मे 2025 मध्ये रिलीझ झालेल्या मराठी चित्रपटांची यादी आणि त्यांची समीक्षा
मे 2025 मध्ये रिलीझ झालेल्या मराठी चित्रपटांची यादी आणि त्यांची समीक्षा | List of Marathi movies released in May 2025 and their reviews
Written by : आकांक्षा कोलते
Updated : जुलै 22, 2025 | 09:17 PM
खरं तर आता वेबसिरीज चा जमाना असल्यामुळे प्रेक्षकांच्या चित्रपटांच्या बाबतीत अपेक्षा वाढल्या आहेत. त्यातही नवीन आलेल्या चित्रपटांमध्ये ओरिजनल कंटेट कमीच असतो. परंतु आशयघन आणि दर्जेदार कथानक हा मराठी चित्रपटांचा गाभा आहे. मराठी चित्रपट हे नेहमीच वास्तववादी आणि चांगला कंटेंट घेऊन भेटीला येतात हे आता प्रेक्षकांच्या लक्षात येत आहे. त्यामुळे मराठी चित्रपटांना प्रेक्षक आता भरभरून प्रतिसाद देतात. असं असलं तरीही हल्ली इतके चित्रपट प्रदर्शित होत असतात की ते तेवढे दर्जेदार असतातच असं नाही. त्यामुळे आम्ही हे सांगण्याचा प्रयत्न करू की प्रदर्शित झालेला एखादा चित्रपट खरंच बघायला हवा की नको.
आज या लेखात आपण मे २०२५मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपट आम्हाला कसे वाटले ते सांगणार आहोत. ज्यामुळे ते बघायला हवे की नको ते ठरवणं तुम्हाला सोपं जाईल.
मे २०२५ मध्ये प्रदर्शित झालेले हे मराठी चित्रपट तुम्ही पाहिलेत का.?

१. आता थांबायचं नाय! (Ata Thambaycha Naay!) |
लेखक | शिवराज वायचळ, ओंकार गोखले, अरविंद जगताप |
दिग्दर्शक | शिवराज वायचळ |
कलाकार | भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, आशुतोष गोवारीकर, ओम भुतकर, प्राजक्ता हनमघर, किरण खोजे |
निर्माता | उमेश कुमार बन्सल, बवेश जानवलेकर, निधी हिरानंदानी, धरम वालिया |
रिलीज तारीख | १ मे २०२५ |
भाषा | मराठी |
“आता थांबायचं नाय!” चित्रपट समीक्षा :-
बऱ्याच दिवसांनी मराठीमध्ये एक छान मनोरंजन करणारा हृद्यस्पर्शी सत्य प्रेरणादायी कथेवर आधारित असा चित्रपट आलेला आहे. शिवराज वायचळ यांनी खूप सुंदर अशी कथा मांडणी करून चित्रपटाचं दिग्दर्शन देखील उत्तम केलेलं आहे. २०१७ साली मुंबई महापालिका आयुक्त उदयकुमार शिरूरकर यांच्या पुढाकारामुळे काही चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना रात्रशाळेत शिकुन राहून गेलेली दहावीची परीक्षा देता आली होती. याच प्रेरणादायी वास्तव कथेवर आधारीत हा चित्रपट असून भरत जाधव, सिद्धार्थ जाधव अशा अनेक गुणी कलाकारांनी या चित्रपटाला चार चांद लावले आहेत.
चित्रपटाची कथा अर्थातच महापालिकेत काम करणाऱ्या सगळ्याच चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या आयुष्या भोवती फिरणारी आहे. उतारवयात कडे झुकत चाललेला मंचेकर म्हणजेच भरत जाधव हा एक सफाई कामगार असतो. परिस्थितीने गांजलेला मंचेकरचा जीव वर्षानुवर्ष कचऱ्यात काम करून कंटाळलेला असतो. आपल्या नातवासोबत छान आयुष्य मजेत घालवायचं स्वप्न बघणारा परिस्थिती समोर हतबल असतो. तर दुसरीकडे पाणी खात्यात काम करणारा मारूती कदम म्हणजे सिद्धार्थ जाधव हा सुद्धा आठवी नापास असलेला तरूण आपल्या मुलीने तरी चांगलं शिक्षण घ्यावं म्हणून कर्ज काढून तिला शिकवत असतो. दिवसा बीएमसीत काम आणि रात्री टॅक्सी चालवून तो मेटाकुटीला आलेला असतो. चित्रपटात अजून अशी अनेक सफाई कामगार म्हणून काम करणारे आहेत. प्रत्येकाची एक निराळी गोष्ट असते. एकदा अचानक महापालिका आयुक्त उदयकुमार शिरूरकर(आशुतोष गोवारीकर) हे एक काही कामगारांची यादी बनवून फतवा काढतात की ज्यांची दहावी पूर्ण नाही त्यांनी दहावीची परिक्षा द्यावी. त्यासाठी ते रात्रशाळा सुरू करतात आणि निलेश माळी(ओम भूतकर) या शिक्षकाची नियुक्ती करतात. आजपर्यंत फक्त कचऱ्यात काम करत घाणेरड्या वासात आयुष्य जगत असलेल्या या कामगारांच्या आयुष्यात अचानक कोऱ्या पुस्तकांचा वास येतो हे ज्या प्रकारे दिग्दर्शक शिवराज यांनी दाखवलं आहे ते फारच छान आहे.
आता अचानक असा फतवा निघाल्यावर या कामगारांची प्रतिक्रिया काय असते.? ते शिकतात का.? उत्तीर्ण होतात का.? आणि हे सगळं कसं घडतं हे बघण्यासाठी हा चित्रपट नक्कीच बघा. हा एक प्रेरणादायी चित्रपट असून मनोरंजन करण्यात तो कुठेच कमी पडत नाही. लेखक, दिग्दर्शक आणि कलाकार या सगळ्यांनीच उत्तम कामगिरी बजावली आहे. झी फाईव्ह वर हा चित्रपट तुम्ही आता बघू शकता. एक कर्तव्यदक्ष अधिकारी कामाप्रती प्रामाणिक असेल तर सणाजात बदल घडू शकतो हे या चित्रपटात पहायला मिळतं. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.
२. गुलकंद (Gulkand) |
लेखक | सचिन मोटे |
दिग्दर्शक | सचिन गोस्वामी |
कलाकार | समीर चौघुले, सई ताम्हणकर, प्रसाद ओक, ईशा डे, जुई भागवत, तेजस राऊत, वनीता खरात |
निर्माता | सचिन गोस्वामी, सचिन मोटे, संजय छाब्रिया |
रिलीज तारीख | १ मे २०२५ |
भाषा | मराठी |
“गुलकंद” चित्रपट समीक्षा :-
सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी ही जोडी महाराष्ट्रातील प्रेक्षकांना “महाराष्ट्राची हास्यजत्रा” या कार्यक्रमामुळे माहीत झाली. महाराष्ट्रातील प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या या लेखक दिग्दर्शक जोडीने आता चित्रपट क्षेत्रात पदार्पण करत गुलकंद चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटातील बरेचसे कलाकार सुद्धा महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील आहेत. मे २०२५ मध्ये मराठी चित्रपटांची रांग लागली. त्यातील एक म्हणजे गुलकंद.
गुलकंद चित्रपटाची कथा तशी नवीन नाही. याआधी सुद्धा अशा प्रकारचं कथानक किंवा विषय मराठी चित्रपटांत बघायला मिळाले आहेत. चित्रपटात मिनाक्षी(जुई भागवत) आणि ओंकार (तेजस राऊत) या दोघांचं एकमेकांवर प्रेम असतं. दोघंही घरी सांगून रितसर लग्न करणार असतात. सुरूवातीला दोघांच्याही घरचे तयार देखील असतात. परंतु औपचारिक म्हणून जेव्हा ओंकारचे वडील गिरीश माने(प्रसाद ओक) आणि आई रागिणी (ईशा डे) हे मिनाक्षी च्या घरी भेटायला, लग्नाची बोलणी करायला जातात तेव्हा एक मोठा ट्विस्ट येतो. तो असा की तिथे गेल्यावर गिरीश माने यांना आपलं तरुणपणीचं प्रेम कित्येक वर्षांनी समोर उभं दिसतं. त्यांच्या समोर मिनाक्षीची आई नीता ढवळे(सई ताम्हणकर) ऊभी असते. गिरीश आणि नीता यांचं तरुणपणी एकमेकांवर जीवापाड प्रेम असतं परंतु काही कारणास्तव ते दोघं दुरावलेले असतात आणि आता पुन्हा इतक्या वर्षांनी ते दोघं एकमेकांसमोर होणारे व्याही म्हणून उभे ठाकतात. यानंतर खरी मजा सुरू होते. दोघांच्याही जोडीदारांना यांच्या भुतकाळाबद्दल कळतं. या लग्नाच्या निमित्ताने नीता आणि गिरीश यांचं पुन्हा काही सुरू होईल ही भीती रागिणीला वाटते आणि त्यानंतर त्या भीतीपोटी तीची होणारी घालमेल, हे लग्न मोडण्यासाठी ढवळेंना हाताशी धरून ती काय काय उद्योग करते हे सगळं मजेशीर पद्धतीने दाखवलं आहे. परंतु या सगळ्यामुळे भलताच गैरसमज निर्माण होतो आणि मिनाक्षी आणि ओंकार चं लग्न मोडण्याची वेळ येते. आता नक्की काय होणार याचा अंदाज आधीच येतो परंतु एक विनोदी चित्रपट म्हणून बघायला हरकत नाही.
चित्रपटाची कथा मुळात फारशी सक्षम नाही. बऱ्याच जणांना वाटलं होतं की विवाहबाह्य संबंधांना खतपाणी घालणारा चित्रपट आहे की काय परंतु तसं अजिबात नाही. उलट अशा परिस्थितीत नवरा बायको म्हणून एकमेकांना समजून घेऊन आपलं नातं टिकवण्यासाठी कशा प्रकारे संयमी भूमिका स्विकारली पाहिजे हे दाखवलं आहे. एक साधा हलकाफुलका मनोरंजन करणारा कौटुंबिक चित्रपट आहे. फार अपेक्षा न ठेवता बघू शकता. सगळ्याच कलाकारांनी अभिनय उत्तम केला आहे. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.
३. माझी प्रारतना – अकल्पनीय प्रेमकथा (Majhi Prarthana) |
लेखक | पद्मराज नायर |
दिग्दर्शक | पद्मराज नायर |
कलाकार | पद्मराज नायर, अनुषा अडेप, उपेंद्र लिमये,जैनेंद्र निकाळे |
निर्माता | पद्मराज नायर |
रिलीज तारीख | ९ मे २०२५ |
भाषा | मराठी |
“माझी प्रारतना – अकल्पनीय प्रेमकथा” चित्रपट समीक्षा :-
“माझी प्रारतना – अकल्पनीय प्रेमकथा” हा चित्रपट ९ मे रोजी प्रदर्शित झाला असून या चित्रपटाचे सर्वेसर्वा पद्मराज राजगोपाल नायर यांनी मराठी चित्रपट निर्मितीमध्ये पदार्पण करत या चित्रपटाची निर्मिती केली आहे. त्यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली असून या भूमिकेसाठी चक्क पन्नास किलो वजन कमी केलं होतं. इतकं समर्पण एका चित्रपटासाठी क्वचित पहायला मिळतं. त्यांनी या चित्रपटाची कथा लिहिली असून मुख्य भूमिकेसोबतच या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केलेलं आहे.
खरं तर हा चित्रपट म्हणजे मराठीत केलेला एक वेगळा प्रयोग आहे. चित्रपटाची कथा स्वातंत्र्यपूर्व काळातील कोकणातील एका दुर्गम भागातील खेड्यात घडणारी आहे. ही गोळ्या (पद्मराज राजगोपाल नायर) आणि प्रार्थना (अनुषा अडेप) यांची प्रेमकथा आहे. गोळ्या हा सर्वसामान्यांपेक्षा थोडा वेगळा आहे. पूर्ण मतीमंद नसला तरीही तो अगदी नॉर्मल सुद्धा नाही. आपल्या आजीसोबत राहणाऱ्या गोळ्या चं दुसरं कोणी नाही. आजीनंतर प्रार्थना इतकंच त्याचं आयुष्य आहे. परंतु प्रत्येक कथेत एक खलनायक असतो तसा या कथेत या गावचा सरपंच आहे. उपेंद्र लिमये यांनी ही नकारात्मक भूमिका उत्तमरीत्या साकारली आहे. या सरपंचामुळे गोळ्या आणि प्रार्थना एकमेकांपासून दूर जातात. आता ते का.? आणि पुन्हा ते एकत्र येतात का हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
गोळ्या ही भूमिका साकारणारे चित्रपटाचे दिग्दर्शक पद्मराज नायर यांनी अन्नपाणी न खाता सात महिन्या नंतरचा जो गोळ्या साकारला आहे हे निव्वळ अद्भुत आहे. यासाठी त्यांनी तब्बल पन्नास किलो वजन कमी केलं होतं. चित्रपटात मुख्य कलाकारांचा अभिनय चांगला आहे. परंतु चित्रपटाची कथा इतक्या संथपणे पुढे सरकते की अक्षरशः शेवटपर्यंत बघण्याचा कंटाळा येतो. चित्रपटाची कथा, विषय नक्कीच चांगला आहे परंतु काही गरज नसलेले सीन्स आणि गाणी नसती तर कदाचित अजून प्रभावी झाला असता. चित्रपटाची चांगली बाजू काय असेल तर सिनेमॅटोग्राफी आणि लोकेशन्स. कोकणातील सौंदर्य प्रत्येक फ्रेम मधून ज्या प्रकारे दाखवलं आहे ते लाजवाब. कलात्मक दृष्टीकोनातून बघायचं झालं तर हा चित्रपट एक उत्कृष्ट नमुना आहे. चित्रपट म्हणून फार मसाला वगैरे काही नाही. फार कमी प्रेक्षकांना असे चित्रपट आवडतात. कथेची मांडणी आणि सादरीकरण यामुळे चित्रपट कंटाळवाणा वाटतो. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.
४. शातीर द बिगीनिंग (Shaatir: The Beginning) |
लेखक | सुनील वायकर |
दिग्दर्शक | सुनील वायकर |
कलाकार | रेश्मा वायकर, योगेश सोमण, रमेश परदेशी, अनिल नगरकर, मीर सरवर |
निर्माता | रेश्मा वायकर |
रिलीज तारीख | २३ मे २०२५ |
भाषा | मराठी |
“शातीर द बिगीनिंग” चित्रपट समीक्षा :-
आजकाल मराठी चित्रपट म्हणजे स्वतःला अभिनय करायचा असेल तर स्वतः चित्रपट निर्मिती करून हौस पूर्ण करावी असं झालेलं आहे. रेश्मा वायकर यांची निर्मिती असलेला शातीर द बिगीनिंग हा त्यांचा पहिला चित्रपट आहे. या चित्रपटात त्यांनी एका धडाकेबाज, बिनधास्त अशा मुलीची भूमिका साकारली असून हा एक सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आहे. समाजातील ड्रग्सच्या विळख्यात अडकलेली तरुणाई आणि ड्रग्स मुळे या तरुण मुलांचं उध्वस्त होणारं आयुष्य अशा प्लॉटवर चित्रपटाची कथा बेतलेली आहे. एका सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट आधारित आहे.
पुण्यातील एका कॉलेज मध्ये घडणारी ही कथा आहे. कॉलेजच्या होस्टेलमधील एका मुलाने आत्महत्या केल्यानंतर त्याने तसं का केलं याचा शोध सुरू होतो. यातुनच कॉलेज मध्ये सुरू असलेल्या ड्रग्स रॅकेटचे धागेदोरे उलगडत जातात. कॉलेजमध्ये शिकत असलेली नायिका आकांक्षा म्हणजेच रेश्मा वायकर ही या सगळ्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करते. तिला या रॅकेटच्या मागे कोण आहे हे शोधून काढायचं असतं. परंतु या सगळ्यात तिला खूप गोष्टींना, संकटांना सामोरं जावं लागतं. आता असं असताना ती या सगळ्याचा शोध लावते की नाही हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
चित्रपटाची कथा सस्पेन्स थ्रिलर जॉनरची असली तरी ती अतिशय सामान्य आणि अगदीच जुनी आहे. सुनील वायकर यांचं दिग्दर्शन देखील सुमार आहे. रेश्मा वायकर हीने डॅशिंग आणि बोल्ड, बिनधास्त अशी भूमिका साकारली आहे परंतु अभिनय नाटकी वाटतो. इतर कलाकार सुद्धा ठिकठाक आहेत. योगेश सोमण यांना फार भूमिका मिळाली नाही. एकंदरीत फसलेला चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला एक स्टार.
५. पीएसआय अर्जुन (PSI Arjun) |
लेखक | संदिप दंडवते |
दिग्दर्शक | भुषण पटेल |
कलाकार | अंकुश चौधरी, अक्षया हिंदळकर, नंदू माधव, किशोर कदम |
निर्माता | विक्रम शंकर, विक्रांत शिंदे |
रिलीज तारीख | ९ मे २०२५ |
भाषा | मराठी |
“पीएसआय अर्जुन” चित्रपट समीक्षा :-
९ मे रोजी प्रदर्शित झालेला पीएसआय अर्जुन हा चित्रपट भुषण पटेल यांनी दिग्दर्शित केलेला असून प्रेक्षकांचा लाडका अभिनेता अंकुश चौधरी या चित्रपटात एका डॉशिंग पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे. बऱ्याच प्रेक्षकांनी हा चित्रपट मल्याळम चित्रपट कुमानचा रिमेक आहे असं म्हटलं आहे आणि खरंच या चित्रपटाची संपूर्ण कथा आणि सादरीकरण हे कुमान चित्रपटात आहे तसंच आहे.
चित्रपटाची कथा अर्थातच पीएसआय अर्जुन याच्या भोवती फिरणारी आहे. जर कोणी सांगितलं की एखाद्या पोलीस अधिकाऱ्याला चोरी करण्याचं व्यसन लागलं आहे तर आपण हसू. परंतु या चित्रपटाची कथाच मुळात या प्लॉटवर आधारित आहे. पीएसआय अर्जुन याला सुद्धा चोरी करण्याचं व्यसन लागलेलं असतं परंतु ते इतक्या थराला जातं की तो स्वतः त्यात अडकत जातो. एकीकडे
गावात विशिष्ट पद्धतीने खुन होत असतात. याचा शोध अर्जुन घेत असतोच. अशातच गावात अचानक चोऱ्यांचं वाढतं प्रमाण या सगळ्याचा एकमेकांशी काही संबंध असतो का.? पीएसआय अर्जुन खुनाचा तपास करतो का.?हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
अंकुश चौधरी हा चांगला अभिनेता आहे परंतु या चित्रपटात तो तेवढा प्रभावी वाटत नाही. किशोर कदम यांनी चोराची भूमिका उत्तम साकारली आहे. इतरही कलाकारांनी अभिनय चांगला केला आहे. परंतु मुळात ज्यांनी ओरिजनल कुमान चित्रपट बघीतला आहे त्यांची निराशा होऊ शकते परंतु ज्यांनी पाहिला नाही त्यांना हा चित्रपट आवडू शकतो. चित्रपटाचं दिग्दर्शन ठिकठाक आहे. क्लायमॅक्स चांगला आहे. कलादिग्दर्शन उत्तम आहे. एकंदरीत एकदा बघायला हरकत नाही असा हा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.
६. बंजारा (Banjara) |
लेखक | स्नेह पोंक्षे |
दिग्दर्शक | स्नेह पोंक्षे |
कलाकार | भरत जाधव, शरद पोंक्षे, सुनील बर्वे,सक्षम कुलकर्णी, आदित्य धनराज, स्नेह पोंक्षे |
निर्माता | रोहीणी पटवर्धन |
रिलीज तारीख | १६ मे २०२५ |
भाषा | मराठी |
“बंजारा” चित्रपट समीक्षा :-
१६ मे रोजी प्रदर्शित झालेला बंजारा हा चित्रपट स्नेह पोंक्षे याने दिग्दर्शित केलेला असून यात बऱ्याच वर्षांनी
भरत जाधव, शरद पोंक्षे आणि सुनील बर्वे हे तिघे एकत्र आलेले आहेत. शरद पोंक्षे यांचा मुलगा स्नेह पोंक्षे याने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत चित्रपटाची कथा लिहिली आहे. आजकाल नवीन तरूण दिग्दर्शन क्षेत्रात येत ही गोष्ट आशादायी नक्कीच आहे परंतु यांच्याकडून नवीन आणि काहीतरी हटके बघायला मिळालं तर जास्त आवडेल.
बंजारा चित्रपट म्हणजे तीन मित्रांच्या रोड ट्रिपची गोष्ट आहे. समीर (भरत जाधव), अविनाश (शरद पोंक्षे) आणि विवेक (सुनील बर्वे) हे तरुणपणीचे मित्र आता पन्नाशीच्या उंबरठ्यावर उभे असतात. नेहमी संपर्कात असलेले हे तिघं एकदा चार पाच वर्षांच्या कालावधीनंतर एकमेकांना भेटतात तेव्हा त्यांच्या तरूणपणीच्या गप्पा , आठवणी जाग्या होतात. तेव्हा समीर म्हणजेच भरत जाधव ,तरुणपणीचा दाखवलेला सक्षम कुलकर्णी याच्या आजोबांमुळे बावीस तेवीस वर्षांपूर्वी काय घडलं होतं हे आपल्या मुलीला सांगत असतो. त्याचे आजोबा हे चांगले ट्रेकर होते. आजोबांच्या जाण्यानंतर समीर ला त्यांची एक अपूर्ण राहीलेली इच्छा समजते. त्यावेळी त्याच्या आजोबांची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी समीर आपल्या मित्रांना घेऊन प्लॅनिंग नसताना सिक्कीम ला जायला निघतात. तेव्हा ते तिघे बाईक घेऊन सिक्कीम ला जातात. कारण तिथे असलेल्या एका गुप्त महादेव मंदिरात जाण्याची आजोबांची शेवटची इच्छा अपूर्ण राहीलेली असते. परंतु तेव्हा त्या तिघांसोबत असं काही घडतं की ते कसाबसा आपला जीव वाचवतात. त्यामुळे ती इच्छा शेवटपर्यंत अपूर्णच राहते. आता इतक्या वर्षांनी ही घटना आठवल्यावर हे तिघे या वयात पुन्हा तिथं जाण्याचं ठरवतात. आता ते कसे जातात.? त्यांना ते गुप्त मंदिर सापडतं का? हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
चित्रपटाचा प्रयत्न चांगला आहे परंतु एक दिग्दर्शक म्हणून स्नेह याला अजून खूप शिकावं लागेल. एकंदरीत कथा खूप संथपणे पुढे सरकते. बऱ्याचदा तेच तेच संवाद ऐकू येतात. पटकथा अजून प्रभावीपणे मांडता आली असती. मुळात कथा पटकथा लेखन तेवढं प्रभावी नाही. चित्रपटाची कथा वीस बावीस वर्षे मागे जात असेल तर दोन्ही काळात जो फरक दिसायला हवा तो दिसत नाही. काही ठिकाणी खूप नाटकी सादरीकरण वाटतं. परंतु भरत, सुनील आणि शरद पोंक्षे यांना बऱ्याच वर्षांनी एकत्र बघायचं असेल तर चित्रपट बघू शकता. ओटीटीवर आल्यावर एकदा बघायला हरकत नाही असा हा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार.
७. पॉस्को ३०७ (Posco 307) |
लेखक | स्वरूप सावंत |
दिग्दर्शक | स्वरूप सावंत |
कलाकार | स्वरूप सावंत, अमित तवारे, शशी थोसार,सिद्धेश्वर झाडबुके |
निर्माता | वैशाली सावंत, प्रेमलता संघवी |
रिलीज तारीख | १६ मे २०२५ |
भाषा | मराठी |
“पॉस्को ३०७” चित्रपट समीक्षा :-
स्वरूप सावंत दिग्दर्शित “पॉस्को ३०७” हा चित्रपट १६ मे २०२५ रोजी प्रदर्शित झाला. अठरा वर्षाखालील मुला-मुलींना लैंगिक अत्याचारांपासून वाचवण्यासाठी २०१२ साली संमत करण्यात आलेला पॉस्को हा कायदा आजही बऱ्याच जणांना माहित नाही. या कायद्यामुळे आपण न्याय मागू शकतो हेच बऱ्याच जणांना माहिती नसतं. याच कायद्याबाबत अधिक जनजागृती करणारा हा चित्रपट आहे.
स्वरूप सावंत यांनी या चित्रपटाची कथा लिहिली असून दिग्दर्शन देखील केलेलं आहे. ही कथा दोन भावांची आणि त्यांच्या बहीणीची आहे. ज्या गावात ते राहत असतात तिथे कायदा, सुव्यवस्था, न्याय या सगळ्याचं काही कोणाला देणं घेणं नसतं. अन्याय, अत्याचार झाला तरी न्याय मागायचा कुणाला आणि तै मिळेल की नाही याची खात्री नाही अशी परिस्थिती असताना आपल्या बहीणीवर झालेल्या हल्ल्यानंतर कृष्णा आणि बाली हे दोघं भाऊ कायदा हातात घेऊन स्वतःच न्याय मिळवण्याचा प्रयत्न करतात. आता त्यांना न्याय मिळतो की नाही हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
स्वरूप सावंत यांनी एक अतिशय सामान्य आणि घासून पुसून गुळगुळीत झालेल्या विषयावर कथा लिहिली आहे. दिग्दर्शन आणि अभिनय यातलं काहीच त्यांना चांगलं जमलेलं नाही. एकंदरीत खूप नाटकी सादरीकरण वाटतं. संवाद देखील डब केल्यासारखे वाटतात. एकंदरीत फसलेला चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला एक स्टार.
८. मंगलाष्टक रिटर्न्स (Mangalashtaka Returns) |
लेखक | डॉ. भालचंद्र गायकवाड |
दिग्दर्शक | योगेश पांडुरंग भोसले |
कलाकार | वृषभ शाह,शीतल अहिरराव, सक्षम कुलकर्णी,प्रसाद ओक,आनंद इंगळे |
निर्माता | वीरकुमार शहा |
रिलीज तारीख | १६ मे २०२५ |
भाषा | मराठी |
“मंगलाष्टक रिटर्न्स” चित्रपट समीक्षा :-
याआधी म्हटल्याप्रमाणे अभिनयाची हौस असेल तर स्वतः चित्रपट निर्मिती करायची अशी परिस्थिती मराठी चित्रपटसृष्टीत झालेली आहे. वृषभ शाह अभिनीत मंगलाष्टक रिटर्न्स या चित्रपटाची निर्मिती वीर कुमार शहा यांनी केवळ वृषभ याला अभिनय करायचा होता म्हणून केली असं एकंदर चित्रपट बघून वाटतं. या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे हा अख्खा चित्रपट सोडाच तुम्ही दोन तीन मिनिटांचा ट्रेलर सुद्धा पूर्ण बघू शकत नाही. दिग्गज कलाकारांची वर्णी लागलेली असताना देखील हा चित्रपट सपशेल आपटला आहे.
चित्रपटाची कथा पटकथा संवाद कशातच दम नाही. या चित्रपटाची सुरुवातीला थोडीफार चर्चा झाली होती आणि त्याचं कारण म्हणजे या चित्रपटात दाखवण्यात आलेला घटस्फोट सोहळा. एका गावातील दोन वजनदार राजकीय पार्श्वभूमी असलेली घराणी. एका घरातील नायक म्हणून असलेला अनिरुद्ध(वृषभ शहा) आणि दुसऱ्या घराण्यातील मुलगी म्हणजे नायिका शीतल(शीतल अहीरराव) हे दोघं प्रेमात पडतात. परंतु या दोन्ही घराण्यांमध्ये दुश्मनी असते तरी हे दोघं प्रेमात पडतात. परंतु आजुबाजूची मंडळी, नातेवाईक या सगळ्यांमुळे त्यांच्या प्रेमावर प्रश्नचिन्ह निर्माण होतं. आता ते का हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
परंतु आमचा मोलाचा सल्ला ऐकाल तर हा चित्रपट बघण्यात तुमचा बहुमूल्य वेळ वाया घालवू नका. कथा, दिग्दर्शन, अभिनय, गाणी, पार्श्वसंगीत सगळ्याचेच तीन तेरा वाजलेले आहेत. एकंदरीत पूर्ण फसलेला चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला एक स्टार.
९. वामा लढाई सन्मानाची (Vaama: Ladai Sanmanachi) |
लेखक | अशोक कोंडके |
दिग्दर्शक | अशोक कोंडके |
कलाकार | कश्मिरा कुलकर्णी, डॉ महेश कुमार, गणेश दिवेकर, जुई बी |
निर्माता | सुब्रमण्यम के |
रिलीज तारीख | २३ मे २०२५ |
भाषा | मराठी |
“वामा लढाई सन्मानाची” चित्रपट समीक्षा :-
२३ मे रोजी प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट वामा – लढाई सन्मानाची हा अशोक कोंडके यांनी दिग्दर्शित केलेला असून त्यांनी चित्रपटाची कथा लिहिली आहे. खरं तर मराठी चित्रपटांना सन्मान हवा असेल तर त्यांनी दर्जा सुधारण्याची गरज आहे. ढिगभर चित्रपट येऊन सुद्धा बघण्यालायक मात्र मोजके चित्रपट असतात. त्यामुळे आता लढाई मराठी चित्रपटांच्या सन्मानाची आहे.
या चित्रपटात परत तेच म्हणजे जुन्याच विषयावर बेतलेली स्त्री प्रधान अशी कथा. स्त्रीवर होणारा अत्याचार आणि त्याविरुद्ध पेटून उठलेली स्त्री हाच या चित्रपटाचा गाभा आहे. सरला ही एक खूप हुशार मुलगी असते. लग्नानंतर शिक्षण चालू ठेवत आयएएस अधिकारी बनण्याचं स्वप्न पूर्ण करू देणार हे आश्वासन देत तिचा नवरा तिच्याशी लग्न करतो. परंतु लग्नानंतर तो खरे दात दाखवतो. तो तिला लग्नानंतर शिक्षण तर सोडाच पण खूप त्रास देतो, अगदी मारझोड सुद्धा करतो. सुरूवातीला सरला हे नातं टिकवण्यासाठी प्रयत्न करते परंतु सत्य परिस्थितीची जाणीव झाल्यावर ती पेटून उठते. ती पुढे काय करते हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
अशोक कोंडके यांनी एक ठिकठाक कथा लिहिली आहे. कलाकारांचा अभिनय सुद्धा ठिकठाकच आहे. गौतमी पाटील हीचं आयटम साँग ठेवून सुद्धा त्याचा फारसा फायदा झालेला नाही. खरं तर लिहिण्यासारखं या चित्रपटात काहीच नाही. एकंदरीत फ्लॉप शो आहे. माझ्याकडून या चित्रपटाला एक स्टार.
१०. एप्रिल मे ९९ (April May 99) |
लेखक | रोहन मापुस्कर |
दिग्दर्शक | रोहन मापुस्कर |
कलाकार | आर्यन मेंघजी,श्रेयस थोरात,मंथन कणेकर,साजिरी जोशी |
निर्माता | |
रिलीज तारीख | १६ मे २०२५ |
भाषा | मराठी |
“एप्रिल मे ९९” चित्रपट समीक्षा :-
रोहन मापुस्कर दिग्दर्शित एप्रिल मे ९९ हा चित्रपट म्हणजे आठवणींच्या सुवर्ण काळात घेऊन जाणारा एक गोड अनुभव आहे. विशेष करून नव्वदच्या पिढीला हा चित्रपट खूप जास्त आवडेल. नव्वदची पिढी ही अशी पिढी आहे जी आता ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी, सोशल मिडिया, डिजिटल वस्तू, मोबाईल सगळं वापरत आहे परंतु या पिढीने असाही काळ अनुभवला आहे जेव्हा यातलं काहीच नव्हतं. ना मोबाईल ना इंटरनेट ना कसले गॅजेट्स. सुट्टीच्या काळात दिवसभर हुंदडत मजा करणे, नदीवर पोहायला जाणे, रानमेवा खाणे या अशा अनेक गोष्टी या पिढीने अनुभवल्या आहेत. याच सगळ्यावर आधारित हा एक सुंदर चित्रपट बेतलेला आहे.
खरं तर या चित्रपटाची असं काही कथानक किंवा विषय असा नाही. हा एक जुन्या आठवणींना उजाळा देत तुमच्या बालपणातील काळात घेऊन जाणारा अनुभव आहे. चित्रपटाची कथा कोकणातील एका गावात घडतेय. प्रसाद (श्रेयस थोरात), कृष्णा (आर्यन मेंघजी) आणि सिद्धेश (मंथन काणेकर) हे तिघं कोकणातील एका गावात राहात असतात. उन्हाळ्याच्या सुट्टीत काय करायचं याचे बेत ठरवत असताना प्रसादचे वडील त्याला सुट्टीत इंग्रजी शिकण्यासाठी मुंबईत पाठवायचं ठरवतात. परंतु आपल्या मित्रांना सोडून प्रसादला तिकडे जायचं नसतं. त्यच दरम्यान त्या गावात जाई(साजिरी जोशी)ही आपल्या मावशीकडे सुट्टीत म्हणून येते. पुण्यात राहणाऱ्या जाईला उत्तम इंग्रजी बोलता येत असतं. त्यामुळे प्रसाद आपल्या वडिलांना सांगतो की मी सुट्टीत जाईकडून इंग्रजी शिकेन. त्यासाठी त्याचे वडील सुद्धा तयार होतात. आता तिघांचं त्रिकुट चौकोन बनतं. चौघांची छान मैत्री होते. जाईला श्रीवर्धन फिरवणं, गावातील गंमती दाखवणं आणि जाईचं तिघांना इंग्रजी शिकवणं या सगळ्यात या तिघांना जाई आवडायला लागते. पण यापुढे काय होतं हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
खरं तर हा चित्रपट बघण्याची अनेक कारणं आहेत. सुंदर कथानक, सुंदर साधी सहज मांडणी, नैसर्गिक अभिनय आणि उत्कृष्ट दिग्दर्शन असं सगळंच या चित्रपटात जुळून आलं आहे. नक्कीच बघावा असा हा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला चार स्टार.
११. तू आणि मी अमायरा (Tu Me Ani Amaira |
लेखक | मिहीर राज, लोकेश गुप्ते |
दिग्दर्शक | लोकेश गुप्ते |
कलाकार | अजिंक्य देव, सई गोडबोले, पूजा सावंत |
निर्माता | मुक्ता आर्ट्स |
रिलीज तारीख | २३ मे २०२५ |
भाषा | मराठी |
“तू आणि मी अमायरा” चित्रपट समीक्षा :-
लोकेश गुप्ते दिग्दर्शित “तू मी आणि अमायरा” हा चित्रपट २३ मे रोजी प्रदर्शित झाला असून यात अजिंक्य देव, सई गोडबोले आणि पूजा सावंत यांच्या प्रमुख भूमिका आहेत. भारताबाहेर जाऊन चित्रपटाचं चित्रीकरण करणं हा एक नवा ट्रेण्ड आता मराठी चित्रपटसृष्टीला देखील भुरळ पाडत आहे असं वाटतं. विशेष करून लोकेश गुप्ते यांचे बरेच चित्रपट हे भारताबाहेर जाऊन चित्रीकरण केलेले आहेत.
या चित्रपटाची कथा म्हणजे प्रेमाचा त्रिकोण असलेली आहे. अजिबातच नाविन्य नसलेली ही कथा आहे. शुभंकर म्हणजे अजिंक्य देव याला कॅरॉल म्हणजे पूजा सावंत ही आवडत असते पण तो तिला तसं सांगायला घाबरत असतो. एक तर त्याने चाळीशी पार केलेली असते आणि कॅरॉल ही तरुण असते. परंतु अमायरा म्हणजे सई गोडबोले ही त्याच्या मुलीच्या वयाची असलेली मैत्रीण त्याला यासाठी मदत करते. एकदा अमायरा शुभंकरला आपल्या घरी घेऊन जाते तेव्हा मात्र एक नवीन सत्य तिच्यासमोर येतं आणि त्यामुळे अख्खी गोष्ट बदलून जाते. आता ते सत्य काय ते जाणून घेण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
चित्रपटाची कथा पटकथा फार नवीन नसल्यामुळे विशेष भारी असं चित्रपटात पहायला काही मिळत नाही. बाहेर जाऊन चित्रीकरण करणं ही गोष्ट तुम्हाला शेवटपर्यंत चित्रपट बघावा यासाठी पुरेशी नसते. लेखन संवाद ठिकठाक आहेत. लोकेश गुप्ते यांचं दिग्दर्शन ठिक आहे. कलाकार चांगले आहेत परंतु मुळात कथानक प्रभावी नसल्याने तशी मजा येत नाही. ओटीटीवर आल्यावर एकदा बघायला हरकत नाही असा हा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार.
१२. म्हणजे वाघाचे पंजे (Mhanje Waghache Panje) |
लेखक | सौरभ पात्रुडकर, संजय नवगिरे |
दिग्दर्शक | स्वरूप सावंत |
कलाकार | संजय नार्वेकर, प्राजक्ता हणमघर,सौरभ गोखले, निखिल चव्हाण, तमन्ना बांदेकर, दिपाली सय्यद |
निर्माता | निर्मला बांदेकर |
रिलीज तारीख | ३० मे २०२५ |
भाषा |
“म्हणजे वाघाचे पंजे” चित्रपट समीक्षा :-
स्वरूप सावंत दिग्दर्शित “म्हणजे वाघाचे पंजे” हा चित्रपट ३० मे २०२५ रोजी प्रदर्शित झाला. प्रदर्शित होण्याआधी थोडीफार चर्चा झालेल्या या चित्रपटाने खरं तर प्रेक्षकांची निराशा केली. संजय नार्वेकर आणि प्राजक्ता हणमघर या दोन कलाकारांच्या विनोदामुळे किमान थोडं फार हसू शकतो परंतु चित्रपटात बाकी खास असं बघण्यासारखं काही नाही.
सौरभ पात्रुडकर यांची कथा आणि संजय नवगिरे
यांची पटकथा हि अगदीच काळाच्या बरीच मागे चाललीय असं वाटतं. दिपाली सय्यद यांनी सुमित्रा ही भूमिका साकारली आहे ज्या डॉक्टरांचा खूप राग करत असतात, ज्यांचा शब्द म्हणजे अंतिम शब्द. त्या त्यांच्या मुलीसाठी म्हणजे तमन्ना बांदेकर हिच्यासाठी स्थळ शोधत असतात. परंतु जो मुलगा बघायला येतो तो इतका वडिलांच्या आज्ञेत असतो की वडील म्हणतील ती पूर्व दिशा असं असतं. सौरभ गोखले हा तिचा मित्र दाखवला आहे. परंतु सुमित्रा यांना त्यांच्या मुलीच्या प्रेमाविषयी कळतं तेव्हा त्यांच्या आयुष्यात असं वादळ येतं की त्यांचा भूतकाळ जागा होतो. आता तो भूतकाळ काय असतो.? हे जाणून घेण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
चित्रपटाची कथा पटकथा अगदीच सामान्य आहे. चित्रपटातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला गेला आहे परंतु तो समजण्यासाठी चित्रपट बघावा लागेल आणि शेवटपर्यंत खिळवून ठेवेल असं या चित्रपटात काहीच नाही. विनोदी असल्यामुळे चित्रपट थोडा तरी सुसह्य होतो. परंतु तमन्ना बांदेकर हिचा अभिनय बघताना आपण का हा चित्रपट बघतोय याचा पश्चात्ताप होतो. मराठी चित्रपटसृष्टीत अशाच चित्रपटांची निर्मिती होत राहीली तर प्रेक्षक पाठ फिरवतीलच यात शंका नाही. मोजके चित्रपट सोडले तर आजकाल या अशा चित्रपटांची निर्मिती जास्त होते याची खंत वाटते. दिग्दर्शन अगदीच सामान्य आहे. संवाद, संगीत, पार्श्वसंगीत कशातच राम नाही. एडिटिंग खराब आहे त्यामुळे चित्रपट बघताना एखादा डब चित्रपट बघतोय असं वाटतं. असो “म्हणजे वाघाचे पंजे” हा चित्रपट एकंदरीत तुमच्याकडे रिकामी वेळ आहे आणि तुमच्या फार अपेक्षा नसतील तर हा चित्रपट तुम्ही बघू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला एक स्टार.
१३. अष्टपदी (Ashtapadi) |
लेखक | महेंद्र पाटील |
दिग्दर्शक | उत्कर्ष जैन |
कलाकार | संतोष जुवेकर, मयूरी कापडणे, अभिनय पाटेकर |
निर्माता | उत्कर्ष जैन |
रिलीज तारीख | ३० मे २०२५ |
भाषा | मराठी |
“अष्टपदी” चित्रपट समीक्षा :-
३० मे रोजी प्रदर्शित झालेला अष्टपदी हा चित्रपट उत्कर्ष जैन यांनी दिग्दर्शित केलेला असून महेंद्र पाटील यांची कथा आहे. यात संतोष जुवेकर, अभिनय पाटेकर आणि मयुरी कापडणे हे तिघे मुख्य भूमिका साकारत आहेत.
चित्रपटाची कथा संगीतमय अशी प्रेमकथा आहे. अगदी जुन्या काळातील टिपिकल मराठी प्रेमकथा. दोघांचं एकमेकांवर असलेलं भरपूर प्रेम आणि त्यात तिसरा असं कथानक असलेल्या या चित्रपटात नवीन बघायला काही मिळत नाही. एका संगीत शाळेत भेकलेले सावनी आणि अनिकेत एकमेकांच्या प्रेमात पडतात परंतु विक्रम म्हणजे संतोष जुवेकर याचं सावनीवर जीवापाड प्रेम असतं. तीच प्रेम मिळवण्यासाठी तो काही करू शकतो. आता सावनी कोणाशी लग्न करते हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
मध्यंतरी छावा चित्रपटाच्या यशानंतर एका मुलाखती मुळे संतोष जुवेकर खूप ट्रोल झाले होते. अक्षय खन्ना यांच्या बद्दल बोलताना मी तिकडे बघितलच नाही..मी बघूच शकत नाही असं ते म्हणाले होते. तसं काहीसं प्रेक्षक या चित्रपटाच्या बाबतीत नक्कीच म्हणू शकतील. अतिशय सामान्य कथा, सुमार दिग्दर्शन आणि सादरीकरण. खास असं चित्रपटात काही नाही. अभिनय सुद्धा ठिकठाकच. एकंदरीत फसलेला चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला एक स्टार.
१४. धर्मरक्षक अहिल्यादेवी होळकर एक युग (Dharmarakshak Ahilyadevi Holkar Ek Yug) |
लेखक | सुशांत सोनवले |
दिग्दर्शक | सुशांत सोनवले |
कलाकार | अश्विनी महांगडे |
निर्माता | सोमनाथ शिंदे |
रिलीज तारीख | १६ मे २०२५ |
भाषा | मराठी |
“धर्मरक्षक अहिल्यादेवी होळकर एक युग” चित्रपट समीक्षा :-
“धर्मरक्षक अहिल्यादेवी होळकर – एक युग” हा चित्रपट अर्थातच अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनकार्यावर आधारित आहे. धनगर समाजात जन्मलेल्या अहिल्याबाईंचे लग्न वयाच्या आठव्या वर्षी सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या मुलाशी, खंडेरावांशी झाले होते. आणि एका लढाईत झालेल्या खंडेरावांच्या मृत्यू नंतर सती न जाता अहिल्याबाई होळकर यांनी प्रजेसाठी राज्यकर्ती ही जबाबदारी स्वीकारली. त्यांनी केलेल्या सगळ्या कार्याचा गौरव म्हणून या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
चित्रपटाची कथा अर्थातच एक इतिहास आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी जे जे कार्य केलं. त्यांनी अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले, अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला. धर्मशाळा बांधल्या. प्रसंगी प्रजेसाठी हाती तलवार घेतली हे सगळं या चित्रपटात पहायला मिळतं. अश्विनी महांगडे यांनी अहिल्याबाई होळकर यांची भूमिका साकारली आहे.
इतक्या मोठ्या महान व्यक्तीमत्वावर चित्रपट बनवायचा तर खूप मोठी जबाबदारी असते. सेट, व्हिएफएक्स इफेक्ट्स, ॲक्शन कोरिओग्राफी या गोष्टींना महत्त्व असतं परंतु या गोष्टींना या चित्रपटात फार महत्त्व दिलं गेलंय असं वाटत नाही. चित्रपट बनवताना बजेटची मर्यादा आल्यामुळे चित्रपट तेवढा प्रभावी वाटत नाही. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याबद्दल आदर आणि माहितीसाठी हा चित्रपट बघू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार.
१५. पायवाटेची सावली (Paivatechi Savali) |
लेखक | मुनावार शमीम भगत |
दिग्दर्शक | मुनावार शमीम भगत |
कलाकार | विजे भाटिया आणि शल्वी शाह |
निर्माता | मुनावार शमीम भगत |
रिलीज तारीख | ३० मे २०२५ |
भाषा | मराठी |
“पायवाटेची सावली” चित्रपट समीक्षा :-
मुनावर भगत यांनी एक असा चित्रपट दिग्दर्शित केला आहे जो बघण्यासाठी खरं तर प्रेक्षकांना पैसे दिले गेले पाहिजेत. विजे भाटिया आणि शल्वी शाह असे दोन कलाकार मध्यवर्ती भूमिकेत असलेला हा चित्रपट ३० मे रोजी प्रदर्शित झाला.
चित्रपटाची कथा एका तरुणाभोवती फिरते ज्याला अभिनय क्षेत्रात नाव कमवायचे आहे आणि त्यासाठी तो मुंबईत येतो परंतु त्याच्यासमोर इतक्या अडचणी येतात की त्याल अपयश मिळतं. दरम्यान त्याच्या आयुष्यात एक मुलगी येते परंतु प्रेमाच्या बाबतीतही त्याला अपयशच मिळतं. पुढे त्याला आध्यात्मिक मार्ग सापडतो आणि त्याचं आयुष्य बदलतं. आता नक्की काय होतं हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
मुळात याला चित्रपट म्हणावं का इथुनच सुरवात होते. विजे शहा यांचा भयानक अभिनय(?) बघून हसावं की रडावं असं वाटतं. असो एकंदरीत दहा पंधरा मिनिटे सुद्धा सहन न होणारा हा प्रकार आहे. माझ्याकडून या चित्रपटाला अर्धा स्टार.
तर मंडळी यापैकी तुम्ही कोणते चित्रपट पाहीलेत आणि आवडलेत का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसंच या विकेंडला वरीलपैकी कोणता चित्रपट बघायला आवडेल हे सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.