मार्च २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी
Written by : आकांक्षा कोलते
Updated : जून 20, 2023 | 12:12 AM
आशयघन आणि दर्जेदार कथानक हा मराठी चित्रपटांचा गाभा आहे. मराठी चित्रपट हे नेहमीच वास्तववादी आणि चांगला कंटेंट घेऊन भेटीला येतात हे आता प्रेक्षकांच्या लक्षात येत आहे. त्यामुळे मराठी चित्रपटांना प्रेक्षक आता भरभरून प्रतिसाद देतात.
२०२२ चा शेवट वेड या चित्रपटाने लोकांना अक्षरशः वेड लावून गेला. तर २०२३ ची सुरुवात दणक्यात झालीय का ते आपण बघूया. आज आम्ही तुम्हाला २०२३ मध्ये जानेवारी महिन्यात प्रदर्शित झालेले चित्रपट सांगणार आहोत.

१. रौंदळ |
दिग्दर्शक | गजानन नाना पडोळ |
कलाकार | भाऊसाहेब शिंदे, नेहा सोनवणे |
निर्माता | बाळासाहेब शिंदे, पुरूषोत्तम भापकर, प्रमोद भास्कर |
प्रदर्शित तारीख | ३ मार्च २०२३ |
भाषा | मराठी |
“रौंदळ” चित्रपट समीक्षा :-
ख्वाडा चित्रपटात स्वतःच्या नैसर्गिक अभिनयाची छाप सोडलेल्या भाऊसाहेब शिंदे याने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
शेतकऱ्यांच्या समस्या आणि त्यांची होणारी परवड दाखवणारे बरेच चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. हा चित्रपट सुद्धा शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक आणि त्याविरुद्ध उठवल्या गेलेल्या आवाजावर आधारित आहे.
शेती हेच त्यांच्या उत्पन्नाचे साधन असणाऱ्या एका शेतकरी कुटुंबात असलेला शिवा जाधव म्हणजेच भाऊसाहेब शिंदे हा कथेचा नायक आहे. आई-वडील आणि आजोबांसह हे इतकंच त्यांचं कुटुंब.
शिवा हा देशावर मनापासून प्रेम करणारा गरम रक्ताचा तरुण. देशासाठी काहीही करण्याची तयारी असलेल्या शिवाला सैन्यामध्ये भरती व्हायचं असतं.
परंतु काही कारणास्तव तो सैन्यात भरती होऊ शकत नाही त्यावेळी तो खचून जातो. पण जेव्हा त्याचे आजोबा त्याला समजावून सांगतात शेतकरी सुद्धा शेती पिकवून एक प्रकारे देशाची सेवाच करतो, तेव्हा तो शेती करण्याचा निर्धार करतो.
पण लवकरच त्याच्या लक्षात येतं की त्याला वाटत असतं तेवढी पण शेती करणं सोपं नाही. शेतीमालाला न मिळणारा भाव, ठेकेदार, व्यापारी यांची चालणारी मनमानी, मधल्या मधे होणारा दलाल ,व्यापारी ,ठेकेदार यांचा फायदा, आणि या सगळ्यांना असणारा राजकीय नेत्यांचा पाठिंबा हे सगळं लक्षात आल्यावर शिवा या सगळ्याविरूद्ध आवाज उठवतो आणि त्याचीच ही कथा. या सगळ्या संघर्षासोबतच शिवा आणि त्याची प्रेयसी म्हणजेच नवीन कलाकार नेहा सोनवणे यांची प्रेमकहाणी सुद्धा छान फुलताना दाखवली गेली आहे.
गजानन नाना पडोळ यांनी उत्तम दिग्दर्शन केले आहे. सगळ्याच कलाकारांनी उत्कृष्ट अभिनय केला आहे त्यामुळे हा चित्रपट जास्त खरा वाटतो. अस्सल गावरान बाज असलेला हा चित्रपट सगळ्याच बाबतीत उत्तम आहे. उत्तम कथा, उत्तम दिग्दर्शन आणि त्याचसोबत उत्तम संगीत असं सगळंच या चित्रपटात जुळून आलं आहे. कदाचित या चित्रपटाचा सिक्वेल येऊ शकतो असं चित्रपट संपताना वाटतं. माझ्याकडून या चित्रपटाला स्टार.
२. सातारचा सलमान |
लेखक | हेमंत ढोमे |
दिग्दर्शक | हेमंत ढोमे |
कलाकार | सुयोग गोऱ्हे, शिवानी सुर्वे, सायली संजीव, अक्षय टंकसाळे, मकरंद देशपांडे, आनंद इंगळे |
प्रदर्शित तारीख | ३ मार्च २०२३ |
भाषा | मराठी |
“सातारचा सलमान” चित्रपट समीक्षा :-
हेमंत ढोमे लिखित आणि दिग्दर्शित सातारचा सलमान हा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी हलकीफुलकी कॉमेडी असलेला धमाल चित्रपट. काहीतरी करू पाहणाऱ्या, स्वपनांचा पाठलाग करणाऱ्या सातारच्या अमितची ही गोष्ट. चित्रपटाची टॅग लाईनच तशी आहे. “स्वप्नं बघीतली तरच ती पूर्ण होतात.”
मकरंद देशपांडे यांनी अमितच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. खरं तर अमितचे वडील हे अमिताभ बच्चन यांचे खूप मोठे चाहते असतात. आणि हिरो व्हायचं हे त्यांचं स्वप्न असतं. पण ते काही पूर्ण होत नाही. तेव्हा ते एक दिवशी सगळ्या गावकऱ्यांसमोर एक आव्हान स्विकारतात की ते त्यांच्या मुलाला खूप मोठा स्टार, हिरो बनवणार आणि इथुनच सातारच्या सलमानचा प्रवास सुरू होतो.
सुयोग गोऱ्हे याने सातारच्या सलमानची भुमिका सुंदर वठवलीच आहे. पण त्याचसोबत त्याचा मित्र विक्या म्हणजेच अक्षय टंकसाळे याने नेहमीप्रमाणे विनोदी भूमिका उत्तमरीत्या पार पाडली आहे. चित्रपटात बऱ्याच पाहुण्या कलाकारांची वर्णी लागली आहे. सई ताम्हणकर, महेश मांजरेकर, स्वतः दिग्दर्शक हेमंत ढोमे असे बरेच कलाकार काही सीन्स मध्ये आहेत.
दिग्दर्शक हेमंत ढोमे याने चित्रपटासाठी बरीच मेहनत घेतली आहे. एका गाण्यासाठी तर चक्क साताऱ्यातील एका गावातील घरं रंगवली होती. आणि त्याचा हवा तो परिणाम गाण्यात दिसतोच.
आपल्या वडिलांनी घेतलेलं चॅलेंज, त्यांचं स्वप्न अमित पूर्ण करतो का.? अमितचा सातारचा सलमान कसा होतो हे बघण्यासाठी हा धमाल चित्रपट तुम्ही नक्कीच बघायला हवा. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.
३. आय प्रेम यू |
लेखक | नितीन कहार |
दिग्दर्शक | नितीन कहार |
कलाकार | कायदू लोहार , अभिजित अमकर |
प्रदर्शित तारीख | १७ मार्च २०२३ |
भाषा | मराठी |
“आय प्रेम यू” चित्रपट समीक्षा :-
हिंदी असो वा मराठी चित्रपटसृष्टी, प्रेमकथांवर आधारित चित्रपटांची काही कमी नाही. नायक नायिका यांचं प्रेम मग घरचे व्हिलन किंवा प्रेमाचा त्रिकोण वैगरे असे विविध कंगोरे असलेले पण प्रेमकथा असलेले बरेच चित्रपट प्रदर्शित होत राहतात. प्रेम हे मागून मिषत नाही पण मिळालं नाही तरी ते विसरता येत नाही. प्रेम हे एखाद्या व्यसनाप्रमाणे असतं. एकदा का माणूस प्रेमात पडला की त्याला बाकी काहीच सुचत नाही. कसंही करून ते त्याला हवं असतं. “I प्रेम U” हा चित्रपट सुद्धा याच पठडीतील. पण तरीही वेगळा. आता यात वेगळं नक्की काय ते मात्र चित्रपटातच कळेल.
सखा आणि वीणा ची ही आगळीवेगळी प्रेमकहाणी एकदा तरी नक्की बघावी अशी आहे. सुरूवातीला आकंठ प्रेमात बुडालेली वीणा अचानक प्रेम नाही असं सांगते तेव्हा सखा कसा रिॲक्ट होतो.?तीचं प्रेम नसतं की अजून काही कारण असतं.? सखा तिला विसरतो की तिच्या मागे देवदास बनतो.? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला चित्रपट बघितल्यावरच मिळतील.
कायदू लोहार या दाक्षिणात्य अभिनेत्रीने पहिल्यांदाच मराठी चित्रपटात काम केले असले तरी ते उत्तम जमले आहे. अभिजित आमकर आणि कायदू यांची केमिस्ट्री छान जुळून आली आहे. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.
४. फुलराणी |
लेखक | जाई जोशी, स्वानंद केळकर, ए. राव |
दिग्दर्शक | विश्वास जोशी |
कलाकार | प्रियदर्शिनी इंदलकर, सुबोध भावे, विक्रम गोखले, सुशांत शेलार, गौरव घाटणेकर, गौरव मालणकर, अश्विनी कुलकर्णी, वैष्णवी आंधळे |
प्रदर्शित तारीख | २२ मार्च २०२३ |
भाषा | मराठी |
“फुलराणी” चित्रपट समीक्षा :-
फुलराणी म्हटलं की आपोआप आठवतो तो “तुला शिकवीन चांगलाच धडा, तुझ्या पापांचा भरलाय घडा” हा संवाद. पु.लं नी लिहिलेलं हे नाटक अजरामर तर झालंच पण काही ठराविक संवाद तर प्रेक्षकांच्या अजूनही लक्षात आहेत.
आता “फुलराणी” हा चित्रपट आणि “ती फुलराणी” हे नाटक यात साम्य आहे का हे चित्रपट बघितल्यावरच कळेल. हा चित्रपट म्हणजे विक्रम राजाध्यक्ष आणि शेवंता यांची प्रेमकहाणी इतकाच मर्यादित नसून यात बरेच कंगोरे आहेत. प्रियदर्शिनी इंदलकर हीने या फुलराणीला अतिशय योग्य न्याय दिला आहे. त्याचप्रमाणे विक्रम राजाध्यक्ष म्हणजे सुबोध भावे, ब्रिगेडियर विक्रम गोखले या सगळ्यांनीच उत्तम अभिनय केला आहे. पण तरीही कुठेतरी चित्रपट कमी पडलाय हे जाणवत राहतं.
ग्रुमिंग इन्स्टिट्यूट चा मालक असलेल्या विक्रम राजाध्यक्ष ने कोळीवाडयात राहणारी फुलां शेवंता तांडेल हिला सौंदर्यस्पर्धेसाठी तयार करण्याचं चॅलेंज स्वीकारलं आहे. दरवर्षी आपल्याच इन्स्टिट्यूट मधील मॉडेल सौंदर्यस्पर्धा जिंकतात याचा अभिमान आणि थोडा गर्व असणाऱ्या विक्रमला त्याच्या मित्राकडून हे चॅलेंज दिलं जातं. आता हे आव्हान विक्रम पूर्ण करतो का? या सगळ्यात त्यांची प्रेमकहाणी कशी फुलते.? शेवंता स्पर्धा जिंकते का हे सगळं बघण्यासाठी हा चित्रपट जरूर बघा.
तर मित्रांनो, यापैकी कोणते चित्रपट तुम्ही पाहीलेत आणि या विकेंड ला कोणते बघायला जाणार आहात हे कमेंट करून नक्की सांगा.
