“शेखर होम्स” वेबसिरीज समीक्षा | ट्विस्ट.. टर्न्स… सस्पेन्सने भरलेली…विचार करायला लावणारी वेबसिरीज
“शेखर होम्स” वेबसिरीज समीक्षा | ट्विस्ट.. टर्न्स… सस्पेन्सने भरलेली…विचार करायला लावणारी | “Shekhar Homes” Webseries Review | Twists.. Turns… Full of Suspense… Thought-provoking
Written by : आकांक्षा कोलते
Updated : जून 12, 2025 | 10:22 PM
ट्विस्ट.. टर्न्स… सस्पेन्सने भरलेली…विचार करायला लावणारी तरीही हलकीफुलकी के के मेननची “शेखर होम्स” ही वेबसिरीज एकदा नक्की बघा.

शेखर होम्स (Shekhar Home) |
लेखक | अनिरुद्ध गुहा, निहारीका पूरी, वैभव विशाल |
दिग्दर्शक | रोहन सिप्पी, सृजित मुखर्जी |
कलाकार | के के मेनन, रणवीर शौरी,रुद्रनिल घोष, रसिका दुग्गल, किर्ती कुलहरी |
निर्माता | अनिरुद्ध गुहा, सृजित मुखर्जी |
सीजन | १ |
रिलीज तारीख | १० ऑगस्ट २०२४ |
भाषा | हिंदी |
“जगभरून फिल्म्स” वेबसिरीज समीक्षा :-
सध्या वाढत असलेलं तापमान आणि ऊन बघता घराबाहेर पडू नये असं वाटतं. पण मग विकेंडला घरात बसून तरी काय करावं.? हाही एक प्रश्नच.! बरं हल्ली बरे असे चित्रपट संख्येने कमी त्यातही ओटीटी वर यायला एक दोन महिने जातात. पण तुम्ही काळजी करू नका. या विकेंडला काय बघायचं प्रश्न पडलाय तर डिस्नी हॉटस्टार शेखर होम्स ही वेबसीरीज तुम्ही नक्कीच बघू शकता. विकृत खूनांची मालिका नाही की सायको किलर नसलेली सस्पेन्स थ्रिलर रहस्यमय परंतु तरीही हलकीफुलकी अशी ही सिरीज नक्कीच एकदा बघायला हरकत नाही.
हल्ली सस्पेन्स थ्रिलर चित्रपट किंवा वेबसिरीज म्हटलं की एक सायको सिरियल किलर असतो, जो जेव्हढं जमेल तेवढ्या क्रुर आणि विकृत पद्धतीने एकामागोमाग एक खून करत सुटतो. बऱ्याचदा तसे सीन्स बघताना अक्षरशः अंगावर येतात. नाही म्हटलं तरी त्याचा परिणाम आपल्या मनावर होतोच परंतु सस्पेन्स थ्रिलर आपल्या बुद्धीला चालना देणारं काहीतरी असं बघायला आपल्याला आवडतं.
शेखर होम्स ही वेबसिरीज तशी फार अनपेक्षित क्लायमॅक्स आहे अशी नाहीय. बऱ्याचदा प्रेडिक्टेबल किंवा अगदी शेवटी सुद्धा थोडाफार बांधलेला आपला अंदाज खरा होईल अशीच आहे तरीही शेवटपर्यंत बघायला लावणारी आणि तुम्हाला विचार करायला भाग पाडणारी अशी आहे. एकूण सहा भागांची ही मालिका तुम्हाला नक्की आवडेल. आर्थर कॉनन डॉयल याच्या “शेरलॉक होम्स” पासून प्रेरित असलेली ही एक मजेशीर वेबसिरीज आहे.
सहा भाग हे वेगवेगळ्या केसेस वर आधारित आहेत तरीही एकमेकांशी जोडलेले आहेत. कथा आहे १९९०च्या दशकातील. बंगालमधील लोनपुर नावाच्या छोट्याशा गावात राहणारा शेखर होम्स (केके मेनन) हा एक गुप्तहेर आहे जो प्रचंड तल्लख बुद्धीचा आहे. जे दिसतंय त्याच्या पलिकडे जाऊन बघणारा हा शेखर होम्स छोट्या मोठ्या केसेस अगदी चुटकीसरशी सोडवत असतो. गावातील पोलिस इन्स्पेक्टर लाहा (रुद्रनिल घोष) सुद्धा प्रत्येक केस सोडविण्यासाठी शेखर होम्स कडे येत असतो.
सुरूवात होते ती एका बकरीच्या शोधा पासून. गावातील एका शेतकऱ्याची बकरी अगदी काही मिनिटांतच शोधून बकरी कोणी चोरलीय हे सुद्धा शेखर होम्स अगदी चलाखीने शोधून काढतो ते बघून सुरूवातीला एकंदरीत मालिका कशी आहे याबद्दल थोडा संशय येतो परंतु पुढचे भाग बघितल्यावर आपला इंटरेस्ट नक्कीच वाढतो. त्याच गावात होणाऱ्या खूनांचा शोध घेण्यासाठी इन्स्पेक्टर लाहा शेखर होम्स येतो तेव्हा निव्वळ आपल्या चाणाक्ष बुद्धीमत्ता आणि निरिक्षण याच्या जोरावर शेखर केसेस सोडवत असतो. पहीलीच केस एका सायको सिरियल किलर ची असते जी शेखर खूप कमी वेळात सोडवतो. शेखरच्या मदतीला त्याचा पार्टनर जयव्रत सैनी (रणवीर शौरी) याची सुद्धा महत्वाची भूमिका आहे. एक्स-आर्मी डॉक्टर असलेला जयव्रत हा मानसिक शांती मिळवण्यासाठी त्या शहरात नव्याने आलेला असतो आणि शेखरचा रूम पार्टनर असतो. शेखर आणि जयव्रत यांची कमी वेळात घट्ट मैत्री होते. त्यानंतर आलेल्या प्रत्येक केसमध्ये जयव्रत सुद्धा शेखरला मदत करतो. फक्त लोनपूर गावातच नाही तर शहराबाहेर सुद्धा शेखर आणि जयव्रत केसेस सोडविण्यासाठी जात असतात. अशातच एका शहरात काही राजकीय नेत्यांना ब्लॅकमेल करणारे व्हिडिओ येतात. ते व्हिडिओ कोण पाठवतंय आणि कोण ब्लॅकमेल करतंय याचा शोध घेण्यासाठी शेखरला बोलवलं जातं. तिथं गेल्यावर एक केस सोडवता सोडवता वेगळीच रहस्यं बाहेर पडतात. तसेच तिथे शेखरची ओळख इरावती(रसिका दुग्गल) हीच्याशी होते आणि अर्थातच त्यांच्यात एक अनामिक नातं तयार होतं. पुढे जाऊन हीच इरावती भास्करविला बंगल्यातील एक मालक रवीने केलेल्या आत्महत्येची केस घेऊन येते. दिडशे वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेला सरकटा परत आलाय आणि त्यानेच रवी यांचा खून केला आहे अशी बातमी गावभर पसरते. आणि यामागचं सत्य शोधून काढण्यासाठी शेखर तिथे जातो. आणि त्या बंगल्यात दडलेली अनेक रहस्यं बाहेर पडतात. हा भाग खूप रंजक आणि ट्विस्ट असलेला आहे.
खरं तर या सगळ्या छोट्या मोठ्या केसेस मागे खरी केस ही असते की दोन वर्षांपूर्वी एकाच ठिकाणी काम करत असलेल्या तीन वैज्ञानिकांचा झालेला खून आणि त्यामागचं रहस्यं. हे खून एका फॉर्म्युला साठी झालेले असतात. असा फॉर्म्युला ज्यामुळे असंख्य लोकांना एकाच वेळी ठार मारलं जाऊ शकतं आणि त्याचं कारण सुद्धा नंतर कळणार नाही. खरं तर सुरूवातीला या सगळ्यामागे मृण्मय(किर्ती कुलहरी) असते असा प्राथमिक अंदाज असतो. परंतु हा फॉर्म्युला बनवण्यामागे मुख्य सुत्रधार एम हा असतो. हा एम कोण हे कोणालाच माहीत नसतं. त्या एम पर्यंत शेखर पोहचणार असतोच परंतु काही कारणास्तव शेखरलाच ते शहर सोडून लोणपूर गाठावं लागतं.
आता खरा एम कोण असतो..? तो फॉर्म्युला बनवण्यामागे त्याचा हेतू काय असतो..? शेखरला तो सापडतो का.? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शेवटच्या भागात मिळतात त्यासाठी तुम्हाला ही सिरीज बघावी लागेल. सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली तरी या वेबसिरीजचा अजून एक सिक्वेल येईल अशी हिंट शेवटच्या भागात मिळते.
के के मेनन याच्या अभिनयाबद्दल काही सांगण्याची गरज नाही परंतु त्याला तोडीस तोड असा अभिनय रणवीर शौरी याने केला आहे. रसिका दुग्गल सुद्धा उत्तम आहे. किर्ती ला मुळातच खूप कमी भूमिका वाट्याला आली आहे. इतरही सगळ्याच कलाकारांचा अभिनय छान आहे. रोहन सिप्पी आणि सृजित मुखर्जी यांचं दिग्दर्शन चांगलं आहे. बंगालचं सौंदर्य छान पद्धतीने अनुभवता येतं. काही ठिकाणी काही सीन्स अगदीच ठिकठाक वाटतात. किंवा काही गोष्टी, लॉजिक न पटणारं वाटतं. परंतु एकंदरीत सगळे एपिसोड एन्जॉय करू शकतो असे आहेत. माझ्याकडून या वेबसिरीजला तीन स्टार.
मंडळी तुम्हाला ही वेबसिरीज आवडली की नाही ते जरूर कळवा.