वे मेन” सीरिज कुठे पाहू शकतो..?
नेटफ्लिक्स वर पाहू शकता.
लेखक स्टार रेटिंग : –
उत्तम दिग्दर्शन, भूमिका यासाठी माझ्याकडून ५ स्टार पैकी ४ स्टार देईन.
तुम्ही द रेल्वे मेन सीरिज पाहिली असेल तर तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट मध्ये लिहायला विसरू नका.