मार्च २०२४ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी
मार्च २०२४ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेले हे हिंदी चित्रपट तुम्ही पाहीलेत का?
Written by : Akanksha Kolte
Updated : मे 5, 2024 | 11:01 PM
खरं तर आता वेबसिरीज चा जमाना असल्यामुळे प्रेक्षकांच्या चित्रपटांच्या बाबतीत अपेक्षा वाढल्या आहेत. त्यातही नवीन आलेल्या चित्रपटांमध्ये ओरिजनल कंटेट कमीच असतो. बरेच चित्रपट हे रिमेक असतात. त्यामुळे चित्रपटगृहात प्रेक्षकांना खेचून आणणं हे आता निर्माते आणि दिग्दर्शक यांच्यापुढे नवीन आव्हान आहे. आता प्रेक्षकांच्या चित्रपटांच्या बाबतीत असलेल्या अपेक्षा पूर्ण होतायत की नाही हे आमच्या परीने सांगण्याचा प्रयत्न या लेखात आम्ही करणार आहोत.
आज या लेखात फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित झालेले चित्रपट कोणते आहेत आणि बघायला हवेत की नको याबद्दल आमचं मत सांगणार आहोत.

१. लापता लेडीज |
लेखक | बिप्लव गोस्वामी, स्नेहा देसाई, दिव्यनिधि शर्मा |
दिग्दर्शक | किरण राव |
कलाकार | रवि किशन,स्पर्श श्रीवास्तव, नितांशी गोयल ,प्रतिभा रांटा, सतेंद्र सोनी, दुर्गेश कुमार |
निर्माता | आमिर खान,किरण राव, ज्योति देशपांडे |
प्रदर्शित तारीख | १ मार्च २०२४ |
भाषा | हिंदी |
“लापता लेडीज” चित्रपट समीक्षा :-
मि. परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमिर खानची निर्मिती असलेल्या लापता लेडीज या चित्रपटाचं दिग्दर्शन किरण रावने केलं असून चित्रपट एकदम परफेक्ट झाला आहे. हा चित्रपट बघीतल्यावर किरण रावने अजून चित्रपट दिग्दर्शित करायला हवे असं वाटेल. सगळे नवीन चेहरे, एकही मोठा स्टार नाही, फार मसाला नाही तरीही चित्रपट एकदम सुपर से भी उपर म्हणावा असा आहे कारण चित्रपटाची कथा एकदम जबरदस्त आहे. त्यात कलाकारांचा नैसर्गिक अभिनय आणि किरण रावचं परफेक्ट दिग्दर्शन. सगळ्या गोष्टी इतक्या सुंदर जुळून आल्या आहेत.
चित्रपटाची कथा तुम्हाला हसवते, हसता हसता रडवते. मध्यप्रदेशमधील एका काल्पनिक गावात घडणारी ही कथा दोन दशकांपूर्वीची आहे. एका ट्रेनमधे सुरू होणारी ही गोष्ट बऱ्याच सामाजिक विषयांवर प्रश्नांवर भाष्य करणारी आहे. दिपक आणि फूल हे नवविवाहित जोडपं ट्रेन मधून आपल्या घरी जात असतं, तेव्हा त्यांच्यासोबत प्रवास करणारं अजून एक जोडपं ट्रेन मध्ये असतं. परंतु घरी पोहचल्यावर मात्र दिपक त्याची बायको फूल हीला घेऊन न येता चुकून दुसऱ्या नवरीला घेऊन जातो. हा सगळा गोंधळ होतो कारण तेव्हा स्त्रिया चेहरा झाकला जाईल इतका पदर तोंडावर घेत असत. त्यामुळे दिपकला माहीत नसतं की त्याच्यासोबत दुसरीच कोणी आली आहे. दिपक पुढे पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करतो.तिथे पोलिस म्हणून रवी किशन यांनी तर अभिनयाचे षटकार लावले आहेत. चित्रपटात ट्विस्ट आणि सस्पेन्स हा आहे की त्याच्यासोबत येणारी दुसरी स्त्री स्वतःहून काही का बोलत नाही.? दिपकच्या बायकोचं काय होतं.? ती कुठे गायब होते.? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं म्हणजे हा चित्रपट. शेवटपर्यंत तुम्हाला खिळवून ठेवणारी ही कथा अतिशय सुंदर गुंफलेली आहे. हा चित्रपट नसून आपल्या आजूबाजूला घडणारी गोष्ट असं वाटतं. अतिशय नितांत सुंदर आणि आवर्जून बघावा असा हा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला साडेचार स्टार.
२. दंगे |
लेखक | बेजॉय नांबियार, मिथिला हेगड़े, फ्रांसिस थॉमस, नील जूलियन |
दिग्दर्शक | बेजॉय नांबियार |
कलाकार | हर्षवर्धन राणे,एहान भट,निकिता दत्ता, टी जे भानु |
निर्माता | भूषण कुमार , कृष्ण कुमार , बेजॉय नांबियर , प्रभु एंटनी, मधु एलेक्जेंडर |
प्रदर्शित तारीख | १ मार्च २०२४ |
भाषा | हिंदी |
“दंगे” चित्रपट समीक्षा :-
वजीर सारख्या चित्रपटाचं दिग्दर्शन करणाऱ्या बेजॉय नांबियार यानेच या चित्रपटाची कथा लिहिली आहे आणि दिग्दर्शन सुद्धा केलं आहे. बेजॉय ची स्वतःची अशी एक वेगळी शैली आहे परंतु यावेळी कुठेतरी ती वेगळी जादू कमी पडलेली दिसते.
हर्षवर्धन राणे,एहान भट,निकिता दत्ता या सगळ्यांना घेऊन बेजॉयने कॉलेज लाईफ, कॉलेज मध्ये चालणारं राजकारण यावर आधारित हा चित्रपट काढला आहे.वरवर बघता कॉलेज मधील राजकारण दिसलं तरी चित्रपटाची कथा एका वेगळ्याच भुतकाळावर आधारित आहे. सेंट मार्टिन्स नावाच्या एका युनिव्हर्सिटीत हे सगळं घडतं. झेवियर(हर्षवर्धन राणे) जो अर्थातच कॉलेजमधील हीरो आहे. ऋषिका (निकिता दत्ता), गायत्री (टीजे भानू), अंबिका (तान्या कालरा)हे सुद्धा त्याच्याच कॉलेज मध्ये शिकत आहेत. सगळे मेडिकल चे विद्यार्थी आहेत. कथेला खरी सुरुवात होते जेव्हा युवा(अहान भट्ट) या ज्युनिअर ची कॉलेज मध्ये एंट्री होते. झेवियल आणि युवा मध्ये असा काहीतरी काळा इतिहास आहे जो त्यांच्या वर्तमानात दुश्मनी घेऊन आला आहे. आता ती स्टोरी काय हे बघायला चित्रपट बघायला हवा.
कॉलेजमधील निवडणूका, हॉस्टेलवर चालणारे दंगे, दोन वेगवेगळ्या गटांत चालणारी भांडणं, हाणामारी, दुश्मनी असा सगळा मसाला या चित्रपटात आहे. ड्रग्स ची दुनिया सुद्धा अपवाद नाही. ॲक्शन सीन्स, बॅकग्राऊंड म्युझिक या जमेच्या बाजू आहेत.
हर्षवर्धन ने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की तो एक चांगला अभिनेता आहे. सगळ्याच कलाकारांनी अभिनय उत्तम केला आहे. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.
३. ऑपरेशन व्हॅलेंटाईन |
लेखक | आमीर नाहीद खान, सिद्धार्थ राजकुमार, शक्ती प्रताप सिंह हाडा |
दिग्दर्शक | शक्ती प्रताप सिंह हाडा |
कलाकार | वरुण तेज,मानुषी छिल्लर,नवदीप,परेश पाहूजा,रुहानी शर्मा |
निर्माता | संदिप मुड्डा |
प्रदर्शित तारीख | १ मार्च २०२४ |
भाषा | हिंदी |
“ऑपरेशन व्हॅलेंटाईन” चित्रपट समीक्षा :-
१४ फेब्रुवारी २०१९ हा भारतीय इतिहासातील काळा दिवस. या दिवशी पुलवामा इथे झालेल्या हल्ल्यात आपले भारतीय निमलष्करी दलाचे चाळीस जवान शहीद झाले होते. त्यानंतर त्याचा बदला म्हणून भारतीय हवाई दलाने बालाकोटा येथे सर्जीकल स्ट्राइक केला होता. याच सत्यघटनेवर आधारित या आधी विकी कौशल चा उरी, ऋतिक रोशन चा फायटर असे चित्रपट आले आहेत. ऑपरेशन व्हॅलेंटाईन हा चित्रपट सुद्धा असाच आहे.
पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने बदला घेण्यासाठी एअरस्ट्राइक केला होता त्यावर चित्रपटाची कथा आधारित आहे. विंग कमाडंर अर्जुन देव उर्फ रुद्रा (वरुण तेज) हा एक प्रशिक्षित पायलट आहे. पाकिस्तान वर करण्यात येणाऱ्या एअरस्ट्राइक साठी त्याची निवड झाली आहे. भारतीय निमलष्करी दलाचे चाळीस जवान शहीद झाले त्याचा अर्जुन ला बदला घ्यायचा आहेच परंतु त्याचसोबत त्याचा जवळचा मित्र कबीर याच्या मृत्यूचा देखील त्याला बदला घ्यायचा आहे. याच बदल्याची ही गोष्ट आहे.
मुळ तेलगू चित्रपटाचं हे हिंदी व्हर्जन आहे. थोडेफार ट्विस्ट, सीन्स वेगळे पहायला मिळतात. परंतु एकंदर चित्रपट फारसा परिणामकारक नाही. वरूण ने अभिनय चांगला केला आहे. मनुषीने पदार्पण केलं असल्यामुळे अजून बरीच तयारी करण्याची गरज आहे असं वाटतं.
VFX आणि ग्राफिक्स अगदीच ठिकठाक असल्यामुळे चित्रपट बघताना ते तेवढं खास वाटत नाही. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.
४. कागज २ |
लेखक | अंकुर सुमन, शशांक खंडेलवाल |
दिग्दर्शक | वी के प्रकाश |
कलाकार | सतीश कौशिक, अनुपम खेर, दर्शन कुमार , स्मृति कालरा,नीना गुप्ता , अनंग देसाई, किरण कुमार, करण राजदान |
निर्माता | गणेश जैन, रतन जैन, निशांत कौशिक, शशि कौशिक |
प्रदर्शित तारीख | १ मार्च २०२४ |
भाषा | हिंदी |
“कागज २” चित्रपट समीक्षा :-
कागज २ हा चित्रपट कागज या चित्रपटाचा सिक्वेल आहे.कागज हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. खरं तर या चित्रपटाबद्दल फार कोणाला माहीत असण्याचं कारण नाही, करण न झालेलं प्रमोशन. आणि मुळात गरीबांचे, सामान्य माणसाचे हक्क आणि त्यांच्या समस्या यावर आधारित चित्रपटांची अवस्था सुद्धा सामान्य माणसासारखीच आहे.
आजकाल श्रीमंत अजून श्रीमंत होतोय तर गरीब अजून गरीब. श्रीमंत माणसाला सगळंच मिळतंय परंतु सामान्य माणसाला त्याचे मुलभूत अधिकार, त्याचे हक्क सुद्धा बजावता येत नाहीत. कारण आपल्याकडील यंत्रणा श्रीमंतांच्या दिमतीला इतकी हजर असते की सामान्य माणूस आयुष्यभर हक्कांसाठी सुद्धा झगडतच राहतो. हा चित्रपट अशाच एका सामान्य असलेल्या आईवडिलांच्या हक्कांवर आधारित आहे. ज्यांची मुलगी युपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेली एक टॉपर विद्यार्थीनी असून तीला आयपीएस अधिकारी व्हायचं असतं. परंतु तीची स्वप्नं आणि तिच्या आई वडिलांची स्वप्न धुळीस मिळतात. कारण रस्त्यावर चाललेल्या एका नेत्याच्या रॅली मुळे तीला वेळेवर उपचार मिळत नाहीत आणि तीचा या भ्रष्ट यंत्रणेमुळे जीव जातो. आणि याविरुद्ध न्याय मागण्यासाठी तीचे वडील(सतीश कौशिक) न्यायालयात पोहचतात. आता यंत्रणेविरूदध असलेल्या या लढ्यात त्यांना न्याय मिळतो का ते बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल.
या लढ्यात त्यांना साथ मिळते ती राज नारायण सिंह (अनुपम खेर) यांची जे एक वकील आहेत. त्यांची सुद्धा एक वेगळी कथा यात आहे. त्यांचा मुलगा उदय राज सिंह (दर्शन कुमार) त्यांचा राग करत असतो कारण त्याचे वडील उदय रज हे त्याची राधिका (नीना गुप्ता) आणि त्याला त्याच्या लहानपणीच सोडून गेलेले असतात. परंतु या केसच्या निमित्ताने या वडील मुलाच्या नात्याचे वेगळे पैलू समोर येतात.
सतीश कौशिक यांचा हा शेवटचा चित्रपट पाहील्यावर आपण एका चांगला कलाकार गमावला याची जाणीव होते. सरळ साधा फार मसाला नसलेला हा चित्रपट आहे. शासकीय यंत्रणा, न्यायव्यवस्था आणि इतर बऱ्याच सामाजिक मुद्दे आणि सामान्य माणसाच्या समस्या यावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.
५. फेयरी फोक |
लेखक | करन गौर |
दिग्दर्शक | करन गौर |
कलाकार | रसिका दुग्गल, मुकुल चड्डा, निखिल देसाई, अमित पथारे, चंद्रचूड़ राय, अंकित,जाह्नवी दवे, अनुकंपा हर्ष |
निर्माता | सिद्धार्थ भाटिया, करन गौर, अनुकंपा हर्ष, तेजस शाह |
प्रदर्शित तारीख | १ मार्च २०२४ |
भाषा | हिंदी |
“फेयरी फोक” चित्रपट समीक्षा :-
चित्रपट कसा आहे हे सांगायला मुळात तो कळायला तरी हवा. परंतु १ मार्च रोजी प्रदर्शित झालेला फेयरी फोक हा चित्रपट आणि त्यातून नक्की म्हणायचं आहे ते समजत तर नाहीच परंतु चित्रपटाची कथा सुद्धा पचनी पडत नाही. रसिका दुग्गल आणि मुकुल चढ्ढा यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचे हे दोघं नवरा बायको कार्यकारी निर्माते सुद्धा आहेत.
मोहित आणि ऋतिका हे दोघं नवरा बायको एका रात्री बाहेर गेलेले असताना अचानक त्यांची गाडी खराब होते आणि नेमकं तिथं जवळपास कोणी नसतं. काय करावं विचारात असतानाच त्यांना तिथे एक नग्नावस्थेत उभा असलेला माणूस दिसतो. त्याची विचारपूस केल्यावर तो काहीच बोलत नाही म्हणून मग हे दोघं त्याची दया येऊन आपल्या घरी घेऊन येतात. आणि इथुनच खरी गोष्ट सुरु होते.
रात्री झोपताना मोहीत त्या माणसाला किस करून झोपतो तर दुसऱ्या सकाळी तो माणूस आपण स्वतः मोहीत असल्याचं सांगतो. दुसऱ्या रात्री ऋतिका त्याला किस करून झोपते तर पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी तो माणूस आपण ऋतिका असल्याचं सांगतो. त्या माणसाची कोणतीही पार्श्वभूमी, त्याचा भुतकाळ काहीच कळत नाही. माती खाऊन जगणारा हा नक्की माणूस आहे की अजून कोण हे सुद्धा कळत नाही. हे सगळं खरं घडतं की मोहीत ऋतिका यांचे काल्पनिक खेळ हे बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल. परंतु खरं सांगायचं तर आपल्या सारख्या सामान्य प्रेक्षकांना हा चित्रपट समजण्या आणि झेपण्या पलिकडचा आहे. सस्पेन्स थ्रिलर वाटणारा हा चित्रपट प्रत्यक्षात काही वेगळाच आहे. माझ्याकडून या चित्रपटाला एक स्टार.
६. शैतान |
लेखक | आमिल कीयान खान |
दिग्दर्शक | विकास बहल |
कलाकार | आर माधवन, अजय देवगण, ज्योतिका,जानकी बोधीवाला,अंगद राज |
निर्माता | अजय देवगन,ज्योति देशपांडे,कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक |
प्रदर्शित तारीख | ८ मार्च २०२४ |
भाषा | हिंदी |
“शैतान” चित्रपट समीक्षा :-
८ मार्च रोजी प्रदर्शित झालेला शैतान हा चित्रपट बराच चर्चेत होता. हा चित्रपट मुळ गुजराती भाषेतील “वश” या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. कृष्णदेव यागनिक यांनी लिहीलेल्या मुळ कथेत थोडाफार बदल करून शैतानची कथा लिहिली आहे परंतु नव्याने लिहीली गेलेली ही कथा म्हणजे स्क्रीन प्ले म्हणावा तेवढा परिणामकारक नाही. आपल्या घरातील मोठी माणसं आपण लहान असताना किंवा आजही आपल्या मुलांना सांगतात की बाहेर गेल्यावर प्रवास करताना ओळख नसलेल्या व्यक्तीशी बोलू नका त्यांनी दिलेलं चॉकलेट किंवा इतर काही खाऊ नका. पण ते असं का सांगतात ते “शैतान” हा चित्रपट पाहील्यावर तुम्हाला जास्त कळेल.
८ मार्च रोजी प्रदर्शित झालेला विकास बहल
दिग्दर्शित आर माधवन आणि अजय देवगण यांचा शैतान हा चित्रपट तंत्र मंत्र काळी विद्या, जादूटोणा,वशीकरण यावर आधारित असला तरी तो भयपट नक्कीच नाही. हा सायकोलॉजिकल, सुपरनॅचरल थ्रि*लर चित्रपट असून तो तुमच्या मेंदू सोबत खेळत तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवतो.
चित्रपटाची कथा ही अर्थातच एका कुटुंबाच्या आयुष्यात अचानक आलेल्या सैतानामुळे त्यांची काय अवस्था झाली आहे यावर बेतलेली आहे. कबीर म्हणजे अजय देवगण त्याच्या कुटुंबासोबत सुट्टी घालवण्यासाठी आपल्या फार्म हाऊसवर जात असतो. त्याची बायको ज्योती(ज्योतिका), मुख्य भूमिकेत असलेली मुलगी जान्हवी (जानकी बोधीवाला) आणि मुलगा ध्रुव(अंगद राज) हे सगळे मजा करत जात असतात. त्यांना एके ठिकाणी एका धाब्यावर चित्रपटाचा खलनायक म्हणजेच सैतान वनराज(आर माधवन) भेटतो. आणि इथुनच खरा चित्रपट सुरू होतो. हा सैतान त्यांच्यासोबत छान बोलून ओळख वाढवून एकत्र जेवण वैगरे करतो. परंतु हाच वनराज कबीर नंतर त्यांच्या घरात घुसतो कबीर च्या मुलीला जान्हवी ला काहीतरी खायला देऊन तिला वश करून घेतो. आणि सुरू होतो मग आपल्या मुलीला वाचवण्यासाठी एका आईबापाचा आणि एका त्या मुलीला एका अघोरी प्रथेसाठी आपल्या सोबत घेऊन जाणाऱ्या सैतानामधील संघर्ष.
आता पुढे नक्की काय होतं, वनराज जान्हवीचे कशा पद्धतीने छळ करतो, कबीर आपल्या मुलीला वाचवतो का हे सगळं बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल. विकास बहल यांचं दिग्दर्शन ओके आहे. आर माधवन आणि जानकीने केलेला अभिनय मात्र जबरदस्त आहे. परंतु जेवढी चर्चा झाली तेवढा चित्रपट खास वाटत नाही. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.
७. तेरा क्या होगा लव्हली |
लेखक | बलविंदर सिंह जंजुआ, रूपिंदर चहल, अनिल रोधन |
दिग्दर्शक | बलविंदर सिंह जंजुआ |
कलाकार | रणदीप हुड्डा,इलियाना डिक्रूज, गीतिका विद्या,करण कुंद्रा, पवन मल्होत्रा,सुनील दहिया,वरुण शर्मा |
निर्माता | सोनी पिक्चर्स फिल्म्स इंडिया |
प्रदर्शित तारीख | ८ मार्च २०२४ |
भाषा | हिंदी |
“तेरा क्या होगा लव्हली” चित्रपट समीक्षा :-
आपल्याकडे लग्न ठरवताना मुलीच्या बाबतीत तिचं शिक्षण जेवढं महत्वाचं वाटत नाही तेवढं किंबहुना जास्तच महत्व तिच्या रंगाला दिलं जातं. सावळ्या काळ्या वर्णाच्या मुलींचं लग्न जुळवणं हे आईवडीलांसाठी एक मोठं टेन्शन असतं. किती स्थळ नकार देतात याची गिणतीच नसते. याच धर्तीवर आधारित तेरा क्या होगा लव्हली हा चित्रपट ८ मार्च रोजी प्रदर्शित झाला आहे. बलविंदर सिंह जंजुआ
यांनी सहलेखकांसोबत या चित्रपटाची कथा लिहिली असून दिग्दर्शन सुद्धा केलं आहे.
ही गोष्ट लव्हली नावाच्या मुलीची गोष्ट आहे जी रंगाने जास्त सावळी आहे. त्यामुळेच तिचं लग्न ठरत नसतं म्हणून मग शेवटचा पर्याय म्हणून तिचे वडील दुप्पट हुंडा देऊन तिचं लग्न एका मुलासोबत ठरवतात. परंतु लग्नाच्या नेमकं एक दिवस आधी तिच्या हुंड्यासाठी आणलेलं सामान चोरीला जातं. आता ट्विस्ट हा येतो की ही चोरीची केस सोडविण्यासाठी आलेला पोलिस अधिकारी (रणदीप हुड्डा) हा सुद्धा याआधी या लव्हली ला स्थळ म्हणून पहायला आलेला असतो आणि नकार देऊन गेलेला असतो. आता यापुढे काय होतं हे बघण्यासाठी मात्र हा चित्रपट बघावा लागेल.
चित्रपट बघताना राहून राहून हेच वाटत की चित्रपटाच्या कथेची गरज म्हणून एका सावळ्या मुलीलाच का कास्ट केलं नसेल. इलियाना या भुमिकेत तेवढीशी प्रभावी वाटत नाही. रणदीप चा अभिनय चांगला आहे. चित्रपटाची कथा ओळखीची असल्यामुळे वेगळं असं काही बघायला मिळत नाही. दिग्दर्शन ठिकठाक आहे. एकंदर चित्रपट बरा आहे . ओटीटी वर आल्यावर बघू शकता . माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.
८. अल्फा बीटा गॅमा |
लेखक | शंकर श्रीकुमार, मेनका शर्मा |
दिग्दर्शक | शंकर श्रीकुमार |
कलाकार | रीना अग्रवाल, अमित कुमार वसिष्ठ, निशान ननैया |
निर्माता | जतिन राज, मोना शंकर, मेनका शर्मा |
प्रदर्शित तारीख | ८ मार्च २०२४ |
भाषा | हिंदी |
“अल्फा बीटा गॅमा” चित्रपट समीक्षा :-
शंकर श्रीकुमार आणि मेनका शर्मा यांनी या चित्रपटाची कथा लिहिली असून शंकर श्रीकुमार यांनी दिग्दर्शन केले आहे. लग्नाचा आणि पर्यायाने नवरा बायको या नात्याचा शेवट करू इच्छित असणाऱ्या एका जोडप्याची ही गोष्ट आहे.
चिरंजीव (अमित कुमार वसिष्ठ) आणि मिताली (रीना अग्रवाल) या दोघांचं एकमेकांशी पटत नसतं. त्यामुळे काही दिवस वेगळं राहण्याचा निर्णय घेऊन ते तसं करतात परंतु असं केल्याने सुद्धा त्यांच्या नात्यात फरक पडत नाही. म्हणून मग एके दिवशी मिताली जय म्हणजेच चिरंजीवला घटस्फोट हवा हे सांगण्यासाठी आपल्या घरी बोलवते , जिथे ती आपला प्रियकर रवी(निशान ननैया) याच्यासोबत राहत असते. जय तिथे जातो परंतु नेमकं कोव्हीडने सगळीकडे थैमान घातलेलं असल्यामुळे सरकार कडून संचारबंदी लागू करण्यात येते आणि १४ दिवस लॉकडाऊन ची घोषणा होते. त्यामुळे आता नवरा बायको आणि बायकोचा प्रियकर असे तिघे एकाच घरात राहण्याशिवाय त्यांच्याकडे काही पर्याय नसतो. तर पुढे काय होतं, या चौदा दिवसांत काय काय घडतं ते थोडं गंभीर थोडं विनोदी पद्धतीने दाखवलं आहे. आता मिताली जयचा घटस्फोट होतो की नव्याने नातं सुरु होतं हे बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल.
थोडं विनोदी पद्धतीने चित्रपटाची कथा आपल्यासमोर मांडण्यात आली आहे. शंकर श्रीकुमार यांचं दिग्दर्शन बरं आहे परंतु मुळात कथा पटकथा संवाद म्हणावे तेवढे प्रभावी नाहीत. काही संवाद, सीन्स परत परत तेच चालू आहे असं वाटतं. संगीत, सिनेमॅटोग्राफी ठिकठाक आहे. परंतु एकदा बघायला हरकत नाही असा हा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.
९. योद्धा |
लेखक | सागर आंब्रे |
दिग्दर्शक | सागर आंब्रे, पुष्कर ओझा |
कलाकार | सिद्धार्थ मल्होत्रा,राशि खन्ना, दिशा पाटनी, तनुज विरवानी,सनी हिंदूजा |
निर्माता | हीरू यश जौहर, करण जौहर, अपूर्व मेहता, शशांक खेतान |
प्रदर्शित तारीख | १५ मार्च २०२४ |
भाषा | हिंदी |
“योद्धा” चित्रपट समीक्षा :-
सिद्धार्थ मल्होत्रा याचा योद्धा हा चित्रपट १५ मार्च रोजी प्रदर्शित झाला असून सागर आंब्रे आणि पुष्कर ओझा
यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केले आहे. शहेनशहा नंतर पुन्हा एकदा सिद्धार्थ मल्होत्रा आर्मी च्या युनिफॉर्म मध्ये ॲक्शन सीन्स करताना दिसत आहे.
