मार्च २०२४ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी
मार्च २०२४ मध्ये प्रदर्शित झालेले हे मराठी चित्रपट तुम्ही पाहिलेत का.?
Written by : आकांक्षा कोलते
Updated : मे 09, 2024 | 12:20 AM
खरं तर आता वेबसिरीज चा जमाना असल्यामुळे प्रेक्षकांच्या चित्रपटांच्या बाबतीत अपेक्षा वाढल्या आहेत. त्यातही नवीन आलेल्या चित्रपटांमध्ये ओरिजनल कंटेट कमीच असतो. परंतु आशयघन आणि दर्जेदार कथानक हा मराठी चित्रपटांचा गाभा आहे. मराठी चित्रपट हे नेहमीच वास्तववादी आणि चांगला कंटेंट घेऊन भेटीला येतात हे आता प्रेक्षकांच्या लक्षात येत आहे. त्यामुळे मराठी चित्रपटांना प्रेक्षक आता भरभरून प्रतिसाद देतात.
आज या लेखात आपण मार्च २०२४ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपट आम्हाला कसे वाटले ते सांगणार आहोत. ज्यामुळे ते बघायला हवे की नको ते ठरवणं तुम्हाला सोपं जाईल.

१. लग्न कल्लोळ |
लेखक | जितेंद्र कुमार परमार |
दिग्दर्शक | मोहम्मद बर्मावाला, डॉ. मयुर तिरमखे |
कलाकार | सिद्धार्थ जाधव, भूषण प्रधान, मयूरी देशमुख, प्रिया बेर्डे, प्रतिक्षा लोणकर, सुप्रिया कर्णिक |
निर्माता | अण्णासाहेब तिरमखे, मंगल तिरमखे, मयुर तिरमखे |
प्रदर्शित तारीख | १ मार्च २०२४ |
भाषा | मराठी |
“लग्न कल्लोळ” चित्रपट समीक्षा :-
मयुरी देशमुख, भुषण प्रधान आणि सिद्धार्थ जाधव यांचा लग्न कल्लोळ हा चित्रपट तुम्ही आता अल्ट्रा मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर बघू शकता.
सिद्धार्थ जाधव म्हटलं की विनोदी चित्रपट आहे हे सांगायला नको. खरं तर गंभीर भूमिका सुद्धा तेवढ्याच ताकदीने साकारतो परंतु विनोदी भूमिका हा त्याचा हातखंडा आहे. या चित्रपटात सुद्धा सिद्धार्थ ने उडवलेली धमाल पहायला मिळते.
चित्रपटाची कथा ही श्रुती आणि अथर्वच्या लग्नाभोवती फिरणारी आहे. हे दोघं एकमेकांवर प्रेम करत असतात आणि त्यांना लग्न करायचं आहे, खरं तर त्यात अडचण अशी काही नाहीय परंतु गडबड अशी झाली आहे की श्रुती ला एक जुळी बहीण आहे. आणि तिचं लग्न, तिचा संसार मोडण्याच्या मार्गावर आहे. आता जुळी बहीण म्हटल्यावर श्रुती ची पत्रिका पण सारखीच. तिच्या ग्रहांची स्थिती सुद्धा सारखीच. मग आता श्रुतीला अशी भीती वाटत आहे की जर हे लग्न झालं आणि बहीणी प्रमाणेच तिचा संसार सुद्धा मोडेल की काय.? तसं होऊ नये म्हणून श्रुती काय काय शक्कल लढवते, काय काय योजना आखते हे धमाल पद्धतीने दाखवलं आहे. खरं तर ते सगळं बघताना पटत नाही. आता श्रुती नक्की काय करते.? तिचं लग्न होतं का.? ते टिकतं का.? हे सगळं बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल.
मनोरंजन म्हणून एकदा बघायला हरकत नाही. परंतु कथा अजून चांगली कसती तर कदाचित चित्रपट चांगला झाला असता. प्रिया बेर्डे, प्रतिक्षा लोणकर, सुप्रिया कर्णिक या सगळ्या सहकलाकारांनी अभिनय उत्तम केला आहे. लोकेशन्स, सिनेमॅटोग्राफी छान आहे. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.
२. ही अनोखी गाठ |
लेखक | महेश मांजरेकर |
दिग्दर्शक | महेश मांजरेकर |
कलाकार | श्रेयस तळपदे, गौरी इंगवले, ऋषी सक्सेना, शरद पोंक्षे, सुहास जोशी |
प्रदर्शित तारीख | १ मार्च २०२४ |
भाषा | मराठी |
“ही अनोखी गाठ” चित्रपट समीक्षा :-
जर तुम्हाला वाटत असेल की पांघरूण चित्रपटातील “ही अनोखी गाठ कोणी बांधली” या वैभव जोशी यांच्या गाण्यावरून या चित्रपटाचं हे नाव ठेवलं आहे तर तुमचा अंदाज बरोबर आहे. फार मसाला नसलेला एक नितांत सुंदर प्रेमकथा असलेला हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे महेश मांजरेकर यांनी. या चित्रपटाची कथा पटकथा सुद्धा त्यांनीच लिहिली आहे.
चित्रपटाची कथा, विषय नवीन नाही. “हम दिल दे चुके सनम” या चित्रपटाची आठवण करून देणारा हा चित्रपट आहे. श्रेयस तळपदे आणि गौरी इंगवले हे दोघं प्रमुख भूमिकेत आहेत. श्रीनिवास म्हणजे श्रेयस तळपदे हा पेशाने वकील असून जबाबदाऱ्या पार पाडण्याच्या नादात चाळीशी उलटून गेली तरी त्याचं लग्न झालेलं नाहीय. आणि आता त्याची आई सुहास जोशी जी मृत्यूच्या दारात उभी आहे ती त्याच्या मागे लागून त्याचं लग्न अदीती(दिप्ती लेले) हीच्या सोबत ठरवते. परंतु लग्नापूर्वीच अदीतीचा मृत्यू होतो त्यामुळे अदीतीचे वडील आपल्या लहान मुलीचा म्हणजे आमला हीचा हात श्रीनिवास च्या हातात देऊन तिच्या मनाविरुद्ध त्यांचं लग्न लावून देतात. आमला ही एक उत्कृष्ट नृत्यांगना असून तिला अभिनेत्री व्हायचं असतं. यासाठी ती त्या क्षेत्रातील सिनेमॅटोग्राफर असलेल्या रोहीतच्या संपर्कात असते, जी रोहीत कडे त्या क्षेत्रात जाण्यासाठी एक मार्ग म्हणून बघत असते तर एकीकडे
रोहीत ला अमला आवडत असते.
परंतु जेव्हा श्रीनिवास च्या लक्षात येतं की अमला आणि त्याच्या मध्ये ते प्रेमाचं, पती पत्नीचं नातं, तो बंध निर्माण होत नाहीय तेव्हा तो अमला आणि रोहित यांना एकत्र आणण्याचं ठरवतो. आता पुढे काय होतं हे बघण्यासाठी चित्रपट बघावा हे उत्तम.
महेश मांजरेकर यांचा अशा प्रकारच्या चित्रपटांमध्ये हातखंडा आहे. त्यांचं दिग्दर्शन उत्तम आहे परंतु पटकथा लिहीताना ती तुकड्या तुकड्यात लिहीली आहे असं वाटतं. कुठे कुठे भावना कमी पडल्या असं जाणवतं. अभिनय मात्र सगळ्यांच्या छान झाला आहे. चित्रपटाची जमेची बाजू म्हणजे संगीत. सगळी गाणी उत्कृष्ट आणि अर्थपूर्ण आहेत. एकंदर तुम्हाला तरल साधी, मनाचा वेध घेणारी प्रेमकहाणी बघायची असेल तर हा चित्रपट बघू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.
३. दंगा |
लेखक | विशाल पाटील |
दिग्दर्शक | रमीझ राजा मुर्तुझा, विशाल पाटील |
कलाकार | सचीन गिरी, सोनल सागोरे, नागेश भोसले, मानीनी दुर्गे |
निर्माता | राकेश कुमार गाडेकर |
प्रदर्शित तारीख | १५ मार्च २०२४ |
भाषा | मराठी |
“दंगा” चित्रपट समीक्षा :-
१ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांपैकी अजून एक चित्रपट म्हणजे रमीझ राजा मुर्तुझा आणि विशाल पाटील दिग्दर्शित “दंगा” चित्रपट. खरं तर साध्या एका वाक्यात सांगायचं झालं तर या चित्रपटाबद्दल
लिहिण्यासारखं विशेष असं काही नाही. खरं तर चित्रपट निर्मिती करायची म्हणजे खूप मोठी आर्थिक गणितं जुळळावी लागतात आणि ते करून जर चित्रपट अशा प्रकारे बनवायचा असेल तर स्वतः स्वतःचे नुकसान करून घेण्यासारखे आहे. असो.!
एका खेडेगावात घडणारी ही कथा आहे. भोऱ्या आणि चिंगी यांना त्यांच्या गावातील तान्हाबाई या महीलेवर एक चित्रपट काढायचा असतो. आता तीच्यावरच का हे चित्रपट बघीतल्यावर कळेल. या चित्रपटात ग्रामीण भागातील गावांमध्ये कशा प्रकारे राजकारण चालतं ते दाखवलं आहे. तसेच अर्थात प्रेमकथा सुद्धा आहे.
राजकारण , खेडेगावातील आयुष्य असं सगळं या चित्रपटात आहे. चित्रपटाची कथा,पटकथा, संवाद, संगीत यातील एकही गोष्ट छान म्हणावी अशी नाही. अगदी अभिनय सुद्धा जेमतेम आहे. नागेश भोसले यांचा अभिनय चांगला आहे.
दिग्दर्शन अगदीच सुमार. एकंदर चित्रपट नाही बघीतला तरी चालेल. माझ्याकडून या चित्रपटाला एक स्टार.
४. मन येड्यागत झालं |
लेखक | विकास जोशी, सुदर्शन पांचाळ |
दिग्दर्शक | योगेश जाधव |
कलाकार | स्वानंदी बेर्डे , सुमेध मुदग्ळकर |
निर्माता | कुणाल कंदकुर्ते, संदीप जोशी |
प्रदर्शित तारीख | १ मार्च २०२४ |
भाषा | मराठी |
“मन येड्यागत झालं” चित्रपट समीक्षा :-
१ मार्च रोजी प्रदर्शित झालेला “मन येड्यागत झालं” हा चित्रपट योगेश जाधव यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने आपला लाडका लक्ष्या म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे यांची मुलगी स्वानंदी बेर्डे हीने पदार्पण केले आहे. चित्रपटाची कथा वेगळी किंवा नवीन नसून तीच आपल्याला पाठ असलेली कथा आहे. चित्रपट बघताना सैराटची कॉपी केलीय का असं वाटतं. विकास जोशी आणि सुदर्शन पांचाळ यांनी मिळून ही कथा लिहिली आहे.
सैराट प्रमाणेच यश(सुमेध) आणि पुजा (स्वानंदी) हे दोघं एकाच कॉलेजमध्ये एकाच वर्गात शिकत असतात. यशला पुजा आवडत असते, अगदी वेड्यासारखं तो तिच्या प्रेमात असतो. आणि पुजा ही एक चुलबुली थोडी कडक स्वभावाची मुलगी असते. तिला सुरूवातीला यश आवडत नसतो परंतु आवडला नाही तर चित्रपटाची कथा पुढे सरकरणार कशी.? त्यामुळे दोघं प्रेमात पडतात. परंतु तरूण अल्लड वयात झालेल्या प्रेमाचं पुढे जाऊन काय होतं हे सगळ्यांनाच माहीत आहे. तेच यांच्या बाबतीत होतं. ते बघून हा चित्रपट सैराट पासून प्रेरणा घेऊन बनवला आहे असं वाटतं.
चित्रपटाचं दिग्दर्शन अगदीच सुमार आहे. संगीत, गाणी, एडिटिंग सगळं ठीकठाक आहे. सिनेमॅटोग्राफी छान आहे. एकंदर नवीन असं चित्रपटात काही नाही. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.
५. कन्नी |
लेखक | समीर जोशी |
दिग्दर्शक | समीर जोशी |
कलाकार | हृता दुर्गुळे, शुभंकर तावडे, अजिंक्य राऊत, वल्लरी विराज, ऋषी मनोहर |
निर्माता | अमित भरगड, गगन मेश्राम, वैभव भोर, सनी राजानी |
प्रदर्शित तारीख | २३ फेब्रुवारी २०२४ |
भाषा | मराठी |
“कन्नी” चित्रपट समीक्षा :-
कल्याणी रेवंडीकर म्हणजे कन्नी हीची आणि तिच्या स्वप्नपूर्ती साठी तिने घेतलेल्या मेहनतीची , जिद्दीची ही गोष्ट आहे. आपल्या कुटुंबाला सुख देण्यासाठी आणि स्वतःची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी लंडनमध्ये गेलेली कन्नी आपल्या सोहम, निशा आणि भूषण या तीन मित्रांसोबत राहत असते. परंतु आता तिचा व्हिसा संपत आलेला असतो त्यामुळे तिला नव्या नोकरीची गरज असते. कारण भारतात परत आल्यावर तिचे काका तिचं लग्न लावून देणार असतात. हृता दुर्गुळे हीने कल्याणीची भूमिका साकारली आहे.
आता कन्नीला नवीन नोकरी मिळते का.? व्हिसा मिळतो का कि भारतात येऊन तिला लग्न करावं लागतं.? व्हिसा मिळवण्यासाठी कन्नी काय काय शक्कल लढवते हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल. चित्रपटाची कथा पटकथा अतिशय संथपणे पुढे सरकते. संकलन सुद्धा ठिकठाक असल्यामुळे चित्रपट प्रभावी वाटत नाही. मुळ विषय किंवा कथा नक्कीच चांगली आहे. संवाद, सिनेमॅटोग्राफी, अभिनय या सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.
६. अमलताश |
लेखक | सुहास देसले |
दिग्दर्शक | सुहास देसले |
कलाकार | राहुल देशपांडे, पल्लवी परांजपे, प्रतिभा पाध्ये, दिप्ती कुंटे |
निर्माता | मुग्धा देसाई, जितेंद्र जोशी |
प्रदर्शित तारीख | ८ मार्च २०२४ |
भाषा | मराठी |
“अमलताश” चित्रपट समीक्षा :-
मी वसंतराव या चित्रपटात आपण गायक राहुल देशपांडे याला अभिनय करताना पाहीलं आहे. राहुल हा एक उत्कृष्ट गायक आणि सोबतच एक चांगला अभिनेता आहे हे त्याने आता पुन्हा एकदा सिद्ध केले आहे त्याच्या अमलताश या चित्रपटातून.
अमलताश हा चित्रपट म्हणजे कथा, पटकथा, गाणी, संगीत, संवाद आणि अभिनय या सगळ्याचा सुरेख संगम आहे. सुहास देसले यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट म्हणजे एक सांगितिक सुरेल मेजवानी आहे. राहुल देशपांडे आणि पल्लवी परांजपे यांची मुख्य जोडी या चित्रपटात बघायला मिळते. त्यांच्या नात्याची सुंदर तरल गुंफण इतक्या अलगदपणे दिग्दर्शक सुहास यांनी विणली आहे की, या नात्याचा प्रवास बघताना भर उन्हात एखाद्या अमलताश च्या झाडाखाली सावलीचा आनंद घ्यावा असा अनुभव येतो.
राहुल हा एक संगीताची जाण असलेला उत्तम गायक आहे. त्याचा मित्रांसोबत एक म्युझिकल बॅंड सुद्धा असतो. परंतु सध्या तो बंद असल्याने वाद्यांचं एक दुकान ते चालवत असतात. असंच एका घरी वाद्याच्या दुरूस्तीकरता गेल्यावर राहुल ची ओळख किर्ती सोबत होते. किर्ती ही कॅनडा वरून भारतात आपल्या आजीकडे आलेली असते. तिला सुद्धा संगीताची आवड असते. याचमुळे राहुल आणि किर्ती ची ओळख होऊन त्यांच्या नात्याची विशेष तार जुळते. त्यांच्यात मैत्री असते की प्रेम हे ठरवणं अवघड. कोणतं नाव नसलेलं हे नितांत सुंदर नातं जसं जसं पुढे जातं ते बहरत जातं. आता पुढे त्या नात्याचं काय होतं हे बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल.
एक अतिशय सुंदर अनुभव अनुभवायला मिळेल हे नक्की. राहुल आणि पल्लवी या दोघांनीही उत्तम अभिनय केला आहे. माझ्याकडून या चित्रपटाला साडेतीन स्टार.
७. तेरवं |
लेखक | श्याम पेठकर |
दिग्दर्शक | हरिष इथापे |
कलाकार | संदिप पाठक, किरण खोजे, किरण माने, नेहा दंडाळे |
निर्माता | नरेंद्र जिचकार |
प्रदर्शित तारीख | ८ मार्च २०२४ |
भाषा | मराठी |
“तेरवं” चित्रपट समीक्षा :-
८ मार्च रोजी प्रदर्शित झालेला हरिष इथापे दिग्दर्शित तेरवं हा चित्रपट शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि त्यानंतर त्यांच्या विधवा झालेल्या बायकांचा समाजात जगण्यासाठी होणारा संघर्ष यावर बेतलेला आहे. महाराष्ट्रातील यवतमाळ, वर्धा या भागात या चित्रपटाचं चित्रीकरण करण्यात आले आहे. या भागात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण जास्त असते.
किरण खोजे हिने चित्रपटात जनाबाई ही मुख्य भूमिका साकारली आहे. तर जनाबाईंच्या पतीच्या म्हणजे सुधाकरच्या भुमिकेत संदिप पाठक आहे. स्वतःच्या मतावर ठाम असणारी आणि पुढारलेल्या विचारांची जनाबाई आपल्या पतीने आत्महत्या केल्यावर रडत न बसता जिद्दीने उभी राहते.माहेर सासरकडून कोणताच पाठिंबा नसलेली जनाबाई गावातील इतर विधवा महिलांसाठी सुद्धा उभी राहते. एका अतिशय चांगल्या विषयावर हा चित्रपट बनवण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा आपल्याकडे अतिशय गंभीर आणि संवेदनशील असा प्रश्न आहे. एखाद्या शेतकऱ्याने जीव दिल्यावर त्याच्या मागे कुटुंबाचं काय होतं, त्याच्या पत्नीला कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. यावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे.
चित्रपटाचा विषय चांगला आहे परंतु पटकथा आणि दिग्दर्शन ठिकठाक असल्यामुळे चित्रपट प्रभावी वाटत नाही. बाकी संदिप पाठक, किरण खोजे, किरण माने यांचं काम चांगलं झालं आहे. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.
३. लॉकडाऊन लग्न |
लेखक | सागर पाठक, सुमित संघमित्र |
दिग्दर्शक | सुमित संघमित्र |
कलाकार | हार्दिक जोशी, सुनील अभ्यंकर, प्रवीण तरडे, क्षितिष दाते, अमोल कागणे, विराट मडके,प्राजक्ता गायकवाड,अश्विनी चावरे, चेतन चावडा, किरण कुमावत, सुशांत दिवेकर |
निर्माता | लक्ष्मण कांगणे, अमोल कांगणे, सागर पाठक |
प्रदर्शित तारीख | ८ मार्च २०२४ |
भाषा | मराठी |
“जगभरून फिल्म्स” चित्रपट समीक्षा :-
मराठी चित्रपटांना प्रेक्षक नाही अशी नेहमीच तक्रार असते परंतु सध्या मराठी चित्रपट कधी आणि कुठे प्रदर्शित होतात हेच प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाही. सुमित संघमित्र दिग्दर्शित लॉकडाऊन लग्न हा चित्रपट ८ मार्च रोजी प्रदर्शित झाला परंतु या चित्रपटाचं प्रमोशन न झाल्यामुळे लोकांपर्यंत तो पोहचलाच नाही. हार्दिक जोशी हा मालिकांमधून घराघरात पोहोचलेला लाडका कलाकार. तो या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे.
चार वर्षांपूर्वी कोरोना ने थैमान घातले होते तेव्हा संपूर्ण जगात एका भीतीचं वातावरण होतं. असं असलं तरीही एक बाजू अशी सुद्धा होती की याच लॉकडाऊन च्या काळात बरीच लग्न पार पडली. तर काही ठरलेली पुढे ढकलली गेली. अशाच लॉकडाऊन मधील एका लग्नाची ही गोष्ट आहे. आपल्या बहीणी साठी उत्तम स्थळ शोधता शोधता भाऊ स्वतःच एका मुलीच्या कसं प्रेमात पडतो हे मजेशीर पद्धतीने दाखवलं आहे. तसंच एका लग्न ठरलेल्या जोडीच्या आयुष्यात लॉकडाऊन लागल्यामुळे काय होतं हे सुद्धा दाखवलं आहे. एकंदर धमाल विनोदी असा हा चित्रपट आहे. झी फाईव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट तुम्ही बघू शकता.
प्रवीण तरडे यांची सुद्धा एक महत्वपूर्ण भूमिका या चित्रपटात पहायला मिळते. सगळ्या कलाकारांनी अभिनय चांगला केला आहे. परंतु एक परिपूर्ण चित्रपट म्हणून हा चित्रपट कुठेतरी कमी पडतो. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.
९. भागिरथी मिसिंग |
लेखक | संजय इंगुळकर |
दिग्दर्शक | सचिन वाघ |
कलाकार | शिल्पा ठाकरे, सुरेश विश्वकर्मा, अभिषेक अवचट, चंद्रकांत मूळगुंदकर, संदीप कुलकर्णी, पूजा पवार |
प्रदर्शित तारीख | ८ मार्च २०२४ |
भाषा | मराठी |
“भागिरथी मिसिंग” चित्रपट समीक्षा :-
भागिरथी मिसिंग हा चित्रपट ८ मार्च रोजी प्रदर्शित करण्याचा उद्देश म्हणजे स्त्रीयांवर होणारा अन्याय आणि अत्याचार यावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. आणि महीला दिनाचं औचित्य साधून हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला.
सचिन वाघ यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून ही एका गावात घडणारी गोष्ट आहे. सस्पेन्स थ्रिलर अशा धाटणीचा हा चित्रपट आहे. एका छोट्याश्या गावातील ही गोष्ट आहे. एका कुटुंबातील नुकतंच लग्न झालेलं एक तरुण विवाहित मुलगी अचानक बेपत्ता होते आणि तिचा शोध घेण्यासाठी पोलिस यंत्रणा कामाला लागते. तिचा शोध घेता घेता तिच्या पुर्वा आयुष्यातील अनेक घटना उलगडत जातात. आता त्या घटना काय आहेत.? किंवा ती मुलगी सापडते का हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
आजकाल मुलींना पळवून नेणे किंवा त्यांचं बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढत चाललं आहे. या गंभीर विषयाला हात घालणारा हा चित्रपट आहे. मनोरंजन म्हणून एकदा बघायला हरकत नाही असा हा चित्रपट आहे. पटकथा अजून रंजक असती तर चित्रपट अजून जास्त प्रभावी झाला असता. दिग्दर्शन ठिकठाक आहे. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.
१०. ऊन सावली |
लेखक | अभय वर्धन |
दिग्दर्शक | दिवाकर नाईक |
कलाकार | भुषण प्रधान, शिवानी सुर्वे, अजिंक्य नानावरे |
निर्माता | समीर ए शेख |
प्रदर्शित तारीख | १५ मार्च २०२४ |
भाषा | मराठी |
“ऊन सावली” चित्रपट समीक्षा :-
१५ मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला ऊन सावली हा चित्रपट आता अल्ट्रा झकास या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेला आहे. भुषण प्रधान, शिवानी सुर्वे आणि अजिंक्य नानावरे यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट फार काही नवीन विषय किंवा कथा असलेला चित्रपट नाहीय परंतु भुषण आणि शिवानी यांना एकत्र बघायला प्रेक्षकांना कदाचित आवडू शकतं.
हल्ली प्रेमविवाह करण्याचं प्रमाण वाढत चाललं आहे परंतू पूर्वीच्या काळी असं मोठी माणसं पद्धतशीर ठरवून लग्न लावून देत, तेव्हा दोन अनोळखी व्यक्ती एकमेकांना समजून घेत कसे प्रेमात पडत असतील हे या चित्रपटात पहायला मिळतं. अन्वी(शिवानी) आणि प्रणय(भुषण) या दोघांच्या घरचे त्यांच लग्न ठरवतात परंतु या दोघांनाही हे लग्न करायचं नसतं. पण जेव्हा ते दोघं एकमेकांना भेटतात तेव्हा मात्र प्रणयला अन्वी मनापासून आवडते. कालांतराने अन्वीला सुद्धा प्रणय आवडायला लागतो इतक्यात तिचा भुतकाळ तिच्यासमोर उभा राहतो. ही स्टोरी तुम्हाला हम दिल दे चुके सनम सारखी वाटू शकते. चित्रपटाची कथा पटकथा काहीच नवीन नाही.
कलाकारांचा अभिनय ठिक आहे. सिनेमॅटोग्राफी, संगीत, संवाद ठिक आहे. छान किंवा वेगळं खास असं या चित्रपटात काही नाही. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.
११. शिष्यवृत्ती |
लेखक | अखील देसाई |
दिग्दर्शक | अखील देसाई |
कलाकार | रूद्र ढोरे, दुष्यंत वाघ, कमलेश सावंत,अनिकेत केळकर, उदय सबनीस, अंशुमन विचारे |
निर्माता | अनिल बेहेरे, वीनया गोझर, सुभाष मांडवकर |
प्रदर्शित तारीख | ८ मार्च २०२४ |
भाषा | मराठी |
शिष्यवृत्ती” चित्रपट समीक्षा :-
चित्रपटाच्या नावाप्रमाणेच ही कथा एका मुलाच्या शालेय शिक्षणावर आधारित आहे. अखील देसाई यांनी या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद लिहिले असून दिग्दर्शन सुद्धा त्यांनी स्वतः केले आहे. या चित्रपटाचं फार प्रमोशन न झाल्यामुळे लोकांपर्यंत हा चित्रपट पोहचला नाही.
चित्रपटाची कथा अर्थातच एका शाळेत शिकणाऱ्या मुलाभोवती फिरणारी आहे त्यामुळे चित्रपटाचं बरचसं चित्रिकरण हे शाळेच्या आवारात झालेलं आहे.राजू हा एक अतिशय हुशार आणि गुणी विद्यार्थी असतो. जसा अभ्यासात हुशार तसाच तो खेळात सुद्धा तरबेज असतो. उत्तम खेळाडू आणि हुशार म्हणून तो सगळ्यांना माहीत असतो. परंतु राजूच्या घरची परिस्थिती बेताची असल्याने त्याच्या पुढच्या शिक्षणाची सोय होणं अवघड असतं. याचमुळे त्या शाळेत नव्याने आलेले शिक्षक गावडे सर हे त्याला शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असतात. परंतु ही शिष्यवृत्ती राजूला घ्यायची नसते. आता तसं का हे मात्र चित्रपट बघीतल्यावरच कळेल.
शिष्यवृत्ती न घेता राजू पुढे शिकतो का.? त्याची ही प्रेरणादायी गोष्ट म्हणजे हा चित्रपट. कथा पटकथा संवाद दिग्दर्शन सगळं ठिक आहे. काही कलाकारांचा अभिनय सोडला तर बाकी नवखे वाटतात. सिनेमॅटोग्राफी, लोकेशन्स उत्तम आहेत. बाकी हा चित्रपट म्हणावा तेवढा खास नाही. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार.
१२. मोऱ्या |
लेखक | जितेंद्र बर्डे |
दिग्दर्शक | जितेंद्र बर्डे |
कलाकार | जितेंद्र बर्डे, उमेश जगताप, कुणाल पुणेकर, रूपाली गायखे, शिवाजी गायकवाड, धनश्री पाटील, रूद्रम बर्डे |
निर्माता | तृप्ती कुलकर्णी, राजेश अहिवले |
प्रदर्शित तारीख | २२ मार्च २०२४ |
भाषा | मराठी |
“मोऱ्या” चित्रपट समीक्षा :-
ही गोष्ट आहे एका मोऱ्या नावाच्या एका तरूणाची. जो एका गावात राहून रस्ते, गटारं साफ करण्याचं काम करत असतो. आता हे वेगळं सांगायची गरज नाही की मोऱ्या हा अनुसूचित जाती मधील असतो. आपल्या समाजात आजही काही ठराविक कामं अनुसूचित जाती मधील लोकांनीच करावी असा एक समज किंवा तशी धारणा असते. तर मोऱ्या हा कष्ट करून आपल्या मुलासोबत आणि पत्नी सोबत राहत असतो. मात्र त्याचा मुलगा सचिन हा अभ्यासात खूप हुशार असतो. परंतु या सचिन ला आपल्या जातीवरून आणि आपल्या वडिलांच्या कामावरून खूप बोलणी ऐकावी लागत. त्याच्या शाळेतील मुलं त्याची टर उडवतात.
परंतु हे चित्र बदलतं जेव्हा मोऱ्या अनुसूचित जाती मधून निवडणुकीत उभा राहतो आणि जिंकतो सुद्धा. यामागे गावचे नेते बापूसाहेब मोहीते हे असतात. मोऱ्या सरपंच होतो. परंतु किती काही झालं तरी आपला समाज या अनुसूचित जाती मधील लोकांना सहसा स्विकारत नाही. त्यांच्या हक्कांसाठी कितीही कायदे आले तरी समाजात त्यांना हवा तो मान सन्मान मिळत नाही.
आता मोऱ्या सरपंच झाल्यावर तरी ही परिस्थिती बदलते का? हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल. चित्रपटाची कथा पटकथा ठिकठाक आहे. दिग्दर्शन सुमार आहे असं म्हणावं लागेल. अभिनय सुद्धा ठिकठाक आहे. विषय चांगला असला तरी चित्रपट तेवढा प्रभावी नाही. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार.
१३. जन्म ऋण |
लेखक | कांचन अधिकारी, मंजुश्री गोखले |
दिग्दर्शक | कांचन अधिकारी |
कलाकार | मनोज जोशी , सुकन्या कुलकर्णी, सुशांत शेलार, शशी पेंडसे, आर के तुषार |
निर्माता | कांचन अधिकारी |
प्रदर्शित तारीख | २२ मार्च २०२४ |
भाषा | मराठी |
“जन्म ऋण” चित्रपट समीक्षा :-
हल्ली काळ बदलला आहे आणि काळाप्रमाणे आजकाल ची पिढी देखील बदलली आहे. आईवडील आपल्या मुलांसाठी आपलं आयुष्य खर्ची घालून त्यांचं आणि आपलं भविष्य सुखात जावं यासाठी प्रयत्न करतात परंतु मुलांना मात्र त्याबद्दल काही वाटत नसतं. ते फक्त स्वतःचा विचार करतात. अशाच एका आपल्या वडिलांचा विश्वासघात करणाऱ्या एका स्वार्थी मुलाची ही गोष्ट आहे. एका सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट आहे.
अण्णा (मनोज जोशी) हे कोकणातील दापोली येथे राहणारे निवृत्त शिक्षक आहेत. खूप कष्टाने त्यांनी आपल्या मुलाला दिलिपला शिकवून इंजिनिअर बनवून अमेरिकेत पाठवलेले असते. परंतु हाच दिलिप जेव्हा भारतात परत येतो आणि आपल्या आईवडिलांना अमेरिकेत घेऊन जायचं स्वप्न दाखवून खोट्या सह्या घेऊन पॉवर ऑफ ॲटर्नी वर सह्या घेतो तेव्हा अण्णांच्या पायाखालची जमीन सरकते. पुढे काय होतं हे बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल. यात सुकन्या कुलकर्णी यांनी अण्णांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे.
कांचन अधिकारी यांनी लिहिलेल्या कथेत नावीन्य असं काही नाहीय. कथा तुटक तुटक भागात लिहील्यासारखी वाटते. दिग्दर्शन चांगलं केलं आहे. लोकेशन्स सिनेमॅटोग्राफी छान आहे. मनोज जोशी आणि सुकन्या कुलकर्णी यांनी अभिनय सुद्धा उत्तम केला आहे. परंतु एक चित्रपट म्हणून मनोरंजन करण्यास हा चित्रपट कुठेतरी कमी पडतो. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.
१४. अलिबाबा आणि चाळिशीतले चोर |
लेखक | विवेक बेळे |
दिग्दर्शक | आदित्य इंगळे |
कलाकार | सुबोध भावे, श्रुती मराठे, मुक्ता बर्वे, अतुल परचुरे, उमेश कामत, मधुरा वेलणकर, आनंद इंगळे |
निर्माता | नितीन वैद्य, वैशाली लोंढे, निखिल वराडकर, संदिप देशपांडे |
प्रदर्शित तारीख | २२ मार्च २०२४ |
भाषा | मराठी |
“जगभरून फिल्म्स” चित्रपट समीक्षा :-
बऱ्यापैकी चर्चेत असलेला “अलिबाबा आणि चाळिशीतले चोर” हा चित्रपट विवेक बेळे यांनी काही वर्षांपूर्वी लिहिलेल्या एका नाटकावर आधारित आहे. आयुष्यातील मध्यावर म्हणजेच चाळीशीच्या टप्प्यावर आल्यानंतर काही स्त्री काय किंवा पुरुष काय दोघंही भावनिक आधार असेल किंवा अजून काही परंतु आपला जोडीदार सोडून इतर स्त्री पुरूषांकडे आकर्षित होतात. काही उघडपणे तर काही लपून छपून अशा नात्यांमध्ये गुंतलेले असतात. याच संवेदनशील विषयावर गंमतीशीर आणि विनोदी पद्धतीने भाष्य करणारा हा चित्रपट आहे.
डॉक्टर (अतुल परचुरे) आणि सुमित्रा (मुक्ता बर्वे) या दोघांची जोडी, तर पराग (सुबोध भावे) आणि अदिती (श्रुती मराठे) ही एक जोडी, वरुण (आनंद इंगळे) आणि शलाका (मधुरा वेलणकर-साटम) ही तिसरी जोडी अशा तीन जोडप्यांसोबत त्यांचा लग्न न झालेला अजून एक मित्र म्हणजे अभिषेक (उमेश कामत). त्यांच्यातील धमाल बघताना मजा येते. प्रत्येक जण आपला जोडीदार सोडून इतरांसोबत आकर्षित असलेला बघायला मिळतो.
असंच हे सगळेजण एकदा फिरायला जातात. तिकडे नाचगाणी धमाल सुरू असताना अचानक लाईट जाते आणि कोणीतरी कुणाचं तरी चुंबन घेतल्याचा आवाज येतो. आता प्रत्येक जण आपापल्या जोडीदारावर संशय घेतो. आणि इथेच खरी धमाल सुरू होते. आता हे चुंबन कोणी कोणाचं घेतलय हे मात्र चित्रपट बघीतल्यावरच कळेल.
सगळ्याच कलाकारांनी अभिनय उत्तम केला आहे. सगळेच कसलेले कलाकार एकत्र आल्यामुळे चित्रपट बघताना मजा येते. चित्रपटाची कथा सुद्धा इतर नेहमीच्या कथांपेक्षा वेगळी आहे. दिग्दर्शन सुद्धा छान आहे. एकंदर धमाल विनोदी असा हा चित्रपट नक्कीच बघावा असा आहे. माझ्याकडून या चित्रपटाला साडेतीन स्टार.
तर मंडळी गेल्या महिन्यात तुम्ही यातील कोणकोणते चित्रपट पाहिले ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा.