HomeFilmsMarathi

जानेवारी २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी | या मराठी चित्रपटांनी केली २०२३ ची धमाकेदार सुरवात!

Written by : आकांक्षा कोलते

Updated : फेब्रुवारी 25, 2023 | 11:35 PM

jan 2023 marathi movie list 1

आशयघन आणि दर्जेदार कथानक हा मराठी चित्रपटांचा गाभा आहे. मराठी चित्रपट हे नेहमीच वास्तववादी आणि चांगला कंटेंट घेऊन भेटीला येतात हे आता प्रेक्षकांच्या लक्षात येत आहे. त्यामुळे मराठी चित्रपटांना प्रेक्षक आता भरभरून प्रतिसाद देतात.
२०२२ चा शेवट वेड या चित्रपटाने लोकांना अक्षरशः वेड लावून केला. तर २०२३ ची सुरुवात दणक्यात झालीय का ते आपण बघूया. आज आम्ही तुम्हाला २०२३ मध्ये जानेवारी महिन्यात प्रदर्शित झालेले चित्रपट सांगणार आहोत.

१. सुर्या
२०२३. ॲक्शन, नाटक. २ तास ८ मिनिटे. [ यु / ए ]
लेखकमंगेश ठाणगे
दिग्दर्शकहसनैन हैद्राबादवाला
कलाकारप्रसाद मंगेश, रूचिता जाधव, उदय टिकेकर, अरुण नलावडे,, पंकज विष्णू, प्रदीप पटवर्धन, संदेश भोसले, आर्या पाटील
प्रदर्शित तारीख६ जानेवारी २०२३
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.८⭐/ ५

सुर्या” चित्रपट समीक्षा :-

हसनैन हैद्राबादवाला दिग्दर्शित सुर्या हा एक ॲक्शनने भरलेला चित्रपट आहे. एका चाळीत राहणाऱ्या सुखी कुटुंबाची ही गोष्ट आहे. सुर्या आणि त्याची हे आपल्या आईवडिलांसोबत छान आयुष्य जगत असतात. पण ते ज्या चाळीत राहत असतात. त्या चाळीवर एका नेत्याचा डोळा आहे. जो गुंडांना घेऊन ती चाळ बळकावायला बघत आहे. पण अर्थातच सुर्या या सगळ्याला विरोध करतो यग त्याचा विरोध मोडून काढण्यासाठी किंवा त्याचा काटा काढण्यासाठी हेमंद बिर्जे हे म्हणजे रजाक काय काय करतो हे चित्रपट बघताना कळेल. त्यांचा विरोध करताना सुर्याच्या कुटुंबासोबत काय घडतं आणि सुर्या काय करतो हे समजण्यासाठी चित्रपट पहायला हवा.
चित्रपट बघताना कथा अगदीच तीच तीच आहे असं वाटत राहतं. सुर्याची भूमिका साकारणारा अभिनेता प्रसाद मंगेश याने ॲक्शन सीन चांगले केले असले तरी अभिनयाची जादू त्याला जमलेली नाही. त्याची प्रेयसी रूचिता जाधव हीने चांगला अभिनय केला आहे. त्याचबरोबर उदय टिकेकर, अरुण नलावडे,, पंकज विष्णू, प्रदीप पटवर्धन, संदेश भोसले आर्या पाटील यांच्या भूमिका उत्तम आहेत. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.


२. साथ सोबत
२०२३. नाटक. [ यु / ए ]
लेखकरमेश मोरे
दिग्दर्शकरमेश मोरे
कलाकारमोहन जोशी, संग्राम संमेळ, मृणाल कुलकर्णी ,अनिल गवस, अमोल रेडीज, दिलीप आसुर्डेकर
प्रदर्शित तारीख१३ जानेवारी २०२३
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.५⭐/ ५

साथ सोबत” चित्रपट समीक्षा :-

राष्ट्रीय पारितोषिक विजेते दिग्दर्शक रमेश मोरे यांनी दिग्दर्शित केलेला ‘साथ सोबत’ हा चित्रपट बऱ्याच जणांना माहित नाही. कारण इतर चित्रपटांसारखं याच फारसं प्रमोशन केलं नाही. संग्राम संमेळ आणि मृणाल कुलकर्णी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात मोहन जोशी यांची सुद्धा मुख्य भूमिका आहे. त्याचसोबत राजदत्त, अनिल गवस, अमोल रेडीज, दिलीप आसुर्डेकर आदी कलाकारांच्याही भूमिका आहेत.
चित्रपटाची कथा सांगायची झाली तर प्रत्येकाला सोबतीची गरज ही असतेच त्यातही वयाच्या विशेष टप्प्यात म्हणजेच म्हातारपणात ती जास्त जाणवते. पण हल्ली कोकणात सर्वत्र चित्र दिसतं ते म्हणजे नोकरी धंद्यानिमित्त तरूण मंडळी शहराकडे धाव घेते. आणि गावी मागे राहतात ते म्हातारे आईवडील किंवा वृद्ध माणसं. ज्यांना आता आजुबाजुला माणसं असण्याची जास्त गरज वाटतेय. एकंदर नातेसंबंधांवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. त्यातच फुलणारी प्रेमकथा सुद्धा यात आहे.
चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे संपूर्णपणे हा चित्रपट कोकणात चित्रित करण्यात आलेला आहे. त्यामुळे चांगल्या पटकथा आणि अभिनयासोबतच कोकणातील कौलारू घरं, हिरवीगार झाडं हे सगळं बघणं म्हणजे डोळ्यांना मिळणारा सुखद गारवा. खरं तर असे चांगले संदेश देणारे चित्रपट फारसे लोकांना आवडत नाहीत. पण जरूर पहावा असा हा चित्रपट आहे. एका तरी पात्रासोबत तुम्ही रिलेट कराल किंवा त्यात तुम्हाला तुमचं कोणीतरी दिसेल. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.


३. व्हिक्टोरिया : एक रहस्य
२०२३. भयपट, रोमांचक. १ तास ४९ मिनिटे. [ यु / ए ]
लेखकओमकार गोखले
दिग्दर्शकविराजस कुलकर्णी , जीत अशोक
कलाकारसोनाली कुलकर्णी, आशय कुलकर्णी, पुष्कर जोग
प्रदर्शित तारीख१३ जानेवारी २०२३
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.१⭐/ ५

व्हिक्टोरिया : एक रहस्य” चित्रपट समीक्षा :-

हॅारर मिस्ट्री थ्रिलर अशा जॉनरचा हा चित्रपट असून सोनाली कुलकर्णी आणि आशय कुलकर्णी यांच्या यात मुख्य भूमिका आहेत. स्कॉटलंडमध्ये आराम करण्यासाठी म्हणून गेलेल्या या जोडप्याची ही गोष्ट आहे. रहस्यमय भयकथा असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन विराजस कुलकर्णी आणि जीत अशोक यांनी केलं आहे. या दोघांचाही हा पहिलाच प्रयत्न असून त्यांनी चांगल्या प्रकारे जबाबदारी पेलली आहे.
सुरूवातीला चित्रपटाची कथा संथ गतीने सुरू राहते त्यामुळे बघताना थोडा कंटाळा येऊ शकतो. पण अंकीता आणि सिद्धार्थ सुट्टीसाठी स्कॉटलंडमध्ये ज्या व्हिलामध्ये थांबले आहेत तिथे त्यांना होणारे भास, विचित्र आवाज, घटना हे सगळंच बघताना उत्कंठा आणि भीती वाटते. ज्या व्हिलामध्ये ते थांबलेत तो सिद्धार्थच्या काकांचा असून पूर्वी ते एक हॉटेल होतं. शहरापासून दूर असलेल्या या व्हिलामध्ये राहणाऱ्या अधिराज काकांच वागणं पण बऱ्याचदा संशयास्पद वाटतं. त्यांचा या सगळ्यात काही हात असतो का हे बघण्यासाठी चित्रपट नक्की बघा. हे रहस्य उलगडण्यासाठी “व्हिक्टोरिया: एक रहस्य” हा चित्रपट तुम्ही जरूर बघा. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.


४. वाळवी
२०२३. विनोदी. १ तास ४६ मिनिटे. [ यु / ए ]
लेखकमधुगंधा कुलकर्णी, परेश मोकाशी
दिग्दर्शकपरेश मोकाशी
कलाकारस्वप्नील जोशी,सुबोध भावे,अनिता दाते,शिवानी सुर्वे,नम्रता संभेराव
प्रदर्शित तारीख१३ जानेवारी २०२३
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.१⭐/ ५

वाळवी” चित्रपट समीक्षा :-

दिग्दर्शक परेश मोकाशी यांचे या आधीचे चित्रपट जर तुम्ही पाहीले असतील तर तुम्हाला कल्पना असेलच की हा चित्रपट नक्कीच उत्तम असणार. पण यावेळी फक्त उत्तमच नाही तर वेगळा अनुभव परेश मोकाशी यांनी प्रेक्षकांना दिला आहे. डार्क ह्युमर आणि सस्पेन्स क्राईम जॉनर असलेला हा यांचा पहीलाच चित्रपट. मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी यांनीच या चित्रपटाची कथा पटकथा लिहिली आहे.
अनिकेत म्हणजे स्वप्नील जोशी आणि त्याची बायको अवनी अनिता दाते या दोघांनी सोबत आत्महत्या करायची असा प्लॅन केला आहे. अवनी म्हणजे अनिता दाते ही डिप्रेशनमधे असते आणि तीची ट्रिटमेंट चालू असते मनोविकार तज्ञ डॉ हर्षवर्धन म्हणजे सुबोध भावे यांच्याकडे. अवनीच्या याच मानसिक अवस्थेचा फायदा अनिकेत ला घ्यायचा आहे.
आत्महत्या कशी आणि कधी करायची हे सगळं प्लॅनिंग स्वप्नील जोशी करतो आणि त्याच्या सोबत त्याची प्रेयसी वेदिका म्हणजे शिवानी सुर्वे असते, जी एक डेंटिस्ट आहे. त्यांचा खरा प्लॅन असतो की अनिकेत फक्त नाटक करणार पण अवनी खरोखरच आत्महत्या करणार. म्हणजे खुनाचा आळ वैगरे येण्याचा प्रश्नच नाही. प्लॅन पार पडतो की नाही हे चित्रपटात कळेल. पण इथेच येतो पहीला ट्विस्ट. आणि संपूर्ण चित्रपटात ट्विस्टची मालिका सुरू राहते. हि वाळवी प्रेक्षकांचा मेंदू पोखरणार यात शंकाच नाही.
अभिनयाच्या बाबतीत तर सगळेच कलाकार अव्वल आहेत. कोणापेक्षा कोण सरस हे ठरवणं फारच अवघड. नक्कीच बघावा असा हा चित्रपट आहे. चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा. माझ्याकडून या चित्रपटाला साडेतीन स्टार.


५. सरला एक कोटी
२०२३. नाटक. २ तास २ मिनिटे. [ यु / ए ]
लेखकनितीन सुपेकर
दिग्दर्शकनितीन सुपेकर
कलाकारओंकार भोजने, ईशा केसकर, छाया कदम
प्रदर्शित तारीख१३ जानेवारी २०२३
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.४⭐/ ५

सरला एक कोटी” चित्रपट समीक्षा :-

सरला एक कोटी हा चित्रपट मनोरंजन करणारा तर आहेच पण त्यासोबत स्त्री कडे फक्त उपभोगाची गोष्ट म्हणून बघणाऱ्या लोकांच्या कानाखाली सणसणीत चपराक देणारा देखील आहे. “अंगभर कपडे घालूनसुद्धा बाई उघडी असते!” हा संवाद चित्रपटाचं सार सांगून जातो.
नितीन सुपेकर यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात ओंकार भोजने आणि इशा केसकर हे दोघं मुख्य भूमिकेत आहेत. एका गावातील ही जुगाराच्या डावात स्वतःच्या बायकोची बोली लावून ती हरलेला भिकाजी आणि त्याची बायको सरला यांची ही गोष्ट आहे. भिकाजी हा रोजंदारीवर काम करणारा साधा मजूर आहे. त्याची आई त्याचं लग्न आपल्याच माहेरच्या गावातील सरला सोबत लावून देते. भिकाजी हा दिसायला पण अगदीच बरा असल्याने गावातील लोक, मुलं त्याला चिडवतात की इतकी सुंदर बायको याला कशी काय बरं मिळाली. या भिकाजीला पत्ते खेळायचा नाद असतो. त्यामुळे असंच एकदा तो पत्त्यांचा डाव खेळताना चक्क सरलाची बोली एक लाखाला लावतो आणि हरतो. पुढे आता सरलाला वाचवायला आधुनिक काळातील कृष्ण येतो की स्वतः यातून बाहेर पडते की काय होतं हे बघण्यासाठी हा चित्रपट तुम्ही नक्कीच पहावा.
पुर्वार्ध कंटाळवाणा वाटू शकतो पण उत्तरार्धात मात्र चित्रपट वेग पकडतो. कथा वेगळी आहे त्यामुळे अजून छान खुलवता आली असती. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.


६. बांबू
२०२३. विनोदी. नाटक. २ तास ६ मिनिटे. [ यु / ए ]
लेखकअंबर हडप
दिग्दर्शकविशाल देवरूखकर
कलाकारअभिनय बेर्डे, वैष्णवी कल्याणकर, पार्थ भालेराव
प्रदर्शित तारीख२६ जानेवारी २०२३
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.५⭐/ ५

बांबू” चित्रपट समीक्षा :-

अभिनय बेर्डे, वैष्णवी कल्याणकर आणि पार्थ भालेराव यांच्या मुख्य भूमिका असलेला बांबू हा चित्रपट २६ जानेवारी ला प्रदर्शित झाला. खरं तर शाहरुखच्या पठाण या चित्रपटामुळे बऱ्याच मराठी चित्रपटांना फटका बसणार हे निश्चित होतंच आणि तसंच झालं.
तेजस्विनी पंडित हिची निर्मिती असलेला हा पहिला चित्रपट. ज्याची कथा अगदीच सुमार असं म्हणावं लागेल. कथेत काहीच नाविन्य नाही. एका वाक्यात सांगायचे झाले तर, अभिनय बेर्डे चा मित्र पार्थ च त्याच्या प्रेमाचे कसे बांबू लावतो ही या चित्रपटाची गोष्ट.
चित्रपटगृहात जाऊन बघण्यासारखं असं काही नाही. सगळ्यांचा अभिनय पण चांगला आहे. भारी म्हणावं असं या चित्रपटात काहीच नाही. त्यातल्या त्यात लैंगिक शिक्षणाविषयी जागृती हा एक प्लस पॉइंट आहे यामध्ये. हल्लीच्या मुलांना लैंगिक शिक्षण देणे किती गरजेचं आहे यावर हा चित्रपट भाष्य करतो. कथाच दमदार नसल्याने दिग्दर्शक विशाल देवरूखकर यांना तसाही फार वाव नव्हता. माझ्याकडून या दिड स्टार.

हे पण वाचा –

२०२३ ची दमदार सुरुवात करणारे “हे” धमाकेदार चित्रपट तुम्ही पाहीलेत का.? | जानेवारी २०२३ मधील प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपट

तर मित्रांनो, यापैकी कोणते चित्रपट तुम्ही पाहीलेत आणि या विकेंड ला कोणते बघायला जाणार आहात हे कमेंट करून नक्की सांगा.

Content Writer
Writer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *