HomeFilmsHindi

मे 2025 मध्ये रिलीझ झालेल्या हिंदी चित्रपटांची यादी आणि त्यांची समीक्षा

मे 2025 मध्ये रिलीझ झालेल्या हिंदी चित्रपटांची यादी आणि त्यांची समीक्षा | List of Hindi movies released in May 2025 and their reviews

Written by : आकांक्षा कोलते

Updated : जुलै 9, 2025 | 11:33 PM

मे २०२५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेले हे हिंदी चित्रपट तुम्ही पाहीलेत का?

   खरं तर आता वेबसिरीज चा जमाना असल्यामुळे प्रेक्षकांच्या चित्रपटांच्या बाबतीत अपेक्षा वाढल्या आहेत. त्यातही नवीन आलेल्या चित्रपटांमध्ये ओरिजनल कंटेट कमीच असतो. बरेच चित्रपट हे रिमेक असतात. त्यामुळे चित्रपटगृहात प्रेक्षकांना खेचून आणणं हे आता निर्माते आणि दिग्दर्शक यांच्यापुढे नवीन आव्हान आहे. आता प्रेक्षकांच्या चित्रपटांच्या बाबतीत असलेल्या अपेक्षा पूर्ण होतायत की नाही हे आमच्या परीने सांगण्याचा प्रयत्न या लेखात आम्ही करणार आहोत. 

 आज या लेखात मे २०२५ महिन्यात प्रदर्शित झालेले चित्रपट कोणते आहेत आणि बघायला हवेत की नको याबद्दल आमचं मत सांगणार आहोत. 
List of Hindi movies released in May 2025 and their reviews

१. रेड २ (Raid 2)
२०२५. थ्रिलर, ड्रामा. २ तास १९ मिनिटे. [U/A १३+]
लेखक रितेश शाह, राजकुमार गुप्ता, जयदीप यादव, करण व्यास
दिग्दर्शकराजकुमार गुप्ता
कलाकारअजय देवगन, रितेश देशमुख, वाणी कपूर, रजत कपूर, सौरभ शुक्ला, अमित सियाल, यशपाल शर्मा, सुप्रिया पाठक
निर्माताभूषण कुमार, कृष्ण कुमार, कुमार मंगत, अभिषेक पाठक
रिलीज तारीख१ मे २०२५
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.२⭐/ ५

रेड २” चित्रपट समीक्षा :-

सात वर्षांपूर्वी राजकुमार गुप्ता यांनी दिग्दर्शित केलेला रेड हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला होता. आयकर विभागातील एक प्रामाणिक अधिकारी भ्रष्ट राजकारण्यांचा काळा पैसा बाहेर काढण्यासाठी काय काय प्रयत्न करतो हे आपण या चित्रपटात पाहिलं होतं. आता प्रदर्शित झालेला रेड २ हा याच चित्रपटाचा दुसरा भाग आहे. आधीच्या चित्रपटातील काही प्रसंग या चित्रपटात जोडले आहेत. खरं तर व्हिलन बदलला परंतु बाकी प्लॉट तसाच ठेवलाय असं चित्रपट बघीतल्यावर वाटतं. रितेश देशमुख विरूद्ध अजय देवगण अशी जुगलबंदी या चित्रपटात पहायला मिळते.
अमेय पटनायक (अजय देवगन) हा एक आयकर विभागातील प्रामाणिक अधिकारी असून तो भ्रष्टाचार करून काळा पैसा कमवणाऱ्यांसाठी कर्दनकाळ बनून त्यांचा काळा पैसा बाहेर काढत असतो. यामुळेच अशाच एका कारवाईनंतर त्याच्यावरच लाच घेण्याचा आरोप ठेवून त्याची बदली करण्यात आलेली असते. भोज मध्ये ही बदली झालेली असते आणि तिथे गरिबांचा मसीहा दादाभाई (रितेश देशमुख) याचं राज्य असतं. खरं तर दादाभाई हा गरिबांसाठी एक फाऊंडेशन चालवत असतो. गोरगरिबांना ,अडलेल्या प्रत्येकाला तो मदत करत असतो. जनतेसाठी अमाप पैसा खर्च करत असतो. आणि म्हणूनच अमेय पटनायक याला दादाभाईचा संशय येतो. आणि मग अर्थातच तो त्याच्या घरी रेड टाकण्यासाठी जातो, परंतु ट्विस्ट असा येतो की दादाभाई प्रत्येक कारवाई वेळी पटनायक ला सहकार्य करतो. आणि पटनायकच्या हाती काहीच लागत नाही. आता दादाभाई खरंच चांगला असतो की नक्की काय आहे हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
चित्रपटात बरेच ट्विस्ट आणि टर्न्स आहेत. क्लायमॅक्स चांगला आहे. परंतु चित्रपटाचा पुर्वार्ध बघताना बरेच प्रसंग आधीच्या चित्रपटातील आहेत तसेच दाडवलेत त्यामुळे पुढे काय होणार हे कळतं. त्यात अजय देवगण आणि वाणी कपूर यांचा रोमान्स आणि गाणी दाखवण्यात बराच वेळ घालवला आहे. परंतु पुढे कथा सरकत जाते तेव्हा इंटरेस्ट येतो. रितेश देशमुख याने नेहमीप्रमाणे नकारात्मक भूमिका उत्तम साकारली आहे. अजय देवगण ठिक आहे. खूप भारी असं काही नाहीय. सौरभ शुक्ला यांना अजून काही प्रसंगांमध्ये बघायला मजा आली असती. चित्रपटाचं दिग्दर्शन चांगलं आहे परंतु आधीपेक्षा काहीतरी वेगळं यात बघायला आवडलं असतं. असो, चित्रपट एकदा बघायला हरकत नाही असा आहे. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.


२. द भूतनी (The Bhootnii)
२०२५. भयपट, विनोदी, ड्रामा. २ तास १० मिनिटे. [U/A १६+]
लेखकवंकुश अरोड़ा, सिद्धांत सचदेव
दिग्दर्शकसिद्धांत सचदेव
कलाकारसंजय दत्त, सनी सिंह, मौनी रॉय, पलक तिवारी, निक, आसिफ खान, हर्षवर्धन सिंह
निर्मातादीपक मुकुट, संजय दत्त
रिलीज तारीख१ मे २०२५
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.०⭐/ ५

द भूतनी” चित्रपट समीक्षा :-

१ मे रोजी प्रदर्शित झालेला “द भूतनी” हा चित्रपट म्हणजे हॉरर कॉमेडी च्या नावाखाली केलेला निव्वळ टाइमपास आहे. सिद्धांत सचदेव यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात संजय दत्त आणि मौनी रॉय हे दोघं मध्यवर्ती भूमिकेत आहेत. चित्रपटाची कथा अगदीच सुमार आहे.
वंकुश अरोड़ा आणि सिद्धांत सचदेव यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे. कथा दिल्ली युनिव्हर्सिटी
सेंट विसेंट कॉलेजमध्ये सुरू होते. या कॉलेजच्या परिसरात एक व्हर्जिन ट्री म्हणून झाड आहे, ज्या झाडाची व्हॅलेंटाईन डे दिवशी पूजा केली जाते. या दिवशी या झाडाकडे आपल्या मनातील जोडीदार मागितला की तो मिळतो असा समज असतो. आणि याचमुळे अख्खा चित्रपट तुम्हाला बघावा लागतो. कॉलेज मधील एक विद्यार्थी शांतनु (सनी सिंह) याला या झाडाची पूजा करायची असते परंतु चुकून तो बाजूच्या दुसऱ्याच झाडाची पूजा करतो आणि मग त्याच्या आयुष्यात भूतनी(मौनी रॉय) हीची एन्ट्री होते. आता भूतनीला शंतनू हवा असतो त्यामुळे ती त्याच्या मागे लागते. सगळ्यांना चित्रविचित्र अनुभव येऊ लागतात मग या भूतनीला पकडण्यासाठी घोस्ट हंटर असलेल्या पॅराफिजिसिस्ट डॉक्टर कृष्णा त्रिपाठी (संजय दत्त) याची एन्ट्री होते. आता तो भूतनीला पळवून लावतो की अजून काही घडतं हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
कथा, अभिनय, लॉजिक, दिग्दर्शन या सगळ्याचाच अभाव असलेल्या या चित्रपटात फार फार तर काही विनोदी प्रसंग बघायला मिळतात. त्यात पण एकटे असाल होण्याऐवजी राग जास्त येईल. मौनी रॉय ही नगिन रोल मधून अजून बाहेर पडलेली नाही. एकंदरीत फसलेला चित्रपट आहे. त्यामुळे हा चित्रपट नाही बघीतला तरी चालेल. माझ्याकडून या चित्रपटाला एक स्टार.


३. कोस्टाओ (Costao)
२०२५. जीवनचरित्र, ड्रामा. २ तास ४ मिनिटे. [U/A १६+]
लेखक भावेश मंडालिया, मेघा श्रीवास्तव
दिग्दर्शकसेजल शाह
कलाकारनवाजुद्दीन सिद्दीकी, प्रिया बापट, किशोर कुमार जी, हुसैन दलाल, माहिका शर्मा
निर्माताविनोद भानुशाली, कमलेश भानुशाली, भावेश मंडालिया, सेजल शाह, श्याम सुन्दर, फैजुद्दीन सिद्दिकी
रिलीज तारीख१ मे २०२५
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.४⭐/ ५

कोस्टाओ” चित्रपट समीक्षा :-

सेजल शाह दिग्दर्शित कोस्टाओ हा चित्रपट झी फाईव्ह वर प्रदर्शित झाला असून नवाजुद्दीन सिद्दिकी, किशोर कुमार आणि प्रिया बापट यात मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट १९९० च्या दशकातील गोव्यातील कस्टम अधिकारी कोस्टाओ फर्नांडिस यांच्या आयुष्यात घडलेल्या सत्य घटनांवर आधारित आहे. कोस्टाओ यांनी सोन्याची तस्करी रोखण्यासाठी स्वतःचं सर्वस्व पणाला लावलं त्याचीच ही गोष्ट.
चित्रपटाची कथा सत्य घटनेवर आधारित आहे. कोस्टाओ फर्नांडिस हा ९०च्या दशकातील एक अत्यंत प्रामाणिक कस्टम अधिकारी असतो. आणि नव्वदच्या दशकात गोल्ड स्मगलिंगचं म्हणजेच सोन्याची तस्करी आणि समुद्रमार्गे त्याची आयात हे प्रमाण जास्त होतं. हीच तस्करी रोखण्यासाठी कोस्टाओ नेहमी दक्ष असायचा परंतु काही कारणास्तव तो रेड टाकणार ही बातमी आधीच पोहचायची आणि त्याच्या हाती काहीच लागत नव्हतं. आणि एकदा त्याच्या खबरीकडून १५०० किलो सोनं येणार अशी खबर मिळते आणि यावेळी तो सावधगिरी म्हणून कागदोपत्री नोंद न करता रेड टाकतो परंतु या सगळ्यात त्याच्या हातून पीटर म्हणजे स्मगलर आणि राजकारणी असलेल्या डी’मेलोचा भाऊ याचा खून होतो. आणि कोस्टाओ यांच्याविरुद्ध पीटरच्या खुनाचा आरोपाखाली खटला सुरू होतो. आता कोस्टाओ यातून बाहेर पडतो का.? त्या १५०० किलो सोन्याच्या बिस्कीटांचं‌ पुढे काय होतं हे बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल.
चित्रपटाची कथा सत्य घटनेवर आधारित आहे त्यामुळे फार मसाला वगैरे काही बघायला मिळत नाही. चित्रपट अजून रंजक बनवता आला असता परंतु सेजल शाह यांनी एकाच वेळी बऱ्याच गोष्टी दाखविण्याच्या नादात काही गोष्टी राहून गेल्या किंवा ज्या दाखवल्या त्या तेवढ्या प्रभावी वाटत नाहीत. कथा अगदीच साधी सरळ न मांडता थोडी रंजक वळण घेत, ट्विस्ट आणि टर्न्स दाखवत पुढे गेली असती तर शेवटपर्यंत उत्कंठा वाढली असती. नवाजुद्दीन याने नेहमीप्रमाणे अभिनय उत्तम केला आहे. प्रिया बापट हीने देखील उत्तम साथ दिली आहे. एकंदरीत एकदा बघायला हवा असा हा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.


४. द नेटवर्कर (The Networker)
२०२५. विनोदी, ड्रामा. २ तास. [U/A १३+]
लेखक विकास मलिक
दिग्दर्शकविकास विश्वकर्मा
कलाकारविक्रम कोचर, दुर्गेश कुमार,ऋषभ पाठक, दुर्गेश कुमार,इश्तियाक ख़ान
निर्माताविकाश मलिक, शरद मलिक
रिलीज तारीख९ मे २०२५
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.०⭐/ ५

द नेटवर्कर ” चित्रपट समीक्षा :-

९ मे रोजी प्रदर्शित झालेला “द नेटवर्कर” हा चित्रपट “एमएलएम” म्हणजेच “मल्टी लेव्हल मार्केटिंग” मधून लोकांना कसं फसवलं जातं यावर आधारित आहे. विकास विश्वकर्मा यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट खरं तर कोणाला माहीत असण्याचा प्रश्नच येत नाही कारण ना या चित्रपटाचं प्रमोशन झालं ना कुठे शोज लागले. मोजके शोज लागले ते कधी आणि कुठे हे कोणालाच माहीत नाही. असो, तसंही विषय कितीही चांगला असला तरी चित्रपट पूर्णपणे फसलेला आहे.
चित्रपटाची कथा आदित्य (विक्रम कोचर) याच्याभोवती फिरणारी आहे. आदित्य हा नेहमीच मल्टिलेव्हल मार्केटिंग करून पैसे कमवत असतो आणि नेहमी फसत असतो. असंच एकदा कंगाल झाल्यावर पुन्हा एकदा तो आणि त्याचा मित्र राघव (ऋषभ पाठक)हे दोघं मिळून एक कंपनी सुरू करतात. त्यात ते लल्लन (दुर्गेश कुमार) याला देखील सामिल करून घेतात. परंतु काही कारणास्तव त्यांची ही कंपनी देखील बंद पडते
मग ते परत दुसरीकडून पैसे घेऊन वेगळी कंपनी सुरू करतात. अर्थातच या सगळ्या मल्टिलेव्हल मार्केटिंग करून पैसे कमवणाऱ्या कंपन्या असतात. आणि या कंपन्यांना भविष्य कधीच नसतं. हेच या चित्रपटाच्या निमित्ताने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आदित्य आणि त्याचा मित्र प्रत्येक वेळी नवीन उद्योग करतात आणि प्रत्येक वेळी फसतात. त्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत जातो. शेवटी काय होतं हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल. परंतु चित्रपट बघून वेळ आणि मूड घालवण्यापेक्षा तो न बघीतलेलाच बरा.
चित्रपटाचा विषय नक्कीच चांगला आहे. मल्टिलेवल मार्केटिंग मुळे बऱ्याच जणांचं आयुष्य उध्वस्त झालेलं आहे. परंतु हा इतका महत्त्वाचा आणि गंभीर विषय ज्या पद्धतीने मांडला ते अगदीच सुमार आहे. कथा, दिग्दर्शन कशातच दम नाही. काही कलाकारांमुळे काही विनोदी प्रसंग बघण्यासारखे आहेत परंतु तेवढ्यासाठी चित्रपट बघणं गरजेचं नाही. माझ्याकडून या चित्रपटाला एक स्टार.


५. रोमीओ एस३ (Romeo S3)
२०२५. ॲक्शन, थ्रिलर. २ तास २७ मिनिटे. [U/A]
लेखक शैलेश वर्मा
दिग्दर्शकगुड्डू धनोआ
कलाकारठाकुर अनूप सिंह, पलक तिवारी, अमन धालीवाल, सचिन खेडेकर, शिवानी जाधव, जाकिर हुसैन , अनंत जोग, राजेश खट्टर
निर्माताजयंतीलाल गडा
रिलीज तारीख१६ मे २०२५
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.०⭐/ ५

रोमीओ एस३” चित्रपट समीक्षा :-

गुड्डू धनोआ दिग्दर्शित रोमीओ एस ३ हा एक ॲक्शनपट असून ठाकूर अनूप सिंह या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. एक ड्रग्सचं साम्राज्य उध्वस्त करणाऱ्या धडाकेबाज पोलिस अधिकाऱ्याची ही कथा आहे.
चित्रपटाची कथा डीसीपी संग्राम सिंह शेखावत (ठाकुर अनूप सिंह) याच्या भोवती फिरते. डीसीपी संग्रामसिंह शेखावत हा अंडरकव्हर राहून काम करत असतो कारण त्याला गोव्यातील एक मोठं ड्रग कार्टेल उध्वस्त करून त्या टोळीच्या म्होरक्या ला पकडायचं असतं. ही कामगिरी करत असतानाच आपल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या खूनाचे धागेदोरे त्याच्या हाती लागतात. आणि या सगळ्याच्या मुळाशी ड्रग माफिया जयंत मखीजा ( अमन धालीवाल ) हाच आहे हे समजत. त्यानंतर संग्राम सिंह काय करतो हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल. खरं तर मे महिन्यात प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये एकापेक्षा एक सुमार चित्रपट कोणता अशी स्पर्धा असावी असं हा चित्रपट बघीतल्यावर वाटतं.
मुख्य भूमिकेतील ठाकुर अनूप सिंह याला अभिनय फारसा काही जमलेला नाही. पत्रकार म्हणून पलक तिवारी हीने देखील अभिनय शिकण्याची गरज आहे. कथा, पटकथा ,दिग्दर्शन सगळंच फसलेलं आहे. ओटीटीवर आल्यावर देखील बघून वेळ वाया घालवू नये असा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला एक स्टार.


६. भूल चूक माफ (Bhool Chuk Maaf)
२०२५. विनोदी, रोमँटिक. २ तास २० मिनिटे. [U/A १३+]
लेखक करण शर्मा
दिग्दर्शककरण शर्मा
कलाकारराजकुमार राव, वामिका गब्बी, सीमा पाहवा, संजय मिश्रा, जाकिर हुसैन, रघुवीर यादव, इश्तियाक खान, विनीत कुमार
निर्मातादिनेश विजन
रिलीज तारीख२३ मे २०२५
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.५⭐/ ५

भूल चूक माफ” चित्रपट समीक्षा :-

राजकुमार राव म्हटलं की आपोआपच आपल्या अपेक्षा वाढतात, कारण त्याचा सहजसुंदर नैसर्गिक अभिनय. परंतु चित्रपटाचा विषय आणि कथा यात काही विशेष नसेल तर कितीही गुणी आणि मोठा कलाकार असला तरीही चित्रपट चालत नाही. असंच झालंय भूल चूक माफ या चित्रपटाच्या बाबतीत. हा चित्रपट म्हणावं असं मनोरंजन करण्यात कमी पडतो.
चित्रपटाची कथा बनारस मधील रंजन आणि तितली यांची आहे. दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे. रंजन हा नुसताच बसून खाणारा, काहीच कामधंदा न करणारा एक सुशिक्षित बेरोजगार आहे. त्यामुळे तितलीचे वडील एक अट ठेवतात की दोन महीन्यात रंजनला सरकारी नोकरी मिळाली तर ते दोघांचं लग्न लावून देतील. इकडून तिकडून जुगाड करून रंजन नोकरी मिळवतो देखील परंतु ट्विस्ट असा येतो की ज्या दिवशी दोघांचं लग्न असतं तो दिवसच उजाडत नाही. म्हणजे आदल्या दिवशी हळद लावून उद्या लग्न लागणार हे स्वप्न बघत रंजन झोपतो परंतु पुन्हा तोच कालचा दिवस उजाडतो. म्हणजे पुन्हा हळद लावून तो झोपतो परंतु परत तेच. तो या चक्रव्यूहात का आणि कसा अडकतो.? त्यातून तो बाहेर पडतो का हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
करण शर्मा यांनी लिहिलेल्या या कथेत काहीच नाविन्य नाही की वाह म्हणावं असं काही नाही. दिग्दर्शन सुद्धा ठिकठाक आहे. समाजातील चालीरीती परंपरा यामुळे एखाद्याच्या आयुष्यात काय घडू शकतं हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. बनारस मधील काही लोकेशन्स सुंदररित्या दाखवले आहेत. सिनेमॅटोग्राफी छान आहे. संगीत बरं आहे. अभिनय म्हणाल तर सगळ्यांचा ठिकठाक आहे. राजकुमार राव आहे म्हणून चित्रपट बघावा असं वाटत असेल तर एकदा बघायला हरकत नाही. परंतु विनोदी असला तरी चित्रपट मनोरंजन करण्यात कमी पडतो. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार.


७. कपकापी (Kapkapiii)
२०२५. विनोदी, भयपट. २ तास २० मिनिटे. [U/A १३+]
लेखक कुमार प्रियदर्शी, सौरभ आनंद
दिग्दर्शकसंगीत सिवन
कलाकारतुषार कपूर, श्रेयस तळपदे, सिद्धि इदनानी
निर्माताजयेश पटेल
रिलीज तारीख२३ मे २०२५
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.५⭐/ ५

