HomeFilmsHindi

या गणेशोत्सवात बघायला विसरू नका श्री गणेशाची लीला आणि महिमा सांगणारे ॲनिमेशन हिंदी चित्रपट.!

या गणेशोत्सवात बघायला विसरू नका श्री गणेशाची लीला आणि महिमा सांगणारे ॲनिमेशन हिंदी चित्रपट.!

Written by : आकांक्षा कोलते

Updated : सप्टेंबर 19, 2023 | 10:59 PM

Ganesh festival animation hindi films reviews and information
   अख्ख्या महाराष्ट्राचं लाडकं दैवत म्हणजेच आपल्या बाप्पाच्या आगमनासाठी आता अवघे दोन दिवस उरले आहेत. आता अनुभवता येणार ते फक्त आणि फक्त चैतन्यमय असं भारलेलं वातावरण. चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेला हा आपला बाप्पा येणार म्हटल्यावर खरं तर आधीचे आठ दिवस सुद्धा मंतरलेले असतात. एक वेगळाच जल्लोष, टाळाच्या ठोक्यात म्हटल्या जाणाऱ्या आरत्या, ढोल ताशांचा गजर याचसोबत ऐकू येणार ती आपल्या बाप्पाची गाणी आणि टेलिव्हिजन वर बऱ्याच वाहिन्यांवर दाखवले जाणार बाप्पाचा महीमा सांगणारे चित्रपट.    
   मराठी असो वा हिंदी, बऱ्याच चित्रपटांमध्ये एक तरी महत्त्वाचा सीन किंवा गाणं हे खास बाप्पावर चित्रित केलेलं असतं. आज आपण असेच काही ॲनिमेशन चित्रपट बघणार आहोत ज्या चित्रपटांमध्ये गणपती बाप्पाचा महीमा वर्णन केला गेलाय किंवा असे खास बाप्पावर चित्रित करण्यात आलेले खास सीन्स आहेत. 
१. बालगणेश
२००७. ॲनिमेशन, साहसी. १ तास ४५ मिनिटे. [ यु ]
लेखक पंकज शर्मा
दिग्दर्शकपंकज शर्मा
कलाकारअशर शेख, आदर्श गौतम, नम्रता, जीतेद्र जैसवाल, जी प्रकाश सिंघ, रजनीका गांगुली, तारण, विवेक,
निर्मातास्मिता मारू, पंकज शर्मा
प्रदर्शित तारीख२६ ऑक्टोबर २००७
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.२⭐/ ५

बालगणेश” चित्रपट समीक्षा :-

२००७ साली प्रदर्शित झालेला बालगणेश हि एक ॲनिमेटेड म्युझिकल फिल्म आहे. या गणेशोत्सवात बच्चे कंपनीला हा चित्रपट नक्कीच दाखवू शकता.
भगवान शंकर यांनी क्रोधित होऊन गणपतीचं शिर कापून मग तिथं हत्तीचं मुंडकं का बसवलं.? गणपती बाप्पा त्यांचं वाहन उंदीर मामांच्या पाठीवर बसले असता पडले मग चंद्र हसला होता तेव्हा बाप्पाने काय शाप दिला.? किंवा मग कार्तिकेय आणि गणपती बाप्पांची पृथ्वी प्रदक्षिणा हि कथा असेल हे सगळं खूप छान ॲनिमेटेड कार्टून्सचा वापर करून दाखवण्यात आलं आहे. लहान मुलांना हा चित्रपट नक्कीच आवडेल. हा चित्रपट तुम्ही हॉटस्टार डिस्नी, प्राईम व्हिडिओ किंवा युट्यूबवर सुद्धा बघू शकता.


२. बालगणेश २
२००९. ॲनिमेशन, साहसी. १ तास १३ मिनिटे. [ यु ]
लेखक पंकज शर्मा
दिग्दर्शकपंकज शर्मा
कलाकारअशर शेख, प्रदीप शुक्ला, पंकज शर्मा, गणेश दिवेकर, नेश्मा मैत्री, समय ठक्कर, संजीव तिवारी
निर्मातास्मिता मारू, पंकज शर्मा
प्रदर्शित तारीख२३ ऑक्टोबर २००९
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.३⭐/ ५

बालगणेश २” चित्रपट समीक्षा :-

२००७ साली आलेल्या बालगणेश चा सिक्वेल म्हणजे बालगणेश २ जो विजय एस भानुशाली यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात सुद्धा आपल्याला गणपती बाप्पांची किर्ती, त्यांची हुशारी, अलौकिक बुद्धिमत्ता बघायला मिळते.‌
महर्षी व्यास मुनींनी जेव्हा भारतातील प्रसिद्ध महाकाव्य महाभारत लिहायला घेतलं तेव्हा त्यांना लेखनिक म्हणून एक अत्यंत बुद्धिमान बालकाची गरज होती. यासाठी त्यांनी ब्रम्हदेव यांना विचारले असता त्यांनी बालगणेश याचं नाव सुचवलं. व अशा प्रकारे बालगणेश ने व्यासांना महाभारत लिहायला मदत केली. हिच गोष्ट या चित्रपटात पहायला मिळते. तसेच गजमुकसुर या राक्षसाला बाप्पांनी कसं पराभूत केले होते ही कथा सुद्धा बघायला मिळते. युट्यूबवर हा चित्रपट उपलब्ध आहे.


३. बालगणेश ३
२०१५. ॲनिमेशन, साहसी. १ तास ८ मिनिटे. [ यु ]
लेखक लिली भानुशाली, ओमकार शिवडे
दिग्दर्शकविजय एस. भानुशाली
कलाकारविदित कुमार, परमिंदर घुम्मान, संजीव तिवारी, मनीष भवन, विनोद कुलकर्णी, गणेश दिवेकर, नेश्मा मैत्री, समय ठक्कर
निर्मातास्मिता मारू, पंकज शर्मा
प्रदर्शित तारीख१८ सप्टेंबर २०१५
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.०⭐/ ५

बालगणेश ३” चित्रपट समीक्षा :-

बालगणेश यांनी केलेले पराक्रम फक्त सामान्य मुलांनाच नव्हे तर झेबा नावाच्या परग्रहावरील मुलांना देखील ऐकायला आवडले होते हे सांगणारा हा चित्रपट आहे.
यात आपले उंदीर मामा बालगणेशाच्या अगाध लिला आणि पराक्रम सांगत आहेत. कैलास पर्वतावर स्वतःचं साम्राज्य निर्माण करण्यासाठी आणि महादेवांना पराभूत करण्यासाठी अनेक राक्षसांनी प्रयत्न केले परंतु आपल्या गणेशाने सगळ्यांनाच पळवून लावले. दैत्य सिंधू, दैत्य चंचलासुर, मत्यासुर यासारख्या राक्षसांचा गणेशाने कसा पराभव केला हे या ॲनिमेटेड चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. युट्यूबवर हा चित्रपट तुम्ही बघू शकता.

४. माय फ्रेंड गणेशा
२००७. ॲनिमेशन, परिवार, कल्पना. ३ तास १० मिनिटे. [ यु ]
लेखक एस. सचिंद्र, राजीव एस. रुईया
दिग्दर्शकराजीव एस. रुईया
कलाकार एहसास चन्ना, किरण जनजानी, शितल शाह, उपासना सिंग
निर्मातामनीष रूपारेल, रमन त्रिखा, मितेश मेहता, दीपक भानुशाली, रोनक भगत
प्रदर्शित तारीख६ जुलै २००७
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.९⭐/ ५

माय फ्रेंड गणेशा” चित्रपट समीक्षा :-

आरती आणि आदित्य यांचा आठ वर्षांच्या आशु नावाच्या मुलाची आणि बाप्पाच्या धमाल मैत्रीची ही गोष्ट आहे. आईवडील सतत कामात व्यस्त असल्याने आशु एकटा पडलेला असतो. त्याच्या घरी घरकाम करणाऱ्या मुलीसोबत तो गप्पा मारत असे. असंच एकदा आशु एका पिटुकल्या उंदराला पाण्यातून वाचवतो आणि घरी आणतो. तेव्हा गंगूताई त्याला गणपती बाप्पा आणि त्याचं वाहन उंदीर मामाची गोष्ट सांगते. त्यामुळे आशुला सुद्धा गणपती बाप्पाला घरी आणावं असं वाटतं. आणि गणेश त्याच्या घरी येतो ते त्याचा मित्र बनून. ते दोघे मिळून खूप धमाल करतात. अनेक समस्या सोडवतात. आता कसं ते या चित्रपटात पहायला मिळेलच. तर या गणेशोत्सवात हा चित्रपट आपल्या मुलांना नक्की दाखवा. युट्यूबवर हा चित्रपट तुम्ही बघू शकता.


५. माय फ्रेंड गणेशा
२००८. ॲनिमेशन, परिवार, कल्पना. १ तास ५६ मिनिटे. [ यु ]
लेखक एस. सचिंद्र, राजीव एस. रुईया
दिग्दर्शकराजीव एस. रुईया
कलाकार आयुष शाह, कुरूष डेबू, हर्ष छाया, उपासना सिंग
निर्माताअझिया आचार्य
प्रदर्शित तारीख८ ऑगस्ट २००८
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.१⭐/ ५

माय फ्रेंड गणेशा २” चित्रपट समीक्षा :-

२००७ सखली आलेल्या माय फ्रेंड गणेशा या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. या चित्रपटात सुद्धा वाशु नावाचा मुलगा आहे जो आपल्या आईवडिलांच्या भांडणांना कंटाळला आहे. तो सुद्धा एकटा पडला आहे. तेव्हा त्याच्या घरी असणारी गंगुबाई त्याला गणपती बाप्पाच्या गोष्टी सांगत असे. वाशुच्या हट्टामुळे त्यांच्या घरी गणपती आणतात. परंतु वाशू ला त्याचा मित्र बनून आलेला बाप्पा हवा असतो.
असंच एकदा काही खोडकर मुलं वाशूला त्रास देत असतात तेव्हा वाशू गणेशाचं नामस्मरण करतो आणि चक्क बाप्पा आणि मुशक खरोखर येतात. पण ते इतर कोणाला दिसत नाहीत. अशी हि वाशू आणि त्याच्या फ्रेंड गणेशाची ही गोष्ट आहे. युट्यूबवर हा चित्रपट तुम्ही बघू शकता.


६. माय फ्रेंड गणेशा
२०१०. ॲनिमेशन, विनोदी. २ तास ५ मिनिटे. [ यु ]
लेखक शब्बीर अहमद, एस. सचिंद्र, राजीव एस. रुईया
दिग्दर्शकराजीव एस. रुईया
कलाकार राहुल पेंडकलकर, बाबा सेहगल, इव्हा ग्रोवर, सयाजी शिंदे, मकरंद अनासपुरे
निर्माताअझिया आचार्य
प्रदर्शित तारीख२६ मार्च २०१०
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.९⭐/ ५

माय फ्रेंड गणेशा ३” चित्रपट समीक्षा :-

आधीच्या दोन्ही भागापेक्षा हा चित्रपट थोडासा वेगळा आहे म्हणजे कथा थोडी वेगळी आहे. यात गण्या नावाचा मुलगा आपल्या काका काकी सोबत राहत असतो परंतु ते त्याचा खूप छळ करायचे. त्यामुळे तो एक दिवस घरातून पळून जातो. तेव्हा त्याला गंगूबाई भेटते व तो तिच्यासोबत तिच्या घरी जातो.
पुढे खूप अडचणी येतात. गण्याला शोधून काका पलत त्याला घेऊन जितो परंतु बाप्पाच्या कृपेने गण्या आणि गंगूबाई ची परत भेट होते. या सगळ्यात गणपती बाप्पा गण्याला मदत कलत असतात परंतु ते इतर कोणाला दिसत नाहीत. गण्याला जुळा भाऊ पण असतो जो अगदी विरुद्ध स्वभावाचा असतो. गण्या आणि बाप्पा मिळून कसे संकंटांवर मात करतात हे दाखवणारा एक विनोदी अंगाने जाणारि धमाल चित्रपट आहे. युट्यूबवर हा चित्रपट तुम्ही बघू शकता.

 तर मंडळी तुम्हाला हा लेख कसा वाटला ते नक्की सांगा. आणि या गणेशोत्सवात कोणता चित्रपट बघणार ते कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, 'जगभरून' तर्फे तुम्हाला गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
Content Writer
Writer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *