एप्रिल २०२४ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी
एप्रिल २०२४ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेले हे हिंदी चित्रपट तुम्ही पाहीलेत का?
Written by : आकांक्षा कोलते
Updated : मे 10, 2024 | 12:40 AM
खरं तर आता वेबसिरीज चा जमाना असल्यामुळे प्रेक्षकांच्या चित्रपटांच्या बाबतीत अपेक्षा वाढल्या आहेत. त्यातही नवीन आलेल्या चित्रपटांमध्ये ओरिजनल कंटेट कमीच असतो. बरेच चित्रपट हे रिमेक असतात. त्यामुळे चित्रपटगृहात प्रेक्षकांना खेचून आणणं हे आता निर्माते आणि दिग्दर्शक यांच्यापुढे नवीन आव्हान आहे. आता प्रेक्षकांच्या चित्रपटांच्या बाबतीत असलेल्या अपेक्षा पूर्ण होतायत की नाही हे आमच्या परीने सांगण्याचा प्रयत्न या लेखात आम्ही करणार आहोत.
आज या लेखात एप्रिल महिन्यात प्रदर्शित झालेले चित्रपट कोणते आहेत आणि बघायला हवेत की नको याबद्दल आमचं मत सांगणार आहोत.

१. दुकान (Dukan) |
लेखक | सिद्धार्थ सिंह, गरिमा वहाल |
दिग्दर्शक | सिद्धार्थ-गरिमा |
कलाकार | मोनिका पंवार, सिकंदर खेर, मोनाली ठाकुर, सोहम मजूमदार,हिमानी शिवपुरी, गीतिका त्यागी |
निर्माता | ए झुनझुनवाला, एस के अहलूवालिया,सिद्धार्थ आणि गरिमा |
प्रदर्शित तारीख | ५ एप्रिल २०२४ |
भाषा | हिंदी |
“दुकान” चित्रपट समीक्षा :-
सिद्धार्थ-गरिमा लिखित आणि दिग्दर्शित दुकान हा चित्रपट सरोगसी वर आधारित आहे. आता आपल्या भारतात कायद्यानुसार सरोगसी निषिद्ध आहे परंतु हा चित्रपट हा कायदा येण्यापूर्वीच्या काळातील आहे. तेव्हा गुजरात यधील आनंद या भागात विदेशातील इतकी जोडपी येऊन सरोगसी पद्धतीने बाळ जन्माला घालत होते की जणू काही तो एक धंदा किंवा एक दुकान झाल्यासारखं झालं होतं. त्याच परिस्थितीवर आधारित हा चित्रपट आहे.
ही गोष्ट आनंद भागात राहणाऱ्या जॅस्मिन(मोनिका पवार) म्हणजेच चमेली पटेल हीची. चमेली ही एक स्वच्छंद आणि स्वतःच्या मर्जीने आयुष्य जगणारी मुलगी असते. वाया गेलेली म्हणू शकतो इतकी बिनधास्त आयुष्य जगणारी. वडीलांच्या मारापासून वाचण्यासाठी नवनवीन क्लृप्त्या शोधणारी. ही चमेली इतकी अविचारी असते की ती वडीलांच्या वयाच्या एका वृद्ध माणसाशी लग्न करते. परंतु तिचं आयुष्य खऱ्या अर्थाने बदलतं जेव्हा वृद्ध पतीचं निधन झाल्यानंतर तिला पोट भरण्यासाठी सरोगेट आई बनण्याचा पर्याय निवडावा लागतो. तो ती बिनधास्त निवडते कारण लहानपणापासून तिला मुलं नको असंच वाटायचं. दीया (मोनाली ठाकुर) आणि अरमान (सोहम मजूमदार) हे दोघं चमेली सोबत सरोगसी साठी करार करतात. परंतु चमेली आपल्या पोटातील बाळात गुंतायला लागते आणि आता तिला ते बाळ दीया आणि अरमान ला द्यायचं नसतं. म्हणूनच ती पळून जाण्याचा प्रयत्न करते. आता तिचा हा प्रयत्न यशस्वी होतो का.? कायद्यानुसार बाळ कोणाचं.? पुढे काय होतं ते बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल. या आधी आपण अशा आशयाचे बरेच चित्रपट पाहीलेले असल्यामुळे या चित्रपटात नवीन काही सापडत नाही.
सिद्धार्थ गरीमा यांनी याआधी बऱ्याच हिट चित्रपटांचं लिखाण केले आहे परंतु दिग्दर्शन या चित्रपटात पहिल्यांदाच केलेलं आहे. त्यांनी अजून बऱ्याच गोष्टी शिकण्याची गरज आहे. चित्रपटाच्या कथेमध्ये बऱ्याच गोष्टी खटकतात. कलाकारांचा अभिनय चांगला आहे. परंतु एक उत्तम कलाकृती म्हणून बऱ्याच गोष्टींची कमतरता जाणवते. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.
२. बड़े मियां छोटे मियां |
लेखक | अली अब्बास जफर,आदित्य बसु, सूरज गियानानी |
दिग्दर्शक | अली अब्बास जफर |
कलाकार | अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, पृथ्वीराज सुकुमारन, मानुषी छिल्लर,अलाया एफ, सोनाक्षी सिन्हा, रोनित बोस रॉय |
निर्माता | वाशू भगनानी, जैकी भगनानी, दीपिका देशमुख, हिमांशु किशन मेहरा, अली अब्बास जफर |
प्रदर्शित तारीख | ११ एप्रिल २०२४ |
भाषा | हिंदी |
“बड़े मियां छोटे मियां” चित्रपट समीक्षा :-
फ्लॉप वर फ्लॉप चित्रपट देण्याच्या शर्यतीत असलेल्या अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांचा पुन्हा एकदा फ्लॉप ठरलेला चित्रपट म्हणजे बड़े मियां छोटे मियां. बऱ्याच काळानंतर अली अब्बास जफर यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट म्हणजे तेच तेच घासून पुसून गुळगुळीत झालेल्या विषयावर बनवलेला ॲक्शनपट. सुरूवातीपासून शेवटपर्यंत फक्त ॲक्शन सीन्स चा भडीमार.
चित्रपटाची कथा देशभक्ती वर आधारित आहे. भारतातील वैज्ञानिक टीम ने एक असं कवच तयार केलेलं असतं जे शत्रू राष्ट्रांच्या मिसाईल ॲटॅक पासून भारताचं रक्षण करेल. परंतु हेच कवच एका सुरक्षित ठिकाणी घेऊन जात असताना हल्ला होतो आणि ते कवच चोरीला जातं. आता अर्थात ते शोधून पलत आणण्याची जबाबदारी कॅप्टन फिरोज (अक्षय कुमार) आणि कॅप्टन राकेश (टायगर श्रॉफ) यांच्याकडे सोपवली जाते. ज्यांना काही कारणास्तव नोकरीतून काढून टाकलेलं असतं परंतु हे काम दुसरं कोणी करूच शकत नाही म्हणून त्यांना बोलवलं जातं. त्यांच्यासोबत कॅप्टन मिशा (मानुषी छिल्लर) आणि परमिंदर (अलाया एफ) या असतात. आता हे चौघं ते कवच परत आणतात की नाही हे मात्र चित्रपट बघीतल्यावरच कळेल.
परंतु जर तुम्हाला पैसे वेळ वाया घालवायचा नसेल तर चित्रपट न बघणे उत्तम. कथा पटकथा काहीच नवीन नाही. ॲक्शन सीन्स सुद्धा बघून बघून कंटाळा येतो. दिग्दर्शन ठिकठाक आहे. गाणी पण सुमारच. एकंदर फसलेला चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार.
३. मैदान |
लेखक | सायविन क्वाड्रस, अमन राय, आकाश चावला, अरुनव जॉय सेनगुप्ता, अतुल शाही,रितेश शाह |
दिग्दर्शक | अमित रवींद्रनाथ शर्मा |
कलाकार | अजय देवगन, प्रियामणि, गजराज राव, रुद्रनील घोष |
निर्माता | बोनी कपूर, अरुनव जॉय सेनगुप्ता, आकाश चावला |
प्रदर्शित तारीख | १० एप्रिल २०२४ |
भाषा | हिंदी |
“मैदान” चित्रपट समीक्षा :-
आपल्याकडे क्रिकेट या खेळाइतकं प्रेम इतर कोणत्याही खेळाला मिळत नाही. अगदी ऑलिम्पिक सारख्या स्पर्धेत सुद्धा भारताचा सहभाग असतो तेव्हा सुद्धा बऱ्याच लोकांना माहीत सुद्धा नसतं. परंतु एखादं मेडल जिंकल्यावर त्यावर चित्रपट काढला की मात्र प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळतं. मग तो चक दे इंडिया हा हॉकीवर आधारित किंवा ‘मैरी कॉम’ हा बॉक्सिंगवर, दंगल हा कुस्तीवर आधारित असलेला चित्रपट असो. प्रेक्षकांना हे सगळे चित्रपट आवडले होते. असाच फुटबॉल या खेळावर आधारित मैदान हा चित्रपट घेऊन आले आहेत दिग्दर्शक
अमित रवींद्रनाथ शर्मा. या चित्रपटात अजय देवगण याने सय्यद अब्दुल रहीम ही भूमिका साकारली आहे. अब्दुल रहीम हे तेव्हा साधारण १९५०-१९५८ च्या काळात भारताच्या फुटबॉल संघाचे प्रशिक्षक होते. आणि त्यांच्याच कारकीर्दीत भारत आतापर्यंत फक्त एकदाच ऑलिम्पिक स्पर्धेत विजयी झाला होता. त्या विजयाची कहाणी सांगणारा हा चित्रपट आहे.
हा एक स्पोर्ट्स ड्रामा आहे त्यामुळे फार मसाला किंवा ॲक्शन सीन्स वैगरे काही नाहीत. ज्यांना खेळाची आवड आहे त्यांच्यासाठी हा चित्रपट नक्कीच बघावा असा आहे. परंतु आवड नसलेल्यांना सुद्धा हा चित्रपट आवडू शकतो. अजय देवगण याने आतापर्यंतचा बेस्ट परफॉर्मन्स दिला आहे असं म्हणू शकतो.
सय्यद अब्दुल रहीम यांनी भारतीय संघाला ऑलिम्पिक मध्ये यश मिळवून देण्यासाठी भारताच्या कानाकोपऱ्यातून फुटबॉल खेळाडूंची निवड करून एक नवा संघ तयार करताना फुटबॉल असोसिएशनमधील अधिकाऱ्यांचा विरोध पत्करून संघ बनवावा लागला होता. त्यावेळी भारतीय फुटबॉल असोसिएशन हे कलकत्ता येथे असल्याने संघात जास्त बंगाली खेळाडू असावेत असा असोसिएशन मधील सदस्यांचा प्रयत्न होता. परंतु मुळचे हैदराबादचे असलेल्या रहीम यांना हे मान्य नव्हतं. त्यांना बंगाल, हैदराबाद यापेक्षा “भारत” आपला एक देश, देशाचा विजय महत्वाचा वाटत होता. त्यांच्याच प्रयत्नांमुळे १९६२मध्ये आशियाई खेळात सुवर्णपदक पटवण्याचा मान भारतीय संघाला मिळाला होता. परंतु हे यश, हा विजय हा प्रवास सोपा नव्हता. हाच संपूर्ण प्रवास अतिशय रंजकपणे पडद्यावर मांडून दिग्दर्शक अमित रवींद्रनाथ शर्मा यांनी खेळाच्या इतिहासातील हे योगदान असंख्य भारतीयांना सांगण्याचं काम केले आहे. अजय देवगण आणि इतर सगळ्यांनीच अभिनय उत्तम केला आहे. प्रियामणी च्या वाट्याला फारशी भूमिका नाही. परंतु एक स्पोर्ट्स ड्रामा म्हटल्यावर चालायचं. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.
४. अमरसिंग चमकीला |
लेखक | इम्तियाज अली और साजिद अली |
दिग्दर्शक | इम्तियाज अली |
कलाकार | दिलजीत दोसांझ, परिणीति चोपड़ा, अंजुम बत्रा,अपिंदरदीप सिंह |
निर्माता | मोहीत चौधरी |
प्रदर्शित तारीख | १२ एप्रिल २०२४ |
भाषा | हिंदी |
“अमरसिंग चमकीला” चित्रपट समीक्षा :-
पंजाबचा “एल्विस प्रेस्ली” म्हणून ओळखल्या पंजाबचा रॉकस्टार “अमरसिंह चमकीला” याच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट इम्तियाज अली याने दिग्दर्शित केला असून प्रेक्षकांना ही कलाकृती प्रचंड आवडली आहे. इम्तियाज अली हा नेहमीच नावीन्यपूर्ण आणि वेगळ्या धाटणीचे चित्रपट घेऊन येत असतो. हा चित्रपट अमरसिंह चमकीला या पंजाबमधील सत्तरच्या दशकातील एका प्रसिद्ध गायकाच्या आयुष्यावर आधारित आहे.
अमरसिंह चमकीला ही भूमिका दिलजीत दोसांझ याने साकारली असून परिणीती चोप्रा ही अमरजोतच्या भूमिकेत म्हणजेच अमर सिंह चमकीला यांच्या पत्नीच्या भूमिकेत पाहायला मिळते. एका मिलमध्ये काम करणाऱ्या धन्नीराम अवघ्या वयाच्या विसाव्या वर्षी लोककलावंत अमरसिंह चमकीला म्हणून प्रसिद्धी मिळवली. अर्थात या प्रवासात त्यांची पत्नी सुद्धा सोबत होती. त्यांनी लिहिलेल्या गाण्यांना स्वतः संगीत देऊन ती गाणी इतकी लोकप्रिय झाली की पंजाब मध्येच नव्हे तर परदेशातही त्यांच्या गाण्यांचे कार्यक्रम होत. परंतु त्यांनी लिहिलेल्या गाण्यांवर काही ठराविक समाजातील लोकांनी आक्षेप घेतला. त्यांची गाणी ही अश्लील आणि स्त्रीयांवर टिका आणि त्यांचा अनादर करणारी आहेत या कारणांमुळे त्यांच्या गाण्यांना प्रचंड विरोध झाला. अमरसिंह हे दलित समाजातील असल्याने त्यांच्यावर विशिष्ट समाजातील लोकांचा विशेष राग होता. याच रागातून ऐन तारुण्यात वयाच्या २७ व्या वर्षी अमरसिंह आणि त्यांची पत्नी अमरज्योत यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. ही हत्या का आणि कोणी केली याचा शोध आजपर्यंत लागलेला नाही.
इम्तियाज अली याने उत्कृष्ट दिग्दर्शन केलं असून दिलजीत याने सुद्धा खरंच प्रेक्षकांचा दिल जिंकला आहे. त्याने ही भूमिका अक्षरशः जिवंत केली आहे. त्या काळातील काही व्हिडिओंचा संदर्भ दिल्यामुळे बऱ्याच गोष्टी डोळ्यासमोर घडल्या असं वाटतं. एकंदर एक उत्तम कलाकृती बघायची असेल तर हा चित्रपट नक्कीच नेटफ्लिक्स वर बघा. माझ्याकडून या चित्रपटाला चार स्टार.
५. अमीना |
लेखक | अफताब हस्नैन, किशन पवार |
दिग्दर्शक | कुमार राज |
कलाकार | रेखा राणा, अनंत महादेवन, उत्कर्ष कोहली, शरद शर्मा |
निर्माता | कुमार राज |
प्रदर्शित तारीख | १२ एप्रिल २०२४ |
भाषा | हिंदी |
“अमीना” चित्रपट समीक्षा :-
अमीना हा चित्रपट १२ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला असून कुमार राज यांनी य चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. एक चांगली कथा पटकथा योग्य न्याय न मिळाल्याने वाया गेली असं या चित्रपटामुळे वाटतं. स्त्रियांना गुलाम म्हणून वागवणं, स्त्रीयांवर अत्याचार करणं आणि वर्षानुवर्षे हे सहन करणाऱ्या स्त्रिया जेव्हा स्वतःच्या हक्कांसाठी न्यायासाठी पेटून उठतात तेव्हा त्या काय करू शकतात हे दाखवण्याचा प्रयत्न या चित्रपटात केला आहे.
चित्रपटाच्या कथेमध्ये एक कथा आहे. म्हणजे रेखा राणा हीने मीना ही मुख्य भूमिका साकारली असून ती एक कलाकार असते. ती करत असलेल्या नाटकात ती अमीना हे पात्र साकारत असते. “यहॉं अमीना बिकती हैं” असं नाटकाचं नाव असतं. ज्यामध्ये एक गरीब मुलगी असते जीचे आईवडील तीच्या मनाविरुद्ध तीचं लग्न एका वृद्धासोबत लावून देतात. पुढे तिचा नवरा तिला विकतो, तिच्यावर अत्याचार करतो. तिच्यावर बलात्कार करण्यात येतो आणि हे सगळं सहन न होऊन अमीना आत्महत्या करते. आता अमीना हे पात्र साकारणारी मीना मात्र स्वतंत्र विचारांची एक बिनधास्त मुलगी असते. परंतु हे नाटक करून करून हळूहळू अमीना तीच्या आयुष्यात डोकाव बघत असते. आणि दुर्दैवाने खरंच मीनावर सुद्धा काही तरुण बलात्कार करतात. आता मीना अमीना प्रमाणे स्वतःचा जीव देते की बलात्काऱ्यांना शिक्षा देण्यासाठी उभी राहते हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
कलाकारांनी अभिनय चांगला केला असला तरी चित्रपट तेवढा प्रभावी झाला नाहीये. बऱ्याच गोष्टी खटकतात. दिग्दर्शन ठिकठाक आहे. गाणी, संगीत खास नाही. एकंदर फसलेला चित्रपट म्हणू शकतो. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार.
६. ३० तास सर्वाइवल : गौरैया लाइव्ह |
लेखक | सीमा सायनी, गेब्रिएल वत्स |
दिग्दर्शक | गेब्रियल वत्स |
कलाकार | अदा सिंह,ओंकार दास,सीमा सैनी,नरेंद्र खत्री, शगुफ्ता अली, विनय झा |
निर्माता | राहुल रणगरे, निशांत जैन, रोहीत सिंह चौहान, राजीव जैन |
प्रदर्शित तारीख | १२ एप्रिल २०२४ |
भाषा | हिंदी |
“३० तास सर्वाइवल : गौरैया लाइव्ह” चित्रपट समीक्षा :-
काही वर्षांपूर्वी एका बोअरवेलमध्ये पडलेल्या प्रिन्स या छोट्या मुलाची बातमी तुम्हाला माहीत असेलच. हा चित्रपट सुद्धा अशाच एका कामगाराच्या मुलीवर आहे जी बोअरवेलच्या खड्ड्यात पडली आहे आणि तब्बल ३० तास जीव वाचेल या आशेने खड्ड्यात अडकून पडली आहे. हा तीस तासांचा तासांचा थरारक अनुभव या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. कन्स्ट्रक्शन साइट वर काम करणाऱ्या कामगार, मजुरी करणाऱ्या गरीब लोकांचं आयुष्य किती खडतर असतं. पॉश बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या या लोकांसाठी त्या बिल्डींग बांधणाऱ्या मजुरांचं अस्तित्व नसल्यासारखं. या चित्रपटाच्या निमित्ताने ते पुन्हा एकदा अधोरेखित झालेलं पहायला मिळतं.
हि गोष्ट आहे रामपाल आणि त्याच्या कुटुंबाची. रामपाल हा एक कन्स्ट्रक्शन साइट वर मजुरी करणारा कामगार आहे. परिस्थितीने गरीब असणारा रामपाल हा आपल्या कुटुंबासोबत आनंदी आयुष्य जगत असतो. परंतु त्याच्या आयुष्यात दुःखाचा डोंगर कोसळतो जेव्हा त्याची गौरैया नावाची छोटी मुलगी एका बोअरवेलच्या खड्ड्यात पडते. तिचा खड्ड्यात पडल्यानंतरचा थरारक अनुभव दाखवताना दिग्दर्शक गेब्रिएल वत्स यांनी त्याच वेळी फ्लॅशबॅक मध्ये जात बऱ्याच गोष्टींवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु या फ्लॅशबॅक मुळेच कथेचा मुख्य भाग आणि प्रवाह बाजूला पडल्यासारखा वाटतो. गरीब श्रीमंत ही दरी तीव्रतेने दाखवताना गौरैयावरचा फोकस बाजूला होतो.
आता गौरैया वाचते की नाही हे बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल. परंतु चित्रपटगृहात चालण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी या चित्रपटात नक्कीच नाही. अदा सिंह आणि ओंकार दास यांनी अभिनय उत्तम केला आहे परंतु पटकथा आणि दिग्दर्शन चांगलं असतं तर कदाचित चित्रपट अजून चांगला झाला असता. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार.
७. सायलेन्स २ : द नाईट आउल बार शुटआऊट |
लेखक | अबान देवहंस, सनी शर्मा |
दिग्दर्शक | अबान देवहंस |
कलाकार | मनोज बाजपेयी, प्राची देसाई, साहिल वैद, वकार शेख, दिनकर शर्मा, पारुल गुलाटी, चेतन शर्मा, श्रुति बापना, नीना कुलकर्णी |
निर्माता | कीरण देवहंस |
प्रदर्शित तारीख | १६ एप्रिल २०२४ |
भाषा | हिंदी |
“सायलेन्स २ : द नाईट आउल बार शुटआऊट” चित्रपट समीक्षा :-
२०२१ साली प्रदर्शित झालेल्या सायलेन्स चित्रपटाचा सिक्वेल “सायलेन्स २ : द नाईट आउल बार शुटआऊट” हा १६ एप्रिल रोजी झी फाईव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. खरं तर सिक्वेल काढण्या इतपत पहिला चित्रपट काही सुफर थ्रिलर नव्हता की प्रेक्षक आतुरतेने वाट वैगरे बघत होते. आणि आताचा सुद्धा तसाच ठिकठाक म्हणावा असाच आहे.
अबान देवहंस आणि सनी शर्मा यांनी यावेळी लिहीलेली कथा आधीच्या भाग संपतो तिथूनच चालू होते फक्त यावेळी केस वेगळी आहे. नावाप्रमाणेच द नाईट आउल बार मध्ये अचानक झालेल्या गोळीबाराचं सत्य शोधून समोर आणण्याचं काम एसीपी अविनाश वर्मा(मनोज वाजपेयी) याच्या टीमकडे आलेलं आहे. ते सुद्धा या गोळीबारात एका मंत्र्याचे सचिव आणि एका पत्रकाराची हत्या झाल्यामुळे या केसला जास्त महत्त्व मिळालेलं असतं. परंतु ही केस सोडवत असतानाच मानवी तस्करी सारखे भयंकर धागेदोरे टीमच्या हाताशी लागतात. आणि त्यातूनच हा गोळीबार पत्रकार किंवा सचिव यांच्यासाठी नसून एका मुलीला मारण्यासाठी होता हे कळल्यावर केसला वेगळं वळण प्राप्त होतं. आता नक्की काय घडलंय ते बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल. झी फाईव्ह वर हा चित्रपट तुम्ही बघू शकता.
थ्रिलर चित्रपट म्हटल्यावर प्रेक्षकांना गुंतवून ठेवता आलं पाहिजे ते इथे जाणवत नाही. कथा वेगाने सरकते असं वाटतं. बरेच मुद्दे थोडक्यात आटोपल्या सारखे वाटतात. मनोज वाजपेयी याचा अभिनय चांगला आहे हे सांगायला नकोच. त्याचे फॅन असाल तर एकदा बघायला हरकत नाही असा हा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.
८. लव्ह, सेक्स और धोका २ |
लेखक | अभिनव सिंह, प्रतीक वत्स, दिवाकर बॅनर्जी |
दिग्दर्शक | दिवाकर बॅनर्जी |
कलाकार | मौनी रॉय, तुषार कपूर, अनु मलिक, उर्फी जावेद, स्वरूपा घोष, परितोष तिवारी, बोनिता राजपुरोहित, अभिनव सिंह |
निर्माता | एकता कपूर, शोभा कपूर |
प्रदर्शित तारीख | १९ एप्रिल २०२४ |
भाषा | हिंदी |
“लव्ह, सेक्स और धोका २” चित्रपट समीक्षा :-
दिग्दर्शक दिवाकर बॅनर्जी याचा लव्ह सेक्स और धोका या चित्रपटाचा सिक्वेल म्हणजे आता प्रदर्शित झालेला “लव्ह, सेक्स और धोका २” हा चित्रपट. पहिल्या चित्रपटाला चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. आताचा चित्रपट हा इंटरनेट चा गैरवापर आणि आजकालच्या डिजिटल जगात प्रेमाच्या नावाखाली होणारी फसवणूक आणि गुन्हे यावर बेतलेला आहे.
यावेळी चित्रपटात दिवाकर बॅनर्जी यांनी तीन चित्रपटाच्या नावाप्रमाणेच तीन वेगवेगळ्या कथांमधून चित्रपट मांडला आहे. पहील्या कथेत एका रियालिटी शो मधून एका ट्रान्सजेंडर मुलीचं आयुष्य उलगडून दाखवले आहे. जी जन्मतः मुलगा असतो परंतु नंतर स्वतःचं लिंग बदलून आता ती नूर ही मुलगी असते. त्या निमित्ताने रियालिटी शो मधे नक्की काय चालतं किंवा शोच्या टिआरपी साठी व्यक्तीगत आयुष्य किती पणाला लागू शकतं हे बघायला मिळतं. तर दुसऱ्या कथेत एका तृतीयपंथी मुलीची गोष्ट दाखवली आहे. एका मेट्रो स्टेशन वर साफसफाई कामगार म्हणून काम काम करणाऱ्या या मुलीवर सहकारी कामगाराकडून बलात्कार होतो परंतु त्याचा शोध लावताना एक नाही तर चार पाच जणांकडून हा अत्याचार झाल्याचं समोर येतं. यात तिची बॉस म्हणून असलेली स्वरूपा घोष हीची भूमिका सुद्धा महत्वाची आहे. तर तिसऱ्या भागात एका इंटरनेट आणि डिजिटल दुनियेच्या आधीन झालेल्या एका गेमरची गोष्ट आहे. ज्याचे मिलियन मध्ये फॉलोअर्स आहेत. त्याच्या लाइव्ह सेशनमध्ये एका फॉलोअर ने त्याचे बरेच कारनामे उघडकीस आणल्यानंतर कसं त्याचं आयुष्य बदलतं हे दाखवलं आहे.
खरं तर हा चित्रपट न बघणे हे उत्तम. कथा पटकथा कशाचा कशाशी संबंध नसलेल्या या चित्रपटामध्ये बघण्यासारखं काही नाही. संवाद, गाणी, दिग्दर्शन यापैकी एकही गोष्ट चांगली म्हणावी अशी नाही. तुम्हाला तुमचा वेळ आणि मूड खराब करायचा असेल तर हा चित्रपट तुम्ही बघू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला एक स्टार.
९. दो और दो प्यार |
लेखक | सुप्रतिम सेनगुप्ता, एशा चोपड़ा, अमृता बागची |
दिग्दर्शक | शीर्षा गुहा ठाकुरता |
कलाकार | विद्या बालन, प्रतीक गांधी, इलियाना डिक्रूज, सेंथिल राममूर्ति |
निर्माता | समीर नायर, दीपक सेगल, तनुज गर्ग, अतुल कस्बेकर, स्वाति अय्यर |
प्रदर्शित तारीख | १९ एप्रिल २०२४ |
भाषा | हिंदी |
“दो और दो प्यार” चित्रपट समीक्षा :-
‘द लवर्स’ या फ्रेंच चित्रपटावर आधारित हा चित्रपट शीर्षा गुहा ठाकुरता यांनी दिग्दर्शित केलेला असून आजकालच्या नातेसंबंधांवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटात विद्या बालन आणि प्रतीक गांधी या दोघांची जोडी मुख्य भूमिकेत बघायला मिळते तर इलियाना डिक्रूज आणि सेंथिल राममूर्ति हे सहकलाकार आहेत.
आजकाल लग्न झालेल्या जोडप्यांच्या बाबतीत जरा पटेनासं झालं की घटस्फोट हे टोक गाठायला वेळ लागत नाही. आणि प्रेमविवाह करण्याचं प्रमाण वाढल्यामुळे लग्नानंतर नावीन्य राहतं नाही आणि लवकरच नात्याचा कंटाळा यायला सुरुवात होते मग यातूनच एक्स्ट्रा मॅरीटल अफेअर वैगरे सुरू होतं. असंच काहीसं घडताना बघायला मिळतं दो और दो प्यार या चित्रपटात. चित्रपटाची कथा आपल्या आजूबाजूला असणाऱ्या असंख्य जोडप्यांची असू शकते. डेंटिस्ट असलेली काव्या (विद्या बालन) आणि बिझनेस करत असलेला अनिरुद्ध (प्रतीक गांधी) या दोघांचं लग्न होऊन जवळपास एक तप लोटलयं. आतापर्यंत सगळं ठीक चालू असताना अनिरुद्ध च्या वडीलांच्या मृत्यू नंतर जेव्हा त्याच्या वर घर आणि बिझनेस अशा जबाबदाऱ्या पडतात तेव्हा त्यांच्या छान चालू असलेल्या वैवाहिक आयुष्यातील रंग कमी झाल्यासारखं होतं. यातूनच एकमेकांबद्दलची ओढ कमी होते आणि अनिरूद्ध नोराच्या जवळ जातो तर काव्या ही फोटोग्राफी करणाऱ्या विक्रमच्या ( सैंथिल राममूर्ति) प्रेमात पडते. दोघं ठरवतात की आपापल्या बाहेरच्या नात्याबद्दल एकमेकांना सांगून टाकायच.
परंतु चित्रपटात ट्विस्ट येतो जेव्हा काव्याचे आजोबांचा मृत्यू होतो आणि तिच्या माहेरी दोघं जातात. तिकडे गेल्यावर जुन्या आठवणी जाग्या होतात आणि त्यांच्यात पुन्हा जवळीक निर्माण होते. आता हे दोघं पुन्हा एकत्र राहणार की आपापल्या नवीन जोडीदारांना निवडणार हे बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल. एकंदर मनोरंजन करणारा आणि आपल्या आयुष्यात डोकावून बघायला लावणारा चित्रपट आहे. विद्या बालन आणि प्रतीक गांधी यांनी अभिनय उत्तम केला आहे. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.
१०. काम चालू हैं |
लेखक | पलश मुच्छल |
दिग्दर्शक | पलश मुच्छल |
कलाकार | राजपाल यादव, जिया मानेक, कुरांगी नागराज |
निर्माता | बेसलाईन स्टुडिओ |
प्रदर्शित तारीख | १२ एप्रिल २०२४ |
भाषा | हिंदी |
“काम चालू हैं” चित्रपट समीक्षा :-
किम चालू हैं हा चित्रपट खऱ्याखुऱ्या घटनेवर आधारित असून राजपाल यादव याने या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. आपल्या देशात, राज्यात रस्त्यांची जी दुरावस्था असते त्यावरून आपण नेहमी म्हणतो की रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता तेच कळत नाही. हे खड्डे कित्येकदा इतके जीवघेणे ठरतात की कित्येक कुटुंब उध्वस्त होतात. अशीच उध्वस्त झालेल्या कुटुंबाची ही गोष्ट आहे.
ही खरीखुरी गोष्ट महाराष्ट्रातील सांगली मधील आहे. मनोज पाटील या एका तरुणाची ही गोष्ट आहे. मनोजचं हसतं खेळतं त्रिकोणी कुटुंब असतं. त्याची मुलगी गुडीया ही अभ्यासात अतिशय हुशार तर असतेच परंतु ती एक उत्कृष्ट क्रिकेट खेळाडू असते. तिच्या शाळेतून विविध स्तरांवर ती उत्तम कामगिरी करत असते. ती एक राज्यस्तरीय खेळाडू म्हणून खेळणार असते परंतु नियतीला हे मान्य नव्हतं. एके दिवशी वडीलांसोबत स्कूटर वरून जात असताना रस्त्यावरील एका खड्ड्यात स्कूटर अडखळते आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं. गुडीया चा जीव एका खड्डयामुळे जातो. आणि याच कारणामुळे मनोजचं मानसिक संतुलन बिघडतं. तो न्यायालयात दाद मागतो परंतु त्याला न्याय मिळत नाही. परंतु तो या सगळ्यामुळे रस्त्यावर दिसतील ते खड्डे बुजवण्याचं विडा उचलतो. पुढे काय होतं ते बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल.
चित्रपट तांत्रिकदृष्ट्या किंवा काही गोष्टींमध्ये कमी पडतो परंतु बघण्यासारखा नक्की आहे. राजपाल याने स्वतःची विनोदी कलाकार म्हणून असलेली ओळख पुसत एक नवीन पैलू दाखवला आहे. परंतु दिग्दर्शन, कॅमेरा वर्क, संगीत या गोष्टी कमी पडल्या. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.
११. लव्ह यू शंकर |
लेखक | रवींद्र राम पाटिल और प्रियांक मेहता |
दिग्दर्शक | राजीव एस. रूईया |
कलाकार | श्रेयस तळपदे, तनीषा मुखर्जी, संजय मिश्रा, अभिमन्यु सिंह, हेमंत पांडे, मन गांधी, ईलाक्षी गुप्ता |
निर्माता | सुनीता देसाई, तेजस देसाई |
प्रदर्शित तारीख | एप्रिल २०२४ |
भाषा | हिंदी |
“जगभरून फिल्म्स” चित्रपट समीक्षा :-
१९ एप्रिल रोजी प्रदर्शित लव्ह यू शंकर हा चित्रपट खास करून लहान मुलांसाठी आहे. तुम्हाला जर माय फ्रेंड गणेशा सारखे चित्रपट आठवत असतील किंवा आवडले असतील तर हा चित्रपट सुद्धा तसाच आहे. पूर्ण ॲनिमेटेड नसला तरीही शंकराचं छोटं रूप ॲनिमेटेड बघायला मिळतं. आजपर्यंत गणपती बाप्पा वर असे चित्रपट बरेच आले परंतु भगवान शंकर यांचं लहान रूप असं पडद्यावर पहील्यांदाच बघायला मिळत आहे.
ही गोष्ट शिवांश नावाच्या एका छोट्या मुलाची आहे. जो परदेशात राहत असतो. एकदा फुटबॉल खेळताना पडल्यावर त्याच्या डोक्याला मार लागतो आणि तेव्हापासून त्याला त्याच्या मागच्या जन्मात घडलेल्या घटना आठवायला सुरूवात होते. याचमुळे त्याचे आईवडील त्याला भारतात बनारसला घेऊन येतात कारण त्याला त्या घटना तिथे घडलेल्या आठवत असतात. बनारसला आल्यावर शिवांशला कळतं की त्याचा मागच्या जन्मी खुन करण्यात आला होता आणि त्याला तो कोणी केला होता हे देखील आठवतं. आता तो त्या हत्या करणाऱ्या खुन्याचा चेहरा जगासमोर आणायचं ठरवतो अर्थातच या सगळ्यात त्याला साथ असते ती त्याच्या मित्राची म्हणजेच आपल्या छोटू शंकरची. आता ते दोघं काय करतात.? खुन्याला कसं पकडून देतात.? हे धमाल पद्धतीने दाखवलं आहे. छोटा शंकर आपल्याला ॲनिमेटेड स्वरूपात बघायला मिळतो.
दिग्दर्शक राजीव एस. रूईया यांनी लहान मुलांना आवडेल असा हा चित्रपट बनवला खरा परंतु प्रमोशन न केल्यामुळे तो लहान मुलांपर्यंत पोहचलाच नाही. विषय चांगला होता परंतु दिग्दर्शन आणि नावीन्य नसलेली पटकथा यामुळे चित्रपट मनोरंजन करण्यात कमी पडतो. कलाकारांनी अभिनय चांगला केला असला तरी ॲनिमेशन आणि तांत्रिक गोष्टींमध्ये सुद्धा चित्रपट निराश करतो. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.
१२. द लिगसी ऑफ जिनेश्वर |
लेखक | प्रशांत बेबर, विवेक अय्यर |
दिग्दर्शक | प्रदीप पी जाधव, विवेक अय्यर |
कलाकार | मनीष बिशला औसत, सुरेंद्र पाल, शरद गोरे, शुभम् व्यास,स्वयं जोशी,तुषार फुलके, अनिल |
निर्माता | महावीर टॉकिज,श्री खरतरगच्छ सहस्राब्दी |
प्रदर्शित तारीख | १९ एप्रिल २०२४ |
भाषा | हिंदी |
“द लिगसी ऑफ जिनेश्वर” चित्रपट समीक्षा :-
बऱ्याचदा धर्म किंवा धार्मिक मुद्द्यांवर आधारीत चित्रपट बनवताना दिग्दर्शक निर्माते खूप विचार करून चित्रपट बनवतात. कारण आपल्या भारतात लोकांच्या आपापल्या धर्माप्रती भावना, श्रद्धा जोडलेल्या असतात. असाच जैन धर्मातील शिष्य गुरू परंपरा आणि जैन धर्माची शिकवण, विचार यावर आधारित द लिगसी ऑफ जिनेश्वर हा चित्रपट १९ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रदीप पी जाधव आणि विवेक अय्यर यांनी केले आहे.
चित्रपटात बघायला मिळत की जिनेश्वर सूरी आणि बुद्धिसागर या आपल्या शिष्यांना घेऊन जैन मुनी आचार्य वर्धमान सुरी हे जैन धर्माचा प्रसार करत लोकांना धर्माचं पालन करणं किती महत्त्वाचं आहे हे पटवून देत होते. ही कथा अभिषेक मालूची असून जैन धर्म आणि जैन संस्कृतीची ओळख आणि महत्व सांगणारा हा चित्रपट आहे. हा काळ साधारण संवत्सर १०८० च्या दरम्यानचा आहे. सुरेंद्र पाल हे या चित्रपटात मुख्य भूमिकेत असून चित्रपटाची कथा प्रशांत बेबर यांनी लिहीली आहे.
चित्रपटाची कथा किंवा चित्रपट जैन धर्माशी निगडित असला तरी इतर धर्मातील लोकांना सुद्धा हा चित्रपट आवडू शकतो अर्थातच यातील आवड असणं आवश्यक आहे. बाकी सगळ्यांनाच हा चित्रपट आवडेलच असं नाही. एका ठराविक प्रेक्षकवर्गाला हा चित्रपट नक्कीच जास्त आवडेल. कलाकारांनी अभिनय चांगला केला आहे. सिनेमॅटोग्राफी चांगली आहे. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.
१३. रूसलान |
लेखक | शिवा, यूनुस सजावल, मोहित श्रीवास्तव, केविन दवे |
दिग्दर्शक | करण एल भूटानी |
कलाकार | आयुष शर्मा,जगपति बाबू, सुश्री मिश्रा, विद्या मालवडे, नवाब शाह, सुनील शेट्टी |
निर्माता | के के राधामोहन |
प्रदर्शित तारीख | १९ एप्रिल २०२४ |
भाषा | हिंदी |
“रूसलान” चित्रपट समीक्षा :-
करण एल भूटानी दिग्दर्शित रूसलान चित्रपट १९ एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला परंतु या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. देशभक्ती असा अजेंडा असलेल्या या चित्रपटाची कथा अक्षरशः प्रेक्षकांना पाठ झाली आहे. फक्त चांगले ॲक्शन सीन्स आणि काही ट्विस्ट आणि टर्न्स टाकल्यामुळे हा चित्रपट चालेल हा दिग्दर्शक निर्मात्यांचा अंदाज चुकीचा निघाला. त्यात हीरो म्हणून आयुष शर्मा. अभिनय केला की नाही हे तुम्हाला शोधावं लागेल असा अभिनय.
चित्रपटाची कथा नेहमीचीच. रूसलान हा एका दहशतवाद्याचा मुलगा असतो ज्याचे वडील एका चकमकीत मरतात. आणि तो अनाथ झाल्यामुळे त्याला एक मेजर दत्तक घेतात. परंतू एका दहशतवाद्याचा मुलगा हा ठपका आयुष्यभर त्याच्या कपाळावर बसतो. तो घालवण्यासाठी रूसलान ला देशासाठी काहीतरी करायचं आहे आणि स्वतःला प्रामाणिक भारतीय म्हणून सिद्ध करायचं आहे. यासाठी तो रॉ एजंट म्हणून एका गुप्त कामगिरीवर रूजू होतो. आता तो ते मिशन पूर्ण करतो का.? स्वतःला सिद्ध करतो हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल. ॲक्शन सीन्सचा भरणा असलेल्या या चित्रपटात रूसलान या एकाच पात्राभोवती अख्खा चित्रपट रेंगाळतो. त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट म्हणजे शेवटी झालेली सुनील शेट्टीची एन्ट्री. बाकी चित्रपटात नवीन काही नाही. नाही बघीतला तरी चालेल असा हा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार.
१४. मैं लडेगा |
लेखक | आकाश प्रताप सिंह |
दिग्दर्शक | गौरव राणा |
कलाकार | आकाश प्रताप सिंह, वल्लारी विराज, गंधर्व दीवान,अश्वथ भट्ट,सौरभ पचौरी, दिव्य खरनारे, राहिल सिद्दीक |
निर्माता | अक्षय भगवानजी, पिनाकिन भक्त |
प्रदर्शित तारीख | २६ एप्रिल २०२४ |
भाषा | हिंदी |
“मैं लडेगा” चित्रपट समीक्षा :-
गौरव राणा दिग्दर्शित मै लडेगा हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घरगुती हिंसाचाराच्या घटना आपण खूप वेळा ऐकत असतो. ज्या घरांत किंवा कुटुंबात अशा घटना, भांडणं होतात त्या घरातील मुलांच्या मनावर त्या सगळ्याचा परिणाम होत असतो. त्या वातावरणात वाढत असताना काही जण वाया जातात तर काही मुलं जिद्दीने चांगलं काहीतरी करून दाखवतात. ही गोष्ट अशाच एका मुलाची आहे जो जिद्दीने परिस्थितीवर मात करून बॉक्सिंग मध्ये गोल्ड मेडल आणतो.
आकाश प्रताप सिंह या मुलाची ही गोष्ट आहे. जो रोज आपल्या आईला वडीलांकडून मार खाताना तिचा छळ होताना बघत असतो. तो आणि त्याचा छोटा भाऊ हे बघतच मोठे होत असताना आकाशला होस्टेल मध्ये पाठवण्यात येतं परंतु छोटा भाऊ मात्र घरीच असतो. आकाश ला लहान वयात जबाबदारीची जाणीव येते. त्याला बॉक्सिंग मध्ये गोल्ड मेडल मिळवून एक लाख रुपये म्हणून मिळालेल्या बक्षीसामध्ये आपल्या छोट्या भावाचं शिक्षण करायचं आहे. आणि म्हणूनच काही झालं तरी त्याला ही स्पर्धा जिंकायची आहे. त्याच्या य प्रवासात त्याचे मित्र मैत्रिणी सोबत असतातच. आता आकाश त्याचं हे स्वप्न पूर्ण करू शकतो की नाही हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
दिग्दर्शक गौरव राणा यांनी चांगला विषय निवडला आहे परंतु पटकथा जरा लांबल्यामुळे चित्रपट थोडा संथ वाटतो. कलाकारांचा अभिनय, संगीत, सिनेमॅटोग्राफी या गोष्टी चांगल्या आहेत. बाकी चित्रपट ठिकठाक आहे. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.
तर मंडळी या वीकेंडला तुम्ही कोणता चित्रपट बघायला जाताय हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.