योद्धा हे भारतीय सैन्यातील टास्क फोर्सचं असं एक युनिट आहे जे युद्धजन्य परिस्थिती आली तर तीनही दलांचं काम करू शकेल. या युनिटचा चा प्रमुख अरूण कटियाल म्हणजेच चित्रपटाचा हिरो सिद्धार्थ मल्होत्रा हा आहे. खरं तर या युनिट ची सुरुवात अरूणच्या वडीलांनीच केलेली असते. परंतु अरुण च्या एका चुकीमुळे किंवा वरिष्ठांचे आदेश न ऐकल्यामुळे एका विमान हायजॅक प्रसंगी देशातील एका मोठ्या सायंटिस्टला जीव गमवावा लागतो अर्थातच याची जबाबदारी अरूणवर येते आणि योद्धा हे युनिट कायमचं बंद करण्याचा निर्णय सरकारकडून घेतला जातो. अरूणची पत्नी (राशी खन्ना) ही सुद्धा सरकार तर्फे हायजॅकर्स सोबत बोलणी करण्याच किंवा निगोसिएशन करण्याचं काम करत असते.
कालांतराने पुढे जाऊन पुन्हा एकदा विमान हायजॅक केलं जातं तेव्हा सुद्धा अरूण त्या विमानात हजर असतो. आता अरूणवर विमानातील प्रवाशांना वाचवण्याची जबाबदारी येते. परंतु इथे वेगळाच ट्विस्ट बघायला मिळतो. ते विमान अरूणनेच
हायजॅक केल्याचा आरोप त्याच्यावर केला जातो. आता खरंच तसं झालं आहे का.? हे बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल. चित्रपटात अजून एक सरप्राइज आहे ते म्हणजे दिशा पाटनी. एअर होस्टेस च्या छोट्या पण महत्त्वाच्या भूमिकेत दिशाने चांगलं काम केलं आहे.
सिद्धार्थ चे ॲक्शन सीन्स बघण्यासारखे आहेत. फार नवीन असं या चित्रपटात काही नाही. दिग्दर्शन चांगलं आहे परंतु बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळा लॉजिक न लावता चित्रपट बघीतला तर एन्जॉय करू शकता. सिद्धार्थ च्या फॅन्स ना हा चित्रपट जास्त आवडू शकतो. बाकी चित्रपट ठिकठाक आहे. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.
१०. बस्तर : द नक्सल स्टोरी |
लेखक | अमरनाथ झा, सुदीप्तो सेन,विपुल अमृतलाल शाह |
दिग्दर्शक | सुदीप्तो सेन |
कलाकार | अदा शर्मा , इंदिरा तिवारी, विजय कृष्ण , शिल्पा शुक्ला ,यशपाल शर्मा,राइमा सेन |
निर्माता | विपुल अमृतलाल शाह |
प्रदर्शित तारीख | १५मार्च २०२४ |
भाषा | हिंदी |
“बस्तर : द नक्सल स्टोरी” चित्रपट समीक्षा :-
केरळ स्टोरी नंतर अदा शर्माच्या बस्तर या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू होती तो शेवटी १५ मार्च रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या नावाप्रमाणे चित्रपटाची कथा ही छत्तीसगड मधील बस्तर या भागातील नक्षलवाद यावर आधारित आहे.
चित्रपटाच्या सुरुवातीला बस्तर गावात एका ठिकाणी राष्ट्रगीत सुरू असते आणि ध्वजारोहणाचा कार्यक्रम सुरू असतो परंतु तिथे काही नक्षलवादी येऊन तो भारताचा ध्वज उतरवून त्यांच्या संघटनेचा ध्वज फडकवला जातो. इतकं करुन शांत न होता ते नक्षलवादी जो पुढाकार घेऊन राष्ट्रीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम करत असतो त्याला आणि त्याच्या कुटुंबाला आपल्या सोबत घेऊन जातात. आणि त्या कुटुंबासमोर त्या व्यक्तीची निघृण हत्या करतात. आणि त्याच्या मुलाला आपल्यासोबत ठेवून घेतात.
आता त्या व्यक्तीच्या पत्नीला पोलिस अधिकारी नीरजा माधवन (अदा शर्मा) सपोर्ट करते की तीने पोलिसात भरती व्हावं आणि या नक्षलवाद्यां विरूद्ध कायद्याने लढावं. आता पुढे काय होतं ते मात्र चित्रपट बघीतल्यावरच कळेल. एकंदर या चित्रपटात नक्षलवादी संघटना, त्यांचं कार्य, ते इतक्या टोकाला जाऊन असं का वागतात त्यामागे त्यांची काय भूमिका असते हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु यावेळी केरळ स्टोरी सारख्या चित्रपटाचं दिग्दर्शन करणाऱ्या सुदिप्तो सेन यांची जादू कमी वाटली. नक्षलवादी हिंसाचार इतका दाखवण्यात आला आहे की अक्षरशः सगळी दृश्यं अंगावर येतात. सुरूवातीला कथा बांधून ठेवते परंतु सेकंड हाफ मध्ये चित्रपट तेवढा परिणामकारक वाटत नाही. अदाचा अभिनय सारखाच वाटतो. देशभक्ती आणि नक्षलवादी कारवाया का होत असाव्यात असा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर तुम्ही चित्रपट बघू शकता. ज्यांना फार हिंसाचार आवडत नाही त्यांनी या चित्रपटाकडे वळूच नये. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.
११. मर्डर मुबारक |
लेखक | अनुजा चौहान, गजल धालीवाल, सुप्रतिम सेनगुप्ता |
दिग्दर्शक | होमी अदजानिया |
कलाकार | पंकज त्रिपाठी, सारा अली खान, विजय वर्मा, डिंपल कपाड़िया,करिश्मा कपूर, संजय कपूर, टिस्का चोपड़ा, आशिम गुलाटी |
निर्माता | दिनेश विजन |
प्रदर्शित तारीख | १५ मार्च २०२४ |
भाषा | हिंदी |
“मर्डर मुबारक” चित्रपट समीक्षा :-
सतराशे साठ चांगले कलाकार घेऊन चित्रपट काढला म्हणजे तो प्रेक्षक बघतीलच किंवा तो चालेलच हा निर्माते आणि दिग्दर्शक यांचा गैरसमज कधी दूर होणार काय माहित.? मर्डर मुबारक हा चित्रपट म्हणजे निव्वळ सगळे मसाले एकत्र टाकून नेमकं मीठ न टाकलेल्या रेसिपी सारखा आहे.
दिल्लीतील रॉयल क्लब मध्ये एक खुन होतो आणि अख्खा चित्रपट त्या खुनाभोवती फिरतो. तो कोणी केला, का केला असेल कसा केला असेल हे शोधण्याचं काम एसिपी भवानी सिंह म्हणजेच पंकज त्रिपाठी करत आहेत. विनोदी पद्धतीने लेखन, दिग्दर्शन केल्यामुळे ते इतकं विनोदी झालंय की एक मर्डर केस सोडवली जातेय हे आपलं आपल्यालाच लक्षात ठेवावं लागतं.
हा रॉयल क्लब म्हणजे शहरातील उच्चभ्रू वर्गातील लोकांचं फक्त येणं जाणं. मोठं मोठे सेलिब्रिटी, मोठ मोठे व्यावसायिक थोडक्यात अतिश्रीमंत लोकांसाठी हा क्लब म्हणजे प्रतिष्ठेचा विषय. अशा या क्लब मध्ये जिम ट्रेनर म्हणून काम करणाऱ्या मॅथ्यू चा खून होतो. आता या मॅथ्यूकडे क्लब मध्ये येणाऱ्या प्रत्येकाचं काही ना काही गुपित असतं त्यामुळे संशयाची सुई कथेतील सगळ्या पात्रांकडे फिरत असते. आता खून कोणी केला हे मात्र शेवटीच कळतं.
क्लब यू टू डेथ या अनुजा चौहान यांच्या पुस्तकावर आधारित ही कथा लिहिली आहे. प्रामाणिकपणे सांगायचं तर इतक्या चांगल्या कलाकारांना घेऊन असा चित्रपट बनवणं म्हणजे त्यांचं टॅलेंट वाया घालवण्यासारखं आहे. तरी एक गोष्ट चांगली की चित्रपट सरळ ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. खरं तर बघाच असा रीकमेंड करण्याइतका चांगला चित्रपट नक्कीच नाही. परंतु नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन असेल आणि वेळ असेल तर बघायला हरकत नाही. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.
१२. ऐ मेरे वतन |
लेखक | कन्नन अय्यर, दाराब फारूकी |
दिग्दर्शक | कन्नन अय्यर |
कलाकार | सारा अली खान , स्पर्श श्रीवास्तव , अभय वर्मा , गोदान कुमार , आनंद तिवारी , सचिन खेडेकर , मधु राजा, इमरान हाशमी |
निर्माता | करण जौहर, अपूर्व मेहता, सोमेन मिश्रा |
प्रदर्शित तारीख | १५ मार्च २०२४ |
भाषा | हिंदी |
“ऐ मेरे वतन” चित्रपट समीक्षा :-
१५ मार्च रोजी ॲमेझॉन प्राईम वर प्रदर्शित झालेला ऐ मेरे वतन हा चित्रपट १९४२ साली झालेल्या भारत छोडो या चळवळी दरम्यान झालेल्या घटनांची आठवण करून देतो. ही चळवळ मोडून काढण्यासाठी इंग्रजांनी गांधीजी, नेहरू यांना तुरुंगात ठेवले होते. हा चित्रपट तेव्हाच्या काळात इंग्रजांविरुद्ध झालेल्या या लढ्यात अंडरग्राऊंड होऊन काम करणाऱ्या कॉग्रेसच्या कार्यकर्त्या क्रांतीकारक उषा मेहता यांच्यावर आधारित आहे.
हरिमोहन मेहता (सचिन खेडेकर) हे इंग्रजांची पुजा करत त्यांची चाकरी करणारे जज असतात आणि त्यांची मुलगी उषा(सारा अली खान) ही आपल्या सहकाऱ्यांसोबत रेडिओ द्वारे तुरुंगात असणाऱ्या देशासाठी लढणाऱ्या नेत्यांचा आवाज सामान्य जनतेपर्यंत पोहचवण्याचं काम करत असते. या कामात तिला स्वातंत्र्य सेनानी राम मनोहर लोहिया (इमरान हाशमी) यांची मदत मिळत असते. क्रांतिकारकांची ही धडपड, ही चळवळ मोडून काढण्यासाठी इंग्रज सरकार हे रेडिओ स्टेशन बंद करण्याचे आदेश देतं. इतकंच नव्हे तर भुमिगत असलेल्या उषाला पकडण्याचे आदेश सुद्धा दिले जातात. आता यापुढे काय होतं ते बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल.
क्रांतीकारक उषा मेहता यांच्या कार्याबद्दल माहिती करून घेण्यासाठी आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी क्रांतिकारकांना काय काय करावं लागलं हे बघण्यासाठी हा चित्रपट नक्कीच बघावा. परंतु एक कलाकृती म्हणून म्हणावा तेवढा हा चित्रपट प्रभावी नाही. कन्नर अय्यर यांनी कथा आणि दिग्दर्शन दोन्हीवर अजून काम करण्याची गरज होती. बऱ्याच ठिकाणी साराचा अभिनय सुद्धा नैसर्गिक वाटत नाही. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.
१३. मडगाव एक्स्प्रेस |
लेखक | कुणाल खेमू |
दिग्दर्शक | कुणाल खेमू |
कलाकार | दिव्येंदु , प्रतीक गांधी , अविनाश तिवारी , नोरा फतेही , उपेंद्र लिमये, छाया कदम |
निर्माता | रितेश सिधवानी, फरहान अख्तर |
प्रदर्शित तारीख | १५ मार्च २०२४ |
भाषा | हिंदी |
“मडगाव एक्स्प्रेस” चित्रपट समीक्षा :-
आपण नेहमी असे व्हायरल मीम्स किंवा जोक्स वाचतो की गोव्याची ट्रिप फक्त प्लॅन होते, एक्झिक्युट होत नाही. अशाच तीन मित्रांच्या गोवा ट्रीप वर आधारित आ धमाल कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने कुणाल खेमू याने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे.
डोडो, आयुष आणि प्रतीक हे शाळेपासूनचे लंगोटी दोस्त. जे शाळेत असल्यापासून गोव्याला जाण्याचा प्लॅन करत असतात आणि स्वप्न बघत असतात. मोठं झाल्यावर आपापल्या आयुष्यात व्यस्त झाल्यावर एक दिवशी अचानक ते जुनं स्वप्न पूर्ण करायचं ठरवतात. आणि फायनली गोव्याला जायचा प्लान करतात. आता त्यांचा प्लान शाळेत असताना करत तसाच आताही करतात म्हणजे कमीत कमी खर्चात गोव्यात जाऊन मजा करणे. यासाठी सुरूवात अर्थातच प्रवासाने होते. तिकडे जाण्यासाठी ते मुंबईवरून मडगाव एक्स्प्रेस ने स्लीपर कोच मधून प्रवास करतात.
आता ट्विस्ट हा येतो की ट्रीप दरम्यान एका बॅगच्या अदलाबदली मुळे ते एका ड्रग्स प्रकरणात अडकतात. आणि काही गॅंगस्टर्स त्यांना भेटतात. आता खरंच त्यांचा या ड्रग्स प्रकरणाशी संबंध असतो का वैगरे हे बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल. चित्रपट मनोरंजन करणारा आहे , विनोदी आहे. कुणाल ने दिग्दर्शन चांगलं केलं आहे. एकंदर चित्रपट बघून तुमचं मनोरंजन होईल हे नक्की. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.
१४. स्वातंत्र्यवीर सावरकर |
लेखक | उत्कर्ष नैथानी, रणदीप हुड्डा |
दिग्दर्शक | रणदीप हुड्डा |
कलाकार | रणदीप हुड्डा,अंकिता लोखंडे, अमित सियाल, राजेश खेरा |
निर्माता | आनंद पंडित, रणदीप हुड्डा |
प्रदर्शित तारीख | २२मार्च २०२४ |
भाषा | हिंदी |
“स्वातंत्र्यवीर सावरकर” चित्रपट समीक्षा :-
प्रदर्शित होण्यापूर्वीच बराच चर्चेत असलेला चित्रपट म्हणजे रणदीप हुड्डा याने निर्मिती आणि दिग्दर्शन केलेला चित्रपट “स्वातंत्र्यवीर सावरकर”. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आयुष्यावर, त्यांनी देशासाठी केलेल्या कार्याबद्दल माहिती आणि आठवण करून देणारा हा चित्रपट आहे.
चित्रपटाची सुरुवात स्वातंत्र्यपूर्व काळ म्हणजे साधारण एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस प्लेगची साथ पसरली होती तो दाखवला आहे. प्लेग झालेल्या रूग्णांना इंग्रज अक्षरशः जिवंत जाळत होते आणि हे बघूनच छोट्या विनायकला इंग्रजांविरुद्ध चीड निर्माण होते. आणि त्याच्या देशकार्याला सुरुवात होते. आपल्या मोठ्या भावासोबत अभिनव संघटनेची स्थापना करून तरूणांना इंग्रजांविरुद्ध लढण्यास तयार करणे वैगरे हे कार्य या संघटनेमार्फत केले जात होते. इथपासून ते सावरकर यांच्या वकीली शिक्षणासाठी त्यांचं लंडनला जाणं, तिकडे अभिनव संघटनेची शाखा सुरू करणं, तिथेही क्रांतीकारी कार्य चालू ठेवणं ते अगदी त्यांनी भोगलेली काळ्या पाण्याची शिक्षा, भारताला स्वातंत्र्य मिळणं आणि सावरकर यांचं निधन असा त्यांचा जीवनपट या चित्रपटात मांडण्याचं शिवधनुष्य रणदीप हुड्डा याने उचललं आहे. सावरकर यांचं कार्य एका चित्रपटात मांडणं खरं तर अशक्य आहे आणि याचाच परिणाम म्हणून चित्रपट खूप वेगाने सरकतो असं वाटतं. दिग्दर्शक म्हणून सुद्धा कदाचित रणदीप ला हा चित्रपट नक्कीच अवघड वाटला असणार. परंतु रणदीप हुडा याने सावरकर यांची भूमिका साकारण्याची जी मेहनत घेतली आहे त्याला तोड नाही.
अंकिता लोखंडेने हीने सुद्धा सावरकरांच्या पत्नीची म्हणजे यशोदाबाईंची भूमिका साकारत रणदीप हुडा ला योग्य ती साथ दिली आहे. अमित सियालने साकारलेली सावरकरांच्या मोठ्या भावाची गणेशची भूमिका सुद्धा छान जमून आली आहे.
चित्रपटात स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी इंग्रजांना लिहीलेल्या माफीनाम्या बद्दल सविस्तरपणे सगळी पार्श्वभूमी आणि घटना दाखवल्या आहेत. सावरकर आणि गांधीजी यांच्यातील वैचारिक मतभेद का होते हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस आणि मदनलाल धिंग्रा यांचा सावरकर यांच्या विचारांवर काय प्रभाव होता हे बघायला मिळतं. एकंदर चित्रपट नक्कीच बघावा असा आहे. भारताला मिळालेलं स्वातंत्र्य सहज मिळालं नव्हतं हे तर माहीत आहेच परंतु त्यासाठी आपल्या क्रांतीकारकांना, आणि स्वातंत्र्यवीर सावरकर काय योगदान द्यावं लागलं हे सांगणारा हा चित्रपट आहे. आपल्या नवीन पिढीला आवर्जून दाखवावा असा हा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.
१५. क्रू |
लेखक | निधि मेहरा, मेहुल सूरी |
दिग्दर्शक | राजेश ए कृष्णन |
कलाकार | तब्बू, करीना कपूर खान, कृति सेनन, तृप्ति खामकर, कपिल शर्मा, दिलजीत दोसांझ, कुलभूषण खरबंदा, राजेश शर्मा. |
निर्माता | एकता कपूर, अनिल कपूर |
प्रदर्शित तारीख | २९ मार्च २०२४ |
भाषा | हिंदी |
“क्रू” चित्रपट समीक्षा :-
आजकाल चित्रपट काढायचे म्हणून काढले जातात की काय असं वाटायला लागलं आहे. ना कथेचा थांगपत्ता ना पटकथे मध्ये काही राम. असंच काहीसं झालं आहे राजेश कृष्णन यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘क्रू’ या चित्रपटात.
आघाडीच्या नायिका सोडल्यास विशेष असं काही या चित्रपटात पहायला मिळत नाही.
कोहिनूर एअरलाइन्समध्ये हवाई सुंदरी म्हणून काम करणाऱ्या तीन नायिकांची ही कथा आहे. विजय वालिया (शाश्वत चॅटर्जी) यांच्या मालकीची कोहिनूर एअरलाइन्स डबघाईस आलेली असते त्यामुळे सहा महिन्यांपासून तब्बल चार हजार कर्मचाऱ्यांचा पगार थकलेला असतो. अर्थात त्या कर्मचाऱ्यां मध्ये या तिघी म्हणजेच गीता सेठी (तब्बू), जस्मिन कोहली (करीना कपूर-खान) आणि दिव्या राणा (क्रिती सेनॉन) सुद्धा असतात. पगार नाही आणि ढिगभर आर्थिक अडचणीत अडकलेल्या तिघींना एक दिवस विमानात एक दिवस चक्क सोन्याची बिस्किटे सापडतात. त्यांचा सहकारी राजवंशीचा (रमाकांत दायमा) याचा मृत्यू होतो आणि त्याच्याच खिशात यांना ही बिस्किटे सापडतात. इथुनच त्यांचं नशिब पालटतं. परंतु खरा चित्रपट सुरू होतो जेव्हा या तिघींना अटक होते.
आता खरंच या तिघी सोन्याच्या तस्करी करण्यात सामील असतात की मुद्दाम त्यांना कोण अडकवतं.? हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल. या चित्रपटाच्या निमित्ताने आर्थिक तोट्यात असलेल्या विमानसेवा आणि तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अडचणी काय असतात हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. विनोदी असलेल्या कथा पटकथा कशातच राम नसल्याने दिग्दर्शक राजेश कृष्णन यांचं दिग्दर्शन सुद्धा ठिकठाक वाटतं. करीना कपूर, तब्बू आणि क्रीती सारख्या अभिनेत्री असून सुद्धा चित्रपट म्हणावा तेवढा प्रभावी झाला नाही. ओटीटी प्लॅटफॉर्मवर आल्यावर बघायला हरकत नाही असा हा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार.
१६. वो भी दिन थे |
लेखक | साजिद अली, सौरभ स्वामी |
दिग्दर्शक | साजिद अली |
कलाकार | जॉन अब्राहम , रोहित सराफ, संजना सांघी, चारु बेदी, आदर्श गौरव, गौरव पराजुली, जीशान क्वाड्री चोपड़ा, आशिम गुलाटी |
निर्माता | सुजीत सरकार,रोनी लाहीडी, शील कुमार |
प्रदर्शित तारीख | १५ मार्च २०२४ |
भाषा | हिंदी |
“वो भी दिन थे” चित्रपट समीक्षा :-
साजिद अली दिग्दर्शित वो भी दिन थे हा चित्रपट २९ मार्च रोजी झी फाईव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला हे एका अर्थाने बरंच झालं. कारण चित्रपटगृहात जाऊन बघावा इतकं विशेष या चित्रपटात नक्कीच काही नाही.
ही एक कॉलेजमधल्या मुलांचं आयुष्य आणि कॉलेज मध्ये होणारं प्रेम, प्रेमाचा त्रिकोण यावर बेतलेली कथा आहे. कथेचा नायक राहुल(जॉन अब्राहम) हा आपल्या कॉलेजमध्ये बऱ्याच वर्षांनी प्रमुख पाहुणा म्हणून आलेला आहे आणि कॉलेज मधील मुलं मुली, ते वातावरण बघून तो आपल्या भुतकाळात जातो. त्याला त्याच्या कॉलेजचे दिवस आठवतात. तरूणपणीच्या राहुलची भुमिका रोहित सराफ याने साकारली आहे. कॉलेज मध्ये असताना राहुल ला शालिनी नावाच्या मुलीवर प्रेम असतं परंतु त्याचवेळी त्याच्या कॉलेज मध्ये नव्याने आलेल्या मिल्कीसोबत सुद्धा त्याचं अफेअर असतं. जेव्हा की त्याचा जिगरी दोस्त कैजाद याला मिल्की आवडत असते. आणि याच कारणामुळे राहुल आणि कैजाद यांच्यात भांडणं होतात. पुढे जाऊन अनेक घटना घडतात की राहुल ला कॉलेज मधील काही मुलं मारतात. आता ते का मारतात? राहुल शेवटी कोणासोबत लग्न करतो या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
चित्रपटाची कथा ठिकठाक आहे. नक्की लेखकाला आणि पर्यायाने दिग्दर्शकाला काय सांगायचं होतं ते कळत नाही. एक हलकाफुलका मनोरंजन करणारा चित्रपट म्हणावा तर तेवढं मनोरंजन हा चित्रपट करत नाही. रोहीत सराफ याचा अभिनय चांगला आहे. जॉन च्या वाट्याला फार भूमिका आलेली नाही. बाकी कलाकारांनी अभिनय चांगला केला आहे. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार.
१७. पटना शुक्ला |
लेखक | विवेक बुड़ाकोटी, समीर अरोड़ा, फरीद खान |
दिग्दर्शक | विवेक बुड़ाकोटी |
कलाकार | रवीना टंडन, सतीश कौशिक,जतिन गोस्वामी, मानव विज, चंदन रॉय सान्याल,अनुष्का कौशिक,रियो कपाड़िया,दया शंकर पांडे, अमित गौड़ |
निर्माता | अरबाज खान |
प्रदर्शित तारीख | २९ मार्च २०२४ |
भाषा | हिंदी |
“पटना शुक्ला” चित्रपट समीक्षा :-
डिस्नी हॉटस्टार वर प्रदर्शित झालेला पटना शुक्ला या चित्रपटाच्या निमित्ताने रविना टंडन हीने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की ती एक चांगली अभिनेत्री आहे. आपल्या देशात, राज्यात राजकारण आणि भ्रष्टाचार यांचं नातं फार जवळचं आहे. हा भ्रष्टाचार प्रत्येक क्षेत्रात अगदी सहज होत असतो. शिक्षण क्षेत्र सुद्धा याला अपवाद नाही. असंच विद्यापीठात केल्या जाणाऱ्या भ्रष्टाचार आणि घोटाळा यावर प्रकाश टाकणारा हा चित्रपट आहे. रविना टंडन ही एका सामान्य वकीलाच्या भुमिकेत दिसते. जीला कोर्टात आणि घरात सुद्धा गृहीत धरलं जातं आणि फार महत्त्व दिलं जात नाही.
परंतु तन्वी शुक्ला म्हणजेच रविना हीच्या कडे अशी एक केस येते ज्यामुळे तिचं अस्तित्व सिद्ध करण्याची तिला संधी मिळते. रिंकी नावाच्या एका मुलीला खात्री कसते की तिचं मार्क शीट बदलून तिला चुकीचं मार्कशीट देण्यात आले आहे. तिला फर्स्ट क्लास मिळणार ही खात्री असते परंतु प्रत्यक्षात तिला खूप कमी मार्क्स मिळालेत असं प्रमाणपत्र मिळतं. याचसाठी ती विद्यापीठ विरोधात केस लढण्यासाठी तन्वी शुक्ला हीच्या कडे जाते. केस जसजशी उलगडत जाते तसं तन्वी च्या लक्षात येतं की यात मोठ्या नेत्याचा हात आहे.
आता तन्वी ही केस जिंकते का.? की नेत्याच्या धमकीला घाबरून केस सोडून देते हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल. रविना, अनुष्का कौशिक,सतीश कौशिक सगळ्याच कलाकारांनी अभिनय उत्तम केला आहे. कथा अजून रंगतदार पद्धतीने मांडता आली असती. परंतु एकदा बघायला हरकत नाही असा हा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.
तर मंडळी या वीकेंडला तुम्ही कोणता चित्रपट बघायला जाताय हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.