कपकापी” चित्रपट समीक्षा :-

२३ मे रोजी प्रदर्शित झालेला कपकापी हा मल्याळम चित्रपट ‘रोमांचम’ याचा हिंदी रिमेक आहे. कॅरम बोर्ड सारख्या दिसणाऱ्या एका बोर्डवर खेळल्यानंतर एक आत्मा येतो आणि त्यानंतर काय घडतं हे या चित्रपटात पहायला मिळतं.
चित्रपटाची कथा मुळ चित्रपट रोमांचम सारखीच आहे. यात सुद्धा मनु (श्रेयस तळपदे) आणि त्याचे मित्र अच्युत (दिनकर शर्मा), नानकू (जय ठक्कर), निरूप (वरुण पांडे) हे सगळे एका खोलीत राहत असतात. सगळेच उनाड आणि नुसतिच टाईमपास करत दिवस ढकलत असतात. एके दिवशी त्यांना त्यांच्या खोलीत एक ओईजा बोर्ड सापडतो आणि ते त्या बोर्ड वर खेळायला बसतात. या खेळाद्वारे मृत आत्म्यांना बोलवलं जातं. अर्थातच त्यांच्या या खेळामुळे तिथे अनामिका नावाच्या मुलीचा आत्मा खरोखरच येतो. गोष्टी हाताबाहेर जातात तेव्हा त्या कंट्रोलमध्ये आणण्यासाठी तुषार कपूरची एन्ट्री होते. आता त्यानंतर मात्र काय घडतं हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
मुळ मल्याळम चित्रपट ‘रोमांचम’ बघीतला असेल तर या चित्रपटात बऱ्याच त्रुटी जाणवतील. तसंही नसेल बघीतला तरी हा चित्रपट फारसा काही जमलेला नाही. हॉरर कॉमेडी च्या नावाखाली आता तेच तेच बघून प्रेक्षक सुद्धा कंटाळले आहेत.या चित्रपटात हॉररची कमी आहे, काही विनोदी प्रसंग आहेत ज्यामुळे नक्कीच हसायला येतं. परंतु एकंदरीत चित्रपट तेवढा प्रभावी नाही. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार.


८. पुणे हायवे (Pune Highway)
२०२५. गुन्हेगारी, थ्रिलर, ड्रामा. २ तास ७ मिनिटे. [A]
लेखक बग्स भार्गव कृष्ण, राहुल दा कुन्हा
दिग्दर्शकबग्स भार्गव कृष्ण, राहुल दा कुन्हा
कलाकारअमित साध , जिम सर्भ , अनुवब पाल , मंजरी फडनीस , केतकी नारायण, सुदीप मोदक
निर्माताराहुल दा कुन्हा, सीमा महापात्र
रिलीज तारीख२३ मे २०२५
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.५⭐/ ५

पुणे हायवे” चित्रपट समीक्षा :-

पुणे हायवे हा चित्रपट राहुल दाकुन्हा यांच्या याच नावाच्या नाटकावर आधारित आहे. हा एक सस्पेन्स थ्रिलर चित्रपट असून यात एक मर्डर मिस्ट्री आहे. बग्स भार्गव कृष्ण आणि राहुल दा कुन्हा यांनी या चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन केलेलं आहे.
चित्रपटाची कथा पाच मित्रांभोवती फिरते. खंडू (अमित साध), विष्णू (जिम सर्भ), निकी (अनुभव पाल), नताशा (मंजरी फडणीस) आणि बाबू (हिमांशू बालपांडे) हे सगळे बालपणीपासुनचे चांगले मित्र असतात. नताशा ही खंडूची बहीण असते. यांच्यातील नाततं खूप घट्ट असतं तरीही एकदा एका राजकीय नेत्याकडून मानसेकर अडून मारहाण होते तेव्हा मात्र बाकीचे सगळे फक्त बघत बसतात. काहीच करत नाही. त्यानंतर यांच्या मैत्री मध्ये थोडा दुरावा येतो परंतु मैत्री कायम राहते. परंतु चित्रपटात ट्विस्ट येतो जेव्हा त्या मानसेकरच्या मुलीचा मृतदेह सापडतो.आता तिला कोणी मारवेलं असतं.? त्यात या पाच जणांचा काही हात असतो का.? हे त्यात कसे अडकतात.? हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
सस्पेन्स थ्रिलर असला तरीही चित्रपटाची कथेत बऱ्याच ठिकाणी विसंगती आढळते. शेवटपर्यंत खिळवून ठेवण्यात कथा पटकथा अयशस्वी ठरते कारण दिग्दर्शन म्हणावं तसं प्रभावी वाटत नाही. काही ठिकाणी उगीच गोंधळ वाढवलेला आहे. ट्विस्ट आहेत परंतु ते बघीतल्यावर आश्चर्य वाटत नाही. कलाकारांनी अभिनय चांगला केला आहे. परंतु एकंदरीतच फसलेला चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार.


९. केसरी वीर (Kesari Veer)
२०२५. ॲक्शन, ड्रामा, हिस्टोरिकल. २ तास ४१ मिनिटे. [U/A १६+]
लेखक क्षितिज श्रीवास्तव, कानू चौहान
दिग्दर्शकप्रिंस धीमान
कलाकारसूरज पंचोली, आकांक्षा शर्मा, सुनील शेट्टी, अरुणा ईरानी, विवेक ओबेरॉय
निर्माताकानू चौहान
रिलीज तारीख२३ मे २०२५
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.५⭐/ ५

केसरी वीर” चित्रपट समीक्षा :-

केसरी वीर हा चित्रपट एका खऱ्याखुऱ्या शुरवीर योद्धावर आधारित आहे. मुघलांच्या राजवटीत मुघल सुभेदार जफर खान हा गुजरात मधील हिंदू देवतांची मंदिरे उध्वस्त करत होता तेव्हा त्याला सामोरं जाणाऱ्या शूरवीर योद्धा हमीरजी गोहिल यांची शौर्यगाथा सांगणारा हा चित्रपट आहे. एक सत्य ऐतिहासिक लढाई, भव्यदिव्य मांडणी, व्हिएफएक्स इफेक्ट्स, लढाईचे सीन्स इतकं सगळं असुनही चित्रपट म्हणावा तसा प्रभावी झाला नाही.
चित्रपटाची कथा अर्थातच मुघल साम्राज्य होतं तेव्हाची आहे. मुघलांचे हिंदूवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढत होतेच परंतु त्यांनी हिंदू मंदिरं सुद्धा सोडली नव्हती. तत्कालीन मुघल सुभेदार जफर खान(विवेक ओबेरॉय) जेव्हा सोमनाथ मंदिर उध्वस्त करण्याच्या मनसुब्याने आला तेव्हा हमीरजी गोहिल(सुरज पांचोली) आणि वेगड़ा भील (सुनील शेट्टी) यांनी त्याच्या विरोधात जो लढा दिला तो या चित्रपटात पहायला मिळतो. हमीरजी गोहिल आणि वेगड़ा भील यांना आजही गुजरात मध्ये देवासमान मानलं जातं.
चित्रपटाची कथा पटकथा अजून प्रभावीपणे मांडता आली असती. सुरज पांचोली हमीरजी म्हणून सक्षम वाटत नाही. सुनील शेट्टीने सुपर कमबॅक केला आहे. ऐतिहासिक सत्यकथा असल्यामुळे चित्रपटाची मांडणी ज्या पद्धतीने असायला हवी होती तशी दाखवण्यात दिग्दर्शक प्रिंस धीमान नक्कीच कमी पडले. चित्रपटात बऱ्याच तांत्रिक त्रुटी जाणवतात. बऱ्याच ठिकाणी छावा आणि बाहुबली ची कॉपी केलीय असं जाणवतं. परंतु इतिहासातील एक महत्त्वाचं पान माहिती करून घेण्यासाठी एकदा बघायला हरकत नाही असा हा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार.


१०. चिड़िया (Chidiya)
२०२५. ड्रामा. १ तास ५५ मिनिटे. [U]
लेखक मेहरान अमरोही, अमिताभ वर्मा, गणेश पंडित
दिग्दर्शकमेहरान अमरोही
कलाकारस्वर कांबळे, आयुष पाठक, विनय पथक, अमृता सुभाष
निर्माताफाखरून हुसैनी, सुधीर कोळते, विनीत, आरिफ, इफ्तेकार अमरोही, मेहरान अमरोही, पियुष दुगड,
रिलीज तारीख३० मे २०२५
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.०⭐/ ५

चिड़िया” चित्रपट समीक्षा :-

“चिड़िया” हा एक लहान मुलांचं भावविश्व उलगडून दाखवणारा संवेदनशील चित्रपट आहे. मेहरान अमरोही यांनी चाळीत राहणाऱ्या कुटुंबांची सद्य परिस्थितीवर भाष्य करत त्यांच्या अनेक समस्या या चित्रपटाच्या निमित्ताने मांडल्या आहेत. मेहरान अमरोही यांनी एक साधी सरळ भावूक करणारी लहान मुलांचं भावविश्व उलगडून दाखवणारी कथा लिहिली असून दिग्दर्शन देखील केलेलं आहे.
मुंबईतील एका चाळीत राहणाऱ्या दोन भावंडांची ही गोष्ट आहे. शानू (स्वर कांबले)आणि बुआ(आयुष पाठक)ही दोन मुलं वडीलांच्या अचानक मृत्यू नंतर आपल्या आईसोबत राहत असतात. त्यांची आई वैष्णवी(अमृता सुभाष) ही बायकांना साडीफॉल वगैरे करून देऊन रोजचं दोन वेळचं जेवण कसं भागेल हे बघत असते. परंतु तिच्या डोक्यावर नवऱ्याने घेतलेलं कर्ज फेडण्याची जबाबदारी असते. परिस्थिती अत्यंत हलाखीची असते. आणि या अशा परिस्थितीत शानू आणि बुआचं शिक्षण करणं शक्य नसतं त्यामुळे त्यांना शाळेतून काढलं जातं. खरं तर या दोघांना या कशाचीच कल्पना नसते. ती दोघं आपल्या वेगळ्याच विश्वात असतात. त्यांना बॅडमिंटन खेळण्याचं खूप वेड असतं. त्यासाठी ते इकडून तिकडून कपड्याने शिवलेलं बॅडमिंटन रॅकेट, चिड़िया म्हणजेच बॅडमिंटनचं फुल हे सगळं मिळवतात. एक जागा साफ करून ग्राऊंड बनवतात परंतु काही ना कारणास्तव त्यांना खेळायला मिळत नाही. परंतु शेवटी त्यांचा काका बाली (विनय पाठक) मुळे त्यांच्या आयुष्यात आनंदाचा तो क्षण येतो. काका हा एक फिल्म इंडस्ट्रीत स्पॉट बॉय म्हणून काम करत असतो. आता त्याच्यामुळे मुलांना कसं खेळायला मिळतं हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल.
चिड़िया हा चित्रपट बऱ्याच महत्त्वाच्या विषयावर भाष्य करतो. बालमजुरी, शिक्षणाचा अभाव, कुपोषण अशा कितीतरी समस्या लहान मुलांचं भविष्य धोक्यात आणत असतात. मेहरान यांनी या सगळ्याच मुद्द्यांना अलगदपणे हाताळलं आहे. दोन्ही लहान मुलांचा अभिनय उत्तम आहे. अमृता सुभाष, विनय पाठक या दोघांनीही सहज सुंदर नैसर्गिक अभिनय करून कथेला न्याय दिला आहे. एकदा बघायला हवा असा हा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.


११. इंटरोगेशन (Interrogation)
२०२५. थ्रिलर, गुन्हेगारी. १ तास २७ मिनिटे. [U/A १६+]
लेखक सानिल कोकटे, हर्ष शाह, अजोय वर्मा राजा
दिग्दर्शकअजोय वर्मा राजा
कलाकारमनु सिंह, दर्शन ज़रीवाला, अभिमन्यु सिंह, यशपाल शर्मा, राजपाल यादव, गिरीश कुलकर्णी, ऋतुजा शिंदे, कुंवर प्रागी आर्य
निर्माताकुंवर प्रागी आर्य, इंदरवीर, पियूष दिनेश गुप्ता
रिलीज तारीख३० मे २०२५
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.९⭐/ ५

इंटरोगेशन” चित्रपट समीक्षा :-

आजकाल चित्रपटगृहात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांपेक्षा ओटीटीवर प्रदर्शित होणारे चित्रपट अधिक चांगले असतात असं म्हणावं लागेल. असाच एक चित्रपट म्हणजे झी फाईव्ह वर प्रदर्शित झालेला “इंटरोगेशन”. नावाप्रमाणेच चित्रपटात एका खुनाचा तपास आणि संशयितांची सखोल चौकशी अशा प्लॉटवर हा चित्रपट आधारित आहे. अजोय वर्मा राजा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं असून हा एक सस्पेन्स क्राईम चित्रपट आहे.
एका सेवानिवृत्त न्यायाधीश यांची हत्या होते. आणि त्यांना त्या दिवशी भेटलेल्या चार जवळच्या लोकांवर खूनाचा संशय जातो. पण चक्रावून टाकणारी गोष्ट अशी असते की चारही जण खुन मीच केला असं सांगतात. आता त्यांच्यापैकी नक्की खुन कोणी केला आहे आणि का हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल. संपूर्ण चित्रपटात इंटरोगेशन म्हणजेच गुन्ह्याची सखोल चौकशी कशी केली जाते, कोणकोणते ट्विस्ट आणि टर्न्स समोर येतात हे बघायला मिळतं. अजोय वर्मा राजा यांनी दिग्दर्शन उत्तम केलेलं आहे. शेवटपर्यंत खिळवून ठेवण्यात चित्रपट यशस्वी ठरतो. सगळ्याच कलाकारांनी अभिनय उत्कृष्ट केलेला आहे. संगीत चांगलं नसलं तरी त्याने फार काही पडत नाही. जरूर बघावा असा हा चित्रपट आहे. झी फाईव्ह वर हा चित्रपट तुम्ही बघू शकता.

    तर मंडळी वरीलपैकी तुम्ही कोणते चित्रपट पाहीलेत आणि त्यापैकी तुम्हाला कोणता आवडला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसंच या वीकेंडला तुम्ही कोणता चित्रपट बघताय हे सुद्धा सांगा. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *