मार्च 2025 मध्ये रिलीझ झालेल्या मराठी चित्रपटांची यादी आणि त्यांची समीक्षा
मार्च 2025 मध्ये रिलीझ झालेल्या मराठी चित्रपटांची यादी आणि त्यांची समीक्षा | List of Marathi movies released in March 2025 and their reviews
मार्च २०२५ मध्ये प्रदर्शित झालेले हे मराठी चित्रपट तुम्ही पाहिलेत का.?
Written by : आकांक्षा कोलते
Updated : जून 12, 2025 | 10:05 PM
बघता बघता २०२४ हे साल सरलं. २०२४ मध्ये सुद्धा मराठी चित्रपटसृष्टीत नवीन नवीन प्रयोग केले गेले. काही प्रेक्षकांना आवडले तर काही सपशेल फसले. आता २०२५ मध्ये नवीन काय काय बघायला मिळेल हे येणारं वर्षच सांगेल. आज या लेखात वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे मार्च महिन्यात कोणते मराठी चित्रपट प्रदर्शित झाले आणि ते कसे आहेत ते बघू.
खरं तर आता वेबसिरीज चा जमाना असल्यामुळे प्रेक्षकांच्या चित्रपटांच्या बाबतीत अपेक्षा वाढल्या आहेत. त्यातही नवीन आलेल्या चित्रपटांमध्ये ओरिजनल कंटेट कमीच असतो. परंतु आशयघन आणि दर्जेदार कथानक हा मराठी चित्रपटांचा गाभा आहे. मराठी चित्रपट हे नेहमीच वास्तववादी आणि चांगला कंटेंट घेऊन भेटीला येतात हे आता प्रेक्षकांच्या लक्षात येत आहे. त्यामुळे मराठी चित्रपटांना प्रेक्षक आता भरभरून प्रतिसाद देतात. असं असलं तरीही हल्ली इतके चित्रपट प्रदर्शित होत असतात की ते तेवढे दर्जेदार असतातच असं नाही. त्यामुळे आम्ही हे सांगण्याचा प्रयत्न करू की प्रदर्शित झालेला एखादा चित्रपट खरंच बघायला हवा की नको.
आज या लेखात आपण मार्च २०२५ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपट आम्हाला कसे वाटले ते सांगणार आहोत. ज्यामुळे ते बघायला हवे की नको ते ठरवणं तुम्हाला सोपं जाईल.

१. स्थळ (Sthal) |
लेखक | जयंत सोमळकर |
दिग्दर्शक | जयंत सोमळकर |
कलाकार | नंदीनी चिकटे, सुयोग धवस, संगीता सोनेकर |
निर्माता | शेफाली भुषण, करण ग्रोवर, रिगा मल्होत्रा, जयंत सोमळकर |
रिलीज तारीख | ७ मार्च २०२५ |
भाषा | मराठी |
“स्थळ ” चित्रपट समीक्षा :-
आता स्त्रियांच्या शिक्षणाचं प्रमाण वाढलंय हे जरी खरं असलं तरी आजही ग्रामीण भागात मुली वयात आल्यानंतर शिक्षणापेक्षा लग्न लावून देण्याला प्राधान्य दिलं जातं. मग मुलीची शिकण्याची कितीही इच्छा असो वा जिद्द असो. घरच्यांसमोर या मुलींना माघार घ्यावी लागते आणि स्वतःच्या स्वप्नांना तिलांजली द्यावी लागते. जयंत सोमळकर लिखित आणि दिग्दर्शित स्थळ हा चित्रपट अशाच धर्तीवर आधारित आहे. स्त्री शिक्षण, सक्षमीकरण, हुंडा पद्धती अशाच बऱ्याच संवेदनशील आणि महत्त्वाच्या विषयावर हा चित्रपट भाष्य करतो.
चित्रपटाची कथा विदर्भातील एका गावातील आहे . पदवीचं शिक्षण पूर्ण करणारी आणि सेवा परिक्षा देण्याचं स्वप्न बघणारी सविता (नंदिनी चिकटे) ही आपले वडील दौलतराव वांधरे (तारानाथ खिरटकर) आणि आई लीलाबाई (संगीता सोनेकर), भाऊ मंगेश (सुयोग धावस) यांच्यासोबत राहत असते. खरं तर तिला शिकून मोठं व्हायचं असतं. स्वतःच्या पायावर उभं राहून काहीतरी करून दाखवायचं असतं. परंतु नेमकी ज्या दिवशी तिची एमपीएससी परीक्षा असते त्याच दिवशी तिला लग्नासाठी बघायला स्थळ येतं. इच्छा नसतानाही जे स्थळ बघण्यासाठी ती तयार होते ती लोकं शेवटी नकारच देतात. काही दिवसांनी तिचे खापणे सर (संदीप पारखी) तिला लग्नासाठी मागणी घालतात. परंतु त्यांचे वडील जेव्हा हुंड्यासाठी ५ लाख रुपयांची मागणी करतात परंतु काही घटनांमुळे हेही लग्न मोडतं. एकीकडे सविताच्या भावाचं प्रेम असलेल्या मुलीचं देखील तिसऱ्याच मुलासोबत लग्न होतं. एकंदरीत कुठेच चांगलं काही घडत नाही.
जयंत सोमळकर यांनी लिहिलेली कथा मनोरंजन कमी आणि निगेटिव्ह झोनमध्ये जास्त घेऊन जाते. कथेचा सार सत्य परिस्थितीवर बेतलेला असला तरीही आशादायी असं घडत नाही. दिग्दर्शन ठिकठाक आहे. कलाकारांचा अभिनय चांगला आहे. ग्रामीण भागातील परिस्थितीचं स्वरूप दाखवणारा हा चित्रपट आहे. अशा प्रकारचे चित्रपट बघायला आवडत असतील तर बघू शकता. मसाला, मारामारी, गाणी असं काही यात नाही. एकंदरीत एकदा बघायला हरकत नाही असा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.
२. फ्रॉम चायना विथ लव्ह (From China With Love) |
लेखक | अनिकेत वाघ |
दिग्दर्शक | अनिकेत वाघ |
कलाकार | अनिकेत वाघ, गायत्री बनसोडे, सोनाली भांगे, अंकुश मांडेकर, सिद्धेश्वर झाडबुके |
निर्माता | अनिकेत वाघ |
रिलीज तारीख | १४ मार्च २०२५ |
भाषा | मराठी |
“फ्रॉम चायना विथ लव्ह” चित्रपट समीक्षा :-
पैशाची गरज कुणाला नसते..? परंतु काही जणांना कमी कष्टात पैसा कमावण्याची खूप हाव असते आणि त्याचमुळे पुढे जाऊन अशी माणसं गोत्यात येतात. चुकीच्या मार्गाने पैसा मिळवताना आपण स्वतः एका मोठ्या चक्रव्यूहात अडकत आहोत हे फार उशिरा लक्षात येतं. “फ्रॉम चायना विथ लव्ह” या चित्रपटाची कथा अशाच एका चक्रव्यूहात अडकलेल्या अभिमन्यूची आहे.
अनिकेत वाघ लिखित आणि दिग्दर्शित हा चित्रपट खरं तर बऱ्याच गंभीर मुद्द्यांवर भाष्य करतो. कथेच्या मध्यवर्ती भूमिकेत असलेल्या अभिमन्यू ला एक फोन कॉल येतो ज्यावर एका चिनी ॲपवरून काही मिनिटांतच कोणत्याही कागदपत्रां शिवाय कर्ज मिळू शकते अशी माहिती मिळते. आणि हे पैसे मिळवण्यासाठी अभिमन्यू ला पुढे काय काय करावं लागतं.? तो कसा यात अडकत जातो..? पैशांमुळे कसा अनेकांना जीव गमवावा लागतो हे या चित्रपटात पहायला मिळतं. चक्रव्यूहात अडकलेला अभिमन्यू त्यातून बाहेर पडतो का हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
आजकाल चालणारे अनेक ऑनलाईन फ्रॉड, वेगवेगळ्या ॲपवरून चालणारे स्कॅम याबाबत जनजागृती करणारा हा चित्रपट आहे. परंतु एक चित्रपट म्हणून बघताना अनेक गोष्टींचा अभाव जाणवतो. अनिकेत वाघ यांनी या चित्रपटात अभिमन्यू ही मुख्य भूमिका साकारली असून दिग्दर्शन कथा सुद्धा त्यांचीच आहे. त्यांघा अभिनय चांगला आहे परंतु दिग्दर्शन काही जमलेलं नाही. कथा विस्तार सुद्धा अजून चांगल्या प्रकारे करता आला असता. एकंदरीत चित्रपट फारसा प्रभावी नाही. ओटीटी वर आल्यावर वेळ असेल तर बघू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार.
३. हार्दिक शुभेच्छा (Hardik Shubheccha) |
लेखक | पुष्कर जोग |
दिग्दर्शक | पुष्कर जोग |
कलाकार | पुष्कर जोग, हेमल इंगळे, पूर्वी मुंदडा, विशाखा सुभेदार, अभिजीत चव्हाण, अनुष्का सरकटे, पृथ्विक प्रताप, विजय पाटकर |
निर्माता | आनंद पंडित, रूपा पंडित |
रिलीज तारीख | २१ मार्च फेब्रुवारी २०२५ |
भाषा | मराठी |
“हार्दिक शुभेच्छा” चित्रपट समीक्षा :-
पुष्कर जोग लिखित आणि दिग्दर्शित हार्दिक शुभेच्छा हा चित्रपट २१ मार्च रोजी प्रदर्शित झाला असून लैंगिक सुसंगतता या महत्त्वाच्या आणि उघडपणे न बोलल्या जाणाऱ्या विषयावर भाष्य करतो. पुष्कर जोग यांच्या आधीच्या चित्रपटांप्रमाणेच या चित्रपटाचं चित्रीकरण देखील पॅरीस वगैरे सारख्या देशात करण्यात आलं आहे. परंतु फक्त देशाबाहेर जाऊन चित्रिकरण केलं म्हणजे चित्रपट चांगला होईल हा गैरसमज लवकर दूर होणं गरजेचं आहे.
चित्रपटाची कथा पुष्कर जोग याने स्वतः लिहीली असून तो माधव जोशी ही मध्यवर्ती भूमिका साकारत आहे. दिसायला थोडा पोक्त आणि डोक्यावर टक्कल असलेल्या माधवचं बऱ्याच प्रयत्नानंतर राधिका पाठक (हेमल इंगळे) हीच्यासोबत लग्न ठरतं. परंतु चित्रपटाची कथा ज्यावर अवलंबून आहे ते म्हणजे त्याच्या लग्नात त्याचा मित्र रवी (पृथ्वी प्रताप) त्याला सेक्स टॉईजचा एक बॉक्स लग्नाची भेट म्हणून देतो. आणि माधवच्या नकळत पहिल्याच रात्री राधिका तो बॉक्स पाहते आणि तिला तिच्या आधीच्या प्रियकराच्या सेक्स टॉईज सोबतच्या कटू आठवणी आणि अनुभव आठवून तिला माधव बद्दल सुद्धा भिती निर्माण होते. त्यामुळेच माधव आणि राधिकामध्ये गैरसमज, तणाव वाढतो. त्यांचं वैवाहिक जीवन असून नसल्यासारखे झालेलं असतं. काही महीन्यात माधव पॅरिस ला जातो. तिकडे त्याची मैत्री एका घटस्फोटीत मुलीसोबत होते जी माधव आणि राधिका यांचं नातं सुधारण्यासाठी मदत करते.
आता माधव आणि राधिका यांच्या आयुष्यातील हे गैरसमज दूर होऊन त्यांचा संसार चांगला होईल का.? हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
चित्रपटात माधव चे आईवडील म्हणून विशाखा सुभेदार आणि अभिजीत चव्हाण यांनी चांगली विनोदी भूमिका साकारली आहे. थोडं फार यांच्यामुळे निदान हसायला मिळतं. किशोरी आंबिये यांनी देखील छान विनोदी भूमिका साकारली आहे. परंतु चित्रपटाची कथा पटकथा आणि दिग्दर्शन यात काहीच दम नसल्यामुळे चित्रपट फारसं मनोरंजन करत नाही. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार.
४. गाव बोलावतो (Gaav Bolavato) |
लेखक | सचिन विठ्ठल पाटील |
दिग्दर्शक | विनोद माणिकराव |
कलाकार | भूषण प्रधान,माधव अभ्यंकर,श्रीकांत यादव,शुभांगी लाटकर,गौरी नलावडे |
निर्माता | प्रशांत नरोडे, शंतनु भाके, प्रविण इंदू |
रिलीज तारीख | २१ मार्च २०२५ |
भाषा | मराठी |
“गाव बोलावतो” चित्रपट समीक्षा :-
चित्रपटाच्या नावावरून लक्षात येतं की चित्रपट चित्रपट हा गाव सोडून गेलेल्यांना गावची असलेली ओढ यावर आधारित आहे. आजकाल गावचे तरूण शिक्षण पूर्ण करून नोकरी निमित्त शहराकडे स्थलांतर करतात. खरं तर प्रत्येक जण आपापल्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवत असतो परंतु यामुळे गावं ओसाड पडत चालली आहेत. हीच परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न या चित्रपटात केला आहे. सचिन पाटील यांनी या चित्रपटाची कथा लिहिली असून विनोद माणिकराव यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केले आहे.
चित्रपटाची कथा अर्थातच एका गावात घडणारी आहे. संग्राम(भुषण प्रधान) हा अप्पासाहेब (माधव अभ्यंकर) आणि आई (शुभांगी लाटकर) यांचा मुलगा शिक्षण पूर्ण करून मुंबईत नोकरी करत असतो. खरं तर अप्पासाहेब यांची इच्छा असते की संग्राम ने गावीच राहावं. त्यांनी संग्रामचं लग्न गावातीलच एका मुलीसोबत ठरवलेलं असतं. परंतु संग्राम ला मुंबईतील मानसी (गौरी नलावडे) आवडत असते.
एकीकडे गावचा सरपंच सर्जेराव (श्रीकांत यादव) हा अतिशय भ्रष्ट आणि क्रूर असतो. गावातील शेतकऱ्यांना जमिनीसाठी मारून ती आत्महत्या आहे असं तो दर्शवत असतो. व्यापारी मखिजा सोबत त्याला गावात एक रासायनिक कारखाना सुरू करायचा असतो परंतु अप्पासाहेब या सगळ्याला विरोध करत असतात. अचानक अप्पासाहेब यांचा मृत्यू होतो म्हणून संग्राम गावी येतो. गावी आल्यावर त्याला सर्जेराव याचे कारनामे समजतात. तर आपल्या वडिलांचा मृत्यू नसून तो खून होता असं समजल्यावर तो पेटून उठतो. तसंच गावाला सर्जेरावा पासून वाचवण्यासाठी तो सरपंच पदासाठी निवडणुकीत उभा राहतो. आता संग्राम निवडणुकीत जिंकतो का.? अप्पासाहेब यांना कोणी मारलं याचा शोध तो घेतो का.? पुढे काय होतं हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
चित्रपटाची कथा, पटकथा, विषय यात काहीच नाविन्य नाही. त्यामुळे तेच तेच विषय आणि कथा असल्यावर प्रेक्षकांना खिळवून ठेवेल असं या चित्रपटात काही नाही. कलाकारांचा अभिनय चांगला आहे. दिग्दर्शन ठिक आहे. परंतु एकंदरीत चित्रपट मनोरंजन करण्यात कमी पडतो. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार.
५. भेरा (Bhera) |
लेखक | प्रसाद खानोलकर |
दिग्दर्शक | श्रीकांत प्रभाकर |
कलाकार | दिपक जोईल, श्रद्धा खानोलकर, आकांक्षा खोत, प्रमोद कोयंडे |
निर्माता | श्रीकांत प्रभाकर |
रिलीज तारीख | २१ मार्च २०२५ |
भाषा | मराठी |
“भेरा” चित्रपट समीक्षा :-
२०२० साली संपूर्ण जगाला वेठीस धरून सगळ्या आरोग्य व्यवस्थेला आव्हान देणारा कोरोना व्हायरस आठवला तरी अंगावर काटा उभा राहतो. खेडेगावात तर या व्हायरस बद्दल एकूण माहिती कमी असल्यामुळे तिकडे लोकांनी जास्त धसका घेतला होता. एरव्ही एकमेकांना मदत करणारी लोकं जीवाला घाबरून घराबाहेर पडत नव्हती की कोणाला घरात घेत नव्हती. त्यामुळे माणुसकी वगैरे दाखविण्याच्या भानगडीत जास्त कोण पडत नव्हतं. याच धर्तीवर भेरा हा चित्रपट श्रीकांत प्रभाकर यांनी दिग्दर्शित केला आहे.
चित्रपटाची कथा २०२० मध्ये म्हणजेच लॉकडाऊनच्या काळातील आहे. कोकणातील एका गावात घडणारी ही कथा अनिबाई (श्रद्धा खानोलकर) आणि विष्णू (दीपक जॉइल) या कर्णबधिर मुलाभोवती फिरणारी आहे. अनिबाई गावी एकटीच राहत असते. तिचा मुलगा सुरेश (गौरव राऊळ) मुंबईत असतो. अनिबाई या ॲपेंडिक्स या आजाराने त्रस्त असतात. लवकरात लवकर त्यांची शस्त्रक्रिया करून घ्यायची असते परंतु लॉकडाऊनच्या निर्बंधांमुळे सुरुवातीला तो गावी परतू शकत नाही. त्या काळात विष्णू तिची काळजी घेत असतो परंतु लॉकडाऊनच्या निर्बंधामुळे विष्णू चं असं फिरणं गावकऱ्यांना मान्य नसतं. अनाथ असलेला विष्णू त्याची बहीण रेखा सोबत(आकांक्षा खोत) आपल्या मामाच्या (विवेक वाळके) घरी राहत असतो. परंतु गावकऱ्यांच्या दबावाखाली मामा सुद्धा विष्णू ला घरात घेत नसतो. एकीकडे अनिबाईंची तब्येत जास्त बिघडते. आता त्यांची शस्त्रक्रिया वेळेत होते का.? विष्णू चं पुढे काय होतं.? हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
प्रसाद खानोलकर यांनी खूप संवेदनशील कथा लिहिली आहे. परंतू चित्रपट म्हणून याआधीही लॉकडाऊन आणि कोरोना पार्श्वभूमीवर बरेच चित्रपट येऊन गेले आहेत त्यामुळे प्रेक्षकांना परत आता तेच नको वाटतंय. परंतु एकंदरीत चित्रपट नक्कीच माणूस म्हणून विचार करायला भाग पाडतो. श्रीकांत प्रभाकर यांचं दिग्दर्शन छान आहे. खूप नैसर्गिक अभिनय आणि सहजपणे साकारलेले भावनिक प्रसंग जास्त प्रभावी वाटतात. कोकणातील अप्रतिम सौंदर्य एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघायला मिळतं. कोकण म्हणजे फक्त समुद्र किनारा आणि नारळ पोफळीच्या बागा नव्हे तर त्यापलीकडे खूप काही आहे हे जाणवतं. सिनेमॅटोग्राफी उत्कृष्ट आहे. एकंदरीत एकदा तरी बघायला हवा असा हा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.
६. आरडी (RD) |
लेखक | गणेश शिंदे, बी. अप्पासाहे |
दिग्दर्शक | गणेश कचरू शिंदे |
कलाकार | गणेश शिंदे, अवंतिका कवठेकर |
निर्माता | हंसराज भक्तवाल, इश्तेकर अहमद शेख, साहील वाढवेकर |
रिलीज तारीख | २१ मार्च २०२५ |
भाषा | मराठी |
“आरडी” चित्रपट समीक्षा :-
गणेश शिंदे यांनी दिग्दर्शित केलेला आरडी हा चित्रपट २१ मार्च रोजी प्रदर्शित झाला असून या चित्रपटाची कथा सुद्धा त्यांचीच आहे. या चित्रपटातील मध्यवर्ती भूमिका सुद्धा त्यांनी स्वतः साकारली आहे. खरं तर चित्रपट फारसा चालला नाही, स्क्रीन मिळाल्या नाहीत, पर्यायाने प्रेक्षकांपर्यंत पोहचला नाही. परंतु एका नवीन दिग्दर्शक लेखकाने स्वबळावर एखाद्या चित्रपटाची निर्मिती केली हा एक प्लस पॉइंट आहे. बऱ्याचदा नवीन दिग्दर्शक लेखक चित्रपट निर्मिती करतात परंतु बजेट कमी असल्या कारणाने बऱ्याच त्रुटी राहतात आणि तांत्रिकदृष्ट्या देखील तेवढा सक्षम चित्रपट बनत नाही. आरडी चित्रपटाच्या बाबतीत तेच झालेलं आहे.
चित्रपटाची कथा ग्रामीण भागातील आहे. आरडी नावाचा तरुण एक चूक करतो परंतु पुढे जाऊन त्या एका चुकीमुळे त्याला काय काय परिणाम भोगावे लागतात हे या चित्रपटात पहायला मिळतं. आयुष्यात आपण बऱ्याच छोट्या छोट्या चुका करत असतो, तेव्हा परिणाम काय होईल याची भीती नसते. त्यामुळे तेव्हाच कोणाची माफी वगैरे मागण्याचा विचार देखील करत नाही. परंतु याच चुका नंतर महागात पडतात. चित्रपटाच्या नायकाकडून आरडी अशीच एक चुक होते ज्याचे भयंकर परिणाम होतात आणि फक्त आरडी च नाही तर त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या सगळ्यांच्याच आयुष्यात फरक पडतो. आता नक्की तो काय चुक करतो आणि काय घडतं हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल. कारण हा एक सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आहे.
गणेश शिंदे यांची कथा खरंतर फारशी आव्हानात्मक नाही त्यात दिग्दर्शन सुद्धा अगदीच ठिकठाक आहे. छायाचित्रण, कॅमेरा वर्क या गोष्टी सुद्धा जरा तांत्रिकदृष्ट्या कमी पडल्या आहेत. परंतु एक पहीला प्रयत्न म्हणून ठिक आहे. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार.
७. फॉलोअर (Follower) |
लेखक | हर्षद नलावडे |
दिग्दर्शक | हर्षद नलावडे |
कलाकार | हर्षद नलावडे, राघवेंद्र पवार, डोना मुन्शी |
निर्माता | हर्षद नलावडे |
रिलीज तारीख | २१ मार्च २०२५ |
भाषा | मराठी |
“फॉलोअर” चित्रपट समीक्षा :-
महाराष्ट्र – कर्नाटक सीमावाद किंवा खासकरून बेळगाव प्रांतात असणारी मराठी जनता यांना अल्पसंख्याक म्हणून सामोरं जावं लागणाऱ्या अनेक संकटांमुळे भरडून निघणारं बेळगाव हा बऱ्याच वर्षांपासून चर्चेत राहीलेला आणि तोडगा न निघालेला विषय आहे. बेळगावात राहणाऱ्या मराठी माणसांना तिथल्या कन्नड स्थानिक लोकांकडून अतिशय हिन वागणूक मिळते आणि त्याच धर्तीवर हा चित्रपट आहे. ज्या ठिकाणी आपण जन्माला आलो, वाढलो मोठे झालो तो भाग फक्त कागदावरच्या नकाशामुळे दोन राज्यांत विभागला गेल्यावर आपली मातृभाषा, संस्कार, परंपरा सगळं बदलून टाकणं सोपं नसतं. बहुसंख्य लोक मराठी असुनही फक्त सीमा विभागणी मुळे बेळगाव प्रांतात राहतात. हा त्यांचा गुन्हा नाही. परंतु या लोकांना कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागतं हे या चित्रपटात पहायला मिळतं.
चित्रपटाची कथा एका राघवेंद्र पवार(रघु प्रकाश) या मराठी तरुणाभोवती फिरते. याचा एक मित्र सचिन जो कन्नड भाषिक आहे तर एक परवीन म्हणून मैत्रीण आहे. या तिघांमधली मैत्री सुद्धा भाषिक वादामुळे तुटण्याच्या मार्गावर असते. रघू हा एक छोटा पत्रकार असतो आणि मराठी लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी तो कमी पगारात एका ऑनलाईन मिडिया एजन्सी साठी काम करत असतो. रागीट स्वभाव असलेला रघू नेहमी प्रक्षोभक बातम्या देत असतो. अशातच त्याच्या एका चुकीमुळे तो मोठ्या अडचणीत सापडतो. आता नक्की तो काय करतो आणि त्याचे परिणाम काय होतात हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
मुळचा बेळगावचा असलेला हर्षद नलावडे याने या चित्रपटाची कथा लिहिली असून दिग्दर्शन सुद्धा केलेलं आहे. स्वतः अनुभव घेतल्यामुळे चित्रपटात त्याने ती व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला आहे. सचिन ही भूमिका सुद्धा त्याने साकारली आहे. चित्रपटाचा विषय अतिशय संवेदनशील आणि वादग्रस्त असा आहे. तरीही या विषयावर चित्रपट बनवला त्याबद्दल त्यांचं कौतुक. परंतु मनोरंजन करण्यात हा चित्रपट अयशस्वी ठरतो. दिग्दर्शन तेवढं खास नाही. कलाकारांचा अभिनय ठिक आहे. एकंदरीत विशेष प्रभाव टाकेल असा हा चित्रपट नाही. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.
तर मंडळी यापैकी तुम्ही कोणते चित्रपट पाहीलेत आणि आवडलेत का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसंच या विकेंडला वरीलपैकी कोणता चित्रपट बघायला आवडेल हे सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.