या गणेशोत्सवात बघायला विसरू नका श्री गणेशाची लीला आणि महिमा सांगणारे हे काही खास चित्रपट.!
या गणेशोत्सवात बघायला विसरू नका श्री गणेशाची लीला आणि महिमा सांगणारे हे काही खास चित्रपट.!
Written by : आकांक्षा कोलते
Updated : सप्टेंबर 19, 2023 | 6:27 PM
अख्ख्या महाराष्ट्राचं लाडकं दैवत म्हणजेच आपल्या बाप्पाच्या आगमनासाठी आता अवघे दोन दिवस उरले आहेत. आता अनुभवता येणार ते फक्त आणि फक्त चैतन्यमय असं भारलेलं वातावरण. चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेला हा आपला बाप्पा येणार म्हटल्यावर खरं तर आधीचे आठ दिवस सुद्धा मंतरलेले असतात. एक वेगळाच जल्लोष, टाळाच्या ठोक्यात म्हटल्या जाणाऱ्या आरत्या, ढोल ताशांचा गजर याचसोबत ऐकू येणार ती आपल्या बाप्पाची गाणी आणि टेलिव्हिजन वर बऱ्याच वाहिन्यांवर दाखवले जाणार बाप्पाचा महीमा सांगणारे चित्रपट.
मराठी असो वा हिंदी, बऱ्याच चित्रपटांमध्ये एक तरी महत्त्वाचा सीन किंवा गाणं हे खास बाप्पावर चित्रित केलेलं असतं. आज आपण असेच काही चित्रपट बघणार आहोत ज्या चित्रपटांमध्ये गणपती बाप्पाचा महीमा वर्णन केला गेलाय किंवा असे खास बाप्पावर चित्रित करण्यात आलेले खास सीन्स आहेत.
१. चित्रपट : अष्टविनायक (१९७९) |
लेखक | मनोराम |
दिग्दर्शक | राजदत्त |
कलाकार | सचिन, वंदना पंडित, चंद्रकांत, पद्मा चव्हाण, राजा गोसावी, शरद तळवलकर, डॉ. वसंतराव देशपांडे, रमेश भाटकर, शमा गोसावी आणि इतर. |
निर्माता | शरद पिळगांवकर |
प्रदर्शित तारीख | ९ फेब्रुवारी १९७९ |
भाषा | मराठी |
“अष्टविनायक” चित्रपट समीक्षा :-
या चित्रपटाबद्दल काय बोलावं.? अभिनय, दिग्दर्शन संगीत अशा सगळ्याच बाबतीत अतिशय सुंदर आणि परिपूर्ण असा हा चित्रपट आहे. एका कारखानदाराचा एकुलता एक मुलगा परदेशातून शिकून आल्यावर आपल्या शिक्षणाचा उपयोग करत मिल मध्ये बदल करतो. याचसाठी नास्तिक असलेला हा बाळासाहेब इनामदार म्हणजेच सचिन हा वर्षानुवर्षे मिलमध्ये साजरा होत असलेला गणेशोत्सव बंद करतो. गणेशम़दीराचं मुळ स्थान हलवतो. आणि अर्थातच याचे परिणाम दिसायला लागतात. मिलमध्ये नुकसान होण़, वडिलांच़ निधन, पत्नीचा गर्भपात, पत्नीसोबत वैचारिक मतभेद या सगळ्या गोष्टी ह़तात. तेव्हाच त्याची पत्नी वीणा जीची बाप्पावर अफाट श्रद्धा आहे ती नवस पूर्ण करण्यासाठी नवऱ्याला घेऊन अष्टविनायकाची यात्रा करायला आजारी अवस्थेत बाहेर पडते. या सगळ्याची महती सांगणारा हा चित्रपट आहे. हा चित्रपट इचलकरंजी मध्ये घडलेल्या एका सत्य घटनेवर आधारित आहे.
या चित्रपटातील जगदीश खेबुडकर यांच्या लेखणीतून अवतरलेल्या अष्टविनायका तु़झा महीमा कसा या गाण्याने इतिहास रचला होता . अजुनही हे गाणं तेवढंच लोकप्रिय आहे. अष्टविनायकाचा महिमा आणि त्यांचं दर्शन हे गाणं नुसतं बघून आणि ऐकून आपल्याला मिळतं. मोरेगावचा मोरेश्वर, थेऊरचा चिंतामणी, सिद्धटेक चा सिद्धिविनायक , रांजणगावचा महागणपती, ओझरचा विघ्नेश्वर, लेण्याद्री चा गिरिजात्मक , महड गावचा वरदविनायक आणि पालीचा बल्लाळेश्वर या अष्टविनायकांची महती आणि माहीती या गाण्यातून आपल्याला मिळते.
२. मोरया (२०११) |
लेखक | सचिन दरेकर |
दिग्दर्शक | अवधूत गुप्ते |
कलाकार | संतोष जुवेकर, चिन्मय मांडलेकर, परी तेलंग, स्पृहा जोशी, दिलीप प्रभावळकर, पुष्कर श्रोत्री |
निर्माता | अवधूत गुप्ते, अतुल कांबळे |
प्रदर्शित तारीख | १९ ऑगस्ट २०११ |
भाषा | मराठी |
“मोरया” चित्रपट समीक्षा :-
संतोष जुवेकर आणि चिन्मय मांडलेकर यांच्या प्रमुख भूमिका असलेला मोरया हा चित्रपट १९ ऑगस्ट २०११ साली प्रदर्शित झाला होता.
सध्या देव धर्माच्या नावाखाली राजकारणी नेत्यांनी जे काही गलिच्छ राजकारण सुरू केले आहे त्या धर्तीवर आधारित हा चित्रपट आहे. मुंबईतील दोन चाळीतील गणेशोत्सव मंडळांमध्ये चाललेली चढाओढ, त्यातून निर्माण झालेली स्पर्धा, द्वेष, एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी केले जाणारे प्रयत्न आणि या सगळ्याचा वापर आपल्या राजकीय फायद्यासाठी करून घेणारे राजकारणी आणि त्यातून कसं सगळं उध्वस्त होऊ शकतं हे दाखवणारा हा चित्रपट आहे.
या चित्रपटातील ज्ञानेश्वर मेश्राम यांनी गायलेलं मोरया हे गाणं आजही प्रत्येक गणेशोत्सवात लावलं जातं. हा चित्रपट तुम्ही सोनी लिव्ह किंवा ॲमेझॉन प्राईम वर पाहू शकता.
३. वक्रतुंड महाकाय (२०१५) |
लेखक | योगेश विनायक जोशी |
दिग्दर्शक | पुनर्वसू नाईक |
कलाकार | विजय मौर्य, नमन जैन, शशांक शेंडे, रिशी देशपांडे, जयंत सावरकर, उषा नाडकर्णी. |
निर्माता | अनुराग कश्यप, गुनीत मोंगा, अंशुमन जैन, बोहरा ब्रोस. |
प्रदर्शित तारीख | १५ सप्टेंबर २०१५ |
भाषा | मराठी |
“वक्रतुंड महाकाय” चित्रपट समीक्षा :-
पुनर्वसू नाईक यांनी दिग्दर्शित केलेला वक्रतुंड महाकाय हा चित्रपट साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात दहशतवादी हल्ला करण्यासाठी बॉम्बस्फोट घडवून आणण्याची योजना आहे. यासाठी एका गणपतीच्या बाहुला घेऊन त्यात जिवंत बॉम्ब ठेवला आहे. तो बाहुला एका मंदिरात ठेवून ती व्यक्ती रिमोट घेऊन बाहेर उभी असते परंतु एक छोटा मुलगा तो बाहुला आकर्षक वाटल्यामुळे घेऊन पळतो. हिच चित्रपटाची कथा आहे.
पुढे तो बाहुला कुठे कुठे जातो.? रिमोट चं बटन दाबलं जातं का.? बाप्पाची कृपा हे सगळं बचणं उत्कंठावर्धक आहे. नेटफ्लिक्स वर हा चित्रपट तुम्ही बघू शकता.
४. व्हेंटिलेटर |
लेखक | राजेश मापुस्कर |
दिग्दर्शक | राजेश मापुस्कर |
कलाकार | आशुतोष गोवारीकर, सुलभा आर्या, जितेंद्र जोशी, सुकन्या कुलकर्णी, विजू खोटे |
निर्माता | प्रियंका चोप्रा, मधू चोप्रा |
प्रदर्शित तारीख | ४ नोव्हेंबर २०१६ |
भाषा | मराठी |
“व्हेंटिलेटर” चित्रपट समीक्षा :-
व्हेंटिलेटर हा चित्रपट खरं तर नातेसंबंधावर भाष्य करणारा चित्रपट आहे. परंतु या चित्रपटात सगळ्यात महत्वाचा सीन हा आपल्या बाप्पावर चित्रित करण्यात आला आहे. घरातील जेष्ठ व्यक्ती गजू काका आजारी असतात आणि जेव्हा ते व्हेंटिलेटर वर असतात तेव्हा त्यांच्यासाठी घरातील सगळेजण गजाननाला प्रार्थना करत असतात. नेमकं गणेश चतुर्थीच्या आधी हे सगळं घडतंय असं दाखवण्यात आलं आहे.
२०१६ साली प्रदर्शित झालेल्या “व्हेंटिलेटर” या चित्रपटातील रोहन – रोहन यांनी संगीतबद्ध केलेलं या रे या..सारे या…गजाननाला आळवूया…हे गाणं खूप गाजलं होतं. रोहन प्रधान यांनी हे गाणं गायलं आहे. हा चित्रपट तुम्ही झी फाईव्ह आणि ॲमेझॉन प्राईम वर पाहू शकता.
५. लोकमान्य एक युगपुरुष |
लेखक | ओम राऊत, कौस्तुब सावरकर |
दिग्दर्शक | ओम राऊत |
कलाकार | सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर, प्रिया बापट |
निर्माता | नीना राऊत |
प्रदर्शित तारीख | २ जानेवारी २०१५ |
भाषा | मराठी |
“लोकमान्य एक युगपुरुष” चित्रपट समीक्षा :-
स्वातंत्र्य चळवळीला चालना देण्यासाठी पर्यायाने हिंदूंना एकत्र आणण्यासाठी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला प्रोत्साहन दिले आणि खऱ्या अर्थाने सार्वजनिक गणेशोत्सवाचे ते प्रणेते ठरले. याच टिळकांच्या आयुष्यावर आधारित असलेला “लोकमान्य – एक युगपुरुष” हा चित्रपट २०१५ साली प्रदर्शित झाला होता.
आज आपण संपूर्ण महाराष्ट्रात सर्व ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणारी असंख्य मंडळं बघतो परंतु या सगळ्याची सुरुवात कधी, कशी आणि का झाली हे माहीत करून घेण्यासाठी हा चित्रपट बघू शकता.
तर मंडळी तुम्हाला हा लेख कसा वाटला ते नक्की सांगा. आणि या गणेशोत्सवात कोणता चित्रपट बघणार ते कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, ‘जगभरून फिल्म्स’ तर्फे तुम्हाला गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!